“व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले” ही उक्ती ब्रिटींशाच्या बाबतीत नेहमीच वापरली जाते. पण राज्यकर्ते बनतानाचा त्यांचा प्रवासही तेवढाच मनोरंजक आहे. शतकभराच्या प्रवासाच्या त्यांच्या या आठवणी त्यांनी अनेक ठिकाणी लिहून तर काढल्या आहेतच पण जतनही केल्या आहेत. ब्रिटिश राज्यकर्ते म्हणून उदयाला आल्यानंतरही त्यांचे भारताविषयीचे आकर्षण संपलेले नव्हते. त्यांनी भारतीय, त्यांची संस्कृती, धर्म इ. विषयी विस्तृत अभ्यास केला. भारतभर प्रवास करताना त्यांनी प्रवासवर्णनेही लिहिली. यातले अनेक लेखक मुलकी किंवा सेनेतले अधिकारी आहेत. त्यामुळे यातल्या अनेकांच्या आठवणी आपल्याला एकसारख्याही वाटतात. या सगळ्यातून एक प्रवासवर्णन किंवा आठवणी सांगणारे लिखाण मात्र वेगळं आहे कारण ते लिखाण एका स्त्रीचे तिच्या भारतातल्या वास्तव्याच्या स्मृती जागवणारं आहे.
ही स्त्री आहे १८४८ ते १८५३ मध्ये मुंबईचा गव्हर्नर असणाऱ्या ल्युशिअस बेंटिक कॅरे उर्फ लॉर्ड फॉकलंडची पत्नी अॅमेलिया कॅरे. तिच्या या पुस्तकाचं नाव ‘Chow-Chow; Being selections from a journal kept in India, Egypt and Syria’ हे इतकं लांबलचक आहे. हे पुस्तक १८५७ साली लंडनमध्ये प्रकाशित झाले. पुस्तक प्रकाशनाच्यावेळी या बाईसाहेब जिवंत होत्या की नाही याचा नक्की अंदाज करता येत नाही कारण त्या १८५७ सालीच वारल्याची नोंद आहे. ‘Chow-Chow’ या विचित्र वाटणार्या शब्दाबद्दल माहीती देताना ती म्हणते की – भारतात गावोगाव फ़िरून माल विकणारे बोहरा व्यापारी ‘Chow-Chow’ नावाच्या एका टोपलीत/गाठोड्यात सर्व प्रकारच्या मालाचा एक-एक नमुना ठेवतात. जो ते गिर्हाईकांना उघडून दाखवतात. यावरून आपल्याला अंदाज आला असेलच की त्या ‘Chow-Chow’ प्रमाणेच गव्हर्नरबाईसुद्धा आपल्या या पुस्तकात त्यांच्या पोतडीतून एकेक चीज काढून दाखवणार आहेत.
पुस्तकात काय लिहिलंय हे बघण्याआधी अॅमेलिया कॅरेची आपण थोडी ओळख करून घेऊया. अॅमेलिया ही इंग्लंडचा राजा चौथा विल्यम आणि त्याचं प्रेमपात्र डोरोथी जॉर्डन यांची मुलगी. चार बहीणी आणि पाच भाऊ अशा मोठ्या कुटुंबात ती वाढली. तिचा जन्म १८०७ सालचा. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया ही अॅमेलियाची चुलत बहीण. १८३० साली अॅमेलियाचं लग्न बेंटिक कॅरे उर्फ लॉर्ड फॉकलंडशी झालं. उमराव घराण्यातल्या लॉर्ड फॉकलंडची ईस्ट इंडीया कंपनीने मुंबई प्रांताचा गव्हर्नर म्हणून नेमणूक केली. १८४८ साली तो भारतात येऊन दाखल झाला आणि सोबतच गव्हर्नरबाईही दाखल झाल्या.

अॅमेलिया तिच्या आठवणींची सुरुवात मुंबईत उतरल्यापासून करते. मे महिन्यातल्या एका ’रम्य’ दुपारी त्यांचे जहाज मुंबई बंदरात येऊन दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागताला टळटळीत उन्हात तमाम विदेशी आणि देशी साहेब आपापल्या लवाजम्यासह उभे होते. मंत्र्यासंत्र्यांची वाट बघत उन्हात उभे रहाण्याची रीत जी आपण जागोजागी बघतो तिची मुळे इतक्या मागेपर्यंत गेलेली आपल्याला जाणवतात.
त्यावेळच्या मुंबईचे वर्णन जे काही वर्णन अॅमेलियाने केलेले आहे ते अगदी वाचण्यासारखे आहे. मुंबईत पोचल्यानंतर पहिल्याच दिवशी ती मुंबईचा फेरफटका मारायला बाहेर पडली. त्यावेळी तिला एक लग्नाची वरात दिसली, एका अशक्त घोड्यावर स्वार झालेले नवरा-नवरी, त्यांची चकचकीत बाशिंगे, मुंडावळ्या आणि त्यांच्यासमोर वाजणारी वाजंत्री. या वाजंत्रीला ती Tom-Tom drums म्हणते. संध्याकाळच्यावेळी घोडे विकणारे अरब आणि पारशी लोक सुंदर आणि रूबाबदार कपडे घालून रस्त्यावर कॉफी पित बसलेले पाहून तिला आपण युरोपमध्ये असल्याचा भास होतो. रोज संध्याकाळी Bandstand वर होणारा वाद्यवृंदाचा कार्यक्रम, त्यावेळी आपल्या ’नेटीव’ नोकराचाकरांच्या लवाजम्यासह जमलेल्या ब्रिटिश स्त्रिया, त्याचवेळी डासांनी मांडलेला उच्छाद त्यामुळं कार्यक्रम संपल्यासंपल्या घरी निघून जाण्याची सगळ्यांची गडबड अशा अनेक गंमती ती सांगते.

अॅमेलिया त्यावेळी मुंबईत अनेक ठिकाणी राहीली. परळसारख्या ठिकाणी रोज दिसणारे साप, मलबार हिलवरचे जंगल तिथून रात्री ऐकू येणारी कोल्हेकुई हे ऐकून आपण ही मुंबईच आहे हे विसरून जातो. मुंबईत त्याकाळी जागोजागी असणाऱ्या वाड्या आणि आमराया, माहीममध्ये असणारे नारळी पोफळीचे वृक्ष, त्यावर चढून ताडी काढणारे भंडारी लोक, मलबार हिलवर विखरून पडलेले जुन्या मंदीराचे अवशेष अशी ही मुंबई आपल्या मुळीच ओळखीची नाही. आजच्या गजबजलेल्या मुंबईने ही जुनी मुंबई केंव्हाच गिळून टाकलेली आहे. अॅमेलियाने घारापुरीच्या लेण्यांनाही भेट दिलेली होती, लेण्यातल्या थंडगार हवेने हवेने सुखावून जाऊन ती विचार करते की पुर्ण उन्हाळा यां गुहातच रहावे. पौर्णिमेच्या रात्री चांदण्यात न्हाऊन निघालेल्या भव्य शिल्पांना पाहून ती हरखून जाते.
मुंबई जरी इंग्रजांची व्यापारी राजधानी असली तरीही मुंबईची हवा ब्रिटिशांना फारशी मानवत नसे. एका पार्टीत तिने एका ब्रिटिश माणसाला त्याच्या तब्बेतीविषयी विचारले त्यावेळी खांदे उडवून तो म्हणाला “Ahh ! Alive today, dead tomorrow”. ब्रिटिशांना मुंबईतले उष्ण आणि दमट वातावरण फारसे मानवत नसे. इथले डास, ताप वगैरे गोष्टींचा त्यांना भयंकर त्रास होत असे. अनेक ब्रिटिश अधिकारी भारतातच मृत्यूमुखी पडत. वेगवेगळ्या प्रांतात राहून होणाऱ्या तापांना त्यांनी नावेही दिलेली होती. Sindh fever, Deccan fever, Taraain fever, Nagpore fever, Jungle fever अशी तापांची अनेक नावे त्यांच्यात रुढ होती.
अॅमेलियाला भारतातल्या अनेक गोष्टी अचंबित करत त्यातली एक म्हणजे इथली वृक्षसंपदा. इथल्या संस्कृतीचा भाग होऊन गेलेली झाडे, त्यांच्याभोवती गुंफलेल्या पौराणिक गोष्टी यांचीही नोंद अॅमेलिया घेते. परळला जिथे गव्हर्नर रहात असे तिथे अशोकाचा एक भव्य वृक्ष होता. अशोकाच्या वृक्षाला सुंदर स्त्रीच्या लत्ताप्रहाराने बहर येतो ही कविकल्पनाही तिला माहीत आहे. अॅमेलियाला स्केचिंगची आवड होती, वडापिंपळाच्या गर्द सावलीत बसून किंवा आमराईत बसून ती अनेकदा स्केचेस करत असे. पिंपळावरचे ‘Bachelor Ghost’ म्हणजे मुंजा वगैरेच्या गोष्टीही तिच्या लिखाणातून डोकावतात. साताऱ्याजवळ असणाऱ्या वैराटगडाच्या पायथ्याशी दोन-तीन एकरावर पसरलेले एक वडाचे झाड पाहून ती त्याच्या प्रेमातच पडलेली होती. मजेची गोष्ट म्हणजे तिने झाडांची लग्नेही लावलेली बघीतलेली होती. लिंब आणि पिंपळ एकमेकाशेजारी लावले जात. त्यावेळी लग्नातले सर्व विधीही केले जात, जेवणावळी होत हे तिने नोंदवून ठेवलेले आहे. चिंच आणि आंब्याचेही लग्न अशाच प्रकारे लावले जाई. ती आळंदीला गेलेली असताना तिने बरीच खटपट करून तिथल्या अजान वृक्षाची एक फांदी मिळवली आणि ती रुजवण्याचा प्रयत्न केला. नंतर तिचा मित्र आणि भारताचा पहिला Chief Conservator of Forest डॉ. गिब्सन याने ते झाड रूजवून तिला इंग्लंडला कळवलेही होते.
भारतात इंग्लंडच्यामानाने नोकरचाकर जास्त उपलब्ध असत त्यामुळे एखाद्या बड्या साहेबाच्या घरात नोकरचाकरांची फौजच असे. स्वैपाकी, माळी, घोडेवाला, हमाल (घरातली वरकड कामे आणि स्वच्छ्ता करणारा), धोबी, घरातले दिवे पाजळणारा मशालजी, पाणीवाला भिस्ती, गायवाला असे अनेक लोक घरात वावरत असत. त्यापैकी अनेकांना कामचलाऊ इंग्रजी समजे आणि बोलता येई. पण ज्यांच्याशी नेहमी संबंध येई असे व्यापारी, बेकरीवाले, खाटीक इ. लोकही असत. त्यांच्याशी बोलताना त्यांचे इंग्रजी समजून घेणे हे अत्यंत अवघड असे. त्याचा नमुना म्हणून एका खाटकाने त्याचे गिऱ्हाईक असणाऱ्या एका कलेक्टरीण बाईंना लिहिलेली चिठ्ठीच अॅमेलिया आपल्यासमोर पेश करते. तो लिहितो —
To Mrs. Collector Sahib, ESQ
Honoured Madam,
Madam’s butler says that madam is much displeased with poor butcher, because mutton too much lean and tough. But Sheep no grass got, where get fat? When come rain then good mutton. I kiss your honour’s pious feet. I have honour to remain madam.
Your affectionate butcher,
Mohomed Cassein
अॅमेलिया आणि इतर बरेचसे ब्रिटिश लेखक यांत एक महत्वाचा फ़रक आपल्याला जाणवतो तो म्हणजे इतर बरेचसे लेखक जंगल किंवा शिकार यांच्याच वर्णनासाठी शब्द खर्च करतात तर अॅमेलिया मात्र इथल्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचा पुरेपुर आढावा घेण्याचा प्रयत्न करते. हिंदू धर्मातले अनेक बारकावे ती टिपते. तिला शिवपार्वती आणि त्यांचा परिवार माहीत आहे, विष्णूचे दशावतार, हनुमान, काली, गणपती यांच्या अनेक गोष्टी ती लिखाणातून मांडते. शाळीग्राम हे विष्णूचे रूप असून गंडकी नदीत सापडणारे दगड हे शाळीग्राम म्हणवले जातात. त्यावर विष्णूच्या चक्राचे ठसे असतात एवढी बारीकसारीक माहीती ती आपल्याला देते. अॅमेलिया वाईला असताना तिथल्या मंदीरांना भेटी देऊन तिने काही मंदीरातल्या पुजाऱ्यांशी धार्मिक चर्चाही केली होती. वाईजवळच्या धोम येथील मंदीरात तिला एका पुजाऱ्याच्या हातात एक सुंदर पळी दिसलेली होती तिला ती फारच आवडलेली होती म्हणून तिने ती विकत घेण्याची इच्छा दर्शवली पण त्या भटजीबुवांनी तिला मुळीच दाद दिली नाही. तर अॅमेलियाने त्याच दिवशी संध्याकाळी वाईच्या बाजारातून तसलीच एक पळी पैदा केली. आज महाराष्ट्रातल्या अगदी मोजक्या लोकांना ’स्थंडील’ म्हणजे काय हे सांगता येईल पण अॅमेलियाला याची व्यवस्थित माहीती आहे. ज्या देशात आपण राज्यकर्ते म्हणून आलेलो आहोत तिथल्या नेटीवांच्या धर्माची वरवर माहीती माहीती असणे चालणार असतानाही ब्रिटिश लोक किती चौकसपणे माहीती नोंदवत हे बघून थक्क व्हायला होतं.
विष्णूचे एक रूप म्हणून विठोबाची उपासना महाराष्ट्रात गेली अनेक शतके होत आहे. अॅमेलियानेसुद्धा याची नोंद घेतलेली आहे आणि ‘Worship of Wittoba’ या नावाने तिने एक अखंड प्रकरणच लिहून काढलेले आहे. विठोबाच्या कथांचाही ती नोंद ठेवते. आपल्याला जी पुंडलीकाची गोष्ट माहीत आहे त्यापेक्षा निराळीच गोष्ट अॅमेलिया सांगते. पुंडलीक आपल्या आईवडील आणि पत्नीसह तीर्थयात्रेसाठी जाताना पंढरपुरातल्या एका मातृपितृ भक्त ब्राह्मणाच्या घरी मुक्काम करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या घरात तीन सुंदर स्त्रिया त्याला घरकाम करताना दिसतात त्या गंगा, यमुना आणि सरस्वती असतात अशी काहीशी अपरिचित कथा ती आपल्याला सांगते.
पंढरपुरात तिथले पुजारी आलेल्या यात्रेकरूंना आपल्याकडे घेऊन जाण्यासाठी ते त्यांचा पाठलाग करत हे ती सांगते. त्याचवेळेला यात्रेकरूंच्या नावागावावरून ते कुणाचे यजमान हे सांगणाऱ्या त्यांच्या चोपड्यांचीही ती माहीती देते. या चोपड्यात संपूर्ण घराण्याची माहीती नोंदवून ठेवली जात असल्याने या चोपड्यांचा उपयोग वारसाहक्क ठरवताना वगैरे केला जाई हे सुद्धा ती नमुद करते.
महाराष्ट्रात दिर्घकाळ राहील्याने अॅमेलियाला आपले अनेक सण आणि उत्सव जवळून बघायची संधी मिळाली. मुंबईतल्या दिवाळीच्या सणाचे वर्णन करताना ती दिव्यांनी आणि आकाशकंदीलांनी उजळून गेलेली सुंदर घरे, उत्तम कपडे घातलेले पुरुष, त्यांचे रंगीबेरंगी पटके, आणि आकर्षक दागिने घातलेल्या व सुंदर रेशमी साड्या नेसलेल्या स्त्रिया यांची वर्णने ती करते. दिवाळी साजरी करण्याचा उद्देश एखाद्या ज्ञानी माणसाला विचारला तर तो हा उत्सव दुर्गा किंवा कालीचा आहे म्हणून सांगेल तर एखादा उनाड माणूस मात्र हा लक्ष्मीचा आहे म्हणून सांगेल अशी पुस्तीही ती आपल्या दिवाळीच्या वर्णनाला जोडते. (यावरून आपण कोणत्या गटात मोडतो याचा आपणही विचार करायला हरकत नाही.) शिमग्याच्या सणाची आपली माहीती (आता बोंब मारायला होळीची वाट बघायला लागत नसल्याने) पोळीच्या पुढे फारशी सरकत नाही पण अॅमेलिया मात्र होळीचे वर्णन वसंतोत्सव, कामोत्सव किंवा मधुत्सव असे करते. होळीच्या वेळी होणाऱ्या कामदेवाच्या पूजेचाही ती उल्लेख करते. पुण्यातल्या गणेशोत्सवाचे वर्णन करताना ती हत्ती, घोडे, पालखी यांसह निघणाऱ्या विसर्जनाच्या मिरवणुकीत होणाऱ्या वाद्यांच्या कर्कश्श आवाजाविषयीही सांगते. आणि सगळ्यात शेवटी विचारते की एवढ्या सुंदर मुर्तीला पाण्यात का बुडवायचे ?
भारतीयांच्या श्रद्धा आणि परंपरा यांविषयी अॅमेलियाला विलक्षण कुतुहल आहे. भारतातल्या जनतेत मृत्यू, त्या नंतरचे जीवन आणि पुर्नजन्म यांविषयी पुर्वापार श्रद्धा आहे आणि पारलौकिक जीवनासाठी त्यांचे सदैव प्रयत्न सुरु असतात हे निरिक्षण अॅमेलियाने नोंदवले आहे. या श्रद्धा फक्त हिन्दुधर्मीयांच्या पुरत्याच मर्यादीत होत्या असे नव्हे तर मुस्लीम समाजातही त्या होत्या. बोहरी समाजातील धर्मगुरू ज्याला ’आगा’ असे म्हटले जाते तो त्याकाळी लोकांकडून पैसे गोळा करून जन्नतला जाण्याचा ’पासपोर्ट’ देई. हा पासपोर्ट म्हणजे खरोखर एक कागद असे आणि मृताचे दफन करताना हा पासपोर्टही त्याच्यासोबत पुरला जाई.
मुंबईतला उन्हाळा ब्रिटिशांना अजिबात सहन होत नसे त्यामुळे मुंबई जरी राजधानी असली तरी वर्षातून निम्मा वेळ ते मुंबईच्या बाहेरच काढत. उन्हाळ्यात महाबळेश्वर, पावसाळ्यात पुणे असे शक्यतो त्यांचे मुक्काम असत. मुंबईच्या उकाड्याबद्दल लिहिताना अॅमेलियाने एक मजेशीर प्रसंग सांगीतलेला आहे. एकदा अॅमेलिया आणि गव्हर्नर भायखळ्याच्या चर्चमध्ये रविवारच्या प्रार्थनेला गेले असताना तिला खिडकीबाहेर अनेक नेटीव लोक जमलेले दिसले, क्षणभर तिला वाटलं की हे सगळे लोक गव्हर्नरला भेटायला जमले असावेत पण प्रार्थना सुरू होताच तिला समजलं की हे सगळे लोक पंखे चालवणारे आहेत.
ब्रिटिश उन्हाळा मुंबईत घालवण्याऐवजी महाबळेश्वरला पसंती देत. मुंबईतून महाबळेश्वरला जाताना पुणे-वाई असा आपला आजचा मार्ग न निवडता ते आधी मुंबईतून वाफेच्या छोट्या जहाजाने बाणकोटला पोचत तेथून सावित्री नदीतून महाड आणि तेथून पालखीने घाट ओलांडला जाई. या प्रवासाच्या दरम्यान अॅमेलिया पालखीच्या भोयांशी संवाद साधून त्यांच्या या कामाबद्दल, त्यांना त्यातून मिळणाऱ्या मोबदल्याबद्दल माहीती मिळवते. भाषेचा अडथळा असतानाही ती त्यांच्या धार्मिक समजुती आणि रिती परंपरा समजून घेण्याचा प्रयत्न करते. त्यातून तिला देवाला कौल लावणे आणि बगाड यांसारख्या प्रथा समजतात.
घाट चढून वर जाताना अॅमेलियाला सह्याद्रीच्या रौद्ररूपाचे,दाट जंगलांचे दर्शन होते. सह्याद्रीविषयीच्या अनेक पौराणिक कथा तिला माहीत आहेत. त्यातली एक तर अतिशय वेगळी आहे. सह्याद्री हा मुळात हिमालयापेक्षाही उंच होता त्यामुळे सुर्याचा रथ त्याच्या उत्तुंग शिखरांना अडत असे. सुर्याने या अडचणीवर तोडगा काढण्याची विनंती पर्वतांचे गुरु अगस्ती ऋषींना केली. अगस्ती मग सह्याद्रीकडे आले. अगस्ती मग सह्याद्रीकडे आले अगस्तींना पाहून सह्याद्रीने त्यांना वाकून नमन केले. अगस्ती ऋषींनी त्याला ते समुद्रावरून संध्या करून येईपर्यंत तसेच थांबण्याची आज्ञा केली आणि ते संध्या करायला निघून गेले. सह्याद्री वाकून बसून राहीला पण अगस्ती ऋषी काही परत आले नाहीत. सह्याद्री कायम वाकलेलाच राहून गेला आणि सुर्याच्या रथाचा अडथळा कायमचा दूर झाला. (बहुधा या प्रसंगाला जोडूनच तो तीन आचमनात समुद्र पिऊन टाकण्याचा प्रसंग झाला असावा)
महाबळेश्वरला पोहोचल्यावर तिथली थंड हवा, उतरलेले ढग, दाट जंगल आणि सकाळच्यावेळी पडणारे धुके पाहून अॅमेलिया हरकून जाते. तिथं रहाणारे लोक, त्यांचे कष्टाचे जीवन यांचेही तिला अप्रूप वाटते. आपल्याला माहीत असलेलं आजचं महाबळेश्वर आणि अॅमेलियाने बघितलेलं महाबळेश्वर यात प्रचंड तफावत आहे. कुठले कुठले पॉईंट बघत हिंडणाऱ्या आपल्यातल्या अनेक पर्यटकांना याची कल्पनाही नसेल की हे सगळे पॉईंट ब्रिटिशांनी शोधलेले आहेत.
त्याकाळात काही हौशी ब्रिटिश शिकारीमागे जंगल पिंजून काढत होते तर काही महाबळेश्वर फिरता फिरता नवीन पॉईंट शोधून काढत होते. त्यातल्या काही ठिकाणी अॅमेलिया जाऊनही आलेली होती पण त्यातल्या सुर्योदय पहाण्याचा विल्सन पॉईंट आणि सुर्यास्त बघण्यासाठीचा बॉम्बे पॉईंट फक्त यांचाच उल्लेख ती करते. मावळतीचा सुर्य बघताना ती मध्येच प्रतापगड दाखवून तिथं झालेल्या अफझलखानाच्या वधाच्या प्रसंगाची ती वाघनखांसह इत्यंभूत माहीती देते. याचबरोबर महाबळेश्वरला असणाऱ्या आणि रोज सुर्यास्त बघायला जमणाऱ्या ब्रिटिश स्त्रियांविषयी टिप्पणी करत ती त्यांच्या निसर्गसौंदर्य बघण्यापेक्षा ’गॉसिप’ करत बसण्याच्याही उल्लेख करते.
मराठ्यांचे राज्य लयाला जाऊन तेंव्हा सुमारे तीस वर्षांचा काळ उलटून गेलेला होता त्यामुळे साताऱ्याचे छत्रपती, त्यांची दरबारी मंडळी, सरदार वगैरे अजूनही आपले महत्व राखून होते. अॅमेलिया महाबळेश्वरला असतानाच एकदा साताऱ्याच्या छत्रपतींच्या दोन महाराणी आणि युवराज वेंकाजीराजे हे प्रतापगडावरील देवीच्या दर्शनासाठी गेले असताना त्यांनी रस्त्यात गव्हर्नरची भेट घेतली. यावेळी त्या आपल्या हत्ती, घोडे, ऊंट अशा लव्याजम्यासह आलेल्या होत्या. त्यांच्या आगमनाची वर्दी देण्यासाठी शिंगे आणि नौबती वाजत होत्या. राजस्त्रिया पालखीतून उतरल्यावर त्या इतरांच्या नजरेला पडू नयेत म्हणून दोन्ही बाजूंना किनखापाचे (याला ती Cincap म्हणते) पडदे लावलेले होते. गव्हर्नरतर्फे त्यांचे स्वागत भारतीय पद्धतीप्रमाणे म्हणजे गुलाबपाणी शिंपडून झाले. गव्हर्नरने वेंकोजीराजांना सामोरे जाऊन त्यांचे स्वागत केले. त्यांचा हात धरून त्यांना आसनावर बसवले. हा भेटीचा कार्यक्रम काही काळ चालला. गोड पदार्थ, फळे इ. पदार्थ पाहुण्यांसमोर ठेवण्यात आले आणि शेवटी पानसुपारी होऊन कार्यक्रम संपला. या प्रसंगी राजस्त्रियांची उत्तम वस्त्रे, निवडक पण सुंदर आणि मौल्यवान दागिने. वेंकाजीराजांचे मोती, पाचू आणि हिऱ्यांचे दागिने आणि त्यांचे विलक्षण देखणे व्यक्तिमत्व यांचेही ती वर्णन करते.
भोरच्या पंतसचिवांशीही अॅमेलियाशी भेट झालेली होती. हे म्हणजे बहुदा चिमणाजी रघुनाथ पंतसचिव असावेत. त्यांच्या पत्नीही यावेळी त्यांच्यासोबत होत्या. पंतसचिवांनी अॅमेलियाचे स्वागत इंग्रजीत केले. त्यांच्या पत्नीशी काही काळ दुभाषामार्फत अॅमेलियाचे संभाषण झाले. ही राजस्त्री विलक्षण गोरी, काहीशी ठेंगणी आणि भरपूर दागिन्यांनी मढलेली होती. दुसऱ्या दिवशी तिने स्वत: केलेले अनेक पदार्थ अॅमेलियाला पाठवून दिले. यांत केशर घातलेली शेवयांची खीर, गोड भात, केक्स आणि पेस्ट्रिज म्हणजे बहुदा गोड वड्या, शिवाय दही आणि साखर वापरून केलेला पदार्थ म्हणजे बहुतेक श्रीखंड आणि आंब्याचे लोणचे होते.
पावसाळा सुरु होता होता ब्रिटिश महाबळेश्वरमधून निघत आणि पुण्याकडे प्रयाण करत. त्यावेळी चालू असलेली घरांच्या डागडुजीची कामे,छ्परांची शेकरणी आणि पावसाळ्यासाठी लाकूडफाटा साठवून ठेवण्याच्या कामांचाही ती नोंद ठेवते. महाबळेश्वरला कित्येक वर्षे एक मिशनरी बाई रहात असत त्या पावसाळ्यातही आपले घर सोडत नसत. त्यांचा माळी आणि काही नोकरचाकर यांच्यासह त्या तिथे रहात. महाबळेश्वरला पावसापासून बचावासाठी वापरले जाणारे इरलेही अॅमेलियाच्या नजरेतून सुटलेले नाही.
पुण्याकडे येताना काही काळ अॅमेलिया वाईला ही थांबलेली होती. वाईचे प्रशस्त आणि सुंदर घाट, तिथली मंदीरे, पाठ्शाळा यांचेही वर्णन ती करते. वाईच्या मुक्कामात तिने नाना फडणवीसांची विधवा पत्नी जिऊबाईंची भेट घेतली. या बाई त्यावेळी सुमारे साठीच्या असाव्यात. अॅमेलिया म्हणते या बाई एखाद्या देवीसारख्या विलक्षण सुंदर होत्या. ज्यावेळी त्यांनी अॅमेलियाचे हात हातात घेतले त्यावेळी त्यांचे हात अतिशय मृदु होते असेही अॅमेलियाने नोंदवून ठेवलेले आहे. जिऊबाईंनी अॅमेलियाला माधवराव पेशवे (म्हणजे थोरले माधवराव की सवाई माधवराव हे समजत नाही) आणि नाना फडणवीसांच्या पूर्ण आकाराच्या तसबिरीही दाखवल्या होत्या.
अॅमेलियाच्या पुण्याच्या मुक्कामात म्हणजे खरं तर दापोडीच्या मुक्कामात अॅमेलिया पुण्याच्या परिसराचे, इथल्या सरदारांचे, गव्हर्नरने भरवलेल्या दरबाराचे माहीतीपूर्ण वर्णन करते. दापोडी आणि खडकीतल्या लष्कराच्या छावण्या, तिथल्या बागा, तिथली ब्रिटिश पद्धतीची घरे आणि तिथे होणाऱ्या पार्ट्या यांचाही अंतर्भाव अॅमेलियाच्या लिखाणात होतो. पुण्यात त्याकाळी हरदासाची कथा समाजात अतिशय लोकप्रिय होती. काही ठिकाणी अॅमेलिया त्या कथा ऐकायला जाऊनही आलेली होती. पुण्याच्या रस्त्यांवर बसून तिने चित्रे रेखाटण्याचाही प्रयत्न केला पण त्या काळातही रस्त्यातल्या गर्दीमुळे आणि पुणेकरांच्या ’चौकस’ वृत्तीमुळे तिला हा कार्यक्रम आवरता घ्यावा लागला.
या सगळ्या ऐतिहासिक आणि जुन्या वातावरणाची सफर घडवता घडवताच अॅमेलियाची भारतातून निघण्याची वेळ होते. पण इथेसुद्धा एक सुंदर योगायोग जुळून आलेला आहे. तिचा भारतातला बहुतेक शेवटचा नागरी समारंभ म्हणजे बोरीबंदर ते ठाणे रेल्वेमार्गाचे गव्हर्नरच्या हस्ते झालेले उद्घाटन. यावेळी अॅमेलियाच्या डोक्यात अनेक विचार घोळून गेले. रेल्वे सुरु झाल्यानंतर भारतातील जात, धर्म अशी अनेक बंधने गळून पडतील, लोक एकत्र येण्याची सुरुवात होईल असा आशावादी विचार ती करते. जुना आणि परंपरांच्यात गुंतलेला भारत बघीतलेली अॅमेलिया इथून जाताना एका मोठ्या बदलाची साक्षीदार होऊन होते. १८५३ च्या डिसेंबर महिन्यात एका संध्याकाळी फिरोज नावाच्या जहाजातून ती तिच्या आवडत्या मुंबईतील संधीप्रकाशातील दृष्ये डोळ्यात साठवून घेत घेत भारत सोडते आणि ईजिप्तच्या दिशेने प्रयाण करते.
अॅमेलियाच्या लिखाणातून ब्रिटिश लेखकांनी लिहिलेली हिंदू धर्माविषयीची पुस्तके, इथल्या संस्कृत नाटकांविषयी त्यांनी केलेले लिखाण यांचा वारंवार उल्लेख येतो. तिच्या चौकस स्वभावामुळॆ ती अनेक ठिकाणी जाऊन येते आणि तिथली विस्तृत माहीती देते. उदाहरण द्यायचे झाले तर हिन्दू धर्मातील मृत्यूनंतरचे विधी, पिंडदान, श्राध्द इत्यादी विषयी तिने सविस्तर लिहून ठेवले आहे. या गोष्टी तिने कुठे बघितल्या असतील याचे आपल्याला नवल वाटत रहाते. एतद्देशीय लोकांहून आपण श्रेष्ठ आहोत या दृष्टीकोनाचा प्रभावही तिच्या लिखाणावर जाणवतो. तिला भेटलेल्या मोजक्या स्त्रिया आणि पुरुष सोडले तर बाकीच्यांवर ती कमी उंची, स्थूल बांधा, विचित्र ठेवण अशी शेलकी टिकाही ती सतत करते. इंग्रजांच्या मानाने इथल्या अनेक परंपरा आणि रीतीरिवाज यांचा दर्जा कसा कमी आहे हे वेळोवेळी पटवून सांगताना तिचा सुर नकारात्मक लागतो. पण तरीही जुन्या महाराष्ट्राचे रम्य दर्शन तिच्या या पुस्तकातून होते हे नक्की.
छान माहिती.
LikeLike
खूपच सुंदर माहिती दिली.. लेखिकेचं निरिक्षण लाजवाब.
LikeLike
या विदुषीचे पुस्तक PDF मिळेल काय? पंढरपूर बद्दल सगळे वाचावे वाटले म्हणून विचारले
LikeLike
https://archive.org/details/bub_gb_GMIRAAAAYAAJ इथून डाउनलोड करता येईल पुस्तक
LikeLiked by 1 person
फारच सुंदर. मुळ पुस्तक वाचल्याचा अनुभव येतो.
LikeLike
रंजक माहिती!
LikeLike
नेहमीप्रमाणेच सुरेख
LikeLike
Reblogged this on गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही.
LikeLike
निव्वळ अप्रतिम ..
काही वाचनात न आलेले वाचायला मिळाले. धन्यवाद.
वसंत शेगुणशी.
9423576846
LikeLike