आपल्याकडे काही प्रथा पडून गेलेल्या असतात. म्हणजे एखादी महिला निरनिराळ्या क्षेत्रांमधे काम करते आणि त्या क्षेत्रातल्या पुरुषांपेक्षा ते काम उच्च दर्जाचे असेल तर अशा महिलेला टॉमबॉय, व्हॅगॅबॉण्ड, ढालगज अशी शेलकी विशेषणे लावली जातात. कदाचित पुरुषप्रधान संस्कृतीला बसलेला हा धक्का जबरदस्त ठरत असावा की त्या महिलेला अशा शेलक्या विशेषणांनी संबोधून कमीपणा देण्याचे काम केले जाते.
अशाच एका कर्तृत्ववान महिलेचा जन्म झाला १९०२ साली. नृत्य, चित्रपटात अभिनय, गिर्यारोहण, चित्रपट दिग्दर्शन, फोटोग्राफी अशी वेगवेगळी क्षेत्रात तिने काम केले आणि या सगळ्या क्षेत्रात तिने वाखाणण्यासारखी कामगिरी केली. अर्थात तिच्या चित्रपट दिग्दर्शनाच्या कार्याला थोडी काळी किनार होती. पण त्यामुळे तिच्या कर्तृत्वाला कुठेही उणेपणा येत नाही. १०२ वर्षांचे दीर्घ आयुष्य आणि वयाच्या ९० वर्षांपर्यंत सृजनशील काम करत राहणारी ही महिला होती लेनी राईफेन्स्टाल.
२२ ऑगस्ट १९०२ साली लेनीचा जन्म बर्लिन मधे झाला. तिचे वडील बर्लिन मधील प्रसिद्ध उद्योगपती होते. लहानपणापासूनच लेनीला निसर्गाची आवड. तिच्या आईने तिच्या या स्वभावाला खतपाणी घातले. वयाच्या १६ व्या वर्षापासून तिने स्टेजवर नृत्याचे कार्यक्रम सुरू केले आणि थोड्याच कालावधीत तिला अमाप प्रसिद्धी मिळाली. मात्र तिच्या वडिलांचा याला विरोध होता. तिने या विरोधाला फारसे जुमानले नाही. पण तिच्या नशिबात नृत्य नव्हते. एका अपघातात गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तिला आपले नृत्य सोडावे लागले. पण हीच नृत्याच्या कारकिर्दीने तिच्यासाठी पुढचे दार उघडले गेले.

डॉ. अर्नोल्ड फ्रॅन्क, हे जर्मनीतले एक सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांचे सगळे चित्रपट हे निसर्गरम्य पर्वतांच्या परिसरात चित्रित केले जात. पर्वतांच्या उंच शिखरांवर संपूर्ण युनिटसह जाऊन चित्रीकरण करणे हे त्यांच्या चित्रपटांचे वैशिष्ठ्य होते. त्यांचा ’Mountain of Destiny’ हा चित्रपट पाहून लेनी अतिशय प्रभावीत झाली. फ्रॅन्क यांनीही लेनीचे नृत्याचे कार्यक्रम बघितले होते. नृत्यातील तिचे चापल्य आणि अभिनयामुळे लेनीची फ्रॅन्कवर छाप पडली. लेनी दिसायलाही सुंदर आणि आकर्षक होती. फ्रॅन्कने आपल्या पुढल्या सात चित्रपटांसाठी करारबद्द केले. ’The Holy Mountain’, ‘The White Hell of Piz Palu’, ‘S O S Iceberg’ हे त्यातले काही चित्रपट. हे सगळे चित्रपट पर्वतराजींमधून चित्रित करण्यात आले. निसर्गसौंदर्याने मोहित झालेली एक आकर्षक तरुणी वेगवेगळी साहसे करत दुष्ट प्रवृत्तींशी लढते हे या सगळ्या चित्रपटांचे कथानक. याच चित्रपटांमधे साहसी दृश्ये करताना तिला गिर्यारोहण शिकावे लागले आणि अल्पावधीतच तिने त्यात प्राविण्य मिळवले. उंच उंच कड्यांवर दोर न वापरता वर चढण्याची अनेक दृश्ये या चित्रपटांमधे लेनीवर चित्रित केली गेली. यानंतर ती गिर्यारोहणाच्या प्रेमात पडली. जर्मनीमधे एक उत्कृष्ठ गिर्यारोहक म्हणून तिचे नाव घेतले जाऊ लागले. पण आता चित्रपटातल्या अभिनयाच्या कारकिर्दीला वेगळेच वळण लागणार होते.

चित्रपटात अभिनय करतानाच तिला दिग्दर्शनाविषयी आकर्षण निर्माण झाले. १९३२ साली ’The Blue Light’ नावाचा चित्रपट हा आपला पहिला चित्रपट तिने दिग्दर्शित केला. हा चित्रपट प्रचंड गाजला. समीक्षकांनीही या चित्रपटाविषयी गौरवोद्गार काढले.

याच काळात जर्मनीमध्ये नाझी पक्षाचा प्रभाव वाढत चालला होता. हिटलर हा चित्रपटांचा चाहता होता आणि त्याने ’The Blue Light’ बघितला. याच काळात लेनी आणि हिटलरची भेट नाझी पक्षाचा प्रचारप्रमुख गोबेल्सने घडवून आणली. त्यावेळी हिटलरने लेनीला सांगितले की जेव्हा आम्ही सत्तेवर येऊ तेव्हा तुला आमच्यासाठी माहितीपट बनवण्याचे काम देण्यात येईल आणि त्याचप्रमाणे हिटलरने सत्तेवर येताच आपल्या नाझी पक्षासाठी प्रचारपट बनविण्याचे काम लेनीवर सोपवले. हिटलरच्या या भेटीने व त्याचे आत्मचरित्र ’माईन काम्फ’ वाचून लेनी अतिशय प्रभावीत झाली. हिटलर आणि लेनी आता वरच्यावर भेटू लागले आणि हिटलर हा लेनीच्या प्रेमात पडल्याच्या अफवा ही उठल्या.

हिटलरने जर्मनीतील सत्ता काबीज केली आणि लेनीने नाझी पार्टीवर ’Victory of Faith’ नावाचा एक प्रचारपट बनवला. या प्रचारपटामुळे लेनीला आपल्या उणिवांची जाणीव झाली. त्यानंतर तिने १९३५ मधे ‘Day of Freedom’ नावाचा आणखी एक प्रचारपट बनवला. मात्र अजूनही अपेक्षीत असलेले कौशल्य तिला गवसले नव्हते. या दोन्ही प्रचारपटांसाठी सत्ताधाऱ्यांचे सर्व प्रकारचे पाठबळ होते. मात्र लेनी अजूनही समाधानी नव्हती.
याच अभिमानापासून तिने केलेला पुढला प्रचारपटानी केवळ जर्मनीच नव्हे तर जगभरात वाहवा मिळवली. ’Triumph of the Will’ नावाच्या प्रचारपटाने इतिहास घडवला. या प्रचारपटात लेनीने वापरलेली तंत्र पाहून जगभरातील मोठमोठे दिग्दर्शक अचंबित झाले. हा प्रचारपट काळाच्या पुढचा होता. आजही अनेक चित्रपट संस्थांमधील अभ्यासक्रमात तेथील विद्यार्थ्यांना हा प्रचारपट दाखवला जातो. लेनीला या प्रचारपटाच्या निर्मितीसाठी सर्व साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली होती. न्युरेनबर्ग येथे नाझी पार्टीच्या मेळाव्या दरम्यान या प्रचारपटाचे चित्रीकरण करण्यात आले. उत्कृष्ट जर्मन कॅमेरे, विमानातून केलेले चित्रीकरण, उत्कृष्ट संकलन यामुळे हा प्रचारपट अत्यंत गाजला.

१९३६ साली बर्लिन मधे ऑलिंपिकचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने लेनीने ’Olympia’ नावाचा माहितीपट बनवला होता. दोन भागात प्रदर्शित झालेला हा माहितीपटही जगभर गाजला. याच्या पहिल्या भागात प्राचीन ग्रीक ऑलिम्पिक्स व दुसर्या भागात प्रत्यक्ष ऑलिम्पिक दरम्यानचे चित्रीकरण होते. ऑलिम्पिकच्या पूर्वतयारी दरम्यान तिने धावपटू, जलतरणपटू अशा अनेक खेळाडूंच्या सरावाचे चित्रीकरण करून ठेवले होते. जलतरणपटूंचे चित्रीकरण करताना तिने पहिल्यांदा पाण्याखाली (Underwater) चालणारे कॅमेरे वापरून चित्रीकरण केले. याच चित्रिकरणाचा तिने संकलन करताना बेमालूम वापर केला.

यानंतर युध्द चालू झाले आणि लेनी युद्धाच्या चित्रीकरणासाठी प्रत्यक्ष युद्धभूमीवर गेली. पण त्यात तिला फारसे यश आले नाही. दोस्त राष्ट्रांनी हिटलरला दुसर्या महायुद्धात पराभूत केले आणि हिटलरच्या संपर्कात असलेल्या सर्व व्यक्तींवर आता ते नजर ठेवून होते. यात लेनीचाही समावेश होता. तिच्यावर नाझी पार्टीला मदत केल्याचे आरोप होऊ लागले. लेनीने आपण नाझी पार्टीचे सभासदत्व घेतले नव्हते असे सांगून हे आरोप फेटाळून लावले. असे असले तरी लेनी ही हिटलर आणि त्याच्या नाझी पार्टीशी घनिष्ट संबंध ठेऊन होती असे बरेच पुरावे सांगतात. तिचा पहिला दिग्दर्शित चित्रपट ’The Blue Light’ चा लेखक बेला बालाझ (Bela Balázs) आणि निर्माता हॅरी सोकल (Harry Sokal) हे दोघेही ज्यू होते आणि युद्ध चालू झाल्यानंतर चित्रपटाच्या नामावलीतून त्यांची नावे वगळण्यात आली. ’Olimpia’ हा माहितीपट ऑलिम्पिक्स खेळांवर आधारित असला तरीही हा माहितीपट बनविण्यासाठी गोबेल्सने आर्थिक सहाय्य केले होते. तसेच या माहितीपटात हिटलरचे वारंवार दर्शन होते. हिटलरने जेव्हा पॅरिसवर ताबा मिळवला तेव्हा लेनीने त्याला अभिनंदनाचा निरोप पाठवला. याबद्दल नंतर तिला विचारण्यात आले तेव्हा तिने ’मला त्यावेळी वाटले की आता युद्धविराम होईल. त्यामुळे मी तसा निरोप पाठवला’ असे तोकडे कारण दिले. जर्मन छळछावण्याच्या विषयीही तिच्यावर आरोप करण्यात आले.

गोबेल्सने तिची आणि हिटलरची भेट घडवून आणली असली तरी लेनी गोबेल्सचा द्वेष करत असे. तिच्या प्रचारपटांच्या कामाविषयी तिला परवानगीविनाच हिटलरला भेटण्याची मुभा होती. १९४४ साली तिने नाझी लष्करी अधिकारी पिटर जेकबशी विवाह केला व त्यावेळी ते दोघे हिटलरला भेटले होते. ’हिटलर आता थकलाय. त्याचे हातही आता थरथरतात. पण त्याच्या आवाजात आजही तीच पूर्वीची जादू आहे.’ असे वर्णन तिने तेंव्हा त्याचे वर्णन केले होते.

युद्धाच्या अंतिम काळात तिने हिटलरशी फारकत घेऊन आपले लक्ष पुन्हा चित्रपट दिग्दर्शनाकडे वळवले. १९४४ साली ’Tiefland’ नावाचा चित्रपटाचे काम सुरू केले. त्यात तिने स्पॅनिश जिप्सी नृत्यांगनेची भूमिका केली होती. याच चित्रपटात इतर जिप्सी माणसांच्या भूमिकांसाठी तेथील जवळच्याच छळछावण्यातल्या लोकांचा वापर केला गेला आणि या सर्व माणसांना नंतर ऑस्टविझमध्ये ठार मारण्यात आले असा आरोप तिच्यावर करण्यात आला अर्थात लेनीने हाही आरोप फेटाळून लावला आणि यातील एकाही माणसाला मारण्यात आले नाही असा दावा केला. युध्दविरामानंतर दोस्त राष्ट्रांनी नाझी पार्टी आणि तिच्याशी संबंधीत सर्व व्यक्तींवर बंधने घातली. अर्थातच लेनीही या शुद्धीकरण मोहिमेत अडकली. तिच्यावर अनेक बंधने घालण्यात आली पण तिला तिच्या कामापासून रोखले गेले गेले नाही. अखेर १९५४ साली ’Tiefland’ प्रदर्शित झाला. पण यानंतर मात्र तिने एकही चित्रपट बनवला नाही.

वयाच्या ७१ वर्षी तिने स्कुबा डायव्हिगंचे प्रशिक्षण घेतले आणि आपल्या पाण्याखाली छायाचित्रिकरणाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने १९६२ ते १९७३ दरम्यान अफ्रिकेतील सुदान येथील नुबा आदिवासींचे छायाचित्रण केले आणि या छायाचित्रांचे ‘Die Nuba’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक जगभर प्रचंड गाजले. लेनीने नुबा आदिवासी पुरुषांच्या खांद्यावर चढून ही छायाचित्रे काढली असे आरोपही तिच्यावर झाले.
वयाच्या ९० वर्षांपर्यंत लेनी ही स्कुबा डायव्हिंग करत होती. २००२ साली वयाच्या १०२ व्या वर्षी तिचे निधन झाले.

लेनीच्या कामाला नाझी संबंधांची काळी किनार असली तरी तिने केलेले सर्जनशील कामाचे श्रेय आपल्याला आजही नाकारता येणार नाही.
कौस्तुभ मुदगल
खूपच सुंदर..👍
LikeLike