मुळच्या अरबस्तानातल्या कॉफीनं जग कसं पादाक्रांत केलं याबद्दल आपण मागच्या भागात बघितलं पण समाजमान्यता मिळवण्यासाठी अजून कॉफीची अग्निपरीक्षा होणं बाकी होतं. त्याची गोष्ट आपण या भागात ऐकूया.
मक्केत लोकांना कॉफीची आवड लागली. धार्मिक कार्यक्रमातून प्यायली जाणारी कॉफी नंतर सहज प्यायली जाऊ लागली. कॉफीची दुकानं उघडली गेली त्यांना Kaveh Kanes असं संबोधलं जाई. कॉफी पिता-पिता लोक बुद्धिबळ आणि इतर बैठे खेळ खेळू लागले. कॉफीच्या सोबतीने गप्पा-गोष्टी रंगू लागल्या, नाना विषयांवर खमंग चर्चा करू लागले. कॉफीच्या जोडीला नाचगाणेही सुरू झाले. इथंवर आपण येऊन पोचलेलो होतो.

कोतवालपदी केली. नवीन कोतवालसाहेब भलतेच शिस्तप्रिय आणि धार्मिक होते. एकदा आपला संध्याकाळचा नमाज संपवून शहराचा फेरफटका मारायला ते निघाले. एके ठिकाणी रस्त्यात त्यांना काही लोक एकत्र बसून कॉफीचे घोट घेत बसलेले दिसले. वास्तविक ते लोक रात्रभर जागून प्रार्थना करायची तयारी करत होते. त्यांच्या हातातले पेय मदिरा असावी असा कोतवालसाहेबांचा पहिल्यांदा समज झाला पण त्यांचा हा समज त्यांच्याबरोबरच्या लोकांनी दूर केला व हे लोक कॉफी पीत असल्याचे त्यांना सांगितले. शिवाय शहरभर हे असे लोक पसरलेले आहेत जे दिवसभर काही कामधंदा न करता कॉफी पीत बसलेले असतात, यात फक्त पुरुष नाही तर त्यांच्या जोडीला स्त्रियाही असतात अशीही पुस्ती त्याला जोडून दिली. हे ऐकल्यावर कोतवालसाहेबांना त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या शहरातील पुरुष आणि स्त्रियांच्या चारित्र्याची आणि नैतिकतेची भयंकर काळजी वाटू लागली. त्यांनी तडक कॉफी पिणाऱ्या लोकांना मशिदीत येण्यास मज्जाव केला व दुसऱ्या दिवशी आपले सर्व अधिकारी, काझी, वकील, धर्मगुरू आणि मक्केतील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांची एक सभा बोलावली.
दुसऱ्या दिवशी सभा सुरू झाल्यावर कोतवालाने सर्वांना आदल्या दिवशी घडलेला किस्सा सांगितला आणि कॉफी हाऊसेसवर बंदी घालावी असा प्रस्ताव मांडला व त्यावर बाकीच्या लोकांना त्यांचे मत विचारले. लगेच तिथं जमलेल्या तमाम लोकांनी कोतवालाचा कॉफीविरोधी रोख बघून बंदीला दुजोरा द्यायला सुरुवात केली. Kaveh Kanes कसे स्त्रिया पुरुष भेटतात, ( म्हणजे ही परंपरा किती जुनी आहे बघा !) तिथं कशी डफ वगैरे वादयं वाजवून नाचगाणी चालतात, बुद्धिबळ आणि Mankala सारखे खेळ पैसे लावून खेळले जातात. शिवाय धर्माच्या विरुद्ध असणाऱ्या कितीतरी गोष्टी तिथं चालतात. तुमच्यासमोर या सगळ्या गोष्टी चालू होत्या कयामतच्या दिवशी तुम्हाला याचा जबाब द्यावा लागेल असं लोकांनी म्हटल्यावर तर कोतवालाने कॉफीवर बंदी घालायचा निर्धारच केला.
एका उच्चवर्गातल्या गृहस्थानं तर कॉफी ही मद्यासारखीच नशीली असल्याचं सांगितलं, यावर ताबडतोब बाकी लोकांनी तुला मद्याचा काय अनुभव असा प्रश्न विचारल्यावर हे गृहस्थ सारवासारवी करू लागले. कॉफीप्रेमी असणाऱ्या एका वकिलांनी कॉफीचा बचाव करण्याचा प्रयत्न सुरू केला. सामोपचाराचा प्रयत्न करत ते म्हणाले, हे सगळे मुद्दे बरोबरच आहेत. कॉफी हाऊसेसमध्ये हे उद्योग चालतातच, त्यांना शिस्त लागलीच पाहिजे. पण मुळात कॉफीची परीक्षा केली पाहिजे, ती शरीराला आणि मनाला घातक आहे का याचा निर्णय लागला पाहिजे फक्त दुकानं बंद करून काही होणार नाही. तर यावर हकीमांचं मत घ्यावं. त्यावर सभेतल्या एक प्रसिद्ध हकिम लगेच पुढं आला. या हकिमाने कॉफीविरोधी एक पुस्तकच लिहिलं होतं. त्याने कॉफी ही औषध म्हणून वापरणेही चुकीचं असून ते नैतिकता ढासळवणारं पेय असल्याचा निर्वाळा दिला.
शेवटी या सभेनं बहुमतानं कॉफीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. बंदीच्या ठरावावर सगळ्यांच्या सह्या घेऊन तो ठराव इजिप्तला बादशहाकडे पाठवून देण्यात आला. कॉफीवरच्या बंदीची त्वरित अंमलबजावणी करण्यात आली. कॉफीहाऊसना टाळं ठोकण्यात आलं आणि गोदामातली कॉफी जाळून टाकण्यात आली. कॉफीहाऊस बंद झाली पण लोक चोरून कॉफी पिऊ लागले. या बंदीवर काहींनी टीकाही केली पण सर्वमान्य निर्णय असल्यानं त्याचं पालन करण्याशिवाय काही पर्याय उरला नाही. दरम्यान काही लोक चोरून कॉफी पिताना सापडले तेंव्हा त्यांची गाढवावरून धिंड काढण्यात आली. कॉफीवर बंदी आणल्याचा आनन्दही काही लोकांनी साजरा केला पण तो काही फार काळ टिकला नाही.
कॉफीवरच्या बंदीचा ठराव इजिप्तला बादशहाकडे जाऊन पोचला, तो ठराव बघताच बादशहा भडकला आणि म्हणाला ज्या गोष्टीवर राजधानीत बंदी नाही त्यावर बंदी घालण्याचा अधिकार कोतवालाला कुणी दिला ? मक्केच्या हकिमांना माझ्या दरबारी हकिमांच्यापेक्षा जास्त अक्कल आहे? ठराव तर बादशहाने रद्द केलाच शिवाय कोतवालाचे कडक शब्दात कान उपटले.या निर्णयामुळे मक्केत आनंदी आनंद झाला. कोतवालाला सगळ्यांनी यथेच्छ शिव्याशाप दिले पण हे प्रकरण एवढ्यावरच आटपलं नाही. खुद्द कोतवालाच्या भावाने कोतवालाला ठार मारले, कारण कोतवालाच्या या कामगिरीमुळे त्यांच्या खानदानालाच बट्टा लागला असं त्याचं म्हणणं होतं. कॉफीला विरोध करणारा हकिमही मारला गेला.
मक्केतले कॉफीप्रेमी आता पुन्हा सुखाने कॉफीचे घोट घेत सुखात आयुष्य जगू लागले. १५२४ ला पुन्हा मक्केच्या काझीने कॉफीहाऊस बंद करवली पण त्याची लोकांनी घरात कॉफी पिण्याला हरकत नव्हती. ही बंदीही फार काळ टिकली नाही, लौकरच नवा कॉफीप्रेमी काझी आला आणि त्याने ही बंदी उठवली.
ऑटोमन सुलतान Selim I ने इजिप्त ऑटोमन साम्राज्याला जोडले आणि त्याच्या सैन्याबरोबर कॉफीने इस्तंबुल गाठले. ऑटोमन साम्राज्यातही कॉफी लोकप्रिय झाली. दमास्कस आणि अलेप्पोमध्ये उत्तमोत्तम कॉफी हाऊस उभारली गेली. कॉफीच्या औषधी गुणांमुळे आपला धंदा बसेल या भीतीने एका हकीमसाहेबांनी बाकीच्या हकिमांना एकत्र करून त्यांना सवाल केला – कॉफी नावाच्या मद्याविषयी तुमचं मत काय? लोक एकत्र बसून कॉफी पितात, ती त्यांना चढते व तब्बेतीचे नुकसान होते. कॉफीला औषधीशास्त्रात मान्यता आहे की बंदी ? या हकिमाचे स्वतःचे मत कॉफी ही बंदीयोग्य आहे असेच होते. पण त्याच्या या कळकळीचा इतर इतर हकिमांवर फारसा परिणाम झाला नाही आणि त्यांचे कॉफीवरचे प्रेम अबधितच राहिले.
कैरोमध्ये कॉफी हाऊस ही प्रार्थनास्थळापेक्षा जास्त लोकप्रिय असल्याचे लोक गंमतीने म्हणत. यामुळे काहीवेळा धार्मिक लोकांच्या आणि धर्मगुरूंच्या भावना दुखावू लागल्या. एकदा प्रार्थनेनंतरच्या भाषणात एका मुल्लाने कॉफी ही धर्माला मान्य नाही आणि कॉफी पिणारे हे खरे मुसलमान नाहीत असे सांगितले. यांवर काही धार्मिक लोक भडकले आणि त्यांनी बाहेर पडल्यावर सापडतील ती कॉफीहाऊस जाळून टाकली. कैरोत यामुळं भयंकर संघर्ष भडकला. कॉफीप्रेमी आणि कॉफीविरोधी गट आमनेसामने आले.
कैरोच्या मुख्य काझीने यावर उपाय म्हणून शहरातले प्रमुख हकीम आणि काझी यांना एकत्र चर्चेला बोलावले. काझीने प्रथम हकिमांचे मत विचारले. हकिमांनी एकमुखाने सांगितले की कॉफीला त्यांच्या शास्त्रात मान्यताच आहे पण तरीही तिचा अतिरेक टाळला पाहिजे. शिवाय मुल्लांनी या बाबतीत भडकाऊ भाषणे देऊ नयेत व कॉफीविरोधकांनी सहिष्णुता बाळगावी अशी पुस्तीही जोडली. यांवर त्या सभेतच वादावादीचा प्रसंग ओढवला. पण मुख्य काझी हा एक हुशार गृहस्थ होता, त्याने दोन्ही बाजूना शांत करून, एकत्रित बसवून उत्तम कॉफी पाजली आणि स्वतःही प्याला. यामुळे दोन्ही पक्षात सामंजस्य निर्माण झाले व कॉफीला पहिल्याहून अधिक सन्मान आणि समाजमान्यता मिळत गेली. पुढच्या काळात ऑटोमन साम्राज्यात एका धर्मगुरुने दमास्कसमध्ये आणि हकिमाने अलेप्पोमध्ये कॉफीहाऊस उघडले. ही कॉफीहाऊस अतिशय सुंदर होती, उत्तमोत्तम बैठका, तलम पडदे आणि देखणे गालिचे यांनी ती सजवलेली होती. त्यांना Taktacalah असं नाव देण्यात आलेलं होतं. इथं सर्वांना मुक्तप्रवेश होता. चर्चा, वादविवाद इथं बसून करता येत. कॉफीसोबत इतरही मनोरंजनाच्या गोष्टी इथं असत. देशोदेशीचे प्रवासी लोक तिथं येत. काझी, वकील, धर्मगुरू असे अनेक उच्चभ्रू लोक तिथं येत. कॉफी आता उच्च दर्जाचे पेय म्हणून समाजमान्य झालेली होती. खुद्द सुलतानाच्या राजवाड्यात त्याला कॉफी तयार करून देण्यासाठी एक स्वतंत्र अधिकारी नेमला जाऊ लागला.त्याला Kavehjibachi म्हणून ओळखले जाई.

पर्शियातसुद्धा कॉफी लोकप्रिय होती पण पर्शियातले राज्यकर्ते कॉफी आणि धार्मिक वादविवाद हाताळण्यात जास्त वाकबगार होते. त्यामुळं तिथं कॉफीवर बंदी आणण्याची वेळ आली नाही. उदाहरणार्थ पर्शियातल्या इस्पहान या शहरातही अनेक विद्वान,लेखक वगैरे एकत्र जमून धर्म, राजकारण इ विषयांवर चर्चा करत. हे पाहून तिथल्या कोतवालाने कॉफीहाऊस मध्येच एक मुल्ला नेमला. या मुल्लाने आपल्या मनमिळाऊ आणि आदबशीर स्वभावाने सर्वांना आपलेसे केले. त्याच्यामुळे चर्चेचे विषय हे इतिहास, कविता व धर्म एवढ्यापुरतेच मर्यादित राहीले. अर्थात हा मुल्ला कोतवालानेच नेमला आहे हे गुपितच ठेवण्यात आलेले होते. या सर्वांतून राजकीय गोंधळ काही प्रमाणात का होईना कमी झाला.
Adam Olearius हा एक जर्मन सरकारचा प्रतिनिधी होता. तो सतराव्या शतकात पर्शियामध्ये काही काळ नेमणुकीवर होता. त्याने पर्शियामधून बराच प्रवासही केला होता. त्याने त्याच्या डायरीत कॉफीहाऊसेसविषयी बरीच माहिती नोंदवून ठेवली आहे. तो म्हणतो, इथल्या कॉफीहाऊसेसची ओळखच तिथं येणाऱ्या कवी, लेखक आणि इतिहासकारांमुळे आहे. ते या ठिकाणी बसून आपल्या आपल्या मित्रांना लहान-लहान गोष्टी सांगतात. काही विषयांवर भाषण देतात. पुन्हा कॉफीचे घोट घेत आपल्या मित्रांबरोबर हितगुज करतात.

Karstens Niebuhr नावाचा एक प्रवासी १८ व्या शतकात अरेबिया, सीरिया आणि ईजिप्तमध्ये येऊन गेला. त्याने कॉफीचे शिष्टाचार आणि कॉफीहाऊसची संस्कृती यांविषयी सविस्तर लिहिलेले आहे.
उत्तमोत्तम लेखक कॉफीहाऊसमध्ये रसिकांसमोर कथावाचन करत, काही वेळा एखादी गोष्ट सुरू करून लोकांकडून उस्फुर्तपणे ती पूर्ण करून घेत. काही कॉफीहाऊसमध्ये अरेबियनसारख्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टींची मैफल जमलेली असे तर कुठं उत्तम नाचगाणी चालू असत. लेखक आणि कवी दिवसभर कॉफीहाऊसमध्ये बसून प्रतिभासाधना करत.
इस्तंबुलमध्ये गरीब असो वा श्रीमंत. तुर्क, ग्रीक, ज्यू आणि आर्मेनियन अशा सर्वच घरात दिवसातून दोनदा तरी कॉफीपान होईच. घरी आलेल्या प्रत्येकाला कॉफी पाजणे हा अलिखित नियम होता. कॉफी नाकारणे हे शिष्टाचाराच्याविरुद्ध वर्तन किंवा हा यजमानाचा अपमान मानला जाई. काही लोक दिवसातून वीसवेळा तरी कॉफी पीत. पॅरिसला जेवढा खर्च प्रत्येक घरामागे वारुणीवर होई त्याहून अधिक खर्च इस्तंबुलमध्ये कॉफीवर होई. रस्त्यातले भिकारी अन्नासाठी नाही तर कॉफी पिण्यासाठी हात पसरत. इतकेच नव्हे तर लग्नासाठी प्रियतमेला मागणी घालताना मी तुला कधीच कॉफी कमी पडू देणार नाही असं वचन प्रेमिक देत. एकनिष्ठतेच्या वचनापेक्षा हे वचन मोठे मानले जाई. लग्नानंतर पत्नीला कॉफी नाकारणे हे कारण काडीमोडासाठी पुरेसे असे.


कॉफी ज्या ट्रेमधून आणली जाई तो चांदीचा असे, कॉफी कपातून प्यायली न जाता चिनी मातीच्या नक्षीदार बशीतून प्यायली जाई. या बशीला पकडण्यासाठी खालती एक व बाजूला दोन असे कान असत. तुर्क कॉफीचे घोट घेत घेत हुक्कापान करत, तंबाखूचा हुक्का धर्मात निषिद्ध असला तरी तुर्क हुक्कापान करत. पुरुषांबरोबरच स्त्रियाही चोरून हुक्का पीत. कॉफीमुळे नपुंसकत्व येते अशी सर्वसाधारण समजूत त्याकाळी होती तरीही कॉफी हे उच्चभ्रू वर्गाचे पेय असण्याची कल्पना असल्याने कॉफी सर्वांच्या आयुष्यातील महत्वाचा घटक होती. शिवाय कॉफीपानामुळे येणाऱ्या नपुंसकत्वाची काळजी तंबाखूच्या धुंदीने दूर होई म्हणून जोडीला तंबाखूही असेच.

क्रमश:
वा! कॉफी इतकाच सुंदर लेख!!
LikeLike
लेख वाचून गरमा गरम कॉफी प्यायची इच्छा झाली
LikeLike