फेब्रुवारी महिना आला की प्रेमवीरांच्या अंगात भलताच उत्साह संचारलेला असतोय, त्यात आणि दुसरा आठवडा आला की बोलायची सोयच नाही. आज हा दिवस, उद्या तो दिवस करत करत शेवटी गाडं प्रेमाच्या दिवसापर्यंत जाऊन पोचतंय. त्यातला एक दिवस असतोय तो टेडीचा !
गेल्या काही वर्षात भारतात या टेडीचं एवढं पिक आलेलं आहे की घरातल्या लहान पोराकडं (पक्षी पोरीकडंही) टेडी नसेल तर तो ‘फाऊल’ मानला जातो. याला हातभार लावायचं महान कार्य आमच्या सिनेमांनीही पार पाडलेलं आहे. धगोरडी झालेली नायिका लाडिकपणे तिच्या चाळीशीतल्या जवान प्रियकराने दिलेल्या किच्च गुलाबी रंगाच्या टेडीला घट्ट मिठी मारून विरहाने विव्हल झालेली तुम्ही अनेकदा बघितलेलीच असेल. पण या टेडीची सुरुवात कशी झाली याबद्दल तुम्हाला अंदाजही करता येणार नाही.
१९०२ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट मिसिसिपीला अस्वलाच्या शिकारीसाठी गेले. Holt Collier नावाचा एक निष्णात शिकाऱ्याकडे शिकारीची सर्व जबाबदारी देण्यात आली. शिकारीचा दिवस उजाडला आणि Collier ने आपले साथीदार व शिकारी कुत्र्यांच्या मदतीने एका जंगी अस्वलाचा माग काढून त्याचा पाठलाग करत त्याला बरोब्बर रुझवेल्ट बसलेल्या ठिकाणी आणलं. पण नेमके त्याचवेळेला रुझवेल्टसाहेब जेवण्यासाठी निघून गेलेले होते. Collier ची आता पंचाईत झाली, राष्ट्राध्यक्षांसाठी शोधून काढलेल्या या ‘स्पेशल’ अस्वलाची शिकार स्वतः करायचीही पंचाईत आणि सोडून द्यावं तरीही पंचाईत. नेमकं त्याचवेळेला खवळलेल्या अस्वलाने एका शिकारी कुत्र्यावर हल्ला केला आणि कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात Collier नं अस्वलाला गोळी घालून जखमी केलं आणि एका झाडाला बांधून ठेवलं.
यथावकाश रुझवेल्टसाहेब जेवून परत आले आणि त्यांना Collier चा हा पराक्रम समजला. Collier ने त्यांना या बांधून ठेवलेल्या जखमी अस्वलाची शिकार करण्याची विनंती केली पण रुझवेल्टने अशी आयती शिकार करायला नकार दिला.

या घटनेला अमेरिकेत मोठीच प्रसिद्धी मिळाली आणि १९०२ सालच्या नोव्हेंबर महिन्यात वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकात Clifford Berryman नावाच्या एका व्यंगचित्रकाराने रुझवेल्ट आणि अस्वल यावर एक मालिकाच केली. सुरुवातीला त्याने चित्रात रुझवेल्ट आणि झाडाला बांधलेलं मोठं अस्वल दाखवलेलं होतं पण हळूहळू अस्वलाचा आकार कमी करत करत त्याने एक छोटंसं आणि गोंडस दिसणारं अस्वलाचं पिल्लू दाखवायला सुरुवात केली.

यावरून प्रेरणा घेऊन ब्रुकलीनच्या Morris आणि Rose Michtom या खेळण्याच्या व्यापाऱ्यांनी एक खेळातले अस्वल तयार केले. हे खेळण्यातले अस्वल खरोखरच्या अस्वलासारखे हिंस्त्र न दिसता गोंडस दिसणारे लहानसे पिल्लू होते. हे अस्वल लौकरच फार लोकप्रिय झाले, स्त्रिया आणि लहान मुलांना तर ते अतिशय आवडले. आणि या अस्वलाचे नाव ठेवण्यात आले टेडी बीअर, टेडी हे नाव रुझवेल्टच्या नावावरुन म्हणजे थिओडोरवरून घेण्यात आलेले होते.
टेडीच्या या खेळण्याने अमेरिकेची बाजारपेठ वेगाने काबीज केली, यथातथाच चालणारा Morris आणि Rose Michtom यांचा व्यवसाय टेडीने सावरला. त्यांनी पुढं Ideal Novelty and Toy Company ची स्थापना केली जी आजही सुरू आहे.
योगायोगाने Margarete Steiff नावाच्या एका जर्मन बाईंनीही याच सुमारास खेळण्यातल्या अस्वलांचे उत्पादन सुरू केले आणि लौकरच हे अस्वल युरोपभर प्रसिद्ध झाले. तिने या खेळण्याला Steiff Bear हे नाव दिले. Steiff आणि Teddy मधला फरक म्हणजे Steiff च्या डाव्या कानावर एक बटण असते. Steiff bear हे महागडे असतात आणि त्यांच्या जुन्या मॉडेल्सना आजही जगभरातल्या संग्राहकांकडून मोठी मागणी असते.
एवढा सगळा इतिहास समजूनही प्रेमिकांनी एकमेकांना टेडी देण्याच्या महान परंपरेचा उगम कुठून झाला याबाबत मात्र अजूनही मुग्धताच आहे.
Apratim mahiti…hyacha koni vicharhi nasel kela
LikeLiked by 1 person
Thanks shilpa
LikeLike
टेडी बद्दल आधी माहीती मला त्रोटक होती.याशोधन…या लेखामुळे जादा माहीती मिळाली.लेख खूपच छान झालाय.
LikeLiked by 1 person
धन्यवाद
LikeLike
टेडी बद्दल आधी माहीती मला त्रोटक होती.यशोधन…या लेखामुळे जादा माहीती मिळाली.लेख खूपच छान झालाय.
LikeLike