कळा ज्या लागल्या जीवा…

काही दिवसांपूर्वी मी दाताच्या डॉक्टरांच्या खुर्चीत आल्या प्रसंगाला धीरानं ‘तोंड’ देत पडलेला असताना मला सहज वाटलं की पूर्वी जेंव्हा असल्या काही सोयीसुविधा नसताना लोक दातदुखी कशी सहन करत असतील? त्यांच्याकडे दातांच्या दुखण्यावर कोणते उपाय असतील? 

सापडलेला हा विषय मी घराकडं घेऊन आलो आणि दुखऱ्या दातानिशी यावरची माहिती शोधायला सुरुवात केली. आदिमानवाचे दात किडत नसतील कारण तो साखर खायचा नाही पण कच्चं धान्य आणि फळं खाऊन त्याचे दात झिजत मात्र असतील. पण तरीही दातदुखी झालीच तर मग दुखऱ्या दाताच्या मुळाशी एखादा लाकडाचा तुकडा किंवा छोटा दगड ठेवून नंतर त्यावर एकच दणकट घाव घालून दात पाडण्याचे ‘कौशल्य’ माणसाने (दुसऱ्यांच्या किडलेल्या आणि काही वेळा चांगल्या दातांवर केलेल्या) अनेक प्रयोगातूनच मिळवले असावे. (आठवा :- कास्ट अवे सिनेमातला स्वतःच स्वतःचा दात पाडण्याचा प्रसंग) 

प्राचीन मानवाला दातदुखीची ३ कारणं ज्ञात होती – १) दातातली किड  २)शत्रूने केलेली करणी आणि ३) शरीरात वाढलेला कोणतासा एक द्रवपदार्थ.

पूर्वी इतर कसल्याही तपासण्या न करता फक्त जीभ बघून केलेल्या निदानावरून योग्य ते औषध देणारे फॅमिली डॉक्टर होते त्याचप्रमाणे मेसोपोटेमियातले वैद्य दात बघून रोग्याच्या तब्बेतीचा अंदाज लावायचे उदाहरणार्थ – 

If his teeth are dark-colored, the disease will last a long time.

If his teeth are crowded together, he will die.

If his teeth (fall out) his house will collapse.

If he grinds his teeth, the disease will last a long time.

If he grinds his teeth and his hands and feet shake: Hand of the moon god, he will die.

(संदर्भ – क्युनिफॉर्म लिपीत कोरलेल्या मातीच्या पाट्या) 

दातांवर करणी होऊ नये म्हणून किंवा झालेली करणी उतरावी म्हणून गळ्यात चामड्यात गुंडाळलेले मंतरलेले दगड बांधले जात. तर दातातली किड मरावी म्हणून दुखऱ्या दाताला वेगवेगळ्या औषधी वनस्पती जाळून धुरी दिली जायची आणि नंतर त्या दातात काही बियांची पूड आणि मेण एकत्र करून भरलं जायचं. 

बॅबिलोनचा राजा हम्मुराबीने इसपू २२५०मध्ये तेंव्हाच्या शल्यविशारद (त्याकाळात न्हावी छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया करत आणि दुखणारे दातही काढून देत.) मंडळींसाठी एक नियमावली तयार केली त्याला ‘Hammurabi’s code’ असं म्हटलं जातं. हे सगळे नियम एका दगडी स्तंभावर लिहिलेले आहेत आणि ही पहिली वैद्यकीय नियमावली मानली जाते. हे नियम अतिशय कडक आहेत एखाद्या शस्त्रक्रियेदरम्यान समजा रुग्ण दगावला तर त्याची शिक्षा म्हणून शल्यविशारदाचे हातच तोडले जात. (Hammurabiच्या code चे पालन करणारे भारतात अजूनही बक्कळ आहेत) 

Hammurabi’s code मध्ये दातांबद्दलही काही नियम आहेत. सुमारे दोन परिच्छेद हे दातांबद्दल आहेत. दात ही माणसाची संपत्तीच मानली गेली जायची. रागाच्या भरात कुठल्या दांडगोबानं एखाद्या नागरिकाचा दात घशात घातल्यास तर त्याबदल्यात त्याचा स्वतःचा एक दात काढला जायचा पण एखादया गुलामाचा दात घशात घातला तर त्या बदल्यात चांदी द्यावी लागायची. 

ग्रीक आणि रोमनांच्या ‘दंत’कथा 

रोमनांना युद्धात अनेकदा अवयव गमवावे लागत मग त्यांची जागा सोन्याच्या अवयवांनी भरून काढली जायची. युद्धात (आणि बहुधा काही वेळा गृहयुध्दातही) दात गमावले तर त्याजागी सोन्याचे दात किंवा दोन दातांच्या मध्ये सेतू बसवला जाई. आज आपण दाताना जे ब्रिजिंग करतो त्याचे श्रेय या मंडळींना आहे. रोमन साम्राज्य गडगंज असलं तरी सोन्याची किंमत त्यांनाही होतीच त्यामुळे अशी सोनेरी मंडळी पैलतीरी पोचल्यावर त्यांच्या अंगावर चढवलेले हे सगळे सोन्याचे साज उतरवल्याशिवाय त्यांना जाळू/पुरू नये असा नियम होता. तरीही काही ‘विद्रोही’ मंडळींनी स्वत:ला या साजासकट पुरून घेतल्याने आपल्याला त्यांच्या या कौशल्याची माहिती मिळाली. 

ग्रीकांनी आपल्या दातदुखीचा भार देवावर सोडलेला होता. Aesculapius हा औषधांचा देव त्यांची दुःखं स्वतःच्या शिरावर (आणि काहीवेळा दातावरही) घेई. याची मंदिरं बांधली जात आणि तिथं केवळ नामस्मरणाने दाताचे रोग बरे व्हायचे. Aesculapiusलाही जमलं नाहीच तर जादूटोणा, बाहेरची बाधा काढणं वगैरे होतंच. 

Aesculapius

दात पहिल्यांदा भरण्याचे श्रेय बहुदा Celsus या रोमन दंतवैद्याचे आहे. जवळपास इसवीसनाच्या पहिल्या शतकात त्याने एका रोग्याच्या दातात शिसे भरले होते. अफू, लवंग इ एकत्र करून त्याचा लेप दुखऱ्या दातावर लावण्याचा उपाय त्याने शोधून काढलेला होता. हा Celsus आणि ख्रिस्त एकमेकांना समकालीन, ख्रिस्तापेक्षा तो जवळपास १५ वर्षांनी मोठा होता. 

मध्ययुगीन युरोपमधलं ‘थेटर’ 

चौकात गर्दी गोळा करून जादूचे खेळ करून दाखवणारे आपल्याला काही नवीन नाहीत. पण मध्ययुगीन युरोपात चौकात वेगळ्याच जादूचे खेळ चालत. एखाद्या गावात बाजार भरलेला असताना अचानक कर्णा फुंकल्याचा जोरदार आवाज व्हायचा आणि साहजिकच गर्दी जमायला लागायची. पहिल्यांदा एक जादूगार येऊन ग्राम्य विनोद करत जादू करायला लागायचा आणि गर्दी जssरा स्थिर व्हायची. काही मिनिटं यात गेली की पुन्हा वाद्यांचा कल्लोळ उठायचा आणि एक लांब कोट आणि चमकदार टोपी असा भपकेबाज पेहराव केलेला मनुक्ष येऊन दाखल व्हायचा याशिवाय त्यानं गळ्यात मानवी दातांची माळही घातलेली असायची. तो आपण आजवर किती लोकांचे दुखरे दात कसे त्यांना मुळीच न दुखवता उचकटून हातात दिले अशी स्वतःची बढाईदार स्तुती करायला लागायचा आणि त्याला भुलून एखादा दुखऱ्या दाताचा गडी स्वतःहून पुढे यायचा. त्याचा दुखरा दात शून्य मिनिटात काढून दाखवला जाई तो गडीही आपल्याला वेदना कशी जाणवली नाही हे सगळ्यांना सांगायला लागायचा. रस्त्यावर जादूचे खेळ बघून तयार झालेल्या मंडळींना हे जादूगार स्वतःचाच माणूस गर्दीत उभा करून त्यालाच पुढं बोलावतात हे माहीत आहेच. इथंही तोच प्रकार होई. खोटं रक्त, आधीच कुणाचा तरी काढलेला दात हातचलाखीने या गड्याच्या तोंडात टाकून खेळात रंग आणला जाई. यानंतर वाद्यांचा पुन्हा दणका उठत असे. 

हे बघून धीर आलेली दुखऱ्या दातांची मंडळी आता पुढं येत पण त्यांना यापरास वेगळाच अनुभव येई. दात उचकटताना त्यांनी खच्चून मारलेली बोंब वाजंत्रीच्या ‘बहु गलबल्यात’ कुणालाही ऐकूच जायची नाही. दुखरा दात काढला की संपलं असं आपल्याला वाटत असलं तरी ते तसं नाही बरेचदा यामुळं काही इतरही त्रास सुरू व्हायचे आणि ते निस्तरायला लागायचे. आणि तोवर आपले हे डॉक्टर गुल झालेले असायचे. याशिवाय अजून एक उपाय असायचा तो म्हणजे शल्यक्रिया करणाऱ्या न्हावी मंडळींकडून उपचार करून घेणे. ते सुद्धा दात काढणे आणि अंगात वाढलेला कुठंलासा द्रवपदार्थ काढणे हे दोनच उपाय करत. दोन्हीकडे करताना रक्तपात अटळच होता. तेंव्हाच्या डॉक्टर मंडळींनी आपण दातांवर काम करणार नसल्याचं ठरवूनच घेतलेलं होतं. 

चौकात,बाजारात,जत्रेत गर्दी गोळा करून दात काढणाऱ्या या मंडळींना tooth-drawer म्हटलं जाई आणि गावाकडची मंडळी यांना toothers किंवा toothies ही म्हणत. त्यातले सगळेच काही भोंदू किंवा भामटे नसत पण अनेकदा त्यांना फारसं ज्ञान नसायचं त्याचबरोबर वेदनाशामकं, भूल नसताना आणि जेमतेम उपकरणांनिशी ते काम करायचे. त्यांना बऱ्याच स्पर्धेलाही तोंड द्यायला लागायचं. नुसत्या दातांवर पोट भरत नसल्याने ते त्या जोडीला पायाची कुरुपं काढणे, मोडलेली हाडं जोडून देणे इ उद्योगही करत. 

त्यातले काही दातकाढे अतिशय प्रसिद्ध होते त्यापैकी एक म्हणजे Martin Van Butchell. हे साहेब दिसायला काही औरच होते. ठेंगणा बांधा आणि लांब दाढी असणारा हा दातकाढ्या लंडनमधून आपल्या पांढऱ्या रंगाच्या व त्यावर बैंगणी ठिपके असणाऱ्या तट्टावरून फिरत असे.

या गृहस्थाने केलेला अजून एक अचाट उद्योग म्हणजे त्याने त्याच्या मयत बायकोला म्हणजे एलिझाबेथला योग्य त्या प्रक्रिया करून एका काचेच्या पेटीत घालून ठेवलं आणि तो त्याच्याकडे येणाऱ्या मंडळींशी तिची अगत्याने ओळखही करून देत असे. ( या अखंड सौभाग्यवती एलिझाबेथ बाईनी नवरा ख्रिस्तवासी होण्याआधी आपला मुक्काम लंडन म्युझिअममध्ये हलवला आणि १९४१ साली हिटलरच्या हवाईदलाने त्यांना मोक्ष देईपर्यंत त्या तिथंच होत्या.) 

या Martin Van Butchell साहेबानी आपल्या धंद्याची केलेली जाहिरात वाचण्याजोगी आहे. 

१७व्या शतकापासून ते १९व्या शतकापर्यंत पॅरिसमधल्या Pont-Neuf bridge च्या परिसरात दातकाढे आणि इतर भोंदू मंडळींचा सुळसुळाट होता. दात काढण्यापासून ते भूत उतरवण्यापर्यंत सर्व सिद्धी प्राप्त असलेली मंडळी इथं ठेचेला पाच पन्नास मिळत असत. यापैकी एक होता Le Grand Thomas. भयंकर धिप्पाड असलेला हा मनुष्य चार लोकांच्या वाट्याचे जेवण जेवायचा, तेवढीच वारूणी प्यायचा आणि कधी कधी दिवसाचे १८ तास झोपायचा. पण उरलेल्या वेळात तो पॅरिसमधल्या गोडघाशा मंडळींचे दुखरे दात काढून तो त्यांच्या चेहऱ्यावर (एखादा दात कमी असलेलं) हसू फुलवायचा. त्यानं या क्षेत्रात इतकं नाव मिळवलं की त्याच्यावर अनेक कथा, कविता आहेतच पण नाटकंही त्यांचं दंतपुराणाचं आख्यान लावत. त्याचा पोशाखही एकदम फैनाबाज असायचा. लालभडक कोट, तिरकी आणि मोरांची पिसं खोवलेली टोपी आणि कमरेला खंजीर. Pont-Neuf bridge बद्दल एक सांगायची राहिलेली गोष्ट म्हणजे माणूस असलेलं पहिलं छायाचित्र इथून काढलं गेलेलं होतं. 

पण Le Grand Thomasनंतरच्या काळात मात्र दातकाढ्यांचा सामाजिक दर्जा घसरला तो घसरलाच, फ्रान्समध्ये तर ‘दातकाढयांसारखे खोटे बोलणे’ हा वाक्यप्रचारच रूढ झाला. एखादा दात काढल्यासारखा दाखवताना आपल्या हातातला दात कळा लागलेल्या माणसाच्या तोंडात टाकला जायचा आणि तो कसलेला कलाकार तोंडातला दात आणि आधीच घेऊन ठेवलेलं कोंबडी/बकरीचं रक्त थुंकून दाखवायचा की लगेच लोकांच्या रांगा लागल्याच. दुखणेकरी माणसाला बसवायला खुर्ची वगैरे नसायचीच त्यामुळं वरच्या रांगेतील सुळे किंवा दाढा काढणं फारच अवघड असायचं मग दातकाढे हे दात काढता येणार नाहीत याचा अंदाज आला की त्यांचा संबंध डोळ्यांशी जोडून गाल फुगवून बसलेल्या माणसाला डोळे जाण्याची भीती घालायचे. आणि बिचारे लोक डोळे तरी वाचले याचं समाधान मानून कळा सहन करायचे. 

कर्माचं फळ आणि दाताला कळ 

चर्चमध्ये अनेक रोगांवर उपचार होत असले तरी काही वेळा चर्च धर्माच्याविरुद्ध वर्तन करणाऱ्याला जबर शिक्षाही करत. ख्रिस्ती मंडळींच्या ४० दिवसांच्या Lent या उपासाच्या दिवसात चोरून मांस खाणाऱ्या/उपास मोडणाऱ्या मंडळींना दात उपटण्याची शिक्षा दिली जायची. आणि हे दात शक्यतोवर पुढचेच काढले जायचे जेणेकरून ती पोकळी सदैव इतरांना दिसत राहील. (आपल्या नशिबानं हिंदू धर्मात असं काही नाही नाहीतर अनेकांच्या आयुष्यात मोठी ‘पोकळी’ निर्माण झाली असती.) इतरही अनेक गुन्ह्यातल्या हाताबद्दल गुन्हेगाराला दात गमवायची वेळ यायची. आपण अनेकदा सिनेमात डायलॉग ऐकलेला आहे की ‘हमे अमुक तमुक लाख रुपये दे दो, वरना हम तुम्हारे बच्चे के तुकडे तुकडे जर देंगे’ या डायलॉगचं श्रेय बाराव्या शतकातला इंग्लंडचा राजा जॉनला द्यायला हरकत नाही त्यानं एका श्रीमंत माणसाकडून १०००० ducats उकळण्यासाठी त्याला पकडून आणून स्वतःच्या राजवाड्यात डांबलं आणि तो खंडणी द्यायला राजी होईपर्यंत सात दिवस रोज स्वहस्ते त्याचा एक दात काढून त्याच्यावर राजकृपा केली. 

ख्रिश्चन दंतेश्वरी सेंट अपोलोनिया 

अपोलोनिया ही साधारण इसवीसनाच्या तिसऱ्या शतकात अलेक्झांड्रीया इथं जन्मली, तिचा जन्म व्हावा म्हणून तिच्या आईने मेरी मातेला नवस केलेला होता. त्यावेळी अलेक्झांड्रीयात नुकतीच ख्रिस्ती धर्माची पावलं पडायला लागलेली होती, त्यामुळं त्याला विरोधही प्रचंड होता. अपोलोनियाने ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेऊन त्याचा प्रचार करायला सुरुवात केली. यावर तिला पकडून तिला रोमन देवतांची उपासना करण्याची बळजबरी करण्यात आली याला नकार मिळाल्यावर तिचे सगळे दात उपसून काढले गेले आणि शेवटी तिला आगीत टाकण्यात आले. जळताना तिनं वचन दिलं की जो तिची प्रार्थना करेल त्याला कधीही दातदुखी होणार नाही. 

त्यामुळे हे भोंदू दातकाढे अपोलोनियाची शपथ घेऊन आणि काहीवेळा त्यांच्याकडे असलेल्या ‘साक्षात’ तिच्या दातावर हात ठेवून दातदुखी घालवण्याची हमी देत. अपोलोनियाच्या दातात असलेल्या या दैवी गुणामुळे तिच्या दाताला प्रचंड मागणी आली. पंधराव्या शतकातला इंग्लंडचा राजा सहावा हेन्री हा अतिशय भाविक होता त्याने अपोलोनियाचे सगळे दात आपल्या एजंट मंडळींकडे जमा करण्याचे आदेश जनतेला दिले आणि जनतेनेही याला उस्फुर्त प्रतिसाद देत जवळपास टनभर दात राजाच्या खजिन्यात जमा केले. एवढ्या दातांच्या अपोलोनियाचं पोट भरायची वेळ आली असती तर या बिचाऱ्या राजाचं संपूर्ण राज्यही पुरे पडलं नसतं. 

आपण आधी वाचलं त्याप्रमाणे न्हावी मंडळींना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी कितीतरी आधीपासून होती, या मंडळींनी एकजुटीने इंग्लंडच्या राजाकडे जाऊन दाद मागितली आणि १४६२ मध्ये सर्व प्रकारचे व्यवसाय करण्याची सनद आपल्या पदरी पाडून घेतली. यात त्यांना त्यांच्या स्वतःच्या उद्योगासोबतच इतरही सर्वप्रकारचे उद्योग करण्याचे हक्क मिळाले. फक्त त्यांनी कुंटणखाने चालवू नयेत आणि लोकांच्या केसातल्या ‘श्वापदांना’ काढण्याचे काम करू नये एवढीच अट त्यात घातलेली होती. मग यांनी आपलं सगळं ज्ञान पणाला लावून ‘प्रॅक्टिस’ सुरू केली. १५-२२ ऑगस्ट १६६५ म्हणजे शिवाजी महाराज बहुदा उत्तरेत कुठंतरी असताना दूर लंडनमध्ये आठवडी मयतांचा यादीत एकूण ५५६८ मंडळी दाताच्या दुखण्यामुळे (किंवा बहुदा त्यावरच्या उपायांमुळे) ख्रिस्तवासी झाली असा उल्लेख आढळतो तर प्लेगाने फारच कमी धावा करत फक्त ४२३७चा आकडा गाठला. 

पहिली महिला डेंटिस्ट 

दाताच्या डॉक्टरांपैकी बहुसंख्य महिला असतात (हे विधान मी आजवर वाचलेल्या दवाखान्याच्या पाट्यांवर आधारीत आहे). पण इंग्लंडमधल्या Barber surgeon guild अर्थात न्हावी मंडळींच्या वैद्यकीय संघटनेनं २६ ऑगस्ट १५५७ ला एक पत्रक काढून श्रीमती Dawson यांना दातांवर कोणत्याही प्रकारचे उपचार करण्यास मनाई केली. या बाईंचा पहिला नवरा हा दातांवर उपचार करायचा तो मेल्यावर या बाईंनी त्याचा धंदा आपल्या हातात घेतला. पण लौकरच त्यांनी ‘जातीबाहेर’ लग्न करून नवीन संसार थाटला आणि तरीही पहिल्या नवऱ्याचा धंदा सुरूच ठेवला. हे लक्षात आल्यावर लगेच पत्रक काढून बाईंना हा धंदा बंद करायला लावला. १७४५ मध्ये  इंग्लंडचा राजा दुसरा जेम्सने न्हावी मंडळींच्या सनदेत मोठ्या प्रमाणावर फेरफार करून त्यांच्या हातातली शस्त्रं खाली ठेवायला त्यांना भाग पाडलं. 

या नंतरच्या काळातही अनेक ‘दंतकथा’ घडल्या, शोध लागले आणि आपलं जीवन सुखकर झालं. पण त्याबद्दल लिहीत बसलो तर एखादं मेडिकल जर्नल वाचल्यासारखं वाटून एखादी ‘तीव्र सणक’ तुमच्या डोक्यात जाण्याची शक्यता लक्षात घेऊन मी हा लेख इथं आवरता घेतो. 

ता.क. –  पुस्तकं अर्पण करतात तसं हा लेख अर्पण करायची वेळ आली तर त्याची अर्पणपत्रिका अशी असेल – (प्रेमात न पडताही) तळमळून काढलेल्या कित्येक रात्रींना….

यशोधन जोशी

2 thoughts on “कळा ज्या लागल्या जीवा…

Add yours

  1. खूपच रंजक नि अभ्यासपूर्ण धांडोळा आहे. यावरून एक आठवलं कोलकत्याच्या राष्ट्रीय संग्रहालयातल्या भारहुत कक्षात एक जातक आहे. काही माकडे एका विशालकाय यक्षाचा दात उपटत असल्याचे शिल्पांकित केलेले आहे.हवा असल्यास फोटो पाठवीन.

    Like

    1. जरूर पाठवा. हे कुठलं जातक आहे मलाही नक्की आठवत नाही.

      Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: