चमकदार काही जीवघेणे…भाग-१

चमकदार काही जीवघेणे…भाग-२(अंतिम)

सोन्याचा मोह हा मनुष्याला फार प्राचीन काळापासून आहे, त्याच्या दुर्मिळपणामुळेच कृत्रिमरीत्या सोनं तयार करण्याचे प्रयत्नही मनुष्य सतत करत आलेला आहे. मग यांत थेट सोनंच तयार करणं ते लोखंड किंवा तांब्याला सोन्यात रूपांतरित करणारा Philosopher’s stone म्हणजेच परीस तयार करणे यांसाठीसुद्धा माणसाने अनंत प्रयत्न केले. काहींना मात्र सोनेरूपे अशा भौतिक गोष्टींपेक्षा अमरत्व मिळवणे किंवा दीर्घायुषी होण्याचा ध्यास होता. मग यांसाठी अनेक मंडळींनी अनंत खटपटी केल्या, वेगवेगळी रसायनं/धातू एकत्र करून जाळून बघितले, काहींची मिश्रणे करून वेगवेगळी संयुगं तयार केली गेली.  यातूनच काहींनी इतरांना सोनं, चांदी तयार करून देण्याच्या आशेला लावलं, यांत केवळ जनसामान्य नव्हते तर युरोपमधले राजेरजवाडे, धनिक मंडळी होती आणि सामान्यांना मुक्तीचा मुक्तीचा मार्ग दाखवणारी चर्चही होती. सर्वानाच काही ना काही कारणासाठी सोन्याचांदीची गरज होती. अर्थात या प्रयोगातून फार काही निष्पन्न झालं नसलं तरी लोकांची याबद्दलची आशाही मावळली नाही. तरी या सगळ्यांतून एक फायदा निश्चित झाला की रसायनशास्त्र (या आपल्याला अजिबात न आवडणाऱ्या) ज्ञानशाखेचा उदय झाला. ग्रीक भाषेत khemia म्हणजे परीस तयार करण्यासाठी केलेली वेगवेगळ्या पदार्थांची सरमिसळ आणि प्रक्रिया. याचंच अरबी रूप म्हणजे alchemy आणि त्याचं भारतीय रूप म्हणजे किमया. यावरूनच Chemistry या शब्दाचा उदय झाला.

एक होता किमयागार –
Hamburg हे एक जर्मनीतलं छोटं आणि सुखवस्तू शहर. या गावात Hennig Brandt नावाचा एक गृहस्थ रहात असे याचे जन्मसाल समजत नाही पण साधारणपणे याचा जन्म १६२० ला झाला असावा. त्या काळात युरोपमध्ये जे युद्ध चालू होते त्याला thirty years war म्हणतात. (या युद्धाची गुंतागुंत एवढी आहे की नक्की कोण कोणाशी कशासाठी लढतंय हे चारेक वेळा वाचल्यावर मला समजलं. कारण ऑस्ट्रिया आणि जर्मन राज्ये एकमेकांविरुद्ध आणि एकमेकांशी, बाल्टिक प्रदेशावर ताबा मिळवण्यासाठी डेन्मार्क आणि स्वीडन  तर अनेक लहानमोठ्या कारणांसाठी फ्रान्स आणि स्पेन एकमेकांत भांडत होते) पण आपण साधारणपणे ही लढाई कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट मंडळींच्यात जुंपलेली होती असं एकूण चित्र होतं. तर सांगायची गोष्ट अशी की आपल्या Brandt साहेबांनी या युद्धात काही काळ शिपाईगिरी केली आणि मर्दुमकीही गाजवली त्यामुळं त्यांना दुय्यम अधिकारी पदापर्यंत बढतीही मिळालेली होती. युद्ध संपलं आणि Brandt साहेब पलटणीतून बाहेर पडून पुन्हा आपल्या घरी आले व नंतर एका काचेच्या वस्तू तयार करणाऱ्या कारखान्यात कामाला लागले. इथंच बहुदा त्यांना alchemy ची गोडी लागली. Brandt तसा उच्चभ्रू कुळातला होता त्यामुळे त्याचं लग्नही तोलामोलाचं घराणं असणाऱ्या एका मुलीशी झालं. लग्नात त्याला बरीच संपत्ती मिळाली आणि त्यानं आपली काचेच्या कारखान्यातली नोकरी सोडून प्रयोगशाळेत सोनं बनवायची खटपट सुरू केली. स्वतःला तो Here Doktor Brandt म्हणवून घ्यायला लागला. यथावकाश या उद्योगात बायकोकडून आलेली संपत्ती तर त्यानं उधळलीच त्याचबरोबर इकडून तिकडून पैसे कर्जाऊ घेऊन तो कर्जबाजारीही झाला. त्यात त्याची बायकोही वारली. पण कर्मधर्मसंयोगानं तो एका धनाढ्य विधवेच्या प्रेमात पडला आणि मग तिनं याच्या उद्योगांना पाठबळ पुरवायला सुरुवात केली. (मोठा नशीबवान माणूस !) 

साधारणपणे १६६९ मध्ये एका रात्री तो आपल्या प्रयोगशाळेत एक प्रयोग करत बसलेला होता. हा प्रयोग म्हणजे मानवी मूत्र उकळून त्यातून सोनं तयार करण्याची खटपट होती. मानवी मूत्रातून त्यानं एक घन पदार्थ मिळवलेला होता. भट्टीची आच वाढवून त्यानं या पदार्थाचं निरीक्षण सुरू केलं आणि अचानक ज्या काचेच्या पात्रात  हा घनपदार्थ होता ते आगीनं भरून गेलं आणि एक चमकदार पदार्थ तयार झाल्याचं त्याला दिसून आलं. एक कुजलेल्या लसणासारखा वास सर्वत्र पसरलेला होता. Brandt ला वाटलं आपण बहुतेक सोनं किंवा परीस तयार केला आणि त्याला आपण श्रीमंत झाल्याची स्वप्नं पडायला लागली. पण त्याला लौकरच लक्षात आलं की हा पदार्थ सोनं किंवा परीस यापैकी काहीही नाही आणि श्रीमंत होण्याचं त्याचं स्वप्न सुरू होताहोताच विरून गेलं. पण या दुःखात त्यातल्या त्यात समाधान म्हणजे त्यानं तयार केलेल्या या पदार्थानं त्याला Hamburg मध्ये अफाट प्रसिद्धी मिळवून दिली. Brandt नं या पदार्थाला नाव दिलेलं होतं Phosphorus mirabilis अर्थात दैवी प्रकाश देणारा म्हणजेच आपल्या आवर्तसारणीतलं १३वं मूलद्रव्य फॉस्फरस. पण आपण हा फॉस्फरस कसा तयार केला हे मात्र Brandt नं कधीच सांगितलं नाही.

Herr Doktor Hennig Brandt

आता आपण फॉस्फरसच्या प्रवासाच्या बहुपात्री प्रयोगाला सुरुवात करूया. Brandt नंतर या गोष्टीतलं महत्वाचं पात्र आहे Johann Kunckel. हे साहेब तोंडात सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आलेले होते. याचे वडील डेन्मार्कच्या युवराजाचे दरबारी alchemist होते. Kunckel सुद्धा लहानपणापासूनच खटपट्या होता. अगदी तरुण वयातच तो सुद्धा एका ड्युकच्या दरबारात alchemist बनला. तिथून जॉब हॉपिंग करत तो जर्मनीतल्या Saxony प्रांताच्या राजाचा तो दरबारी alchemist बनला. हा सगळा कथाभाग १६६७चा पण १६७५ मध्ये त्याची ही alchemist नोकरी गेली कारण राजाच्या इच्छेनुसार शिशाचं सोन्यात रूपांतर करणं त्याला जमलं नाही. बेकारीच्या दिवसांतच Kunckel च्या कानावर Brandt नं तयार केलेल्या चमकदार पदार्थाची बातमी आली. Kunckel ची उत्सुकता आता चाळवलेली होती त्यानं तडक Hamburg ला जाऊन Brandt ची भेट घेतली आणि डोळे भरून फॉस्फरस बघितला. रात्रभर झगमगणारा फॉस्फरस बघून तो मंत्रमुग्ध झाला. हरखून जाऊन त्यानं काही फॉस्फरस Brandt कडं  विकत मागितला. Brandt नेहमीप्रमाणे पैशांच्या चणचणीत होता कारण एव्हाना त्याने दुसऱ्या बायकोची संपत्तीही जवळपास उडवलेलीच होती. पण Kunckel ला फॉस्फरसबरोबर तो तयार करण्याची कृतीही पाहिजे होती जी द्यायची Brandt ची तयारी नव्हती त्यामुळं इथं चर्चा काही काळ थांबली. फॉस्फरस बघितल्यावर लगेचच Kunckel नं त्याबद्दल त्याचा एक सहकारी Daniel Kraft ला पत्र लिहून त्याबद्दल सांगितलं होतं. आपलं तिसरं पात्र म्हणजे हा पन्नाशीतला Kraft, हा अतिशय धोरणी माणूस होता. तो पत्र हातात पडल्यावर लगेच निघून Hamburg ला आला पण आपण Hamburg आल्याचं त्यानं Kunckel ला कळू दिलं नाही.

Kraft नं फॉस्फरस बघून हे ओळखलं की हा परीस किंवा सोनं नसलं तरी हा आपल्याला खूप काही मिळवून देऊ शकेल. त्यानं Brandt शी ताबडतोब सौदा सुरू केला आणि तयार असलेला तसेच तो भविष्यात तयार करेल तो सगळा फॉस्फरस विकत घ्यायची तयारी दर्शवली. Brandt तसाही पैशाच्या तंगीत होताच त्यानं लगेच मान्यता दर्शवली आणि थोडी घासाघीस होऊन २०० thalers ला म्हणजे आजच्या घडीला जवळपास ८हजार डॉलर्सला हा सौदा पक्का झाला. हा सगळा व्यवहार चालू असतानाच Kunckel तिथं जाऊन धडकला पण आता Brandt नं त्याला फॉस्फरस विकायला नकार दिला. Kunckel नं तरीही जोर धरून फॉस्फरस बनवायच्या कृतीविषयी माहिती मिळवली तेंव्हा Brandt नं मानवी मूत्रापासून एवढंच मोघम उत्तर त्याला दिलं. कर्मधर्मसंयोगानं त्याची आणि Kraft ची Hamburg मध्ये गाठही पडली पण Kraftनं आपल्या ठरलेल्या व्यवहाराविषयी त्याला ताकास तूर लागू दिला नाही उलट सांगितलं की Brandt हा काही पटणारा माणूस नाही आणि कृती सांगायचीही त्याची तयारी नाही. Kunckel बिचारा हताश होऊन परतला आणि त्यानं मानवी मूत्रपासून फॉस्फरस बनवायचे प्रयोग सुरू केले. एकदा त्यानं Brandtला पत्र पाठवून फॉस्फरस तयार करण्याच्या कृतीबद्दल विचारलंही पण तो बधला नाही. त्यानं उलट टपाली Kraft शी झालेल्या आपल्या कराराबद्दल त्याला सांगितलं आणि Kunckelला आपल्या झालेल्या फसगतीबद्दल समजलं. 

१६७६ – Kraft नं युरोपमधल्या राजे रजवाडे आणि धनिकांच्या दरबारात फॉस्फरसचं जाहीर प्रदर्शन सुरु केलं आणि त्याला जोरदार प्रसिद्धी मिळाली. तिथं त्यानं हा फॉस्फरस स्वतःच शोधून काढल्याची आवई उठवली. इकडं Kunckel अजूनही प्रयोगांमगून प्रयोग करत होता पण अजूनही त्याला यश हुलकावण्या देत होतं. Kunckel ची इकडं धडपड सुरू असताना Kraft कुणाकुणाच्या राजेशाही दिवाणखान्यात अंधारात स्फुरदीप्तीचे (बघा शाळेत शिकलेला हा शब्द अजूनही आठवत असेल तर) खेळ करून दाखवत भलताच प्रसिद्ध झालेला होता. १६७६ मध्ये Kunckelला फॉस्फरस तयार करण्यात थोडं यश आलं पण तरीही अजून त्याचा फॉस्फरस Brandt च्या फॉस्फरससारखा चमकदार दिसत नव्हता. त्याने पुन्हा एकदा Brandt ला पत्र पाठवलं आणि विनंती केली की मला थोडी तरी मदत कर. पण Brandt नं उलट टपाली पत्र पाठवलं की मी तुला पत्रातून हे सांगू शकणार नाही कारण मग ते सगळ्यांनाच समजायची शक्यता आहे. यांवर Kunckel म्हणाला alchemy code म्हणजे सांकेतिक भाषेत कळव पण Brandt नं यांवर काहीच उत्तर दिलं नाही. अखेर २५ जुलैला Kunckelला फॉस्फरस तयार करण्यात यश आलं. आता त्याला Brandt च्या मदतीची मुळीच गरज नव्हती. Kunckel नं आपलं सगळे संशोधन प्रसिद्ध केलं आणि सांगितलं ‘कोणत्याही ईश्वरनिर्मित वस्तूपासून’ मी तो तयार करून दाखवीन. आपल्या या शोधाच्या जोरावर राजाश्रय मिळवत तो १६८९ मध्ये तो स्वीडनच्या दरबारात खाण आणि खनिजे मंत्री झाला. पुढे अनेक वर्षे त्यालाच फॉस्फरसचा शोधक मानलं जाई.

Kunckel नं फॉस्फरस तयार केल्यानंतरही Kraft ची सर्कस चालूच होती. १६७७ मध्ये Hanover च्या ड्युकच्या दरबारात आपला खेळ दाखवत असताना त्याची गाठ तिशीतल्या Leibnitz शी पडली. Leibnitz हा त्या काळातला नामवंत विद्वान होता. गणित,विज्ञान, इतिहास या तिन्ही विषयांत तो प्रविण होता.Calculus चा काही भाग हे त्याचं संशोधन आहे. Leibnitz ला Kraft नं पुरतं अवाक करून सोडलं. योगायोगाने काही महिन्यातच Leibnitz काही कामासाठी Hamburg ला आला तिथं त्याला Brandt विषयी माहिती समजली आणि त्यानं Brandt ला शोधून काढलं. नेहमीप्रमाणे Brandt पैशाच्या चणचणीत होता त्यानं Leibnitz ला पैशाच्या बदल्यात फॉस्फरस आणि तो बनवायला शिकवायचं मान्य केलं. सध्या तो Kraft ला टाळत होता आणि त्यासाठी आपल्याकडून सध्या पहिल्यासारखा फॉस्फरस बनतच नाही हे कारण त्यानं पुढं केलेलं होतं. Leibnitz नं त्याच्यापुढे Hanoverच्या ड्युकसाठी काम करायची संधी ठेवली. Brandt लगेच तयार झाला. Leibnitz नं महिना १० thalers पगारावर Brandt ला दरबारी alchemist ची नोकरी मिळवून दिली शिवाय ६ महिन्यांचा पगारही त्याला आगाऊ दिला.पण  Brandt च्या बायकोनं थोडा अजून पगार वाढवून मिळावा म्हणून घासाघीस करणारं पत्र Leibnitz पाठवून दिलं पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. Brandt ही तसा व्यवहारी माणूस होता त्यानं Kraft ला एकूण घडामोडींची माहिती देऊन तिथून काही पैसे निघतील काय याचा अंदाज घेतला. Kraft चा ही आता या सर्कशीनं जीव उबलेला होता त्यानं ही Brandt ला ही नोकरी स्वीकारायचा सल्ला दिला. पण Kraft च्या हातात अजूनही एक शेवटचं पान शिल्लक होतं ते म्हणजे इंग्लंडच्या राजाचा दरबार. इथं एक शेवटचा खेळ करून आपला खिसा भरून घ्यायचा त्याचा विचार होता. अखेर आपल्या प्रयोगासाठी एक भट्टी आणि भरपूर मानवी मूत्र एवढीच मागणी करून Brandt नं Hanover चा रस्ता धरला. १६७८ ला तिथं पोचून त्यानं फॉस्फरस तयार करून दाखवला आणि ड्युकच्या कौतुकाला तो पात्र झाला. Brandt परत Hamburg ला आला आणि त्यानं तिथूनच फॉस्फरस तयार करून पाठवण्याचं आश्वासन ड्युकला दिलं. पण फॉस्फरस काही आला नाही. Leibnitz नं त्याला पत्र पाठवल्यावर त्यानं सध्या आपली आणि आपल्या मुलांची प्रकृती बरी नाही आणि आपली मुलगी आजारपणात दगावल्याचं त्यानं कळवलं. शिवाय पगार थोडा वाढवून देण्याचा तगादा लावला. अखेर त्याला महिन्याला ४० thalers एवढा पगार मिळाल्यावर तो पुन्हा आपल्या कामावर रुजू झाला.

फॉस्फरसनं त्याच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना गडगंज केलं अपवाद फक्त Brandt चा. त्याच्या नशिबी मात्र श्रीमंती परत कधीच आली नाही. Brandt हा फॉस्फरसचा शोधकर्ता आहे हे सुद्धा अनेक वर्षे वादात होतं. पण Leibnitz आणि Brandt ची बायको मार्गारेट यांच्या पत्रांमुळे त्याला हे श्रेय मिळालं. Brandt साधारण १७१० पर्यंत जिवंत होता. त्याला पुढच्या काळात फॉस्फरसपासून इंग्लंडमध्ये तयार होऊ लागलेल्या औषधांबद्दल समजलं असेल, त्यातून धनोत्तर झालेल्या मंडळींविषयीही त्याला कळलं असेल. पण तो अखेरपावेतो निर्धनच राहिला.

L to R – Kunckel, Kraft, Leibnitz

क्रमशः

यशोधन जोशी

2 thoughts on “चमकदार काही जीवघेणे…भाग-१

Add yours

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: