माणसांप्रमाणे प्राण्यांना भावभावना असतात का? तसेच प्राण्यांना माणसांच्या भावभावना कळतात का? या दोनही प्रश्नांवर गेली तीन चार शतके संशोधन चालू होते. प्राण्यांचा आणि भावभावनांचा काहीएक संबंध नाही अशी समजूत अनेक शतके रुढ होती. याला धक्का देणारी एक घटना घडली १९ व्या शतकाच्या अखेरीस.
१८९१ साली Wilhelm von Osten या घोड्यांच्या शिक्षकाने सगळ्या जगाला अचंबित करून सोडलं. त्याने त्याचा Hans नावाच्या घोड्याला मानवाप्रमाणे बुद्धिमत्ता असल्याचा दावा केला. याची प्रात्यक्षिके तो सगळीकडे करू लागला. त्याने हान्सला गणिती प्रश्न सोडवण्यात तरबेज केले होते. उदा. तीन गुणिले चार म्हणजे किती? असा प्रश्न हान्सला विचारला की हान्स आपल्या पायाच्या टापांचा १२वेळा आवाज करी. त्याला एखाद्या कागदावर लिहिलेल्या आठ वजा पाच किती? असा प्रश्न दाखवला की तो अचूकपणे तीनदा टापांचा आवाज करी. हे सगळे पाहून लोक आश्चर्यचकित होत. यामुळे हान्सला जर्मनीत भलतीच प्रसिध्दी मिळाली. हान्स हा खरोखरच बुद्धिमान घोडा आहे असे लोकांना वाटू लागले. पण काही लोकांना शंका आली की जेव्हा Wilhelm ही प्रात्यक्षिके करतो त्यावेळी तो हान्सला काही खाणाखुणांनी सूचना देतो.

याची सत्यता उलगडण्यासाठी १९०४ साली जर्मन वैज्ञानिकांची एक समिती नेमण्यात आली. या समितीमध्ये वैज्ञानिकांबरोबर सर्कसमध्ये प्राण्यांना प्रशिक्षण देणार्या प्रशिक्षकाचा समावेश केला गेला. या समितीने एक प्रयोग केला. त्यांनी हान्सला Wilhelmच्या अनुपस्थितीत प्रश्न विचारायचे ठरवले. तसा प्रयोग केला गेला आणि Wilhelm हजर नसतानाही हान्सने अचूक उत्तरे दिली. यामुळे हान्सच्या बुद्धिमत्तेवरचा लोकांचा विश्वास आणखी दृढ झाला.
असे असले तरीही काही तज्ञांना यामागे काहीतरी रहस्य असावे असे जाणवत होते. १९०७ साली ऑस्कर फुग्स्ट नावाच्या एका मानसशास्त्रज्ञाने हान्सची पुन्हा चाचणी घेण्याचा चंग बांधला. त्याने हान्सला प्रश्न विचारल्यावर हान्सचे निरीक्षण चालू केले. अनेक अथक प्रयत्नानंतर ऑस्करने यामागील रहस्य उलगडले. हान्स हा हुशार घोडा होता यात वादच नाही. Wilhelm ने त्याला प्रश्नकर्त्यांच्या चेहर्यावरचे भाव वाचण्याचे प्रशिक्षण दिले होते. जेव्हा हान्सला तीन गुणिले चार किती? असा प्रश्न विचारला जाई की हान्स टापा वाजवायला सुरुवात करायचा. त्यावेळी हान्सची नजर प्रश्नकर्त्यांच्या चेहर्याकडे असे. टापा वाजवताना प्रश्नकर्त्याच्या चेहर्यावरील ताण वाढत जात असे आणि जेव्हा बारावी टाप वाजवली जात असे तेव्हा प्रश्नकर्त्यांच्या चेहेर्यावर ’हुश्श’ असा भाव येत असे आणि हा भाव बघुनच हान्सला आपण उत्तरापर्यंत पोहोचलो याची जाणीव होत असे. ऑस्करने हे सत्य जगासमोर आणले आणि प्राण्यांना भावभावना असतात तसेच ते माणसांच्या चेहर्यावरील भावही वाचू शकतात यावर शिक्कामोर्तब झाले. कदाचीत आपला चेहेरा कोरा ठेवणार्या एखाद्या माणसाने हान्सची परीक्षा घेतली असती तर हान्सला उत्तर देणे शक्य झाले नसते.
हान्स हा इतिहासात Clever Hans म्हणून प्रसिध्द झाला.
कौस्तुभ मुदगल
Leave a Reply