एखादी माहिती छापणे किंवा एखाद्या दस्तऐवजाची दुसरी प्रत(copy) तयार करणे आज आपल्यासाठी विशेष अवघड नाही. आतातर आपण soft copies वापराकडे वाटचाल करत आहोत. पण एकेकाळी देवनागरी लिपीत छपाई करता यावी म्हणून एका गृहस्थाने भयंकर खटपट केली त्याचीच ही गोष्ट.
वर्ष सुरू आहे १६७०, सुरतेतील ईस्ट इंडिया कंपनीच्या मुख्य कार्यालयात कंपनीच्या मुंबई कार्यालयामार्फत एका भारतीय माणसाने लिहिलेले पत्र येऊन पडलेले आहे. सुरतेमधील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याचं अनेकदा वाचन केले आणि शेवटी ते लंडन ऑफिसला शिफारसीसह पाठवून दिले.
पत्र पाठवणारा हा गृहस्थ होता भीमजी पारेख (किंवा पारीख) आणि त्याला मुंबईत एक छापखाना सुरू करायचा होता. त्यासाठी त्याने कंपनीकडे एक छपाईयंत्र आणि ते चालवण्यासाठी एक कुशल तंत्रज्ञ मागितलेला होता.महाराष्ट्रात अजून पुरंदरच्या तहाची आणि आग्रा भेटीनंतरची शांतता नांदते आहे आणि त्याचवेळी हा भीमजी मुंबईत एक छापखाना सुरू करून हिंदूंचे ग्रंथ छापण्याच्या खटपटीत आहे.त्यासाठी त्याने थेट फिरंगी साहेबाच्या देशातून एक तंत्रज्ञ मागवलेला आहे आणि त्याचा पगार म्हणून तो त्याला वार्षिक ५० पौंड देणार आहे.
या भीमजीची बाकीची काही माहिती सापडत नाही,हा कोण? कुठला? काही म्हणता काही माहीत नाही. छापखाना सुरू करण्याच्या विचाराच्या आधी त्याने काहीतरी छापलेले बघितले असावे त्यानंतर त्याने आपल्या चौकसबुद्धीने छपाईचे तंत्र जाणून घेतले असावे आणि मग त्याला असेच आपण आपले धर्मग्रंथही छापू शकू हे सुचले असावे. नक्की सांगता येत नाही पण त्याच्या डोक्यात कुठूनतरी हे छपाईचं खूळ आलं हे निश्चित.
तंत्रज्ञ मिळवण्याची भीमजीची खटपट बराच काळ चालली आणि मग शेवटी मेहेरबान कंपनी साहेबांनी भीमजीची मागणी मान्य करत १६७४ साली हेन्री हिल नावाचा एक छपाई तंत्रज्ञ,छपाईचे यंत्र,कागद आणि इतर जरुरीच्या वस्तू मुंबईला पाठवून दिल्या. बिलंदर ब्रिटिश लोक कोणतीही गोष्ट अशी सरळ आणि निर्हेतुकपणे थोडीच करतील? या सर्वांमागेही त्यांचा छुपा हेतू होताच.भारतात छपाई सुरू झाल्यावर ख्रिस्ती धर्मग्रंथ छपाईसाठी आणि धर्मप्रसारासाठी त्याचा उपयोग होईलच की !
हेन्री हिल भारतात आला. तो अत्यंत निष्णात तंत्रज्ञ होता पण त्याला अक्षरे तयार करण्याचे ज्ञान नव्हते आणि भूर्जपत्रावर लिहिलेल्या ग्रंथातील अक्षरे समजून घेणेही त्याच्याच्याने निभेना. हेन्रीने आणलेल्या इंग्रजी अक्षरांप्रमाणे देवनागरी अक्षरे करण्यासाठी भीमजी आणि हेन्री यांनी बराच प्रयत्न केला आणि त्यात त्यांना थोडेफार यश मिळाले. त्याने छापलेले कागद वाचण्याजोगे असल्याचे मत कंपनीच्या पत्रांतून व्यक्त केलेले आढळते.
भीमजी मात्र अजूनही समाधानी नव्हता त्याला हव्या असलेल्या दर्जाचे छापणे अजून तरी साधलेले नव्हते. १६७६ साली त्याने कंपनीकडे founder आणि caster म्हणजे धातू ओतणारे कारागीर पुरवण्याची मागणी केली. कंपनीच्या पत्रव्यवहारातून १६७७ साली असे कारागीर पाठवून दिल्याचीही नोंद आढळते.
काय विलक्षण माणूस असावा हा भीमजी पारेख? एखादी गोष्ट डोक्यात घेतल्यावर पुढची ८-१० वर्षे त्याने त्यावर झपाटून काम केले. विदेशी कारागिराला आपल्याला नक्की काय हवे आहे हे समजावून सांगण्यापासून, या तंत्रात काय सुधारणा करावी लागेल हे समजावून घेतल्यानंतर हवे असलेले कारागीर विदेशातून पुन्हा मागवणे. किती खटाटोप करावा या गृहस्थाने? धन्य त्याच्या जिद्दीची.
या सगळ्यानंतर भीमजीच्या प्रयत्नांना यश आले का, त्याच्या योजनेप्रमाणे त्याला हिंदूंचे धर्मग्रंथ छापता आले का? या प्रश्नांचे काहीच उत्तर सापडत नाही. भीमजी पारेख इतिहासात पुन्हा कुठेतरी हरवून जातो.
जादा कलम :- देवनागरी छापणे शक्य झाले असो वा नसो पण भीमजीने मागवलेले यंत्र आणि इंग्रजी अक्षरे यांनी भारतातील छपाईचा पाया घातला असावा असे मानायला हरकत नाही.१६८८ साली भारतात आलेला एक ब्रिटिश अधिकारी कॅप्टन अलेक्झांडर हॅमिल्टन याने मुंबईच्या कंपनीच्या कार्यालयात काही छापील कागदपत्रे बघितल्याचे नोंदवून ठेवले आहे.
* भारत म्हणजे ब्रिटिश अधिपत्याखालचा भारत(British India) असा अर्थ इथे अपेक्षित आहे. फ्रेंच किंवा पोर्तुगीज अधिपत्याखालील भारतातील मुद्रणासंबंधीच्याही काही नोंदी आहेत त्या येथे गृहीत धरलेल्या नाहीत
Leave a Reply