स्टिकर

“अरे या डब्यांवर आत काय आहे याची स्टिकर्स तरी लावा!” प्रत्येक घरातल्या पुरुषांचा स्वयंपाकघरातील गोष्टी शोधताना उडणारा गोंधळ आणि त्यानंतर झालेला हा संवाद.
स्टिकर्स किंवा लेबल्स आता आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेले आहेत. बाजारातून आणलेल्या वस्तूवर कुठले ना कुठले स्टिकर लावलेले असतेच. मग ते त्या वस्तूच्या किंमतीचे असो किंवा विकली जावी म्हणून आकर्षकता आणण्यासाठी लावलेले. आता तर मोठमोठ्या मॉल्समधे फळांवर किंवा अंड्यावरही स्टिकर्स लावलेले असतात. याच स्टिकर्सच्या शोधाचा आणि प्रकारांचा हा धांडोळा….
स्टिकर्स म्हणजे कागदावर, प्लॅस्टिकवर किंवा व्हिनाईलवर (ह्याची माहिती पुढे लेखात येईलच) छापलेले चित्र किंवा मजकूर व ज्याच्या मागील बाजूस चिकटवण्यासाठी डिंक लावलेला असतो. साध्या कागदाच्या  स्टिकर्समधे या मागील बाजूस असलेल्या डिंकाला पाणी लावून चिकटवावे लागते. ह्या स्टिकर्सला वापरलेला डिंक पाण्यात विरघळणारा असतो. दुसरा प्रकार म्हणजे ह्या प्रकारचे स्टिकर्स चिकटवताना दाब देऊन चिकटवले जाते. ह्या स्टिकर्सचा डिंक पाण्यात विरघळणारा नसतो. चिकटवताना पुढील बाजूस दाब दिल्यावर हे स्टिकर चिकटतात. अशा प्रकारचे स्टिकर चिकटवताना काही वेळा साबणमिश्रीत पाण्याचा वापर केला जातो. स्टिकरच्यापाठीमागे असलेला डिंक व ज्या पृष्ठभागावर ते स्टिकर चिकटवायचे आहे या दोन्हींच्यामधे या साबणमिश्रीत पाण्याचा पातळ असा थर दिला जातो व दाब देऊन जेव्हा हे पाणी काढले जाते तेव्हा ते स्टिकर त्या पृष्ठभागावर चिकटतो. अशा स्टिकर्सचा उपयोग वस्तूला आकर्षक बनवण्याकरता किंवा वस्तुविषयी माहिती, किंमत दर्शवणे यासाठी केला जातो.
स्टिकर्सचा उपयोग कधीपासून चालू झाला या विषयी फारशी माहिती मिळत नाही. प्राचीन काळी इजिप्तमधे व्यापारी आपल्या वस्तूंची जाहिरात करण्यासाठी व त्यांच्या किंमती प्रदर्शित करण्यासाठी कागदाला मागीलबाजूस डिंक लावून भिंतींवर चिकटवत. याचे पुरावे तेथे झालेल्या उत्खननात मिळाले आहेत. येथेच आपल्याला स्टिकरच्या संकल्पनेचा उगम दिसतो.
पाठीमागे डिंक लावलेल्या कागदाची संकल्पना सर रोलॅण्ड हिल यांनी १८३७ साली मांडली. ही संकल्पना पहिल्यांदा टपाली तिकीटांसाठी वापरली गेली.  १७ व्या शतकात युरोपमधे कागदावरील छपाईला सुरुवात झाली. १८ व्या शतकात छापील कागदांना पाठीमागे डिंक लावून चिकटणारी स्टिकर्स व पोस्टर्स यांचा वापर होऊ लागला. याचबरोबर काही व्यापार्‍यांनी आपल्या मालावर तो आकर्षक दिसावा म्हणून स्टिकर्स लावण्यास सुरुवात केली.
आज आपण जी स्टिकर्स वापरतो त्याचा शोध लागला १९३५ साली. रे स्टॅन्टन अ‍ॅव्हरी ह्या अमेरिकन संशोधकाने हा शोध लावला. अ‍ॅव्हरी यांचा जन्म १३ जानेवारी १९०७ साली झाला. १९३२ साली त्यानी आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने आपला व्यवसाय सुरु केला. १९३५ मध्ये त्याने किम क्लिन प्रॉडक्टस या नावाने स्टिकर्स बनवायला सुरुवात केली. त्याने बनवलेली प्रारंभीची स्टिकर्स हे गोलाकार होते व ते वस्तूची किंमत दर्शवण्यासाठी वापरले जात. या स्टिकर्सचे वैशिष्ठ्य म्हणजे हे स्टिकर्स काढल्यानंतर वस्तूवर कुठल्याही प्रकारचे डिंकाचे डाग रहात नसत. याप्रकारच्या स्टिकर्स त्याकाळात क्रांतिकारी ठरले. १९४० साली १९ कामगारांना घेऊन चालू केलेल्या या कंपनीचे नाव १९४६ साली अ‍ॅव्हरी अ‍ॅडेसीव लेबल कॉर्पोरेशन असे झाले. आज या कंपनीमधे जगभरातले २५००० कामगार काम करतात.
1496770152556
रे स्टॅन्टन अ‍ॅव्हरी
पाकिटांवर चिकटवण्यासाठी किंवा वस्तूंवर किंमत लिहीण्यासाठी वापरण्यात येणारे स्टिकर्स हे कागदापासून बनवलेले असतात. कागदाच्या पाठीमागे डिंक लावलेला असतो व या डिंकावर मेणकागद लावलेला असतो. या मेणकागदाला रिलिज पेपर असे म्हणतात. स्टिकरचा वापर करण्यापूर्वी हा रिलिज पेपर काढून स्टिकर पृष्ठभागावार चिकटवता  येतात. रिलिज पेपरवर मेणासारख्या पदार्थाचा थर असल्याने कागदाचा डिंक या कागदाला चिकटत नाही.
जेथे वस्तूचा पाण्याशी संपर्क येणार असतो तेथे प्लॅस्टिक किंवा व्हिनाईल स्टिकर्स वापरले जातात. व्हिनाईल म्हणजे प्लॅस्टिकपासून बनवण्यात आलेल्या PVC च्या पातळ फिल्मला मागील बाजूस डिंक लावलेला असतो. PVC हे प्लॅस्टिकचे पॉलिमरायझेशन केल्यावर बनते. याचा शोध अपघातानेच लागला.  १८७२ साली युजेन बाऊमन या जर्मन रसायन शास्त्रज्ञाने PVC व्हिनाईलचा शोध लावला. पण त्याने त्याचे पेटंट न घेतल्याने त्याच्या शोधाचे श्रेय फ्रेडरीक क्लेट या जर्मन संशोधकाकडे जाते. १९१३ साली फ्रेडरीक क्लेट याने वेगळ्या पध्दतीने PVC व्हिनाईल बनवून त्याचे पेटंट घेतले. PVC मधे जलरोधक गुणधर्म असल्याने ते लवकरच मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले.  प्रारंभीचे हे व्हिनाईल्स चिकटवण्यापूर्वी त्यांना पाठीमागे हाताने डिंक लावून चिकटवले जाई. आजही ही पध्दत भिंतींना वॉलपेपर्स किंवा जमिनीवर व्हिनाईल चिकटवण्यासाठी वापरली जाते.
१९६० साली फॅबलॉन या नावाने पाठीमागे डिंक लावलेले व त्याला रिलिज पेपर लावलेले (Self Adhesive) व्हिनाईल इंग्लडमधे वापरण्यात येऊ लागले.हा एक क्रांतिकारी शोध होता.आता डिजिटल प्रिंटिंगच्या या जमान्यात अशा सेल्फ अ‍ॅडेसिव्ह व्हिनाईल्सवर छापणे सहज शक्य झाले आहे. मोठमोठ्या मॉल्समधे भिंतींना लावलेली पोस्टर्स ही अशाच व्हिनाईलवर छापलेली असतात. याचबरोबर आता वेगवेगळ्या तापमानाला टिकणारे, विशिष्ठ रासायनिक प्रक्रिया केल्यावर टिकणारे, प्रकाश पडल्यावर चमकणारे, अंधारात चमकणारे (Glow), वाहनांवर लावण्यात येणारे अशा विविध प्रकारचे व्हिनाईल्स (Dcals आणि Car Wraps) उपलब्ध आहेत. अ‍ॅव्हरी डेनिसन, 3M, LG या सारख्या कंपन्या या प्रकारची उच्च दर्जाचे व्हिनाईल्स बनवतात.

 

….आणि आता घरातल्या डब्यांवरही स्टिकर्स लागले आहेत फक्त गुळ असे स्टिकर असलेल्या डब्यात दाणे तर पोह्याचे स्टिकर असलेल्या डब्यात डाळ सापडते.

कौस्तुभ मुदगल

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: