आपण शाळेत इतिहास शिकताना नेहमी प्रश्नांची ठोकळेबाज उत्तरं लिहीत आलेलो आहे. उदाहरणार्थ अमुक तमुक युद्धाची कारणे काय यांत मूलभूत कारणं आणि तत्कालीन कारणं. अमुक युद्धात तमुक देशाचा/ व्यक्तीचा विजय झाला त्याची कारणं लिहिताना उत्कृष्ट डावपेच, प्रशिक्षित सैन्य आणि आधुनिक शस्त्रं हे आपण सहज लिहीत आलेलो आहे. पण या विजयामागे कितीतरी मोठी तयारी आणि अभ्यास असतो याचा आपण फार खोलात जाऊन विचार करत नाही. याचं उदाहरणचं द्यायचं झालं तर १८५७ चा राष्ट्रीय उठाव. या उठावाचं तत्कालीन कारण लिहिताना आपण एनफिल्ड बंदुकीच्या गोळ्यांची गाय आणि डुकराच्या चरबीयुक्त आवरणे आणि त्यामुळं हिंदी शिपायांच्या दुखावलेल्या भावना हे आपण डोळे झाकून लिहिलेलं होतं. पण याहून खोलात जाऊन आपण त्याबद्दल कधीच विचार केला नाही.
एकदा सहज बंदुका, काळानुरूप त्यात होत गेलेले बदल याबद्दल वाचताना मला एनफिल्ड बंदुकीची थोडीफार माहिती सापडली, माझं कुतुहल जागृत झालं आणि मग मी त्याबद्दल शोधाशोध सुरू केली. आणि मग मला जाणवलं या विषयाच्याबाबतीत तांत्रिकदृष्ट्या फार खोलात न जाताही भरपूर माहिती उपलब्ध आहे की जी फारच रंजक आहे. मग आता नमनालाच फार बंदुकीची दारू न जाळता आपण मुख्य विषयाकडं वळूया…
आपण अगदी सहजपणे बंदूक हा शब्द वापरतो पण त्यातही दोन प्रकार होते. एक होती ती musket आणि दुसरी रायफल. आता या दोन्हीत फरक काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ?
आपण रायफल म्हणजे काय हे आधी समजून घेऊया म्हणजे त्यानंतर musket समजून घेणं सोपं जाईल. रायफल हा शब्द मुळात rifling वरून आलेला आहे. Rifling म्हणजे बंदुकीच्या नळीच्या आतील spiral grooves म्हणजेच बारीक सर्पाकृती आटे. यामुळे रायफलीतून झाडलेली गोळी स्वतःभोवती फिरत लक्षापर्यंत पोहोचते. स्वतःभोवती फिरल्यामुळे ही गोळी लक्षापर्यंत जाईपर्यंत स्थिर रहाण्यास मदत होते. यामुळं रायफलचा निशाणा अधिक अचूक असतो.(अर्थात हे सगळं एवढं सोपं नाही, त्यात अनेक इतर घटकही असतात पण विषयप्रवेश करताना हे थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे.)

Musket ही smoothbore असे म्हणजे तिच्या नळीच्या आतून rifling केलेलं नसे. Musket चा निशाणा मुळीच अचूक नसे किंबहुना musket निशाणा साधून मारा करण्यासाठी बनवलेलीच नव्हती. यामुळं निशाणा धरून मारा करण्याऐवजी अनेक बार एकाच ठिकाणी म्हणजे जिथं शत्रूची गर्दी जास्त आहे तिथं काढले जात ज्यामुळं अनेक सैनिक एकाचवेळी ठार मारणे किंवा जायबंदी करणे साधत असे.
Musket च्या एकूण कामगिरीविषयी सांगायचं तर २२ जुलै १८१२ रोजी Salamanca ला म्हणजे स्पेनमध्ये ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यात एक लढाई झाली. या लढाईत ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व करत होता Duke of Wellington.(याला Iron Duke असंही म्हणत, यानेच पुढं Waterloo च्या युद्धात नेपोलियचा पराभव केला.) या लढाईत फ्रेंचांचे सुमारे ८००० सैनिक मारले गेले किंवा जखमी झाले आणि यासाठी ब्रिटिशांनी जवळपास ३५,००,००० (होय, अक्षरी पस्तीस लाख) गोळ्या झाडल्या. म्हणजे झाडल्या गेलेल्या दर ४३७ गोळ्यांनंतर एक गोळी कामी आली.
१८५१ साली आफ्रिकेतल्या Cape या ठिकाणी झालेल्या Xhosa टोळ्यांविरुद्धच्या चकमकीत ब्रिटिशांनी ८००० गोळ्या झाडल्यानंतर फक्त पंचवीस लोक जायबंदी झाले किंवा मारले गेले. म्हणजे १८१२ ते १८५१ या चार दशकांच्या कालावधीत musket च्या मारक क्षमतेत काही फारसा बदल झाला नाही.
Musket मध्ये buck and ball या प्रकारच्या गोळ्या वापरत. यांत साधारण पावणेदोन सेंटिमीटरचा शिशाचा एक गोळा आणि तीन ते सहा buckshot pellets म्हणजे शिशाचे वाटाण्याच्या आकाराचे छर्रे असत. यामुळं मोठ्या भागावर पसरून मारा करणे शक्य होई. अर्थात यातला जो मोठा गोळा असे तोच प्राणघातक असे छर्रे फक्त शत्रूला जखमी करण्यासाठी उपयोगी पडत. पण याचा जवळून केलेला मारा घातकच असे. सुमारे ५ ग्रॅम दारू (तेंव्हाच्या मापानुसार 3 dram) आणि buckshot pellets हा सगळा सरंजाम paper catridge मध्ये भरलेला असे आणि प्रत्येक वेळी बंदूक ठासून भरावी लागत असे त्याचंही एक वेगळं ड्रिल असे म्हणजे paper catridge फोडून दारू नळीतून आत भरतात ( यालाच muzzle loading म्हणतात), त्यानंतर paper catridge मध्येच असलेले buckshots बंदुकीत भरत आणि मग नळीच्या खालच्या बाजूला असलेल्या ramrod ने हा सगळा मसाला ठासून घट्ट बसवत. या सगळ्या क्रियेला सुमारे ३० सेकंद वेळ लागत असे. सगळ्या बंदुका काही एकदम ठासून तयार होत नसत त्यामुळं या बंदुकवाल्यांचे दोन-तीन गट करून त्यांच्याकडून मारा करून घेतला जाई. यामुळं प्रत्येकाला आपापले शस्त्र सज्ज करायला वेळ मिळे आणि माराही सतत चालू राही. या पद्धतीला volley fire असं म्हणतात.

Musket च्या मर्यादा सांगायच्या तर युद्धात १५० यार्ड्स (१३७ मी) हून लांबच्या शत्रूवर गोळीबार करता येत नसे (म्हणजे त्याचा फारसा परिणाम होत नसे), २०० यार्ड्सवर तर नाहीच नाही. ७५ ते १०० यार्ड्स एवढ्या अंतरावरून मारा केला असता निशाणा दोन फुटांपर्यंत हुकत असे आणि २०० यार्ड्सच्या अंतरावर तर त्यात ६ फुटांपर्यंत फरक पडत असे.

Muskets च्या मर्यादा लक्षात घेऊन त्यावर उपाय शोधणे आता अनिवार्य होऊन गेले होते. यांवर युरोपभर बरेच संशोधन सुरू होते अनेक प्रकारच्या बंदुका तयार होत होत्या, सतत त्यांचे परीक्षण सुरू होते. यांतूनच १८५१ मध्ये Minie या रायफलची निर्मिती झाली. ही रायफल 0.702 bore ची होती. बंदुकीचा bore म्हणजे बंदुकीच्या नळीचा आतील व्यास. या रायफलमध्ये buckshots ऐवजी bullet म्हणजे काडतूस वापरले जाई (काडतूस हा शब्द बहुदा cartridge वरूनच आला असावा). ही रायफलही muzzle loading प्रकारचीच होती.

Minie रायफल आल्यामुळं muskets एकदम मागं पडल्या कारण Minie सुमारे ६०० यार्डपर्यंत परिणामकारक मारा करत असे तर १००० यार्डापर्यंत तिची गोळी पोचत असे. Musket मधून निशाणा साधता येत नसे पण रायफलमधून निशाणा साधणे शक्य होते कारण नळीवर निशाणा साधण्यासाठी sight होती (या sight ला मराठीत माशी असे नाव आहे). युरोपमधल्या शिपायात तर अशीही अफवा पसरलेली होती की या रायफलची गोळी एका मागोमाग पंधरा सैनिकांच्या छातीतून आरपार जाते. तरीही या रायफलही काही परिपूर्ण नव्हत्या कारण नळीतून बाहेर पडताना गोळी किंचित तिरकी होत असे त्यामुळं लांब पल्ल्यावर निशाणा साधता येत नसे.
१८५२ मध्ये इंग्लडच्या Master General of Ordnance असलेल्या Viscount Hardinge ने सगळ्या बंदुका तयार करणाऱ्या ब्रिटिश कंपन्यांना नवीन रायफलसाठी design तयार करायचे आदेश दिले. यानुसार Westley Richards, Greener, Wilkinson, Presley & Lancaster या दिग्गज कंपन्यांनी आपली आपली design पाठवून दिली. यांतच या सगळ्यांच्या मानाने अगदी लहान आणि सरकारी कंपनी असणाऱ्या Royal small arms factory ने ही एनफिल्ड नावाची एक रायफल पाठवलेली होती. ही रायफल इतरांच्या मानाने छोट्या bore ची म्हणजे 0.530 bore ची होती. त्याकाळी अशी समजूत होती की bore जेवढा मोठा तेवढी त्या गोळीने होणारी जखम अधिक घातक. पण एनफिल्डच्या रायफलने हा समज खोटा ठरवला.

एनफिल्डमधून निघालेली गोळी ८०० यार्डापर्यंत अचूक निशाणा साधत असे आणि १२५० यार्डापर्यंत तिचा मारा पोचत असे. निशाणा साधण्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारची sight उपलब्ध होत्या. एक सामान्य रायफल पलटणीतल्या सैनिकांसाठी आणि दुसरी निशाणबाज म्हणजे marksmen सैनिकांसाठी. शिवाय जुन्या रायफलींपेक्षा हिचे वजन कमी होते आणि Muzzle-loading ला लागणारा वेळही कमी होता. यांतही paper cartridge च वापरले जाई आणि त्यांवर चरबीचा पातळ थर दिलेला असे.

सर्वच प्रकारच्या तपासण्यात एनफिल्ड रायफल इतरांहून उजवी निघाली आणि ताबडतोब Enfield कंपनीला २८००० रायफलींची ऑर्डर मिळाली. या रायफलींचा वापर करण्याचा प्रसंगही ब्रिटिशांवर लगेचच आला. १८५३ मध्ये Crimea war सुरू झाले जिथं फ्रेंच, ब्रिटिश आणि तुर्क एकत्रितपणे रशियाविरुद्ध लढत होते. सुरुवातीला ब्रिटिश Minie रायफल घेऊन लढत होते पण युद्ध मध्यात पोहोचेतो ब्रिटिश सैनिकांच्या हातात एनफिल्ड आल्या आणि त्यानंतर ब्रिटिश सैनिकांनी रशियाविरुद्ध निर्णायक आघाडी घेतली. यानंतर एनफिल्डची मागणी वाढतच गेली.
आता आपण परत भारतात येऊया. भारतात कंपनीच्या सैन्यात सुमारे ४०,००० ब्रिटिश सैनिक आणि सुमारे २,५०,००० भारतीय सैनिक होते. इंग्लडमधून भारतातही एनफिल्ड रायफल दाखल झाल्या. यासाठीची paper catridge भारतातच तयार केली जाणार होती. कलकत्ता हे कंपनीचे मुख्यालय असल्यानं या रायफल कलकत्त्याजवळच्या डमडम इथल्या शस्त्रागारात ठेवल्या गेल्या. जानेवारी १८५७ मध्ये डमडम शस्त्रागारात एका उच्चवर्णीय शिपायाने चरबी लावलेले काडतूस चावल्याने आपला धर्म भ्रष्ट झाल्याची आवई उठवली. प्रत्यक्षात डमडममध्ये अजूनही या काडतुसांची निर्मिती सुरू व्हायची होती आणि भारतात तर अजून एनफिल्डचा वापर सुरूही झालेला नव्हता किंबहुना तिच्या तपासणीसाठीसुद्धा अजून त्यातून एकही गोळी उडवून पाहिली गेली नव्हती. २७ जानेवारीला कंपनी सरकारचा military secretory कर्नल बर्चने घोषणा केली की शस्त्रागारातून निघालेली सर्व काडतुसे चरबी न लावलेली असतील शिपायांनी आपल्या इच्छेनुसार चरबी लावावी. पण याचा परिणाम उलट झाला, शिपायांना खात्रीच पटली की पूर्वीच्या काडतुसांना चरबी लावलेलीच असली पाहिजे.
२९ मार्च १८५७ ला कलकत्त्याजवळ बराकपूर छावणीत मंगल पांडेने लेफ्टनंट बॉघवर पहिली गोळी झाडली पण ती त्याला न लागता त्याच्या घोड्याला लागली. २४ एप्रिलला बंडाची आग मीरतला पोचली आणि मग लौकरच दिल्ली, कानपूरपर्यंत पोचले. या सगळ्या घटनाक्रमाविषयी माहिती देताना Lahore to Lucknow : Indian Mutiny Journal या पुस्तकात लेफ्टनंट लँग म्हणतो काडतुसांच्या घोटाळ्यामुळे या सगळ्या शिपायांच्या हातात अजूनही एनफिल्ड रायफल आलेल्या नव्हत्या ते अजूनही जुन्या smoothbore musketsच वापरत होते. इंग्रज सैनिकांनी आणि अधिकाऱ्यांनी मात्र आता एनफिल्ड वापरायला सुरुवात केली होती. सुरुवातीच्या पीछेहाटीनंतर इंग्लिश फौजेने आता प्रतिहल्ले करायला सुरुवात केली. लेफ्टनंट लँग मुझफ्फरनगर जवळच्या जलालाबाद किल्ल्यावर असताना बंडवाल्या शिपायांनी किल्ल्यावर हल्ला केला. त्यावेळचे
वर्णन करताना लँग म्हणतो इन्फट्रीची एक तुकडी शिड्या घेऊन तटावर धावून आली पण आमच्या माऱ्यापुढे त्यांचा निभाव लागेना. एनफिल्डमधून केलेला हा मारा इतका प्रभावी होता की अनेकदा एकेका गोळीत दोन शिपाई ठार होत होते. बंडवाल्या शिपायांना मात्र smoothbore muskets आणि minie मधून आमच्यावर मारा करणं अवघड जात होतं. त्यांना नक्कीच या रायफल नाकारल्याचे दुःख होत असावे. लखनौजवळच्या सिकंदरबागेतही अशीच तुंबळ लढाई होऊन एनफिल्डमुळंच इंग्रजांची सरशी झाली.

अर्थात या सर्व बंडाचे कारण फक्त ही काडतुसेच होती असं मानणंही चुकीचंच ! पण इंग्लडमधल्या Woolwich मध्ये बसून ही काडतुसं कशी असावीत याचा विचार करणाऱ्याला हजारो मैलांवर भारतात यामुळं किती गोंधळ होईल याची कल्पना तरी कशी यावी ! गाईच्या किंवा डुकराच्या चरबीचा थर हा केवळ तो स्वस्त आहे आणि सहज उपलब्ध आहे म्हणूनच वापरलेला होता. Thorburn नावाचा ब्रिटिश अधिकारी म्हणतो जर शिपायांच्या हातात एनफिल्ड रायफली असत्या तर हे बंड रोखणे अतिशय अवघड झाले असते. अखेर १८५९ पासून काडतुसांवर चरबीच्याऐवजी मेणाचा वापर केला जाऊ लागला. अर्थात त्याच्यासाठी दिलेलं कारण होतं चरबीमुळे काडतुसांवर परिणाम होतो.
एनफिल्डची निर्मिती आणि सुधारणा पुढं बराच काळ सुरू राहिली. एनफिल्ड रायफल हा इंग्लडच्या लष्करी इतिहासातला असा घटक आहे ज्याने इंग्लिश साम्राज्य सर्वदूर पसरवण्यात मोलाची कामगिरी केली. खुद्द राणी व्हिक्टोरियालाही एनफिल्डमधून निशाणेबाजी करून बघण्याचा मोह आवरला नाही.
एनफिल्डच्या शोधामुळे फक्त इंग्लडचा लष्करी फायदा झाला काय ? तर नाही तर त्यातून काही इतर गोष्टीही साध्य झाल्या. युद्धात सैन्याइतकेच महत्वाचे कार्य वैद्यकीय सेवा देणाऱ्या तुकड्याही करत असतात. Smoothbore musket आणि एनफिल्ड रायफल यांमुळे होणाऱ्या जखमा यांच्यात बराच फरक असे. एनफिल्डच्या गोळीने होणाऱ्या जखमा या जास्त घातक असत. हाडांवर गोळी आदळली असता हाड मोडत असे, musket च्या जखमा खोलवर असत पण त्यामुळे हाडांना दुखापत होत नसे. युद्धभूमीवर किंवा लष्करी रुग्णालयात या दुखापतींवर उपचार करतानाच आपण आज वेगवेगळ्या हाडांवर ज्या प्रकारची प्लॅस्टर घालतो त्यांची सुरुवात झाली किंवा त्याच्या पद्धतीत सुधारणा झाली.
आपण आज म्हणतो जगभर वेगवेगळ्या युद्धांमुळे प्रचंड हानी झाली. पण यांतून अनेक फायदेही झाले. औद्योगिक विकासात युद्धांचा वाटा फार मोठा आहे. आपण आधी एनफिल्डचंच उदाहरण घेऊया. इंग्लंडमध्ये पूर्वी बंदुकीची निर्मिती वेगवेगळे भाग हाताने जोडून करत. अनेक छोटे-मोठे उत्पादक वेगवेगळे भाग तयार करत आणि नंतर ते एकत्रित करून जोडले जात. अनेकदा उत्पादकांच्या अडचणी जसे की कामगारांची कमतरता, संप यांमुळे उत्पादनावर परिणाम होत असे. पण एनफिल्ड पूर्णतः एकाच ठिकाणी तयार होत असे. १८५३ साली एनफिल्डचे उत्पादन सुरू झाल्यावर तिचे ६३ हिस्से जोडून रायफल करण्यासाठी ७१९ machine operations होती जी करण्यासाठी ६८० प्रकारची लहानमोठी यंत्रे लागत. ही सर्व यंत्रे अमेरिकेतून मागवली गेली. सुरुवातीच्या काळात मागणी पूर्ण करण्यासाठी आठवड्याला १२०० रायफल्स तयार केल्या जात.
जलद उत्पादनाच्या या तंत्राला तेंव्हा american methodology असे म्हटले जाई. अमेरिकेत Civil war च्या दरम्यान उत्पादन वाढवण्यासाठी जे अनेक प्रयोग झाले त्यातूनच हे तंत्र निर्माण झाले. युद्ध संपल्यावर हीच पद्धत वापरून अनेक गोष्टींचं उत्पादन सुरू झालं. Isaac Singer ने युद्धकाळानंतर Singer शिवणयंत्रे बनवून संपूर्ण बाजारपेठ काबीज केली. अमेरिकन घड्याळ कंपन्यांनी उत्पादनात इंग्लड आणि स्वित्झर्लंडला मागे टाकले. सगळ्यात कमाल म्हणजे Remington कंपनीने तर civil war संपल्यावर बंदुकीची मागणी घटल्यावर टाईपरायटर तयार करून आपल्या कंपनीची ढासळणारी आर्थिक स्थिती सुधारली.
या सगळ्याचं तात्पर्य सांगायचं झालं तर युद्धस्य कथा रम्या असं आपण म्हणतो पण रणांगणाच्या मागेही तेवढ्याच रोमांचक गोष्टी लपलेल्या असतात.

एनफिल्ड रायफलमधे काडतूस भरणे व ते Fire करणे हे दाखवणारे हे दोन व्हिडिओ
lekh apratim
LikeLike
Awesome
LikeLike
अप्रतिम लेख
Sent from my iPhone
>
LikeLike
अफलातून लेख!योग्य मांडणी आणि अचूक शब्द नसते तर हेच details कंटाळवाणे आणि किचकट वाटले असते.पण हा लेख अत्यंत माहितीपूर्ण आणि तितकाच रोचक झालाय,याबद्दल लेखकाचे मनापासून कौतुक!😊
LikeLiked by 1 person
धन्यवाद
LikeLike
छान माहीती दिलीय…
LikeLiked by 1 person
Nice and new information…changed the perspective
LikeLiked by 1 person