चमकदार काही जीवघेणे…भाग-२(अंतिम)

चमकदार काही जीवघेणे…भाग-१

Kraft आपला फॉस्फरस दाखवायला इंग्लंडला पोचला, तिथं जाण्याचे त्याला राजाकडून १००० thalers मिळाले (म्हणजे आजचे जवळपास ३० हजार डॉलर आणि आपल्या Brandt ला महिना जेमतेम ४० thalers फॉस्फरस तयार करण्याचे मिळत.) दरबारात फॉस्फरस दाखवायला आलेल्या Kraft ची भेट झाली Robert Boyle शी. Robert Boyle हा इंग्लंडच्या राजाचा दरबारी alchemist होता. (विज्ञानशाखेत कधी असाल तर Boyle तुम्हाला एखादेवेळी आठवायची शक्यता आहे. P1V1=P2V2 हा नियम मांडणारा गृहस्थ तो हाच. त्याला विज्ञानातून इतिहासात आणणारा पहिला माणूस बहुतेक मीच!) Boyle हा आपल्या शिवाजी महाराजांचा समकालीन आहे, त्याचा जन्म १६२७चा आणि मृत्यू १६९१चा. हा कट्टर ख्रिस्ती धर्माचा उपासक होता. तो आयुष्यभर अविवाहित राहिला आणि त्यानं सामाजिक कार्यासाठी आपला बराचसा पैसा खर्च केला. त्याचा दृष्टिकोन शास्त्रीय असला तरी त्यानं आयुष्यातला बराचसा काळ परीस शोधण्यात खर्च केला. Boyle नं Kraft ला रॉयल सोसायटी ऑफ लंडनमध्ये फॉस्फरसचं प्रदर्शन करायला बोलावलं. हे प्रदर्शन अथवा त्याचे विविध खेळ इथं काहीसे रटाळच झाले. (Kraft एरव्ही अंधाऱ्या खोलीत बोटांवर फॉस्फरस घेऊन नाव लिहून दाखवणे, तो चेहऱ्यावर लावून अंधारात आपला चमकणारा चेहरा दाखवणे, स्फुरदीप्ती, फॉस्फरसनं भाजत नसलं तरी गन पावडर पेटवून दाखवणे वगैरे खेळ करून दाखवायचा. प्रेक्षकांना फॉस्फरस हात लावूनही बघता येई.) कार्यक्रमानंतर Boyle नं Kraft ला खाजगीत भेटून फॉस्फरसचा थोडा नमुना प्रयोगासाठी मागितला. Kraft नं साहजिकच नकार दिला. Boyle नं त्या बदल्यात त्यानं alchemy तून मिळवलेले काही रासायनिक पदार्थ देण्याची तयारी दर्शवली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पण जाता जाता Kraft नं Boyle ला फॉस्फरस मानवी शरीरातून मिळतो एवढी माहिती दिली. आता इथून सुरू होते ती Boyle च्या धडपडीची गोष्ट.

Robert Boyle

Kraft जर्मनीला निघून गेला आणि इकडं Boyle च्या डोक्याला भुंगा लागला. शेवटी त्यानं फॉस्फरस शरीरातून मिळतो या वाक्यावरून त्याचा स्रोत मानवी मूत्रच असावं हा अंदाज लावून त्याच्यावर प्रयोग सुरू केले. त्याला बराच काळ यश येईना. मूत्र उकळून शेवटी एक घट्ट साका तयार होई पण त्यातून फॉस्फरस कसा मिळवायचा हे कोडे काही सुटेना. तरीही धीर न सोडता त्यानं Johann Beacher हा एक alchemist आपल्या मदतीला घेतला. त्याच्यासोबत त्याचा मदतनीस म्हणून Ambrose Godfrey हा १७ वर्षांचा एक मुलगाही आला. तरीही यश येईना. Godfrey आणि Beacher जर्मनीतूनच आले असल्याने त्याना Brandt माहीत होता. शेवटी Godfrey नं जाऊन त्याचे पाय धरले पण नेहमीप्रमाणे Brandt नं संपूर्ण माहिती न सांगता फक्त ‘उच्च तापमान’ एवढंच सांगितलं. Godfrey अतिशय हिकमती माणूस होता त्यानं परत येऊन थंड पडलेल्या भट्टीला पुन्हा ताव दिला आणि शेवटी अनेक प्रयत्नानंतर फॉस्फरस तयार केलाच.

Ambrose Godfrey

Boyle हा काही Kraft सारखा खेळ्या नव्हता, त्यानं फॉस्फरसच्या उपयोगांवर विचार सुरू केला. बरणीत भरून जहाजांवर रात्रीच्यावेळी उजेडासाठी, बंद हंडीत ठेवून जाळ्याबरोबर पाण्यात सोडला तर मासे आकर्षित होतील, घड्याळाच्या काट्यांवर लावला तर रात्री वेळ समजेल ( घड्याळाच्या काट्यांबद्दलचा विचार हा साधारण १६८० सालातला आहे हे विसरायचं नाही !) असे सर्वसाधारण उपयोग नोंदवलेच पण पुढच्या काळात तो औषधात वापरता येईल असंही नोंदवून ठेवलं आणि त्याची ही भविष्यवाणी खरीच ठरली. Boyle नं आपला शोध काही झाकून ठेवला नाही त्याने फॉस्फरसचे असंख्य प्रयोग करून त्यावरचं आपलं संशोधन सर्वांसाठी खुलं केलं. (अर्थात त्यानं तो तयार करायची कृती नाहीच सांगितली) रसायनशास्त्र सर्वासाठी खुलं करण्याच्या त्याच्या धडपडीमुळेच त्याला आजही रसायनशास्त्राचा जनक मानलं जातं. फॉस्फरसवर असंख्य प्रयोग करण्यात दोनेक वर्षं गेल्यावर Boyle चा त्यातला रस संपला. एव्हाना Godfrey स्वतःच उत्तम तंत्रज्ञ झालेला होता त्यानं फॉस्फरसचं उत्पादन सुरू केलं आणि तो फॉस्फरस बाजारात विकू लागला. यातून त्याला गडगंज पैसा मिळाला, पूर्ण युरोपभर त्यानं आपला व्यापार वाढवला. Boyle विषयीचा आदर त्याच्या मनात सदैव टिकून राहिला. त्यानं आपल्या पहिल्या मुलाचं नाव Boyle Godfrey असं ठेवलं. मजेची गोष्ट म्हणजे एवढा ज्वालाग्राही पदार्थ तयार करणाऱ्या Godfrey नंच अग्निशामक म्हणजे fire extinguisher चा पण शोध लावलेला आहे.

Ambrose Godfrey चं अग्निशमन आणि त्याच्या पद्धती याबद्दलचं पुस्तक

John Walker हा लंडनचा रहिवासी होता. त्याचा स्वभाव मिश्किल आणि आनंदी होता. तो सदैव कोट्या करत रहायचा. (बहुतेक घरच्यांच्या आग्रहाखातर) तो सर्जन झालेला होता पण त्यात त्याचा जीव काही रमेना.मग तो वयाच्या ३८ व्या वर्षी फार्मासिस्ट झाला. एकदा एका प्रयोगासाठी त्यानं पोटॅशियम क्लोरेट आणि अँटीमनी सल्फाईडचं मिश्रण केलं आणि त्यात थोडासा गोंद मिसळला. त्यातलं काही मिश्रण त्याच्या प्रयोगशाळेतल्या फरशीवर सांडलं. Walker साहेब ते बुटानं खरडून काढायला गेले आणि त्या मिश्रणाने पेट घेतला. लगेच या साहेबांच्या डोक्यात प्रकाश पडला. त्यांनी पुन्हा ते मिश्रण तयार करून लाकडाच्या छोट्या चिपांवर त्याचा लेप दिला आणि खरखरीत वस्तूंवर घासल्यावर त्या पटायला लागल्या. आणि ७ एप्रिल १७२७ रोजी या साहेबांनी १०० काड्यांचा एक डबा आणि त्या काड्या घासण्यासाठी सँडपेपर हा सरंजाम एकूण १२ पेन्सला (उधारीवर) विकून आपल्या नवीन धंद्याचा शुभारंभ केला. या नवीन उत्पादनाला इतका ‘भरघोस’ प्रतिसाद मिळाला की १८२७-२९ या दोन वर्षात तब्बल २०० काडेपेट्या विकल्या गेल्या. (त्यातल्या रोखीने किती आणि उधारीवर किती हे मात्र समजू शकले नाही!) आणि अखेर हा धंदा गुंडाळला गेला.

John Walker

साधारण १८२८/२९ मध्ये Michael Faraday (आपले law of induction वाले) नं रॉयल इन्स्टिट्यूशन लंडनमध्ये (बहुदा Walker नंच बनवलेल्या) काडेपेटीचं कोडं उलगडून दाखवलं. यावेळी तिथं Samuel Jones नावाचा एक गृहस्थ हजर होता. त्यानं ही कल्पना ताबडतोब उचलली आणि १८३० साली Lucifers या नावानं काडेपेट्या बनवायला सुरुवात केली. त्या इतक्या गाजल्या की काडेपेटीला समानार्थी शब्द म्हणून ते नाव वापरलं जाऊ लागलं. यानंतर अनेक भिडू मैदानात उतरले.त्यापैकी वॅट आणि बेल यांनी काडेपेट्यांच्या व्यापारात मोठं नाव मिळवलं. पुढच्या काळात जोन्स,वॅट आणि बेल यांनी एकत्र येऊन Blue bell नावाची कंपनी काढली, या काडेपेटीतल्या काड्या निळ्या असत. ही कंपनी पुढं दीडशे वर्षं टिकली. यांनी अनेक वैविध्यपूर्ण उत्पादने बाजारात आणली. उदाहरणार्थ वाऱ्यातही सिगार पेटवू शकेल अशी Fuzees ही काडेपेटी, हिच्यात लाकडाऐवजी जाड पुठ्ठ्याच्या तुकड्याला पोटॅशियम नायट्रेट लावलेलं असायचं. Candle match यातली काडी जवळपास दोनेक मिनिटं प्रकाश द्यायची. पण काडेपेट्यांच्याबाबतीतली एक गोष्ट अत्यंत घातक होती ती म्हणजे काड्या ठेवलेला डबा हलवला तरीही काड्या एकमेकांवर घासून पेटत. खिडकीत ठेवलेल्या डब्याला उन्हाची तिरीप लागूनही त्या पेटत. अशा आगी लागून अनेक घरं बेचिराख झाली आणि अनेकांचे प्राण गेले.

सुरुवातीला काडेपेटीत वापरला जाई पिवळा फॉस्फरस यामुळं फॉसी-जॉ या रोगाला आमंत्रण मिळे. कारखान्यातल्या कामगारांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झालेले होते. या कामगारात बहुसंख्य तरुण मुली असत. यांच्या पिळवणुकीला white slavery हे नाव मिळालं, खुद्द इंग्लंडच्या राणीनेही या प्रश्नाची दखल घेऊन उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला पण कारखानदारांनी नियमातून पळवाटा काढत आहे त्याच प्रकारे काम सुरू ठेवले. Byrant & May या कारखान्यातल्या कामगार मुलींच्या लढ्याला अखेर (होमरूल लीगवाल्या)ॲनी बेझंट बाईंनी पाठिंबा दिला आणि या मुलींचा मोर्चा थेट ब्रिटनच्या संसदेवर नेला. मग कारखानदार नमले आणि या कामगार मुलींना योग्य वेतन, आरोग्य सुविधा वगैरे लाभ मिळायला लागले. तरी अजूनही स्वस्त असणाऱ्या पिवळ्या फॉस्फरसचाच वापर कारखानदार करत होते. लाल फॉस्फरसच्या वापरासाठी Salvation army नं प्रयत्न सुरू केले. त्यांनी दुकानदारांवर दबाव आणून पिवळ्या फॉस्फरसच्या काडेपेट्यांची विक्री बंद पाडली आणि अखेर उत्पादकांनी नमतं घेतलं.

Byrant & May या कारखान्यातल्या कामगार मुलींचा मोर्चा

टीप – औषधात वापरला जाणारा फॉस्फरस, खतात वापरला जाणारा फॉस्फरस, रसायने तयार करताना वापरला जाणारा फॉस्फरस यांबद्दलही प्रचंड माहिती उपलब्ध आहे पण ते लिहिताना विषयाची रंजकता संपून जाऊन माहितीचा भडीमार केल्यासारखं वाटायला लागेल त्यामुळं इथं त्याचा औद्योगिक वापर हा विषय थांबवून आपण फॉस्फरसच्या थोड्या वेगळ्या वापराकडं बघूया.

युद्धं ही खरं तर एक प्रकारच्या प्रयोगशाळाच असतात. कारण युद्धात ज्ञात असलेल्या आणि निर्माण होत असलेल्या शस्त्रास्त्रांचा वापर केला जात असतो. नवीन तयार झालेल्या शस्त्रांची परिणामकारकता तपासून बघायला इतकी चांगली संधी दुसरी नसते. फॉस्फरसच्या बाबतीतही असंच झालं. दुसऱ्या महायुद्धात फ्रान्सचा पाडाव झाल्यावर हिटलरचं पुढचं लक्ष इंग्लंड हेच होतं. इंग्लंडनेही या युद्धाची तयारी सुरू केलीच होती. जर्मन सैन्य जर इंग्लंडमध्ये घुसलंच तर त्याला रोखण्यासाठी सामान्य नागरिकांच्या हातातही शस्त्रं देणं गरजेचं होतं. यांवर एक सोपा उपाय आखला गेला. काचेच्या बाटलीत भरलेलं फॉस्फरस आणि बेंझिनमधलं द्रावण म्हणजे ‘मोलोटॉव कॉकटेल’ (मोलोटॉव हा रशियाचा परराष्ट्रमंत्री होता.रशियानं दुसऱ्या महायुद्धात जर्मनीशी हातमिळवणी करून फिनलँडवर हे बॉम्ब टाकले आणि बातमी पसरवली की आम्ही अन्नधान्याची पाकिटं वाटत आहोत. यावरून हे नाव पडले) या बाटलीत वातीसारखी कापडाची चिंधी बुडवलेली असे जी पेटवून बाटली फेकली की ती फुटते. बेंझिन पेटते आणि फॉस्फरसही बाहेर पसरून पेट घेतो. आघाडीच्या जर्मन रणगाड्यांवर याचा हल्ला झाला तर आक्रमणाचा वेग कमी होईल या अंदाजाने अशा लाखो बाटल्या तयार करून जनतेत वाटल्या गेल्या. यासाठी बाजारातल्या रिकाम्या दुधाच्या आणि बिअरच्या वापरल्यानं त्यांचा अफाट तुटवडा जनतेला सहन करावा लागला. पण सुदैवानं यांचा वापर करण्याची वेळ कधीच आली नाही.

दुसऱ्या महायुद्धात फॉस्फरसचा वापर बॉम्ब तयार करण्यासाठीसुद्धा केला गेला. जवळपास १४ किलो (म्हणजे ३० पौंडी) वजनाचे हे बॉम्ब तयार केले गेले. या बॉम्बची रचना तो आपल्या वजनाने छप्पर फोडून खाली पडतील अशी होती. यांत अगदी थोड्या प्रमाणात स्फोटक आणि बाकीचा फॉस्फरस असायचा. बॉम्ब पडल्यावर स्फोट होऊन फॉस्फरस बाहेर फेकला जाई आणि तो पातळ होऊन पेट घेई. ही आग फार भीषण असायची कारण फॉस्फरसच्या नद्याचं आग घेऊन इकडेतिकडे धावत असत. ही आग पाणी मारल्यावर काही काळ विझायची पण पाणी उष्णतेने उडून गेले की फॉस्फरस पुन्हा पेट घ्यायचा.

Operation Gomorrah – या मोहिमेचे नाव बायबलमधल्या एका कथेवरून ठेवण्यात आलं होतं. Gomorrah हे शहर देवानं तिथल्या दुष्ट लोकांना शिक्षा देण्यासाठी जाळलं अशी ती गोष्ट आहे. Operation Gomorrah मधलं हे शहर होतं जर्मनीतलं एक महत्वाचं औद्योगिक शहर Hamburg. याच शहरात (कु)प्रसिद्ध जर्मन यु-बोट्स तयार होत. या पाणबुड्यांनी अटलांटिक महासागरात दोस्तांचे प्राण कंठाशी आणलेले होते. असंख्य जहाजांवर हल्ले करून त्यांनी लाखो टन युद्धसाहित्य समुद्राच्या तळाशी पोचवले होते. Hamburg वर हल्ला करून जर्मनीचा कणा मोडण्याचा या हल्ल्यामागचा इरादा होता. २५ जुलै ते २ ऑगस्ट १९४३ या दरम्यान सतत हवाईहल्ले करून इंग्लंड आणि अमेरिकेने Hamburgची धूळधाण उडवली. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर फॉस्फरस बॉम्बचा वापर केला गेला. यामुळे तिथं एवढ्या प्रचंड आगी लागल्या की उष्णतेने तिथले डांबरी रस्तेही पाघळून गेले. या हल्ल्यात जवळपास ३७,००० लोक ठार झाल्याची अधिकृत नोंद आहे. इमारतींचे नुकसान तर एवढे झाले की जवळपास ४० लाख टन राडारोडा तिथं गोळा झालेला होता. फॉस्फरस बॉम्ब एवढ्या मोठ्या प्रमाणात वापरायचे कारण हे पण सांगितले जाते की हे बॉम्ब इंग्लंडच्या कोठारात पडून होते आणि ते धोकादायक स्थितीच्या आसपास पोचलेले होते. मग त्यांना निकामी करण्याच्या खर्चाला पर्याय म्हणून ते वापरले गेले. आगीच्या उष्णतेने Hamburg चे रहिवासी होरपळून मेले आणि जे जगले त्यांची संपूर्ण कातडी सोलवटून गेलेली होती. अनेकांनी हाल सहन करण्यापेक्षा जर्मन सैन्याला आपल्याला ‘Shot of Grace’ देऊन या वेदनेतून मुक्त करण्याची विनंती केली आणि सैनिकांनीही ती मान्य केली. जिथं पहिल्यांदा फॉस्फरस तयार झाला तेच शहर फॉस्फरसमुळं भस्मसात व्हावं हा अगदीच काव्यगत न्यायासारखं झालं. पण जिद्दी जर्मनांनी चारेक महिन्यात पुन्हा Hamburg उभं केलं. दुसऱ्या महायुद्धानंतर उरलेल्या फॉस्फरस बॉम्बचं काय करावं हा मोठा प्रश्न अमेरिका, इंग्लंड यांच्यासमोर उभा ठाकला त्याचा उपाय म्हणून हे सगळे बॉम्ब त्यांनी खोल समुद्रात नेऊन बुडवले. आजही अनेकदा हे बॉम्ब किनाऱ्यावर आलेले सापडतात.

बॉम्बहल्ल्यानंतरचं Hamburg

आज आपल्या दैनंदिन जीवनात अनेक ठिकाणी आपल्याला फॉस्फरस भेटत असतो यापुढं एखादया जखमेवर औषध लावताना किंवा काडी ओढून दिवा लावताना कधीतरी Brandt, Boyle, Ambrose आणि Walker ची आठवण काढायला हरकत नाही.

यशोधन जोशी

4 thoughts on “चमकदार काही जीवघेणे…भाग-२(अंतिम)

Add yours

 1. दोन्ही भाग मस्तच. सर्वात वरची चित्रं काडेपेटीवरची आहेत का? त्यातलं पाहिलं चित्र कसलं आहे?

  Like

  1. होय सगळ्यात वरची चित्रं काडेपेट्यांवरचीच आहेत. पहिला छाप आहे ते बहुतेक अश्विनीकुमार असावेत.

   Like

 2. रंजक माहिती आणि नेहमीप्रमाणेच सुरेख मांडणी व अद्वितीय लेखनशैली!

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: