पृथ्वीवरील भौतिक परिसराने पराकोटीचे बदल अनुभवले आहेत. ‘अन्न’ या वस्तूचा प्राथमिक स्रोत या भौतिक पर्यावरणामध्येच असतो. वनस्पती आणि प्राणिजीवनाची शक्याशक्यता या भौतिक पर्यावरणाने ठरते. सध्या ‘जागतिक तापमान’ वाढत असल्याची मोठी भयग्रस्त चर्चा चालु आहे. आजवरच्या भूवैज्ञानिक पुराव्यांनुसार पृथ्वीवरील वातावरण तापणे, ते थंडावणे, असे हेलकावे अनेकदा घडले आहेत. जेव्हा मनुष्यप्राणी फार मोठी कर्ब उलाढाल करत नव्हता, तेव्हासुध्दा घडले आहेत. या हेलकाव्यांमुळे जीवसृष्टीची ठेवण बदलते, कधी कधी अतोनात पालटते. दाट ते तुरळक जंगलांच्या जागी वाळवंटी कळा येते. नद्यांचे प्रवाह बदलतात. काही नद्याच सुकून नाहीशी होतात. अशा उत्पातांबरोबरीने अन्नाची व्याख्या पार पालटते.
मनुष्यजातीची वाटचाल इतर जीवसृष्टीप्रमाणेच या बदलांच्या चाळणीतून झालेली आहे. मानवसदृश माकडापासून उपजलेले स्थित्यंतर बदलत बदलत मनुष्यशाखा उपजली; पण इतर माकडांपेक्षा त्याचा जबडा, दातांची ठेवण आणि मेंदू यात लक्षणीय बदल झाले. हे बदल अन्नसंकल्पनेशी निगडित आहेत.
अधिक जाडसर दंतकवच, पसरट दाढांमुळे अनेक प्रकारच्या वस्तू ‘खाद्य’ होऊ शकल्या. ‘वनस्पती’ व ‘प्राणी’ या दोन्हींचे ग्रहण त्यामध्ये चालू राहिले. वाघसिंहादी मार्जार किंवा लांडगा-कुत्रावर्गीय मांसाहार प्राण्यांचे दात वनस्पतिभक्षणाला लायक नव्हते, तर अन्य माकडवर्गीयांनी मांसाहार प्रतिकूल होता. परिणामी, विशिष्ट पर्यावरणाखेरीज त्यांना जगणे मुश्किल होते. माणसाच्या सर्वभक्षीपणामुळे परिस्थितीनुसार तगणे, नव्या परिसरात स्थलांतरीत होऊन तगणे सुकर बनले.
मनुष्यप्राण्यांना कोणकोणत्या रुपाने अन्न गवसत गेले आणि भेडसावत राहिले, या प्रश्नाचे उत्तर फार गुंतागुंतीचे आहे. माणसाची ‘उपजत’ बुध्दी किती, अनुभवातून अंगीकारलेली अशी ‘अनुकूल’ बुध्दी किती, माणसाचा मेंदू कसा विकसित झाला, याचा ‘अन्न‘ या जाणिवेशीही संबंध आहे.
सुमारे २५ हजार वर्षांपूर्वी पृथ्वीचा खूपसा भाग हिमाने झाकलेला होता. भूभागांवर हिमाचे ताव पसरले होते. समुद्राची क्षेत्रेही गोठलेली होती. जशी या हिमतावांची वितळण होत पीछेहाट सुरु झाली तसे वनस्पती व प्राणिजीवन निराळ्या जोमाने व वैशिष्ट्यांनी फुलू लागले. या अखेरच्या मोठ्या हिमयुगाला ‘वुर्म’ म्हणतात. युरोपातले हवामान अधिक उबदार होऊ लागले. बर्फ हटल्याने मोकळ्या झालेल्या जमिनीवर प्राणी, मनुष्य व वनस्पतींचे वैपुल्य वाढू लागले. बर्फ वितळून या अखेरच्या समुद्राची पातळी उंचावू लागली. भारतीय भूभागांवर होणार्या पावसात वाढ होऊ लागली. त्यानंतरच्या सुमारे १३००० ते ६००० पुर्वीच्या काळाला ‘मध्याश्मयुग’ म्हणतात. हा पूर्वीच्या तुलनेत सुबत्तेचा काळ. कंद आणि फळे या स्वरुपामुळे अन्न मुबलक झाले. मानवी लोकसंख्यादेखील बळावली. तरीही आजच्या अर्थाने शेती सार्वत्रिक नव्हती. अन्नपैदास केली जात नसे. अन्न मुख्यत: शोधून गोळा केले जाई. हत्यारे फार प्रगत नव्हती. शिकार मोठ्या कष्टाची असे. मोठ्या प्राण्यांची शिकार मर्यादित संख्येमुळे आणि जिकिरीमुळे कमी असे. मांस साठविणेही शक्य नसे. त्यापेक्षा पाणवठा, गवताळ भागातील छोट्या पण संख्येने विपुल असणार्या प्राणी व पक्ष्यांची शिकार सुलभ असे. या काळातल्या दगडी हत्यारांची ठेवणही त्यामुळे अशा शिकार्यांना अधिक साजेशी आढळते. प्राण्याची शिकार आणि वनस्पतीजन्य अन्न गोळा करणे, याचे प्रमाण सुमारे एकास चार इतके असावे, असा कयास आहे. आधुनिक आर्थिक भाषेत सांगायचे, तर शिकारीमधून मिळणार्या मांसातून जास्त उष्मांक मिळायचे, पण जास्त खर्चीही पडायचे. म्हणून फक्त उष्मांक बेताचेच लाभायचे. त्यापेक्षा अन्न गोळा करण्यासाठीची यातायात अधिक सुकर. या खटाटोपातूनच दोन विशेष बाबी उद्भवल्या. एक म्हणजे ‘शिकारीसाठीचे मित्र प्राणी’ आणि ‘पाळीव प्राणी’ ही नवी संस्कृती व संस्था वाढीला लागली. दुसरे म्हणजे वनस्पतिचक्राची अधिक डोळस जाण येऊ लागली.
या दोन्ही बाबी माणसाच्या समाजाचे व भौगोलिक स्थित्यंतराचे स्वरुप ठरवू लागल्या. परंतु जवळपसा सर्व संस्कृतींमध्ये व समाजांत माणसाचे ‘सर्वभक्षी’ पण (शाकाहार व मांसाहार) शाबूत दिसते. निव्वळ वनस्पतिजन्यं पदार्थांवर उपजीविका करण्याची कुवत पुरेशी आलीच नव्हती. जेव्हा ‘शेती’ ची कल्पना रुजली आणि फोफावली तेव्हाच या शक्यतेचा उदय झाला असावा. बहुतेक सर्व समाजव्यवस्थांमध्ये शेतीचा आरंभ स्त्रियांकडून झाला असावा, असेच सूचित करणारे पुरावे आढळतात. हे फार मोठे आर्थिक स्थित्यंतर आणि सर्वांत लक्षणीय ‘श्रमविभागणी’ चे उदाहरण ठरले आहे. शेती म्हणजे ‘नैसर्गिक’ अशी आपली ढोबळ धारणा असते. ही बव्हंशी विपरीत समजूत आहे. शेती ही मनुष्यमात्राने केलेली सर्वात क्रांतिकारक शस्त्रक्रिया. तिला कृत्रिम म्हणावे की नैसर्गिक? मनुष्य हा निसर्गाचाच एक भाग आहे. त्या अर्थाने ती नैसर्गिकच. आपल्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार आसपासचे भौतिक जग मुरडून घेण्याची मोठी ताकद प्रथम शेतीतून व्यक्त झाली. मनुष्य आधी अन्न ‘निवडून’ घेत असे. शेतीमुळे तो अन्नेतर बाबी निवडून काढून टाकू लागला. अन्न देणार्या वनस्पतींचा अन्नेतर वनस्पतींपासून बचाव करु लागला. वनस्पती लागवडीपासून वाढीपर्यंत हुकमत आल्यामुळे उत्पादन स्थिरावले. वरकड पैदा झाला. मनुष्यजीवन भौगोलिकदृष्ट्यादेखील स्थिरावले. ‘शिकार’, ‘पाळीव प्राणी’ आधारित जीवनक्रमी सावलीसारखा चालूच होता; पण तोही वाढत्या जाणिवेमुळे, ज्ञानामुळे हळूहळू उंचावू लागला.
हे स्थित्यंतरदेखील सर्वत्र एकसमान नव्हते. त्याची गती, प्रगती आणि गुणवत्ता फार भिन्न आणि आणि गुंतागुंतीची आढळते. हे कसे घडले हे समजावून घ्यायला भूविज्ञान, पुराविज्ञान, वातावरणविज्ञान, पर्यावरणविज्ञान अशी अनेक भिंगे वापरावी लागतात, तरच आहे त्या तुटपुंज्या साधनांतून हा इतिहास उलगडतो. जगभरच्या प्रदेशातील विभिन्नता काही अंशी तरी वनस्पतीची नैसर्गिक विखरण कशी झाली, यावरच अवलंबून होती. म्हणूनच पूर्वापार काही भाग म्हणजे वनस्पतिजन्य अन्न, असे ठाम असे तयार होऊ लागले. काही वनस्पतींचे वेचक प्राबल्य फार झपाट्याने वाढले त्याचे सुस्पष्ट दाखले हरतर्हेने मिळतात.
सुरेख लेख. माझे अतिशय आवडते लेखक आहेत हे. सरांची सर्वच पुस्तके आवर्जून वाचावी अशी आहेत. आपले आभार
LikeLike