मला काही दिवसांपूर्वी घरात बसल्या बसल्या फार म्हणजे फारच अस्वस्थ झाल्यासारखं झालेलं होतं इतका अस्वस्थपणा मला पूर्वी मी जेंव्हा (कैकदा) प्रेमात पडलेलो होतो तेंव्हाच आलेला होता. बराच वेळ काय करावं याचा विचार करूनही काहीच न सुचल्यानं मग मी घरात पडलेला एक बबल रॅप घेऊन त्याचा आवाज करत माझ्यातल्या अस्वस्थपणाला वाट काढून दिली. कुठल्याही गोष्टीचा पुरेपूर वापर करायचा आपल्या स्वभावांतच असल्यानं मी या घटनेचाही वापर करून घेतला.
वर्ष १९५७ – अमेरिकेतलं न्यू जर्सी राज्य Alfred Fielding आणि Mark Chavannes या दोन इंजिनीयर असलेल्या मंडळींनी अगदी सहज म्हणून दोन प्लास्टिकचे पडदे (शॉवर कर्टन) एकमेकांना चिकटवून बघितले पण त्या दोन पडद्यांच्यामध्ये हवा राहिली आणि एखाद्या पापडाला फोड उठावेत तसं त्या पडद्यांवर हवेचे बुडबुडे तयार झाले.
Alfred आणि Mark यांनी हे तयार झालेलं प्रॉडक्ट आधी वॉलपेपर म्हणून खपवायचा प्रयत्न केला पण हा असला विचित्र वॉलपेपर कोणीही घ्यायला तयार झाले नाही मग त्यांनी काही काळ याला ग्रीन हाऊसमध्येही खपवण्याचा प्रयत्न केला पण तिथंही या जोडगोळीला फारसं यश आलं नाही. पण तरीही त्यांनी धीर सोडला नाही आणि या मटेरियलचं उत्पादन सुरूच ठेवलं. त्यासाठी त्यांनी एक कंपनी स्थापन केली जिला नाव दिलं Sealed Air Corp.

काळाचाही आपला असा एक हिशोब असतो. १९६० च्या आसपास IBM कंपनीनं आपला 1401 हा worldwide accounting machine (WWAM) असं बिरुद मिरवणारा संगणक तयार केला. हा जगभरात पोचवण्यासाठी त्यांना सुरक्षित पॅकेजिंग मटेरियलची गरज होती आणि त्यांची नजर पडली या हवेचे अंगभर हवेचे बुडबुडे असणाऱ्या मटेरिअलवर. त्यांनी या बबल रॅपचा वापर आपले संगणक पॅक करण्यासाठी वापरायला सुरुवात केली आणि अमेरिकाभरातून या बबल रॅपला मागणी येऊ लागली.
Alfred आणि Mark यांनी या प्रॉडक्टचं पेटंट आपल्या नावावर घेतलं व आज Sealed Air Corp जगातली एक नामांकित कंपनी आहे आणि २०२१ मध्ये तिची उलाढाल एकूण ४९०३ दशलक्ष डॉलर्सची आहे.
Leave a Reply