टपाल तिकीटाचे पर्फोरेशन

आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेक गोष्टी वापरत असतो किंवा बघत असतो. या छोट्या छोट्या गोष्टींना आपण हाताळत असलो तरीही त्या गोष्टींबद्दल फारसं कुतुहल आपल्या मनात नसतं असाच एकदा मनात एक विचार आला की या गोष्टींच्या शोधापर्यंत पोहोचलं पाहिजे. या आपल्याला क्षुल्लक वाटणार्‍या गोष्टींच्या शोधांचा घेतलेला वेध.

टपालसेवा चालू झाली त्यावेळी त्याला तिकीट लावण्याची प्रथा नव्हती. टपालाचा खर्च हा ज्या व्यक्तीला टपाल पाठवले जात असे त्याच्याकडून वसुल केला जात असे. पण बर्‍याच वेळा ज्याच्या नावे पत्र पाठवले जाई तो पत्र स्विकारण्यास नकार देत असे. त्यामुळे अशा पत्रांचा खर्च टपाल खात्यावर पडत असे. १८३७ साली रोलॅण्ड हिल या ब्रिटिश शाळाशिक्षकाने टपालाला तिकीट लावण्याची संकल्पना पहिल्यांदा मांडली. टपाल पाठवण्याचा खर्च हा तिकीटाची किंमत या रुपात टपाल पाठवणार्‍याकडून आधीच वसुल केल्यामुळे वरील समस्या राहणार नाही अशी त्याची कल्पना होती. ह्या संकल्पनेवरुन १८४० साली ब्रिटिश टपाल खात्याने पेनी ब्लॅक हे जगातील पहिले तिकीट वितरीत केले.

stamp-Penny-Black

पर्फोरेशन म्हणजे एका सरळ रेषेत बारीक भोकांची एक सलग ओळ. त्यामुळे कागद एकमेकापासून विलग करण्यास सोपे जाते. यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन छिद्रांमधील अंतर. हे अंतर कमी असले तर कागद हाताळतानाही विलग होण्याची शक्यता असते तर हे अंतर जास्त असल्यास कागद विलग करताना फाटण्याची शक्यता असते.तुमच्या घरी पायानी चालवण्याचे शिवणयंत्र असेल तर शिवणयंत्राच्या सुईला धागा न लावता कापडाऐवजी कागद घातल्यास त्याला भोकांचे पर्फोरेशन होते.

आरंभीच्या काळात मोठ्या कागदावर छापलेली तिकीटे ही कात्री किंवा ब्लेडने कापावी लागत. यात वेळही जात असे व कापताना चुकाही होत असत. तिकीटे एकमेकांपासून वेगळी करण्याच्या या समस्येवर १८४७ साली हेन्री आर्चर या आयरीश संशोधकाने पहिले पर्फोरेशन यंत्र बनवले व ह्या यंत्राचे सादरीकरण तेथील टपाल खात्याला केले गेले. हेन्रीने सादर केलेला दोन यंत्रांद्वारे केल्या जाणाऱ्या पर्फोरेशनचा हा प्रयोग फसला. हेन्रीने केलेल्या या यंत्रांनी होणारे पर्फोरेशन भोकांचे नव्हते. त्याला लावलेल्या छोट्या ब्लेडच्या ओळीने कागदाला एका रेषेत कापले जात असे. यालाच राऊलेट तंत्र असे म्हणले जाते.

Archer_Roulette
राऊलेट तंत्राने केलेले पर्फोरेशन

त्यानंतर १८४८ साली हेन्रीने छोट्या पिनांनी भोकांचे पर्फोरेशन यंत्र बनवले व त्याचे पेटंट घेतले. या यंत्राद्वारे तिकीटांच्या कडा व दोन तिकीटांच्या ओळीमधे एकाचवेळी परफोरेशन करता येऊ लागले. या पर्फोरेशनला कोम्ब पर्फोरेशन असे म्हणले जात असे. १८४९-५० साली ब्रिटिश टपाल खात्यामार्फत या पर्फोरेशन यंत्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या. जून १८५३ रोजी या यंत्राचे पेटंट ब्रिटिश टपाल खात्याने ४००० पौंडास हेन्री करुन विकत घेतले. हेन्रीने शोधलेल्या या संकल्पनेवर आधारीत नेपियर अ‍ॅण्ड सन लि. या कंपनीने टपाल खात्यास पर्फोरेशन यंत्रे बनवून दिली. प्रारंभी ही यंत्रे महसुली तिकीटांसाठी वापरली गेली. १८५४ सालापासून मग टपाल तिकीटांना पर्फोरेशन करण्यासाठी ही यंत्रे वापरली जाऊ लागली.

CanadaPerf1
पहिल्या पर्फोरेशन यंत्राची आकृती

१८५४ साली बेमरोज बंधुंनी रोटरी पर्फोरेशन यंत्राचे पेटंट घेतले. परंतू हे यंत्र टपाल तिकीटांना पर्फोरेशन करण्यास कुचकामी ठरले. १८५६ साली जॉर्ज होवार्ड या सुताराने या यंत्रात काही जुजबी बदल करुन ते अमेरिकन टपाल खात्याला दिले. त्यानंतर सरळ रेषेत पर्फोरेशन करणार्‍या व रोटरी तंत्रज्ञानावर आधारीत असलेल्या यंत्रांमधे अनेक सुधारणा केल्या गेल्या. आजही या तंत्रावर आधारीत असलेली यंत्रे पर्फोरेशनसाठी वापरली जातात. टपाल तिकीटांबरोबरच बांधणी केलेल्या बिलबुकांमधील बिले फाडण्यासाठी किंवा एखाद्या फॉर्मचा काही भाग फाडून देण्यासाठी पर्फोरेशन तंत्राचा उपयोग केला जातो.

CanadaPerf3
रोटरी पर्फोरेशन

नंतरच्या काळात राऊलेट तंत्रातही सुधारणा झाली. परंतु हे तंत्र टपाल तिकीटांसाठी फारसे वापरले गेले नाही. बॅंकेकडून मिळणार्‍या चेक्सना या प्रकारचे पर्फोरेशन असते.

कौस्तुभ मुदगल

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: