चुकली दिशा तरीही – भाग २

कुठल्याही शास्त्रामधे काही नवीन घडण्याची प्रक्रिया कधीच थांबत नाही. टॉलेमीआणि असंख्य अज्ञात संशोकांनी केलेल्या कामानंतर Cartographyच्या संशोधनाची गती काहीशी कमी झाली. Dark Age च्या कालखंडात नकाशाशास्त्रामधे काहीच काम झाले असे झाले नाही. पण जे काही काम झाले त्यावर धर्माचा जबरदस्त पगडा होता. बरेचसे नकाशे हे धार्मिक ग्रंथांमधे असलेल्या वर्णनांवरून काढले गेले. धर्माविरूध्द जाण्याची मोठी दशहत त्याकाळी समाजामधे होती.

Isidorus Hispalensis

पण या काळातल्या Cartography बद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला पुन्हा थोडं मागे जावं लागेल. स्पेनमधल्या सेव्हिल या शहरात सहाव्या शतकात एका तल्लख बुध्दी असलेल्या माणसाचा जन्म झाला. त्याला ’प्राचीन कालखंडातला शेवटचा हुशार माणूस’ असं संबोधल जातं. त्याचं नाव होतं Isidorus Hispalensis. तो ’सेव्हिलचा इसिडोर’ या नावाने ओळखला जातो. इ.स. ५६० साली त्याचा जन्म झाला आणि इ.स. ६३६ साली तो मेला. आपल्या ७५ वर्षाच्या या कालखंडात त्याने केलेले महत्वाचे काम म्हणजे त्याने २० खंडात लिहिलेला ’Etymologiae’ हा कोश होय. Dark Age च्या काळात नकाशाच्या तंत्रात फारशी भर पडली नसली तरी या विषयातलं लोकांचं आकर्षण कमी झालं नव्हतं. ’Etymologiae’ मधे केलेल्या वर्णनांवरून या Dark Age मधे नकाशे काढले गेले. या नकाशांना T-O नकाशे असं म्हटलं गेलं.

काय होते हे T-O नकाशे? यातला O हे अक्षर पृथ्वीची सीमारेषा दाखवते. पृथ्वी चपटी आहे आणि ती तीन खंडांमधे विभागली आहे असे या नकाशात दाखवले आहे. पृथ्वी तीन भागात विभागण्यासाठी इंग्रजी T सारख्या रेषांचा उपयोग केला गेला आहे. हे तीन विभाग म्हणजे युरोप, अफ्रिका आणि आशिया. आशिया हा मोठा आणि युरोप आणि अफ्रिका हे दोन छोटे असे विभाग या नकाशांमधे पाडले गेले. यातली T या अक्षराची वरची आडवी रेघ ही नाईल ते रशियातील डॉन नदीवरून जाते तर उभी रेघ भुमध्य सागरापासून खाली जाते. जेरुसलेम हे या नकाशाच्या मध्यभागी दाखवलेले आहे. सगळ्यात गंमतीची गोष्ट म्हणजे पूर्व ही दिशा वरच्या बाजूस आही. पुर्वेकडून सुर्य उगवतो आणि आशिया खंड हा पुर्वेकडे असल्याने या नकाशांमधे आशिया खंड वरती दाखवलेला आहे. या प्रकारच्या नकाशांच्या अनेक आवृत्त्या या कालखंडात बनवल्या गेल्या आणि त्यात बायबल मधे उल्लेख असलेल्या अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या. या काळातले हे सगळे नकाशे हे T-O प्रकारच्या नकाशांच्या आवृत्त्या होत्या.

Hereford Mappa Mundi

या कालखंडात Mappa Mundi या नावाने युरोपमधे या प्रकारच्या नकाशांमधली १२ व्या शतकातली आवृत्ती ही इंग्लंडमधील हिअरफोर्ड येथील चर्चमधे जतन करून ठेवण्यात आलेली आहे. Hereford Mappa Mundi या नावाने प्रसिध्द असलेला हा नकाशा कातड्यावर काढण्यात आलेला असून १.६५ मी X १.३५ मी या आकाराचा आहे. या नकाशाचा व्यास हा ४.३२ फ़ूटाचा आहे. त्यावरून त्याचा परिघ साधारणत: १३.५७२ फूट येवढा निघतो. हे सगळे नकाशे जुन्या ग्रंथांमधे असलेल्या वर्णनांवरून केले गेले होते. फक्त यात भर पडली ती वेगवेगळ्या गावांच्या नावांची. त्याचबरोबर व्यापारी मार्ग, वेगवेगळ्या भागांची स्थानिक वैशिष्ठे, त्या भागात वाहणार्‍या नद्या अशी बरीच माहिती नोंदवलेली असे.

Catalan Atlas

Mappa Mundi मधला इ.स. १३७५ मधे काढला गेलेला Catalan Atlas या नावाने ओळखला जाणारा एक नकाशा फ्रान्समधील रॉयल लायब्ररीमधे जतन केला आहे. १५८१ साली Heinrich Bünting या जर्मन संशोधकाने काढलेला Mappa Mundi हा इतर नकाशांपेक्षा वेगळा होता. या नकाशाला Bunting lover Leaf Map असे म्हणले जाते. या नकाशात तीन खंड हे पानाच्या आकारात दाखवले होते.

Bunting lover Leaf Map

पूर्वी उल्लेख आल्याप्रमाणे अरबी सरदारांनी या नकाशावरची अनेक पुस्तके त्यांच्या संग्रहात जतन केली होती. १२ व्या शतकात अरब भूगोल अभ्यासक अल इद्रिसी हा सिसिलीचा राजा रॉजर (दुसरा) याच्या दरबारी आला होता. तेथे त्याने राजाच्या आज्ञेवरून Tabula Rogeriana हा पृथ्वीचा नकाशा तयार केला. त्या नकाशावर त्याने अनेक बारीक सारीक नोंदी केलेल्या आहेत. हा नकाशा त्या काळातला अद्यावत माहिती असलेला नकाशा होता. या नकाशाचे सगळयात मोठे वैशिष्ठ्य म्हणजे या नकाशात दक्षिण दिशा वरती दाखवली होती म्हणजे आपण सध्या जे नकाशे पाहतो त्याच्या बरोबर उलटा असलेला हा नकाशा होता.

Tabula Rogeriana

१३ व्या शतकाच्या अखेरीस युरोपमधे समुद्रात फिरणार्‍या नाविकांसाठी काही तक्ते केले गेले. या तक्त्यांना Portolano Charts असे म्हणतात. प्रारंभीचे तक्ते हे भुमध्य समुद्राच्या भागातले होते. समुद्रात फिरणार्‍या बोटींवर हे तक्ते ठेवलेले असत. या तक्त्यांमधली माहिती अचुक असे. यात मुख्यत: बोटी हाकारण्यासाठी रेषांनी दिशा दाखवलेल्या असत. या तक्त्यांमधे अक्षांश व रेखांश दाखवलेले नसत. एखादे ठिकाण हे होकायंत्रावर असलेल्या खुणांनी दाखवलेले असे व उत्तर दिशा ही वरती दाखवलेली असे. यावरून नाविकांना जायच्या ठिकाणची दिशा कळत असे. याचबरोबर या नकाशांमधे अंतर आणि नावाड्यांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वार्‍याची दिशा दिलेली असत आणि या तक्त्यांमधे विविध किनारे व किनार्‍यावरची बंदरे यांची नोंद केलेली असे. यातले फारसे तक्ते आता उपलब्ध नाहीत. तसेच हे तक्ते कोणी काढले याबद्दलचीही अतिशय त्रोटक माहिती उपलब्ध आहे.

Portolano Chart

यातला Carte Pisaane नावाचा १३व्या शतकाच्या अखेरीस काढला गेलेला तक्ता पॅरीसमधे आजही जतन करून ठेवला आहे.

Carte Pisaane

१५ वे शतक हे नकाशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे शतक समजले जाते. या शतकात एक महत्वाची घटना घडली ते म्हणजे नकाशाशास्त्रात काम करणारे संशोधक हे पुन्हा टॉलेमीने केलेल्या कामाकडे वळले. टॉलेमीने लिहिलेला मुळ ग्रंथ उपलब्ध नसला तरी त्याच्या काही प्रती युरोपभर विखुरलेल्या होत्या. या ग्रंथाचे मुख्यत: दोन भाग उपलब्ध होते आणि त्यात जवळ जवळ ९१ नकाशे होते. या सगळ्या नकाशांचा अभ्यास करून जर्मनीत एक नकाशा छापण्यात आला. यात अक्षांश रेखांश दाखवलेले होते. अर्थात हा नकाशा अचुक नव्हता. पण या टॉलेमीच्या संशोधनाच्या पुनर्लोकनामुळे पुढील दिशा मिळाली. १५ व्या शतकात कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला व त्यानंतर युरोपमधून अशा मोहिमांची सुरुवात मोठ्या प्रमाणात झाली. या सगळ्या मोहिमांमधे नवनवे प्रदेश उजेडात तर आलेच पण नकाशे अधिकाधिक अचुक बनण्यास मदत झाली.

या सागरी मोहिमांवरील नाविकांनी नकाशाच्या वाटचालीत मोठी भर घातलेली आहे. यात बर्नल डिआझ (Bernal Diaz) याची १४८७ सालची आफ्रिका मोहिम, १४९३ सालची कोलंबसची मोहिम, १४९८ सालची वास्को-द-गामाची मोहिम, १५०० साली कॅब्रल (Cabral) याने लावलेला ब्राझिलचा शोध, १५११ साली अल्फान्सो द अल्बुकर्क (Alfonso d’Albuquerque) याची मलाक्काची मोहिम अशा युरोपातून झालेल्या मोहिमांमुळे त्या त्या भूभागाची प्रत्यक्ष दर्शनी माहितीमुळे नकाशे आणखी अद्यावत झाले. या मोहिमा करताना या नाविकांच्या हातात होते Portolano Charts. त्यावरून या नाविकांनी या मोहिमा काढल्या. काही यशस्वी झाल्या तर काही फसल्या. पण त्यांनी प्रत्यक्ष बघितलेल्या गोष्टींच्या नोंदीचे नकाशाच्या प्रगतीमधे मोठे योगदान आहे.

Cantino Planisphere

१५०२ साली एका अनामिक पोर्तुगीज माणसाने काढलेला एक नकाशा अल्बर्तो कॅन्टिनो याने इटलीमधे आणला. हा नकाशा कोणी आणि कधी काढला गेला याबद्दलची फारशी माहिती उपलब्ध नाही. Cantino Planisphere या नावानी ओळखल्या जाणार्‍या या नकाशात अंक्षांश (Latitude म्हणजेच नकाशांवरील आडव्या रेषा) दाखवल्या गेल्या आहेत. या नकाशात पोर्तुगीज खलाशांनी शोधलेले वेगवेगळे प्रदेश दाखवले आहेत. या नकाशात युरोप, अफ्रिका, ब्राझिलची किनारपट्टी तसेच अरबी समुद्र भारत दाखवले गेले आहेत. त्याकाळात खलाशांच्या दृष्टीने वाहणार्‍या वार्‍याच्या दिशांचे मोठे महत्व होते या नकाशाचे सगळ्यात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यात वाहणार्‍या वार्‍यांच्या दिशा दाखवणार्‍या खुणा केलेल्या आहेत. यानंतर दोनच वर्षात म्हणजे १५०४ साली पेद्रो रिनेल याने खलाशांसाठी नाविक नकाशा बनवला. यात पहिल्यांदा उत्तर अमेरिकेचा किनारा दाखवलेला आहे. १५०७ साली जर्मन नकाशा अभ्यासक Martin Waldseemuller याने पहिल्यांदा अमेरिका या शब्दाचा वापर केला. १५०६ साली Giovanni Matteo Contarini या संशोधकाने पहिल्यांदा अधुनिक जगाचा पहिला नकाशा बनवला. या नकाशाचे दोन भाग होते. हे दोन भाग जोडले की संपुर्ण ३६० अंशाचा गोलाकार नकाशा बनत असे.

Contarini चा नकाशा

१५०७ साली Waldseemuller यानेही असा नकाशा बनवला होता. पण या दोन्ही नकाशांच्या फक्त मुळ प्रती उपलब्ध आहेत. १५०७ साली रोम मधे प्रकाशित झालेला Ruysh Map हा पण असाच नकाशा होता. हा नकाशा काढला होता Johannes Ruysch या भटक्या भूगोल संशोधकाने. या सगळ्या नकाशांवर टॉलेमीच्या नकाशाची छाप स्पष्ट दिसते.

Ruysh Map

नकाशामधे इतर दिशा समजण्यासाठी नेहेमी उत्तर दिशा दाखवली जाते. उत्तर दिशाच का दाखवली जाते? या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे. या विषयी अनेक मतांतर सापडतात. प्राचीन काळी प्रवासी हे रात्री दिसणार्‍या तार्‍यांवरून दिशा ठरवून प्रवास करत असत. त्यातला उत्तर दिशेला असणारा ध्रुवतारा हा तर प्रवाश्यांचा मित्रच. ध्रुवतारा हा उत्तर दिशा दाखवतो म्हणुन उत्तर दिशा नकाशात दाखवली जाते असा एक विचार आहे. चीनमधे लागलेल्या होकायंत्राचा शोध हा युरोपात पोहोचला. होकायंत्राची सुई ही नेहेमी दक्षिणोत्तर राहते. त्यामुळे उत्तर दिशा दाखवतात. अशीही एक संकल्पना आहे. पृथ्वीवरचा बराचसा भूभाग हा पृथ्वीच्या उत्तर खंडात आहे त्यामुळे उत्तर दिशा दाखवली जाते असेही सांगितले जाते. कारण काहीही असो उत्तर दिशेवरून अनेक वादंगही निर्माण झाले. काय ते पुढे बघूच. १५३० साली अलोन्झो द सान्ता क्रुज या नकाशा अभ्यासकाने पहिल्यांदा नकाशात उत्तर दिशा दाखवली.

व्हेरोना शहराचा नकाशा

साधारणत: १५ व्या शतकापासून युरोपमधे एखाद्या भूभागाचे सर्वेक्षण करून त्या भागातील सर्व बारीकसारीक गोष्टींचा समावेश असलेले सर्वेक्षण नकाशे (Survey Maps) काढणे सुरु झाले. यातला सर्वात जुना नकाशा हा १४४० साली काढलेला इटलीमधील व्हेरोना या शहराचा आहे. ह्या नकाशानंतर १४६० साली व्हेनिसमधून इतर सर्व १० प्रांतांच्या प्रांतअधिकार्‍यांना त्यांच्या अधिकाराखाली असलेल्या भूभागांचे असे नकाशे बनवण्याचा आदेश देण्यात आला.

Mercator Projection Map 1569

१६ व्या शतकातला महत्वाचा नकाशा संशोधक Gerardus Mercator याचा जन्म १५१२ साली बेल्जियममधे झाला. Mercator हा भूगोलाबरोबरच, गणित, इतिहास, तत्वज्ञान याचाही अभ्यासक होता. त्याचे महत्वाचे काम म्हणजे त्याने १५६९ साली बनवलेला पृथ्वीचा नकाशा. Mercator Projection Map 1569 या नावाने हा नकाशा ओळखला जातो. या नकाशात त्याने अनेक बारीकसारीक नोंदी केलेल्या आहेत. नकाशावरती १५ सुचींमधे वर्णनात्मक ५ हजार शब्द आहेत. त्याने केलेले आणखी एक महत्वाचे काम म्हणजे त्याने स्थानिक भूभागांचे १०० तपशिलवार नकाशे बनवले. आटोपशीर आकारात काढलेल्या या नकाशांचा अ‍ॅटलास बनवला. जगात पहिल्यांदा नकाशांच्या पुस्तकाला अ‍ॅटलास असे संबोधले गेले. Marcetor चा मुख्य धंदा होता तो म्हणजे अभ्यासकांसाठी पृथ्वीचे गोल बनवणे. त्याकाळी हे पृथ्वीचे गोल मोठ्या प्रमाणात विकले गेले. आजही यातले अनेक गोल अस्तित्वात आहेत.

Theatrum Orbis Terrarum मधील जगाचा नकाशा

नेदरलॅंडमधे जन्मलेला Abraham Ortelius या नकाशा संशोधकाने Theatrum Orbis Terrarum या नावाचा एक अ‍ॅटलास १५७० साली प्रकाशित केला. या अ‍ॅटलासमधे ७० नकाशे होते. या अ‍ॅटलासचं वैशिष्ठ्य म्हणजे Terra Australis म्हणजेच पृथ्वीच्या दक्षीण गोलार्धातल्या जमिनीची नोंद केली गेली. या नकाशामधे न्यु गिनिया पर्यंतच्या दक्षीण गोलार्धातल्या या देशाची नोंद केलेली आढळते. पण Ortelius चं सगळ्यात महत्वाच काम म्हणजे त्याने पहिल्यांदा Continental Drift ची संकल्पना मांडली. याच काळात Emery Molyneux नावाचा ब्रिटिश गणिती होवून गेला. खरतर त्याचा मुळ धंदा होता भूमितीला लागणारी वेगवेगळी साधने बनवण्याचा. विल्यम सॅंडरसन या माणसाने त्याला मोठ्या प्रमाणात अर्थिक मदत देऊ केली आणि त्याला पृथ्वीचे गोल बनवण्यास सांगितले. Molyneux ने बनवलेला पहिला पृथ्वीचा गोल इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिला दिला गेला.

Molyneux Globe

त्यानंतरचे सर्वात महत्वाचे काम केले ते फ्रान्स मधील कॅसिनी या परिवाराने. १७व्या आणि १८ व्या शतकात हे काम झाले. या परिवाराच्या चार पिढ्या फ्रान्सचे नकाशे अद्ययावत करण्यात गुंतल्या होत्या. त्यांनी काढलेले Topographical Maps आजही वापरले जातात. हे नकाशे वेगवेगळ्या भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वापरले गेलेच त्याबरोबर सैन्यदलानेही हे नकाशे वापरले. फ्रानसमधील वेगेवेगेळ्या भूभागांचे नकाशे बनवण्याचं हे काम १६६९ साली चालू झालं आणि ते संपल १८१८ साली. हे नकाशे बनवताना वापरलेल्या तंत्रामुळे नकाशाच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. The Cassini Map या नावाने ओळखल्या जाणार्‍या या नकाशांच्या बाडात ८८ सेमी X ५५.५ से. मी. आकाराचे १८२ नकाशे होते. १:८६४०० या प्रमाण वापरून हे नकाशे काढले गेले होते. Jean Baptiste Bourgugnon d’Anville या फ्रेंच संशोधकाने नकाशाच्या तंत्रात मोलाचे योगदान केले आहे. वयाच्या १५ व्या वर्षी त्याचा प्राचीन ग्रीसचा पहिला नकाशा प्रकाशित केला. यानंतर त्याने जगातल्या वेगवेगळ्या भूभागांचे नकाशे काढले. यासाठी त्याने अनेक प्राचीन ग्रंथांचा अभ्यास केला. त्याच्या आधीच्या संशोधकांनी प्राचीन ग्रंथांमधील संदर्भ वापरून काढलेले नकाशे तितकेसे अचुक नव्हते. d’Anaville चे वैशिष्ठ्य हे आहे की त्याने एकाच भूभागाचे वेगवेगळ्या ग्रंथात आलेले उल्लेख याच्यावरती संशोधन केले आणि त्यावरून त्याने काढलेले नकाशे हे अचुक होते. या कालखंडात अनेक देशांमधे या विषयावर काही ना काही काम चाललेच होते. नकाशाच्या या शास्त्रात या युरोपमधील संशोधकांनी काहिनाकाही भर घातलेली आहे.

d’Anaville ने काढलेला नकाशा

१८ व्या शतकाच्या मध्यात ब्रिटिश संशोधकांनी केलेलं महत्वाचं काम केलं होत भारतीय उपखंडात. १७५० सालापासून इस्ट इंडिया कंपनीने भारतात आपलं बस्तान बसवण्यास प्रारंभ केला होता. याचवेळी त्यांना भारतीय भूभागाच्या नकाशांची निकड जाणवू लागली. भारतात ब्रिटिशांच्या आधी नकाशांच्या क्षेत्रात फारसे काम झाले नव्हते. बंगाल प्रांतात मेजर जेम्स रेनेल याने १७६७ साली जमिनीच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली. त्याने आपल्या १२ वर्षाच्या कारकिर्दीत बंगाल आणि बिहार या प्रांतात सर्वेक्षण करुन त्या भागांचे नकाशे बनवले. त्याने हे काम करताना मुख्यत: येथील नद्यांच्या आजुबाजूचा प्रदेश, या भागातले दळण वळणाचे प्रमुख मार्ग आणि गावखेड्यांचा अभ्यास केला. हे काम करताना त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. तापाने तर त्याला बेजार केले होते. असे असले तरी त्याने केलेले काम हे याच काळात युरोपमधे झालेल्या कामापेक्षा सरस होते. रेनेल निवृत्त झाल्यानंतर दोन वर्षानी १७७९ साली या ’बंगाल अ‍ॅटलास’ चे प्रकाशन लंडन येथे झाले. निवृत्तीनंतरही रेनेलने लंडनमधेच भारताच्या नकाशांवर काम चालू ठेवले. १७८२ साली ‘Map of Hindoustan’ या नावाने त्याने एक पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाच्या १७९२ आणि १७९३ साली आणखी अद्ययावत माहिती असलेल्या आवृत्त्या निघाल्या.

Map of Hindoustan

१८ व्या आणि नंतर १९ व्या शतकातही युरोपमधे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम होत राहिले. युरोप आणि आशियातील काही देशांमधे मोठ्या प्रमाणात सर्वेक्षणांची कामे केली गेली. त्याचबरोबर या कालखंडात आणखी एक महत्वाचे काम झाले ते म्हणजे अ‍ॅटलास आणखी अचुक केले गेले. यानंतर युरोपमधे झालेल्या युध्दांमधे हे अद्ययावत माहिती असलेले नकाशे वापरले गेले.

वर उल्लेख आल्याप्रमाणे नकाशात वरच्या बाजूस उत्तर दिशा दाखवलेली असते. खरं तर पृथ्वी गोल असल्याने त्याची वरची बाजू आणि खालची बाजू असं काही सांगता येत नाही. पण उत्तरेकडे राहणारे लोक हे प्रगत आहेत आणि दक्षिण गोलार्धातल्या लोकांना दुय्यम लेखण्यासाठी नकाशांमधे उत्तर दिशा वर दाखवली जाते असा दावा काहीजणांनी १९ व्या शतकाच्या अखेरीस करण्यास प्रारंभ केला. अशा लोकांनी नकाशामधे दक्षिण दिशा वरती दाखवणारे नकाशे प्रकाशित केले. उरुग्वेमधला एक चित्रकार Joaquin Garia याने पहिल्यांदा असा नकाशा काढला. मागे उल्लेख केल्याप्रमाणे अल इद्रिसीचा नकाशा अशा प्रकारचा पहिला नकाशा होता. यानंतर सगळ्यात महत्वाचा उल्लेख करण्यासारखा नकाशा हा मेलबॉर्न युनिव्हर्सिटीने १९७९ साली प्रकाशित केला. Stuart McArthur या ऑस्टेर्लियन संशोधकाने वयाच्या १५ वर्षी पहिला ऑस्ट्रेलियावर असलेला नकाशा काढला होता. त्याच्या अमेरिकन मित्रांकडून ’जगाच्या खालच्या भागातला राहिवासी’ अशी त्याची हेटाळणी केली. सहा वर्षानंतर त्याने ऑस्ट्रेलिया वर दाखवणारा हा नकाशा प्रकाशित केला. आपण नेहेमी उत्तरवरती असलेले नकाशे बघत आलेलो असल्याने वेगवेगळ्या खंडांचा एक विशिष्ठ आकार आपल्या डोक्यात बसलेला असतो. लेखाच्या सुरुवातीस असलेला नकाशा McArthur चा आहे. हे दक्षिण दिशा वर असलेले नकाशे बघताना आणखी बर्‍याच वेगवेगळ्या गोष्टी नजरेस पडतात. असाच एक वाद नासाने अपोलो यानातून १९७२ साली घेतलेल्या पृथ्वीच्या छायाचित्राच्या बाबतित झाला होता. अपोलोने घेतलेल्या मुळ छायाचित्रात पृथ्वीचा दक्षिण गोलार्ध वरती आहे. नासाने हे छायाचित्र १८० अंशात फिरवून प्रकाशित केले असा दावा काही संशोधकांनी केला.

इथे नकाशावरची ही लेखमाला संपवतो. संपवतो असेच म्हणावे लागते कारण या विषयाचा आढावा दोन लेखांमधे घेणे केवळ अशक्य आहे. उपग्रहांच्यामुळे आता नकाशाचे तंत्र बरेच अद्ययावत झाले आहे. ह्या लेखमालेचा हेतू एवढाच होता की कमी साधने उपलब्ध असूनही या शेकडो संशोधकांनी नकाशाच्या तंत्रात काम करून त्याला प्रगत केले. यात अनेक संशोधकांचा उल्लेख आलेला नाही. ज्या विषयावर लोकांनी ७००-८०० पानांची पुस्तके लिहिली आहेत त्या विषयाचा आढावा दोन लेखात घेणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे मला जे संशोधक महत्वाचे वाटले आणि ज्या घटना महत्वाच्या वाटल्या त्यांचाच समावेश या लेखांमधे केला आहे. या विषयावरची माहिती शोधताना मला इतके संशोधक सापडले की मी अक्षरश: थकून गेलो. याचबरोबर या विषयाशी संबंधीत असणारे अनेक महत्वाच्या भागांविषयी मला लिहिता आले नाही. ग्रीनविच लाईन, अक्षांश-रेखांश दाखवण्याच्या पध्दती, नकाशा काढताना वापरलेल्या स्केल, नकाशांबरोबर येणार्‍या सुची, Satellite Imaging, GPS असे अनेक विषय या लेखमालेतून सुटलेले आहेत. या विषयांवर वेगवेगळे लेख होऊ शकतील. नकाशाच्या तंत्रात होणार्‍या प्रगतीमधे अनेक किचकट तांत्रिक गोष्टींचा समावेश आहे. त्या तांत्रिक बाबी या लेखमालेत घेतलेल्या नाहित. या विषयाबद्द्ल कुतुहल निर्माण करणे हा या लेखमालेचा उद्देश. आज आंतरजालावर या विषयावर प्रचंड माहिती उपलब्ध आहे. Cartography या नावाने शोध घेतला तर तुमच्यासमोर मोठा खजिना उघडेल. याचबरोबर Aademia.edu या साईटवर या विषयाच्या संबधीत अनेक रिसर्च पेपर आहेत. अजूनही या विषयावर वाचण्यासारखे खूप आहे. मराठीमधे या विषयावरती फार कमी लिहिले गेले आहे. त्यामुळे या विषयाची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.

कौस्तुभ मुद्‌गल

5 thoughts on “चुकली दिशा तरीही – भाग २

Add yours

  1. कौस्तुभभाऊ,व्वा!वाचताना मस्त सफर झाली…कदाचित तेव्हा दर्यांची दिशा चुकली असेल पण तरीही त्यांनी ‘नविन’ अशी दिशा शोधली यातून सुध्दा काहीतरी शिकावयास मिळत आहे..

    अतिशय अभ्यासपूर्वक अन् मुख्य म्हणजे कष्ट किती घ्यावे लागले असतील हे वाचताना संदर्भावरुन समजत आहे,विशेष कौतुक भाऊ.

    आशा करतो कि अजून रंजक सफर तुमच्याकडून घडत राहो.

    Liked by 1 person

  2. Vachunch evdha confuse zale…
    It shows how much research the writer have done..
    too good 👍🏼

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: