साल होतं १९०४. अमेरिकेतलं पहिलं ऑलिंपिक. सर्वत्र उत्साह पसरलेला. मॅरेथॉन चालू होणार होती. बरोबर ३ वा. ३ मिनिटांनी मॅरेथॉन चालू झाली. आधीच्या बॉस्टनला झालेल्या मॅरेथॉनमधले पहिले तीनही विजेते सामील होते. याचबरोबर क्युबा येथील एक धावपटू सामील झाला होता. आपल्याला या मॅरेथॉनमध्ये भाग घेता यावा म्हणून त्याने संपूर्ण क्युबामध्ये धावून पैसे जमवले होते.
धुळीचा खकाणा आणि प्रचंड उकाड्यात शर्यत चालू झाली. अशा वातावरणामुळे शर्यतीमधील अनेक धावपटूंना उष्माघाताचा प्रचंड त्रास झाला. त्यात शर्यतीच्या संयोजकांनी आणखी भर घातली. धावपटूंना धावताना अतिशय कमी पाणी देण्यात आले. त्यामुळे नर्जलीकरणाचा त्रासही अनेकांना भोगावा लागला. पहिल्या पाच फेर्या या मैदानातच मारण्यात आल्या. मैदानातल्या तिसर्या फेरीच्या दरम्यान पहिली दुर्घटना घडली. John Lordan नावाच्या धावपटूला उलट्यांचा त्रास होऊ लागला आणि त्याने शर्यत सोडून दिली. त्यानंतर धावपटू मैदानाबाहेर पडले. धावपटूंच्यामध्ये अडथळा येऊ नये म्हणून घोडेस्वार, पत्रकार, डॉक्टर, धावपटूंचे सहकारी आणि शर्यत आयोजित करणार्या लोकांनीच इतकी गर्दी करून ठेवली की धावपटूंना त्यातून वाट काढत पळावे लागले.
तर अशा अनेक संकटांमध्ये धावपटूंनी धावण्यास सुरुवात केली. Fred Lorz या धावपटूने आधी झालेल्या बोस्टन मॅरेथॉनमध्ये दोनदा पहिल्या पाचमध्ये क्रमांक मिळवला होता. या धावपटूने ही शर्यत जिंकली. म्हणजे त्यानी तसा दावा केला. दावा केला असे म्हणण्याचे कारण म्हणजे त्याला शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यात त्याला स्नायूंमध्ये पेटके येऊ लागले. मग त्याने पुढील प्रवास एका गाडीमध्ये बसून केला आणि अंतिम रेषेच्या अलीकडे गाडीतून खाली उतरून त्याने शर्यत पूर्ण केली. त्याला संयोजकांनी विजयी घोषीतही केले. Lorz ने शर्यत आपण जिंकल्याचा दावा केला पण काही प्रेक्षकांनी त्याचे रहस्य फोडले. Lorz ने ही बातमी खोटी आहे असा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण हे शाबीत झाल्यावर त्याच्यावर आजन्म बंदी घालण्यात आली.
याच शर्यतीत Len Taunyane आणि Jan Mashiani हे दोघे कृष्णवर्णीय आफ्रिकेतील आदिवासी जमातीतील धावपटू सामील झाले होते. ऑलिंपिकमध्ये सामील झालेले हे दोघे पहिले कृष्णवर्णीय आफ्रिकन.

शर्यतीत दुसरा नंबर पटकावला Thomas Hicks याने. Hicks हा व्यवसायाने विदुषक होता. २० व्या मैलाला Hhicks ला प्रचंड तहान लागली. त्याने आपल्या सहकार्यांना पाणी मागितले. पण त्याला पिण्यासाठी पाणी देण्याऐवजी त्याच्या सहकार्यांनी त्याचे अंग ओल्या स्पंजने पुसून काढले. त्याला पळण्यासाठी उर्जा मिळावी यासाठी त्याच्या सहकार्यांनी त्याला पळताना अंड्याच्या पांढर्या बलकाबरोबर उत्तेजना देणारे एक औषध दिले. पण झाले भलतेच. Strychnine नावाचे हे औषध वापरले जायचे उंदीर मारण्यासाठी. त्याने त्याला विषबाधा झाली. त्याचा पळण्याचा वेग मंदावला. शेवटचे दोन मैल राहिले असताना त्याला त्याच्या सहकार्यांनी Strychnine ब्रॅंडीमध्ये मिसळून दिले. याने त्याला थेडी तरतरी आली. पण शेवटी त्याच्या सहकार्यांनी त्याला चक्क उचलून शर्यत पूर्ण केली. Lorz चा खोटेपणा शाबीत झाल्यावर Hicks ला विजयी घोषीत केले.

अर्ध्या शर्यतीच्या दरम्यान Miller नावाचा धावपटू सगळ्यात पुढे होता. त्याच्या मागे Newton आणि Hicks होते. Miller ला पायामध्ये पेटके येऊ लागले. त्यातच त्याने शर्यतीत एका ठिकाणी चुकीचे वळण घेतले. आता परत वळून पुन्हा शर्यतीत पळण्याचा त्याला कंटाळा आला व त्याने शर्यत सोडून दिली. Newton हा एकमेव धावपटू होता ज्याने कुठलीही गडबड न करता ही शर्यत तिसर्या क्रमांकाने पूर्ण केली.
१९ व्या मैलाला आणखी एक दुर्घटना घडली. William Garcia नावाचा धावपटू हा चौथ्या क्रमांकावर होता. तो पळताना अचानक खाली पडला. त्याला तेथेच रक्ताची उलटी झाली. त्याला ताबडतोब दवाखान्यात नेण्यात आले. तो अगदी मरणाच्या दारातून परत आला.
Andarin Carabjal या क्युबन धावपटूने ही शर्यत चौथ्या क्रमांकाने पूर्ण केली. त्याने क्युबात पळून जमवलेले पैसे अमेरिकेत आल्यावर जुगारात खर्च केले. त्याला शर्यतीत घालण्यासाठी योग्य असे कपडे देखील उरले नाहीत. शेवटी त्याने घातलेली फूल पँट अर्धी कापली. हा पळत असताना रस्त्याच्या बाजूला एका फळाच्या दुकानातून सफरचंद घेतले. पण ते कच्चे असल्याने ते खाल्ल्यावर त्याच्या पोटात पेटके येऊ लागले. मग पठ्ठ्याने काहीवेळ रस्त्याच्या बाजूला डुलकी घेतली. जागा झाल्यावर त्याने मग शर्यत पूर्ण केली.

तर अशी ही १९०४ साली झालेल्या ऑलिंपिकमधील शर्यतीची कथा.
Leave a Reply