ऑटो स्कॉर्झेनी-जिगरबाज कमांडो ते मारेकरी

१२ सप्टेंबर १९४३ : रविवार : दुपारचे २ वाजत आलेले आहेत स्थळ :- कॅम्पो इम्पेतोर हॉटेल इटली.

साठीच्या आसपासचा एक गृहस्थ उंच टेकडीवर असलेल्या या हॉटेलच्या बाहेरून बंद केलेल्या खिडकीसमोर नजर शून्यात लावून बसलेला आहे. आपल्या भवितव्याविषयी चिंता करत असतानाच त्याला विमानाची घरघर ऐकू आली पण युद्धकाळात विमानांची घरघर नेहमीचीच असा विचार करून त्याने तिकडे दुर्लक्ष केले पण काही क्षणातच रेडिओवरून खणखणीत जर्मन आवाजात एक उद्घोषणा झाली “ सॅल्युट ड्यूस” फ्युररने मला खास तुमची सुटका करण्यासाठी इथे पाठवले आहे ! यावर इतका वेळ चिंतामग्न असलेला तो गृहस्थ अत्यंत आनंदाने चित्कारला,”मला माहित होतं माझा प्रिय मित्र मला असे कधीच वाऱ्यावर सोडणार नाही.”!

थोड्याच वेळात त्या टेकडीवर एक विमान उतरले व त्यातून तो गृहस्थ आधी रोमकडे आणि तिथून एका बॉम्बर विमानातून व्हिएन्नाला रवाना झाला.

Gran-Sasso-Book-2-e1451855586769

ज्याच्या सुटकेसाठी हा सर्व खटाटोप करण्यात आला तो होता इटलीचा ड्यूस बेनिटो मुसोलिनी आणि २०० सशस्त्र सैनिकांच्या पहाऱ्यातून,बंदुकीची एक गोळीही न झाडता मुसोलिनीला सोडवणारा जर्मन कमांडो होता ऑटो स्कॉर्झेनी. ऑटो स्कॉर्झेनी आणि त्याच्या एस एस ट्रूपरच्या तुकडीने ही कामगिरी खुद्द हिटलरच्या आदेशावरून पार पडली. या मोहिमेचे नाव होते “ऑपरेशन ओक”. या मोहिमेनंतर ऑटो स्कॉर्झेनीला अफाट लोकप्रियता लाभली, दोस्तराष्ट्रांचे हेरखाते त्याला युरोपमधील सर्वात खतरनाक व्यक्ती म्हणून ओळखू लागले आणि या कामगिरीबद्दल हिटलरने स्कॉर्झेनीची पाठ थोपटून त्याला पदावर बढती दिली.

hitler-656824

ऑटो स्कॉर्झेनी १९०८ मध्ये व्हिएन्नामध्ये एका ऑस्ट्रीयन कुटुंबात जन्मला, स्कॉर्झेनी कुटुंबात लष्करी सेवेची परंपरा होती.१९३१ साली त्याने नाझी पक्षाचे सदस्यत्व घेतले,हिटलरच्या भाषणांचा आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा मोठा प्रभाव स्कॉर्झेनीवर होता. दुसरे महायुद्ध सुरु झाल्यावर आपल्या बांधकाम व्यवसायातून बाहेर पडून तो एस एस panzer तुकडीत सामील झाला जे हिटलरचे संरक्षक दल होते.

दुसऱ्या महायुद्धात रशियन आघाडीवरही ऑटो स्कॉर्झेनीने अनेक लढायात भाग घेतला, मॉस्कोसाठी झालेल्या लढाईत त्याच्यावर सरकारी इमारती ताब्यात घेण्याची कामगिरी सोपवण्यात आलेली होती.१९४२ साली  रशियन आघाडीवर एका लढाईत तो जखमी झाला आणि त्यातून बरा झाल्यावर त्याला बर्लिनमध्ये लष्करी मुख्यालयात रुजू होण्याचा आदेश मिळाला. येथे तो लष्करी डावपेच आणि कमांडोच्या मदतीने छुप्या युद्धाच्या युक्त्या सुचवल्याने नावारूपाला आला त्यातूनच त्याला “ऑपरेशन ओक” या मोहिमेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.

मे १९४५ मध्ये बर्लिनचा पाडाव झाला, जर्मन फौजांनी शरणागती पत्करली आणि युरोपातले युद्ध संपले. दोस्त राष्ट्रांनी अनेक उच्चपदस्थ नाझी लष्करी तसेच एस एस व गेस्टापो अधिकाऱ्यांना अटक केली आणि त्यांच्यावर न्युरेम्बर्ग येथे युद्धखोरी आणि युद्धगुन्ह्यांबद्दल खटले चालवण्यास सुरुवात केली. त्यातील जवळपास सर्वानाच देहदंडाची शिक्षा झाली. स्कॉर्झेनीलाही बल्ज युद्धादरम्यान अमेरिकी सैनिकी गणवेश व इतर साहित्य वापरून अमेरिकन सैन्यात गोंधळ माजवणे आणि हेरगिरी करणे या आरोपांखाली तुरुंगात डांबण्यात आले. पण जुलै १९४८ मध्ये तो आणि इतर काही एस एस अधिकारी अमेरिकन मिलिटरी पोलिसांचे गणवेश घालून तुरुंगातून निसटले.

या पलायनानंतर अशी अफवा पसरली कि स्कॉर्झेनीला अमेरिकन गुप्तचर यंत्रणेनेच पळून जाऊन स्पेनला पोहोचण्यास मदत केली आणि त्याबदल्यात स्कॉर्झेनीने अमेरिकेसाठी काही कामगिरी पार पाडली.स्पेनमध्ये काही वर्षे राहून स्कॉर्झेनीने ‘नानसेन” पासपोर्ट मिळवला ( हा पासपोर्ट आपला देश सोडून आलेल्या निर्वासितांना त्यांना आश्रय देणाऱ्या देशाकडून दिला जातो.) स्पेनमधल्या वास्तव्य दरम्यान स्कॉर्झेनी तेथे रहात असलेल्या अनेक भूमिगत अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता,त्यापैकीच एक अधिकारी होता जनरल रीनहार्ड गेलन. गेलन महायुद्धादरम्यान military inteligence विभागात कार्यरत होता.पूर्व आघाडीवर रशियन सैन्य जर्मन सैन्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे असा निष्कर्ष हिटलरपर्यंत पोचवल्याबद्दल त्याला निलंबित करण्यात आले होते.

युद्धानंतर गेलन अमेरिकन गुप्तचर यंत्रणा CIA साठी काम करत होता,अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशात पुढे जे शीतयुद्ध होणार होते त्याची नुकतीच सुरुवात होत होती. CIA पूर्व नाझी अधिकाऱ्यांचा वापर करून कम्युनिस्ट चळवळीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असे.गेलनच्या या संघटनेला Gelen Organization असे म्हटले जात असे.यात अनेक उत्तम नाझी,एस एस आणि गेस्टापो अधिकारी कार्यरत होते.यातच आता स्कॉर्झेनीचीही भर पडली.

Gelen Organization तर्फे स्कॉर्झेनीची नेमणूक इजिप्तचे लष्करप्रमुख जनरल मोहम्मद नाजीब यांचा लष्करी सल्लागार म्हणून करण्यात आली. इजिप्तच्या लष्कराला प्रशिक्षित करण्याचे कामही स्कॉर्झेनीने पार पाडले,यात त्याच्याबरोबर अनेक नाझी लष्करी अधिकारीही सामील होते.इजिप्त आणि इस्त्राईलमधील संघर्षातून हे सर्व डावपेच खेळले जात होते. इस्त्राईलविरोधी पॅलेस्टाईन बंडखोरानाही त्याने कमांडो प्रशिक्षण दिले.अमेरिकेच्या पंखांखाली राहून अमेरिका ज्याची पाठराखण करते त्या इस्त्राईलविरोधी कारवाया स्कॉर्झेनी कशा घडवून आणत होता हे सुद्धा एक कोडेच आहे.

११ सप्टेंबर १९६२ : म्युनिक : रॉकेट शास्त्रज्ञ हेन्झ क्रग आपल्या ऑफिसात काम करत होता. पण त्या दिवसानंतर तो परत कधीच कोणाला दिसला नाही.म्युनिक पोलिसांनी जंगजंग पछाडूनही त्यांना हेन्झचा काहीही पत्ता लागला नाही.म्युनिक पोलिसांना फक्त एवढाच पत्ता लागला कि हेन्झ गेल्या काही महिन्यात अनेकदा इजिप्तची राजधानी कैरोला गेलेला होता.काही दिवसांनी अशी कुजबुज सुरु झाली कि हेन्झला इस्त्रायली गुप्तहेर संघटना मोसादने पळवून इस्त्राईलला नेले व तिथेच त्याला ठार मारण्यात आले आणि या अपहरणामागे हात होता स्कॉर्झेनीचा!

इतके दिवस इस्त्राईलविरोधी असणारा स्कॉर्झेनी अचानक त्यांना कशी मदत करू लागला? आणि या शास्त्रज्ञाला मारून इस्त्राईलला कोणता फायदा झाला ? याचं उत्तर तेंव्हाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणात आहे. इस्त्राईल या स्वतंत्र ज्यू राष्ट्राच्या निर्मितीपासूनच त्याच्या सभोवताली असणारे कट्टर मुस्लीम देश त्याचे शत्रू होते. पण इस्त्राईल अत्यंत हिंमतीने त्यांचा मुकाबला करत होते.यातीलच एक देश होता इजिप्त.इजिप्तच्या लष्करी रॉकेट विकसित करण्याच्या प्रकल्पात अनेक जर्मन शास्त्रज्ञ काम करत होते.हा प्रकल्प म्हणजे इस्त्राईलच्या सुरक्षेला धोकाच होता, म्हणून यात सहभागी असलेले शास्त्रज्ञ मोसादच्या निशाण्यावर होते. एकतर त्यांना धमकावून या प्रकल्पातून अंग काढून घेण्यास सांगण्यात येत होते किंवा हेन्झप्रमाणे त्यांना ठार करण्यात येत होते.

तरीही स्कॉर्झेनी यात कसा हा प्रश्न उरतोच. दुसऱ्या महायुद्धानंतर न्युरेम्बर्ग येथे अनेक नाझी वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि नाझी सरकारातील महत्वाच्या पदावरील लोक यांना देहदंडाची शिक्षा देण्यात आली. याला Denazification असे नाव देण्यात आले. पण महायुद्ध संपता संपता अनेक नाझी लष्करी,एस एस आणि गेस्टापो अधिकारी जर्मनीतून पळून स्पेन,अर्जेन्टिना इ देशात आश्रयाला गेले. न्युरेम्बर्ग खटल्यातून जरी ते वाचले तरी इस्त्राईल त्यांना सोडणार नव्हते. मोसाद त्यांना शोधून टिपून काढत होते. आणि या सर्वांमागे होता युरोपातील ज्यूंच्या शिरकाणातून बचावलेला सायमन वुइसेन्थ.

मोसाद आपले लक्ष टिपण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होते आणि मोसादच्या यादीत स्कॉर्झेनीचेही नाव होतेच.पण मोसादचे तत्कालीन प्रमुख इस्सर हारेल यांना असे वाटत होते कि स्कॉर्झेनीला ठार मारण्यापेक्षा त्याला वाचवून त्याच्याकडून काही कामगिरी पार पडून घ्यावी. यानुसार स्कॉर्झेनीवर पाळत ठेवण्यात आली आणि एके दिवशी मोसादच्या एका अज्ञात गुप्तहेराने थेट स्कॉर्झेनीच्या घरात शिरून त्याच्यासमोर मोसादकडून मारले जाणे किंवा मोसादशी हातमिळवणी करून त्यांच्यासाठी काम करणे असे दोन पर्याय त्याच्यासमोर ठेवले आणि स्कॉर्झेनीने मोसादशी हातमिळवणी केली.

इजिप्तच्या रॉकेटप्रकल्पाची माहिती मिळवण्यासाठी मोसादला कोणीतरी आतल्या वर्तुळातली व्यक्ती पाहिजे होती त्यासाठी स्कॉर्झेनी अगदी योग्य होता. त्याने इजिप्तमध्ये शिरून या सर्व प्रकल्पाची आणि त्यावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांची माहिती गोळा केली. त्यातील काहींना धमकावले काहीना ठार मारले.शेवटी जर्मन शास्त्रज्ञांनी जीवाच्या भीतीने यातून अंग काढून घेतले व शेवटी इजिप्तचा रॉकेटप्रकल्प थंडावला.

यानंतरही अनेक गुप्त कारवायात त्याने मोसादसोबत काम केले.स्कॉर्झेनीने आपले युद्धातले आणि युद्धानंतरचे सर्व अनुभव आत्मचरित्ररूपाने प्रकाशित केले पण त्यात त्याने आपली अमेरिका आणि इस्त्राईलशी झालेली जवळीक यांवर कोणतेही भाष्य केलेले नाही. पण जगभरात अनेक नाझी पकडले जात असताना खुलेआम वावरणारा स्कॉर्झेनी नाझीविरोधी गटांकडून मारला गेला नाही यातच सारे समजून येते. अशीअनेक रहस्ये त्याच्या मृत्यूनंतर त्याच्याबरोबरच गाडली गेली.

१९७५ साली वयाच्या ६५व्या वर्षी स्कॉर्झेनी स्पेनमध्ये कर्करोगाने मरण पावला त्याच्यावर स्पेन आणि व्हिएन्ना असे दोन ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही ठिकाणी अनेक पुर्व नाझी मोठ्या संख्येने हजर होते आणि त्यांनी एक हात उंचावून नाझी सॅल्युट करत स्कॉर्झेनीला शेवटची मानवंदना दिली.

Otto_Skorzeny

यशोधन जोशी

2 thoughts on “ऑटो स्कॉर्झेनी-जिगरबाज कमांडो ते मारेकरी

Add yours

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: