पाण्याला गेलेल्या Jack आणि Jill ची ही कविता आपण शाळेत जोरजोरात घोकलेली आहे पण जॅक आणि जिल कोण हे आपण कधी शोधलं नाही. तर इतर अनेक गोष्टींसारखीच याची पण दोन-तीन व्हर्जन आहेत. पण सगळ्यात पहिल्यांदा हे गाणं १७६५ ला Mother Goose’s Melody या
लंडनमध्ये छापलेल्या पुस्तकात छापलं गेलं होतं.
जॅक आणि जिलची गोष्ट एखाद्या तालुका लेव्हलच्या पेपरात येणाऱ्या बातमीच्या सुरात सांगायची तर – इंग्लंडमधल्या Somerset कौंटीतल्या मौजे Kilmersdon या गावात रहाणारा इसम जॅक उमर अदमासे २५ वर्ष धंदा शेती हा गावात असणाऱ्या टेकडीवर पाणी आणायला (पाणी आणायला टेकडीवर? हा प्रश्न मलाही सुटलेला नाही) गेला असता अपघातग्रस्त होऊन मरण पावला. या वेळी गरोदर असलेली त्याची बायको जिल उमर अदमासे २० धंदा घरकाम ही सुद्धा बाळंतपणानंतर मानसिक धक्क्याने काही दिवसांनी मरण पावली.
या गोष्टीत पुढं दुर्दैवी दाम्पत्याच्या मुलाला सगळ्या गावाने मिळून वाढवले आणि त्याने पुढे मोठा झाल्यावर आपल्या आईबापाच्या स्मरणार्थ गावात एक स्मृतीशिळा बसवली. पण या घटनेचा नक्की काळ मात्र कळलेला नाही.

जॅक आणि जिलच्या गोष्टीचं दुसरं व्हर्जन मात्र भलतंच रक्तरंजित आहे आणि ते जोडलं गेलं आहे फ्रेंच राज्यक्रांतीशी. १७९३ मध्ये फ्रान्सचा राजा King Louis XVI – आणि त्याची राणी Marie Antoinette यांची फ्रेंच राज्यक्रांती दरम्यान क्रांतिकारकांनी गिलोटीनखाली मुंडकी उडवली याचा संदर्भही या कवितेशी जोडला जातो. King Louis XVI उर्फ जॅक याचं राजमुकुट घालणारं मुंडकं उडवलं गेलं आणि त्याच्यापाठोपाठ राणी Marie Antoinette उर्फ जिल हिचंही उडवलेलं मुंडकं गडगडत त्याच्या शेजारी येऊन पडलं.

यातली कुठली गोष्ट खरी असेल ती असो पण एखाद्या दुःखद घटनेची हकीकत ही लहान मुलांची कविता व्हावी आणि पिढ्यानपिढ्या मुलांनी ती गात रहावी हे फारच विस्मयकारक आहे.
यशोधन जोशी
Leave a Reply