आजकाल आपल्याकडं कुठल्याही जरा बऱ्या हॉटेलात गेलो की होणारा सगळ्यात मोठा वैताग म्हणजे एकसारख्याच चवीच्या पदार्थांची स्पॅनिश इटालियन अशा कुठल्या कुठल्या भाषेत लिहिलेली नावं. या पदार्थांच्या नावाचं स्पेलिंग वाचताना स,ह,ज,झ आणि च यापैकी नक्की उच्चारावं याचा इथं फार घोटाळा होतोय. उदाहरणार्थ mojito असं स्पेलिंग असलं तरीही त्याला muh-hee-toh म्हणायचं, lasagne असं उदराग्नी, कामाग्नी च्या जवळपास जाणारं स्पेलिंग असलं तरी luh-za-nyuh असं उच्चारायचं. आपल्याला ऑर्डर देताना ती नावं नीट उच्चारता नाही आली की ऑर्डर घेणाऱ्याच्या चेहऱ्यावर एक खुनशी आनंद पसरल्याचा भास मला नेहमी होत असतोय. म्हणजे एकुणात काय तर आपल्याला स्वतःच्या गोष्टींचं कौतुक कमी आणि दुसऱ्याचं जास्त. दुपारी जेवून, पानाचा तोबरा चघळून झाल्यावर अंधाऱ्या आणि थंडगार माजघरात तासभर झोपण्यात जे सुख आहे ते शब्दात सांगता येणार नाही. वामकुक्षी घेणाऱ्याना हसणाऱ्या लोकांसाठी देशोदेशीच्या दुपारी झोपण्याच्या तऱ्हांचा घेतलेला हा धांडोळा –
स्पॅनिश Siesta – स्पॅनिश लोक हे मुळात झोपप्रिय आहेत. Siesta या शब्दाचा मूळ अर्थ सहावा तास असा आहे. पण स्पॅनिश मंडळी याचा अर्थ घेताना सकाळी झोपून उठल्यानंतर सहाव्या तासाला जेवून खाऊन जी विश्रांती घेतली गेली पाहिजे ती असा घेतात. साधारणपणे हा Siesta ची वेळ दुपारी दोनपासून ते पाचपर्यंत मानली जाते. स्पेनमधल्या अनेक शहरात दुपारी या वेळात दुकानं बंद असतात. आता या Siesta ला तशी काही अंधार,फॅन, अंगावर पातळ चादर इ इ सरंजामाची गरज नाही आपण बसल्या बसल्याही Siesta घेऊ शकतो. पण हा Siesta चार तासांचा नसून फक्त अर्ध्या तासाचा असतो. सुप्रसिद्ध स्पॅनिश दर्यावर्दी कोलंबस साहेबसुद्धा दुपारी भर समुद्रात जहाजाचा नांगर टाकून अर्धा तास siesta उर्फ एखादी पडी टाकत असणार याबद्दल मला कुठलीही शंका नाही.
इटालियन Riposo (उच्चारी रिपोजो) – झोपेच्याबाबतीत इटालियन मंडळींनी स्पॅनिश मंडळींच्या हातावर हात मारलेला आहे म्हणायला हरकत नाही. पण इटालियन मंडळी ही जरा जास्तच बैजवार असल्यानं त्यांनी स्पॅनिशांच्या अर्ध्या तासाच्या विश्रांतीला स्पॅघेट्टीसारखं ताणून थेट दीड ते दोन तास करून टाकलेलं आहे. रिपोजो साधारणपणे दुपारी दीड वाजल्यापासून चारपर्यंत चालतो. या वेळात ऑफिस, दुकानं तर बंद असतातच पण सुप्रसिद्ध म्युझिअम आणि गॅलरीजसुद्धा बंद असतात. रिपोजो हा बसल्या बसल्या पार पाडण्याचा विधी नसून दुकानं, ऑफिसं यांना टाळं लावून घरात जाऊन थेट अंथरुणावर अंग टाकण्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळं रिपोजोचं विडंबन करून त्याला ‘रिझोपो’ म्हटलं तरी फारसं बिघडणार नाही.
जपानी Inemuri (उच्चारी ईनेमुरी) – जपानी चेहऱ्यावरून झोपेत असल्यासारखी दिसत असली तरी त्यांच्यात झोपेचं प्रमाण फार कमी आहे. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन दिवसरात्र काम करत रहाण्याची सवय त्यांनी स्वतःला लावून घेतलेली आहे. पण या झोपेची कमतरता पूर्ण करण्याचं त्यांचं तंत्र थोडं वेगळं आहे. कामंधंदे बंद करून आणि दुकानं/ऑफिसला टाळी न ठोकता बसल्या जागेला दोन पाच मिनिटांची डुलकी घेणे.जपानी मंडळी रेल्वेत किंवा बागेत बसल्या बसल्या ईनेमुरी घेताना दिसतात. ईनेमुरी हे तुमच्या धडपडून काम करण्याच्या वृत्तीचं द्योतक आहे असं जपानी लोक मानतात. यापुढं कधी ऑफिसात जाण्याची वेळ आलीच आणि दुपारी सवयीनं डोळे झाकायला लागले तर ‘गर्व से कहो हम ईनेमुरी मै है !’
खरं तर हा लेख काल आंतरराष्ट्रीय झोप दिवसाच्या निमित्ताने पोस्ट करायचा होता पण आधी siesta मग riposo आणि त्यांच्यामध्ये inemuri या गडबडीत ते राहूनच गेलं.
अगदी जिव्हाळ्याचा विषय मांडल्याबद्दल धन्यवाद!
नेहमीप्रमाणेच मस्त माहिती आहे..!
LikeLike
पुर्वी गल्फ देशातही, “एक ते चार” झोपेची वेळ असे. सकाळी आठ ते एक आणि संध्याकाळी चार ते सात या ऑफिसच्या वेळा होत्या. संध्याकाळच्या सत्रात, “दुपारची झोप नीट झाली ना ?” याची आवर्जून चौकशी केली जात असे. पण वाहतुकीवर पडणारा ताण, लोकांचा रहायच्या जागा दूर असणे, मॉल्सचा धंदा कमी होणे वगैरे कारणासाठी आता नऊ ते पाच अशा वेळा आता असतात.
LikeLiked by 1 person