मानवाला स्वातंत्र्याची आस अगदी जन्मापासूनच असते. परकीय राज्यकर्त्यांनी लादलेल्या गुलामगिरीच्या जोखडातून बाहेर पडण्यासाठी जगातील अनेक देशांमधे मोठमोठ्या चळवळी होऊन गेल्या आहेत. या झाल्या राजकीय स्वातंत्र्य चळवळी.
अधूनमधून आपण वर्तमानपत्रात तुरुंगातून कैदी पळुन गेल्याच्या बातम्या वाचत असतो. या पलायनालाही स्वातंत्र्याची ओढच कारणीभूत असते. जन्मठेप झालेल्या कित्येक कैद्यांनी केवळ आणि केवळ स्वातंत्र्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करुन पलायन केलेले आहे. यातला एक महत्वाचा प्रयत्न म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा. बोटीतून उडी मारुन पोहत जाऊन फ्रेंच किनाऱ्याला जाण्याचा त्यांचा प्रयत्न धाडसीच म्हटला पाहिजे.
पॅपिलॉन, डेझर्टर अशा कादंबऱ्याममधून आपण अशा पलायनाच्या कथा वाचल्या असतीलच याचबरोबर अशा पलायनाच्या कथांवर अनेक चित्रपटही निघाले. याच विषयावरचा ‘एस्केप फ्रॉम अल्काट्राझ’ नावाचा एक चित्रपट कॉलेजला असताना बघण्यात आला. पण त्यावेळी त्याची कथा अविश्वसनीय वाटली होती. पण पुढे आंतरजालावर धुंडाळताना या विषयी माहिती वाचनात आली आणि चित्रपटाची कथा खरी होती हे लक्षात आले. ही पलायनाची सत्यकथा आजपर्यंत तुरुंगातून पलायन केलेल्या इतर कथांपेक्षा अत्यंत रोचक आहे.
अल्काट्राझ नावाचं एक बेट सॅन फ्रान्सिस्को जवळील उपसागरात आहे. सॅन फ्रान्सिस्को पासून सुमारे १.२५ मैल आत समुद्रामधे हे बेट आहे. १७७५ साली जुआन मॅन्युएल या स्पॅनिश माणसाने ह्या माणसाने या बेटाची नोंद केलेली आढळते. त्याला या बेटावर मोठ्या संखेने पेलिकन पक्षी दिसले त्यावरून या बेटाला त्याने अल्काट्राझ हे नाव दिले. १८६३ नंतर या बेटाचा उपयोग युध्दकैद्यांना कैदेत ठेवण्यासाठी केला जाऊ लागला. १९३३ साली अमेरिकन सरकारने गुन्हेगारांसाठी या तुरुंगाचा उपयोग सुरु केला. या बेटावर अतिशय खतरनाक कैद्यांना ठेवले जात असत. तुरुंगातून पळून जाण्याचे प्रयत्न करणाऱ्या कैद्यांना या बेटावर पाठवले जात असे. उपसागरातील अतिथंड व वेगाने वाहणाऱ्या प्रवाहांमुळे या बेटावरुन पलायन करणे अशक्य होते. याचबरोबर पाण्यामधे शार्कसारखे खतरनाक मासे असल्याच्या वावड्या मुद्दाम पसरवण्यात आल्या होत्या. या बेटावर अमेरिकेतील अल कपोन, मशिनगन केली, निकी कोविन, रॉबर्ट स्ट्राऊड या सारखे अत्यंत खतरनाक कैदी ठेवले होते. तुरुंगात एकावेळी ६०० कैदी ठेवता येतील एवढे कक्ष होते. पण या तुरुंगात केवळ २०० कैदी ठेवलेले होते व या कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्षक नेमलेले होते. दर १५ मिनिटांनी हे रक्षक टेहाळणी करण्यासाठी फेऱ्या मारत असत. या रक्षकांना पलायन करणार्या कैद्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश होते.
जून १९६२ साली या बेटावरुन तीन कैद्यांनी पलायन केले. त्या आधी या बेटावरुन पळुन जाण्याचे १४ प्रयत्न झाले होते व ते सगळे प्रयत्न फसले होते. जॉन अॅंग्लिन व क्लॅरेन्स अॅंग्लिन हे दोन भाऊ छोट्या मोठ्या चोऱ्या करण्यात माहीर होते. १९५६ साली त्यांना एका बॅंक लुटण्याच्या अपराधात त्यांना २० वर्षांची शिक्षा झाली. त्यांना फ्लोरिडा येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. तेथून त्यांनी पलायनाचे अनेक प्रयत्न केले. त्यामुळे त्यांची रवानगी अल्काट्राझला केली गेली. फ्रॅंक मॉरीस असाच एक गुन्हेगार. त्यालाही एका चोरीच्या गुन्हयात अटक झाली. तो त्याला ठेवलेल्या तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाला. पण त्याला पुन्हा पकडण्यात आले व १९६० साली त्यालाही अल्काट्राझ येथे पाठवण्यात आले. फ्रॅंक हा अत्यंत हुशार होता. त्याचा IQ सर्वसाधारण माणसांपेक्षा खूप जास्त होता.

हे तिघेही अल्काट्राझ मधे भेटले व त्यांनी तेथून पळण्याची योजना आखली. त्यांच्या या योजनेत तेथील आणखी एक कैदी अॅलन वेस्ट हा सुद्धा सामील झाला. त्यांच्या या योजनेचे नियोजन जवळ जवळ वर्षभर सुरू होते आणि त्यांनी केलेल्या या योजनेमागील विचार अशक्य कोटीतील होता. अर्थात या नियोजनामधे वेस्टचा मोठा वाटा होता. तो या तुरुंगात १९५८ पासून होता व त्याला या तुरुंगाची बरीच माहिती होती. येथील कैद्यांना शिलाई, तुरुंगाची साफसफाई करणे, रंगरंगोटी करणे, सुतार काम अशी वेगवेगळी कामे दिली जात. वेस्टवर साफसफाई व रंगरंगोटी करण्याची जबाबदारी होती. त्यासाठी त्याला तुरुंगातील विविध कक्षांमधे जाव लागत असे. हे काम करतानाच त्याच्या लक्षात आले की तिसऱ्या मजल्यावर हवा खेळती रहावी यासाठी केलेली व तुरुंगाच्या छपरावर उघडणारी एक खिडकी आहे. या कैद्यांना ठेवण्यात आलेल्या कक्षांच्या मागील बाजूस पाण्याचे पाईप्स जाणारा पॅसेज होता. या पॅसेजकडे दुरुस्ती करण्याशिवाय कोणीही फिरकत नसे. या मागच्या पॅसेजमधून तिसऱ्या मजल्यावर पोहोचायचे व तेथून वायुविजनासाठी असलेल्या खिडकीतून छतावर जायचे. त्यानंतर छतावरुन खाली उतरुन समुद्रकिनारी पोहोचायचे व पलायन करायचे अशी त्यांची योजना होती. पण या योजनेमधे त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागणार होते.


पहिला अडथळा म्हणजे त्यांना कक्षा मधून मागील बाजुस असलेल्या पॅसेजमधे जाण्यासाठी मार्ग करावा लागणार होता. प्रत्येक कैद्याला स्वतंत्र कक्ष असल्याने प्रत्येकाला स्वतंत्र मार्ग करणे क्रमप्राप्त होते. दुसरा अडथळा म्हणजे कक्षातून वरच्या मजल्यावर पोहोचल्यावर ज्या खिडकीतून त्यांना छपरावर जायचे होते त्या खिडकीला भक्कम लोखंडी गज लावले होते. ते गज कापून छतावरुन पोहोचणे व तिसरा अडथळा समुद्रकिनारी पोहोचल्यावर पाण्यातून जाण्यासाठी एका तराफ्याची आवशकता.


त्यांना ठेवण्यात आलेल्या तुरूंगातील कक्ष एकमेकांच्या शेजारी होते. त्यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीतील मागील बाजूस असलेल्या लहान जाळीच्या खिडकीच्या आसपासचे सिमेंट उकरुन कक्षातून बाहेर जाण्याचा मार्ग तयार करण्याचे त्यांनी ठरवले. हे सिमेंट खोदण्यासाठी त्यांना हत्यारांची गरज लागणार होती. त्यासाठी भोजनकक्षात असलेले चमचे व सुऱ्या त्यांनी रक्षकांची नजर चुकवून आणल्या. याच बरोबर त्यांनी एक टेबलावर ठेवण्यात येणारा पंखा चोरला व एक ड्रिल पैदा केले. पंख्यापासून हातात धरुन वापरता येण्यासारखे ड्रिल मशिन तयार केले. त्यानंतर त्यांनी खोदण्यास सुरुवात केली. एकावेळी त्यांच्यातील दोघेजण उकरण्याचे काम करत. यावेळी एकजण रक्षकांवर नजर ठेवत असे व खोदण्याचा आवाजबाहेर जाऊ नये म्हणून त्यांच्यातील एक वाद्य वाजवत असे. रक्षक जवळ आला की खोदणाऱ्याला सांकेतिक इशारा दिला जात असे. काही महिन्यांच्या मेहनतीनंतर त्यांनी त्या खिडकीतून बाहेर पडण्याएवढी जागा बनवली. त्याचबरोबर त्यांनी खोदलेली खिडकी रक्षकांच्या नजरेस पडू नये म्हणुन पुठ्ठ्यांपासून खऱ्या खिडक्यांचा आभास निर्माण करणार्या खिडक्या बनवल्या. कक्षाबाहेर पडल्यानंतर या खोटया खिडक्या बाहेरुन लावल्या जात असत. रात्रीच्या वेळी ते कोठडीबाहेर पडत असत.

बाहेर पडल्यावर त्यांच्यासमोर मुख्य समस्या होती ती समुद्र ओलांडण्याची. योगायोगाने याच दरम्यान फ्रॅकच्या हातात एक पॉप्युलर मेकॅनिक्सचा अंक पडला. त्यात हाताने बनवता येणाऱ्या तराफ्याची कृती दिली होती. मग या चौघांनी तेथील भांडारात असलेले रेनकोटस चोरुन आणण्यास प्रारंभ केला व हे रेनकोटस तिसऱ्या मजल्यावर नेऊन ठेवले जात. आता त्यांच्या समोरील महत्वाची अडचण म्हणजे रक्षकांची नजर चुकवून तराफा बनवणे ही होती. कारण या मजल्यावरही टेहाळणी करणारे रक्षक फिरत असत. वेस्टने यावर शक्कल लढवली. साफसफाई करताना मोठ्या प्रमाणात धुळ उडते व कचरा खाली पडतो असे कारण देऊन त्यानी या काही जाळ्यांना ब्लॅंकेट लावून बंद केला. रात्रीच्यावेळी आपल्या कोठडीतून बाहेर पडून यांपैकी दोघेजण हे छतावर जाऊन रेनकोटसपासून तराफा शिवण्याचे काम करत असत. तुकड्या तुकड्यांमधे शिवलेले हे रेनकोटस एकत्र करुन १४ फूट लांब व ६ फूटरुंद असा एक तराफा बनवण्यात आला.
कोठडीतून बाहेर पडल्यावर पहारा देणाऱ्या रक्षकांना कोठडी रिकामी दिसणे अतिशय धोकादायक होते. यावर उपाय म्हणून त्यांनी कागदाचा लगदा, साबण व उकरलेल्या सिमेंटची बारीक पूड एकत्र करुन त्यांनी मानवी चेहेर्याचे मुखवटे केले. तुरुंगाच्या केशकर्तन विभागातून केस आणून त्यांनी त्या मुखवट्यांना लावले. कोठडीतून बाहेरपडण्याआधी आपल्या पलंगावर हे मुखवटे ठेऊन त्यावर चादर घातली जात असे. त्यामुळे रक्षकांना कैदी झोपला आहे असे वाटत असे.
११ जून १९६२ रोजी रात्री ९.३० वाजता अॅंग्लिन बंधू व फ्रॅक हे आपल्या कोठडीतून बाहेर पडले. पण वेस्टआपल्या कोठडीतून बाहेर पडू शकला नाही. हे तिघे आपल्या कोठडीच्या मागील खिडकीतून बाहेर पडले. बाहेर पडल्यावर ते मागील बाजुस असलेल्या पाईपवरुन चढून छ्तावर गेले व तेथून लपतछपत इमारत उतरुन समुद्र किनारी पोहोचले व रबरी तराफ्यातून पलायन केले. त्यांनी या योजनेमागचा मुख्य साथीदाराला वेस्टला मागे सोडले होते. ही योजना या चौघांनी आखली होती पण या चौघांशिवाय तुरुंगातील अनेक कैद्यांना तिची माहिती होती व त्यांनी ही योजना यशस्वी होण्यासाठी या चौघांना मदत केली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वा. फेरी मारणार्या अधिकाऱ्याला झोपलेले हे कैदी बघून संशय आला आणि तेव्हा या तिघांच्या पलायनाची बातमी कळाली. त्यानंतर त्या तिघांचा शोध घेण्यात आला पण त्यांचा कुठेही मागमूस लागला नाही. तुरुंगाच्या वरच्या मजल्यावर रेनकोटपासून बनवलेले लाईफ जॅकेट व त्यांनी वापरलेली हत्यारे सापडली. सॅन फ्रान्सिस्कोच्या किनाऱ्यावर त्यांनी वापरलेले एक वल्हे सापडले. FBI च्या अधिकाऱ्यांच्या निष्कर्षाप्रमाणे हे तिघे थंड पाण्यामुळे मेले व त्यांची प्रेते प्रवाहात वाहून गेली. पण या तिघांच्या नातेवाईकांना मात्र हे मान्य झाले नाही. त्यांच्या मते हे तिघे पलायन करुन दक्षिण अमेरिकेत निघुन गेले. पुढे अनेक वर्ष त्यांना दक्षिण अमेरीकेतील वेगवेगळ्या देशांमधून निनावी भेटपत्रे येत असत. यानंतर FBI चे अधिकारी अॅंग्लिन बंधूंच्या नातेवाईकांवर नजर ठेऊन होते. पण त्यांना कुठलाही पुरावा मिळाला नाही.
या पलायनानंतर वर्षभरातच हा तुरुंग कायमचा बंद करण्यात आला. या तिघांनी वापरलेली हत्यारे, त्यांनी तयार केलेले मुखवटे व सापडलेले लाईफ जॅकेट संग्रहालयात ठेवलेले आहेत. आजही अल्काट्राझ बेटावर जाता येते व तेथील संग्रहालयातील या वस्तू पाहता येतात.
Youtube वर Alcatraz घटनेवरच्या History वNational Geographic चॅनेल्सनी बनवलेल्या या डॉक्युमेंट्रीज पाहता येतात. या व्यतिरीक्तही या विषयावरच्या अनेक डॉक्युमेंटरीज Youtube वर सापडतात. त्याच बरोबर alcatrazhistory.com या साईटवर या तुरुंगाची माहिती मिळते.
कौस्तुभ मुदगल
Palayanachi sachitra mahitee ekdam khaas!!
Chaan zalay lekha!!
LikeLike