भारतीय संस्कृतीत हत्तीला अपरंपार महत्व आहे किंबहुना जगभरात हत्ती ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्याकडच्या अनेक पौराणिक कथात, महाकाव्यात आणि ऐतिहासिक कथात हत्तीचे उल्लेख येतात. या गोष्टी आपण आवडीनं वाचतो पण हत्तींचे प्रकार, त्यांच्या सवयी, उत्तम हत्तींची लक्षणं, त्यांचे रोग आणि उपचार यावर जे विस्तृत काम भारतीयांनी केलेलं आहे त्याबद्दल आपल्याला विशेष माहिती नाही. हा विषय दीर्घ आहे म्हणून मी या लेखात फक्त भारताच्या प्राचीन इतिहासात आलेले हत्तींचे ठळक उल्लेख, त्यांचे प्रकार आणि त्यांची लक्षणे यांवरच लक्ष केंद्रित केलेलं आहे.
ऋग्वेदात आपल्याला हत्तींचा उल्लेख आढळतो पण त्या काळात हत्तींना माणसाळवणे आपल्याला माहिती होते असं ठाम विधान करता येणार नाही. सिंधू संस्कृतीत मात्र हत्ती हा मानवाच्या आसपास होता असं दर्शवणारे पुरावे सापडतात. हत्तीचं चित्र असणाऱ्या मृण-मुद्रा तर सापडलेल्या आहेतच पण त्याचबरोबर धोलावीराला हस्तिदंताच्या वस्तू निर्माण करण्याची जागाही सापडलेली होती. दायमाबादला सापडलेल्या उत्तर-हरप्पन खेळण्यात चाकं लावलेला हत्ती आहे. पण या ठिकाणीसुद्धा आपल्याला हत्ती हा पाळीव प्राणी झालेला होता असं ठामपणे म्हणता येणार नाही.
दायमाबाद हत्ती प्रतिमा
पुरु उर्फ पौरस राजाचा पराभव करून जेंव्हा अलेक्झांडर मगधचा राजा नन्द याचा मुकाबला करण्याचा विचार करत होता तेंव्हा मगध सैन्यात ४००० हत्ती असल्याचे ऐकून अलेक्झांडरच्या सैन्याला त्यांची अतिशय धास्ती वाटली होती कारण अलेक्झांडरच्या सैन्याला हत्तींशी लढायचा सराव नव्हता. भगवान बुद्धाच्या आयुष्यातही हत्तींचा बरेच ठिकाणी उल्लेख आलेला आहे.
अलेक्झांडर आणि पौरस युद्ध
हत्तींबाबतचा लिखित आणि सुसंगत पुरावा म्हणून मात्र आपण कौटिल्याच्या अर्थशास्त्राकडे बघू शकतो. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात हत्तींची जोपासना, त्यांची घ्यायची काळजी याविषयी सविस्तर माहिती आहे. ही व्यवस्था तयार होण्यासाठी काही शतकांचा कालावधी हा निश्चितच लागला असावा. कौटिल्य म्हणतो राज्याच्या सीमेवर ‘हस्तीवन’ हे खास हत्तींसाठी राखीव वन असावे. या वनावर देखरेखीसाठी अधिकारी नेमलेला असावा, हत्तींच्या हालचाली, त्यांचा फिरण्याचा मार्ग यावर नजर ठेवण्यासाठी वनपाल असावेत. यातून उत्तम हत्ती हेरून तेवढेच पकडावेत. ग्रीष्म हा हत्ती पकडण्यासाठी उत्तम काळ असतो. पकडलेल्या हत्तींची व्यवस्था सांगताना कौटिल्य लिहितो – दिवसाचे आठ भाग केले तर हत्तीना पहिल्या आणि सातव्या भागात स्नान करू द्यावे. दुसरा आणि आठवा भाग खाण्यासाठी असावा, तिसरा पाणी पिण्यासाठी. रात्रीचे दोन भाग झोपण्यासाठी. रोज सकाळी अर्धाप्रहर व्यायामासाठी आणि बाकी वेळ हत्तीला बसण्या-उठण्यासाठी असतात.
हत्तीची उंची मोजण्याचे माप म्हणजे अरत्नी. एक हात म्हणजे एक अरत्नी. हत्तीची उंची नखापासून खांद्यापर्यंत मोजली जाते, लांबी डोळ्यापासून शेपटीच्या टोकापर्यंत आणि घेर अथवा रुंदी पोटाच्या मधोमध मोजली जाते. ७ अरत्नी उंच, ९ हात लांब आणि १० हात रुंद असा हत्ती हा राजाच्या स्वारीसाठी उत्तम मानावा असं कौटिल्य सांगतो. हत्तीचा आहार हा त्याच्या शरीराच्या मापाप्रमाणे म्हणजे अरत्नीच्या हिशोबाने ठरवला जाई. दर अरत्नीस रोज १ द्रोण तांदूळ, २ आढक तेल, ३ प्रस्थ तूप, दहा पल मीठ, ५० पल मांस, एक आढक नासलेले दूध किंवा दोन आढक दही, पाणी पिण्याच्या वेळेस १० पल गूळ व एक आढक मद्य, दोन भारे भारी गवत, हरळी सव्वाभार, वाळलेले गवत अडीच भार आणि भेसळ गवत हवे तेवढे असा आहार हत्तीला दिला जाई.
लढाईसाठी हत्ती तयार करताना त्याची विविध प्रकारे तयारी करून घेतली जाई. वाकणे, उंच होणे, दोरी/काठी/ निशाण यावरून उडी मारणे अशा कवायती करणे. जमिनीवर निजणे, बसणे, खड्ड्यावरून उडी मारून जाणे, मंडल धरणे, इतर हत्तींशी लढणे, तटबंदी किंवा दरवाज्याला टक्कर देणे अशी कौशल्य त्याला शिकवली जात.
कौटिल्यानंतरही याबद्दल विस्तृत लिखाण केलं गेलं आहे. दहाव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत हस्तीआयुर्वेद, मतंग क्रीडा, गजलक्षणम, मानसोल्हास, मृगपक्षीशास्त्र अशा ग्रंथातून हत्तींच्याबद्दल विस्तृत लिखाण केलं गेलं आहे. या ग्रंथात उत्तम हत्तींची लक्षणं, वाईट हत्तींची लक्षणं त्यांच्या अंगावर असलेली विविध चिन्हे, हत्तींचे प्रकार या गोष्टींचा विस्तृत आढावा घेतलेला आहे. या सर्व ग्रंथकर्त्यांनी हत्तीचे एकूण आयुर्मान १२० वर्षांचे मानलेले आहे. वयाच्या विविध टप्प्यांवर हत्तीला वेगवेगळ्या संज्ञा दिलेल्या आहेत. १ वर्षाचा हत्ती बाल, २ऱ्या वर्षी पुच्चुक, ३ऱ्या वर्षी उपसर्प, ४ थ्या वर्षी बर्बर, ५व्या वर्षात कलभ, ६व्यात नैकारिक, ७व्या वर्षी शिशु, ८व्या वर्षी मंजन, ९व्या वर्षी दंतारूण, १० व्या वर्षी विक्क, ११-२० वर्षीय पोत, २१-३० वर्षीय जवन३१-४० वर्षीय कल्याण, ४०-५० यौध अशी त्याला नावं दिली गेलेली आहेत. यापैकी २४-६० वयाचा हत्ती हा आरूढ होण्यासाठी उत्तम असतो. ६० पासून पुढच्या आयुष्यात हत्तीला वृद्ध मानून आराम दिला जातो. कल्याणी चालुक्य राजा सोमेश्वर – ३रा याने रचलेल्यामानसोल्हास या ग्रंथात हत्तींचे विविध प्रकार आणि त्यांची लक्षणं तो विशद करतो. सोमेश्वराने सांगितलेले हत्तीचे प्रकार खालील प्रमाणे
१. मृग – हा हत्ती किरकोळ बांध्याचा असतो. पुढचे पाय, दात, लिंग, कंबर आणि मान हे लांब आणि सडपातळ असतात. डोके, पाठ आणि तोंडाचा आकार हे आकाराने छोटे असतात.पोट आणि कानही छोटे असतात. रंग काळसर आणि डोळे मोठे आणि काळेभोर असतात. हा हत्ती वनात नेहमी कळपाबरोबर संचार करतो आणि सहसा एकटा आढळत नाही. मृग हत्तीत आत्मविश्वासाचा अभाव असतो आणि तो चळवळ्या स्वभावाचा असतो. प्रशिक्षणादरम्यान त्याला सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा शिकवाव्या लागतात. त्याचा स्वभाव बरेचदा चिडखोर असतो त्यामुळे त्याला त्याच्या कलाने घेऊन शिकवणे भाग पडते. मृग हत्ती हा शिकार किंवा खेळांसाठी वापरणे योग्य असते. हा हत्ती बऱ्याच शिक्षणानंतर काहीवेळा युद्धप्रसंगात वापरता येऊ शकतो. २. मंद – या प्रकारच्या हत्तीचे आकारमान ओबडधोबड म्हणता येईल या प्रकारचे असते. छाती, डोके आणि कान मोठे असतात. सुळे, शेपूट, पाय जाडजूड असतात. हनुवटी आणि सोंड मोठे असतात. लिंग आणि वृषण हे लोंबणारे असतात. याचे कातडे जाडजूड आणि सुरकुतलेले असते. हा हत्ती आळशी असतो, दिवसाचा बराच काळ तो झोपून घालवतो. वनात तो एकेकटा आढळतो, याची फारशी धास्ती इतर वन्यप्राणी घेत नाहीत. याचे डोके थंड असते हा चटकन रागाला येत नाही. याला बराच काळ प्रशिक्षण देत रहावे लागते कारण याला शिकवलेल्या गोष्टी लौकर समजतात पण तो या गोष्टी चटकन विसरतोही. याची कामभावना तीव्र असते. या प्रकारचे हत्ती केवळ ओझी उचलणे आणि अंगमेहनतीची कामं करण्यासाठी उपयुक्त असतात.
भद्र – हा हत्ती अतिशय बांधेसूद आणि सौष्ठवपूर्ण असतो. भरदार छाती, बाकदार पाठीचा कणा, भव्य कपाळ, मोठे आणि रेखीव कान, बलदंड पाय, मोठ्या आकाराचे सुळे, सुपारीसारखा रंग आणि मधाच्या रंगाचे डोळे असे त्याचे बाह्यरूप असते. वनात हा हत्ती कळपाचा प्रमुख असतो. रणवाद्ये किंवा मोठ्या आवाजांनी हा बिथरत नाही. हा शिकवलेल्या गोष्टी लगेच आत्मसात करतो आणि त्या विसरत नाही.
हत्तींचे प्रकार आणि बाह्यरूप
यावरून आपल्या लक्षात आता आलेलंच असेल की भद्र हा हत्ती सर्वोत्तम, मृग हा दुय्यम आणि मंद हा हीन दर्जाचा आहे. याशिवाय मिश्र आणि संकीर्ण हे हत्तींचे दोन उपप्रकारही आहेत. मृग, मंद आणि भद्र यांच्यापैकी कोणत्याही दोन प्रकारांचे गुण असलेला हत्ती हा मिश्र मानला जातो. म्हणजे यातून भद्रमृग, भद्रमंद, मंदभद्र, मंदमृग, मृगभद्र आणि मृगमंद हे सहा मिश्र प्रकार निर्माण झाले. दोन प्रकारापैकी पहिले ज्याचे नाव आलेले आहे त्याचे गुण त्या हत्तीत जास्त असतात. उदा. भद्रमृग या प्रकारात भद्रचे गुण जास्त आणि मृगचे गुण कमी असतात. संकीर्ण म्हणजे दोन प्रकारच्या हत्तींच्या मिलनातून तिसऱ्या प्रकारचा हत्ती जन्माला येणे. उदा. काही वेळा मंद आणि मृग यांच्या संयोगातून भद्र हत्ती जन्माला येतो त्याला भद्रमृगमंद असे संबोधले जाते. यालाच संकीर्ण असं म्हटले जाते.
हत्तीच्या शरीराच्या ठेवणीवरून, बाह्यरूपावरून आणि अवयवांच्या आकारानुरूप हत्तीची लक्षणे शुभ आहेत की अशुभ हे ठरवले जाते.
हत्तींची शुभलक्षणे –
राजाच्या स्वारीसाठी वापरला जाणारा हत्तीच्या शरीराचे खालील ६ भाग उठावदार असावेत. मस्तकाच्या बाजूचे दोन उंचवटे, वर वळलेले दोन एकसारख्या आकाराचे सुळे, मस्तक आणि मुख्य शरीर यामधला रज्जू आणि पाठ हे ते भाग होत.
हत्ती आरोग्यपूर्ण असावा म्हणून इतरही काही भागांची चिकित्सा करावी याची यादी आपले ग्रंथ देतात. हे भाग आहेत – सोंडेची दोन टोके, जीभ, टाळू, ओठ, लिंग आणि गुदद्वार.हत्ती पारखण्याच्या इतरही काही कसोट्या असत. हत्तीच्या पायाला वीस नखे असतात. ही नखे वळणदार, चंद्राप्रमाणे शुभ्र असावीत. इतर सर्व लक्षण उत्तम असूनही जर नख्यांची संख्या कमी किंवा जास्त असेल तर तो हत्ती वर्जित मानला जाई. हत्तीचा रंग सुपारीसारखा किंवा लालसर असावा. त्याचे कातडे मऊसर असावे त्यावर स्वस्तिक, श्रीवत्स अशी शुभ चिन्हे असावीत. यांशिवाय शंख, चक्र, कमळ, धनुष्य अशी चिन्हे असतील असा ऊर्ध्वशिश्न हत्ती राजासाठी योग्य. हत्तीचे कान प्रमाणबद्ध असावेत आणि कुठेही कातरलेले नसावेत. पृष्ट खांद्यांचा, गळ्याचा भाग भरदार असणारा असावा. दोन सुळयांपैकी उजवा किंचित वर, सुळ्यांचा रंग किंचित मधासारखा, कपाळ आणि सोंडेवर पांढरे ठिपके असणारा हत्ती राजपुत्रासाठी योग्य असतो.
हत्तीच्या चित्कार आणि चालीवरूनही त्याची पारख केली जाई. हंस, मोर, कोकीळ, वाघ, सिंह, बैल यांच्या स्वरासारखा चित्कारणारा किंवा मेघगर्जनेप्रमाणे चित्कार करणारा हत्ती उत्तम. उंट, कावळा, कोल्हा, अस्वल आणि वानर यासारखा चित्कार करणारा हत्ती हा नित्कृष्ट होय.
हत्तीची चाल ही सिंह, हरण, वानर, हंस किंवा चक्रवाक पक्ष्यासारखी असावी. मल्लाप्रमाणे चालणारा हत्ती हा उत्तम होय. हत्तीच्या सोंडेला तीन घड्या असाव्यात, दोन घड्यांचा हत्ती कुलक्षणी होय. हत्तीने सोंडेतून उडवलेल्या पाण्याला दुर्गंध येत असेल तर तो हत्ती रोगी असतो.
अशुभ लक्षणे रात्री जागा रहाणारा किंवा फिरणारा, पहाटे चित्कारणारा, उड्या मारणारा, पुढचे दोन पाय उचलणारा, शेपटी फिरवणारा हत्ती हा कुलक्षणी मानला जाई. माहुताच्या आज्ञेत न रहाणारा आणि मोकाट हत्ती बाकीची अंगलक्षणे कितीही उत्तम असली तरी वापरू नये. कातडे सच्छिद्र आणि खरबरीत असणारा, सोंडेचे टोक अगदी लहान असणारा किंवा सोंड किंचित आखूड असणारा, उंचीला कमी असणारा, तिरकस शरीराचा, पोटाचा घेर अस्ताव्यस्त असणारा हत्ती ताबडतोब दूर केला जाई. ज्या हत्तीच्या लिंगावर लालसर किंवा पांढरे ठिपके आहेत, ज्याचे लिंग पातळ, आखूड आणि सैलसर आहे, ज्याच्या लिंगावर शिरा आहेत ज्याचे वृषण दिसतात असा हत्ती कदापि हत्तीखान्यात असू नये. अशा हत्तीवर बसणारा राजा मित्र किंवा राजपुत्राच्या हल्ल्याला बळी पडतो. ज्याचे सुळे खडबडीत आहेत, ज्याच्या सुळ्यावर गाठी, खड्डे आहेत, आकार वेडावाकडा आहे असा हत्ती त्याच्यावर आरूढ राजासाठी दैन्य आणि दारिद्र्य घेऊन येतो. ज्याची शेपूट वेडीवाकडी आहे, आखूड आहे किंवा शेपटीच्या सुरुवातीचा भाग पातळ आहे असा हत्ती दुर्लक्षणी होय. ज्याचा कान भग्न झालेला आहे अशा हत्तीवर बसणारा राजा रोगांना बळी पडतो.
भारतातील हत्तींच्या लष्करातल्या समावेशाबद्दल एक निरीक्षण नोंदवण्याजोगं आहे ते म्हणजे भारतातील राजसत्तांविरुद्ध इस्लामी आक्रमकांना यश मिळण्याचं मुख्य कारण म्हणजे भारतीय सत्ताधीश घोडदळापेक्षा गजदलावर जास्त विसंबून असत. गजदलाच्या मंद हालचालींपेक्षा आक्रमकांच्या घोडदलाचा प्रभाव रणभुमीवर जास्त दिसून येई आणि ते विजेते ठरत. पण पुढच्या काळात इस्लामी आक्रमक जेंव्हा राज्यकर्ते बनले तेंव्हा त्यांनी पुन्हा गजदलावर आपली भिस्त काही प्रमाणात तरी ठेवलीच.
सुलतान अल्लाउद्दीन खिलजीला मलिक काफूरने दक्षिणेची लुटालूट करताना पकडून आणलेले ६०० हत्ती नजर केल्याची माहिती बरानी नावाचा त्याचा दरबारी सांगतो. उत्तर प्रदेशातल्या जौनपूर इथल्या शराकी सल्तनतीचा सुलतान महमूद शराकी आणि दिल्लीचा सुलतान बहलोल लोधी यांच्या १४५२ मध्ये दिल्लीपाशी झालेल्या लढाईत महमूद १४०० हत्ती घेऊन उतरल्याचा एक संदर्भ सापडतो. ( हा संदर्भ १७ व्या शतकातला असल्यानं १४०० हा आकडा विश्वासार्ह वाटत नाही, पण त्याच्या निम्मे तरी हत्ती असावेत असं मानायला हरकत नाही)फेरीस्ता बहमनी साम्राज्यातल्या हत्तींबद्दल लिहिताना सांगतो की बहमनी सुलतानाचा पिलखाना ३००० हत्तींनी भरलेला आहे. यात सगळेच हत्ती काही लष्करी वापराचे होते असं मानता येणार नाही पण साधारणपणे यापैकी १/३ तरी लढाऊ होते असं म्हणायला हरकत नाही.
अकबर हा अतिशय हत्तीप्रेमी होता, त्याच्याकडे अनेक उत्तमोत्तम हत्ती होते. हवाई नावाच्या एका भयंकर बलवान आणि मस्तवाल हत्तीची झुंज त्याने रणबाग नावाच्या हत्तीशी लावली. यावेळी अकबर हवाई हत्तीवर स्वतः आरूढ होता हे विशेष. आयने अकबरीतही अबुल फझल अकबराच्या पिलखान्याबद्दल सविस्तर माहिती देतो. अबुल फझलने हत्तींच्या ज्या जाती सांगितलेल्या आहेत त्यात बेहदर (भद्रचा अपभ्रंश), मुंड (मंदचा अपभ्रंश), मुर्ग ( मृगचा अपभ्रंश) आणि मीढ ( मिश्रचा अपभ्रंश) यांचा समावेश होतो. अकबराच्या पिलखान्यात सात प्रकारचे हत्ती होते, हे प्रकार म्हणजे मस्त, शेरगीर(लढाऊ), साधा, मझोला, खडा, बंदरकिया आणि मुकेल (मराठीत ज्याला मुकणा म्हणजे बिन सुळ्यांचा नर म्हणतात तो हाच असावा). याशिवाय अबुल फझल हत्तींची व्यवस्था, त्यांचा आहार, त्यांना शिकवण्याच्या पद्धती, शस्त्रे, दागिने इ विषयीही भरपूर माहिती सांगतो.
हत्तीवर स्वार झालेला अकबर
हत्तीसारखा बलवान, बुद्धिमान आणि प्रसंगी आक्रमक प्राणी भारतातल्या जवळपास सगळ्या सत्ताधीशांनी आपल्या सैन्यात समाविष्ट केला, स्वारीसाठी, शिकारीसारख्या धाडसी खेळासाठी त्याचा वापर केला गेला. हत्तींच्या या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रवासाचा आढावा इतिहासपूर्व काळापासून ते स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत घेणं हे मनोरंजक ठरेल पण लेखाच्या लांबीचा विचार करून मी तात्पुरता लेखणीला इथं विश्राम देतो.
मोगल राजचिन्हे घेऊन आघाडीवर चालणारे गज
संदर्भ – १)हस्तीआयुर्वेद २)मतंगलीला ३)गजशास्त्र ४)मानसोल्हास ५)कौटिलीय अर्थशास्त्र ६)Elephants and Kings – Thomas Trautmann ७)आयने अकबरी
यशोधन जोशी
उत्तम लेख. माझ्याकडे Horse & Elephant Armour हे G.N.Pant यांचे उत्तम पुस्तक आहे. सध्याच घेतलं आहे.
LikeLiked by 1 person
यशोधन.. एकदम माहितिपूर्ण लेख.. हत्ती बद्दल एवढी वैविध्यपूर्ण माहिती प्रथमच वाचली… धन्यवाद
LikeLiked by 1 person
खूप सुंदर आणि ज्ञानात वृद्धी करणारा लेख,
खूप खूप आभार धांडोळा टीम 🙏
LikeLiked by 1 person
Excellent information, esp the 3 types of elephant.
I was struck by the ‘Mruga’ type as it appears in one book, in the story called ‘The Rogue Elephant of Panapatti’. Do take a look.https://archive.org/details/in.ernet.dli.2015.460900/mode/2up
LikeLike
अतिशय सुंदर माहिती. हत्तीबाबत एवढे लिहिले गेले आहे हे बघून आश्चर्य वाटले!
LikeLike
सुंदर माहिती. संशोधन, संकलन, मांडणी, सारेच उत्तम!
LikeLike
सुंदर लेख
LikeLike
Your article here is highly readable. Some related information I would like to add for readers: Decades back. I was one of the four wildlife scientists in BNHS who did exhaustive research on Indian Elephants in different parts of India over a period of 15 years. I do have a good collection of literature on elephants collected during that time. During my travel, I collected a North Eastern counterpart to Gaja Shastra. The nomenclature used in it is different than that used by Kautilya or in Gajshastra. In south India, the terms used for elephant body type too are different. The various things attributed to elephant selection have never been tested in the modern world. I wonder if there was any science behind it. I have seen hundreds of wild elephants in my association with them but never came across any with testicles visible from any side. Elephants as a group along with Afrotherian animals, have jettisoned the external scrotal sac millions of years ago, and have abdominal testicles. I cited one such anomaly but there are scores of them in these tretises.
LikeLike