जर तुम्हाला कोणी कपडे आगीत न पेटण्यासाठी काय करावे हे सांगितले किंवा कितीही वारा आला तरी न विझणारी मेणबत्ती बनवण्याची कृती सांगितली किंवा उंदीर कमी होण्यासाठी काय उपाय करावे किंवा दात चांगले राहण्याचे उपाय सांगितले तर? सांप्रत परिस्थितीत या सगळ्या गोष्टी अगदीच फुटकळ वाटतील कारण आज वर सांगितलेल्या गोष्टी अगदी सहज उपलब्ध आहेत. पण याच गोष्टी सांगणारे पुस्तक जर १४५ वर्षांपूर्वी कोणी लिहिले असेल तर त्याकाळी यांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या असतील. कोणी लेखकाची टवाळी केली असेल, कोणी त्यावर भंपकपणाचा शिक्का मारला असेल. तरी कुतुहलापोटी हे पुस्तक वाचणारा मोठा वर्ग होताच.
गंगाधर गोविंद सापकर या लेखकाने २५ डिसेंबर १८७५ रोजी ’उपयुक्त चमत्कार संग्रह’ या पुस्तक मालिकेचा ८ वा भाग प्रकाशित केला. ’अप्रसिद्ध व उपयुक्त अशा नाना प्रकारच्या चमत्कारिक युक्ती व औषधे यांचा संग्रह’ असे लेखकाने पुस्तकाच्या नावाखाली लिहिले आहे. आपले बंधू भाऊ सापकर यांच्या ’ज्ञानचक्षू’ नावाच्या पुण्यातील बुधवार पेठेत असलेल्या छापखान्यात छापलेल्या या पुस्तकाची किंमत आहे अर्धा आणा. हे पुस्तक लेटरप्रेसने छापलेले आहे.

प्रस्तावनेच्या नावाखाली पुस्तकातील १५-२० पाने खर्ची टाकावी हे लेखकाला मान्य नसावे. एकाच पानाची ’गोळीबंद’ प्रस्तावना वाचली की लेखकाचा हे पुस्तक लिहिण्यामागचा विचार आपल्या लक्षात येतो. प्रस्तावनेत शेवटी आठव्या भागाच्या सुचनेत या आधीच्या सात भागांना ’गुणग्राहक लोकांनी आश्रय दिला’ असा उल्लेख येतो व त्याकाळी एखाद्या पुस्तकाचे आठ भाग प्रकाशित होणे यातच कळून येते की हे पुस्तक वाचणारे अनेकजण त्याकाळी समाजात होते. या पुस्तकाचा आठवा भागच माझ्या हाती पडला.आणि यातलीही शेवटची ९ पाने गहाळ झालेली आहेत. हा भाग एवढा मनोरंजक आहे तर आधीचे भागही तेव्हढेच मनोरंजक असावेत. याच सुचनेत लेखकाने नम्रपणे हेही सांगितले आहे की ’यांत दोष बहुत असतीलच. त्या दोषांचा आव्हेर करून जे थोडे बहुत गुण आढळतील तेच ग्रहण करावे’.

अनुक्रमणिकेत सुमारे ८२ उपयुक्त चमत्कारांची यादी दिलेली आहे. ही अनुक्रमाणिका वाचतानाच आपली उत्सुकता चाळवते. लेखकाला रसायनशास्त्राची सखोल माहिती असावी कारण पुस्तकामधे वेगवेगळी रसायने वापरून करण्याच्या अनेक कृती दिलेल्या आहेत. कपड्याला रंग देण्याची कृती, निळ्या शाईसारखी जर्द पिवळी शाई असे वेगवेगळे रंग तयार करण्यासाठी कुठली रसायने किती प्रमाणात मिसळायची याची कृती लेखकाने दिली आहे. ’अमृततुल्य पदार्थ’ या नावाने असलेल्या एका कृतीत नायट्रेट ऑफ सिल्वर हा पदार्थ चांदी व सोन्याचा अर्क मिळून झालेला असतो व त्यात ’हैपोसलफेट आफ सोडा’ मिळवला की अमृततुल्य गोड पदार्थ तयार होतो. वर उल्लेखलेले दोन पदार्थ मुळात कडू असतात पण एकत्र आल्यावर गोडवा येतो. लेखकाने या पदार्थांच्या चवी सांगितल्या आहेतच आणि तयार होणारा ’अमृततुल्य’ पदार्थाचे उपयोग मात्र सांगितलेले नाहीत. पण बहुधा हा पदार्थ खाण्यासाठीच असावा.

अशा अनेक उपयुक्त गोष्टींबरोबरच लेखकाने काही आश्चर्यकारक चमत्कृतीपूर्ण कृती दिलेल्या आहेत. उदा. ’अदृश्य अक्षरे किंवा खुणा दृश्य करण्याची युक्ती’, ’एखादे मेलनास (बहुधा मिश्रणास) पाण्याने आग लावणे’ ’तांब्याचे सोने करण्याची युक्ती’ ’गमतींचा दिवा’, ’पाण्यात दिवा जळण्याची कृती’ (या दोन कृती दिलेल्या आहेत) आणि सर्वात गमतीशीर म्हणजे ’लांब उडी मारून दाखवणे’ अशा अनेक मनोरंजक कृती दिलेल्या आहेत. शेवटची पाने गहाळ झाल्याने पाण्यात दिवा जाळण्याची कृती आणि लांब उडीची कृतीपासून आपल्याला वंचित रहावे लागते.
याचबरोबर लेखकाला वैद्यकीय ज्ञानही असावे कारण या पुस्तकात त्याने ’पटकीवर औषध’, ’मनुष्यास दमा होतो तो जाण्यास उपाय’ ’लघवी परीक्षा’ ’पंडूरोग समजण्याची चिन्हे’ ’बाळंतरोग समजण्याची चिन्हे’ असे अनेक उपाय दिले आहेत.

प्रसंगवशात आलेल्या संकटाना तोंड कसे द्यावे हे ही लेखकाने या पुस्तकात सांगितलेले आहे. त्यातला एक प्रसंग फारच बिकट आहे. ’वाघाच्या मिशीचा केंश पोटात गेल्यास त्यावर उपाय’ या उपाययोजनेत ’वाघाच्या मिशीचा केंश पोटात गेल्यास बकर्याचे काळजाचे तुकडे करून खावे म्हणजे उतार पडतो’ असे सांगितले आहे. यापुढे लेखकाने असेही सांगितले आहे की ’ वाघाचे मिशीचा केंश पोटात जाणे परम दुर्घट आहे खरें परंतु प्रसंगावशांत अशी गोष्ट घडून आल्यास उपाय माहिती असणे योग्य आहे म्हणून ह्या ठिकाणी दर्शविला आहे’.

अशीच ’उंदीर कमी होण्यास उपाय’ ही कृतीही अतिशय रोचक आहे. उंदरांच्या खाण्याच्या गोष्टींच्या ठिकाणी स्पंजचे छोटे छोटे तुकडे टाकावेत, ते खाल्ल्यावर त्यांची पोटे फुगून ते मरतात असे त्यांनी सांगितले आहे. तसेच या कृतीत ते म्हणतात ’ परंतु हा उपाय भूतदया असणारे मनुष्याचे उपयोगी पडेल असे आम्हास वाटत नाही व त्यास उपायाची गरज ही लागणार नाही परंतु त्रास होणार असेल त्या करिता हा उपाय आहे.’
यात सगळ्यात एक अतिशय उपयोगी माहिती दिली आहे जी आजही ताडून पाहण्यास हरकत नाही. ’घोड्याच्या दांतांवरून त्यांचे वयाची परीक्षा करण्याचे प्रकार’ या कृतीमध्ये घोड्याच्या वयाच्या ३२ वर्षांपर्यंत त्याच्या दाताची स्थिती वर्णन केलेली आहे. ’दात पांढरे असतील तर एक वर्षाचा, दातांचे अंत्य पिवळे असतील तर तो ११ वर्षांचा, मध्यम शंखासारीखे असतील तर तो २२ वर्षांचा….’ अशी वर्णने लेखकाने केली आहेत.
अशा वेगवेगळ्या ८२ कृतिंमधील अर्धवट पुस्तकातील ६६ कृती वाचताना मनोरंजन तर होतेच तसेच तत्कालीन समाजासाठी कुठल्या गोष्टी लेखकाला उपयुक्त वाटत होत्या ते कळते. हे छोटेखानी पण अपुर्ण पुस्तक रोचक आहे. या पुस्तकाची शेवटची ९ पाने व आधीचे ७ भाग मात्र मिळू शकले नाहीत ही खंत मात्र राहिली आहे.
चमत्कार हा सापकरांचा आवडता विषय असावा. त्यांचा ’चमत्कार चिंतामणी’ हा ज्योतिःशास्त्रावरचा १८६५ साली लिहिलेला आणखी एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथात या विषयी आलेले संस्कृत श्लोक व त्यावरून त्यांचे अर्थ वर्णन केले आहेत. त्या ग्रंथाविषयी पुन्हा कधीतरी.

सुरेख….
LikeLike
फार सुंदर लेख
LikeLike
बढीया उपाय आहेत…
LikeLike
अतिशय रंजक माहिती!👌
LikeLike
फार सुंदर माहिती
LikeLike
खूपच ऊपयुक्त माहिती.
LikeLike