ज्ञानदीप लावू जगी…

आपल्या समाजात आपण ‘यशस्वी’ माणसांचा एक ठराविक साचा तयार केलेला आहे, त्यापेक्षा वेगळ्या माणसाला आपण सहसा गिनतीत घेत नाही.याशिवाय वेळोवेळी आपलं रोल मॉडेल बदलल्याशिवाय आपल्याला स्फूर्ती मिळणार नाही याबद्दल आपल्या ‘मन में पुरा विश्वास’ असतो. पण यांपेक्षाही वेगळी एखादी सक्सेस स्टोरी असावी हे आपल्या ध्यानात येत नाही. १९५३ साली एक वेगळं पुस्तक प्रकाशित झालेलं होतं, त्याच्या विषयामुळेच बहुदा तत्कालीन पुस्तकविश्वाने त्याची दखल घेतली नाही.

हे पुस्तक लिहिलेलं आहे आचार्य नंदन सखाराम कालेकर यांनी. हे कुठल्याही अध्यात्मिक गुरुकुलाचे आचार्य नसून ते ‘नंदन केशभूषा विद्यालयाचे’ हेडमास्तर आहेत. केशभूषा विद्यालय इज सो लो क्लास आणि या विषयावर लिहिण्यासारखं काय आहे? हा प्रश्नही तुम्हाला पडला असेलच. पण मी आधीच म्हटल्याप्रमाणे केस कापायचे शिक्षण देणाऱ्या माणसाला यशस्वीतेच्या साच्यात बसवणे आपल्याला मानवत नाही त्याचा होणारा हा मानसिक त्रास आहे.

नंदन सखाराम कालेकर लिखित या पुस्तकाचे नाव आहे ‘केशकर्तनकला’ अर्थात केशभूषा शास्त्र आणि तंत्र. या पुस्तकाला प्रस्तावना आहे शंतनुराव किर्लोस्करांची, पुस्तकाचे प्रकाशन झालेलं आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्याप्रसंगी पक्षविरोधी भूमिका घेणारे नेते भाऊसाहेब हिरे यांचे. आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे नंदन केशभूषा विद्यालयाचे उदघाटन केलेले होते आचार्य अत्रे यांनी.आता तुमची उत्सुकता थोडी चाळवली असेल कारण किर्लोस्कर, अत्रे अशी मोठी नावं आली. मुख्य पुस्तकाकडे वळण्याआधी आचार्य नंदन सखाराम कालेकर प्रोप्रा.ओ.के. हेअर कटिंग सलून ऑपेरा हाऊस मुंबई ४ यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया.

आचार्यांची घरची परिस्थिती गरिबीची असल्याने ते लहान वयातच केस कापण्याच्या दुकानात कामाला लागले पण वाचण्याच्या आवडीमुळे ते उत्तमोत्तम साहित्य वाचून सुविद्य झाले. स्वउत्कर्ष करण्याच्या ध्यासातून त्यांनी जगातील एक उत्कृष्ट केशभुषक बनण्याचे ठरवले. या विषयातले उच्चशिक्षण घेण्यास ते इंग्लडला जाण्याचे स्वप्न त्यांनी पाहिजे आणि त्या ध्यासातून एका प्रवासी बोटीवर त्यांनी हेअरड्रेसरचे कामही पत्करले. ही सर्व हकीकत खुद्द शंतनूरावांनी प्रस्तावनेत लिहिलेली आहे. विदेशी जाताना पोर्ट सैद बंदरातून त्यांनी शंतनूरावांना पत्र लिहून आपली हकीकत कळवली कारण आचार्य स्वतः किर्लोस्करचे वाचक होते. शंतनूरावांनी त्यांना शुभेच्छा देऊन स्वतःचे अनुभव लिहून किर्लोस्करला पाठवण्याचे सुचवले. त्याप्रमाणे आचार्यांचे दोन लेख किर्लोस्करमध्ये १९३६ साली छापूनही आले. किर्लोस्करचा त्याकाळातला दर्जा पहाता ते लेख उत्तम होते समजायला हरकत नसावी. आजच्या संपादनविश्वातल्या मंडळींनीही असे प्रयोग करून बघायला हरकत नाही.

पुस्तकाचे मनोगत लिहिताना आचार्य प्रथम संत सेना महाराजांचे स्मरण करून आपल्या विविध गुरूंचे आभार मानत आपला प्रवास थोडक्यात सांगतात. शिवाय आपल्या लिखाणाच्या उर्मीचे श्रेय दत्तू बांदेकर, मामा वरेरकर आणि आचार्य अत्रे यांच्या नावे जोडतात. इतरही अनेक नामांकित पत्रकार आणि संपादकांचा नामोल्लेख करून ‘पुष्पासंगे मातीस वास लागे’ अशी नम्र भावनाही व्यक्त करतात. हे पुस्तक लिहिण्याचा आचार्यांचा उद्देश म्हणजे आपल्या व्यवसायबंधूंना मार्गदर्शन आणि सामाजिक ऋणातून मुक्त होणे असा उदात्त आहे.

पहिल्या धड्यात आचार्य केशसंवर्धन आणि केशरचना यांचा इतिहास सांगतात. ते म्हणतात केशसंवर्धन आणि केशरचना या कष्टसाध्य कला आहेत. शिल्पकला,चित्रकला वगैरेंचे जसे तंत्र असते त्याप्रमाणे यांचेही तंत्र आहे. या कलेला इतकी वर्षे योग्य तो मान मिळाला नाही, शास्त्राचा दर्जाही दिला गेला नाही याचे कारण केवळ उच्चवर्णीय लोक नसून नाभिक समाजाचे अज्ञान, शिक्षणाचा अभाव आणि त्यांची या कलेविषयीची बेफिकीर वृत्ती हे ही आहे. पण नवीन पिढीला याचे महत्त्व पटलेले आहे आणि तिला आता जनाश्रय लाभत आहे हे सुद्धा नमूद करतात.( आताची गल्लोगल्ली झालेली चकचकीत सलून, पार्लर आणि स्पा बघून आचार्यांना विशेष आनंद झाला असता)

या कलेच्या प्राचीनत्वाची माहीती देताना ते वासुदेव गोविंद आपटे यांनी मनोरंजन मासिकात लिहिलेल्या प्राचीन ग्रंथांच्या आधारे स्त्रियांच्या केशभूषा व पद्धती या लेखाचा संदर्भ देतात. यानंतर आपल्याकडचा माहितीचा खजिनाच आचार्य उघडतात. अथर्ववेदात एक मंत्र आहे ज्याच्यात अशी प्रार्थना केलेली आहे – लांब आणि दाट केसांनी आमची मस्तकं झाकली जावीत, शतपथ ब्राह्मणात मात्र लांब केसांवर टीका केलेली आहे. यावरून आचार्यांचा व्यासंग खोलवर असल्याचे दिसते.

प्राचीन ग्रीस आणि रोममध्ये हा व्यवसाय फक्त केस कापण्यापुरता मर्यादित नव्हता तर ते सामाजिक एकत्रीकरणाचे ते एक ठिकाणही होते. ही मंडळी डोळे,नाक,कान वगैरेंच्या शस्त्रक्रियाही करत शिवाय पायाच्या भोवऱ्या (कुरूपे) काढणे वगैरे कार्यही करत. (यांवरून मला कोल्हापुरातले एक जुने केशकर्तनालयवाले चामखीळ काढून देत त्याची आठवण झाली) आचार्य हे मुळातच अभ्यासू गृहस्थ असल्याचे त्यांच्या कलेचा इतिहास सांगण्यावरून दिसून येते. आर्किओलॉजी, समाजशास्त्र, सामाजिक आणि राजकीय इतिहास अशा विविध अंगांनी ते या कलेचा वेध घेतात.

Barber हा शब्द मूलतः Barba म्हणजे दाढीवरून आलेला आहे, दाढीची निगा राखणारा तो Barber अशी व्युत्पत्ती आचार्य मांडतात. ही कला प्राचीन ग्रीसमधून जगभर पसरली असं त्यांचं मत आहे. (आठवा : लिओनायडस आणि मंडळी, स्पार्टावाले)एखाद्या व्यक्तीच्या केसाचा वापर करून त्याच्यावर जादूटोणा करणे व त्याचे प्राण घेणे (अर्थात केसावरून स्वर्गाला धाडणे) हे प्राचीनकाळी रूढ होते. दाढी हे बुद्धीचे, आरोग्याचे आणि पौरुषाचे लक्षण आहे. (इथं आपल्यापैकी अनेक पुरुषांनी स्वतःलाच भले बहाद्दर म्हणून पाठ थोपटून घ्यायला हरकत नाही, यात धांडोळाकारही आलेच) अशा प्रकारचे अनेक समज केसांत घर करून बसलेले होते असं म्हणून आचार्य आपल्यातल्या विनोदबुद्धीचे दर्शन घडवतात.

प्राचीन रोममधले बालकांच्या जावळाचे विधी वगैरेची माहिती देत ते शत्रूच्या हाती दाढी सापडून आपले सैनिक बंदी बनू नयेत म्हणून अलेक्झांडरने त्यांना दाढी राखायला मनाई केलेली होती, त्याशिवाय एखाद्याची दाढी छाटणे म्हणजे विटंबना म्हणून ज्युलिअस सीझरने त्याने पराजित केलेल्या गॉल लोकांच्या दाढ्या छाटलेल्या होत्या ही नवीनच माहिती आचार्य देतात. १८व्या शतकाच्या सुरुवातीला रशियाचा राजा पीटर द ग्रेटने त्याच्या राज्यातल्या दाढीधारी मंडळींच्या दाढीवर कर बसवलेला होता आणि तो न भरल्यास दाढी छाटली जाई. (आपल्याकडे असं काही केल्यास नोव्हेंबर महिन्यात सरकारी महसुलात मोठी वाढ होईल, त्याशिवाय इन्कम टॅक्स भरल्याच्या पोष्टी ज्याप्रमाणे फेबुवर येतात तशा याच्याही येतील. शिवाय दर अर्थसंकल्पात आम्हा वर्षानुवर्षे दाढी राखणाऱ्या मंडळींसाठी काही सवलतही मायबाप सरकार जाहीर करेल) इंग्लडचा राजा ८व्या हेन्रीनेही दाढीवर कर बसवलेला होता, तो भरल्याचा पुरावा म्हणून एक बिल्ला करदात्याला दिला जाई. तो दाढीत अडकवत की खिशात ठेवत हे मात्र कळत नाही.

युरोपात वैद्यकीय व्यवसाय आणि शस्त्रक्रिया या धर्मगुरू करत आणि त्यांना मार्गदर्शन नाभिक (barber surgeon) करत. पुढे शस्त्रक्रियानिपुण नाभिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आणि धर्मगुरूंना केवळ प्रवचनाचेच काम उरले. पोप अलेक्झांडरनेही धर्मोपदेशकांना शस्त्रक्रिया करण्यास मनाई केली होती कारण त्यात मोठ्या प्रमाणावर रक्तपात होई.

१३व्या शतकात लंडन नाभिक संघ अर्थात Barber’s Company of London ची स्थापना झाली. त्यांनी व्यवसायाचे नियम बनवले तसेच अननुभवी लोकांवर नियंत्रण आणले. त्यांना राजसत्तेचाही पाठींबा होता. शस्त्रक्रियाकरांनी नाभिकांच्या धंद्यात हस्तक्षेप करू नये असा कायदाही तेंव्हा करण्यात आला होता. शस्त्रक्रियाकारांना व्यवसायासाठी जी सनद दिली जाई त्यावर गव्हर्नर आणि दोन नाभिकांच्या सह्या असत. १८व्या शतकात मात्र वैद्यकीय व्यवसाय पूर्ण उदयाला आला आणि नाभिकांची शास्त्रक्रियेपासून ताटातूट झाली. या काळापर्यंतचा इतिहास सांगून आचार्य पहिला धडा संपवतात.

आचार्य स्वतः हात काळे करून शिकलेले असल्याने ते बारीकसारीक माहिती उत्तम देतात. हे पुस्तक वाचताना लहानपणापासून केशकर्तनालयात पाहिलेली वेगवेगळी साधनं, ती वापरण्याण्याची केक (केशकर्तनालय) वाल्यांची स्टाईल अगदी डोळ्यांपुढे उभी रहाते. पुढचा धडा हा नाभिक समाजाच्या वापरातील हत्यारांबद्दल आहे. यात वस्तऱ्यापासून सुरुवात करून कातरी, स्प्रिंगची मशीन( क्लिपर्स), इलेक्ट्रिक क्लिपर्स इ ची सविस्तर माहिती ते देतात. ते झाल्यावर कंगवे/फण्या केस झाडायचे ब्रश, धार लावायचे दगड व चांबड्याचे/कॅनव्हासचे पट्टे, साबणाचा फेस काढायचे (अर्थात दाढीचे) ब्रश वगैरे दुय्यम साधनांचीही ते माहिती देतात.

फौजेत नव्यानेच भरती झालेल्या रंगरुटांना हत्यारं वापरायला शिकवणाऱ्या वस्तादासारखेच आचार्य वस्तऱ्यापासून सुरुवात करून सर्व हत्यारांची भरपूर माहिती सांगतात. वस्तऱ्याची माहिती सांगताना ते या हत्याराच्या देठ,खीळ, कांडे, टांच,खांदा अशा अवयवांची माहिती आकृतीसह सांगतात. आचार्यांच्या उमेदीच्या काळात स्वदेशीची चळवळ जोरात असली तरी ते इंग्लडमधल्या शेफिल्ड येथे तयार झालेले वस्तरे वापरण्याचाच आग्रह करतात. वस्तऱ्याची माहिती सांगून झाल्यावर लगेचच आचार्य त्याला परजण्याची पद्धत शिकवतात तसेच त्यासाठी लागणारे दगड, चांबड्याचे आणि कॅनव्हासचे पट्टे यांचाही तपशील पुरवतात. धार लावण्यासाठीचा बेष्ट दगड म्हणजे ‘स्वाती'(swaty) हे सुद्धा बजावून सांगतात.

आचार्य मुळातच खोलात जाऊन अभ्यास करणारे आहेत. कात्री आणि क्लिपर्स वगैरेची माहिती सांगताना ते क्लिपर्सचं पेटंट कुठल्या अमेरिकन कंपनीकडं आहे हे ते सांगतात. क्लिपर्स आपल्याकडं सर्रास झिरो मशीन म्हणून ओळखले जातात पण याचेही विविध प्रकार आहेत. ते म्हणजे 0000,000,00,0,1,2 आणि 3. त्याचे कोष्टक लिहून कुठल्या मशीनने केस कितव्या भागापर्यंत कापला जातो हे ते सांगतात. इलेक्ट्रिक क्लिपर्स म्हणजे लॉकडाऊनमध्ये ज्याच्या दणादण ऑर्डर टाकून आपण अमेझॉन आणि फ्लिपकार्टचं दुकान आपण चालवलं ते ट्रीमर. ट्रीमर हे तेंव्हापासून होते हे मला या पुस्तकातच कळलं. केस कापण्याचे कंगवे ‘store in cool and dry place’ असा कळकळीचा सल्लाही आचार्य आपल्या व्यवसायबंधूंना देतात.

‘शिंव्हास जशी आयाळ तशी पुरुषास दाढी’ असं कुणीतरी म्हटलेलं माझ्या पक्कं लक्षात आहे. पुढच्या धड्यात आचार्य दाढी करण्याबद्दल विशेष सविस्तरपणे सांगतात. गिऱ्हाईकच्या चेहऱ्याचा अभ्यास करून, त्याच्या केसाचा प्रकार, त्यांचा पोत इ गोष्टी दाढी करण्यापूर्वी लक्षात घ्याव्यात असा सल्ला ते देतात. ‘घे वस्तरा आणि चालव सपासपा’ असं करू नये हे ही बजावतात. ‘केक'(केशकर्तनालय)मध्ये गेल्यावर आपल्याला जी आदबशीर वागणूक मिळते जसे की खुर्ची पुढं ओढून आपल्याला सन्मानपूर्वक आसनस्थ करणे, सौजन्याने काय करायचं आहे वगैरे चौकशी करणे ही शिकवण आचार्य पुस्तकातून देतात. सध्याचे बहुसंख्य ‘केक’वाले आचार्यांच्या गुरुकुलाचाच वारसा पुढं चालवत असावेत.

आचार्य अतिशय काटेकोरपणे प्रत्येक क्रियेची माहिती सांगतात. साबण लावण्यापासून ते कितीसा जोराने वस्तरा कुठल्या भागावर आणि कोणत्या दिशेने फिरवावा हे एवढ्या सविस्तरपणे सांगतात की क्या कहने ! याशिवाय अर्थबोध व्हावा म्हणून आकृत्याही काढून दाखवतात. आपण इतकी वर्षं हा प्रयोग आपल्यावर करून घेतोय पण हे आपल्या लक्षातही आलं नाही हे मला प्रकर्षानं जाणवलं. शिवाय एवढी सगळी खबरदारी घेऊनही रक्तपात झालाच तर उपाय सांगताना पहिला उपाय हा गिऱ्हाईकाची माफी मागणे हाच आहे असंही ते म्हणतात.

पुढच्या धड्यात आचार्य केशकर्तनकलेची माहिती देतात. आधुनिक ‘केक’मध्ये गेले असता शेकडो नक्षीकाम केलेल्या डोक्यांचे फोटो दाखवून आपल्याला अवाक करतात ते सगळं खोटं आहे हे आपल्याला या पुस्तकात समजतं. कारण आचार्यांनी २ प्रकारात आणि ६ उपप्रकारात संपूर्ण केशकर्तनकला बसवून दाखवलेली आहे. हे वर्गीकरण अगदी सोपं आहे, म्हणजे प्रकार १) मध्ये/बाजूला भांग पाडलेले केस आखूड/मध्यम/लांब कापणे आणि प्रकार २) भांग न पाडता उलट फिरवलेले केस आखूड/मध्यम/लांब कापणे. खलास. हा म्हणजे वामनाने तीन पावलात संपूर्ण ब्रह्मांड व्यापून टाकण्याचाच प्रकार झाला. मग नवशिक्याने केस कापताना कशी खबरदारी घ्यावी, हलक्या हाताने, खापे न पाडता कशी केशभूषा करावी वगैरे हितोपदेश आचार्य करतात. प्रत्येक वेळी आचार्य एक गोष्ट आवर्जून सांगतात ती म्हणजे गिऱ्हाईक नाराज न होईल याची खबरदारी घ्यावी. त्यांच्या अफाट जनसंग्रहाचे कारण त्यांचा हा मितभाषी स्वभाव हेच असावे.

दाढी, मिशा आणि ब्रश मारणे या धड्याची सुरुवात आचार्य केशकर्तनादी क्रिया संपल्यावर दाढी,मिशा यांच्या ठाकठिकी संबंधाने विचार करणे आवश्यक आहे अशी पल्लेदार तान घेऊन करतात. दाढी राखणे ही अलीकडे फॅशनच झाली आहे असे म्हणून ते सध्याच्या दाढी टीकाकारांना No Shave November चे प्राचीनत्व सांगतात.म्हणजे ही प्रथा हिरकमहोत्सवी होऊन गेली आहे हे निश्चित. तत्कालीन मिशांचे कट बघताना आपल्याला आपल्या घरातल्या जुन्या फोटोत दिसणारे आपले परिजन आठवतात.

केशविज्ञान आणि शांपू या धड्यात आचार्य एकदम वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून केसांची anatomy, त्यातील घटक द्रव्ये वगैरे शिकवण देतात. शांपूचे प्रकार आणि तो कसा करावा हे सांगून मग पैसे खर्चायला चिकटपणा न करता चांगले शांपू वापरून गिऱ्हाईकांचे समाधान करावे असं म्हणत समेवर येतात. मुखमर्दनकला व स्नायूविज्ञान या धड्यातही आधीच्या धड्यातला टेम्पो टिकवून ठेवत कवटीची रचना वगैरे समजावून सांगत मसाज करण्याच्या कृती व क्लुप्ती उलगडून दाखवतात.

शेवटचा धडा हा केशकर्तनालयासाठीची संकीर्ण माहिती आणि धंदेवाईकास हितोपदेश असा आहे. यात दुकान कुठे काढावे, ते कसे असावे यापासून दुकानाची स्वच्छता, ग्राहकांशी कसे वागावे असा उपदेशात्मक आहे. ‘ग्राहक हा कल्पतरू, तो आपलासा झाला तर भरभराटीला काय तोटा’ असा गांधीजींचा मंत्रच आपल्या भाषेत सांगतात. मालकाने कसे वागावे, कामगारांनी कसे वागावे,धंद्यातील यशाची गुरुकिल्ली म्हणजे वक्तशीरपणा वगैरे नियम सांगत शेवटी आपण कामदारांनी स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे हित साधण्यासाठी वरील सूत्रांचा विचार करावा असं म्हणून आपला हा ज्ञानयज्ञ आटोपता घेतात.

आचार्य नंदन सखाराम कालेकर यांचे कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे आपण कष्टानं साध्य केलेली विद्या, आपलं ज्ञान त्यांनी आपल्या ज्ञातीबांधवांच्या उपयोगासाठी त्यांनी खुलं केलेलं आहे. त्यांच्या लिहिण्यात आपण आता फार मोठे कुणी आहोत हा अहंकार थोडाही झळकत नाही. त्यांनी जो उपदेश त्यांच्या व्यवसायबंधूंना केला आहे तो तमाम मराठी व्यावसायिकांनी अंगी बाणवायला हरकत नसावी. अशा विषयावर आपण कधी लिहू असं मलाही कधीच वाटलेलं नव्हतं पण एक धंदेशिक्षण देणारं एक ऑफबीट पुस्तक म्हणून या पुस्तकाला जरूर महत्व द्यायला हरकत नाही.

यशोधन जोशी

9 thoughts on “ज्ञानदीप लावू जगी…

Add yours

 1. अप्रतीम लेख व माहिती. कालेकार व ही माहिती उजेडात आणल्याबद्दल आपलेही कौतुक!💐

  Liked by 1 person

  1. वेगळ्याच विषयावर छान माहिती!! पण हे केशकर्तनकार महाराष्ट्रात कुठे जन्मले‌ व कुठे हो राहून त्यांचा धंदा करायचे? तसेच लेख, माहिती सांगताना यशोधनजी तुमच्याही त्यावर मार्मिक टिपण्या मस्त आहेत. कधी विनोद कधी आम्हालाा ओळखू न येणारे बारकावे तूम्ही छान उलगडून दाखवता. एखादी मsssssd ऊ रेशमी कापडाची घडी अलगद उलगडून दाखवावी व आम्हीही त्यावरून अलगद हात फिरवून मनाला छानच वाटावे व गोड झिणझिण्या मेंदूपर्यत जातात अगदी तसेच होते . सुंदर विवेचन, बारकावे, मर्म उलगडणे, चित्रदर्शी शैली व वर विनोदाचे गुलाबपाणी. आहाहा खूप सुंदर मेंदूदानंद मिळतो. तुमच्या प्रतिभेला इतका बहर आल्यामुळे माझ्याही प्रतिभेलाा कधी नव्हे तोआलेला बहर मुक्त सोडला आहे , कृपया या वाक्यांना हसू नये वा वाईट टिपण्या करू नयेत.

   Like

 2. मी धांडोळा चे सगळे लेख वाचतो. छान माहिती मिळते, बर्‍याच गोष्टी नव्याने कळतात

  Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: