समजा एखाद्या दिवशी आपण रोजच्यासारखे झोपलो आणि सकाळी उठल्यावर आपल्या लक्षात आलं की हे २०१८ साल नाही तर २०४३ साल आहे म्हणजे आपण २५ वर्षांनंतर जागे झालेलो आहे तर? आपलं सगळं जगच बदलून गेलेलं असेल ना? अशा प्रकारच्या अनेक विस्मयकथाही लिहिल्या गेल्या आहेत.
पण अशा प्रकारची एक घटना प्रत्यक्षात घडून गेलेली आहे. म्हणजे अगदी काही २५ वर्ष वगैरे नाही पण दोन तारखेला झोपून सकाळी उठल्यावर तीनच्या ऐवजी कॅलेंडर चौदा तारीख दाखवतयं असं होऊन गेलेलं आहे. हे कसं झालं ? कुठं झालं? असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेलच तर ही आहे त्याची गोष्ट.
सूर्य उगवल्यावर आपले उद्योग सुरू करणे आणि सूर्यास्ताबरोबर दिवस संपवणे एवढेच एकेकाळी मानवाला माहिती होतं पण हळूहळू विकसित होताना त्याने चंद्र सूर्य इ. च्या स्थितींचा अभ्यास करून आपले कॅलेंडर तयार केले असावे. जगभरात अशी अनेक कॅलेंडर होती पण त्यांच्यात सुसूत्रता नव्हती. म्हणजे इजिप्शिअन कॅलेंडरमध्ये प्रत्येकी ३० दिवसांचे १२ महिने होते आणि प्रत्येक महिन्यात १० दिवसांचे तीन आठवडे होते. (जरा कल्पना करा आजही हेच कॅलेंडर वापरात असतं तर आठवड्यातले पाच दिवस काम करून दोन दिवस सुट्टी घेणाऱ्या आपल्यासारख्या लोकांचे किती हाल झाले असते)
आपल्या साम्राज्यात कालगणनेत सुसूत्रता असावी या हिशोबाने रोमन सम्राट ज्युलिअस सीझरने एक कॅलेंडर तयार करवून घेतले ज्याला ज्युलिअन कॅलेंडर असे म्हटले जाऊ लागले. खरं तर कॅलेंडर तयार करणे, त्यात सूर्य-चंद्राच्या स्थितीचा अभ्यास करून गणितं मांडणे वगैरे गोष्टी भयंकर क्लिष्ट असतात आणि माझ्यासारख्या गणिताची फारशी आवड नसणाऱ्या लोकांसाठी तर ही सगळी आकडेमोड समजून घेणं फारच अवघड असतात. तरीही आपण आता हे कॅलेंडर सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
पृथ्वीला सुर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला ३६५.२५ दिवस लागतात असं आपण सध्या गृहीत धरू. ज्युलिअस सिझरच्या कॅलेंडरमध्ये यात थोडासा बदल करून वर्षाचे बरोबर ३६५ दिवस बनवले गेले. आणि वर्षातल्या महिने व दिवसांचे गणित बसवताना सर्व महिन्यात ३० किंवा ३१ दिवस घालून आणि फेब्रुवारी २८ दिवसांचा बनलेला होता. हे झाले ३६५ दिवस आणि आता उरला फरक वरच्या ०.२५ दिवसाचा, तर दर चार वर्षांनी एकदा फेब्रुवारीमध्ये एक दिवस वाढवून हा एक दिवसाचा फरक भरून काढला जाई. हे कॅलेंडर इसपू १ जानेवारी ४६ पासून वापरले जाऊ लागले आणि पुढे १५ व्या शतकापर्यंत युरोपमध्ये वापरात होते. पण १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात १३ वा ग्रेगरी याने हे कॅलेंडर सुधारण्याचा कार्यक्रम हाती घेतला.
आता तुम्ही विचाराल की ज्युलिअन कॅलेंडर असताना ग्रेगॅरिअन कॅलेंडर तयार करण्याचं कारणच काय? तर याचं उत्तर आहे सौर कॅलेंडर आणि ज्युलिअन कॅलेंडर मध्ये कालगणनेत पडणारा छोटासा फरक. एक सौर वर्ष म्हणजे ३६५.२४२२ दिवस. म्हणजे ज्युलिअन कॅलेंडरचे ३६५.२५ दिवस आणि सौर वर्ष यात ०.००७८ चा फरक दरवर्षी पडू लागला. म्हणजेच दर १२८ वर्षांनी एका दिवसाचा फरक या दोन कॅलेंडरमध्ये पडू लागला.
हे सर्व गणित मांडलेलं होतं पोप १३ वा ग्रेगरी आणि त्याच्या कॅलेंडर सुधारणा समितीनं. १५८२ मध्ये त्यांनी एक नवीन कॅलेंडर तयार करेपर्यंत ०.००७८ हा काळ साठत जाऊन ११ दिवस इतका झालेला होता. १५८२ मध्ये या ग्रेगॅरिअन कॅलेंडरचा स्वीकार स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्सने केला पण इंग्लडने मात्र अजून काही हे कॅलेंडर स्वीकारलेलं नव्हतं.
अखेर १७५२ साली इंग्लडने आणि अमेरिकेने ग्रेगॅरिअन कॅलेंडर स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि २ सप्टेंबरला यातला ११ दिवसांचा फरक लागू करण्याचा निश्चित झाले. म्हणजे २ सप्टेंबरला रात्री ब्रिटिश जनता झोपली आणि थेट १४ सप्टेंबरच्या सकाळी जागी झाली.
या बदलाला जनतेने काही प्रमाणात विरोधही केला, आमचे ११ दिवस परत द्या म्हणून काही काळ इंग्लडमध्ये गोंधळही झाला. पण हळूहळू हा विरोध मावळला आणि सगळं सुरळीत होतं गेलं.
ब्रिटनबरोबर हे नवे कॅलेंडर त्यांच्या सर्व वसाहतींना ही लागू झाले आणि तिथलेही कॅलेंडर ११ दिवसांनी पुढे ढकलले गेले. हे सर्व बदल घडवण्याकरता ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कॅलेंडर ऍक्ट हा ठराव १७५० साली मांडला गेला. या ठरावातल्या एका कलमानुसार जुन्या तारखेनुसार होणारे सर्व सण आणि उत्सव आता नवीन तारखेप्रमाणे करावेत असे स्पष्ट करण्यात आले.
अमेरिकेनेसुद्धा अशाच प्रकारचा एक नियम बनवला. याचे उदाहरण म्हणजे ११ फेब्रुवारी १७३२ साली जन्मलेल्या जॉर्ज वॉशिंग्टनने आपल्या विसाव्या वाढदिवसापासूनचा प्रत्येक वाढदिवस २२ फेब्रुवारीला साजरा करण्यास सुरुवात केली.
आता आपल्याला या वरून बोध हा घ्यायचा आहे की इंग्रजी तारखा प्रमाण मानून आपण ज्या काही ऐतिहासिक घटना भारतात साजऱ्या करतो त्यातल्या १७५२ सालच्या आधीच्या सर्व तारखा आपल्याला अकरा दिवस पुढं नाही काय ढकलायला लागणार ?
टीप- आधीच म्हटल्याप्रमाणे कॅलेंडर, कालगणना हे सगळे अतिशय क्लिष्ट विषय आहेत, हा लेख लिहिताना क्लिष्टता टाळून जेवढ्या सोप्या शब्दात लिहिता येईल तेवढ्या सोप्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यासू लोकांसाठी ज्युलिअन आणि ग्रेगरिअन कालगणनेची विस्तृत माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहेच.
फारच सुरेख…
LikeLike
लेख छान आहे. बरीच नवीन माहिती मिळाली तर काहीची उजळणी झाली . 😊👍🏼👍🏼
– सुजाता देशपांडे
LikeLike
सुंदर माहिती
LikeLike
Nice 👍🏻
LikeLike
मस्त👌🏼
LikeLike
सुंदर, अभ्यासपूर्ण माहिती
LikeLike
आपला लेख वाचनीय होता. आपल्या लेखाशी सार्धम्य असणाऱ्या चलचित्राचा(व्हिडियो) दुवा(लिंक) देत आहे. उत्सुकांनी तो पाहावा.https://www.youtube.com/watch?v=IJhgZBn-LHg
LikeLiked by 1 person
फारच छान आहे हा व्हिडीओ, शाळेत असताना बघायला मिळाला असता तर तेंव्हाच समजलं असतं हे सगळं ☺️
LikeLike