युरोपातून वेगवेगळ्या प्रदेशांच्या शोधात मोठ्या प्रमाणात मोहिमा काढल्या गेल्या. या मोहिमांवर गेलेले प्रवासी अत्यंत धाडसी होते यात शंका नाही. या प्रवाश्यांचं एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त नवनवीन प्रदेश शोधून थांबले नाहीत तर त्यांनी जगाला माहिती नसलेल्या अनेक गोष्टींवर प्रकाश पाडला. टॉलेमी, मार्को पोलो, वास्को द गामा, कोलंबस, रिचर्ड बर्टन असे अनेक धाडसी प्रवासी यात होते. या प्रवाशांनी अनेक अज्ञात गोष्टी जगासमोर आणून आपल्यावर अनंत उपकार केले आहेत.
असाच एक धाडसी प्रवासी १९ व्या शतकाच्या मध्यात आफ्रिकेत गेला आणि त्यावेळी जगाला माहिती नसलेल्या आफ्रिकेतील अनेक गोष्टींचा पटच उलगडला. त्याच नाव होत डॉ. डेव्हिड लिव्हिंगस्टोन. त्यानी या अज्ञात प्रदेशात मोहिमा तर काढल्याच त्याबरोबर त्याने या मोहिमांवर असताना त्याला दिसलेल्या निसर्गातील गोष्टींचा, स्थानिक सामाजिक जीवनाच्या बारीकसारीक नोंदी केल्या आणि त्या जगासमोर आणल्यानंतर मोठमोठ्या संस्थांनी त्याचे सत्कार केले. त्याचा हा प्रवास आपल्याला अचंबित करून सोडतो.
डेव्हिडचा जन्म १९ मार्च १८१३ साली स्कॉटलंड येथे एका अतिशय गरीब कुटुंबात झाला. त्याचे वडील सूतगिरणीत कामगार होते. एका लहानश्या खोलीमध्ये लिव्हिंगस्टोन कुटुंब राहत होते. वयाच्या १० व्या वर्षीच डेव्हिड सूतगिरणीत कामाला लागला. डेव्हिडला वाचनाची अत्यंत आवड होती. संध्याकाळी ६ वाजता गिरणीतून सुटल्यावर तो रात्रशाळेत शिकायला जात असे. शाळेतून परतल्यावर रात्री जागून तो आपली वाचनाची आवड भागवत असे. कथा कादंबऱ्यांपेक्षा त्याला प्रवासवर्णनं असलेली पुस्तक वाचायला आवडत. कदाचित यातच त्याच्या पुढच्या प्रवासी मोहिमांची बीजे रोवली गेली असावीत. लिव्हिंगस्टोनच्या घरातलं वातावरण तसे धार्मिक असल्याने डेव्हिडने वयाच्या विसाव्या वर्षी मिशनरी बनण्याचा निर्णय घेतला. त्याच्या लक्षात असे आले की बरेचसे मिशनरी हे वैद्यकीय शिक्षण घेतलेले असत. मग त्याने ग्लास्गो (Glasgow) येथील वैद्यकीय कॉलेजमधे प्रवेश घेतला. ४ वर्षाच्या या वैद्यकीय शिक्षणादरम्यान त्याने त्याला रस असलेल्या वनस्पतिशास्त्र, भूगर्भशास्त्र अशा विविध विषयांचाही अभ्यास केला. त्याच्या समोर एकच लक्ष होत ते मिशनरी होऊन वेगळ्या देशात प्रवास करायचा. त्याने लंडन मिशनरी सोसायटी मधे प्रवेश घेऊन आपल्या मिशनरी बनण्यासाठीचे शिक्षणही घेतले. शिक्षण चालू असतानाच त्याला एक संधी चालून आली. त्याकाळात चीनमधे धर्मप्रसाराकरता अनेक मिशनरी पाठवले जात असत. चीनला जायला मिळणार या कल्पनेने तो अत्यंत उत्साहित झाला. पण १८३९ साली चीनमधे ब्रिटिश व स्थानिक चिनी राज्यकर्त्यांमधे युद्ध (First Opium War) चालू झाले. गांजाच्या आयात निर्यातीवरून हे युद्ध पेटले आणि डेव्हिडच्या उत्साहावर विरजण पडले.
१८४० साली तो रॉबर्ट मोफाट या मिशनर्याच्या संपर्कात आला. मोफाट हा दक्षिण आफ्रिकेत कुरुमान या प्रांतात मिशनरी कार्यालयाचे कामकाज बघत होता. त्याला आपले मिशनरी कार्य हे उत्तर आफ्रिकेतील प्रांतांमधे न्यायचे होते. डेव्हिड मोफाटमुळे अत्यंत प्रभावित झाला आणि त्याने मिशनरी म्हणून आफ्रिकेत जाण्याचे ठरविले. डेव्हिडच्या आफ्रिकेतील वास्तव्यात घडलेल्या घटना अतिशय रोमांचकारी आहेत.
तीन महिन्यांचा प्रवास करून डेव्हिड केप ऑफ टाउन येथे पोहोचला. येथून पुढचा प्रवास खडतर होता. बैलगाडीतून प्रवास करत डेव्हिड उत्तरेकडे निघाला. दरमजल करत तो शोकुआने (Chonuane) येथे पोहोचला. तेथे त्याची गाठ पडली ती सेशेल नावाच्या टोळीप्रमुखाशी. डेव्हिड एक मिशनरी होता आणि तो आफ्रिकेत आला होता धर्मप्रसारासाठी. पण त्याच्या संपूर्ण वास्तव्यात त्याने ख्रिश्चन धर्मांतर केलेला एकमेव माणुस हा सेशेल होता. त्यानंतर तो कुरुमान (Kuruman) येथे गेला.
आफ्रिकेत अनेक लहान मोठ्या टोळ्या अस्तित्वात होत्या. या टोळ्यांमधे सतत युद्धे होत असत.डेव्हिडला जाणवलेली पहिली अडचण म्हणजे भाषा. त्याला तेथील स्थानिक लोकांशी संवाद साधता येत नव्हता. त्यासाठी त्याने त्याच्या सर्व युरोपिअन सहकार्यांशी सहा महिने संबंध तोडले आणि स्थानिक भाषा शिकून घेतली.

त्यानंतर डेव्हिडने येथील माबोत्सा येथे आपला मुक्काम हलवला. पण तेथे त्याच्यावर एक भलताच प्रसंग गुदरला. या प्रदेशात अनेक सिंहांचे वास्तव्य होते. हे सिंह टोळीवाल्यांच्या पाळीव जनावरांची शिकार करीत. डेव्हिडकडे एक रायफल होती. त्याने या सिंहांचा बंदोबस्त करण्याचे ठरविले. गावातील मेबाल्वे नावाच्या शाळाशिक्षकाकडेही एक बंदूक होती. गावातील पुरूषमंडळी आणि डेव्हिड सगळेच सिंहांची शिकार करायला बाहेर पडले. एका सिंहाला गोळी लागली आणि तो मेला आहे असे समजून ही मंडळी त्याच्या जवळ जाऊ लागली तेव्हढ्यात त्या सिंहाने झुडुपातून झेप घेऊन डेव्हिडवर हल्ला केला. त्या सिंहाने त्याच्या खांद्यात आपले दात घुसवले. नशिब बलवत्तर म्हणून डेव्हिड त्यातून वाचला. त्याचा एक हात या हल्ल्यामुळे अधू झाला तो कायमचाच. त्याच्या जखमा अतिशय खोल असल्याने त्याला पुन्हा कुरुमानला परतावे लागले. तेथे तो मोफाटच्या मुलीच्या प्रेमात पडला व त्याने तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर तो लगेचच पुन्हा आपल्या मोबात्सामधल्या घरी परतला.
नवनवीन प्रदेशाचा शोध घेण्याची त्याची आवड त्याला स्वस्थ बसू देईना. १८४९ च्या जूनच्या महिन्यात तो न्गामी (Ngami) नावाच्या सरोवराचा शोध घेण्यासाठी निघाला. स्थानिक लोकांनी त्याला वेड्यात काढले कारण त्याला कलहारीचे वाळवंट ओलांडून जावे लागणार होते. हा मार्ग अतिशय खडतर तर होता तसेच वाटेत पाण्याची अत्यंत कमतरता होती. तरीही डेव्हिडने हे धाडस करण्याचे ठरवले. स्थानिकांनी हे जमणे शक्य नाही असे त्याला अनेकदा समजावले पण त्यांचे न ऐकता डेव्हिड या मोहीमेवर निघाला. त्याने आपल्या परिवाराला पुन्हा इंग्लंडला पाठवण्याचा निर्णय घेतला. तेथे त्याचा त्याच्या मुलीशी अतिशय हृदयस्पर्शी संवाद झाला. तिने आपल्या वडिलांना विचारले ’तुम्ही घरी केव्हा परताल?’ डेव्हिडने उत्तर दिले ’कधीच नाही कारण लक्षात ठेव तुझे वडिल मिशनरी आहेत.’ या मोहिमेत त्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. पाण्याचे दुर्भिक्ष तर होतेच पण वाटेतल्या अनेक टोळ्यांच्या हल्ल्याचीही भिती होती. तसेच मोहिमेच्या शेवटच्या दिवसात अन्नाचीही टंचाई जाणवायला लागली. पण डेव्हिडच्या दुर्दम्य आत्मविश्वासाने ही मोहिम फत्ते झाली. कलहारी वाळवंट ओलांडून जाणारा तो पहिला युरोपियन माणूस होता.

त्यानंतरची त्याची मोहिम ही आणखी धाडसी होती. १८५३ साली तो सेशेके या गावी आला. येथून एक मोठी नदी वाहते. लिआमपाय असे तिचे स्थानिक नाव. आजही स्थानिक लोक तिला याच नावाने ओळखतात. झांबेझी या नावाने त्या नदीला जगभर ओळखले जाते. डेव्हिडने आणखी एक धाडसी मोहीम आखली. ह्या नदीतून प्रवास करून आपल्याला नदीकाठी वसलेल्या अनेक वस्त्यांमधून धर्मप्रसार करता येईल अशी त्याची कल्पना होती. त्याने काही स्थानिक सहकारी बरोबर घेतले. नदीतून बोटीने प्रवास करून नदीच्या उगमाकडे पोहोचायचे व तेथून पुढे आफ्रिकेच्या पश्चिम किनार्यावर जायचे तिथून परत फिरायचे व सेशेके येथून पूर्वेकडे वाहणार्या झांबेझी नदीतून आफ्रिकेच्या पूर्व किनार्यावर पोहोचायचे. असा नदीतून प्रवास करणे अत्यंत धोकादायक होते, नदीमधे पाणघोडे, मगरींची वस्ती होती. तसेच या प्रवासात भेटणार्या टोळ्यांबद्दल सेशेके मधल्या स्थानिक लोकांनाही फारशी माहिती नव्हती. हा सगळा प्रवास साधारणतः ३००० मैलांचा होता. मोहीम चालू होण्याच्या सुरुवातीलाच डेव्हिड आजारी पडला. त्याची इच्छाशक्ती इतकी प्रबळ होती की चार दिवसांनी थोडा बरा झाल्यावर तो पुन्हा ठरवलेल्या मोहीमेवर निघाला. त्याच्याबरोबर संरक्षणाकरता एक पिस्तूल, रायफल आणि एक शॉटगन होती. खाण्याच्या पदार्थात त्याच्याबरोबर होती २० पाउंड कॉफी, थोडासा चहा आणि थोडी बिस्किटे. वाटेत खाण्यासाठी त्यांना शिकारीवर अवलंबून रहावे लागणार होते. तसेच वाटेत लागणार्या गावांना भेटी देताना घालण्यासाठी चांगल्या कपड्यांचा एक जोड त्याच्याबरोबर होता. वाचण्यासाठी काही पुस्तके, नकाशावर आपला प्रवासमार्ग चिन्हांकित करण्यासाठीच्या वस्तू, वस्तीमधे प्रवचन देताना मिशनरी वापरतात तो दिवा, पांघरण्यासाठी एक ब्लॅकेट आणि स्वतः:साठी एक तंबू अशा तुटपुंज्या सामग्रीसह तो मोहीमेवर निघाला.

या आफ्रिकेतील प्रवासात तो अतिशय बारीकसारीक नोंदी करत होता. स्थानिक भाषेची वैशिष्ट्ये, त्यांच्या चालीरीती तसेच तेथील भूभागाविषयीच्या अनेक गोष्टी त्याने आपल्या डायरीत नोंदवून वल्या. त्सेत्से माशा, रानम्हशी, पाणघोडे यांच्याही अनेक नोंदी विस्ताराने त्याने आपल्या डायरीत नोंदवल्या. एकदा तो प्राण्याच्या कळपाचे निरीक्षण करत गवतामधे शांत पडला होता. त्याच्याबरोबर असलेल्या त्याच्या स्थानिक सहकार्यांना तो आजारी असल्याचे वाटले. त्यांनी मग आजूबाजूच्या सर्व कळपाला पिटाळून लावले. ही नोंद डेव्हिडने आपल्या डायरीत केली आहे. न्गामी सरोवराच्या मोहिमेत त्याला दिसलेला एका हरिण कुळातील प्राणी त्याला झांबेझी मोहिमेतही दिसला. त्याने त्याचे वर्णन आपल्या डायरीत केले आहे. त्या नोंदीवरून असे आढळले की त्याने एका नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. त्याने आपल्या डायरीत नोंदवले आहे की ’आम्हाला वाटले या प्राण्याचे मांस रुचकर असेल. पण लवकरच आम्हाला ते खायचा कंटाळा आला.’ डेव्हिड हा काही या विषयातला तज्ञ नव्हता. पण त्याने नोंदवलेली निरीक्षणे अचूक आणि परिपूर्ण होती.

झांबेझी नदीतून पुढे जाणे तितके सोपे नव्हते. खडकाळ प्रदेशातून जोरदार वाहणार्या प्रवाहातून बोट पुढे नेणे अतिशय अवघड होते. अशा अनेक संकटांशी सामना करत त्याने ६ आठवड्यात जवळ जवळ ४०० मैलांचे अंतर पार केले. या प्रवासात त्याच्या अंगात अनेकवेळा ताप चढलेला असे. मुसळधार पावसाचाही त्यांना सामना करावा लागला. हे ४०० मैलांचे अंतर पार करून तो पोहोचला शिंते या गावी. हे गाव एका स्थानिक टोळीच्या प्रदेशाची राजधानी होती. या टोळीत पोहोचणारा डेव्हिड हा पहिला गोरा माणुस होता. तेथे त्याचे व त्याच्याबरोबर असलेल्या त्याच्या १०० सहकार्यांचे जोरदार स्वागत झाले. तो आपल्या डायरीत नोंदवतो ’येथील टोळीप्रमुखाने आमचे जोरदार स्वागत केले. डोक्यावर शिरस्त्राण घातलेल्या या टोळीप्रमुखाने अंगाला माती आणि राख फासून आमचे स्वागत केले. टोळीमधे स्त्रियांना मानाचे स्थान आहे हे बघून मी आश्चर्यचकित झालो आहे. त्याने त्याला भेटलेल्या टोळीवाल्यांच्या चालीरीती, त्यांची संस्कृती याच्याही बारीकसारीक नोंदी केलेल्या आहेत. शिंतेपासुन उत्तरेकडे वाहणारी नदी पूर्वेकडे वळते. येथे त्याने हे वळण टाळण्यासाठी जमिनीवरून जाण्याचा निर्णय घेतला. डोंगरदर्या पार करून पाचव्या दिवशी ते पुन्हा नदीच्या प्रवाहापाशी पोहोचले. ते ठिकाण होते अंगोलामधील कोझोंबो. त्याचा हा प्रवास पावसाळ्याच्या दिवसात चालू होता. कोझोंबो हे झांबेझी नदीवरचे सगळ्यात उंच ठिकाण आहे. प्रवासात त्याने नकाशावर आपला मार्ग आखण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण ढगाळ वातावरणामुळे त्याला ते शक्य झाले नाही. कोझोंबो मधे त्याला अनेक दिवसांनी आकाशातल्या तार्यांचे दर्शन झाले आणि तो त्याचे ठिकाण नकाशावर अचूकपणे नोंदवू शकला. येथून त्याने झांबेझी नदी पार केली व तो तिच्या पश्चिम किनार्याला गेला. ’आम्हाला नदी ओलांडायला चार तास लागले’ असे तो नोंदवतो. येथे त्याला मागे काही टेकड्या दिसल्या. त्याने स्थानिक माणसाला विचारले या टेकड्या कशाच्या आहेत? तेव्हा त्याने उत्तर दिले ’पेरी’ डेव्हिडने आपल्या डायरीत त्यांची नोंद ’पेरी हिल्स’ अशी केली. खरतर स्थानिक भाषेत पेरी या शब्दाचा अर्थ टेकडी (Hill) असाच आहे. पण आजही त्या टेकड्यांना पेरी हिल्स असेच संबोधले जाते.

येथून पुढे झांबेझी नदीऐवजी जमिनीवरून चार महिन्यांचा प्रवास करून पश्चिमेकडे अंगोलाची राजधानी आणि आफ्रिकेच्या पश्चिम किनार्यावरील लुआंडा (Luanda) येथे पोहोचला. या खडतर प्रवासात त्याच्या तब्येतीची बरीच हेळसांड झाली. त्याला मोठ्या प्रमाणात जुलाब होत होते तसेच त्याला मलेरियाही झाला होता. लुआंडाला पोहोचल्यावर तेथे आपल्या पत्नीची इंग्लंडवरून काही पत्रे आली असतील अशी त्याची आशा होती. पण तेथे त्याच्यासाठी एकही पत्र नव्हते. पण आश्चर्यकारकरीत्या तेथील बंदरात अनेक ब्रिटिश जहाजे उभी होती. एका जहाजाच्या कप्तानाने डेव्हिडला इंग्लंडला परत जाण्याबद्दल विचारले. पण डेव्हिडने त्याला स्पष्ट नकार दिला. ’मी असे केले तर तो माझ्याबरोबर आलेल्या माझ्या स्थानिक सहकार्यांचा विश्वासघात ठरेल. माझ्याशिवाय त्यांना परतीचा मार्ग सापडणे अवघड जाईल.’ असे उत्तर त्याने दिले आणि आपली तब्येत सुधारेपर्यंत तेथेच राहण्याचा निर्णय घेतला.

त्याची तब्येत सुधारल्यावर ते पुन्हा परतीच्या मार्गाला लागले. त्यांना पुन्हा झांबेझीपर्यंत पोहोचायला पाच महिने लागले. झांबेझी नदीपाशी पोहोचल्यावर त्याच्या सहकार्यांनी एका पाणघोड्याची शिकार करून ते मांस शिजवले. गेले अनेक दिवस त्यांना अशी मेजवानी मिळाली नव्हती. पण नदीतल्या पाणघोड्यांनी याचा वचपा काढला. पाणघोड्यांनी त्यांची बोट उलटवून टाकली. यात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. झांबेझीमधुन प्रवास करत ते एक वर्ष सात महिन्यांनी पुन्हा सेशेकेला पोहोचले.

यानंतर त्याने एक अशी गोष्ट जगासमोर आणली ज्या गोष्टीने सर्व जग अचंबित होणार होते. सेशेकेला पोहोचल्यावर त्याला स्थानिक लोकांकडून एका मोठ्या धबधब्याविषयी माहिती मिळाली. स्थानिक लोक त्याला मोसी ओआ टोनिया म्हणजेच गडगडाटी आवाज करणारा धुर असे म्हणत. त्याने लगेचच झांबेझी नदीकडून पूर्वेकडे प्रवास चालू केला. या प्रवासात त्याच्याबरोबर एक छोटी डायरी होती ज्याच्यात त्याने आपल्या प्रवासमार्गाचा नकाशा तपशीलवार काढलेला आहे. याचबरोबर त्याला प्रवासात दिसलेली भौगोलिक स्थितीच्या ही नोंदीही केलेल्या आहेत. १६ नोव्हेंबर १८८५ रोजी तो या धबधब्याच्या तोंडापाशी पोहोचला. त्याला समोर असलेल्या दरीतून मोठ्या प्रमाणात धुक्याचे ढग वर येताना दिसले. जोरदार वाहणार्या पाण्याच्या प्रवाहातून तो धबधब्याच्या कड्याशी पोहोचला. एका मोठ्या घळीमधे गडगडाटी आवाज करत कोसळणारा धबधबा आणि त्यातून घळीमधून वर येणारे धुक्याचे ढग बघून तो अचंबित झाला. या जागेवर पोहोचणारा आणि या धबधब्याचे दर्शन घेणारा तो पहिला आफ्रिकेबाहेरचा माणुस होता. त्याने तेथेच या धबधब्याचे नामकरण केले ’व्हिक्टोरीया फॉल्स’ असे. त्याने त्या धबधब्याच्या काही नोंदी आपल्या डायरीमधे केलेल्या आहेत. हा धबधबा १०० फुट खाली कोसळतो असे त्याने नमूद केलेले आहे. खरेतर एका टोकाला धबधब्याची उंची २०० फुट तर दुसर्या टोकाला ३५० फुट आहे. पुढे पुन्हा ५ वर्षांनी त्याने या धबधब्याला भेट दिली तेव्हा त्याने एका दोरीच्या टोकाला बंदुकीची गोळी बांधून, कड्यावर आडवे पडून धबधब्याची उंची अचुक मोजली. व्हिक्टोरीया फॉल्सची भौगोलिक रचना त्याने अतिशय बारकाईने नोंदवून ठेवली आहे. तो लिहितो ’एका मोठ्या भुकंपामुळे तयार झालेल्या या घळीत हा धबधबा कोसळतो. तिथे इंग्लंडमधे बसून येथील दृश्याची कल्पना येणार नाही.’ यावेळी त्याच्याबरोबर जवळपास दिडशे सहकारी होते. प्राण्यांच्या हत्येला डेव्हिडचा विरोध होता. पण इतक्या लोकांना खायला घालण्यासाठी शिकार करणे गरजेचे होते. त्याने नोंदवले आहे की तेथे त्याच्या सहकार्यांनी एका हत्तीच्या पिल्लाची आणि त्याच्या आईची शिकार केली.

येथून ते पुढे पूर्वेकडे असलेल्या झुंबो (Zumbo) या गावी पोहोचले. झुंबो येथे पोर्तुगीज लोकांनी १७व्या शतकापासून वस्ती केलेली होती. तेथे त्यांनी एक छोटा किल्लाही बांधला होता. डेव्हिड तेथे पोहोचला तेव्हा ती जागा निर्जनावस्थेत होती. येथे त्यांना रानम्हशींच्या एका कळपाचा सामना करावा लागला. रानम्हशींनी त्याच्या सहकार्यांवर हल्ला केला आणि त्यातला एक सहकारी जखमी झाला. पण त्यांच्यावर येणारी संकटं संपली नाहीत. झुंबोपासून पुढे गेल्यावर एका रात्री त्यांच्यावर एका स्थानिक टोळीने हल्ला केला. आधीच प्रवासाने थकलेले त्याचे सहकारी या टोळीवाल्यांशी लढायला तयार नव्हते. पण डेव्हिडने त्यांना बैलाच्या मांसाचे मेजवानी दिली आणि सगळे सहकारी लढाईला तयार झाले. अर्थात लढाई काही झाली नाही. टोळीचे प्रमुख डेव्हिडला भेटायला आले. त्यांना वाटले की डेव्हिड हा पोर्तुगीज आहे. पण डेव्हिड ’मी ब्रिटिश आहे’ हे त्यांना पटवून देण्यात यशस्वी झाला. टोळीप्रमुखाने डेव्हिडला सल्ला दिला ’नदीच्या उत्तर काठाने जाणारा रस्ता खडतर आहे. तुम्ही नदी पार करून दक्षिणेकडून पुढे जा’ असे म्हणून त्याने त्यांना नदी ओलांडण्यासाठी नावांची व्यवस्था केली. त्या दिवशी त्यांना नदी पार करता आली नाही म्हणून त्यांनी नदीमधे असलेल्या एका छोट्या बेटावर मुक्काम केला. दुसर्या दिवशी नदी पार केल्यावर डेव्हिडने टोळीप्रमुखाला दोन चमचे आणि एक शर्ट भेट म्हणून पाठवला.
येथून पुढे मोठ्या डोंगररांगेला वळसा घालून सहा आठवड्यांनी ते टेट (Tate) येथे पोहोचले. पण डेव्हिडची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्याने टेट येथे सहा आठवडे मुक्काम केला. येथे त्याच्या मोहिमेची सांगता झाली. येथून आफ्रिकेचा पूर्व किनारा साधारणतः २०० मैलांवर आहे. पण या भागात पोर्तुगीजांच्या वस्त्या होत्या. डेव्हिड हा पहिला युरोपियन होता ज्याने आफ्रिकेच्या पश्चिम किनार्यापासून पूर्वेकडील किनार्यापर्यतच्या अनोळखी असलेल्या प्रदेशातून प्रवास करून जगाला त्याची ओळख करून दिली.

आपल्या बरोबरच्या सहकार्यांना तेथेच सोडून त्याने बोटीतून २८ मे १८५६ रोजी पुर्वकिनार्यावरील क्वालिमानी येथे पोहोचला. ’मी तुमच्यासाठी पुन्हा परत येईन आणि तुम्हाला तुमच्या घराकडे घेऊन जाईन’ असे आपल्या सहकार्यांना त्याने जाताना वचन दिले होते. त्याच्या या प्रवासाला तीन वर्ष लागली. त्याने आफ्रिका खंडात केलेल्या या प्रवास, त्याने केलेल्या प्राण्यांच्या, पक्षांच्या, भौगोलिक रचनेच्या नोंदी, त्याने काढलेले नकाशे हे त्याचे सर्वात मोठे योगदान आहे. तेथून एका ब्रिटिश बोटीने तो इंग्लंडला परतला. तेथे त्याचे रॉयल जिओग्राफिकल सोसायटीतर्फे मोठे स्वागत करण्यात आले आणि सोन्याचे पदक देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. त्याच्या आफ्रिकेतल्या अनुभवांवर व्याख्यान देण्यासाठी त्याला आमंत्रित करण्यात आले. त्याने लिहिलेल्या डायरीतल्या अनुभवांवर पुस्तक प्रकाशित करण्यात आले. हे पुस्तक अतिशय लोकप्रिय झाले व त्याच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या. ’Missionary Travels and Researches iन South Africa’ या पुस्तकाच्या पहिल्या पानावर त्सेत्से माशीचे रेखाचित्र आहे.

आफ्रिकेतल्या या मोहिमेव्यतीरिक्त डेव्हिडचे अत्यंत महत्वाचे योगदान आहे ते गुलामगिरीविरुध्द त्याने उठवलेला आवाज. त्याच्या आफ्रिकेतल्या प्रवासात त्याने अनेक ठिकाणी आफ्रिकन लोकांना गुलामगिरीसाठी पकडून नेताना बघितले होते. अरब व्यापारी या गुलामांना पकडून जमिनीखाली केलेल्या गुहांमधे कोंडून ठेवत. अरब व्यापाऱ्यांना पोर्तुगीजांचाही काही प्रमाणात पाठिंबा असे. दोन टोळ्यांना एकमेकाशी झुंजायला लावून अरब व्यापारी गुलामांना पकडत व बंदरांमधे त्यांची विक्री चाले. गुलामांना पकडल्यावर अतिशय क्रूरपणे वागवले जात असे. इंग्लंडला परतल्यावर डेव्हिडने या क्रूर प्रथेविरोधात आवाज उठवला. गुलामगिरी विरुद्ध केलेले डेव्हिडचे हे योगदान अतिशय महत्वाचे ठरते.
लंडनच्या मिशनरी सोसायटीने डेव्हिडला आता एका ठिकाणी राहून धर्मप्रसार करावा असा सल्ला दिला. पण डेव्हिडचे मन मात्र त्याने टेट येथे सोडलेल्या त्याच्या सहकाऱ्यांबरोबर होते. त्यामुळे त्याने मिशनरी सोसायटीचा राजीनामा दिला व सोबत सहा ब्रिटिश सहकार्यांना घेऊन तो आफ्रिकेच्या पुर्वकिनार्याला पोहोचला. यावेळी त्यांनी बरोबर मजबूत अशा बोटी आणल्या होत्या. त्याची टेट येथली त्याच्या सहकार्याबरोबरची भेट अत्यंत हृद्य अशी होती. गाणी म्हणत त्याच्या सहकार्यांनी त्याचे स्वागत केले.
पण त्याची ही मोहिम मात्र पहिल्यापासूनच फसत गेली. बरोबरच्या ब्रिटिश सहकार्यांमधला विसंवाद, नदीच्या पात्रात असलेले मोठे मोठे खडक यामुळे त्यांना बोटीने प्रवास करणे अवघड झाले. मागील मोहिमेच्यावेळी पावसाळ्याचे दिवस असल्याने नदीत भरपूर पाणी होते. ही मोहिम उन्हाळ्यात चालू केल्याने पाणी कमी होऊन पात्रातले खडक उघडे पडले. येथे त्याने एक महत्वाचा निर्णय घेतला. त्याने पुन्हा आपला प्रवास टेटच्या दिशेने चालू केला आणि टेटपासून पुढे झांबेझीला शुपांगा येथे येऊन मिळणार्या शायर (Shire) नदीतून उत्तरेकडे प्रवास करून न्यासा (Nyasa) सरोवराचा शोध लावला. या प्रवासातही त्याने अनेक नोंदी करून ठेवल्या आहेत. पुन्हा शुपांगाला परतल्यावर डेव्हिडने तेथेच राहण्याचा निर्णय घेतला. त्याची बायको मेरी ही इंग्लंडवरून तेथे राहायला आली. पण आल्यानंतर तीन महिन्यातच तिचा मृत्यू झाला. ज्या झांबेझी नदीवर त्याने अत्यंत प्रेम केले त्या नदीच्या किनार्यावरच त्याच्या बायकोचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर तो पुन्हा इंग्लंडला परतला.

मात्र वर्षभरातच तो पुन्हा आफ्रिकेत परतला. मात्र यावेळी त्याने नाईल नदीच्या उगमाचा शोध घेण्याचे ठरवले. खरेतर रिचर्ड बर्टनने हा शोध आधीच लावला होता. पण डेव्हिडचे मत मात्र वेगळे होते. त्यामुळे तो पुन्हा आफ्रिकेला परतला. यानंतर तो गायब झाला. त्याचा कुठेही पत्ता लागेना. डेव्हिड हा इंग्लंडमधे अतिशय लोकप्रिय असल्याने ब्रिटिश सरकारने त्याच्या शोधाची मोहिम काढावी असा लोकांनी सरकारवर दबाव आणला. याचवेळी न्यूयॉर्क टाईम्सने एका खाजगी मोहिमेअंतर्गत पत्रकार हेन्री स्टॅनली याला डेव्हिडला शोधण्यास पाठवले. स्टॅनलीला डेव्हिड भेटला उजिजी नावाच्या गावात. त्यांची भेट झाल्यावर स्टॅनलीने उच्चारलेले पहिले वाक्य होते ’Dr. Livingstone? I Presume.’ स्टॅनलीची ही मोहिम १८६९ साली चालू झाली. १० नोव्हेंबर १८७१ रोजी स्टॅनली व डेव्हिडची भेट झाली. १ मे १८७३ रोजी इलाला या गावी डेव्हिड मरण पावला.

डेव्हिडची माझी ओळख करून दिली ती दुसर्या डेव्हिडने. बीबीसीने १९६५ साली लिव्हिंगस्टोन्स रिव्हर – झांबेझी हा एक भाग प्रसारित केला. डेव्हिड अॅटनबरो यांनी लिव्हिंगस्टोनने केलेला हा २००० मैलांचा प्रवास करून ही फिल्म बनवली.
डेव्हिड लिव्हिंगस्टोनने उजेडात आणलेले वेगवेगळे भूभाग, त्याच्या निरीक्षणातून जगासमोर आलेली नवीन माहिती आणि त्याने गुलामगिरी विरुद्ध दिलेला लढा हे त्याचे संपूर्ण जगासाठी मोठे योगदान आहे.
(लेखातील रेखाचित्रे डेव्हिडच्या पुस्तकातून घेतली आहेत.)
कौस्तुभ मुद्गल
माहितीपूर्ण लेख आहे.
डेव्हिड लिव्हिंगस्टोनच्या चिकाटीचं कौतुक करावं तितकं थोडंच.
पण..
एक शतकाहून अधिक काळ लोटल्यावर आफ्रिकेमध्ये त्याच्याकडे आणि त्याच्या मोहिमेकडे वेगळ्या बाजूने पाहिलं जातंय, वेगळ्या दृष्टीकोनातून अभ्यास केला जातो आहे.
Far from religion being a tool in the pursuit of empire, Livingstone partly understood empire as a tool through which to bring what he saw as the salvation of “Commerce, Christianity and Civilisation” to Africa in the form of a liberal individualism, freedom, legitimate trade and private property rights. This was at a time when the British government was not all that interested in colonising Africa. While Livingstone was a “hopeless leader of Europeans”, he displayed courage in the face of famine, civil war, attacks by slavers and malaria, with which his battle was constant and from which his wife Mary Moffat died in 1862. He had “ambition, callousness and vanity” yet also a profound sense of humanity and an ability to suffer pain.
In a sense Livingstone encapsulates the dilemmas at the heart of issues of liberal development in Africa – for his qualities were tightly bound up with the very prejudices that made him into a Christian warrior for the British Empire: humanity merged with zealousness, his call for colonialism as a way of tackling the slave trade impossible to separate from his respect for African people, cultures and languages.
This was the enigma that was Livingstone
LikeLike
धन्यवाद मिलिंद नवीन माहिती बद्दल
LikeLike