तुझा गंध येता – भाग १

लोक गोळा करून गप्पा छाटत बसणं हा माझा आणि माझ्या मित्रमंडळींचा आवडता छंद आहे. हां आता काही लोक याला ‘पुड्या सोडणे’ असंही म्हणतात पण आपण अशा लोकांना आपण मुळीच किंमत द्यायची गरज नाही.  तर सांगायचा मुद्दा असा की पुण्यात किंवा कुठल्याही मोठ्या शहरात आता गप्पा मारायला शांत जागा पाहिजे तर त्यासाठीही पैसे टिचवायला लागतात. शे-दोनशे रुपयाला मिळणारी, स्पेलिंग आणि उच्चार वेगवेगळी असणारी पेयं किंवा पदार्थ मागवून झाल्यावर मगच या कॅफेमध्ये बसायला परवानगी मिळती. आता अशा ठिकाणी आपली नेहमी उठबस असल्यास आपला सामाजिक/बौद्धिक दर्जा उच्च असल्याचा लोकांचा समज होतो हा त्यातला एक फायदा आहेच. तर  हे महागडं कॅफे कल्चर आपल्याकडं कसं बळावत चाललेलं आहे यावर चिंतन करत मी घरापासच्या एका कॅफेत बसलो होतो.कोऱ्या कॉफीचे घोट घेता घेता अचानक माझ्या मनात विचार आला की ही  कॉफी हाऊसची संस्कृती जी भारतात नव्यानं रुजत चाललेली आहे तिची सुरुवात कुठून झाली असावी ? याचं मूळ कुठलं ? याचा शोध घेता घेता एकदम मी कॉफीच्याच मुळाशी पोचलो.

कॉफी हा शब्द मुळात युरोपिअन भाषांतून आपल्याकडं रूढ झाला, पण कॉफीचं अरबी भाषेतलं नाव आहे Qahwah, तर मूळ तुर्की नाव आहे Kaveh. अर्थात हे नाव पेयाचं आहे.पण  आंब्याच्या झाडालाच आंबे लागतात हा न्याय इथं लागू होत नाही,कारण Kaveh ज्याच्या बियांपासून तयार केली जाते त्या झाडाला तुर्क Bunn म्हणत. आपल्याला जवळचा वाटणारा कॉफी हा शब्द मात्र अ‍ॅबसीनियातील Kaffa या शहराच्या नावावरून आला तर Qahwah हा अरबी शब्द एका वाईनसाठीही वापरला जाई. कॉफीचे मूळ शोधायचं झालं तर ते अ‍ॅबसीनिया (आजचा इथिओपिया) आणि अरबस्तान या प्रदेशात कुठंतरी सापडेल. कॉफीचे झाड मूळचे या भागातलेच. काही संशोधकांच्या मते अ‍ॅबसीनियन्सच कॉफीच्या बिया घेऊन अरबस्तानात आले आणि मग तिथं कॉफी रुजली. तर काहींच्या मते येमेन हे कॉफीचं जन्मस्थान. ते जे असेल ते असो पण कॉफी जगभर प्रचलित करण्याचं श्रेय हे निःसंशय अरबांचंच.

कॉफी ही या भागात उगवत असली तरी कॉफी मानवाला माहीत होण्याच्याही काही मजेदार गोष्टी सांगितल्या जातात. यातली एक अशी आहे की Kaldi  नावाचा एक मुलगा रोज आपल्या मेंढ्या चारायला जंगलात जात असे एकदा त्याच्या हे लक्षात आलं की एका विशिष्ट झाडाची फळं खाल्ल्यावर मेंढ्या नाचू लागतात, Kaldi ने कुतुहलाने स्वतःही त्या झाडाची फळं खाऊन बघितली, तर तो स्वतःही सर्व दुःख विसरून नाचू लागला. मग हा रोजचाच पायंडा पडून गेला, एके दिवशी Kaldi आपल्याच धुंदीत असताना तेथून जाणाऱ्या एका मुल्लाने त्याला पाहिले, त्याने Kaldi ला त्याच्या आनंदाचे कारण विचारले असता Kaldi ने कॉफीच्या बिया त्यालाही खायला दिल्या. या बिया खाल्ल्याने रात्रीच्या प्रार्थनेच्यावेळी मुल्लाला झोप येणे बंद झाले आणि मग त्याच्याकडून कॉफीचा प्रसार सर्वदूर झाला.

WhatsApp Image 2019-03-24 at 10.44.29 AM

तर दुसरी गोष्ट आहे मुस्लिम धर्मगुरु शेख ओमरची. शेख ओमर अरबस्तानातील एका शहरात रहायचा एकदा काही कारणानं त्याला तिथल्या कोतवालाने थोड्या दिवसांपुरते हद्दपार केले. भुकेने व्याकुळ झालेला ओमर वाळवंटातून हिंडत असताना त्याला एका झाडाची फळे पक्षी खाताना दिसले. त्यानेही ती फळे खाल्ली. तिथंच पडलेल्या फळांच्या बियाही त्याने खायचा प्रयत्न केला पण त्या फार टणक असल्याने त्याला ते जमले नाही. मग त्याने या बिया उकडून खाण्याचा प्रयत्न केला पण तरीही त्या काही मऊ झाल्या नव्हत्या. शेवटी त्याने बिया उकडण्यासाठी वापरलेले पाणीच पिऊन टाकले आणि आश्चर्य म्हणजे त्याला अतिशय ताजेतवाने आणि उत्साही वाटू लागले. त्याने या बिया गोळा करून आपल्यासोबत  आपल्या शहरात नेल्या आणि तिथेही या बिया उकळून ते पेय तो पीत असे. लौकरच हे पेय अतिशय प्रसिद्ध झाले आणि त्याला त्या शहराचेच नाव देण्यात आले. हे पेय आपण आजही पितो आणि त्याचं नाव आहे Mocha.

timthumb

खुद्द कुराणात आणि बायबलमध्ये कॉफीचा उल्लेख असल्याचा दावा काही संशोधक करतात. डेव्हिड ची बायको Abigail ने डेव्हिडचा राग शांत व्हावा म्हणून त्याला जे पेय दिले ते कॉफीच होते तर कुराणात Gabriel नावाच्या देवदूताने जे पेय प्रेषिताला दिले ते कॉफी होते असा या अभ्यासकांचा दावा आहे. होमरचे महाकाव्य इलियाडमध्ये Troyच्या युद्धाआधी हेलनने ईजिप्तमधून Nepenthe नावाचे दुःख विसरणारे औषध आणले ते म्हणजे कॉफीच होती तर काही म्हणतात ग्रीक योद्धे तरतरी येण्यासाठी Black Broth नावाचे जे सूप पीत ते म्हणजेच कॉफी.

अर्थात हे सगळे झाले सांगोवांगीचे संदर्भ पण कॉफीविषयीचा पहिला लिखित संदर्भ आहे तो नवव्या शतकातला. अबू बाकर नावाच्या एका हकीमाने आपल्या Al-Haiwi अर्थात सर्व रोगांचा इलाज नावाच्या पुस्तकात कॉफीचा उल्लेख Bunchum असा केलेला आहे. अबू बाकर म्हणतो कॉफीबाबत म्हणतो, Bunchum ही पोटासाठी फारच उत्तम आहे.  अबू बाकर त्याकाळातला उत्तम हकीम होता शिवाय तो बगदादच्या दवाखान्याचा प्रमुख होता. त्याला तत्वज्ञान आणि खगोलशास्त्राचंही उत्तम ज्ञान होतं. इब्न सिना नावाच्या एका हकिमानेही कॉफीचा उल्लेख Bunnchum असाच  केलेला आहे. पण या दोन वैद्यराजांनी उल्लेखलेला Bunchum म्हणजेच कॉफी या विषयी अभ्यासकांचे सर्वसाधारणपणे एकमत नाही. (गंमतीचा भाग असा की आज ज्या गोष्टी आजचे डॉक्टर वर्ज्य म्हणून सांगतात त्यातल्या साखर, चहा, कॉफी आणि कोको उर्फ चॉकलेट यांचा वापर प्रथम डॉक्टरांनीच चालू केला.)

कॉफीचा पहिला खात्रीपूर्ण उल्लेख आहे तो १४५४ सालातला. शेख जमालउद्दीन अबू महंमद नावाचा एक इमाम होता जो Aden (सध्याच्या येमेनची राजधानी) चा रहिवासी होता. काही कामानिमित्त तो अ‍ॅबसीनियाला गेला होता आणि मग काही वर्षं तो तिथेच राहिला. Aden ला परत आल्यावर त्याची तब्बेत बिघडली, काही उपायाने त्याच्या जीवाला गोड वाटेनासे झाले. शेवटी त्याने आपले काही लोक पाठवून अ‍ॅबसिनियातून कॉफी आणवली, त्यानंतर त्याची तब्बेत सुधारली,उत्साह वाढला व तो आनंदी राहू लागला. जमालउद्दीन हा इमाम असल्याने त्याच्याकरवी कॉफीचा प्रसार वेगाने झाला. नट व रात्री करमणूकीचे खेळ करणारे, ईश्वरचिंतन करणारे आणि दिवसाच्या उन्हाचा त्रास टाळण्यासाठी रात्री प्रवास करणारे प्रवासी इ. लोक कॉफी पिऊ लागले. दरवेश, (सुफी पंथातील धर्मोपासक) मौलवी आणि प्रवासी यांकडून कॉफीची माहिती येमेन, मक्का-मदिना, पर्शिया व इजिप्तपावेतो पोचली.

दरवेश लोकांचे जे जलसे रात्र रात्र चालत तेंव्हा दरवेश लोक कॉफी पिऊन रात्र जागवत. मग जे प्रेक्षक या जलशांना जमलेले असत त्यांनाही कॉफीची गोडी लागली. होता होता मक्केत लोकांना कॉफीची अतिशय आवड लागली. धार्मिक कार्यक्रमातून प्यायली जाणारी कॉफी नंतर सहज प्यायली जाऊ लागली. कॉफीची दुकानं उघडली गेली त्यांना Kaveh Kanes असं संबोधलं जाई. कॉफी पिता-पिता लोक बुद्धिबळ आणि इतर बैठे खेळ खेळू लागले. कॉफीच्या सोबतीने गप्पागोष्टी रंगू लागल्या, नाना विषयांवर खमंग चर्चा करू लागले. कॉफीच्या जोडीला नाचगाणेही सुरू झाले.

WhatsApp Image 2019-03-24 at 11.00.25 AM

अरब या पेयाच्या इतके प्रेमात पडले की अनेक वर्ष त्यांनी कॉफी दुसऱ्या देशात रुजू दिली नाही. म्हणजे कॉफीच्या बिया दुसऱ्या देशात घेऊन जाण्यास त्यांचा मज्जावच होता किंवा बिया घेऊन जाण्यापूर्वी ते या बिया कडक शेकून अथवा उकळत्या पाण्यातून काढून मगच देत जेणेकरून या बिया पुन्हा रुजू नयेत. मक्का-मदिना अशा ठिकाणी आलेल्या देशोदेशीच्या प्रवाशांवर लक्ष ठेवणे तसं अवघडच. सतराव्या शतकात मक्केला आलेल्या बाबा बुदान नावाच्या एका सुफी अवलीयाने आपल्या दाढीत लपवून कॉफीच्या सात बिया भारतात आणल्या आणि कर्नाटकात चिकमंगळूरजवळ पेरल्या आणि रुजवल्या. यातूनच तयार झालेली प्रजा पुढं कुर्ग आणि म्हैसूरमध्ये वाढीला लागली आणि १८४० नंतर ब्रिटिशांनी भारतात मोठ्या प्रमाणावर कॉफीची लागवड सुरू केली.

Rauwolf हा जर्मन डॉक्टर कॉफीविषयी लिहिणारा पहिला युरोपिअन होता. १५७३ मध्ये त्याने नोंदवून ठेवलेल्या माहितीप्रमाणे तुर्क लोक कॉफीला Bunchum किंवा Bunea असं म्हणत. तर १६५९ मधे Edward Pocoke हा डॉक्टर कॉफीविषयी तुर्कांच्या समजुती आपल्याला सांगतो. तुर्कांच्या मते कॉफी उन्हाळ्यात आपल्याला थंड ठेवते. कॉफी पिल्याने मूत्रमार्ग मोकळा रहातो. कांजिण्या व गोवर होत नाही. तुर्क उत्साही राहण्यासाठी कॉफी पित. कॉफीसोबत ते गोडपदार्थ, पिस्ते आणि लोणी खात. काही लोक दूध घातलेली कॉफीही पीत पण त्याने कुष्ठरोग होतो अशी तुर्कांची समजूत होती.

कॉफीचा जगभर प्रसार

Levent region म्हणजे आजचे सायप्रस, इस्त्रायल, जॉर्डन, लेबनॉन, पॅलेस्टाईन, सीरिया, तुर्की, इजिप्त, ग्रीस आणि इराकचा प्रदेश अर्थात Eastern Mediterranean. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मन, इटालियन आणि डच प्रवासी आणि वनस्पतीशास्त्र अभ्यासकांनी या भागातून कॉफीचे झाड आणि पेय यांविषयी भरपूर माहिती गोळा केली. १६१६ मध्ये डचांनी काहीतरी खटाटोप करून कॉफीचे एक झाड Mocha या येमेनमधल्या शहरातून हॉलंडला आणले पण हे झाड युरोपमध्ये रुजलं नाही. फ्रेंचांनीही १६७० मध्ये Dijon मध्ये कॉफीच्या लागवडीचा एक अयशस्वी प्रयत्न केला.

डचांनी प्रयत्न न सोडता पुन्हा कॉफीची झाडे मिळवून त्यांची लागवड १६५८ मध्ये श्रीलंकेत सुरू केली. १६९६ मध्ये डचांनीच कॉफीची झाडे जावामध्ये नेऊन त्यांची लागवड केली त्यातून थोडंफार उत्पादन सुरू होते न होते तोच जावातल्या भूकंपात ही सगळी झाडं मोडून पडली. तरीही हिंमत न सोडता त्यांनी १६९९ साली पुन्हा भारतातून झाडं नेऊन जावामध्ये रुजवली आणि यावेळी मात्र या झाडांनी जीव धरला आणि कॉफीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करण्यात त्यांना यश आलं. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी जावातून पुन्हा कॉफीची झाडे नेऊन युरोपमध्ये रुजवण्याचा निश्चय केला. १७०६ साली  जावातून कॉफी आणि कॉफीची झाडं नेऊन आणि युरोपमधल्या अनेक बोटॅनिकल गार्डन व संवर्धन केंद्रांना देण्यात आली.

WhatsApp Image 2019-03-24 at 10.40.56 AM
युरोपमधील वेगवेगळ्या देशातील कॉफीची नावे

अशा रीतीने कॉफी युरोपमध्ये पोचली पण कॉफीप्रेमी फ्रेंचांच्या देशात मात्र कॉफी काही केल्या कॉफी रुजत नव्हती. अ‍ॅमस्टरडॅममधून झाडं नेऊन ती रुजवण्याचा प्रयत्न अनेकांनी करून पाहिला पण त्यांना यश आले नाही. शेवटी खुद्द फ्रान्सच्या  राजाच्या पुढाकाराने फ्रेंच सरकार आणि अ‍ॅमस्टरडॅमची महानगरपालिका यांच्यात वाटाघाटी होऊन अ‍ॅमस्टरडॅमच्या महापौरांनी फ्रान्सचा राजा १४वा लुई याला एक कॉफीचं झाड भेट म्हणून पाठवलं. या झाडाचं फ्रान्सतर्फे शाही इतमामात स्वागत करण्यात आलं व ते पॅरिसमध्ये रुजवलं गेलं आणि इथून फ्रेंच कॉफीचा प्रवास सुरु झाला. आता फ्रेंचांनाही त्यांच्या वसाहतीत कॉफीचे उत्पादन सुरू करायचे होते. त्यासाठी त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा कॅरेबियन समुद्रातल्या Martineque बेटाची निवड केली. आता तिथपर्यंत कॉफीचे झाड घेऊन पोचणे व ते रुजवणे हे फार जिकिरीचे आणि कष्टाचे काम होते. पण या बेटावरच्या सैन्याचा कप्तान Gabriel de Clieu नं हे काम आपल्या शिरावर घेतलं. १४व्या लुईला भेट मिळालेल्या झाडापासून तयार केलं गेलेलं सुमारे पाच फूट उंचीचं एक झाड घेऊन कप्तान साहेब निघाले खरे पण वाटेत त्यांच्यावर अनेक संकटं कोसळली. कप्तानसाहेबांच्या वाईटावर टपलेला एक सहप्रवासी त्यांना कॉफीच्या लागवडीचे श्रेय मिळू नये म्हणून धडपडत होता. त्याने या झाडाला काही इजा करू नये म्हणून Gabriel काचेच्या पेटीत ठेवलेल्या झाडाला जीवापाड जपत होता. वाटेत ट्युनिशिअन चाचांनी जहाजावर हल्ला केला तो कसाबसा परतवण्यात आला. नंतर अचानक वारा वाहायचा बंद झाल्याने जहाज एकाच जागी अडकून पडले, जहाजावरचे अन्नधान्य आणि पाणी संपत आले. तेंव्हा आपल्या वाट्याचे पाणी या झाडाला पाजून Gabriel ने झाड जगवले. अशा सर्व संकटांना तोंड देत एकदाचा Gabriel १७२३ साली Martineque वर जाऊन पोचला. त्याने ते झाड रुजवले आणि १७२६ पासून तिथं कॉफीचे उत्पादन सुरू झाले. या झाडाचा वंश पुढे इतका वाढला की १७७७ च्या सुमारास तिथं जवळपास दोन कोटी कॉफीची झाडे होती.

स्पॅनिश मिशनऱ्यांनी कॉफी अमेरिका खंडात फिलिपाईन्स आणि क्युबामध्ये पोचवली. आपल्या आवडत्या ब्राझिलियन कॉफीचे श्रेय पोर्तुगीजांना जाते. १७६० साली Joao Alberto Castello Branca ने गोव्यातून कॉफी ब्राझीलला नेली. ब्राझीलच्या उष्ण आणि दमट वातावरणात कॉफी चांगलीच रुजली. आता शेवटी शेवटी कॉफीच्या अजून एका प्रकाराच्या उगमाची गोष्ट सांगतो आणि मग थांबतो. Molke नावाच्या एका बेल्जियन धर्मगुरूने १७७४ साली रिओ-दि-जानिरोमधल्या एका चर्चला कॉफीच्या काही बिया भेट म्हणून पाठवल्या. या बियांपासून रुजलेल्या झाडाची कॉफी बरीच प्रसिद्ध झाली आणि अजूनही प्रसिद्ध आहे. ही कॉफी कुठली असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे Cappuccino. कॉफीला हे नाव पडण्याचं कारण आहे पाद्रीबाबांनी ज्या चर्चला बिया पाठवल्या होत्या त्याचं नाव होतं Capuchin Monastery.

कॉफीचा प्रवास इथं संपलेला नाही, तिला समाजमान्यता आणि धर्ममान्यता मिळवायला अनेक अग्निदिव्यातून पार पडावं लागलं. त्याविषयी आणि कॉफीच्या उच्चभ्रूवर्गात सामील होण्याविषयी सविस्तर  माहिती पुढच्या लेखात.

क्रमश:

WhatsApp Image 2019-03-24 at 10.40.11 AM

यशोधन जोशी

3 thoughts on “तुझा गंध येता – भाग १

Add yours

  1. Absolutely fantastic Yashodhan. लय भारी !

    इतकी वर्ष काॅफी विकतोय पण आज काॅफी थोडी समजली.

    खरंच लय भारी.

    Like

  2. कॉफी पुराण …. अतिशय रंजक व सुगंधित उतरले आहे…

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: