जाणिजे यज्ञकर्म

संशोधनामधे फारशा महिला काम करत नाहीत असे वर्तमानपत्रात आपण नेहमीच वाचतो. वैज्ञानिक कार्यामध्ये किंवा संशोधनामधे काम करणार्‍या महिलांची संख्या कमी असेल कदाचित पण एका क्षेत्रात मात्र महिलांइतके संशोधन कुठल्या पुरुष संशोधकानेही केले नसेल. ह्या संशोधनात महिलांची पूर्णतः मक्तेदारीच आहे. हे संशोधन आजही अव्याहतपणे चालू आहे. त्याचा माझ्या चष्म्यातून घेतलेला हा धांडोळा….

आत्तापर्यंत जगात वेगवेगळ्या विषयांवर संशोधन झाली. यातील महत्वाचे संशोधन कोणते? या प्रश्नाला अनेक उत्तरे असू शकतात. ही संशोधने मुलत: वैज्ञानिक प्रगतीसाठी आणि मानवाचे जीवन सुखी करण्यासाठी झाली. पण खरोखरच या संशोधनांमुळे मानवी जीवन सुखी झाले का हा संशोधनाचा एक विषय होईल. याचबरोबर आपली किती प्रगती झाली हे ही बघावे लागेल. मात्र एक संशोधन मात्र मानव अस्तित्वात येण्यापासून आजतागायत अखंडपणे चालू आहे. या संशोधनाने मानवी जीवन सुखी करण्याचा अव्याहत प्रयत्न केलेला आहे. या मुलभूत संशोधनाबद्द्ल कोणाला नोबेल किंवा अन्य पुरस्कार मिळाल्याचे ऐकिवात नाही. हे महत्वाचे संशोधन क्षेत्र नेहमीच दुर्लक्षित राहीले आहे. हे संशोधन केले गेले ती प्रयोगशाळा म्हणजे आपले पाकगृह. मानवाच्या लाखो वर्षापासूनच्या अस्तित्वात त्याच्या पाकगृहात जितके प्रयोग झाले असतील तितके प्रयोग कुठल्या प्रयोगशाळेतही झाले नसावेत आणि या संशोधनाचा पाया घालणार्‍या महिला होत्या. त्यानंतर आलेल्या बल्लवाचार्यांनी त्यात भर टाकली.पाकगृहात वेगवेगळे पदार्थ बनवताना ते आणखी कसे चविष्ठ होतील हे संशोधन आणि ते करणार्‍या महिला व बल्लव हे जगातील श्रेष्ठ संशोधक आहेत.

मानवाच्या मुलभूत गरजांमधे अन्न, वस्त्र आणि निवारा यांचा समावेश होतो. पण त्यातली अन्न ही सगळ्यात महत्वाची. लाखो वर्षापूर्वी मानव निसर्गनिर्मित निवार्‍यांच्या आश्रयाने रहातच होता. वस्त्रांची पण त्याला फारशी गरज नसावी. आजही काही जमाती कमीत कमी वस्त्रे वापरुन रहात आहेतच. पण अन्नामुळे आपल्याला उर्जा मिळते व त्यामुळे आपण आपली दैनंदीन कामे करु शकतो त्यामुळे अन्न मिळवणे हे सर्वात महत्वाची गरज होती.

ac41e357-35dd-4f5e-b8d7-3f886741ea68
मांसाहारी होमो इरेक्टस

वेदांमधे माणूस माकडापासून उत्क्रांत झाल्याचा उल्लेख नाही त्यामुळे माणूस हा माकडापासून उत्क्रांत झालेला नाही असा महत्वाचा विचार अलिकडेच काही तज्ञांनी मांडला. खरे तर हा विचार मांडणार्‍यांकडे बघून माणूस या हुशार प्राण्यापासून उत्क्रांत झाला की नाही हा प्रश्न पडतो तरीही हा अत्यंत गहन विचार बाजूला ठेवून आपण डार्विनच्या मार्गाने पुढे जाऊया. मानवाच्या उत्क्रांतीमधे प्रारंभीच्या काळात तो आपली गुजराण फळांवर करत होता असे आढळून आले आहे. पुढे होमो इरेक्टस मानवाच्या काळात मात्र त्याने शिकार करुन मांसाहार करण्यास सुरुवात केली. लाखो वर्षांपूर्वी मानव हा नि:संशय मांसाहारी होता. Hunter and Gatherer या वृत्तीने भटकत प्राण्याची शिकार करुन तो खात होता. सुरवातीला तो कच्चे मांसच खात असला पाहिजे. यातच त्याला आगीचा शोध लागला व त्यात भाजलेला मांसाचा तुकडा आणखी चविष्ठ लागतो हे त्याला कळाले. बार्बेक्यूचा शोध तेव्हा लागला असावा असेही म्हणायला हरकत नाही.

Hunter and Gatherer या कालखंडात मानवाने दगडापासून हत्यारे बनवण्यास सुरुवात केली. ही हत्यारे बनवण्याचे मुख्य कारण काय असावे? पहीले कारण म्हणजे प्राण्यांची शिकार करणे, दुसरे केलेल्या शिकारीतून कातडे सोडवून मांस मिळवणे. म्हणजे हत्यारांचा शोध व त्यातील संशोधन हे पुन्हा त्याच्या अन्नाच्या गरजेशीच संबंधीत होते. या हत्यारे बनवण्याच्या वाटचालीत अगदी भरभक्कम हातकुर्‍हाडींपासून (hand axe) ते बारीकसारीक काम करण्यासाठी बनवलेली microliths (पेरभर लांबीची दगडी हत्यारे)असा प्रवास झाला आहे. याचबरोबर हत्यारांसाठी कुठला दगड वापरावा, कुठल्या प्रकाराने जास्त धारदार हत्यारे बनवता येतील तसेच दगडाऐवजी हाडांचा हत्यारे तयार करण्यासाठी केलेला उपयोग अशा मार्गाने हे संशोधन सतत चालू राहीले. सुमारे १० ते १५ हजार वर्षापासून मानवाची Hunter and Gatherer ही अवस्था संपली आणि तो एके ठिकाणी राहू लागला. पशुपालन आणि शेतीचा शोध यामुळे त्याच्या भटक्या जीवनात स्थिरता आली. हे दोन्ही शोध परत एकदा अन्नाच्या गरजेशीच निगडीत आहेत. गंमतीचा भाग असा की या कालखंडात त्याच्या अन्नामधील मासांहार कमी होऊन शाकाहारी पदार्थ जसे की धान्य, भाज्या याचा वापर वाढीला लागलेला दिसतो. पुढे प्राण्यांना माणसाळवून तो एका ठिकाणी राहू लागला तरी त्याला अन्नासाठी किंवा शिकारीसाठी बाहेर जावेच लागे. याच वेळी स्त्रियांनी काही जंगली झाडांचे Domestication करुन शेतीला सुरुवात केली आणि मग या पाकगृहनामक प्रयोगशाळेतील प्रयोगांना वेग आला असावा.

याचदरम्यान माणसाला धातूचा शोध लागला. हडप्पा संस्कृतीत हत्यारांसाठी, भांड्यांसाठी मोठ्या प्रमाणात धातूंचा वापर केलेला आढळतो. तेथे झालेल्या उत्खननात गहू, बाजरी, तांदुळ, वेगवेगळ्या डाळी तसे तेलबियांचे पुरावे मिळाले आहेत. त्याचबरोबर नारळ, कलिंगड, मसाल्याचे पदार्थ याची ही त्यांना माहिती होती. तसेच त्यांच्या अन्नात गाय, डुक्कर यांचे मांस तसेच नदीतील मासे यांचाही समावेश होता.

burned-millet-dinner
उत्खननात मिळालेले जळलेल्या स्वरुपातले बाजरीचे दाणे

आपल्या प्राचीन वेदांमधेही यज्ञात बळी देण्याची प्रथा होती. गाय, घोडा, कुत्रा व इतर पाळीव प्राण्यांचा बळी यज्ञामधे दिला जात असे व तो प्रसाद म्हणून भक्षण केला जात असे. त्यावेळी यज्ञ करणारे पुरोहितही मांसाहार करत होते. बौध्द धर्माच्या आगमनानंतर ही प्रथा मागे पडलेली आपल्याला दिसते. परंतू भिक्षेत मांसाहारी पदार्थ मिळाला तर तो स्विकारा असा उपदेशही गौतम बुध्दांनी केला होता.

लहानपणीचं एक गाणं आजही लक्षात आहे ते काहीसं असं होतं…
दत्ताची गाय – गायीचे दुध – दुधावरची साय – सायीचे दही – दह्याचे ताक – ताकाचे लोणी – लोण्याचे तुप – तुपाची बेरी वगैरे वगैरे.
यातले दत्तमहाराज काढले तर पुढच्या गोष्टींवर केलेल्या संशोधनाने थक्क व्हायला होतं. प्राण्यांना माणसाळवण्यापासून अन्नात त्यांच्या दुधाचा वापर व त्यानंतर त्यापासून करता येण्याजोगे विविध पदार्थ यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास कसा झाला असेल? आजही घरी दही लावताना आदल्या दिवशीचे विरजण लागते मग पहिल्यांदा दही कसे लावले गेले असेल? या प्रश्नांची उत्तरे मिळणे कठिण आहे. लोण्याचा वापर हा जगभर मोठ्या प्रमाणात केला जातो पण लोण्यापासून पुढे बनवलेले तुप ज्याला Clarified Butter असं म्हणलं जातं याचा वापर भारतीय उपखंडातच केला जातो. तुपाचा शोध याच भूभागात लागला असावा.

अन्न बनवण्याच्या पध्दतींमधेही मोठ्या प्रमाणात संशोधन झाले. भाजणे, शिजवणे, तळणे, मळणे, आंबवणे, वाळवणे आणि आणखी बरेच काही. तळण्याच्या प्रक्रियेतला महत्वाचा घटक म्हणजे तेल. तेलबियांपासून तेल काढून ते स्वयंपाकात वापरायचे हा किती मोठा शोध आहे. तसेच आंबवण्याची प्रक्रिया जलद करण्यासाठी निरनिराळ्या पध्दती वापरल्या गेल्या. या पध्दतींबरोबरच या प्रकारे अन्न बनवण्यासाठी वेगवेगळी भांडी, चमचे, झारे, उलथणी यातही संशोधन झाले. केवळ अन्न बनवणे या प्रक्रियेतून इतर किती शांखांमधे संशोधने झाली. दह्यापासून ताक करण्यासाठी घुसळणे ही प्रक्रिया गरजेचे असते. मग ही घुसळण्याची क्रिया करण्यासाठी रवी सारख्या उपकरणाचा शोध लागला. मग रवी हाताने किंवा दोराच्या तुकड्याने घुसळण्याचेही प्रयोग झाले. घुसळताना ताक बाहेर उडू नये म्हणून अरुंद तोंडांची भांडी अस्तित्वात आली. अगदी आजच्या इलेक्ट्रिक रवी पर्यंत हे संशोधन चालूच राहिलेले दिसते.

Contract0004
मातिची भांडी

याचबरोबर आणखी एक महत्वाचा शोध म्हणजे मसाल्यांचा वापर. आपल्या वेदग्रंथांमधे हळद, आले, मिरी, चिंच यांचा उल्लेख आलेला आहे. अन्नपदार्थांना रुची आणणारे मीठ हे त्याकाळात अत्यंत दुर्लभ होते. समुद्रकिनार्‍याजवळचा भाग सोडल्यास उत्तर भारतात सहजपणे मीठ उपलब्ध होत नसे. तसेच तिखटासाठी लागणारी मिरची भारतात नव्हती. ती आली पोर्तुगीजांबरोबर साधारणतः १५व्या शतकात. तेंव्हा तिखटपणा आणण्यासाठी काळी मिरी हा एकमेव पदार्थ होता. पण मिरी मिळणेही तसे दुर्लभच. मीठ आणि मिरी चलन म्हणून वापरात असल्याचे पुरावे मिळतात. याच बरोबर अगदी मध्याश्मयुगापासून (१० हजार वर्षापूर्वी) माणसाला पदार्थांना गोडी आणणार्‍या मधाची माहिती होती. वेदग्रंथांमधे आपल्याला उसाचा उल्लेख सापडतो. त्यापासून गुळ व साखर बनवली जात असे. त्याच बरोबर ताडगुळाचाही वापर होत असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.

ch_9
धान्याचे कांडप करतानाचे शिल्प, सांची

पाकगृहातील प्राचीन काळापासून झालेल्या या संशोधनावर फारसे लिहिले गेलेले नाही. या प्रयोगशाळेत किती वेगवेगळे प्रयोग झाले असतील? एखादे अन्न खाण्यायोग्य आहे की नाही याचा शोध कसा घेतला असेल? कुठले पदार्थ एकत्र आल्यावर ते चविष्ठ होतात? अन्न करताना भाजणे, शिजवणे इ. पैकी कुठला प्रकार वापरावा? धान्याची साठवणूक करण्यासाठी त्यावर काय प्रक्रिया करावी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सापडणे खरंच कठीण आहे. खरे तर ही यादी खूप मोठी होईल. अन्नाचा हा इतिहास फारच रंजक असला पाहिजे.

भारतात प्रत्येक मैलाला भाषा बदलते असे म्हणतात. तसेच प्रत्येक मैलाला एखादा पदार्थ बनवण्याची पध्दत आणि चवही बदलते. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास विदर्भात बनवले जाणारे बेसन आणि पश्चिम महाराष्ट्रात बनवल्या जाण्यार्‍या पिठल्याची जातकुळी एकच पण चवीत आणि बनवण्याच्या पध्दतीत जमीन आस्मानाचा फरक. खाण्याच्या पदार्थांमधील हे वैविध्य जगभरात फारसे आढळत नाही.

संशोधन चालणार्‍या प्रयोगशाळामधे प्रयोग करायचे असतील तर त्याला काही नियम असतात. ते नियम पाळले तरच तो प्रयोग यशस्वी होतो. पण या प्रयोगशाळेत कुठलेही नियम, बंधने पाळायची सक्ती नाही. त्यामुळे जगभर सगळ्या पाकगृहांमधे वेगवेगळे प्रयोग चालूच आहे असे म्हणणे उचित ठरेल. या प्रयोशाळांमधे नियम किंवा अटी असत्या तर पाककलेवरची पुस्तके वाचून वेगवेगळ्या व्यक्तींनी केलेल्या एखादा पदार्थाच्या चवीमधे जमीन अस्मानाचा फरक पडला नसता. काल तिखट झालेले कालवण आज कमी तिखट करण्याची मुभा ही प्रयोगशाळा तुम्हाला देते. बटाट्यापासून पंजाबी पध्दतीने जिरा आलू किंवा काचर्‍या करण्याचे स्वातंत्र्य या संशोधकांना नेहेमीच मिळते. त्याचबरोबर तयार झालेला पदार्थ चांगला का वाईट हेही व्यक्तीसापेक्ष आहे. त्यामुळे हे संशोधन माझ्या मते अतिशय महत्वाचे ठरते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सगळे संशोधन ओपन सोर्स आहे. वेगवेगळ्या पाककृती करण्याच्या पध्दतींची जगभरात देवाण घेवाण झाली. त्याच बरोबर एखादा पदार्थ आणखी कसा चविष्ठ होईल याबद्दलही माहितीचे आदान प्रदान झाले. शक्यतो आपण केलेल्या संशोधनावर आपला स्वामित्वहक्क असावा अशी संशोधकांची धारणा असते. पण हे मानवाचे जीवन रुचकर बनवणार्‍या या संशोधनकार्याचे आणि यात प्रयोग करणार्‍या महिलांचे आणि बल्लवांचे या जगावर मोठे उपकार आहेत.

आई नेहेमी म्हणायची ’अन्नावर राग काढू नये’ या वाक्याचा अर्थ कळण्यासाठी बराच काळ जावा लागला.

कौस्तुभ मुदगल

11 thoughts on “जाणिजे यज्ञकर्म

Add yours

  1. फारच छान. या विषयावर अजुनही लिहायला हरकत नाही. इतिहासात अपघाताने सापडलेल्या अनेक पाककृती आहेत त्यांचा धांडोळा घ्या. कारण लोकांना इतिहास आवडो वा न आवडो, खायला मात्र आवडते.

    Like

  2. मस्त… मीठ आणि मिरी चलन म्हणून वापरायचे… आता वाचून गंमत वाटली.

    Like

  3. हा लेख म्हणजे स्वयंपाक ह्या जिव्हाळ्याच्या विषयावरील चविष्ट मेजवानी. कितीही खाल्लं तरी अजून दोन घास मिळायला हवे होते असं वाटायला लावणारी.

    पुढल्या लेखांसाठी पोटभर शुभेच्छा !

    Like

  4. मस्त लेख!
    >> अन्नाचा हा इतिहास फारच रंजक असला पाहिजे.
    खरंय!!
    – सचिन

    Like

  5. अभ्यासपूर्ण आणि माहीतीपूर्ण लेख, मस्त एकदम

    Like

  6. वाह! प्रस्तुत विषयाची प्रस्तावना आणि ओळख करून देणारा हा लेख छानच जमला आहे आणि विविध मुद्यांच्या उल्लेख व माहितीमुळे रुचकर ही बनला आहे.
    काही नवीन गोष्टी यानिमित्ताने समजल्या.
    धन्यवाद आणि शुभेच्छा!

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: