भित्यापाठी….

‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ हे असं लहानपणी आपण घरच्यांनी सांगितलेले नेहमी ऐकायचो. असाच एक ब्रह्मराक्षस उभा झाला दुसर्‍या महायुध्दाच्या काळात. तर ही कहाणी आहे एका बोटीची जिच्यामुळे दुसर्‍या महायुध्दात दोस्त राष्ट्रांमधे असेच दहशतीचे वातावरण निर्माण केले. ही बोट युध्दात वापरली गेली नाही तरी तिची दहशत सुमारे ६ वर्षे दोस्त राष्ट्रांवर राहिली.

साल होते १९३९. दुसरे महायुद्ध ऐन भरात होते. जर्मन सैन्याची सगळीकडे सरशी होत होती. जर्मनीने युध्दावर मजबूत पकड घेण्यासाठी एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आखली. बाल्टीक समुद्रावर आपल्या आरमाराची ताकद वाढवून जर्मनीला इंग्लंड आणि रशिया या दोन मोठ्या शत्रूवर कुरघोडी करता येणार होती आणि त्यादृष्टीने जर्मनीने आपले प्रयत्न चालू केले.

जर्मनीने एका युध्दनौकेच्या निर्मितीला प्रारंभ केला. अशी युध्दनौका जिच्यामुळे शत्रूंच्या मनात धडकी भरली होती. टिरपीझ नावाची ही युद्धनौका जर्मनीने १९३९ साली बनवायला सुरुवात केली. आणि लौकरच या युध्दनौकेच्या वैशिष्ठ्यांची माहिती बाहेर फुटली. खरोखरच जर ही युध्दनौका युध्दाच्या मैदानात उतरली असती तर दोस्त राष्ट्रांची त्रेधातिरपीट उडाली असती. त्यामुळे दोस्त राष्ट्रांचे या युध्दनौकेला उध्वस्त करणे हे एक महत्वाचे लक्ष होते. टिरपीझ हे नाव १८९७ ते १९१६ या दरम्यान जर्मनीच्या आरमारात अ‍ॅडमिरल असलेल्या अल्फ्रेड टिरपीझवरून घेतले होते. अ‍ॅडमिरल टिरपीझने जर्मनीचं आरमार इतके बळकट केले होते की इंग्लंडच्या रॉयल नेव्हीलाही धडकी भरावी. असे काय होते टिरपीझमधे ज्याने शत्रू गटात खळबळ माजावी?

टिरपीझ ही एक महाकाय युद्धनौका होती. ७९२ फूट लांबी असलेल्या या नौकेचे वजन ४२९०० टन होते. ती ३० नॉटसच्या वेगाने मार्गक्रमण करू शके. या युद्धनौकेवर १५ इंची ८ तोफा, ५.९ इंची १२ बंदुका, ४ इंची १६ बंदुका, २१ टोर्पेडो असलेल्या ८ नळकांड्या आणि ६ विमाने असलेल्या या नौकेच्या पत्र्याची जाडी १२ इंच होती. तिचा पल्ला १९०० कि.मी. इतका होता. असे असले तरी टिरपीझमधे एक वैगुण्य होते ते म्हणजे त्याला लागणारे इंधन. युध्दकाळात इंधनाचा प्रचंड तुटवडा होताच आणि टिरपीझ चालवण्यासाठी प्रचंड इंधन लागायचे जे जर्मनीला युद्धकाळातही परवडणारे नव्हते.

९ सप्टेंबर १९४३ रोजी नॉर्वेच्या उत्तर किनार्‍यावर दाट धुक्याची चादर पसरली होती. याचवेळी वॅरेन्टसबर्ग येथील नॉर्वेच्या एका छोट्या गढीवर जर्मन नाविकदलाने हल्ला केला. या हल्ल्यात टिरपीझने ही गढी आपल्या पहिल्याच प्रहारात जमीनदोस्त केली आणि ही मोहीम थोड्या वेळात फत्ते करून ती आपल्या नाविक तळावर परतली. टिरपीझचा युद्धात झालेला हा एकमेव वापर. या हल्ल्यामुळे जर्मनीच्या शत्रू राष्ट्रांना टिरपीझच्या ताकदीची कल्पना आली. बाल्टीक समुद्रात टिरपीझच्या सहाय्याने जर्मनीने जम बसवला तर इंग्लंड आणि रशिया या दोन्ही राष्ट्रांसाठी येथे मोठे आव्हान उभे राहणार होते. याची दखल घेत टिरपीझला नष्ट करण्याच्या योजना आखल्या जाऊ लागल्या. अर्थातच ब्रिटनने या बाबतीत आघाडी घेतली.

टिरपीझ हा हल्ला करून नॉर्वेमधील कॅफ्जोर्ड येथील तळावर आली. कॅफ्जोर्डला जाण्याच्या मार्गावरील बेटांवर जर्मनीने विमानवेधी तोफा बसवलेल्या होत्या. तसेच शत्रू टिरपीझवर हल्ला करण्याच्या शक्यतेने टेहळणी करण्यासाठी विमानांचा एक ताफा ही सज्ज ठेवला होता. जेथे टिरपीझ नांगरून ठेवली होती त्या जागेत एखादी पाणबुडी येऊन मारा करेल या शक्यतेने टिरपीझ भोवती समुद्राखाली टोर्पेडो विरोधी जाळ्या बसवल्या होत्या. या जाळ्या १५०० टनी पाणबुडी भेदू शकणार नाही इतक्या मजबूत होत्या. याचबरोबर वरून हवाई हल्ल्याच्या शक्यतेचा विचार करून कॅफ्जोर्ड येथे कृत्रिमरीत्या धुके बनवणारी यंत्रणा सज्ज ठेवली होती. ब्रिटिश नाविक तळ तेथून १६०० किमी वर होता पण या आरमाराचा रशियाकडे जाणारा मार्ग मात्र टिरपीझपासून ८० किमीवर होता आणि हिच ब्रिटीशांना काळजीत पाडणारी समस्या होती. जर ही नौका नष्ट केली नाही तर अटलांटिक व आर्टिक समुद्रातील लष्करी हालचालींवर मर्यादा येणार होती. विन्स्टन चर्चिललाही याची जाणीव होती आणि त्याने ही युद्धनौका नष्ट करणे हे सर्वोच्च प्राधान्य आहे असे जाहीर केले.

टिरपीझवर हल्ला झाला असताना किनार्‍यावरून कृत्रिमरीत्या धुके बनवविण्याची यंत्रणा

१९४० साली टिरपीझवर पहिला हल्ला झाला. यावेळी या युद्धनौकेच्या बाल्टीक समुद्रात चाचण्या चालल्या होत्या. व्हिटवर्थ या दोन इंजिने असलेल्या विमानाच्या ताफ्याने तिच्यावर व्हिलेलशेफन येथे हल्ला केला. पण या हल्ल्याने टिरपीझचे फारसे नुकसान झाले नाही.

१९४२ साली ही युद्धनौका पूर्णतः तयार झाल्यावर स्टर्लिग विमानांच्या ताफ्याने टिरपीझवर पुन्हा हल्ला केला. पण खराब हवामानाने हा हल्ला फसला. मार्चमधे टिरपीझ ही रशियाच्या PQ 12 या नाविक काफिल्याच्या शोधार्थ निघाली पण टिरपीझची ही मोहिम यशस्वी झाली नाही. या फसलेल्या मोहिमेत जर्मनीकडचे ८००० टन इंधन मात्र खर्च झाले. हात हलवत परत येऊन ती ट्रॉन्डहेम येथे नांगरण्यात आली. येथे तिच्यावर तीनदा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ४ हजार टनी बॉम्ब टिरपीझवर टाकण्यात आले. पण याही वेळी खराब हवामानामुळे हे बॉम्ब आपले लक्ष भेदू शकले नाही. टिरपीझवर यानंतरही अनेक हल्ले झाले पण ते सगळे हल्ले अपयशी ठरले. विन्स्टन चर्चिलने हताश होऊन टिरपीझच्या बाबतीत एक विधान केले की ’या सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ही मोहिम यशस्वी करणार्‍याला मिळणारे बक्षीस तयार आहे पण ते कोणी घेऊ शकत नाही.’

जानेवारी १९४३ मध्ये व्हिकर्स कंपनीने सहा X-Craft पाणबुड्या ब्रिटीश नाविकदलाला दिल्या. या X-Craft पाणबुड्या लांबीला ५१ फूट होत्या आणि या छोट्याश्या पाणबुडीतून चार माणसे प्रवास करू शकत. या X-Craft मधे टोर्पेडो ठेवण्याची जागा नव्हती. त्याऐवजी या X-Craftना बाहेरील बाजूस २ टनी बॉम्ब लटकवलेले होते. ब्रिटिश नाविक दलाची अशी योजना होती की या छोट्या X-Craft नी टिरपीझच्या खाली जाऊन हे बाहेर लटकवलेले बॉम्ब तिच्या तळाला लावायचे.

ब्रिटिश X-Craft

११ सप्टेंबरला या सहा पाणबुड्या आपल्या तळावरून निघाल्या. मोठ्या पाणबुड्यांना या लहान X-Craft बांधून त्यांना न्यावे लागले कारण या X-Craft ची वाहन क्षमता १९०० कि.मी येवढी मर्यादीत होती. यावेळी टिरपीझ कॅफ्जोर्ड येथे होती व तिच्या संरक्षणार्थ आणखी दोन जर्मन बोटी तैनात केलेल्या होत्या. योजनेनुसार तीन X-Craftनी टिरपीझवर हल्ला चढवायचा आणि इतर X-Craft तैनात असलेल्या दोन बोटीचा फडशा पाडतील. पण या योजनेत सुरुवातीलाच अडथळे आले. एका X-Craftच्या यंत्रात बिघाड झाला. मोठ्या बोटीला बांधलेल्या एका X-Craft ला दोर तुटल्यामुळे जलसमाधी मिळाली तर तिसर्‍या X-Craft ला काही कारणास्तव परत फिरावे लागले. उरलेल्या तीन X-Craft मात्र आपल्या लक्षाला भेदण्यासाठी निघाल्या. १७ सप्टेंबरला हा ताफा टिरपीझजवळच्या सेरॉय आखातात पोहोचला. येथे या तीन X-Craft मोठ्या पाणबुड्यांपासून विभक्त होणार होत्या. पण त्या दिवशी मोठे वादळ झाले आणि त्यांचा बेत पुढे ढकलण्यात आला.

शेवटी २० सप्टेंबरला या तीनही X-Craft मोहीमेवर निघाल्या. २१ तारखेला ते ब्रॅथलोम येथे पोहोचले. तेथून टिरपीझ फक्त ६.५ किमी अंतरावर होती. आता त्यांचे पुढचे लक्ष होते ते टिरपीझच्या खाली जाऊन बॉम्ब डागायचे. पण यात एक मोठा अडथळा होता तो म्हणजे संरक्षक जाळीचा. टिरपीझ जेथे नांगरून ठेवली होती तेथे टिरपीझच्या बाजूने टोर्पेडो प्रतिबंधक जाळ्या बसवलेल्या होत्या. याचबरोबर टिरपीझ जिथे नांगरून ठेवली होती त्या ठिकाणापासून सुमारे ६ किमीवर आणखी एक जाळीचा पडदा होता. अशा दुहेरी जाळ्यांमधून या छोट्या X-Craft टिरपीझजवळ नेणे अत्यंत जिकिरीचे काम होते.

संरक्षक जाळी

२२ तारखेला पहाटे ते मोहीमेवर निघाले. त्यांची एक योजना अशी होती की एक X-Craft जाळीच्या जवळ जाईल. एक पाणबुड्या बाहेर जाऊन ही जाळी कापेल व पडलेल्या भगदाडातून X-Craft आत न्यायची. या योजनेच्या प्रमाणे ते निघाले तेवढयात त्यांना पाण्याखालून पाण्याच्या वरती चालणार्‍या बोटीच्या पंख्याचा आवाज आला. पेरिस्कोपमधून बघितल्यावर त्यांना असे आढळले की एक बोट टिरपीझच्या दिशेनेच निघाली आहे म्हणजे जाळीचे दार उघडे आहे. मग त्या बोटीच्याच खालून या X-Craft जाळी भेदून आत शिरल्या. पहिला अवघड टप्पा या X-Craft नी पार केला होता. आता टिरपीझच्या बाजूला असलेली जाळी ही फारतर १५ मीटर खोलवर असेल आणि या जाळी खालून आपण सहजरीत्या टिरपीझच्या खाली पोहोचू असा कयास या X-Craft च्या चालकांनी केला. पण घडले भलतेच. १५ मीटर खालून जाताना त्यांची X-Craft जाळीला धडकली. मग आणखी खाली गेल्यावर सुद्धा तोच प्रकार. ही जाळी थेट समुद्राच्या तळापर्यंत होती. आता मोहिम अर्धवट सोडून परत फिरावे या विचारात असतानाच त्यातील एक X-Craft पाण्याबाहेर आली व त्यांना या जाळीतून ही एक छोटी बोट आत जाताना दिसली. त्यांच्या नशिबाने जर्मन टेहळणी पथकाच्या नजरेत ही X-Craft आली नाही.

लगेचच या X-Craft नी त्या लहान बोटीच्या मागे जात दुसर्‍या जाळीच्या आत प्रवेश केला. पण जेव्हा ते टिरपीझपासून साधारणतः २४ मिटर अंतरावर पोहोचले तेव्हा एक आगळीक घडली. एका X-Craft चे होकायंत्र बिघडले आणि ती दिशाहीन होऊन चुकून पाण्याबाहेर आली. यावेळी मात्र ती जर्मन टेहाळ्यांच्या नजरेतून सुटली नाही. यामुळे टिरपीझवर एकच धांदल उडाली. धोक्याचा भोंगा वाजवला गेला. काही क्षण असेच गेले. त्यातच पाण्याखाली एक X-Craft कशाला तरी आदळली. तो होता टिरपीझला बाधून ठेवलेला दोरखंड. त्यातून बाहेर पडताना ती X-Craft पुन्हा पृष्ठभागावर आली. ही पाणबुडी इतकी जवळ होती की त्यांना तोफेचा वापर करता आला नाही त्यामुळे टिरपीझवरील सैनिकांनी त्यावर बंदुकीमधून गोळ्या झाडल्या. ही X-Craft पुन्हा पाण्याखाली गेली आणि ती नेमकी टिरपीझच्या खाली पोहोचली. त्या X-Craft ने मग टाईम बॉम्ब टिरपीझच्या तळाला नेऊन ठेवले. तसेच दुसऱ्या X-Craftनेही आपले बॉम्ब टिरपीझच्या मध्यभागी नेऊन ठेवले.

आता परत फिरणे अवघड आहे याची जाणीव तीनही X-Craftमधील सैनिकांना झाली कारण जाळ्यांचे दरवाजे बंद करण्यात आले होते. पाणबुडीतून बाहेर येऊन जर्मन सैन्याच्या स्वाधीन होणे हा एकच पर्याय त्यांच्यासमोर होता. त्याप्रमाणे ते पृष्ठभागावर आल्या आल्या जर्मन सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतले. तरीही त्यातील एक X-Craft पळून जाण्याचा प्रयत्न करत होती.

आणि तेवढ्यात बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटामुळे ही ४२९०० टनी बोट सहा फूट पाण्याबाहेर उचलली गेली. टिरपीझवरची इलेक्ट्रिक यंत्रणा बंद पडली, दारे अडकून बसली आणि ती ५० मीटर किनार्‍याकडे ढकलली गेली. सगळ्यात मोठे नुकसान झाले ते म्हणजे टिरपीझची तीन टर्बाईन्स निकामी झाली. मनुष्यहानी फारशी झाली नसली तरी अनेक सैनिक जखमी झाले. अशाही स्थितीत पळून जाणारी X-Craft जर्मन सैनिकांनी तोफेने उडवली.

या हल्ल्यामुळे टिरपीझचे मोठे नुकसान झाले. आता तिला दुरुस्तीसाठी जर्मनीच्या गोदीमधे नेणे आवश्यक होते. पण या गोदीकडे नेताना पुन्हा शत्रूच्या हल्ल्याची भिती असल्याने तिला आहे तिथेच दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९४३ चा संपूर्ण हिवाळा हा टिरपीझला दुरुस्त करण्यात गेला व १५ मार्च १९४४ ला टिरपीझ संपूर्ण दुरुस्त झाली. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या हल्ल्यामुळे झालेल्या टिरपीझच्या नुकसानाची बातमी ब्रिटिश नौदलाला नव्हतीच. त्यामुळे टिरपीझची दहशत अजूनही रॉयल नेव्ही वर होती.

१९४४ पासून युद्धाची दिशा बदलली व दोस्त राष्ट्रांची सरशी होऊ लागली. सप्टेंबर १९४४ मधे R.A.F. ने टिरपीझवर पुन्हा हवाई हल्ला केला. यावेळी या विमानांवर १२००० टनाचे टॉलबॉय बॉम्ब होते. टॉलबॉय बॉम्ब हे जर्मन युध्दसामग्री साठे उध्वस्त करण्यासाठी तयार केले होते जे फ्रान्स व जर्मनीतल्या साठ्यांना उध्वस्त करण्यासाठी परिणामकारक ठरले होते. या टॉलबॉय बॉम्बच्या मार्‍याने टिरपीझचे कंबरडेच मोडले व ही नौका उध्वस्त झाली.

टिरपीझला उध्वस्त करणारे टॉलबॉय बॉम्ब

खरेतर जर्मनीला ही महाकाय युध्दनौका युध्दात उतरवणे दोन कारणांनी परवडणारे नव्हते. पहिले कारण म्हणजे या युध्दनौकेला लागणारे इंधन आणि दुसरे कारण म्हणजे खुल्या समुद्रात ह्या महाकाय युध्दनौकेला झटकन वळवणे शक्य नव्हते. यामुळे वळवताना ती शत्रूंच्या टप्प्यामधे येण्याची शक्यता होती. ही दोनही कारणे जर्मन नैदलाच्या लक्षात आलेली होती. यामुळेही कदाचीत ही युध्दनौका प्रत्यक्ष युध्दामधे वापरली गेली नसावी.

टिरपीझ वर टॉलबॉय बॉम्ब हल्ला

युद्धात फारसा भाग न घेता आपली दहशत शत्रूवर ठेवणारी ही आगळी वेगळी टिरपीझची कहाणी. X-Craftच्या हल्ल्यावर पुढे थॉमस गॅलॅमर यांनी ’Twelve Against Tirpitz’ हे पुस्तक लिहिले.

कौस्तुभ मुद्ग‍ल

One thought on “भित्यापाठी….

Add yours

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: