१८१८ साली ब्रिटिश सरकारने भारतावर आपले राज्य प्रस्थापित केले. त्यानंतर ब्रिटिशांचा जुलमी राज्यकारभार चालू झाला. या जुलमी कारभारामुळे तत्कालीन सरकारविरुद्ध बंड करण्याचे बीज रोवले गेले आणि स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले जीवन समर्पित केले. पण काही लोकांना तत्कालीन सरकारविषयी अत्यंत प्रेम होते.
प्राचीन काळी राजांकडे त्यांची स्तुती करण्यासाठी स्तुतीपाठक, भाट अशी पगारी लोकं ठेवलेली असायची. या लोकांचं काम म्हणजे राजाची खरी-खोटी स्तुती करणे आणि राजाला खूश ठेवणे. काही मोगल राजांनी त्यांचे स्तुती करणारे ग्रंथही लिहून घेतले होते.
६-७ महिन्यांपूर्वी यशोधनने मला दोन पुस्तके दिली. त्यातलं एक १८९७ साली तर दुसरं १९११ साली प्रकाशित झालं.
१८९७ हे साल स्वातंत्र्यसग्रामाच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाचे आहे. या वर्षी प्लेगची साथ सगळीकडे आली होती आणि याच भानगडीत २२ जूनला रॅंडचा पुण्यात खून करण्यात आला होता. या सगळ्या षडयंत्रामागे टिळकांचा हात असावा असा संशय ब्रिटिश सरकारला आला होता. टिळक पुण्यात जेव्हा स्वातंत्र्यसंग्रामाच्या गडबडीत गर्क होते तेव्हा गोविंद पांडुरंग टिळक नावाचे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील मुलींच्या शाळेतले शाळामास्तर यांनी ’मलिका मा अझमा महाराणी साहेब व्हिक्टोरीया यांचा जयजयकार असो’ या नावाचे पुस्तक प्रकाशित केले. एक टिळक ब्रिटिश सरकार विरुद्ध भांडत होते तर हे दुसरे टिळक ब्रिटिश महाराणीचा उदो उदो करत होते.

पुस्तक अतिशय मजेशीर आहे. पुस्तकात तिसर्या पानावर व्हिक्टोरीया राणीचे रेखाचित्र छापले आहे. पुढील पानावर पुस्तकाच्या नावाखाली राणीगीत – हे लहानसेच, पण अत्युत्तम नीतिपर पुस्तक असे छापले आहे. पुस्तकाची किंमत चार आणे असून ते कोल्हापूरातील ज्ञानसागर छापखान्यात छापले आहे असा उल्लेख सापडतो.

पुस्तकाची प्रस्तावना ज्याला सुचना असं लेखक म्हणतो ती अतिशय मजेदार आहे. ’ह्या पुस्तकात चक्रवर्तिनी श्रीमती महाराणी साहेब व्हिक्टोरीया केसर इ हिंद यांची स्तुती आणि त्यांस दीर्घायुषी करण्याबद्दल परमेश्वरापाशी विनयपूर्वक मागणे मागून, महाराणी साहेबांच्या कारकिर्दीतील राज्य पद्धतीचे धोरणाविषयी माहिती थोडक्यात दिलेली आहे.’ अशी पुस्तकाची ओळख लेखक पहिल्याच परिच्छेदात करून देतो. हा लेखक अतिशय प्रामाणिक आहे. त्यांनी या सुचनेत लिहिले आहे ’मेहरबान व्हिट्कोम साहेब बहादूर, असि सुपरिंटेंडन्ट रेव्हिन्युसर्वे मराठास्टेट यांणीं आरंभी रुकडी मुक्कामी, आपला अमोल्य वेळ खर्च करून, या बूकांतील पहिल्या आवृतीच्या सर्व कविता मजकडून म्हणवून घेतल्या, आणि मोठ्या आनंदाने ह्या बुकाच्या पहिल्या आवृत्तीच्या कांहीं प्रतींना आश्रय देऊन, काही सुधारणा करण्यास सांगितल्या जेणे करून मजला चालू कामास भारी उमेद आली.’

या संपूर्ण पुस्तकात व्हिक्टोरीया राणीच्या स्तुती करणार्या ४५ कवितांचा समावेश आहे. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत या सगळ्या कविता त्या कुठल्या वृत्तात लिहिल्या आहेत ते दिले आहे. प्रत्येक कवितेनंतर त्याचा अर्थ दिलेला आहे. कवितेच्या प्रत्येक शब्दावर आकडे दिलेले आहेत आणि कवितेनंतर कंसामधे ’वरील अंक अन्वयाचे आहेत’ अशी टिप दिलेली आहे. कवितेच्या अर्थामधे कुठल्या क्रमाने कवितेमधले शब्द आले आहेत हे कळण्यासाठी हे अंक दिले आहेत. त्याकाळी मराठी संगीत नाटकात प्रसिद्ध असलेली साक्या, दिंड्या आणि कामदा या वृत्तातल्याही कविता आहेत.

या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकाची छपाई. १८९७ साल हे भारतातील छपाईचा प्रारंभीचा काळ. अर्थातच पुस्तक हे खिळे जुळवून छापलेले आहे. हातानी लिहिल्याप्रमाणे असलेला हा टाईप फेस देखणा आहे. याचबरोबर पुस्तकाच्या सुरुवातीस व्हिक्टोरीया राणीचे रेखाचित्र छापले आहे.

पुस्तकाच्या अखेरीस लेखकानी विद्याखात्याचे अधिकारी साहेबांना विनंती करून आपली पुस्तकं खपवण्याचा प्रयत्न केला आहे ’शाळांनिहाय बक्षिसें वैगेरे देण्याकरीतां मंजूर करून पुस्तकें घेण्याची मेहेरबानी करतील इतकेंच मागणे मागून त्वत्पदीं नमस्कार करीतों’
एकंदर हे पुस्तक वाचताना धमाल येते.
असंच आणखी एक पुस्तक लिहिलं १९११ साली स्वातंत्र्यसंग्रामाच्या चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या पुण्यात. हे पुस्तक लिहिलं आहे एका लेखिकेने. ’आंग्ल प्रभा’ या नावानी प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची लेखिका आहे हिराबाई रामचंद्र गायकवाड. या बाईंनी आपल्या नावाच्या आधी स्वत:ला बालसरस्वती अशी पदवी लावलेली आहे. पुस्तक छापले आहे ठाण्यातल्या अरुणोदय या छापखान्यात.

हे पुस्तक आहे राजेसाहेब पंचम जॉर्ज आणि त्यांची पत्नी मेरी यांचे लघुचरित्र हे पुस्तक लेखिकेने खुद्द पंचम जॉर्ज आणि मेरी यांनाच अर्पण केले आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच पंचम जॉर्ज आणि मेरीची रेखाचित्रे आहेत आणि चित्राखाली स्तुतीपर आर्या लिहिल्या आहेत. त्यानंतर ’नवकुसुममाला’ या मथळ्याखाली भलामोठा तीन पानी श्लोक लिहिलेला आहे.
प्रस्तावनेची सुरुवात पुन्हा चार ओळींच्या श्लोकाने होते आणि प्रस्तावनेत येणारे एक वाक्य फारच भारी आहे. ’ईश्वराच्या आज्ञेवाचून झाडाचे पान ही हालत नाही इतका अधिकार हल्लीचे सार्वभौम जे इंग्लंडचे राजे पंचम जॉर्ज व हिंदुस्तानचे बादशाह यांच्याकडे आला आहे.’ यानंतरचे कंसातले वाक्य काळजाला भिडणारे आहे. त्या कंसात म्हणतात ’ एकीकडे राजे व दुसरीकडे बादशाह म्हणजे जणू काय इंग्लंड व इंडिया यांची ’हरीहर’ भेटच होय.’
यातला महाराणी मेरीची स्तुती करणारा एक परिच्छेद फारच रंजक आहे.
पूर्व काली इकडे मुद्रणकला माहीत नसल्यामुळे साधुसंतांची चरित्रे, पुराणे व वेद इत्यादी ग्रंथ लिहिणे अवघड होई; म्हणून विद्यादेवी मंत्ररूपाने पठणद्वारे गुप्त राहिली होती. पण अशा तर्हेने कोंडून राहणे तिला न आवडून म्हणा किंवा महाराणी साहेबांची कीर्ती वाढविण्याकरिता म्हणा तिने मंत्रासह यंत्रामध्ये उडी टाकिली अर्थात ती पालथी पडली. (टाइप उलटे असतात). तेव्हा तिला उठविल्यावर म्हणजे छापून काढिल्यावर सुलटी होऊन बसली अशा प्रकारचे आपले सुंदर रूप तिने बादशाहीण येण्यापूर्वी हिंदुस्थानात कोणासही दाखविले नसावे. आणि आता प्रत्यक्ष प्रगट होऊन खुशाल पुस्तक रूपाने व वर्तमानपत्राद्वारे पृथ्विपर्यटन करीत आहे. यावरून असे वाटते की, श्री स्वामिणां सद्गुणखनी महाराणी व्हिक्टोरिया ह्या येतील तेव्हांच आपले खरे स्वरूप व्यक्त करावे असा तिने निश्चय केला असावा.

संपूर्ण पुस्तकात पंचम जॉर्ज आणि महाराणी मेरी हिचे गुणगान केले आहे. मधे मधे श्लोक, रुपके यांची पेरणी याचबरोबर लिहिलेला मजकूर अतिशय रंजक आहे. कदाचित पंचम जॉर्ज आणि महाराणी मेरीने हे पुस्तक वाचले असते (आणि त्यांना ते वाचून कळले असते) तर त्यांना गहिवरून आले असते. यात एक रुपक तर फारच गंमतिशीर आहे.
रूपकं
महाराणी साहेब रूपी हरितालिका मातेने
राज्य रूपी महालांत बसून
प्रजा रूपी भक्तांस
कृपा रूपी प्रसाद देऊन
सद्गुण रूपी मस्तकावर
कीर्ति रूपी किरीट व
शाबासकी रूपी शालू परिधान केला होता तद्वत्
हल्ली राजे महाराजांनी किरीट व शालू सह औदार्य रूपी आभरण धारण करावें
आणि विचार रूपी कृपादृष्टी ठेवून कधी झालेल्या गरीब प्रजेचे पालन करून प्रजेकडून दुवा रूपी दुशाला ग्रहण करावी अशी विनयपूर्वक प्रार्थना आहे.
तसेच या पुस्तकात सातवे एडवर्ड बादशाह यांची स्तुती करणारे एक वेगळे प्रकरण लिहिलेले आहे. पुस्तकाच्या शेवटी बरेच फारसी शब्द असलेले एक हिंदी स्तुतीगीत आहे.

३० पानी छोटेखानी असलेल्या या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सगळे पुस्तक दोन रंगांमधे छापलेले आहे. तांबड्या रंगाची नक्षीदार बॉर्डर आणि काळ्या रंगात मजकूर छापलेला आहे. वापरलेला टाईपफेस सुबक असून पुस्तकारंभी आलेली रेखाचित्रे निळ्या रंगात छापलेली आहेत.
एकीकडे स्वातंत्र्याची चळवळ जोरात चालू असताना इंग्रजांची भलावण करणारे स्तुतीपाठक होते. कदाचित त्यांना त्यावेळी समाजात त्रासही झाला असेल. ‘ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी’ अशी एक म्हण आहे. या म्हणीप्रमाणे स्तुतीपाठकांची ही प्राचीन परंपरा आजही अव्याहत चालूच आहे.
खासच पुस्तकं आहेत 😄😄 मजा आली वाचताना.
LikeLiked by 1 person
😀😀 मनोरंजक! मजा आली.
LikeLiked by 1 person
भारी आहे. मी अर्थातच योग्य त्या श्रेयनिर्देशासह माझ्या संशोधनात याचा संदर्भ देईन. मनापासून धन्यवाद.
LikeLike
मस्त मजेदार किचन कल्लाकार हा हल्ली t.v. चालू असलेल्या कार्यक्रमाप्रमाणे हे सर्व लेख मस्त मजेदार आहेत. वाचून काही काही गोष्टी पदार्थांची वैचित्र्यपूर्ण नावे व कृतींनी खूपच मनोरंजन झाले
LikeLike