माझे आवडते पुस्तक अर्थात गृहिणी-जीवन-सर्वस्व

(हा लेख १९३१ साली एका पतीने आपल्या पत्नीसाठी लिहिलेल्या एका पुस्तकाचा सारांशरुपात घेतलेला आढावा आहे. या काळात स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांची सामाजिक स्थिती कशी होती यावर हे पुस्तक काही प्रमाणात उजेड टाकते. याचबरोबर या पुस्तकात पाककृती, गाणी, उखाणे, पत्रव्यवहारासाठी लिहायचा मायना अशा अनेक रंजक गोष्टी आलेल्या आहेत. या पुस्तकात स्त्रियांविषयी असलेली अनेक मते किंवा त्यांची उद्धृत केलेली कर्तव्ये आता कालबाह्य झाली आहेत हे मला पूर्णतः मान्य आहे, सदर लेख हा फक्त पुस्तकाचा धावता आढावा आहे. )

आपण इतिहासावरची पुस्तके, कथा, कादंबऱ्या वाचतो. पण या पुस्तकांमधे येतो तो फक्त राजकीय इतिहास. लढाया, वंशावळी आणि सन-सनावळ्या यांनी सामान्य लोकांसाठी इतिहास अतिशय रुक्ष बनवून टाकला आहे. सामान्य लोक त्यामुळं इतिहासापासून फटकूनच असतात. राजे-रजवाड्यांच्या जीवनाविषयी थोडी फार माहिती देणारे काही संदर्भ तरी उपलब्ध आहेत पण त्यांच्या काळातल्या सामान्य लोकांच्या जीवनाविषयीची माहिती अगदी किरकोळ आणि त्रोटक स्वरूपात आढळते.

या कालखंडातल्या सर्वसामान्य माणसांचे जीवन कसे होते, ते कुठल्या प्रकारचे अन्न खात, ते कुठली वस्त्रे घालत, त्या काळातल्या प्रथा, परंपरा आणि चालीरीती काय होत्या हा इतिहास मात्र आपल्याला कधीच वाचायला मिळत नाही आणि माझ्या मते हाच इतिहास अतिशय रंजक असतो. आपल्याकडे लिखित इतिहासच सापडत नाही. मग हा तात्कालीन सामाजिक इतिहास आपल्याला कसा कळणार?

हा इतिहास आपल्याला सापडतो तो बौध्द जातक कथांमधे, पौराणिक कथांमधे आणि अगदी अलीकडच्या काळातल्या महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाले बाराव्या शतकातल्या चक्रधर स्वामींच्या लीळाचरित्रात. त्यामुळे सामाजिक इतिहासाची मांडणी करण्यासाठी हे वाङमय आता इतिहासकार अभ्यासू लागले आहेत.

१७ व्या शतकात भारतात छपाईला सुरुवात झाली. पण पुस्तक लिहून मग ते छापणे हे सर्वसामान्यांसाठी अगदी विसाव्या शतकापर्यंत अत्यंत जिकिरीचे काम होते. नेमक्या याचकाळात एक नवरा आपल्या पत्नीसाठी एक पुस्तक लिहितो आणि ते इतर गृहिणींना उपयोगी पडेल या विचाराने छापतो हे उदाहरण आगळेच म्हटले पाहिजे.

धांडोळ्यासाठी विषयाचा शोध घेताना अनेक पुस्तक आम्ही शोधत असतो, वाचत असतो या शोधाशोधीतच हे आगळवेगळं पुस्तक हाती लागलं. १९३१ साली हे पुस्तक प्रकाशित झालं आणि १९३४ साली त्याची दुसरी आवृत्ती आली. पुस्तकाच नाव आहे ’माझे आवडते पुस्तक अर्थात गृहिणी-जीवन-सर्वस्व’.

पुस्तकाचा विषय आहे घरातली कामे आणि त्या काळातल्या गृहिणींवरच्या अगदी छोट्यापासून मोठ्यांपर्यंत जबाबदाऱ्या. नवऱ्याच्या कामाच्या किंवा नोकरीच्या निमित्ताने लहान गावातल्या गृहिणी एकत्र कुटुंबव्यवस्थेतून बाहेर पडून शहरात रहायला आल्याच्या स्थित्यंतराच्या काळात हे पुस्तक आपल्याला घेऊन जाते. घरीदारी कोणी वडीलधारी व्यक्ती नसताना उदभवणाऱ्या अडचणी, किरकोळ आजारपणं याविषयीचे मार्गदर्शन यात आहेच पण पारंपरिक गोष्टी जसे की दूध काढणे, दुपारी जेवणानंतर करायची घरातली कामे, रात्रीच्या जेवणानंतर किंवा सणावाराला लावायच्या पानाच्या विड्यांचे प्रकार आणि ते लावायची पद्धत यांचीही माहिती या पुस्तकात आढळते. त्या काळातल्या nuclear family तल्या स्त्रियांच्या हातात आता काही प्रमाणात आर्थिक व्यवहारही आलेले होते हे पुस्तकात महिन्याचा हिशोब कसा लिहावा यासारख्या प्रकरणातून समजते.

आजच्या काळात हे पुस्तक कोणी प्रकाशित केलं असतं तर स्त्रीमुक्तीवाल्यांनी लेखकाला सळो की पळो करुन सोडले असते. कारण लेखकाने अगदी सकाळी दारात सडा टाकून रांगोळी काढणे ते रात्रीची अंथरुणे घालणे या सगळ्या कामांची जबाबदारी घरातल्या महिलावर्गावर टाकून देऊन या प्रत्येकासाठी एकेक स्वतन्त्र प्रकरण लिहून काढलेले आहे. मला या पुस्तकावर लिहावस वाटलं कारण यात आलेले तत्कालीन संदर्भ गंमतीशीर आहेत. त्याशिवाय उखाणे, कोडी, गाणी अशा अनेक फुटकळ गोष्टींनी हे पुस्तक भरून गेलेले आहे.

या पुस्तकाचे लेखक आहेत डॉ. चिंतामण लक्ष्मण मुळे यांनी त्यांच्या पत्नी सरस्वतीबाईंना हे पुस्तक अर्पण केलेले आहे. माझे आवडते पुस्तक अथवा गृहिणी-जीवन-सर्वस्व असे त्याचे संपुर्ण नाव. पुस्तकाचे दोन खंड आहेत. त्यातला पहिलाच खंड सध्या हाती पडलेला आहे आणि दुसरा खंड मिळवायचे प्रयत्न सुरू आहेत. हे पुस्तक वाचून लेखकाच्या निरीक्षण शक्तीची कमाल वाटते अगदी छोट्यात छोट्या गोष्टींची यात नोंद घेतलेली आहे.

या पुस्तकातील काही संदर्भ, लेखकाची निरिक्षणे तसेच लेखकाची तत्कालीन महिलांविषयी मते याची काही रंजक उदाहरणांचा उल्लेख करणे उचित ठरेल. त्यावरुन पुस्तकाची साधारण रुपरेषा समजण्यास मदत होईल.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखकाने आपल्या पत्नी म्हणजेच सरस्वतीबाई यांना अर्पणपत्रिका दिली आहे. त्यात त्यांनी सुख दु:खातील वाटेकरी असलेल्या पत्नीने हे पुस्तक लिहिताना केलेल्या मदतीचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. या अर्पण पत्रिकेबरोबरच डॉ. मुळे आपल्या पत्नीला हे पुस्तक अर्पण करत असतानाचा एक फोटो छापलेला आहे.

Arpan

पुस्तकाची प्रस्तावना धुळे येथील श्रीमती सौ. गिरिजाबाई केळकर यांनी लिहिलेली आहे. या प्रस्तावनेमधील एकंदर सुर जरा आश्चर्यकारक म्हणावा लागेल. पूर्वी न शिकलेल्या बायका आपले गृहकर्तव्य किती कर्तबगारीने सांभाळीत व आजकालच्या शिकलेल्या मुली कशा शिक्षण संपेपर्यंत अविवाहीत राहतात, यांना कुठले ध्येय नाही, हौस नाही व कर्तबगारी नाही असा केळकरबाईंच्या म्हणण्याचा एकंदर सारांश आहे. पुस्तकात सौ. केळकरांचा प्रस्तावना लिहितानाचा फोटोही छापलेला आहे.

Prastwana

ग्रंथकर्त्याच्या मनोगतामधे लेखकाने पुस्तक काढताना काय काय त्रास झाला तसेच कोणा-कोणाची मदत झाली याचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. पुस्तक लिहुन झाल्यावर मुंबईतील एका प्रसिध्द छापखान्याच्या मालकांनी ते छापण्याचे कबुल केले व २-३ वर्षे झुलवत ठेवले याचाही उल्लेख आलेला आहे. (आजही परिस्थिती फारशी बदलेली नाही.) याचबरोबर डॉ. मुळ्यांनी पुस्तकात कुठले विषय मांडले आहेत याचा थोडा परिचय करुन दिला आहे. पुस्तक लिहिल्यावर त्याचा आवाका मोठा झाल्याने त्यांनी ते दोन भागात विभागले. गृहिणींना वेगवेगळ्या कामाच्या वेळी हाताशी पुस्तक असावे यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे असे ते म्हणतात.

प्रस्तावनेत सौ. केळकरांनी स्त्रिया शिकल्यामुळे बिघडतात असा सूर लावलेला असला तरीही लेखकाचे मात्र असे मत नाही. ते म्हणतात ’स्त्रियांना शिक्षण दिल्यास त्या बिघडतील व त्यांच्यातील पतीशी नम्रतेची वागणूक, स्वधर्माभिमान, परपुरुषाविषयी लज्जा हे गुण उतरणीला लागतील असा समज आहे. त्यामुळे स्त्रीशिक्षण दोषार्ह समजण्यात येते; पण ते वास्तविक नाही.’ यासाठी शिक्षणक्रम बदलणे आवश्यक आहे असे ते म्हणतात. मेकॉलेने बनवलेल्या शिक्षणक्रमाने पाश्चात्य संस्कृतीविषयी आवड निर्माण होईल जे योग्य नाही. येथे त्यांनी एका बाईंचा उल्लेख केलेला आहे. या बाई त्याकाळातील फारच पुढारलेल्या असाव्यात. ’हिंदू समाजात अनेक मालिनी पाणंदीकर निपजून हिंदू संस्कृतीचा नायनाट होईल’ असे ते म्हणतात. याच बरोबर ते म्हणतात ’आपल्या संस्कृतीत योग्य असा फेरफार करणे आवश्यक आहे’. या विषयारंभानंतर स्त्रियांची दिनचर्या कशी असावी याबद्दल त्यांनी विस्तृत माहिती दिली आहे.

Love Marrage

स्त्रियांनी पहाटे उठल्यावर उरकायच्या आन्हिकांविषयी ते लिहितात. त्यात मुखमार्जन करताना बदामाची टरफलं व कोळशाची पूड किंवा मीठ व कापूराची पावडर वापरावी अशी अगदी बारीकसारीक माहितीही दिली आहे. यानंतर काकड्याला म्हणायच्या आरत्या, भूपाळ्या यासाठी ४-५ पाने खर्ची घातली आहेत. घरातील केर काढणे, सडासंमार्जन, रांगोळ्या यांचेही बारकाईने विवेचन केले आहे. स्त्रियांनी करायची वेणीफणी तसेच वेणीचा गुंता कसा सोडवावा, बुचडा कसा बांधावा याबद्द्लही त्यांनी लिहिले आहे. स्त्रियांनी भांग कसा काढावा याबद्द्ल लिहिताना ते म्हणतात ’ मधोमध भांग हा सभ्य समजला जातो. ज्या स्त्रिया बाजूला भांग पाडतात त्यांची गणना छचोर म्हणून करण्यात येते.’ यानंतरच्या भांडी घासण्याच्या भागात वेगवेगळ्या धातूंच्या भांड्यांना घासताना घ्यायची काळजी यावरही त्यांनी लिहिले आहे.

Vadhu

त्याकाळी शहरातील अनेक वाड्यांमधे गोठे असत. त्यामुळे दुधदुभते विपुल प्रमाणात उपलब्ध होई. गोठ्यातील गुरांचे संगोपन कसे करावे, धार कशी काढावी वैगेरे विषयांवर त्यांनी लिहिले आहे. याच बरोबर जर रतिबाचे दुध घेत असल्यास त्यात भेसळ अथवा पाणी किती प्रमाणात आहे हे शोधण्याचेही त्यांनी एक सुत्र दिले आहे. या इतर कामांबरोबरच स्वयंपाकाच्या अनेक पाककृती त्यांनी दिलेल्या आहेत. वेगवेगळी धान्ये कशी साठवावीत, त्यांची साठवणूक करताना काय काळजी घ्यावी वैगेरे माहिती त्यांनी अगदी बारकाईने दिली आहे. उन्हाळी कामे जसे की पापड, पापड्या, वड्या, सांडगे, गव्हाचा चीक, लोणची, मुरांबे, सरबतं, गुलकंद याबद्द्लही त्यांनी लिहिले आहे. तांदुळाच्या पापड्या करताना सध्या वापरात असलेले लोखंडी स्टॅण्डच्या ऐवजी त्यांनी वडाच्या पानांना तेल लाऊन त्यावर पीठ पसरुन पापड्या कराव्यात असे सांगितले आहे. याचबरोबर भात, पोळ्या,भाकऱ्या, भाजी करताना काय काळजी घ्यावी याबद्द्ल सांगितले आहे. फोडणीच्या भागात त्यांनी ठिकरीची फोडणी याची माहिती दिली आहे. त्यालाच आज आपण smoke देणे असे म्हणतो. फुटक्या मडक्याचा तुकडा लाल तापवून त्यावर तेलाचे चारपाच थेंब, जिरे व हिंग घालून त्याचा धुर कोंडून त्या धुराचा वास ताकाला, रायत्यांना देतात त्याला ठिकरीची फोडणी असे म्हणत.

Recipe

यानंतरच्या प्रकरणात त्यांनी दुपारनंतर करायची कामे जसे शिवण, टिपण, पत्रावळी लावणे याबद्दल लिहिले आहे. सायंकाळी मनोरंजनासाठी गावयाची गाणी, खेळ याचे वर्णन केले आहे. याच बरोबर बागकामाविषयीही त्यांनी विस्तृत लिहिले आहे. ज्यांना बाजाची पेटी वाजवण्याचा छंद असेल त्यांच्यासाठी बाजाच्या पेटीच्या पट्ट्या वगैरेंच्या आकृत्या काढून माहिती दिलेली आहे.

रात्रीची कामे, विडा कसा लावावा, अंथरुण, पांघरुण, रात्री निजायच्या आधी म्हणायचे अभंग या विषयांवरही प्रकरणे आहेत. त्यानंतर सणवार, व्रते याबद्द्ल लिहिले आहे. पुस्तकाचा शेवटचा भाग मनोरंजक आहे. पुस्तकाला शेवटी परिशिष्ट आहेत. त्यात रोजचे हिशोब कसे लिहावेत याची कोष्टके दिली आहेत. याचबरोबर वेगवेगळी पत्रे लिहिताना मायना कसा लिहावा याबद्दलही त्यांनी लिहिले आहे. यात पतीला पत्र लिहिताना त्यांनी काय लिहावे हे वाचून सध्याचे सर्व पतिराज घायाळ होतील.

Letter

एक परिशिष्ट उखाण्यांचे आहे. यातले काही उखाणे मनोरंजक आहेत.

Ukhane

वाचताना अनेक मनोरंजक गोष्टी हाताला लागल्या व म्हणून त्याबद्दल लिहावेसे वाटले. साधारणतः एका शतकापूर्वीच्या आपल्या मराठी समाजजीवनाचे प्रतिबिंब म्हणजे गृहिणी-जीवन-सर्वस्व असं म्हणायला काही हरकत नाही.

कौस्तुभ मुदगल

12 thoughts on “माझे आवडते पुस्तक अर्थात गृहिणी-जीवन-सर्वस्व

Add yours

  1. प्राणेश्वर, ममप्रिय, मानसविहारिणी हंसिका, चित्तचकोरचंद्रिका ….
    आई आई गं ss कळ उठली अगदी काळजात 🙂
    कुलीन स्त्रियांनी गायची गाणी पण खास आहेत!
    वाचायलाच हवं पुस्तक.
    ओळख करून दिल्याबद्दल धन्यवादच! 🙂

    Like

  2. घरच्या गृहिणीची काळजी, तिच्या बद्दल वाटणारी आत्मियता आणि तिचे रोजचे जीवनमान सुखकर करण्याचा हा प्रयत्न 1930 सालात सुध्दा होता हे वाचून अतिशय आनंदित झालो, खरे तर आजही गृहिणी साठी असा विचार करणारे विरळाच. ह्या पुस्तकातून घेण्यासारखे बरेच काही आहे. आणि हे सर्व प्रकाशात आणल्याबद्दल कौस्तुभ आणि यशोधनचे मनपूर्वक अभिनंदन….

    Like

  3. खास पुस्तक आणि खास ओळख!
    काही पाने आणि काही फोटो छापल्याने खुमारी वाढली आहे.
    पुस्तकाची निवडच भारी! 😀😀

    Like

  4. मालिनी पाणंदीकर यांनी त्या काळात आंतरधर्मीय विवाह केला होता. हा संदर्भ आमचे मित्र मिलिंद बाम यांनी दिला.

    Like

  5. १९२७ साली समाजात प्रेमविवाहाच्या शक्यता अत्यंत कमी असण्याच्या काळात डॉ. भांडारकर यांची नात मालिनी पाणंदीकर यांनी श्री. गुलाल बशिरुद्दीन खान या मुस्लीम तरुणाबरोबर प्रेमविवाह केला. मालिनी पाणंदीकर मुलींच्या हुजूरपागा शाळेत शिक्षिका होत्या. १९२७ साली समाजावर सदर विवाहाच्या रूपाने ‘बॉम्बच’ पडला. विरोध, चर्चा, निषेधाच्या सभा इत्यादींचा धुरळा उडाला. 

    मालिनी पाणंदीकर या पुरोगामी विचारवंत हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुसीना दलवाईंच्या काकू होत्या.

    Like

    1. ते मला मित्राच्या वैयक्तिक संग्रहातून मिळाले.

      Like

  6. फारच मनोरंजक, तुम्हा म्हणता तस अशा पुस्तकातूनच त्यावेळची समाजस्थिती खऱ्या अर्थाने कळते. या पुस्तकाची प्रत कोठे मिळेल?

    Like

  7. नमस्कार,
    छान ब्लॉग!
    हे पुस्तक माझ्या आज्जीकडे होते पण हरवले, आता हे पुस्तक कुठे मिळू शकेल?

    Like

Leave a comment

Blog at WordPress.com.

Up ↑