माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे कारण त्याला स्मृतीचे वरदान आहे. चांगल्या-वाईट स्मृतींचे संचित घेऊन तो आयुष्याची वाटचाल करत रहातो. अशीच एक आठवण उराशी बाळगून एक इंग्रज भारतातून मायदेशी परतला आणि मरेपर्यंत त्याने भारतातल्या त्याच्या ‘पराक्रमाची’ आठवण उराशी बाळगली.
हे साहेब आहेत विल्यम जेम्स. याचा जन्म १७२१ चा वेल्समधल्या Haverfordwest मधला. घरची परिस्थिती अगदी बेतासबात, वडिलांचा व्यवसाय म्हणजे पिठाची गिरणी चालवणे. वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे हे चिरंजीव घरातून परागंदा झाले, कुठं गेले काय झालं काही पत्ता नाही. पण कुणाचं नशीब कुठं असावं याचा काही भरोसा नाही, विल्यम जेम्सने घरातून बाहेर पडल्यावर समुद्राचा रस्ता धरला आणि जहाजांवर उमेदवारी सुरू केली. वयाच्या सतराव्या वर्षी तो एका जहाजाचा कप्तान बनला आणि स्वतःचे उत्तम बस्तान बसवले.
त्याकाळी इंग्लडमध्ये ईस्ट इंडीया कंपनीचा बोलबाला मोठा होता, कंपनी पगारपाणी आणि भत्तेही चांगले देई. १७४७ मध्ये कंपनीच्या नौदलात भरती होऊन विल्यम जेम्स मुंबईत दाखल झाला आणि अंगच्या गुणांमुळे चारच वर्षांत ‘कमोडोर’ पदाला जाऊन पोचला.

मराठा आणि इंग्रज आरमाराच्या झटापटी सदैव चालूच असत. तुळाजी आंग्रेनी पश्चिम किनाऱ्यावर आपली चांगलीच दहशत बसवलेली होती. पण एक वेळ अशी आली की तुळाजी आंग्रे स्वतःच्या स्वामींना म्हणजे साताऱ्याच्या छत्रपतींनाही जुमानेनासे झाले. मग मराठी सत्तेतर्फे नानासाहेब पेशव्यांनी आंग्र्याविरुद्ध मोहीम उघडली. इंग्रजांनीही त्यांचा भविष्यातल्या फायदा लक्षात घेऊन या संघर्षात मराठ्यांच्या बाजूने भाग घेतला. कंपनीतर्फे विल्यम जेम्सला सुवर्णदुर्गाला वेढा घालण्याची कामगिरी मिळाली. Protector हे इंग्लडमध्ये तयार झालेलं लढाऊ गलबत आणि Viper, Triumph व Swallow ही तीन गुराब अशा चार जहाजांचा काफिला घेऊन सुवर्णदुर्गाच्या दिशेने निघाला. सुवर्णदुर्ग किनाऱ्यापासून सुमारे पाव मैल समुद्रात आहे आणि त्याच्या संरक्षणासाठी किनाऱ्यावर कनकगड, फतेगड आणि गोवागड हे तीन किल्ले आहेत.

सुवर्णगडापाशी येऊन पोचल्यावर विल्यम जेम्सने या चारही किल्ल्यांच्या ताकतीचा अदमास घेतला, या चारही किल्ल्यांवर मिळून १३४ तोफा होत्या. Protector वर ४० तोफा होत्या आणि बाकीच्या जहाजांवर हलक्या माऱ्यासाठी उपयोगी पडतील अशा तोफा होत्या. थोडक्यात सांगायचं तर दोघांचे बलाबल अगदी विरुद्ध होते. पावसाळा तोंडावर होता त्यामुळं जेम्सने वेढा घालणे वगैरे वेळकाढू गोष्टींपेक्षा प्रत्यक्ष लढाईच सुरू करण्याचे ठरवले. त्यानुसार पहिल्या दिवशी जेम्सने समुद्राच्या बाजूने जवळपास ८०० गोळे सुवर्णगडावर डागले.ज्यामुळे किल्ल्यातील शिबंदीचे मोठे नुकसान झाले.
यानंतर त्याने एक धाडसी डाव खेळण्याचे ठरवले आणि रात्रीच्या अंधारात किनारा आणि सुवर्णदुर्ग यांच्यामध्ये जो उथळ व खडकाळ भाग होता तिथं Protector, Viper आणि Triumph ही तीन जहाज घुसवली आणि दुसरा दिवस उजाडताच चारही किल्यांबरोबर एकाच वेळी लढायला सुरुवात केली. Protectorने सुवर्णदुर्गावर असा मारा केला की किल्ल्यांवरच्या तोफा आणि त्या चालवणारे यांचे बरेच नुकसान झाले. दुपारपर्यंत सगळ्या बाजूने सरबत्ती अशीच सुरू राहिली. त्याचवेळी Protector वरून उडवलेला एक गोळा थेट बारुदखान्यावर जाऊन पडला आणि त्याचा भयंकर मोठा स्फोट झाला. आगीचे लोळ उसळले तरीही सुवर्णदुर्ग संध्याकाळपर्यंत लढत राहिला. इंग्रजही रात्रीपर्यंत चारही किल्ल्यांवर मारा करत राहिले. रात्रीच्या वेळी सुवर्णदुर्गावरून निसटून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या छोट्या गलबतांना (इंग्लिश रेकॉर्डसमध्ये यांना gallivats म्हटलेलं आहे.) मागे ठेवलेल्या Swallow ने समुद्राचा तळ दाखवला.
दुसऱ्या दिवशीची सकाळ होताच पुन्हा लढाईला तोंड फुटले पण मराठ्यांच्यात आता फारसा जोर उरलेला नव्हता. सकाळी दहाच्या सुमाराला चारही किल्ल्यांनी शरणागती पत्करली. ब्रिटिशांनी चारही किल्ल्यांवर त्यांचे निशाण फडकवले आणि विजयोत्सव सुरू केला. ते विजयाच्या आनंदात मग्न असतानाच गोवागडाचा किल्लेदार आणि काही सैनिक लपत-छ्पत सुवर्णदुर्गावर पोचले त्यांनी गडाचा पुन्हा ताबा घेतला.परत एकदा लढाईला तोंड फुटले. पुन्हा एकवार सुवर्णदुर्गावर तोफांचा मारा सुरू झाला आणि काही वेळातच ब्रिटिशांनी परत किल्ला जिंकून घेतला. आंग्र्यांच्या विरोधात कंपनीला पहिल्यांदाच एवढा मोठा विजय मिळालेला होता.
विल्यम जेम्सची ही कामगिरी फारच अफाट असली तरी कंपनीने त्याला फक्त १०० पौंड बक्षिसादाखल दिले. १७५६ च्या फेब्रुवारीत विल्यम जेम्सने विजयदुर्ग उर्फ घेरियाच्या लढाईतही भाग घेतला. पुढं काही वर्ष भारतात काढून १७५९ साली त्यानं कंपनीला रामराम ठोकला आणि मायदेशी परतला. तिकडं गेल्यावर विल्यम जेम्सने लग्न केलं, संसार थाटला आणि पोराबाळांच्यात रमला. पण कंपनीशी त्याचे लागेबांधे अजूनही टिकून होते त्यामुळं १७६८ मध्ये कंपनीच्या संचालक मंडळाचा सभासद झाला. १७७८ साली त्याला ‘सर’ हा किताब देण्यात आला.
लॉर्ड सँडविच (हेच ते ज्यांच्याबद्दल ‘एका नावाची गोष्ट’ हा लेख मी लिहिलेला होता) आणि विल्यम जेम्स पुढं एकत्रितपणे राजकारणात उतरले. विल्यम जेम्स दोनदा इंग्लंडच्या संसदेत निवडूनही गेला. १७८३ साली त्याच्यावर कंपनीत असताना हेराफेरी केल्याचा आरोप करण्यात आला, हे प्रकरण इंग्लंडच्या संसदेपर्यंत पोचलं पण विल्यम जेम्सने हे सगळे आरोप फेटाळून लावले.
१७८३ च्या डिसेंबर महिन्यात स्वतःच्या मुलीच्या लग्नातच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो मरण पावला. विल्यम जेम्स आयुष्यभर सुवर्णदुर्गाच्या लढाईच्या आठवणीत रमलेला असे, जीव पणाला लावून जिंकलेली ती लढाई म्हणजे त्याच्या आयुष्यातला त्याने सदैव उराशी बाळगलेला प्रसंग होता. त्या प्रसंगाची आठवण म्हणून त्याच्या पत्नीने त्याच्या स्मरणार्थ एक स्मारक बांधलं आणि सुवर्णदुर्ग संग्रामाची आठवण म्हणून तिने या स्मारकाला Suverndroog castle हे नाव दिले.
लंडनजवळच्या Shooters hill नावाच्या एका छोट्या टेकाडावर आजही हा Suverndroog castle उभा आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासातल्या एका दुर्दैवी प्रसंगाची स्मृती सातासमुद्रापलीकडे अद्याप जिवंत आहे.
Leave a Reply