आज आपण कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर टाईमझोन निवडताना अतिशय सराईतपणे चेन्नई, कोलकाता, मुंबई, न्यू दिल्ली असा टाईमझोन निवडतो. पण सव्वाशे वर्षांपूर्वी यावरून मुंबईत भयंकर खळबळ माजलेली होती आणि ब्रिटिश सत्ता व एतद्देशीयांकडून चालवल्या जाणाऱ्या स्वायत्तसंस्था यांच्यात संघर्ष घडून आलेला होता.
इस १८८३. भारतात राणीचा अंमल सुरू होऊन पावशतक उलटून गेलेले होते.भारतावरचा ब्रिटिश अंमल पक्का करण्यासाठी रेल्वे व टपालसेवा सुरू झालेल्या होत्या. बॉम्बे, मद्रास व कलकत्ता प्रेसिडेन्सी एकमेकांशी रेल्वेने जोडल्या गेल्यावर एक बिकट प्रश्न निर्माण झाला.
भारतातील सर्व व्यवहार व कालगणना हे सुर्योदय व सुर्यास्त या साध्या-सोप्या हिशोबावर चालत होते. सुर्योदय व सुर्यास्ताच्या स्थानिकवेळा पूर्व आणि पश्चिम भारतात साहजिकच निरनिराळ्या होत्या. त्यामुळे रेल्वे व तारखाते यांना या वेळेतील अंतराचा फटका बसू लागला. वेळापत्रकात गडबड हाऊ लागली. यावर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली. इथून तिथून भारतभर एकच वेळ असली पाहिजे, मग मुंबई आणि कलकत्ता यांच्या अदमासे मधोमध मद्रास येते तेंव्हा मद्रासची वेळ ही प्रमाणवेळ (Indian Mean Time) म्हणून सर्वत्र लागू करावी असा फतवा भारताच्या व्हाईसरॉयने काढला. मुंबई इलाख्याचा गव्हर्नर फर्ग्युसनने ताबडतोब या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले आणि आदेश दिला की १ डिसेंबर १८८२ पासून मुंबई इलाख्यात सर्वत्र मद्रास टाईम लागू होईल व सर्व सरकारी कामकाज मद्रास टाईमप्रमाणे चालेल. मद्रास आणि मुंबईच्या वेळात ३९ मिनिटांचा फरक होता. (मद्रास मुंबईपेक्षा ३८ मिनिटे ५०सेकंदानी पुढे होते)

त्याकाळात प्रत्येकाच्या हातात घड्याळ नसे, वेगवेगळ्या ठिकाणी बसवलेल्या घड्याळांबरहुकूम मुंबईकरांचे वेळापत्रक चाले. या घड्याळातले सर्वात महत्वाचे घड्याळ होते मुंबई विद्यापीठावरच्या टॉवरवरचे अर्थात राजाबाई टॉवरवरचे. हा टॉवर आणि घड्याळ जरी विद्यापीठाच्या अखत्यारीत असले तरी या टॉवरच्या देखभालीची जबाबदारी बॉम्बे प्रेसिडेन्सीकडे होती.
विद्यापीठाचे कामकाज कोणत्या वेळेनुसार चालवावे व टॉवरवरच्या घड्याळात कोणती वेळ ठेवावी याबद्दल स्वायत्त संस्था असणाऱ्या मुंबई विद्यापीठात सर्व समिती सदस्यांचे मतदान घेण्यात आले आणि ३४ विरुद्ध ६ अशा मतांनी विद्यापीठाचे कामकाज बॉम्बे टाईमप्रमाणे चालवावे असा ठराव मंजूर झाला.वैशिष्ट्य म्हणजे ठरावाच्या बाजूने जी ३४ मते पडली त्यात १० मते युरोपिअन लोकांची होती. मुंबई विद्यापीठाने या ठरावाची एक प्रत गव्हर्नरकडे पाठवून दिली. यावर संतापून फर्ग्युसनने यापुढे राजाबाई टॉवरच्या देखभालीचा खर्च सरकारतर्फे केला जाणार नाही असा वटहुकूम जारी केला केला. मुंबईत अशीही अफवा पसरली की राजाबाई टॉवर आता सरकार आपल्या ताब्यात घेणार असून नंतर त्यावरची वेळ बदलली जाईल.

नोकरशाही आणि नागरी संस्था यातच असा वाद निर्माण होऊ लागल्याने मोठा पेच निर्माण झाला. हा पेच सोडवण्याच्या हेतूने बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्सने पुढाकार घेतला आणि फर्ग्युसनला एक पत्र लिहिले. पत्रात असे म्हटले होते की सर्वसामान्य जनतेला ही नवीन वेळ मान्य नाही शिवाय एकाच शहरात दोन वेळा असणे हे फारच गैरसोयीचे आहे. एव्हाना नोकरशाहीतील काही वरिष्ठ अधिकारीही बॉम्बे टाईमबाबत अनुकूल झाले होते. फर्ग्युसननेही हे ओळखून स्वतःचा आब राखत १ जून १८८३ पासून सर्व कामकाज पुन्हा बॉम्बे टाईमनुसार करण्याचा आदेश दिला. पण यातसुद्धा त्याने एक पाचर मारून ठेवलेली होती, फक्त मुंबई शहराची वेळ बॉम्बे टाईमप्रमाणे चालणार होती बाकी सर्व इलाख्यात मद्रास टाईमच चालू रहाणार होता. मुंबई शहराच्या बाहेरचा भाग म्हणजे वांद्र्याच्या उत्तरेकडच्या भागात मद्रास टाईमच चालू रहाणार होता.यामुळे मुंबई व आसपासचा भाग दोन वेगवेगळ्या टाईमझोनमध्ये विभागला गेला.

मुंबई इलाख्यात मुंबईशिवाय कराची हे अजून एक महत्वाचे शहर होते. कराचीमधील स्थानिक वेळ मद्रास टाईमपेक्षा ५२ मिनिटांनी मागे होती. त्यामुळे सिंध सभा व कराची चेंबर ऑफ कॉमर्सने गव्हर्नरला विनंती करून ऑगस्ट १८८४ पासून स्थानिक वेळ वापरण्याची परवानगी मिळवली.
मुख्य व्यापारी शहरातील वाद मिटल्याने मुंबई इलाख्यात शांतता निर्माण झाली पण ही शांतता फार काळ टिकली नाही. जेमतेम दोन तपातच पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला.
मध्यंतरीच्या वीस वर्षाच्या काळात जगभरातील सर्व प्रमुख देशांत व्यापाराच्या दृष्टीने एक प्रमाणवेळ निर्माण होणे गरजेचे आहे यावर एकमत होऊन त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले. यानुसार इंग्लडमधील ग्रीनीच हा मध्यबिंदू मानून वेळेचे गणित मांडण्यास सुरुवात झाली.यावरून ग्रीनीच मेरिडीअन टाईम (GMT) सुरू झाला. याशिवाय युनिव्हर्सल टाईम (UTC) ही नवीन संज्ञा उपयोगात आणून टाईमझोनप्रमाणे कालगणना सुरू झाली. सर्व प्रमुख देशांनी या संकल्पना मान्य करून नवीन वेळेनुसार आपापली प्रमाणवेळ बदलली. भारताच्या व्हाइसरॉयसमोरही हा वेळ बदलाचा प्रस्ताव ठेवला गेला पण त्यावर विचार करून तत्कालीन व्हाइसरॉयने भारतातील वेळ बदलण्याचा प्रस्ताव तात्पुरता पुढे ढकलला. हे साल होते १८९९.
१९०५ साली व्हाइसरॉय कर्झनने मात्र रेल्वे व पोस्ट खात्यासाठी तसेच मुंबई,कलकत्ता आणि कराची या महत्त्वाच्या शहारांकरीता GMT प्रमाणे कालगणना बदलण्यास मंजुरी दिली व ३० जून १९०५ पासून या शहरात सरकारी कचेऱ्यानी नवीन वेळेनुसार कामकाज सुरु करावे असा आदेश दिला. या नवीन वेळेला स्टँडर्ड टाईम असे संबोधले जाऊ लागले. स्टॅंडर्ड टाईम व बॉम्बे टाईममध्ये पुन्हा ३९ (३८ मिनिटे ५० सेकंद) मिनिटांचा फरक पडू लागला.
बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्सने स्टॅंडर्ड टाईम लागू करण्याबाबत मतदान घेतले. सुरुवातीला हा ठराव फेटाळला गेला पण ऑगस्ट १९०५ ला झालेल्या फेरमतदानात स्टॅंडर्ड टाईम स्वीकारला गेला. बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स पाठोपाठ बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, फायर इन्शुरन्स एजंट असोसिएशन, नेटीव्ह शेअर ब्रोकर्स असोसिएशन, मिल मालक संघटना यांनीही स्टॅंडर्ड टाईमप्रमाणे कामकाज करण्यास मान्यता दिली. मुंबई महानगर पालिकेनेही २६ विरुद्ध २१ मतांनी स्टॅंडर्ड टाईम स्वीकारला. फक्त कॉटन एक्सचेंज,किरकोळ वस्तूंचे व्यापारी आणि धान्य व्यापारी यांच्या संघटनांनी बॉम्बे टाईमच पाळण्याचा निर्णय घेतला.
सर्वसामान्य जनतेला मात्र हा वेळेतील बदल फारसा पसंत पडला नाही. रेल्वे व प्रवासी लोकांच्या सोयीकरता मुंबई शहराने आपली वेळ बदलणे हे सयुक्तिक नाही असा सूर निघू लागला. मुंबई आता दोन वेळा पाळू लागली. एक बॉम्बे टाईम आणि दुसरा स्टॅंडर्ड टाईम. सरकारी कार्यालये आता १० ते ५ ऐवजी १०.३० ते ५.३० अशा स्टँडर्ड वेळेप्रमाणे चालू लागली. व्हिक्टोरिया अँड प्रिन्सेस डॉकयार्डच्या घड्याळाचे टोले पूर्वी ७.५१ला पडत आता ते ८.३० वाजता पडू लागले. रेल्वे पकडण्यासाठी लोक वेळेआधी अर्धा तास निघू लागले. कोणतीही वेळ लिहिताना बॉम्बे टाईम व स्टॅंडर्ड टाईम दोन्ही लिहिले जाऊ लागले.
मिल मालकांच्या असोसिएशनने जरी स्टॅंडर्ड टाईम पाळण्याचा निर्णय जानेवारी १९०६च्या सुरुवातीला म्हणजे थोडा उशिराच घेतला. ५ जानेवारी १९०५ ला जेकब ससून मिलचे कामगार कामासाठी मिलच्या गेटवर सकाळी पोहोचले तर त्यांना आज मिल ५.३० ला नाही तर ६.१० सुरू होईल व दिवस संध्याकाळी ६.१०ला संपेल असे समजले. यांत त्यांच्या कामाच्या तासात कोणताही फरक पडणार नव्हता तरीही या कामगारांत असंतोष पसरला व ४५०० मिलमजूर संपावर गेले. हे लोण इतर गिरण्यात पसरणार असे दिसताच मिल मालकांनी पुन्हा बॉम्बे टाईम पाळण्याचा निर्णय घेतला.
कामकाजासोबतच धार्मिक गोष्टींवरही स्टॅंडर्ड टाईमचा परिणाम होऊ लागला आणि त्यामुळेही त्या विरोधात जनमत निर्माण होऊ लागले. मुंबईत सूर्य दुपारी डोक्यावर येण्याची वेळ साधारणतः १२.३० असे त्यावेळेनुसार हिंदू, मुस्लिम व ज्यू आपापल्या प्रार्थना करत. पण ३९ मिनिटांच्या फरकाने बॉम्बे टाईमनुसार हे विधी सकाळी ११.५१ लाच पार पाडावे लागू लागले. यावेळी सूर्य डोक्यावर आलेला नसे त्यामुळे धार्मिक कार्यांसाठी मुख्यत्वे बॉम्बे टाईमच पाळला जाऊ लागला. मुस्लिमात बोरा व सुन्नी समाजाने बॉम्बे टाईमप्रमाणेच आपल्या प्रार्थनेच्या वेळा ठेवल्या. खोजा समाज मात्र स्टॅंडर्ड टाईमप्रमाणे नमाज पढत असे.
मुंबईत सामान्य जनता या निर्णयाविरोधात एकवटू लागली. माधवबागेत हजारोंच्या सभा होऊ लागल्या. मुंबई महानगरपालिकेत वेळ बदलासाठी दुसऱ्यांदा मतदान झाले.सुरुवातीला स्टॅंडर्ड टाईमला कौल देणाऱ्या सभासदांनी दुसऱ्या वेळेला मात्र बॉम्बे टाईमच्या बाजूने कौल दिला. फिरोजशाह मेहता हे त्यावेळी मुंबई महानगरपालिकेचे सदस्य होते आणि सुरुवातीपासूनच बॉम्बे टाईमबाबतीत आग्रही होते. महानगरपालिकेत फिरोजशाह मेहता व त्यांचे अनुयायी आणि काँग्रेसचे इतर सदस्य असे दोन गट पडले.काँग्रेसच्या सदस्यांना टिळकांचा पाठिंबा होता.
महानगरपालिकेच्या बॉम्बे टाईम पाळण्याचा निर्णयामुळे महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सर्व घड्याळे बॉम्बे टाईमप्रमाणे चालतील हे निश्चित झाले. यामुळे व्हिक्टोरिया टर्मिनसचे घड्याळ स्टॅंडर्ड टाईम दाखवत असे तर तेथून जवळच असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेतील सर्व मात्र घड्याळे बॉम्बे टाईम दाखवत असत. मुंबईतील वर्तमानपत्रात किंवा इतर ठिकाणी वेळ लिहिताना बॉम्बे टाईम आणि स्टॅंडर्ड टाईम लिहिण्याची पद्धत सुरू झाली.
मुंबईतील सर्व वर्तमानपत्रे सुरुवातीपासूनच बॉम्बे टाईमबद्दल आग्रही होती. यांतील खबरदार, सुलतान-ए – अखबार, पारशी आणि मुस्लिमांचे मुस्लिमांचे मुखपत्र अनुक्रमे जाम-ए-जमशेद आणि अखबार-ए-इस्लाम ही वर्तमानपत्रे इतर बाबतीत ब्रिटिश सरकारची समर्थक होती हे विशेष.
फिरोजशाह मेहतांनी सार्वजनिक सभांमध्ये भाषणे करून स्टॅंडर्ड टाईमचा उघडपणे विरोध सुरू केला. त्यांनी सरकारला धारेवर धरताना प्रश्न उपस्थित केला की भारतासारख्या विशाल देशाला एका स्टँडर्ड टाईममध्ये बसवणे हे कोणत्या शास्त्रीय कारणाने सिद्ध करता येते? कोणताही देश जो भारताएवढा विशाल आहे ज्याने संपूर्ण देशात एकच स्टॅंडर्ड टाईम स्विकारला आहे काय?
या प्रश्नांची उत्तरे ब्रिटिश सरकारने कधीच दिली नाहीत किंबहुना भारतात सत्तेच्या जोरावर आपला निर्णय लादणे हेच यामागचे उद्दिष्ट होते. मुंबई व कलकत्ता या दडपशाहीसमोर न झुकता आपल्या स्थानिक वेळेच्या वापरावरच ठाम राहिले.
१९४७ ला भारताच्या स्वातंत्र्यानंतर स्टॅंडर्ड टाईम हीच भारताची अधिकृत वेळ ठरवली गेली तरीही कलकत्ता १९४८ पर्यंत आणि मुंबई १९५५ पर्यंत आपापल्या स्थानिक वेळेनुसारच आपले व्यवहार पार पाडत होते.
मद्रासला असणारी Central Observatory नंतर अलाहाबादला हलवण्यात आली. स्टँडर्ड टाईम आणि बॉम्बे टाईममधला फरक बराचसा कमी झाला व मुंबईने स्टॅंडर्ड टाईम स्विकारला. आसाममध्ये चायबागान टाईम/Tea Garden Time ही अनधिकृत वेळ अजूनही पाळली जाते जी स्टॅंडर्ड टाईमपेक्षा एका तासाने पुढे आहे.
आता भारताचा स्टॅंडर्ड टाईम दिल्लीतील National Physical Laboratory मध्ये असलेल्या atomic clock नुसार ठरवला जातो. भारताच्या पूर्वेकडील भागांसाठी वेगळा टाईम झोन करावा यासाठी सध्या पुन्हा समिती स्थापन करण्यात आली असून या विषयावर समितीच्या सदस्यात चर्चा सुरू आहे.
अवांतर – हा लेख लिहिताना मला इतकी वर्षं पडलेला एक प्रश्न सुटला,अगदी ७०च्या दशकापर्यंत लग्नपत्रिकेत लग्नाची वेळ लिहिताना त्यापुढे स्टँडर्ड टाईम असे का लिहिले जात असे हे मला समजलं.
यशोधन जोशी
Like this:
Like Loading...
Related
अफलातून विषय आणि अर्थातच great sense of time बरोबर उत्तम ऐतिहासिक हकिकतीचा ऐवज !
LikeLike
स्टॅ.टा.चा धांडोळा खासच.
LikeLike
मस्त! 😊
LikeLike
vaa! majedar aahe!
LikeLike
Wow.. amazing…
LikeLike
Nice article! Please mention all the references at the end. I’m curious from where did yoyu get the old news archives. Thanks.
LikeLike
Eye opener 👏🏼👏🏼
LikeLike