वुई, द पीपल म्हणजे बरं काय जरा हौशीच! त्यात आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात कर्फ्यू हा प्रकार बहुदा पहिल्यांदाच आला. त्यामुळं त्याचा ‘याची देही याची डोळा’ अनुभव घेण्याचा प्रयत्नही अनेकांनी केला. पण काहीजणांच्या बाबतीत हा अनुभव फारच वेदनादायक ठरला हे कालच्याच दिवसात बघायला मिळालेल्या व्हिडीओवरून लक्षात आलं.
इसवीसनाच्या ९व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लडच्या दक्षिणेकडच्या म्हणजेच तेंव्हाच्या वेसेक्स भागात अँग्लो-सॅक्सन वंशाचा आल्फ्रेड(द ग्रेट) हा राजा राज्य करत होता. तेंव्हा सुरू असलेल्या व्हायकिंग राजांविरुद्धच्या युद्धांच्या धामधुमीतसुद्धा वयाने अगदी तरुण असलेला हा राजा नवीन कायदे बनवणे, शिक्षणाला उत्तेजन देणे अशा गोष्टीत जातीनं लक्ष घालत असे.
त्याकाळात इंग्लंडमधली घरं लाकडी असत आणि त्यांना आग लागण्याचे प्रकार वारंवार घडत. आग विझवण्याच्या आजच्यासारख्या सोयी नसल्याने एकंदरीतच भरपूर नुकसान होत असे. यांवर उपाय म्हणून या राजेसाहेबांनी एक नवीनच कायदा तयार करून तो अमलात आणायचं ठरवलं. या नवीन कायद्यानुसार रोज रात्री आठ वाजता एक घंटा वाजवली जाई आणि त्यानंतर तमाम जनता घरात पेटवलेल्या आगीतले मोठे ओंडके बाजूला करून ते विझवत असे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आग पेटवण्यासाठी थोडे निखारे राखेखाली सांभाळून ठेवत असे. हा केला जाणारा घंटानाद घरात उजेडासाठी पेटवलेले सगळे दिवे विझवून झोपण्याचा जनतेला दिलेला इशारासुदधा असे. या घंटानादानंतर घराबाहेर पडण्याची परवानगी जनतेला नसे.

या कायद्यामुळे आगीचे प्रमाण काहीसे आटोक्यात आले आणि याचा दुसरा फायदा असाही झाला की रात्री-अपरात्री भेटून रचले जाणारे कट आणि होणाऱ्या उठावांना आळा बसला.
आता या सगळ्या प्रकाराला cover the fire असं नाव सर्वसामान्य लोकांनी दिलं. तेंव्हाच्या इंग्रजी भाषेवर फ्रेंचांचा मोठा प्रभाव होता cover the fire साठीचा फ्रेंच शब्द आहे carre-feu किंवा cerre-feu, हाच शब्द नंतर couvre-feu असाही लिहिला जाऊ लागला.ही फ्रेंच मंडळी फक्त शब्द तयार करून शांत बसली नाहीत तर त्यांनी आगीवर झाकून ठेवायचं एक स्पेशल भगुणंही तयार केलं आणि त्यालासुद्धा cauvre-feu हेच नाव दिलं.

पुढं हा कायदा नाहीसा झाला आणि इंग्रजी भाषेत होत गेलेल्या सुधारणेतून cauvre-few तून curfew हा इंग्रजी शब्द तयार झाला. हा शब्द एकत्र येण्यास प्रतिबंध किंवा घराबाहेर पडण्यास प्रतिबंध या अर्थाने वापरला जाऊ लागला. इंग्लडच्या कायद्यातही या शब्दाने स्थान पटकावले. जिथं जिथं इंग्रज गेले तिथं हा शब्द रूढ झाला. (कारण सगळीकडंच त्यांच्याविरुद्ध होणारे उठाव आणि केली जाणारी निदर्शनं दडपण्यासाठी त्यांनी हाच कायदा वापरला)
आपण भारतीय लोकांनी असा कुठला शब्द तयार केला नसेल पण असाच एक कायदा ब्रिटिश येण्याच्या फार आधीपासून जवळपास भारतभर सगळ्या मोठ्या शहरात होता. रात्री ठराविक वेळी एक इशाऱ्याची तोफ होई आणि या तोफेनंतर घरातून बाहेर निघायला बंदी असे आणि पहाटेच्या वेळी दुसरी तोफ झाल्यावर पुन्हा घरातून बाहेर पडता येई. ही चाल पेशव्यांच्याकाळात पुण्यातही पाळली जाई, तोफेनंतर बाहेर फिरताना आढळलेल्या इसमास पकडून तुरुंगात टाकलं जाई आणि नंतर खटला चालून त्याला सरकारात काही दंड भरायला लागत असे. काही विशेष प्रसंगी जसे की घरी मयत झाले असता किंवा सुईणीला किंवा वैद्याला आणायला निघालेला गृहस्थ अशांना यांतून सुट देण्यात येई.
Nice information…can you please tell us more about the curfew in India pre-British era??
LikeLike
खुप छान माहिती. धन्यवाद
LikeLiked by 1 person