मानवाने आपल्या उत्क्रांतीच्या दरम्यान अनेक विषयांचे ज्ञान प्राप्त केले आहे. त्यातले मानवाच्या दृष्टीने महत्त्वाचे ज्ञान आहे आरोग्य विषयाचे. रोग व त्यांच्यावरील औषधे यांच्या शोधाच्या कथा अकल्पीत आहेत. तसाच आणखी एक महत्त्वाचा शोध म्हणजे शस्त्रक्रिया. शस्त्रक्रिया ही प्रक्रिया अतिशय वेदनादायी असते. भूल देण्याचे तंत्र विकसित होण्याआधी अफूसारख मादक पदार्थ वापरले जात. अर्थातच ते माफक प्रमाणातच वापरावे लागत आणि त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यावर अनेक मर्यादा होत्या. भूलीचे तंत्र विकसित होण्याआधी शरीराच्या आतील भागांच्या शस्त्रक्रिया तर शक्यच नव्हत्या. होणार्या वेदनांना आणि शस्त्रक्रिया करताना वापरले जाणारे चाकू यांना घाबरून रुग्ण शक्यतो शस्त्रक्रिया करणे टाळत असत. १९ व्या शतकाच्या मध्यात क्लोरोफॉर्मचा शोध लागे पर्यंत ही अशीच स्थिती होती.
पण हा काही आजचा विषय नाही. आजचा विषय आहे तो इस्ट इंडिया कंपनीने नेमलेल्या Dr. James Esdile या स्कॉटिश डॉक्टरचा. हा रेव्हरंट James Esdile चा थोरला मुलगा. त्याने एडिनबर्ग विद्यापीठातून M.D. ही वैद्यकीय पदवी घेतली. त्यानंतर त्याची नेमणूक इस्ट इंडिया कंपनीच्या वैद्यकीय विभागात झाली आणि १८३० साली तो कलकत्ता येथे आला. जेम्सला दम्याचा त्रास होता आणि भारतातील हवामान आपल्याला मानवेल या भावनेने तो भारतात आला. मात्र उत्तर प्रदेशमधील आझमगढ येथे काम करताना त्याला दम्याचा मोठा झटका आला आणि त्याने दोन वर्षांची रजा घेतली. १८३९ साली तो जेव्हा पुन्हा कामावर रुजू झाला तेव्हा त्याची नेमणूक हुगळीच्या इमामबाडा हॉस्पिटलात झाली.
एकदा जेम्सच्या वाचनात इंग्लंडमधील एका शस्त्रक्रियेविषयी माहिती आली. तेथील एका वैद्याने संमोहनशास्त्राच्या आधारे भूल न देता ही शस्त्रक्रिया पार पाडली होती. ही माहिती वाचल्यावर जेम्सला या विषयात अतिशय उत्सुकता निर्माण झाली आणि त्याने हुगळीच्या त्या हॉस्पिटलमध्ये याचा प्रयोग करण्याचे मनात घेतले. जेम्सला संमोहन शास्त्राविषयी फारशी माहिती नव्हती. हुगळी येथील एका हायड्रोसीलच्या शस्त्रक्रियेच्या दरम्यान रुग्णाला झालेल्या वेदना बघून तर त्याने हा प्रयोग करण्याचे मनात पक्के ठरवले.
त्याचा पहिला पेशंट होता रस्त्याच्या कामावर असलेला हायड्रोसीलचाच रुग्ण असलेला एक कामगार. ४ एप्रिल १८४५ रोजी त्याने संमोहनाचा पहिला प्रयोग केला. जेम्सने पुढे लिहिलेल्या Mesmerism in India या पुस्तकात त्याने त्याचे वर्णन केले आहे.
त्याचे दोन्ही गुडघे माझ्या दोन पायांमध्ये ठेवून त्याला डोळे मिटावयास सांगितले.मी माझा हात त्याच्या चेहर्यावरून ते खाली पोटापर्यंत सावकाश फिरवू लागलो. साधारणतः अर्धा तास हा प्रकार मी केला. पण रुग्णाच्या परिस्थितीत काहीही फरक पडला नाही. अजून १५ मिनिटे मी हा प्रकार चालू ठेवला तरीही मला अपेक्षीत असा कुठलाही बदल रुग्णात दिसला नाही. निराश होऊन मी माझा प्रयोग फसल्याचे जाहीर केले. मग मी शांतपणे बसलो आणि काय चुकले असावे याचा विचार करू लागलो. माझे लक्ष रुग्णाकडे गेले आणि मी त्याला डोळे उघडावयास सांगितले. त्याने डोळे उघडले आणि तो म्हणाला ’मला संपूर्ण खोली धुराने भरल्यासारखी दिसत आहे’ माझी उत्सुकता पुन्हा चाळवली आणि मी माझे हात त्याच्या डोक्यापासून छातीपर्यंत आणून येथे थोडा दाब दिला. त्याने मांडीपाशी असलेल्या त्याच्या हातांनी माझे हात दाबले. ही प्रक्रिया पुढे तासभर चालू ठेवली. त्यानंतर त्याला झोप येत असल्याचे त्याने सांगितले. याचवेळी मला जाणवले की त्याच्या जाणीवा कमी होत चालल्या आहेत व त्याच्या प्रतिक्रियाही विसंगत झाल्या आहेत.
जेम्सने यानंतर शस्त्रक्रिया पार पाडली. शस्त्रक्रिया करताना रुग्णाला कुठल्याही वेदना झाल्या नाहीत. यानंतर जेम्सने रुग्णांना संमोहित करून शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. १८४५ ते १८४७ या दोन वर्षांमध्ये जेम्सने वेगवेगळ्या अशा ३०० शस्त्रक्रिया पार पाडल्या.
२२ जानेवारी १८४६ साली त्याने The Englishman या वृत्तपत्राच्या संपादकाला एक अहवाल पाठवला. त्यात त्याने संमोहनाखाली पार पडलेल्या मागील आठ महिन्यातील शस्त्रक्रियांची यादीच दिली आहे. अहवालाच्या सुरुवातीस तो म्हणतो
माझ्या गेल्या आठ महिन्यातील संमोहनाखाली केलेल्या शस्त्रक्रियांची माहिती मी देत आहे. संमोहनाखाली मी पार पाडलेल्या शस्त्रक्रियांमुळे येथील स्थानिक रुग्णांना मोठा फायदा झाला आहे. शस्त्रक्रियेच्या होणार्या वेदनेपासून मुक्ती याशिवाय अनेक फायदे त्यांना मिळाले आहेत. असे उपचार त्यांना मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि त्यापासून त्यांना वंचित ठेवता येणार नाही.

जेम्सने केलेल्या शस्त्रक्रियांपासून रुग्णांमध्ये खरोखरच आश्चर्यकारक परिणाम दिसून आले. मुळात शस्त्रक्रिया करताना त्यांना कुठल्याही वेदना झाल्या नाहीत. जेम्सने संमोहनाखाली केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये एकही रुग्ण दगावला नाही. शस्त्रक्रियेनंतरही जखमांना कुठलाही संसर्ग झाला नाही आणि रुग्ण लवकर बरे झाले.
जेम्सने संमोहनाखाली शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. त्याने कलकत्त्यामध्ये संमोहनाखाली उपचार देणारा एक दवाखानाही उघडला. पण पुढे १८४९ साली जेम्सची नेमणूक इस्ट इंडिया कंपनीच्या आरमारी विभागात केली गेली. १८५३ साली जेम्स निवृत्त झाला आणि तो लंडन येथील संमोहन इस्पितळाचा संचालक झाला. १० जानेवारी १८५९ साली जेम्सचा मृत्यू झाला.
याच काळात भूलशास्त्राची वेगळी शाखा विकसित झाली आणि जेम्सने केलेले हे प्रयोग मागे पडले.
Interesting!
LikeLike