उत्तेजक पेयांचा इतिहास फार मोठा आहे. चहा, कॉफीपासून ते वेगवेगळी मद्य जगभर वेगवेगळ्या प्रकारे प्यायली जात होती आणि आहेत. तरतरी आणणाऱ्या किंवा झिंग चढवणार्या पेयांची आकर्षण मानवाला फार पूर्वीपासूनच आहे. काही प्रदेशांमध्ये पेयांऐवजी झाडांची पाने चावून चघळून खाल्ली जातात. कोकाची पाने चघळत राहिल्यावर तुम्हाला झोप येत नाही अशी नोंद ’पॅपिलॉन’ हेन्री शॅरियरने करून ठेवली आहे.
अशाच एका तरतरी आणणार्या पेयाची नोंद कॅप्टन जेम्स कूकने करून ठेवली. आहे. जेम्स कूक हा साहसी दर्यावर्दी. जेम्सने आपल्या मोहिमांमधून जगातील अनेक भूभाग उजेडात आणले. या साहसी मोहिमांच्या दरम्यान त्याने शोधलेल्या भूभागांविषयी अनेक बारीकसारीक नोंदी त्याने करून ठेवलेल्या आहेत. स्थानिक लोकांच्या प्रथा, राहणीमान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने या भूभागांचे नकाशे काढले आहेत. तो १७७३ सालातील सप्टेंबरमध्ये आपल्या दुसर्या सागरी मोहिमेवर होता. तो जुन्या नकाशांमध्ये दाखवलेल्या ’Terra Australis Incognita’ म्हणजे सध्याच्या ऑस्ट्रेलियाच्या शोधात होता. हा शोध घेताना तो दक्षिण पॅसिफिकमधील सोसायटी आयलंडवर पोहोचला. तेथील स्थानिक आदिवासी लोकांच्या ’टोंगन कावा’ या समारंभाची त्याने नोंद केलेली आहे. तो लिहितो –
’या बेटावरील हे स्थानिक लोक आवा नावाच्या मिरीच्या रोपाप्रमाणे दिसणार्या रोपापासून मद्य बनवतात. ही दारू बनविण्याची पध्दत ही अतिशय घृणास्पद आहे. बरीच लोक या झाडाची मुळं किंवा मुळाजवळील खोडाचा तुकडा तोंडात टाकून चावून त्याचा चोथा करतात. चावून चोथा करताना तोंडात बरीच लाळ सुटते. मग ही सगळी मंडळी एका मोठया भांड्यामध्ये चावलेला चोथा आणि लाळ थुंकतात. भांड्यामध्ये पुरेसा चोथा जमा झाला की त्यात प्रमाणामध्ये पाणी मिसळले जाते व हे मिश्रण गाळले जाते. आता ही दारू पिण्यास तयार असते आणि तिची चव मिरीसारखी लागते.’

शेवटच्या वाक्यात जेम्सने त्या पेयाच्या चवीचा उल्लेख केलेला आहे. घृणास्पद असलेल्या या पेयाची चव जेम्सने बहुधा चाखली असावी.
Leave a Reply