केल्याने देशाटन

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार. शाळेत असताना अनेक वेळा कानवर पडलेल्या या पंक्ती. देशाटन केल्याने खरोखरच आपण जास्त ‘सोशल’ (सोशल मीडिया सॅव्ही नव्हे हं !) व्हायला लागतो.

एखाद्या नवीन गावाला आपल्याला भेट द्यायची असल्यास आपण काय करतो? प्रथमत: त्या गावाला पोहोचण्यासाठी वाहतुकीची कुठली साधने उपलब्ध आहेत हे आपण तपासतो. मग त्या गावात राहाण्यायोग्य हॉटेल कुठले आहे, गावात फिरण्यासाठी काय वाहतुक व्यवस्था आहे, जेवणासाठी कुठले पर्याय उपलब्ध आहेत, गावात बघण्यासाठी कुठली प्रेक्षणीय स्थळे आहेत इ. गोष्टींची आपण माहिती काढतो. आजच्या काळात इंटरनेटमुळे हे काम अतिशय सोपे झालेले आहे. काही सेकंदात ही माहिती तुमच्यासमोर येते.

पण सुमारे ९०-१०० वर्षांपूर्वी या माहितीसाठी कुठली साधन उपलब्ध होती हे बघायला गेले तर आपल्याला असे आढळते की ही माहिती त्या काळात मिळणे तसे कठीणच होते. एखाद्या नवीन गावी जायचे असल्यास तेथे कोणी आप्त/ओळखीचा राहतो का याचा पहिल्यांदा शोध घेतला जात असे. (म्हणजे आऊचा काऊ तो माझा भाऊ असं काहीतरी नातं शोधून काढलं जाई) असा कोणी असल्यास रहाण्या-खाण्याची सोय होऊन जात असे. पण तसा आप्त नसेल तर मात्र हे काम कठीण असे. त्यातही जर परभाषिक प्रातांत गेल्यास भाषेचाही प्रश्न निर्माण होत असे. हे सगळे निरुपण करण्याचे कारण म्हणजे नुकतेच १ जानेवारी १९२५ म्हणजे ९४ वर्षांपूर्वी लिहिलेले एक पुस्तक वाचनात आले.

मुंबईचा मित्र-7

मुंबई ही आज भारताची आर्थिक राजधानी आहे. जेव्हा हे बेट ब्रिटिशांच्या ताब्यात आले तेव्हापासून या शहराची भरभराट व्हायला लागली. मुंबईत काम मिळण्याची मोठी संधी असल्याने त्या काळात मोठ्या प्रमाणात स्थलांतरण झाले. याचबरोबर वेगवेगळ्या कारणांनी बाहेरील अनेक लोक मुंबईला भेट द्यायला येत असत. रेल्वे सुरु झाल्याने मुंबईला पोहोचणे त्यामानाने सोपे होते मात्र मुंबईत फिरण्यासाठी असलेली वाहतुक व्यवस्था, रहाण्यासाठी जागा, प्रेक्षणीय ठिकाणे या विषयांवरील फारशी माहिती त्या काळात लोकांना सहज उपलब्ध नव्हती. या काळात मुंबईत १२ वर्ष वास्तव्य केलेल्या एका माणसास मुंबईत नव्याने येणार्‍या लोकांची ही अडचण दूर व्हावी म्हणून एक मार्गदर्शक पुस्तक लिहावे असे वाटले आणि १ जानेवारी १९२५ रोजी ’मुंबईचा मार्गदर्शक अर्थात मुंबईचा मित्र’ हे पुस्तक जयराम रामचंद्र चौधरी या लेखकाने प्रकाशित केले.

जयराम रामचंद्र चौधरी हे मुळचे पिंपरुड या गावचे राहणारे. पिंपरुड हे छोटेसे गाव नकाशात सहज सापडणार नाही, भुसावळच्या पुढे फैजपूरजवळचे हे एक छोटेसे गाव आहे. त्यांनी दिलेल्या पत्त्यात पिंपरुड गावाच्या पुढे जिल्हा पूर्वखानदेश असा लिहिलेला आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लेखकाच्या नावाखाली जोडाक्षर शिक्षण पाठकर्ते असे लिहिलेले आहे. कामानिमित्त सुमारे १२ वर्षे त्यांचा मुक्काम मुंबई शहरात होता. प्रस्तावनेत ते लिहितात ’नवीन उतारू लोक गाडीतून किंवा बोटीतून उतरल्यावर रस्त्यावर असलेली भयंकर रहदारी व गगनचुंबित (त्या काळातल्या हिशोबाने !) इमारती वगैरे पाहून अगदीच गांगरुन जातात; व त्यांना कोठे जावे? कोठे उतरावे? काय काय पहावे? ह्याविषयी मोठाच विचार होऊन काही एक सुचेनासे होते’ याचबरोबर त्यांनी १८८७ साली प्रकाशित झालेल्या बाळकृष्ण बापू आचार्य व मोरो विनायक शिंगणे यांच्या ’मुंबईचा वृत्तांत’ या पुस्तकाचा मला बराच उपयोग झाला व तज्ञांना माझ्या पुस्तकात काही चुका आढळल्यास त्या कळवाव्यात असे नम्रपणे म्हटले आहे.

पुस्तकात लेखकाने अनेक विषयांवर लिहिलेले आहे. मुंबई बेटाची प्राथमिक माहिती याचबरोबर रेल्वेची व आगबोटींची वेळापत्रके, त्यांच्या भाड्याचे दर, राहण्यासाठी असलेल्या सार्वजनिक धर्मशाळा, प्रेक्षणीय स्थळे, ट्राम वे बद्दलची माहिती असे अनेक विषय या पुस्तकात आलेले आहेत. यातील एक प्रकरण मात्र अतिशय रोचक आहे. ’मुंबईतील ठगबाजीचे काही प्रकार’ हे ते प्रकरण. मुंबईत नव्याने आलेल्या माणसाला कशा प्रकारे फसवले जाते या विषयी त्यांना एक प्रकरण लिहावे असे वाटले म्हणजे मुंबईत त्याकाळातही लोकांना फसवणारे लोक मोठ्या संख्येने होते हे नक्की.

पुस्तकातले पहिले प्रकरण मुंबईला येणार्‍या रेल्वे गाड्यांविषयी आहे. त्याकाळी मुंबईला येण्यासाठी दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या रेल्वे गाड्या होत्या. दि ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे (GIP सध्याची सेंट्रल) आणि बॉम्बे, बरोडा अ‍ॅण्ड सेंट्र्ल रेल्वे (BBCI सध्याची वेस्टर्न) या दोन कंपन्यांच्या रेल्वे गाड्या मुंबईस येत असत. या रेल्वेंचे मार्ग बोरीबंदरवरुन निघून कल्याण येथे जात तेथे या मार्गाला दोन फाटे फुटत (जे आजही तसेच आहेत) पहिला मार्ग थळघाटातून इगतपुरी, नाशिक, भुसावळ मार्गे दिल्लीकडे जात असे तर दुसरा बोरघाटातून पुणे, सोलापूरकडून रायचूरपर्यंत जात असे. येथे लेखकाने असा उल्लेख केलेला आहे की या दोन्ही घाटात दगड फोडून बोगदे केलेले आहेत. लोकांना हे बोगदे पाहून फारच नवल वाटते.

मुंबईचा मित्र-22

याच प्रकरणात रेल्वेच्या ऑफिसांचे पत्ते, तिकिटे मिळण्याची ठिकाणे तसेच लोकल ट्रेन्स याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. या सगळ्यात एक उल्लेख म्हणजे रेल्वे पार्सल पाठवण्याचे दर. पार्सले ही वजनावर पाठवली जातात. दरपत्रकाच्या वर वजनाच्या मापनाबद्दलचा उल्लेख आलेला आहे तो बंगाली शेर असा. त्याकाळी बंगाल प्रेसिडन्सी, मद्रास प्रेसिडन्सी व बॉम्बे प्रसिडन्सी या तीनही विभागात वेगवेगळी मापनपध्दती वापरली जायची. तेंव्हा वजन किलोवर मोजण्याऐवजी शेरात मोजले जात असे. बंगाली शेर म्हणजेच बंगाल प्रेसिड्न्सीचा शेर हा साधारणत: ८४६.६९ ग्रॅमचा असे व रेल्वेने पार्सलांच्या वजनासाठी ही मापनपध्दती अवलंबली होती.

नंतरचे प्रकरण बोटींच्याबद्दल आहे आणि त्यातला ’बोटी सुटण्याच्या वेळा’ दिलेल्या असून खाली कंसात ’टाईम स्टॅण्डर्ड समजावा’ असे लिहिलेले आहे. धांडोळ्यावरच्या ‘अशा रीतीने आपण वेळ पाळू लागलो’ या लेखात स्टँडर्ड टाईमची सविस्तर माहिती आलेलीच आहे.

यानंतरचे प्रकरण आहे ते बाहेरुन येणाऱ्या लोकांसाठीच्या सुचनांचे. बाहेरुन आलेल्या लोकांना कुठल्या समस्यांना तोंड द्यावे लागते याची इत्यंभूत माहिती लेखकाला असावी. या सुचना देताना अतिशय बारीक गोष्टींचा इथे विचार केलेला आहे. त्यात मग उतरावयाचे ठिकाण, उतरल्यानंतर मुक्कामी जाण्यासाठी उपलब्ध असणारी वाहनव्यवस्था, मुक्कामाची सोय होऊ शकतील अशा धर्मशाळांची नावे व त्यांचे ठिकाण या ढोबळ गोष्टींचा उहापोह केलेला आहे. त्याबरोबरच ‘ट्राममधून उतरताना ती ज्या दिशेने जात आहे त्या दिशेकडे तोंड करुन उतरावे व तसे न केल्यास जमिनीवर आपटण्याची भिती असते’ असा एक आपुलकीचा सल्लाही दिलेला आहे, शिवाय सोबत सामानाचा बोझा असेल तर एखादा ’हेलकरी’ (पाटीवाला) करावा, मुंबईस जातेवेळी पोषाख नीटनेटका असावा, वेडेवाकडे उपरणे किंवा पागोटे बघून हा माणूस परगावावरुन आला आहे हे कळल्यावर त्याची चेष्टामस्करी किंवा फसवणूक होण्याची शक्यता असते हे ही सांगितले आहे. वाहतूकीतून चालताना काय काळजी घ्यावी अशा अतिशय किरकोळ वाटणार्‍या गोष्टींविषयी सुचना दिलेल्या आहेत. याचबरोबर मुंबईतली काही प्रसिध्द ठिकाणे, त्यांना भेट देण्यासाठी वेळा, भेटीसाठी आकारले जाणारे शुल्क याचीही माहिती दिलेली आहे.

त्याकाळी मुंबईला बाहेरुन आलेल्या लोकांसाठी मुक्कामासाठी फारशी हॉटेल्स नव्हती. जी हॉटेल्स होती ती फक्त उच्चभ्रू लोकांसाठी होती. सुचनांच्या प्रकरणात मुक्कामासाठीच्या धर्मशाळांची यादी दिलेली असली तरी या धर्मशाळांबद्दलची सविस्तर माहिती देण्यासाठी एक प्रकरण खर्चले आहे. त्यात धर्मशाळेचे ठिकाण, तेथे उपलब्ध असलेल्या खोल्या, तिथे आकारले जाणारे शुल्क, तसेच तेथे स्वयंपाकास लागणारी भांडी, विजेची बत्ती, अंथरुण-पांघरुण या साठी पडणार्‍या शुल्काचाही उल्लेख केलेला आहे.

यानंतरच्या प्रकरणात मुंबईतली सरकारी व्यवस्था, मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांची माहिती आलेली आहे. लोकवस्ती बद्दल ’येथे बहुतेक पृथ्वींतील सर्व मानवजातींच्या मनुष्य़वर्गांचे जणु काय एक प्रदर्शनच दृष्टीस पडते’ असे लिहिले आहे. त्याचबरोबर मुंबईला कित्येक लोक ’बकाली शहर’ असे म्हणतात असाही उल्लेख केलेला आहे. याचबरोबर या प्रकरणात कुठल्या भागात कुठल्या जातीच्या लोकांचे प्राबल्य आहे, राहत्या इमारतींना ’चाळ’ असे म्हणतात आणि तेथे लोक कसे राहतात याची वर्णने, वेगवेगळ्या जातीधर्मांच्या चालीरीती तसेच मुंबईत फिरताना दृष्टिगोचर होणारे देखावे यांचाही उल्लेख आहे.

त्याकाळी मुंबईत फिरण्यासाठी ट्राम हे सगळ्यात सोईस्कर वाहन होते. ट्रामबद्दलची विस्तृत माहिती, त्यांची सोडण्याची ठिकाणे, ट्राम बनवण्याचे कारखाने, त्यांचे थांबे, तिकीटांचे दर याबरोबरच कुठल्या थांब्याजवळ बघण्यासाठी कुठली प्रेक्षणीय स्थळे आहेत याची बारीकसारीक माहिती दिलेली आहे.

TRAM- MUMBAI 1

मुंबईतील ठकबाजीचे प्रकार या प्रकरणात मुंबईत प्रथमच आलेल्या माणासाला कसे फसवले जाते यांची माहिती दिलेली आहे. रिंग ड्रापर्स (अंगठी फेकणारे) कसे फसवतात हे वाचून मला तेजाब चित्रपटात चंकी पांडे एका पारश्याला हॉटेलमधे कसे फसवतो या प्रसंगाची आठवण झाली. याचबरोबर भोंदू वैद्य व जुगारी ठग कसे फसवतात याची सविस्तर माहिती दिलेली आहे.

मुंबईचा मित्र-53

यानंतरची प्रकरणे आहेत ती प्रेक्षणीय स्थळाविषयींची. प्रसिध्द मंदिरांच्या विभागात मुंबईत असलेली पारसनाथ, स्वामी नारायण मंदिर, भुलेश्वर, पंचमुखी मारुती, काळबादेवी, बाबुलनाथ, वालुकेश्वर, महालक्ष्मी या मोठ्या मंदिरांबरोबरच काही लहान मंदिरांचाही उल्लेख आलेला आहे. मंदिरांचे स्थापना वर्ष, मंदिरांचे बांधकाम, मंदिराच्या आजुबाजूचा परिसर, मंदिर बांधण्यामागील काही आख्यायिका अशी अतिशय बारीकसारीक माहिती या प्रकरणात दिलेली आहे. केवळ हिंदू मंदिरांची माहिती न देता मुसलमान लोकांच्या मशिदींबद्दलची माहिती दिलेली आहे. यात हाजी अलीचा उल्लेख ’मामाहजानी’ केला असून त्यामागची कथाही सांगितली आहे.

बाबुलनाथ

प्रेक्षणीय स्थळे बघण्याबरोबरच पर्यटकांचे आणखी एक आकर्षण असते ते म्हणजे खरेदी. मुंबईतल्या अनेक ‘मार्कीटांची’ माहिती, तेथे मिळणार्‍या वस्तू, त्यांची बांधकाम संरचना याबद्दलची माहिती दिलेली आहे. मुंबईतल्या गोद्यांवरही एक प्रकरण आहे. मुंबईत असलेल्या प्रेक्षणीय पुतळे, प्रसिध्द हॉस्पिटले, प्रसिध्द इमारती याबद्दलची सविस्तर माहिती देणारी प्रकरणं या पुस्तकात आलेली आहेत.

हवा खावयाची ठिकाणे या प्रकरणात चौपाटीचा उल्लेख सापडतो. येथे कित्येक फेरीवाले मधूनमधून वाळवंटात ’चणा ल्योरे गरमगरम’ ’गंडेरी ल्योरे गंडेरी’ (गंडेरी म्हणजे उसाचे करवे), ’आईस्क्रीम’ ’सोडा वाटर’ असे मुखाने चमत्कारिक स्वर काढून फिरत असतात असा मजेशीर उल्लेख आलेला आहे. याच प्रकरणात हॅंगिंग गार्डन, अपोलो बंदर (सध्याचे गेट वे ऑफ इंडिया) यांची सविस्तर माहिती आलेली आहे. त्याकाळीही महालक्ष्मी येथे घोड्यांच्या शर्यती चालत. त्यावर चालणारे बेटिंग, घोडे पळवणारे जॉकी याबरोबरच या शर्यतींमुळे अनेक लोकांचे खिसे खाली होतात असाही उल्लेख केलेला आहे.

यानंतरच्या प्रकरणात मुंबईला भेट देणार्‍या व्यापार्‍यांसाठी उपयुक्त माहिती दिलेली आहे. ठोक भावाने विक्री होणारी व्यापारी मार्किटे, विविध वस्तूंच्या तोलण्याबाबतची कोष्टके याचबरोबर वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करणार्‍या दुकानांची नावासकट यादी दिलेली आहे.

शेवटचे प्रकरण आहे मुंबईतल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी कार्यक्रम कसा असावा (Itinerary) दिलेला आहे. याच बरोबर मुंबईतली नाटकांची व सिनेमांचे थिएटर्स यांचीही माहिती दिलेली आहे.

यानंतर पुस्तकात काही जाहिरातीही दिलेल्या आहेत. पुस्तकाच्या सुरुवातीलाच एक सुचना दिलेली आहे. त्यात लेखक म्हणतो की पुस्तकातील जाहिरातीवरुन कुठलाही माल मागवायचा झाल्यास पुस्तकाच्या नावाचा उल्लेख करावा. जाहिरातींचा हा विभाग रंजक आहे. पहिलीच जाहिरात आहे ती पुरुषांमधील लैंगिक ताकद वाढवणार्‍या ’मदनमंजिरी’ नावाच्या गोळ्यांची. एक रुपयाच्या ४० गोळ्यात आपली ‘मर्दानी’ ताकत खात्रीने वाढविणाऱ्या राजवैद्य नारायण केशवजी यांची ही जाहिरात आहे . साडेचार रुपयाच्या घड्याळाबरोबर साखळी फुकट असा उल्लेख असलेली ‘घड्याळ्याची लूट’ ही जाहिरात गजकर्ण व खरजेवरचा रामबाण मलमाचीही माहिती देऊन जाते. इतर जाहिराती कृत्रिम रत्ने, फॅन्सी लेबले, लिहिण्यासाठी लागणारी विविधरंगी शाई, फॅन्सी कॅलेंडरे, टोप्या, स्वतंत्र धंदा चालू करण्यासाठी शिक्षण, बुध्दिवर्धक औषध, अल्युमिनियम भांडी, कृमीसंहारक तेल, जोडाक्षर शिक्षणपाठाचे पुस्तक, फोटोग्राफर्स वगैरेंच्या आहेत.

दोन जाहिराती या पुणेरी पगड्यांविषयीच्या आहेत. त्याकाळी पुणेरी पगडी ही पुण्याबाहेरही मोठ्या प्रमाणात वापरली जात असावी व लोकांना ‘पुणेरी पगडी’ विषयी फारसे वावडे किंवा आकस नसावा.

एखाद्या टुरिस्ट गाईडमधे त्या गावातील प्रेक्षणीय स्थळे, हॉटेल्स, वाहतुकीची साधने असा मजकूर असतो. मला या पुस्तकाविषयी लिहावे असे वाटले कारण लेखकाने अतिशय बारीकसारीक गोष्टींचा विचार करुन पुस्तकात त्याचा समावेश केलेला आहे. पहिल्यांदा जेव्हा मी या पुस्तकाचे नाव वाचले तेव्हा मला ही एखादी कादंबरी असावी असं वाटलं. पण वाचायला सुरुवात केली आणि त्याकाळातले संदर्भ मिळायला लागले. पहिल्यांदा पार्सलचे वजन यासाठी बंगाली शेर जेव्हा वाचला तेव्हा असे काही वजन करण्याचे माप त्यावेळी वापरले जात होते हे कळाले. तसाच एक संदर्भ असाही येतो तो परळ या भागाविषयीचा. लेखकाने म्हणले आहे की ’परळ भागात गिरण्या व मिठागरे पुष्कळ आहेत.’ कुठल्या प्रसिध्द ठिकाणांना भेट द्यावी याच्या यादीत लेखकाने ’धी व्हिक्टोरिया मेमोरिअल स्कूल ऑफ दी ब्लाईंड’ तसेच ’प्रो. दाते यांची मुक्यांची शाळा’ यांचाही समावेश केला आहे. तसेच प्रेक्षणीय स्थळे, पुतळे वगैरेविषयी माहिती देताना त्याच्या आजुबाजूच्या परिसराचेही वर्णन केलेले आहे. मला हे सामाजिक संदर्भ अतिशय महत्वाचे वाटतात. ’सुपशास्त्र’ या पुस्तकाविषयी लिहिताना यशोधनने त्यातील पदार्थ करुन आमच्यापर्यंत पोहोचवावेत या अटीवर पुस्तक उपलब्ध करुन दिले जाईल असे सांगितले होते पण मला अशी काही अट घालता येणार नाही. फार तर आम्हाला जिवाची मुंबई घडवा असे म्हणता येईल. पण ज्या जिज्ञासूंना हे पुस्तक पाहिजे असल्यास ते जरूर उपलब्ध करुन दिले जाईल.

कौस्तुभ मुदगल

5 thoughts on “केल्याने देशाटन

Add yours

  1. nakkich avdel pustak vachayala ! jar pustak copyright chya kakshe baher asel tar pdf format madhe deta yeil ka ? hya article chya shevti ? jenekarun jyana have te ithunch vachtil.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: