काय गंमत आहे पहा ! ज्यावेळी वाडा संस्कृती नांदत होती, त्यावेळी दारात तुळशीचं दर्शन होई. कधी दारासमोर टांगलेल्या एखाद्या पत्र्याच्या डब्यात किंवा घर प्रशस्त असेल, वाडा असेल तर कमरभर उंचीच्या वृंदावनात. मजा म्हणजे वृंदा हे तुळशीचंच दुसर्या एका जन्मातलं नाव. तरी शब्दप्रयोग असायचा ’तुळशी वृंदावन’. या तुळशीत देवाचं तीर्थ टाकलं जायचं. काही गृहिणींचा नियम असे. तुळशीला पाणी घातल्यावर मगच भोजन करायचं. आज सगळीकडे गॅसवर अन्न शिजवलं जातं. गॅस नव्हता तेव्हा चुलीवर लाकडं वा कोळशाच्या मदतीने स्वयंपाक होत असे. सतत धुरात काम केल्यावर तुळशीची पूजा करायला परसदारी वा अंगणात येणं हा केवढा दिलासा असे.
तुळशीचं महत्व धर्म आणि परंपरेत आढळून येते. तुलसीपत्र ठेवणं म्हणजे दानविधीतला अखेरचा टप्पा. दक्षीणा देताना त्यावर ओलं करून तुळशीपत्र ठेवतात. बहुधा ही प्रथा श्रीकृष्णदान या भगवंताच्या आयुष्यातील एका नाट्यमय प्रसंगापासून सुरु झाली असावी. श्रीकृष्णाच्या वजनाएवढं सोनं द्यायला सत्यभामा तयार झाली. तिचे अलंकारच नव्हेत, तर द्वारकेतील सर्व सोनं पारड्यात टाकलं तरी कृष्णाचं पारडं जडच! अखेर रुक्मिणीदेवीला पाचारण केलं. तिनं स्वतःचा एक अलंकार आणि त्यावर एक तुलसीपत्र ठेवून ते पारड्यात टाकलं आणि भगवंतांना नमस्कार केला. श्रीकृष्णाचं पारडं वर उचललं गेलं. श्रीकृष्ण तुळेच्या नाटकाची अशी सांगता झाली.
तुलसी या शब्दाची फोड तुल-सी म्हणजे अतुलनीय, हिच्यासारखी हीच अशी केली जाते.
आज कोविड १९ च्या महामारीच्या विळख्यात सापडलेल्या, संभ्रमावस्थेत असलेल्या माणसांना तुळशीची आठवण झाली. सुख मावळते आणि जिवावर संकट कोसळते! तेव्हा तुझी आठवण येते ही आपली कायमचीच वृत्ती.
पण तुळसच का आठवली? व्यावहारिक कारण म्हणजे तुळशीचं रोप सहज उपलब्ध होतं. ते फारशी जागा व्यापत नाही. त्याला संभाळणं सोपं असतं. मुख्य म्हणजे श्री विष्णु, त्यामुळे श्रीराम, श्रीकृष्ण आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचं कुलदैवत श्री विठ्ठल यांना तुळस अतिशय प्रिय आहे. वैंजयंती माळ या देवतांंच्या पूजनात महत्वाची आहे. हिंदु रीतीरिवाज जाऊ देत पण मुस्लिम बांधवांचा सब्जा ही सुध्दा तुळशी प्रजातीतील एक जाती आहे.
सध्या कोविड १९ काळात वर्तमानपत्रांमधून अनेक वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. ऑक्सिजन वायूच्या तुडवड्यामुळेतर सगळीकडे हाहाकार माजवला आहे. अशातच एक बातमी आली ती म्हणजे गेल्या आठवड्यात रोपवाटिकेत तुळशीच्या रोपांच्या मागणीत अचानक वाढ झाली. कुठेतरी वदंता उठली की इतर झाडांच्या किंवा वनस्पतींच्या तुलनेत तुळस ही अधिक प्रमाणात ऑक्सिजन हवेत सोडते. तेसुध्दा रात्रंदिवस! मात्र वैज्ञानिक सत्य असे की कोणतीही हरित वनस्पती केवळ दिवसाच ऑक्सिजन हवेत परत करते. याचं कारण हरित वनस्पती दिवसा म्हणजे सूर्यप्रकाशात हवेतील कार्बन डाय ऑक्साईड वापरतात. या कार्बन डाय ऑक्साईड आणि पाण्यातील हायड्रोजन यांचे सौर्य उर्जेच्या साहाय्याने संयुग तयार होते. हे संयुग म्हणजे कर्बोदके. पाण्यातून हायड्रोजन वेगळा होतो आणि ऑक्सिजन मुक्त होतो तो वातावरणाचा भाग बनतो.
लक्षात असू दे की केवळ सुर्यप्रकाशातच ही क्रिया घडून येते. रात्री नाही. पाण्याचं विघटन होऊन त्यापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन तयार होणं ही प्रकाश–रासायनिक (Photochemical Reaction) क्रिया आहे. तेव्हा सूर्यप्रकाश नाही तर पाण्याचं विघटन होऊन त्यापासून ऑक्सिजन निर्माण होणं शक्यच नाही. फारच अधिक तीव्रतेचे दिवे लावले तरच ही प्रक्रीया होऊ शकेल! पण दारात किंवा व्हरांड्यातील तुळशीला असं रात्री तीव्र क्षमतेचे दिवे लावून वाढवायचं का?
तेव्हा तुळस अवश्य घरी आणा. पण तिच्या पासून २४ तास ऑक्सिजन मिळेल अशी ’अंधश्रध्दा’ मनात बाळगू नये. बिचारी एवढीशी वनस्पती! दिवसा तरी किती ऑक्सिजन तयार करणार?
आकडेवारी असं सांगते ही दर दिवशी दर माणशी रुग्णालयात वापरले जाणार्या ऑक्सिजन सिलिंडरच्या क्षमतेचे तीन सिलिंडर ऑक्सिजन माणसाला आवश्यक असतो. आपण ऑक्सिजन वापरतो तो अगदी फुकट असतो. पण कोविड १९ चा विळखा बसलेल्यांना ऑक्सिजनची किंमत रुपयाच्या स्वरुपात आणि प्रत्यक्ष जीवनात किती याची जाणीव नक्की झालेली आहे.
डॉ. हेमा साने
वृंदेची कथा अशी आहे. वृंदाचा पति राक्षस होता आणि त्याचे आणि विष्णुचे युद्ध झाले. त्याला जिंकणे जमत नव्हते. तेव्हा विष्णुने वृंदेशी डील करायचे ठरवले. त्याचा जीव कशात आहे हे तिने सांगावे. तिने विचारले, माझा पति मेला, तर माझे काय ? विष्णु म्हणाला, कि तो तिच्याशी लग्न करेल ! तिने पॉईंट काढला, कि तूला ऑलरेडी इतक्या बायका आहेत, तर माझी पोझिशन काय असेल ? तर तो म्हणाला, माझ्या आयूष्यात तूझे स्थान मीठासारखे असेल. पुढे तो राक्षस हरला आणि त्याचे मस्तक हातात घेऊन, वृंदा सती गेली. तिच्या राखेतून तुळस निर्माण झाली. विष्णुच्या वचनाची आठवण, म्हणून दरवर्षी तिचे लग्न लावले जाते तसेच नेवैद्यात मीठ वाढत नाहीत, तर तुळशीचे पान ठेवतात.
LikeLiked by 1 person
माझ्या ऐकण्यात आलं आहे की,पिंपळ हे रात्रं दिवस आँक्सीजन सोडणारं एकमेव झाड आहे हे बरोबर आहे का ?
LikeLike
नाही. लेखात ऑक्सिजन निर्माण होण्याची प्रक्रिया दिली आहे.
LikeLike