लहान असताना मला विक्रम आणि वेताळाची गोष्ट फार आवडायची त्या गोष्टीची सुरुवात नेहमी ‘पण विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही आणि पुन्हा तो झाडापाशी आला’ अशीच असायची. या वाचल्या गोष्टींना जागून छापखान्याच्या मुळाशी जाण्याचा हट्ट काही मी सोडला नाही आणि पुन्हा खोदाखोद सुरू केली. याच उत्खननात हाताला जे काही लागलं त्यातून हा लेख तयार झाला. पहिल्या लेखात आपण सतराव्या शतकात होतो पण “आधी शिखर मग पाया” या माझ्या नेहमीच्या सवयीला जागून आता आपण पार सातव्या-आठव्या शतकापासून सुरुवात करत परत सोळाव्या शतकापर्यंत येऊन पोचणार आहोत.
https://dhaandola.wordpress.com/2017/10/18/printing_in_india/
आधीच्या लेखात आपण भीमजी पारेखने १७व्या शतकात मुंबईत केलेल्या खटपटीविषयी बोललो होतो आता आपण जगभरातल्या छपाईच्या सुरुवातीबद्दल बोलत बोलत परत भारतात येऊया.
मानवाने मुद्रा फार पूर्वी तयार केलेल्या होत्या, सिंधू संस्कृतीतल्या विविध मुद्रा आज आपल्याला अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. आपल्या प्राचीन महाकाव्यातही अनेकदा पत्रावर मुद्रा उमटवण्याचा उल्लेख येतो. त्यामुळं ब्लॉक प्रिंटींगची सुरुवात इथून झाली असं समजायला काही हरकत नाही.
भारताच्या इतिहासातल्या अनेक गोष्टींचा संबंध बुद्ध किंवा बौद्धधर्माशी कुठे ना कुठे जोडता येतोच त्याप्रमाणे छपाईच्या तंत्राच्या शोधाचे मुळही बौद्ध धर्माशी जोडता येते. १९०७ साली ऑरेल स्टेन नावाच्या एका संशोधकाने चीनमधल्या Cave of Thousand Buddhas या गुहेचा शोध लावला. तिथे त्याला अनेक हस्तलिखित पुस्तके सापडली आणि त्याच ढिगात हिरकसूत्र नावाचे एक पुस्तकही सापडले पण आश्चर्य म्हणजे हे पुस्तक छापील होते व त्याच्या छपाईचे साल होते इस ८६८. म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या चालुक्यांचे साम्राज्य नष्ट होऊन तेंव्हा एक शतक उलटून गेलेलं होतं आणि गझनीच्या महमुदाचा जन्म व्हायला अजून तेवढाच अवकाश होता.
हिरकसूत्र हे बहुतेक जगातील पहिले ज्ञात छापील पुस्तक असावे. पण त्यापूर्वी इस ६५० मध्ये ब्लॉक प्रिंटींग तंत्राने बुद्धाची काही चित्रे छापली गेली होती असे संदर्भ सापडतात पण या चित्रांपैकी एकही चित्र उपलब्ध झाले नाही. इस ८६८ साली छापलेल्या हिरकसूत्राची अडीच फूट लांब व एक फूट रुंद या आकाराची सहा पाने सापडली आहेत आणि या सलग पानांची एकूण लांबी सोळा फूट आहे.
चीनमधल्या छपाईच्या इतिहासातील अजूनही काही संदर्भ उपलब्ध आहेत. इस १०४१ मध्ये पी शॅंग नावाच्या एका खटपट्या गृहस्थाने चिनी मातीचे छपाईचे खिळे तयार केले या खिळ्यांना लोखंडी फ्रेम मध्ये बसवता येई. त्यांनतर त्याने जस्ताचे खिळे बनवण्यातही यश मिळवले. इस १३१४ मध्ये वॉंग चँग नावाच्या गृहस्थाने तर लाकडी खिळे बनवले. ज्याअर्थी हे उद्योगी लोक खिळे बनवण्यासाठी एवढे झटत होते त्यावरून छपाईचे प्रमाणही जास्त असावे व त्यात निरनिराळे प्रयोगही चालू असावेत असा अंदाज करता येईल.
आजच्याप्रमाणेच चिन्यांच्या हातावर हात मारत कोरियाचा राजा यी याने इस १३९२ मध्ये छपाईचे खिळे बनवण्यासाठी फौंड्री सुरू केली आणि पंधरा वीस वर्षाच्या धडपडीनंतर ब्रॉन्झच्या खिळ्यांनी १४०९ मध्ये कोरियन भाषेतले पहिले पुस्तक छापले.
युरोपला छपाईचे तंत्रज्ञान बहुतेक चिनी लोकांकडूनच माहीत झाले असावे पण यावरसुदधा अभ्यासकांचे दुमत आहेच. पण युरोपातले पहिले पुस्तक १४५७ मध्ये छापले गेले हे नक्की.
जगभरातल्या छपाईचा आढावा घेऊन आता आपण पुन्हा भारतातल्या छपाईकडे वळूया. भारताशी संपर्क आलेल्या युरोपिअन देशांपैकी फ्रान्समध्ये १४७०, इंग्लंडमध्ये १४७७ आणि पोर्तुगालमध्ये १४९५ मध्ये छपाईला सुरुवात झाली. ब्रिटिश किंवा फ्रेंच भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार किंवा प्रसार फारसा करत नसत पण पोर्तुगीज जेसुईट मिशनरी मात्र धर्मप्रसाराच्याबाबतीत भयंकर आग्रही होते आणि राजसत्तेने त्यासाठी प्रयत्न करावेत असे एकंदरीत या मंडळींचे म्हणणे होते.या उत्साही मंडळींनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी एतद्देशीय धर्मगुरू तयार व्हावेत म्हणून गोव्यात Casa de Santa Fe नावाने एक कॉलेजही सुरू केलेले होते.या कॉलेजात भारतीय विद्यार्थ्यांसोबतच काही चिनी, निग्रो आणि अॅबिसिनीयन (आजचा इथिओपिया) विद्यार्थीही होते.

या कॉलेजात शिकवणारे एक शिक्षक जोआन्स डी बेरा यांनी त्यांच्या रोममधल्या वरिष्ठाला लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे त्याचा सारांश असा आहे – इथे (म्हणजे Casa de Santa Fe मधे) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पोर्तुगीज भाषेत लिहिता वाचता येते, काहींना लॅटिनही लिहिता आणि वाचता येते पण छापील पुस्तके नसल्याने त्यांच्या अभ्यासावर मर्यादा येतात पण आपण मनावर घेतल्यास या विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेतील छापील पुस्तके पुरवता येतील व धर्मप्रसारास त्याचा निश्चितच फायदा होईल. या पत्राची तारीख आहे २० नोव्हेंबर १५४५, पण या पत्रावर बहुदा काही कार्यवाही झाली नसावी.

अॅबिसिनीयाच्या राजाने १५२६ मध्ये पोर्तुगालच्या D’Manoel याला पत्र पाठवून काही “पुस्तके तयार करणारे कारागीर” पाठवून देण्याची विनंती केली पण हे पत्र पोर्तुगालला पोचण्याआधीच पोर्तुगालचा राजा ख्रिस्तवासी झालेला होता त्यामुळे अॅबिसिनीयाच्या राजाचा हा खटाटोप वायाच गेला.
तरीही अॅबिसिनीयाच्या राजाने प्रयत्न न सोडता पोर्तुगालचा नवीन राजा D’Joao शी या बाबतीत पत्रव्यवहार सुरू केला. पण दप्तर दिरंगाईचा एक अफाट नमुना दाखवत अॅबिसिनीयाच्या राजाची ही विनंती १५५६ साली म्हणजे जवळपास तीस वर्षांनंतर मंजूर झाली.
त्याच वर्षी २९ मार्चला एक जहाज छपाईसाठी लागणारे सर्व साहित्य आणि कारागीर घेऊन पूर्वेच्या दिशेने रवाना झाले. फादर नुनेज नावाच्या धर्मगुरुच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आखली गेली होती. नुनेजशिवाय इतरही काही मिशनरी या मोहिमेत सहभागी झालेले होते. खुद्द पोर्तुगालचा राजा या मंडळींना देण्यासाठी सहकुटुंब हजर होता. (काही अभ्यासकांच्या मते ही मोहीम अॅबिसिनीयातील मिशनऱ्यांच्या आग्रहामुळे आखली गेली होती)
एवढ्या सगळ्या पाल्हाळानंतर आता तुम्हाला वाटले असेल की भारतातल्या छपाईविषयी बोलता बोलता आपण अॅबिसिनीयाला कसे काय पोचलो? पण यातच गोव्यात छपाई सुरू होण्याचे मुळ दडलेलं आहे.
त्याकाळात सुवेझ कालवा नसल्याने आधी केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारतात यावे लागे आणि त्यांनतर अॅबिसिनीयाला जावे लागे. असा दमणूक करणारा प्रवास करून १५५६ संपता संपता ही मंडळी भारतात म्हणजे गोव्यात पावती झाली आणि काही दिवस विश्रांती घेऊन पुढच्या प्रवासाच्या तयारीला लागली.पण मधल्या काळात पोर्तुगीज आणि अॅबिसिनीयाच्या राजाचे संबंध बिघडले आणि नुनेज व त्याच्याबरोबरच्या इतर मंडळींना गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नरने पुढच्या प्रवासासाठी परवानगी देणे नाकारले. बिचारा फादर नुनेज गव्हर्नरच्या परवानगीची वाट बघत बघत १५६२ साली गोव्यातच मरून गेला आणि छपाईची सामुग्री व कारागीर गोव्यातच राहिले. पुढच्या काळात गोव्यात छापलेले धार्मिक साहित्यच अॅबिसिनीयाला पाठवले जाऊ लागले.
गोव्यात छपाई सुरू झाली खरी पण जे काही छापले जाई ते पोर्तुगीज भाषेत किंवा रोमन लिपीत छापले जाई. गोव्यातल्या ख्रिस्ती कॉलेजमधील कोंकणी, गुजराती, मल्याळी, केरळी, कन्नड अशा भाषिक विद्यार्थ्यांसाठी पुस्तके छापण्यासाठी लागणारे खिळे अजूनही तयार होणे बाकी होते.
भारतीय लिपींसाठी पहिल्यांदा खिळे तयार करण्याचे श्रेय जोआव गोन्साल्विस नावाच्या स्पॅनिश गृहस्थाला जाते. जोआव गोन्साल्विस हा पेशाने लोहार होता आणि तो उत्तम प्रतीची घड्याळे तयार करत असे. त्याने मलबारी भाषेत फादर स्टीफन्सने लिहिलेला Doutrina Christa नावाचा ख्रिस्ती धर्माचे सार सांगणारा ग्रंथ १५७८ साली छापला. यासाठी त्याने मलबारी भाषेचे खिळे तयार केले.मलबारी म्हणजे नक्की तामिळ की मल्याळम याचा उलगडा बरीच वर्षे होत नव्हता पण जोआवच्या मृत्यूनंतर त्याच्या मृत्यूचे वर्तमान कळवणाऱ्या एका पत्रात जोआव गोन्साल्विसने तामिळ भाषेतील ग्रंथ छापला असा स्पष्ट उल्लेख सापडला. जोआव गोन्साल्विसने तयार केलेला ग्रंथ १५७८ साली छापला गेला, छपाईचे खिळे तयार करण्यासाठी त्याला पेरॉ लुईस नावाच्या पूर्वाश्रमीच्या तामिळ ब्राह्मणाची भरपूर मदत झाली. जोआव गोन्साल्विस Doutrina Christa ची छपाई पूर्ण होण्याआधीच १५७७ साली मरण पावला आणि त्याच्यानंतर त्याचं उरलेलं काम त्याचा साथीदार जोआव परेराने पूर्ण केले.

तामिळ भाषेतील छपाईसाठीची जुळवाजुळव करतानाच जोआव गोन्साल्विस मराठीतील छपाईसाठीही खिळे तयार करण्याचा प्रयत्न करत होता. काही अक्षरे त्याने जुळवलीही होती पण अक्षरांचे वळण, जोडाक्षरे, वाचकांची मर्यादित संख्या व सर्वात महत्वाचे कारण म्हणजे गोव्यातील राजसत्तेची दडपशाही आणि सक्तीचे धर्मांतर या मार्गांचा वापर करून धर्माचा प्रसार करणे हा मार्ग मिशनऱ्यांनी स्वीकारल्याने त्यांना छापील प्रचार साहित्याची फारशी गरज लागत नसे त्यामुळे त्याला हे काम बाजूला ठेवावे लागले. जोआव गोन्साल्विसच्या मृत्यूनंतर देवनागरी लिपीतील छपाईला खीळ बसली.

जोआव परेरा ही देवनागरीतील छपाईवर काम करत असतानाच १५८२ मध्ये मृत्यू पावला. या दोन उद्योगी पुरुषांनंतर देवनागरी छपाईवर काम करणारा कोणी जाणकार न उरल्याने देवनागरीतील छपाईचे काम बारगळले ते बारगळलेच.

१६१६ साली गोव्यातल्या कॉलेजसाठी फादर स्टीफन्सने रचलेले ख्रिस्तपुराण लॅटिन भाषेत छापण्यात आले, १६५४ साली तेच पुन्हा रोमन लिपीतून मराठीत छापले गेले. ख्रिस्तपुराणाची मराठीत छपाई व्हायला मात्र थेट विसावे शतक उजाडले.

अभ्यासपूर्ण, माहीतीपुर्ण आणि वाचनीय लेख
LikeLike
अत्यंत अभ्यासपूर्ण आणि तरीही अतिशय रोचक माहिती.
धन्यवाद यशोधन आणि कौस्तुभ
LikeLike
रंजक आणि माहितीपूर्ण!
LikeLike
मैं मराठी का ज़्यादा जानकार तो नहीं हूं , पर छपाई के इतिहास और अविष्कार का कारण काफी हद तक समझ आया .. सच कहूँ तो इस लेख को पढ़कर.. मैं सोच रहा था .. छपाई का अविष्कार एक सबसे बड़ी क्रांति है.. जिस वजह से आज हम इतना कुछ जानते हैं और जान सकते हैं .. मुझे लगता है आपके रिसर्च की यात्रा का ये एक छोटा सा हिस्सा है पर भारत में छपाई की शुरआत के लिए महत्वपूर्ण ।बहुत सुंदर और आसान शब्दों में आपने ये सारांश बुना है.. विषय पढ़कर ही इच्छा हुई , कि इस पर डॉक्यूमेंट्री बनना चाहिए .. पर अभी स्थिति ऐसी नहीं है , लेकिन जब होगी तो मैं इस पर ज़रूर काम करना चाहूँगा .. आपके बाकी के ब्लॉग भी अब पढूंगा.. ऐसा ही लिखते रहे है.. इस समाज को साफ आईने की ज़रूरत है । आज नहीं तो कल चेहरे देखेंगे ही..
LikeLike
धन्यवाद
LikeLike