आपलं जीवन ठिपक्यांशी घट्ट बांधलं गेलं आहे. कागदावर काढलेली रेघ असो किंवा संगणकावर लिहिलेला मजकूर असो सगळं ठिपक्यांनी बनलेलं आहे. आपण ह्या कृती नेहेमी करत असतो पण आपण या ठिपक्यांना नेहेमी दुर्लक्षित करत आलो आहे. हा लेख आहे तो ठिपक्यांनी एका क्षेत्रात केलेल्या क्रांतीबद्दल. या ठिपक्यांमुळे या क्षेत्रात अमुलाग्र बदल झाला.
छायाचित्र काढणार्या कॅमेर्याचा शोध लागला आणि प्रकाशाच्या मदतीने छायाचित्र काढली जाऊ लागली आणि ही काढलेली छायाचित्रे रासायनिक प्रक्रिया करून छापताही येऊ लागली. याच बरोबर छपाईच्या क्षेत्रातही प्रचंड प्रमाणात प्रगती होत होती. पण यात एकच उणीव राहिली होती ती म्हणजे छापलेल्या पुस्तकांमधे किंवा वर्तमानपत्रांमधून छायाचित्रे छापण्याचे तंत्र विकसित झाले नव्हते. त्यामुळे जुन्या पुस्तकांमधे छायाचित्र छापलेली दिसत नाहीत. सगळी चित्रे काळ्या रंगाच्या रेषांनी काढलेल्या आकृत्या असतात तशी काढलेली असतं. १८४२ साली राणी व्हिक्टोरीयाचा खुनाचा प्रयत्न झाला होता. त्यानिमित्ताने ’द इलस्ट्रेटेड लंडन न्यूज’ एक अंक प्रकाशित झाला आणि या अंकात चक्क दोन छायाचित्रे छापलेली होती. ही खर्याखुर्या छायाचित्रांसारखी नव्हती. अशी एका रंगातली आणि केवळ काळ्या व पांढर्या रंगातील छायाचित्रे छापण्यास तेव्हापासून सुरुवात झाली. या छायाचित्रांसाठी कंपोजमधे लावण्यासाठी बनवण्यात येणारा ब्लॉक बनवण्याची प्रक्रिया मोठी गमतीशीर पण किचकट होती. यात आधी कलाकार जे छायाचित्र छापायचे आहे त्याचे रेखाचित्र (Sketch) कागदावर बनवत असे. मग या रेखाचित्राची उलटी प्रतिमा तयार करून ती एका मऊ लाकडावर चिटकवली जात असे. मग त्या उलट्या चित्रानुसार कोरक्या त्या लाकडावर ती प्रतिमा कोरत असे. काढलेल्या रेखाचित्राची उलटी प्रतिमा काढणे हे तितके सोपे काम नव्हते. याचे उत्तर शोधले फ्रेंच चित्रकार देगा (Degas) याने. त्याने उलटी प्रतिमा लाकडावर उमटविण्यासाठी ट्रान्सफर पेपर तयार केला. या ट्रान्सफर पेपरवर रेखाचित्र काढले जात असे. हा पेपर ट्रेसिंग पेपरसारखा पारदर्शक असे. या पेपरच्या एका बाजूस कोटिंग केलेले असे. कोटिंग केलेल्या बाजूवर रेखाचित्र काढून ती बाजू लाकडी ठोकळ्यावर ठेवली जात असे व वरचा पेपर काढला की कोटिंग असलेल्या बाजूवर काढलेले रेखाचित्र उलटे उमटे. लाकडावर कोरकाम झाले की तो लाकडी ठोकळा एका मऊ चिकणमातीमधे दाबून त्याचा साचा बनवला जात असे. मग या साच्यात धातू ओतून त्याचा ब्लॉक बनविला जात असे. हा ब्लॉक कंपोजमधे लावून मग छपाई केली जात असे. अशा प्रकारे छापलेली रेखाचित्रे अनेक जुन्या पुस्तकांमधे छापलेली दिसतात. अशी कोरून छायाचित्रे छापणे शक्य झाले तरी खर्या फोटोग्राफप्रमाणे छापणे शक्य नव्हते. साधारणतः १८९१ साली अमेरिकेतील वर्तमानपत्रांमधून जवळ जवळ १००० कलाकार आठवड्याला १०००० रेखाचित्रे काढत असत.

या समस्येवर उत्तर म्हणून एका इंग्लिश छायाचित्रकाराने छायाचित्र छापण्याची एक नवीन पद्धत विकसित केली. वॉल्टर वुडबेरी हे त्याच नाव. वॉल्टर हा हरहुन्नरी छायाचित्रकार होता. आपल्या इंजिनिअरींगच्या शिक्षणादरम्यानच त्याने सिगरेटचा बॉक्स आणि चष्म्याच्या भिंगांपासून कॅमेरा बनवला होता. हा छायाचित्रकार १८५१ साली चरितार्थासाठी ऑस्ट्रेलियाला गेला. त्याचे चरितार्थाचे काम इंजिनिअरींग मधले असले तरी तो एक व्यावसायिक छायाचित्रकारही होता. याच दरम्यान त्याची ओळख जेम्स पेज नावाच्या माणसाबरोबर जकार्तामधे आपला स्टुडिओ चालू केला. १८६३ साली आजारामुळे वॉल्टर पुन्हा इंग्लंडला परतला. १८६४ साली त्याने पहिल्यांदा प्रकाश व रसायने न वापरता छायाचित्र छापण्याची पद्धत विकसित केली. अर्थात ही पद्धत शोधली गेली ती फोटोग्राफ छापण्यासाठी मात्र या पद्धतीने अनेक प्रती छापणे सहज शक्य झाल्याने ती मुद्रण क्षेत्रातही वापरली गेली. ज्यामुळे एकाच छायाचित्राच्या अनेक प्रती छापणे सहज शक्य झाले. वॉल्टरने शोधलेल्या पद्धतीत प्रारंभी रसायन आणि प्रकाश यांचा वापर केला जात असे. जिलेटीन आणि डायक्रोमेट यांचे मिश्रण एका काचेवर पसरले जात असे. मग त्यावर कॅमेऱ्याने काढलेल्या छायाचित्राची निगेटिव्ह ठेऊन प्रखर अतिनील किरणांच्या सहाय्याने एक्सपोज केले जात असे. एक्सपोज होताना निगेटिव्ह वर असलेल्या वेगवेगळ्या छटांप्रमाणे जिलेटीन वर छायाचित्र एक्सपोज होत असे. गर्द छटेच्या इथे जाड तर फिकट छटेच्या इथे पातळ अशा उंचसखल आकारात छायाचित्र जिलेटीनवर उमटे. त्यानंतर त्यावर पाणी टाकून एक्सपोज न झालेले जिलेटीन धुवून टाकले जात असे. प्रखर अतिनील किरणांमुळे जिलेटीन टणक होत असे. मग ही जिलेटीनची पातळ फिल्म शिशाच्या एका जाड तुकड्यावर ठेवून प्रचंड दाबाखाली दाबली जात असे. टणक जिलेटीनवरचे छायाचित्र मग या शिशाच्या तुकड्यावर उलटे उमटत असे. मग या पट्टीवर जिलेटीन व शाई यांचे मिश्रण टाकून

छायाचित्र कागदावर उमटवले जात असे. शिशाच्या तुकडयावरून छायाचित्रांच्या अनेक प्रती काढता येत असत. पुस्तकांच्या छपाईत हा शिशाचा तुकडा वापरून आता छायाचित्रे छापता येऊ लागली. या शिशाच्या तुकड्याने छापलेली छायाचित्रे ही फोटो पेपरवर छापलेल्या छायाचित्रांप्रमाणे म्हणजे Continuous Tone मधली असत. ही पद्धत वेळखाऊ तसेच महाग असल्याने ती फक्त किमती पुस्तकांमध्ये वापरली जात असे. या पद्धतीने छापलेली छायाचित्रे अतिशय दर्जेदार असत. या पद्धतीला वुडबरीटाईप असे नाव आहे.

याआधी एका चित्रकाराने केवळ रेषा आणि ठिपके वापरून काढलेल्या चित्रांमधे वेगवेगळ्या छटांचा परिणाम साध्य केला होता. हेन्ड्रीक गोल्डझियस (Hendrik Goldzius) याने काळा हा एकच रंग वापरूनही राखाडी रंगांच्या छटांचे छायांकन आपल्याला त्या चित्रांमधे दिसते. रेषांच्या व ठिपक्यांच्या सहाय्याने त्याने केलेली रेखाचित्रे कमालीची सुंदर आहेत.

यातूनच प्रेरणा घेऊन छायाचित्रे छापण्यासाठी या आधीच एका संशोधकाने सोपी आणि स्वस्त पध्दत शोधली जिने छपाई क्षेत्रात क्रांती घडवली. आजही छापण्यासाठी हिचं पद्धत वापरली जाते. असे असले तरी त्याचा व्यवसायिक वापर सुरू होण्यासाठी तब्बल ३८ वर्षे गेली.

येथे ठिपके मदतीला आले. विल्यम टालबॉट या एका छायाचित्रकाराने या समस्येवर उपाय शोधला. त्याने १८५१ साली पहिल्यांदा ठिपके वापरून छायाचित्रे छापता येतील अशी एक सोपी पद्धत विकसित केली. वुडबरीने शोधलेल्या पद्धतीने खर्याखुर्या फोटोग्राफ सारखी छायाचित्रे छापता येऊ लागली तरी ती रोजच्या वर्तमानपत्रांमधून छापण्यासाठी खर्चिक होती. कोरलेल्या लाकडापासून जी रेखाचित्रे छापली जात त्यात एक समस्या होती ती म्हणजे त्यामधे शाईचा काळा आणि कागदाचा पांढरा एवढ्या दोनच रंगांमधे काम करावे लागत असे. काळ्या व पांढर्या या दोन रंगांमधील राखाडी (Gray) रंगाच्या छटा मिळत नसत. त्यामुळे खर्या फोटोग्राफ सारखे छायाचित्र छापता येत नसे. यावर तोडगा म्हणून विल्यमने अतिशय सोपी पद्धत विकसित केली. ही पद्धत अर्थातच पहिल्यांदा फोटोग्राफ छापण्यासाठी वापरली गेली व त्याचा मुद्रणामधे वापर वर उल्लेख केल्याप्रमाणे नंतर चालू झाला. फोटोग्राफ हे नेहेमी Continuous Tone मधे छापलेले असतात. विल्यमने शोधलेल्या पध्दतीमध्ये ही Continuous Tone मधला फोटोग्राफ हा एक्स्पोज करताना मधे ठिपक्यांची पट्टी ठेऊन अक्षरशः ब्रेक केला जात असे. त्यामुळे एक्स्पोज केलेल्या छायाचित्रात गडद भागात म्हणजे १००% काळ्या रंगाच्या जागी पॅच ९०-८०% भागात क्वाड्राटोन ६०-५०% भागात मिडटोन ३०-२०% भागात क्वार्टर टोन तर ७-५% भागात हायलाईटस अशा प्रकारे ब्रेक केला जाई. यालाच Juxtaposition असेही म्हटले जाते. फोटो कॅमेर्यामधेच एक काचेची पट्टी असे. या काचेवर समान अंतरावर असलेले व एकाच आकाराचे ठिपके काढलेले असत. ही ठिपके असलेली काच छायाचित्राला लहान लहान ठिपक्यांमध्ये परावर्तीत करत असे. अशा प्रकारे घेतलेल्या छायाचित्रातील गडद भागातील ठिपके आकाराने मोठे तर फिकट भागातील ठिपके आकाराने लहान असत. यामुळे या छायाचित्रात एक प्रकारचा ठिपक्यांचा पॅटर्न बनत असे. या ठिपक्यांमधील अंतर अतिशय कमी असे. सगळे ठिपके हे काळ्या रंगातच छापले तरी दृष्टिभ्रमामुळे या लहान मोठ्या ठिपक्यांच्या आकारामुळे छायाचित्रात राखाडी रंगाच्या छटांचा भास होत असे. या अशा ठिपक्यांच्या छायाचित्रांवरून ब्लॉक किंवा ऑफसेटच्या धातूच्या प्लेटवरती उतरवून छापणे सहज शक्य होऊ लागले. ही पद्धत अतिशय सोपी आणि स्वस्त होती. विल्यमनी याचे पेटंटही घेतले. मग याच संकल्पनेला धरून मग वेगवेगळे प्रयोग चालू झाले. ठिपक्यांचा आकार लहान करणे, वेगवेगळ्या म्हणजे चौकोनी, गोल, लंबगोल आकाराचे ठिपके वापरणे, ठिपक्यांच्या ओळींचा कोन बदलणे असे बरेच वेगवेगळे प्रयोग केले गेले. विल्यम लेगो या माणसाने प्रिन्स आर्थर यांचे छायाचित्र ही पध्दत वापरून ’कॅनेडियन इलस्ट्रेटेड न्युज’ या वर्तमानपत्रात १८६९ साली पहिल्यांदा छापले.

पण वर्तमानपत्र आणि मुद्रण क्षेत्रात याचा व्यवसायिक वापर चालू झाला तो १८९० साली. या क्षेत्रात काम करणारे जॉर्ज मिसेनबाख (George Meisenbach) आणि फेड्रिक इव्ज (Frederick Ives) यांनिही उल्लेखनीय काम केले आहे. या ठिपक्यांच्या ओळींची संख्या LPI म्हणजे Line per Inch या प्रमाणात मोजली जाते आणि ठिपक्यांची संख्या ही DPI म्हणजे Dots per Inch मधे मोजली जाते. LPI जितका जास्त तितके छापलेले छायाचित्र मुळ फोटोग्राफच्या जवळ जाते. एकरंगी मुद्रणात वापरली जाणारी ही पद्धत नंतर फोर कलर छपाईतही वापरली जाऊ लागली. मुद्रणात वापरले जाणारे चार रंग म्हणजे निळा (Cyan), किरमिजी (Magenta), पिवळा (Yellow) आणि काळा (Black) यांच्या चार वेगळ्या प्लेटसमधे या चारही रंगांसाठी वापरल्या जाणार्या ठिपक्यांचा कोन बदलला जातो. फोर कलर मुद्रणाच्या सुरुवातीस हे कोन काय असावे याचे प्रमाणीकरण झालेले नव्हते त्यामुळे बर्याचवेळा चित्रांमधे फुलांसारखा एक पॅटर्न येत असे ज्याला Moiré असे म्हणले जाते. मग संशोधनानंतर या ठिपक्यांचे कोन प्रमाणीत केले गेले.
चार रंगांचे वापरात येणारे कोन Moiré
आज हे ठिपके डिजिटल पध्दतीने टाकले जातात. या पद्धतीच्या प्रारंभीच्या काळात ऑफसेटसाठी १००-१२० LPI, लेटरप्रेससाठी बनविण्यात येणार्या ब्लॉकला ८०-१०० LPI तर स्क्रिन प्रिंटिंगसाठी ६०-५० LPI वापरले जात असे. आज डिजिटल तंत्रामुळे ऑफसेटसाठी २०० व त्यापेक्षा अधिक LPI वापरून छपाई करणे शक्य झाले आहे.

आता आणखी एका ठिपक्यांबद्दल. लहानपणी हे ठिपके आपण पाहिलेले असतील. लहानपणी मॅंड्रेक्स, फॅंटम यांची कॉमिक्स वाचली असतील तर तुम्हाला या ठिपक्यांची नक्की ओळख असेल. या कॉमिक्समधे छापलेल्या छायाचित्रांमधे एक ठिपक्यांचा पॅटर्न असे. वरती सांगितलेल्या हाफटोन प्रमाणे हे ठिपके लहान मोठे नसत. एकाच आकाराचे ठिपके कॉमिक्समधल्या चित्रांना एक वेगळीच छटा देऊन जायचे. या ठिपक्यांना ’बेन डे डॉट्स’ असे म्हणले जाते. साधारणतः १८३७ सालापासून कॉमिक्स छापण्यास सुरुवात झाली. ‘The Adventures of Obadiah Oldbuck’ या नावाने प्रकाशित झालेल्या या कॉमिक्स पुस्तकाच्या इंग्रजी व्यतिरिक्त अनेक युरोपियन भाषांमधे आवृत्त्या निघाल्या. इंग्रजीतली आवृत्ती यायला चार वर्षे गेली. कॉमिक्स सुवर्णकाळ मात्र चालू झाला तो १९३८ साली पहिल्यांदा जेव्हा ’सुपरमॅन’ हे कॉमिक्स बाजारात आले. बेंजामीन डे (ज्यु.) या रेखाचित्रकाराने बेन डे डॉटस पहिल्यांदा वापरले. एकाच आकाराचे पण वेगवेगळ्या रंगांचे ठिपके एकमेकांवर ओव्हरलॅप करून छापले की एक वेगळाच परिणाम रेखाचित्रांना मिळत असे. त्यानंतर बेन डे डॉटस हे कॉमिक्स मधील रेखचित्रांमधे वापरले जाऊ लागले. बेन डे डॉटस यांचा वापर केवळ कॉमिक्सपर्यंतच मर्यादित होता. पण अमेरिकन पॉप आर्टिस्ट रॉय लिचेनस्टीन (Roy Lichtenstein) याने आपल्या चित्रांमध्ये आणि शिल्पांमध्ये या बेन डे डॉटसचा भरपूर वापर केलेला आहे.
रॉय लिचेनस्टीन रॉय लिचेनस्टीनचे ’तेल अवीव’ येथील म्युरल
(वरती वर्णन केलेल्या सगळ्या प्रक्रिया या अतिशय त्रोटक आणि त्यातील किचकट तांत्रिक बाजू न देता लिहिलेल्या आहेत.)
तर अशा प्रकारे हे छापलेले ठिपके आपण रोज बघत असतो किंबहूना आपण ठिपक्यांनी छापतही असतो. आपण वापरत असलेले लेझर किंवा इंकजेट प्रिंटरही ठिपक्यांमधेच छपाई करतात. पण या ठिपक्यांचे महत्व आपल्या गावीही नसते. आता जेव्हा वर्तमानपत्रात किंवा एखाद्या पुस्तकात छापलेले छायाचित्र बघाल तेव्हा भिंगामधून हे ठिपके जरूर बघा.
या लेखासाठी संदर्भ म्हणून शोधताना मला एक वेबसाईट सापडली ज्यावर या सगळ्या पध्दतींचे सुंदर सादरीकरण केले आहे. मी त्यांना संदर्भासाठी ही माहिती वापरण्याची परवानगीसाठी मेल पाठवला. सहसा अशा मेलला उत्तर न मिळण्याची शक्यता असते. पण दोनच दिवसांत आभार मानून लेखकानी ही माहिती वापरण्याची परवानगी दिली. तुम्हीही या साईटला जरुर भेट द्या. http://ted.photographer.org.uk/
Leave a Reply