एक भाग्यवंत झाड सफरचंदाचे

गोविंन्दाग्रजांच्या कवितेतले एक कडवे आठवा

“काही गोड फुले सदा विहरती स्वगागनांच्या शिरी,
काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी ;
काही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि ते ;
एकादें फुटके नशीब म्हणुन प्रेतास शृंगारिते !”

‘फुटक्या नशीबा’ ऐवजी नेमके उलटे भाग्य एखाद्या वृक्षाच्या ‘नशिबी’ येते. गयेमधला बोधिवृक्ष आणि न्यूटनच्या माहेरचे सफरचंदाचे झाड हे त्याचे नमुने.

१६६५ साली प्लेगची मोठी साथ आली. म्हणून केंब्रिजमध्ये नुकताच ‘स्नातक’ झालेला आयझॅक न्यूटन आपल्या वारसघरी परतला. हे घर होते लिंकनशायर मधल्या वूलसथॉर्प येथे. तरूण न्यूटन अनेक समस्यांची उकल करण्यात रमलेला, बव्हंशी एकलकोंडा जीव होता. गणित, ग्रहगोलशास्त्र (अॅस्ट्रॉनोमी) हे त्याचा मेंदू व्यापून राहिलेले विषय होते.

रुढ प्रचलित कथा सांगते अशाच एका वेळी घराच्या बागेत सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटन विचारमग्न बसला होता. तेव्हा एक सफरचंद झाडावरुन गळून सरळ रेषेत खाली पडले. ग्रहगोल असे एकमेकांवर का आदळत नाहीत? पृथ्वीतलावर मात्र कोणतीही वस्तू थेट झपाटत (प्रतिसेकंद ३२ फूट वेग वाढत) खाली पडते….. असे का? या प्रश्नाला या पडत्या सफरचंद फळाची पुन्हा आज्ञा झाली.

यासारखी अनेक कोडी एकाच सपाट्यात सोडविणारा ग्रंथ नंतर वीस वर्षांनी म्हणजे १६८७ साली अवतरला पण त्याचे ‘बीज’ म्हणे या पडत्या फळाच्या आज्ञेतले! अशी ही आख्यायिका.

त्यानंतर न्यूटन इतका मोठा गणिती आणि वैज्ञानिक ठरला आणि त्याच्या प्रयोगशाळा, टिपणे, हत्यारे या बरोबरीने या वूलसथॉर्पमधील एका सफरचंदाच्या झाडाला पण ऐतिहासिक वारसवस्तूचा बहुमान मिळाला. आर.जी. किसींग या भौतिक शास्त्रज्ञाने या झाडाचा मागोवा घेत पुरेसा पिच्छा काढला आणि त्याच्या इतिहासावर उपलब्ध पुराव्यांवर त्याच्या अन्यत्र लाविलेल्या भाईबंद रोपटी, झाडे यांच्या जनुकी छाननीवर अवघे पुस्तक लिहून ठेवले आहे. न्यूटनची भाची ते व्हॉलतेर पर्यंत सगळ्यांची साक्ष, नोंद घेत त्याने सदर इतिहास लिहीला आहे.

आदरापोटी व्यक्तिला ईश्वरी दर्जाची श्रध्दा लाभते. विज्ञानामध्ये न्यूटनचे असे झाले. जगभरच्या भौतिक विज्ञानवंतांना ह्या झाडाचे रोपटे आपल्या संस्थांमध्ये वृक्ष म्हणून नांदवावे असे वाटले. न्यूटनच्या बहुमानार्थ त्याच्या डहाळ्या अलग नेल्या गेल्या. हे मुळ झाड १६५० च्या सुमारास लावले गेले. १८१६ च्या वादळात ते पडले. पण त्याला आपसूक फुटवे पण आले. उरल्या पडक्या झाडाच्या ‘न्यूटनस्मृती खुर्च्या’ ‘न्यूटनस्मृती ओंडके’ झाले आणि थोरांघरी वा संग्रहालयात मिरवू लागले. त्याचीच एक रोपडहाळी नजीकच्या बेल्टन पार्कमध्ये लावली गेली. १९३० मध्ये फ्रुट रिसर्च स्टेशनने त्या झाडाच्या डहाळ्या नेल्या तेव्हापासून जगभरच्या विश्वविद्यालयात संशोधन संस्थांमध्ये त्याचा प्रचार झाला. जणू प्रत्येकाला आपल्या प्रांगणात न्यूटनचा सोबती फोफावलेला पाहीजे होता.

याचा आपला स्वदेशी नमुना म्हणजे पुण्यातील ‘आयुका’ १९९४ साली त्यावेळचे संचालक जयंत नारळीकरांना वुलस्थॉर्प मधल्या ‘मातृ’ वृक्षाचे रोपटे मिळाले. प्रोस्टानी पौष्टिक दिरंगाई, पुण्याची उष्म हवा इत्यादी अडथळे निरंतर चालू राहिले. परिणामी रोप वाढायचे पण मान टाकायचे. अखेरीस १९९७ साली दोन रोपे लावली. सावली धरणारे हिरवट आडोसे केले. सर्वांच्या शर्तीने विशेषकरुन डॉ. भापकरांच्या प्रयत्नाला एक छोटे फळ आले ते मी डॉ. भापकरांबरोबर स्वत: पाहिले होते.

जुन्या बायबलमध्ये ‘अदाम आणि हव्वा’ यांनी खाल्लेले फळ म्हणे सफरचंद होते अशी श्रध्दा वा धारणा आहे. (हे फळ बहुदा प्राचीन नारिंग असण्याचा संभव अधिक आहे) पण मनुष्यजातीच्या निर्मितीप्रमाणे भौतिक विज्ञानालाही मुळ कारण ठरलेले हे विशेष म्हणजे अती प्राचीन वस्तूंच्या नकली प्रतिकृती करणे हा एक मोठा गब्बर चोरधंदा आहे. न्यूटनच्या वृक्ष यास अपवाद नाही. २०१६ साली कॅनडाच्या नॅशनल रिसर्च सेंटरला असे कळून चुकले (खरेतर चुकले ते कळले) की आपल्या परसातला न्यूटन सफरचंद वृक्ष हा मुळचा नाही फार काय तो मूळ ‘ फ्लॉवर ऑफ केंट’ या प्रकारचा सुध्दा नाही !

लॉर्ड ऑफ मिंट झाल्यावर न्यूटनने आपली तीक्ष्ण बुध्दी बनावट नाणी पारखण्याकरता खर्ची घातली होती. आता बनावट न्यूटन वृक्ष पारखण्याचे दिवस आहेत.

डॉ. प्रदिप आपटे

 

6 thoughts on “एक भाग्यवंत झाड सफरचंदाचे

Add yours

 1. आम्ही शाळेत असताना विनोदाने म्हणायचो कि, न्यूटनने झाडावरून खाली पडणारं सफरचंद गपचूप खाऊन टाकायला हवं होतं, पण उगाच डोकं चालवत बसला. काही जणांना असं ही वाटायतं कि, सफरचंद खाली पडताना पाहिलं त्यात एवढं विशेष काय ? लहानपणापासून आपण सगळ्याच गोष्टी खाली पडताना पाहतोच की!
  पण खरं म्हणजे “न्यूटनने सफरचंद खाली पडताना पाहिलं आणि गुरुत्वाकर्षणचा शोध लावला” हे इतकं साधं मुळीच नाहीये. खरं म्हणजे न्यूटनने स्वतःला एक प्रश्न विचारला कि,
  सफरचंद (किंवा कुठलीही गोष्ट) जर वरून पृथ्वीच्या दिशेने खाली पडते तर चंद्र का पडत नाही ??

  Like

 2. लेख छान; बरोबरील न्यूटनचे व्यंगचित्र तर फारच छान! त्या चित्राच्या मुळ स्त्रोताचा साभार उल्लेख यायला पाहिजे होता असे वाटते.

  Like

 3. लेख अतिशय सुंदर. असे लेख शालेय पुस्तकांमधे समाविष्ट करण्यात आले तर मुलं फार आनंदानं आणि चिकित्सक वृत्तीने या जगण्याकडे पाहतील

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: