रंगल्या गोष्टी अशा……

एक गुनी ने यह गुन कीना, हरियल पिंजरे में दे दीना।
देखा जादूगर का हाल, डाले हरा निकाले लाल।

या ओळी अमीर खुस्रो याने लिहिलेल्या आहेत. वरच्या पहेलीचं उत्तर आहे खायचे पान. त्याने अशा अनेक ’पहेलिया’ लिहिलेल्या आहेत.

पानाचा इतिहास हे एक मला पडलेले कोडेच होते. शोध घ्यायला लागल्यावर फारच गंमतीदार संदर्भ हाताशी लागले. मला पडलेले कोडे ते संदर्भ वाचल्यावर काही प्रमाणात उलगडले. तेच वापरून आम्ही हे पान रंगवलं.

पान खाण्याची प्रथा ही भारतात फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. तरीही पान हे काही भारतीय नाही, ते भारतात आले बाहेरून. आपण भारतीय लोक एका बाबतीत जबरदस्त आहोत. ते म्हणजे बाहेरुन आलेल्या कुठल्याही गोष्टीचे आपण एकदम ‘देशी’करण करुन टाकतो आणि मग ती गोष्ट मुळची भारतातलीच असावी असा संभ्रम निर्माण होतो. याचं अगदी आपल्या माहितीतलं उदाहरण द्यायच झालं तर आपल्याकडं मिळणारं मसालेदार चायनीज जे चीनमध्येही मिळत नाही. आता पानाबद्दल बोलायचं झाल तर पान जरी बाहेरुन आलेलं असलं तरी भारतात पानावर जेवढे ’व्यक्तीसापेक्ष’ प्रयोग झाले तेवढे प्रयोग कुठेही झाले नसावेत.

या लेखासाठी मी अनेक संदर्भ वाचले (आणि काही पान बांधून घेता घेता गोळा केले). त्यात पहिलं नाव घ्याव लागेल ते डॉ. प. कृ. गोड्यांचं. गोड्यांनी पानाबरोबरच, चुना ठेवायची चुनाळी, तस्त किंवा पिकदाणी, अडकित्ता अशा वेगवेगळ्या पानाशी संबधीत असलेल्या गोष्टींवरही संशोधन केले आहे. मी अनेकांचे संशोधन लेख वाचले. प्रत्येक लेखात लेखकाने गोड्यांचा संदर्भ दिलेला आहेच. सकाळ या वर्तमानपत्रात अरुण टिकेकरांचे इति-आदि या नावाने लेखमाला येत असे. त्यात पानावर दोन सुंदर लेख आहेत. त्यांच्या लेखात मिळालेला एक संदर्भ फारच मजेशीर आहे. एका इंग्रज अधिकार्‍याने टिपू सुलतानाच्या एका स्वारीचं वर्णन करणारं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकात स्वारीविषयीच्या माहीती बरोबरच त्याने त्याला दिसलेल्या सामाजिक परिस्थितीवरही प्रकाश टाकलेला आहे. पान या विषयावर त्याने पुस्तकातली ६-७ पानं खर्ची घातलेली आहेत. याचबरोबर अनेक संशोधन लेखही सापडले. हा लेख म्हणजे या सगळ्या लेखांचा एकत्रित घेतलेला आढावा आहे. चला तर मग आपण या ताम्बुलाख्यानाला सुरुवात करूया!

भारतात पान आलं कुठून? पान मुळचे कुठले हे शोधायला गेल्यास पूर्व आफ्रिका, पूर्व आणि दक्षिण आशियातील देश, चीन या सगळ्याच देशांमधे ताम्बुलाविषयीचे उल्लेख सापडतात. पान खाण्याविषयीचा जगातील पहिला उल्लेख सापडतो तो ‘The Life Story of Tan and Lang’ या व्हिएतनामी पुस्तकात. पूर्व आशियातील देशांमधूनच दक्षिण भारतात पान पोचले. पानात सुपारी घालून, थोडा चुना व कात लावून खाण्याची पध्दत दक्षिण भारतातून उत्तरेकडे गेली. अनेक बौध्द जातक कथांमधे पान खाण्याचा उल्लेख आलेला आहे. पण गोड्यांच्या मते भारतातला पहिला लिखित उल्लेख मात्र आहे इ.स. ४७३ सालातला. मंदसोर येथील एका विणकराच्या या शिलालेखात ’आपल्या प्रियकराला भेटायला जाण्याआधी स्त्रिया दागदागिने तसेच फुलांच्या माळा घालून व पान खाऊन जातात’ असा उल्लेख आहे. स्त्रिया आपले ओठ लाल करण्यासाठी पान खात असत. गुप्त साम्राज्याच्या या कालखंडानंतर अनेक ग्रंथांमधे ताम्बुलाचे उल्लेख आलेले आहेत. वराहमिहिराच्या बॄहत्संहितेत, तसेच चरक, सुश्रुत व काश्यप यांच्या ग्रंथातही ताम्बुलाचे उल्लेख सापडतात. पण भारतरत्न डॉ. पां. वा. काणे यांनी लिहिलेल्या History of Dharmashastra’ या ग्रंथाच्या दुसर्‍या खंडात ताम्बुलाची प्रथा ही इसवी सनाच्या थोडी अगोदर दक्षिण भारतात चालू झाली असावी.

चालुक्य राजा सोमेश्वराच्या इ. स. ११३० साली लिहिलेल्या मानसोल्लास या ग्रंथात ताम्बुलभोगाविषयी लिहिले आहे. राजाला ताम्बुल उपलब्ध करुन देण्यासाठी एका वेगळ्या अधिकार्‍याची नेमणूक करावी असे त्यात सांगितले आहे. ताम्बुलात घालायची सुपारी ही या अधिकार्‍याने बनारसच्या भागातून मागवावी. ताम्बुलासाठी देठ काढलेली पिवळसर पाने आणावीत. सुपारीबरोबरच समुद्री शिंपले वापरून तयार केलेला चुना, कापुर, कस्तुरी तसेच इतर सुवासिक पदार्थही घालावेत असा उल्लेख आहे. श्रीधर नावाच्या कवीने बाराव्या शतकात लिहिलेला स्मिरितार्थशास्त्र या ग्रंथात वेदविद्या शिकाणार्‍या विद्यार्थ्यांनी ताम्बुल खाऊ नये. शयनविधीविषयी लिहिताना तो म्हणतो की शयनासाठी जाण्याआधी घरातील यजमानाने सुगंधित द्रव्ये घातलेला ताम्बुल खावा. एकादशीचा उपवास केल्यास ताम्बुल खाणे टाळावे असे सूचना वजा नियमही सांगीतले आहेत.

ताम्बुल खाण्याला समाजात एक वेगळी प्रतिष्ठा होती. आल्यागेल्याचे स्वागत हे ताम्बुल देऊन केले जात असे. दिलेले पान नाकारणे हा यजमानांचा उपमर्द समजला जाई. पानसुपारीला आपल्या धर्मातही वेगळे स्थान आहे. प्रत्येक धर्मकार्यासाठी पानसुपारी आवश्यक असते. त्याचबरोबर लग्नाचे आमंत्रण देताना पान-सुपारी देण्याची पध्दत आजही आपल्याला सापडते. एखाद्या समारंभाचे आमंत्रण देताना पानसुपारीस यावे असे म्हणण्याची पध्दत आहे. राजदरबारातील खास सरदारांनाही मानाचे विडे दिले जात. तसेच ’पैजेचा विडा’ उचलण्याचीही पध्दत होती.

ताम्बुल करायची पध्दत अनेक प्राचीन ग्रंथांमधे आलेली आहे. ताम्बुलाचे मुख्य घटक म्हणजे खायचे पान, समुद्री शिंपल्यांपासून बनवलेला चुना, कात, सुपारी, दालचिनी, वेलची, लवंग, केशर, भीमसेनी कापुर तसेच सुंगधासाठी कस्तुरी, पानावर चांदी किंवा सोन्याचा वर्ख असा त्रयोदशगुणी विडा. चुना व कात पानामधे कधीपासून वापरला जाऊ लागला या विषयावर गोड्यांनी एक स्वतंत्र लेखच लिहिलेला आहे.

brass_rect_paan_daan3

ताम्बुल हा भूक वाढवणारा, पचनसंस्थेत पाचकरस स्त्रवणारा, मुखाची दुर्गंधी घालवणारा व दातांना घट्टपणा आणणारा असतो असे वर्णन १५ व्या शतकात अब्दुर रझाक याने त्याच्या विजयनगराच्या भेटीदरम्यान नोंदवले आहे. आईने-अकबरी लिहिणार्‍या अबुल फजल याने ही आपल्या ग्रंथात पानाबद्द्ल विस्तृत माहिती दिलेली आहे. तो म्हणतो चांगल्या प्रतीच्या पानांची लागवड आग्र्याजवळ होते. तसेच त्याने पानांच्या विविध जातींची नावे त्यांच्या गुणधर्मासहित दिलेली आहेत. त्याने सांगितलेली पानांची वर्णने अशी आहेत – बिहारी नावाचे पान हे पांढुरके व चकचकीत असते. हे पान खाल्ल्यावर जीभ चरबरीत होते. पण हे पान इतर सगळ्या पानांपेक्षा चांगले असते. काकर हे पानही पांढुरके असते व याच्या शिरा टणक असतात. ही पाने जास्त खाल्यावर जीभ चरबरीत होते.जैसवार हे पान कधीच पांढरट होत नाही. कपुरी नावच्या पानाच्या शिरा टणक असतात पण हे पान चवीला व वासाला उत्कृष्ट असते.कापुरकान्त हे पान पिवळट हिरवे असते. ते मिरीप्रमाणे उग्र व कापुराच्या वासाचे असते. हे पान फक्त बनारसच्या परिसरातच पिकते.बंगाली पान हे मोठे, कडक, उष्ण व उग्र चवीचे असते.

betelcutters2

१७ व्या शतकातील भोजनकुतुहलम् या ग्रंथात पान हे चवीला उग्र, कडवट, पित्तशामक, वायुनाशक, कृमीनाशक आणि दु:खनाशक आहे असे वर्णन आले आहे. असा हा त्रयोदशगुणी विडा स्वर्गातही मिळणार नाही असा श्र्लोक १८ व्या शतकातील योग-रत्नाकर या ग्रंथात आलेला आहे.

पानाबरोबरच पान ठेवण्यासाठीची पानदाणी, चुना ठेवण्यासाठी चुनाळी, कानडी भाषेत अडकी म्हणजे सुपारी व ती फोडण्यासाठीचा अडकित्ता तसेच पान थुंकण्यासाठी तस्त किंवा पिकदाणी अशा कितीतरी साधनांमधे विविधता आढळते. पान ठेवण्यासाठी किती वेगवेगळ्या पानदाण्या बनवल्या गेल्या. (मला आठवतयं लहानपणी एक जर्मन सिल्व्हरची मोटार असे. तिचं वरचं झाकण उघडल की आत चुना ठेवण्याची डबी असे व तो कप्पा उघडला की खाली सुपारी, वेलची, लवंगा, कात ठेवण्याच्या डब्या असत.) चुनाळ्यांमधेही विविधता आढळते. अडकित्तेही वेगवेगळ्या प्रकारचे आढळतात. खरेतर विडा खाल्ल्यानंतर तो थुंकला जात नाही. पण दिवसभरात असे अनेक विडे खाल्ल्यावर तो थुंकण्याची गरज भासत असावी त्यामुळे पिकदाणी आली असावी. गोड्यांनी या विषयावरही सविस्तर लिहिले आहे.
खाण्यासाठी पान लागतात तशीच धार्मिक कार्य, लग्नकार्य यासाठीही पानं मोठ्या प्रमाणात लागत असत. मोठ्या प्रमाणात पानांची मागणी असल्याने त्यांची लागवडही मोठ्या प्रमाणात करावी लागे. गावांमधे वेगवेगळ्या कामांची जबाबदारी असलेले बलुतेदार असत. बलुतेदारांपाशी प्रत्येक गावकर्‍यांचे काही ना काही काम पडे. तसेच गावात अलुतेदारही असत. तेली, तांबोळी, धनगर, शिंपी, माळी, गोंधळी, वाजंत्री, गोसावी, भोई अशा लोकांना अलुतेदार म्हणत. गावातल्या लोकांना यांची गरज भासेच पण वरचेवर या लोकांकडे त्यांचे काम पडत नसे. या अलुतेदारांपैकी तांबोळ्याचे काम असे ते गावाला पानं पुरवण्याचं. गावातील प्रतिष्ठित पाटील किंवा कुलकर्ण्यांच्या घरी खाण्यासाठी पानं पुरवण्याबरोबरच गावातील धार्मिक कार्यासाठी पानं पुरवणं ही जबाबदारी तांबोळ्यांची असे. गावातल्या वाण्यांना पाने विकण्यास बंदी असे. हिंदू आणि मुसलमान अशा दोन्ही धर्माचे तांबोळी असत. या तांबोळ्यांना वतन दिल्याचेही उल्लेख सापडतात. १७७० सालातला एका कागदात सासवडजवळच्य गराडे गावातल्या आबाजी तांबोळ्याने आपल्याला मिळालेल्या वतनाविषयी सरकारात तक्रार केल्याचा एक उल्लेख आहे. १७८३ मधील एका कागदात कासिम बाजी तांबोळ्याने १५ रुपयांना जमिन खरेदी केली. त्याबदल्यात त्याने पाटलाला दर महिन्याला ५० पाने पुरवली पाहिजेत व दरवर्षी रु. दोन याप्रमाणे शेतसारा भरला पाहिजे असा उल्लेख आहे.

टिकेकरांच्या लेखात आलेला संदर्भ म्हणजे ‘A Narrative of Operations of Captain Little’s Detachment and of the Marhatta Army Commanded by Parsurambhu During The Late Confederacy in India Against The Nawab Tipu Sultan Bahaddur’ या लांबलचक नावाचे पुस्तक. हे लिहिले आहे लेफ्टनंट एडवर्ड मूरनं. ह्या जवळजवळ साडेपाचशे पानी पुस्तकात त्याने खायच्या पानावर सहा पानी टिप लिहून काढलेली आहे. तो म्हणतो ’अत्तर आणि विडा हे पहिल्यांदा दरबारातील खाशास्वार्‍यांना दिले जात’ विडा खाण्याची सवय’ ही संपूर्ण भारतभर किंबहुना संपूर्ण आशिया खंडात अगदी राजेरजवाडे ते अत्यंत गरीब माणसांमधेही आढळते असा उल्लेख त्याने केला आहे. यात त्याने विड्याचा उल्लेख ’विडी’ असा केलेला आहे. विड्याला विडी असा उल्लेख अनेक ग्रंथांमधे सापडतो. पानाचे दोन तीन भाग करुन त्यात वेलची, थोडासा चुना घालून त्याची त्रिकोणी घडी करुन त्याला वरुन लवंग लावली जाते असे तो म्हणतो. त्याच्या या निरिक्षणात सुपारी बद्दल तो म्हणतो “ अबे रायनाल याच्यामते नुसती सुपारी खाल्ल्यास रक्तक्षय व काविळ होते त्यामुळे सुपारी ही पानाबरोबरच खाल्ली जाते”. घरी आलेल्या पाहुण्यांना निरोप देताना विडा देण्याची पध्दत असल्याची नोंद त्याने घेतली आहे. चीनी लोक नशेसाठी पानामधे अफू घालून खातात असाही उल्लेख त्याच्या या लेखात येतो. युरोपातून आलेल्या प्रवाश्यांना ही विडा खाण्याची पध्दत किळसवाणी वाटत असे पण आता ते या प्रथेला चांगलेच परिचीत झाले आहेत असेही त्याने म्हणले आहे. हा संपूर्ण लेखच अतिशय मनोरंजक आहे.

या बरोबरच अनेक परदेशी प्रवाशांनीही पानाविषयीच्या नोंदी केलेल्या आहेत. ७ व्या शतकात भारतात आलेला चीनी प्रवासी इत्सिंग याने दक्षिणेकडील दहा बेटांवर सुपारीची लागवड होते तसेच ती खाल्ली जाते असा उल्लेख केलेला आहे. १३ व्या शतकात आलेल्या मार्को पोलो याने भारतात तोंडात ताम्बुल ठेवण्याच्या प्रथेबद्दलचा उल्लेख केलला आहे. वास्को दा गामाने पान खाण्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे. त्याने ताम्बुलाला आताम्बोर (अल्‌-ताम्बुल या फ़ारसी शब्दाचा अपभ्रंश) असे म्हणले आहे. १७ व्या शतकात इटलीहून आलेला प्रवासी मनुची यानेही अनेक नोंदी केलेल्या आहेत. भारतीय लोक जेवणानंतर रक्त थुंकतात असा उल्लेख केलेला आहे. त्याला वाटले की त्यांच्या दातांच्या तक्रारीमुळे तोंडातून हे रक्त पडत असावे. एका इंग्रज बाईने त्याला पानाबद्दल माहिती दिली.

दुपारच्या जेवणानंतर अंमळ वामकुक्षी घेण्याअगोदर पानाचा डबा उघडावा. एक हिरवट पिवळे पान घ्यावे, त्याच्या शिरा व देठ काढावा. नखाने थोडा चुना लावावा, काताचे दोन तुकडे, कातरलेली सुपारी, वेलची टाकावी आणि असा विडा खाल्ल्यावर निद्रादेवीच्या आधिन व्हावे यापेक्षा स्वर्गसुख वेगळे ते काय असते ? हे प्रसंग घरोघरी घडत असले पाहिजेत. मग एवढ्या प्रतिष्ठित पानाला आता अप्रतिष्ठा का प्राप्त व्हावी? पान खाऊन कुठल्याही समारंभाला जाणे हे अप्रतिष्ठेचे लक्षण का व्हावे? याचे उत्तर टिकेकरांनी त्यांच्या दुसर्‍या लेखात दिले आहे.

टिकेकर म्हणतात ’रेडिमेड पानपट्टी सहजासहजी रस्त्यांच्या कोपर्‍या कोपर्‍यावर मिळू लागली. मग पानासाठी कशाला एवढा जामानिमा? घरगुती ताम्बुलाची पानपट्टी झाली, ती कोपर्‍या-कोपर्‍यावरच्या दुकानात मिळू लागली, तेव्हापासून या समारंभातला ’रोमान्स’ संपला’ त्यात १७ व्या शतकात पोर्तुगीजांनी तंबाखू भारतात आणली. पानामधे तंबाखू घालून खाण्याच्या सवयीने पानाचा दर्जा घसरवला. पुढे या सवयीचे व्यसनात रुपांतर झाले, आणि अती तिथे माती या उक्तीप्रमाणे रंगाचा बेरंग झाला. टिकेकरांचे हे दोन्ही लेख अत्यंत वाचनीय आहेत.

चौकाचौकात जशा पानपट्ट्या आल्या तसे पानांमधेही अनेक प्रकार आले. वेगवेगळ्या नंबराचा सुवासिक जर्दा घातलेली अनेक प्रकारची पान मिळू लागली. मग अशी पानं खाणार्‍यांची पानांची permutation आणि combinations ही वाढली. जसे जर्दा पानांचे अनेक प्रकार मिळायला लागले तसे मसालापट्टीतही प्रचंड व्हरायटी आली. (कुणाला कुतुहल असेल तर औरंगाबादच्या ’तारा पान’ मधे जाऊन त्यांची पानांच्या प्रकारांची यादी वाचावी). पानांमधे एवढे वेगवेगळे प्रकार येऊनही पानाची आणि पान खाणार्‍याची प्रतिष्ठा ढळली ती ढळलीच. ( धांडोळाकार मात्र लौकीक प्रतिष्ठा आणि अप्रतिष्ठा यांच्यापलिकडे पोचलेले असल्याने त्यांनी जागोजागीच्या आणि गावोगावीच्या पानवाल्यांच्या कलेची कदर करत वेळोवेळी आपल्या जिभा लाल करून त्यांना उदार आश्रय दिलेला आहे)

कळीदार कपुरी पान, कोवळं छान, केशरी चुना
रंगला कात केवडा, वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा
घ्या हो मनरमणा

राजा बढेंनी असे ’रसभरीत’ वर्णन केलेल्या या विड्याला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करुन द्यायची असेल तर आपल्याला पुन्हा प्राचीन ताम्बुलपुराणाकडे वळावे लागेल हे नक्की.

beeda.jpg

कौस्तुभ मुद्‌गल

4 thoughts on “रंगल्या गोष्टी अशा……

Add yours

  1. फारंच छान लेख आहे. पानाच्या आठवणी जाग्या झाल्या असं म्हणावं तर इथं पान खाणं सोडलं थोडंच आहे ?

    पान खाण्याच्या काही आठवणी मात्र सुखद आहेत –

    आगोदर नुसतंच पान, मग कातरलेली सुपारी, मग एखादी लवंग किंवा वेलदोडा हे एकामागोमाग एक तोंडात टाकंत त्यांचा विडा जमलाच तर हे सगळं तोंडात गेल्यावर जमतो.

    याखेरीज माहूरच्या देवीच्या कुटलेल्या विड्याची चव अजून तोंडात आहे.

    एक दोनदा काही सन्माननीय मित्रांच्या आग्रहावरुन थोडं वेगळं पान खाण्याचा प्रयत्न केला पण त्याचा रस तोंडातून वेळीच थूंकण्याची कला न साधल्याने जग आपल्याभोवती प्रदक्षिणा घालत असल्याचा अनुभव आला. जगानं आपल्याभोवती प्रदक्षिणा घालावी एवढं कर्तृत्व अजुन आपण संपादीत केलं नसल्याची जाणीव असल्याने ते पान पुन्हा खाल्ले नाही.

    बाकी साधं पान, मसाला पट्टी, चाॅकलेट पान, अश्या विविध प्रकारांपासून गोविंद विड्यापर्यंतची सगळी चव घेतली आहे.

    फक्त पानपट्टीवर जावून तेवढं ‘पलंगतोड’ मागायची हिंम्मत काही अजून झाली नाही.

    Liked by 1 person

Leave a comment

Blog at WordPress.com.

Up ↑