विसाव्या शतकाची नुकती कुठं सुरुवात झालेली होती. मलिका-ए-हिंद व्हिक्टोरिया राणी ख्रिस्तवासी होऊन तिचा मुलगा एडवर्ड आता बादशहा झालेला होता. पाचेक हजार मैलांवर भारतात ब्रिटिश राजवट आता स्थिरावलेली होती. इंग्रजी शिक्षण जरी भारतात सुरू झालेलं असलं तरी हे वाघिणीचं दूध सामान्यांना अजून पुरतं पचनी पडलेलं नव्हतं. त्यामुळं मातृभाषेतून शिक्षण घेऊन व्ह.फा. (Vernacular final म्हणजे तेंव्हाची सातवी) पास झाल्यावर अनेकांच्या शिक्षणाच्या गाड्या इथंच थांबत. पुढचं शिक्षण इंग्रजीतून असल्यानं या गाड्या मंदावत आणि स्टेशनं घेत घेत सावकाश पुढं सरकत.
अशाच एका मंदावलेल्या गाडीचा चालक म्हणजे रत्नागिरीचे दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन. (रत्नागिरीत पत्ता सांगताना एवढ्यावर भागत नाही तर कुठली आळी ते सुद्धा सांगायला लागतंय. तर हे पटवर्धन खालच्या आळीतले!) लखूनानांचे हे चिरंजीव म्हणजे महाव्रात्य. मुलाला समुद्राची अफाट ओढ, कोळी,मचवेवाले दालदी याचे दोस्त, समुद्रावर आणि समुद्रात दिवसेंदिवस घालवणे, आट्यापाट्या खेळण्यात वेळ काढणे आणि परीक्षा आली की चार दिवसात कसाबसा अभ्यास करून पास होणे हा याचा एकूण आयुष्यातला कार्यक्रम. काही वर्षे हा कार्यक्रम उत्तम चालला पण इंग्रजी पाचवीत म्हणजे आजच्या हिशोबात बारावीला मात्र त्यांची गाडी मंदावली. दोनदा परीक्षेत आपटी खाल्ल्यावर एक दिवस जेवणाच्या ताटावरच वडिलांशी वाद झाला आणि दत्तात्रेयांनी घराकडं पाठ फिरवली. निघताना वडिलांसमोर हजार रुपये महिन्याला मिळवीन तेंव्हाच परत येईन ही भीष्मप्रतिज्ञाही केली. मित्रमंडळी आणि ओळखीतल्या लोकांकडून चवली-पावली गोळा करून करून कोल्हापूरचा रस्ता धरला. मनसुबा मुंबापुरी गाठण्याचा असला तरी बोटीच्या तिकिटाएवढे पैसे खिशात नसल्याने त्यांनी खुष्कीच्या मार्गाने मुंबईकडे कूच केले. मजल दरमजल करत कोल्हापूर गाठल्यावर दत्तोपंतांनी तिथून रेल्वेने विनातिकिट मिरज आणि नंतर मुंबई अशी मजल मारली.
मुंबईत रत्नागिरीचे चाकरमाने भरपूर.त्यामुळं दत्तोपंतांनी आपल्या ओळखीच्या मंडळींना शोधून त्यांच्याकडे मुक्काम ठोकला आणि त्यांच्याच ओळखीने रेल्वेत गुडस क्लार्क म्हणून चिकटले. एखाद्याची गोष्ट इथंच संपली असती आणि शिरस्त्याप्रमाणे फार तर हेडक्लार्क म्हणून तो पेन्शनीत निघाला असता. पण दत्तोपंतांचा पिंड वेगळाच होता. सतत रेल्वेशी संबंध आल्यानं तिथल्या ब्रिटिश, अँग्लोइंडीयन आणि पारशी इंजिन ड्रायव्हरांचा रुबाब, त्यांचं ते टेचात रहाणं दत्तोपंतांना फार आवडायचं. त्यामुळं आपणही त्यांच्यासारखं इंजिन ड्रायव्हर व्हावं ही इच्छा दत्तोपंतांच्या मनात निर्माण झाली.
प्रयत्न तरी करून बघावा म्हणून दत्तोपंत एके रविवारी सरळ बीसीसीआय रेल्वेचे मुख्य इंजिनियर स्मिथसाहेबांच्या घरी जाऊन धडकले आणि आपली इच्छा त्यांना सांगितली. स्मिथसाहेबानं या पोराच्या डोळ्यातली महत्वाकांक्षा हेरली आणि त्यांना स्वतःचं शिफारसपत्र दिलं. पण हा मराठी पोरगा तिथल्या देशी-विदेशी साहेबांच्यात कसा घुसावा म्हणून त्याचं पुन्हा बारसं करून त्याला अँग्लोइंडियन करून टाकलं. दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन आता झाले डी लॅकमन पॅट. निळसर डोळे, तांबूस गोरापान रंग आणि दणकट शरीरयष्टीमुळं त्यांना हे नाव शोभूनही दिसू लागलं.बंगालमधल्या खडकपूर ट्रेनिंग स्कुलातून एक वर्षाचं शिक्षण पूर्ण करून दत्तोपंत नाही डी लॅकमन पॅट पुन्हा मुंबईत आले. पहिल्यांदा त्यांना लोकल गाडीच्या फायरमनचे काम देण्यात आले आणि पुरेसा कामाचा अनुभव आल्यावर ते इंजिन ड्रायव्हर झाले.
आता एखाद्याने इथंही समाधान मानून थांबायला हरकत नव्हती पण पॅटची महत्वाकांक्षा अजूनही शिल्लक होती. लहानपणापासून रत्नागिरीत आणि नंतर मुंबईत मोठमोठी जहाजं बघून त्यांच्या मनात आपण दर्यावर्दी व्हावं ही सुप्त इच्छा होतीच. यासाठीचं शिक्षण देणारं त्याकाळचे उत्तम विद्यापीठ होतं जर्मनीत हॅम्बुर्गला आणि आता तिथं कसं पोहोचावं याचे विचार पॅटच्या डोक्यात सुरू झाले. इंजिन ड्रायव्हरचं काम करता करता माटुंग्याच्या रेल्वे वर्कशॉपमधल्या जोडल नावाच्या एका जर्मन फोरमनशी पॅटची दोस्ती झाली. या जोडलचा भाऊ हेन्रीक हा मुंबई ते हॅम्बुर्ग बोटीवर पेटी ऑफिसर म्हणून काम करत असे. जोडलशी गप्पा मारतानाच आता पॅटच्या डोक्यात आपले दर्यावर्दी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा तरळू लागली. मग हेन्रीकशी संधान बांधून पॅट साहेबांनी जर्मनीला जाण्याचा चंग बांधला. हेन्रीकने चोरून पॅटना आपल्या बोटीवर घेतलं आणि बोट किनारा सोडून समुद्रात खोलवर पोचल्यावर पॅटना आपल्या एमिट नावाच्या कॅप्टनपुढं उभं केलं.
खवळलेल्या एमिटने प्रश्नांची सरबत्ती केल्यावर पॅटने साळसूदपणे आपण स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेला असल्याने ब्रिटिश सरकार आपल्याला पासपोर्ट देत नसल्याचं कारण पुढं केलं आणि आपली हॅम्बुर्गला शिकायला जाण्याची इच्छाही सांगितली. एमिटला हे कारण पटलं. त्याने पॅटना जर्मनीला घेऊन जाण्याचं मान्य केलंच शिवाय बोटीच्या इंजिनरूममध्ये तात्पुरतं कामही दिलं. हॅम्बुर्गला पोचल्यावर एमिटने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर पॅटना उभं केलं, पॅटने आपल्याला दर्यावर्दी व्हायचं आहे आणि त्यासाठी हे धाडस केल्याचं मान्य केलं. या अधिकाऱ्यांनी मग काही खटपट करून पॅटना तात्पुरतं जर्मन नागरिकत्व मिळवून दिलं आणि हॅम्बुर्गच्या विद्यापीठात प्रवेशही मिळवून दिला. ( हा कोर्स जर्मन भाषेत होता की इंग्रजी? जर्मन भाषेत असल्यास पॅटना जर्मन भाषा येत होती काय वगैरे प्रश्न मलाही पडलेले आहेत.) पॅटचं शिक्षण सुरू झालं, विद्यापीठात काम करत शिकण्याची सोय असल्याने पॅटचा खर्चही परस्परच भागत होता. दोन वर्षांचा मरीन स्कुलचा कोर्स पूर्ण झाल्यावर त्यांनी लगेच ग्लासगोच्या नॉटिकल स्कुल मधून इंजिन अटेंडंट आणि कोस्टल नेव्हीगेशनचा कोर्सही पूर्ण केला. (काही ठिकाणी त्यांनी हे कोर्स स्कॉटलंडमध्ये केले अशीही माहिती सापडते)
आता सगळा समुद्र पॅटसाठी मोकळा होता. पदवीच्या जोरावर पॅटना लिव्हरपूल ते न्यूयॉर्क प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या बोटीवर नोकरी मिळाली. दोन-तीन वर्षे ती नोकरी करून बक्कळ पैसा गाठीशी बांधल्यावर पॅटना आता घराची ओढ लागली. साधारणतः १९१२ किंवा १३ साली ते आधी मुंबईला आणि तिथून रत्नागिरीला आले. तुकाराम बोटीतून उतरलेल्या सफेद अर्धी चड्डी, अर्ध्या बाह्यांचा शर्ट आणि नौदलाची टोपी अशा पोशाखातल्या रत्नागिरीच्या या दत्तू पटवर्धनाला आधी त्यांच्या स्वागताला आलेल्या कुणीही ओळखलं नाही. पण त्यांची ओळख पटल्यावर दोन बैलांच्या धमणीतून त्यांची जंगी मिरवणूक निघाली. रत्नागिरीत दत्तोपंतांनी दीड-दोन वर्षं मुक्काम केला. त्या दरम्यान त्यांचं लग्न झालं, एक मुलगाही झाला आणि बाळंतपणानंतर लगेच त्यांच्या पत्नीचं निधन झालं. त्याच दरम्यान त्यांचे वडील लखूनाना यांनीही देवाज्ञा झाली. आपल्या छोट्या मुलाला आईच्या पदरात टाकून विमनस्कपणे पॅटनी पुन्हा इंग्लंडचा रस्ता धरला.इंग्लंडमध्ये पोचून पुन्हा त्यांची जहाजावरची नोकरी सुरू झाली, मागच्या सगळ्या गोष्टी विसरून पॅट पुन्हा धडाडीने कामाला लागले. याच दरम्यान जगावर पहिल्या महायुद्धाच्या सावल्या पसरू लागलेल्या होत्या. युद्धाला तोंड फुटले लौकरच इंग्लंडही युद्धात उतरले. इंग्लडमध्ये युद्धाची धामधूम चालू झाली आणि सरकारने तरुणांना लष्करभरतीचे आवाहन केले.
पॅटनी ताबडतोब ब्रिटिश आरमार किंवा लष्करात भरती होण्यासाठी अर्ज केला पण वंशाने भारतीय म्हणून त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. मग पॅट अम्ब्युलन्स कोअरमध्ये भरती झाले आणि प्रथमोपचार, शुश्रूषा वगैरेचे प्रशिक्षण घेऊन रणभूमीवर पोचले. काही दिवसांतच त्यांचा निडरपणा आणि धडाडी बघून त्यांना लष्करात भरती करण्याबद्दलची शिफारस त्यांच्या वरिष्ठांनी केली.एव्हाना युद्धाने चांगलाच जोर पकडलेला होता आणि जिथून मिळतील तिथून सैनिकांची भरती सुरू झालेली होती. पॅटना भारतीय पलटणीपेक्षा एखाद्या ब्रिटिश पलटणीतच जाण्याची फार इच्छा होती म्हणून त्यांना ससेक्स रेजिमेंटमध्ये भरती करून घेण्यात आले. त्यांची तडफ बघून १९१५ साली त्यांना त्याच पलटणीत मशीनगन सेक्शनमध्ये घेण्यात आले.
१९१६ साली फ्रान्समध्ये लढताना मांडीत दोन गोळ्या घुसून पॅट जखमी झाले. त्यातून बरे झाल्यावर काही काळ त्यांनी गुप्तवार्ता खात्यातही काम केलं. पण त्यांच्याकडे असणारे तांत्रिक कौशल्य लक्षात घेऊन त्यांना रॉयल एअरफोर्समध्ये एअर मेकॅनिक करण्यात आलं. तिथल्या परीक्षा पास होत होत त्यांनी ब्रिटिश हवाईदलात लेफ्टनंट म्हणून कमिशन मिळवलं. पॅटच्या या सगळ्या कर्तृत्वाची दखल ब्रिटिश वर्तमानपत्रांनीही घेतली आणि त्यांच्याबद्दल ‘A Manly Young Maratha’ असे गौरवोद्गार काढले.
पहिलं महायुद्ध संपलं आणि रणभूमीवर शौर्य गाजवणारे सैनिक घरोघर परतले. पॅटही रत्नागिरीला आले आणि आईबापांच्या प्रेमाला पारख्या असलेल्या आपल्या मुलाला त्यांनी जवळ घेतलं. पॅटच्या पराक्रमाची दखल भारतीय वर्तमानपत्रांनीही घेतली होती. केसरीत त्यांच्याबद्दल लेखही छापून आला होता. त्यामुळं परत आल्यावर जागोजागी त्यांचे सत्कार करण्यात आले. सांगलीचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांनीही आपल्या कुळातल्या या पराक्रमी व्यक्तीचा सत्कार केला.आयुष्याची पुढची वाटचाल करण्याच्या दृष्टीने पॅटनी अमरावतीच्या चंद्रा शेवडे यांच्याशी विवाह केला. काही काळ भारतात राहिल्यावर पत्नी आणि चिरंजीवांसहित इंग्लंडला जाऊन ते पुन्हा आपल्या हवाईदलाच्या नोकरीत रुजू झाले. १९२१ ते २८ एवढा काळ इंग्लंडमध्ये काढल्यावर त्यांच्या पत्नीला तिथले हवामान सोसेनासे झाले म्हणून त्यांनी भारतात बदली मागून घेतली. सिकंदराबादमधल्या लष्कराच्या राखीव दलात त्यांची अधिकारी नेमणूक करण्यात आली.
पण गोष्ट इथंही संपत नाही…
सरकारी नोकरी, मिळणारा उत्तम पगार आणि समाजात मान असतानाही पॅटच्या मनात आपला देश, त्याचं पारतंत्र्य कुठंतरी टोचत होतं. १२ मार्च १९३०ला गांधीजींनी दांडीयात्रा अर्थात सविनय कायदेभंगाची घोषणा केली आणि देशभर त्याच्या ज्वाळा भडकल्या. दत्तोपंत सिकंदराबादमधून निघून थेट दांडीयात्रेत सामील झाले. ऐषारामी आयुष्य आणि पदकांनी सजलेला सैनिकी गणवेश त्यागून त्यांनी जाडीभरडी खादी अंगावर चढवली. ही बातमी सिकंदराबादला जाऊन पोचल्यावर तिथं भयंकर खळबळ उडाली. आपला एक उत्तम अधिकारी आणि त्याचा स्वातंत्र्य चळवळीत सहभाग ही कल्पनाही ब्रिटिश सरकारला सहन होत नव्हती. दत्तोपंतांना ताबडतोब बडतर्फ करण्यात आलं, त्यांच्या पत्नी आणि मुलांना सरकारी घरातून बाहेर काढण्यात आलं.
काही काळानंतर दत्तोपंत आणि कुटुंब आपल्या रत्नागिरीच्या घरी परत आले. आता त्यांच्यापुढे निर्वाहाचा प्रश्न उभा होता. किरकोळ उद्योगधंदा करून दत्तोपंत आपला प्रपंच चालवू लागले. त्याशिवाय स्काऊट संघ स्थापन करून ते तरुणांना सैनिकी पेशासाठी तयार करण्यासाठीही धडपड करत होते.पण परिस्थिती एकूण हलाखीचीच होती.
१९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि पुन्हा भारतात मोठ्या प्रमाणावर सैनिक भरती सुरू झाली. अशा प्रसंगी शांत बसेल तो सैनिक कुठला? दत्तोपंतांनी थेट दिल्ली गाठली आणि व्हाईसरॉय लिनलिथगोची भेट घेतली. व्हाईसरॉयला आधी वाटले की आपली पेन्शन सुरू करावी यासाठी दत्तोपंत इथं आलेले आहेत पण दत्तोपंतांनी हिटलरशी लढण्यासाठी आपल्याला लागणारे मनुष्यबळ आणि माझ्यासारखे हजारो योद्धे तयार व्हावेत म्हणून मला सरकारची मदत करण्याची संधी आपल्याला मिळावी हा आपल्या भेटीचा हेतू असल्याचे व्हाईसरॉयला सांगितले. लिनलिथगोला हे पटले आणि तेंव्हा नुकत्याच तयार झालेल्या ऑल इंडिया मिलिटरी स्कुल या लष्करी अधिकारी घडवणाऱ्या संस्थेत दत्तोपंतांना पुन्हा स्थान देण्यात आले. भरती झालेल्या युवकांना पैलू पाडून अधिकारी करण्याचे काम दत्तोपंत उत्साहाने करू लागले. पण हळूहळू दत्तोपंतांची प्रकृती ढासळू लागली आणि त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले.आणि या कॅन्सरशी झगडतानाच २६ ऑगस्ट १९४३ साली त्यांचे निधन झाले.
टिपा/स्पष्टीकरण –
१.या लेखासाठी रत्नागिरीच्या गुरुनाथ कुलकर्णी नावाच्या एका लेखकाने १९७६ साली साप्ताहिक माणूस मध्ये लिहिलेला एक लेख, इंटरनेटवर सापडलेली काही माहिती आणि ब्रिटिश वर्तमानपत्रे लंडन गॅझेट व द ग्राफिक संदर्भ म्हणून वापरलेले आहेत. ब्रिटिश दप्तरातली ही माहिती लंडनस्थित संकेत कुलकर्णी या माझ्या मित्राने मला मिळवून दिली. मिळालेल्या संदर्भांची एक महत्वाची मर्यादा म्हणजे गुरुनाथ कुलकर्णी यांच्या लेखातली बरीचशी माहिती ही अतिशयोक्तीपूर्ण आहे हे लक्षात आल्याने त्यातला बराचसा भाग मला गाळून टाकावा लागला. लेखातील महितीपेक्षा वेगळी आणि विश्वासार्ह माहिती मिळाली तर लेखात जरूर ते बदल नक्की केले जातील.
२. लेख लिहिताना मी घटनांची वर्षे फारशी लिहिलेली नाहीत कारण त्याबद्दलची विश्वासार्ह माहिती मला मिळालेली नाही.
३. कुलकर्णींचा लेख, गेल्या काही वर्षातली भारतीय वर्तमानापत्रे आणि नेटवरचे संदर्भ पॅट हे पहिले भारतीय पायलट आणि त्यांनी जर्मनीवर बॉम्बिंग केलं वगैरे माहिती देतात पण पॅटच्या सर्व्हीस कार्डवर ते पायलट असल्याची नोंद नाही. शिवाय जर्मनीवर हवाई हल्ला केलेल्या पायलट्सच्या यादीतही त्यांचे नाव आढळत नाही.
४.कुलकर्णींच्या लेखात आणि इतर काही ठिकाणी पॅटना जर्मनीवर बॉम्बिंग केल्याच्या पराक्रमाबद्दल किंग्ज मेडल मिळाले असे उल्लेख आढळतात पण ते मेडल मिळालेल्या लोकांच्या यादीत पॅटचे नाव नाही.
५. या निमित्ताने पहिल्या महायुद्धात पायलट असणाऱ्या पहिली भारतीय व्यक्ती कोण या प्रश्नाचेही उत्तरही सापडले. लेफ्टनंट हरदितसिंग मलिक हे पहिले भारतीय पायलट. हरदितसिंग हे १९८५ पर्यंत जिवंत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते काही काळ कॅनडा आणि फ्रान्समध्ये भारतीय उच्चायुक्त म्हणूनही कार्यरत होते. त्यांची १९७० साली दूरदर्शनने घेतलेली मुलाखत येथे उपलब्ध आहे. http://vimeo.com/40764466 अर्थात या बाबतीतही मतभेद आहेच.
६. लेफ्टनंट श्रीकृष्ण वेलींगकर हे पहिले मराठी पायलट. मूळचे मुंबईचे असणारे वेलींगकर केम्ब्रिजमध्ये शिकत असताना ब्रिटिश हवाईदलात भरती झाले आणि २७ जून १९१८ ला जर्मनीत त्यांचे विमान कोसळून ते मृत्युमुखी पडले. यांची याहून अधिकची माहीती सध्यातरी माझ्याकडे नाही.
७. दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धनांचे वंशज सध्या मुंबईत असतात अशी माहिती मला मिळाली पण त्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकलेलो नाही.
८. सांगलीचे महाराज श्री चिंतामणराव पटवर्धन यांनी दत्तोपंतांचा सत्कार केल्याची माहिती मी दिली आहेच पण पुढच्या काळात त्यांचे पुत्र युवराज श्री प्रतापसिंह पटवर्धन हे सुद्धा ब्रिटिश हवाईदलात पायलट होते आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान मद्रासजवळ त्यांचा एका विमान अपघातात मृत्यू झाला.
या सगळ्या अपुऱ्या माहितीच्या जंजाळातून एक मात्र लक्षात येतं की जर्मनीवरच्या हवाईहल्ल्यात पॅट असोत किंवा नसोत, त्यांना किंग्ज मेडल मिळालेलं असो किंवा नसो पण त्यांच्या कर्तुत्वाची झळाळी कुठंही कमी नाही. एवढी जिद्द आणि धडाडी असणारा मागच्या शतकातला हा ‘Manly Young Maratha’ एक विलक्षण गृहस्थ होता हे नक्की.
यशोधन जोशी
Khup chan
LikeLike
Nice article and your approach to stick to authentic information and to avoid the temptation of over glorifying is commendable.
LikeLiked by 1 person
Fantastic information.
LikeLike
jabardast
LikeLike