डोंगर पोखरून…

मानवाने आजपर्यंत प्रचंड प्रगती केली असली तरी त्याला प्राचीन काळापासून असलेल्या काही समस्यांवर उपाय सापडलेला नाही. आपल्या मुलभूत गरजांबरोबर आपलं जीवन सुखकारक व्हावं यासाठी आपण अनेक वस्तू खरेदी करत आलो आहोत. सध्या जगभर कुठली वस्तू जास्त विकली जाते? या प्रश्नाचं उत्तर कदाचित मोबाईल संच असं असेल. मात्र एका कालखंडात या प्रचंड विक्री होत असलेल्या वस्तूंच्या यादीमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी एक वस्तू होती. उंदीर या प्राण्याने मानवाला प्राचीन काळापासून प्रचंड त्रास दिला आहे. त्यामुळे ’उंदीर पकडण्याचे सापळे’ हे एका कालखंडात प्रचंड विक्री होत असलेल्या वस्तूंच्या यादीमध्ये अग्रस्थान मिळवून होते.

लहानपणी आपली बासरी वाजवून गावातल्या उंदरांना गावापासून दूर नेणार्‍या पाईड पायपरची गोष्ट आपण सर्वांनीच ऐकली असेल. अशी जादूई बासरी मिळावी व आपल्याला त्रास देणार्‍या उंदरांचा खातमा करावा अशी इच्छा माणसाला फार पूर्वीपासूनच राहिली आहे. त्यासाठी त्याने वेगवेगळे प्रयोग केले आहेत पण आजपर्यंत त्याला उंदरांवर पूर्णतः मात करता आलेली नाही.

माणसाने शेती करणे चालू केले आणि तो एका ठिकाणी घर करून राहू लागला. शेतीमुळे त्याला त्याने उत्पादित केलेले वरकड धान्य साठवण्याची गरज भासू लागली आणि याच गरजेमुळे उंदरांना त्याने निमंत्रण दिले. हे साठवलेले धान्य त्यांच्यासाठी अन्नाचा सगळ्यात सोपा स्त्रोत होता. पण उंदरांनी केवळ या साठवलेल्या धान्यावर डल्ला न मारता माणसाच्या इतरही अनेक गोष्टींची नासधूस करायला सुरुवात केल्यानंतर मात्र माणसाने या उच्छादावर उपाय करण्यासाठी प्रयत्न केले.

जसे उंदीर अन्नासाठी आले तशीच मांजरे उंदरांसाठी माणसाच्या सहवासात आली. उंदरांसारखे खाद्य त्यांना माणसाच्या घरांमध्ये सहज उपलब्ध होते. पण एक मांजर मारून मारून किती उंदरांना मारणार. उंदरांची पैदास करण्याची क्षमता प्रचंड होती. त्याकाळी कदाचित मांजरे उंदीर मारत ही असतील पण आजची सोफ्यावर पडून असलेली ही केसाळ मांजर बघितली तर ती उंदीर पकडतील यावर काही माझा विश्वास बसत नाही. मी आत्तापर्यंत उंदीर मांजराचा खेळ केवळ ’टॉम अ‍ॅण्ड जेरी’ मध्ये बघितला आहे.

उंदीर मारण्यासाठी माणसाने जे काही वेगवेगळे प्रयत्न केले आहेत त्याचे वर्गीकरण असे करावे लागेल. पहिला म्हणजे ’ एकावेळी एक उंदीर जिवंत पकडण्याचे सापळे’ नंतर ’एकावेळी अनेक उंदीर पकडण्याचे सापळे’, ’उंदरांना ठेचून मारणारे सापळे’, ’स्प्रिंगच्याद्वारे खटक्यासारखे मिटून उंदरांना चिरडून मारणारे सापळे’, ’चिकट पदार्थाद्वारे उंदरांना पकडता येतील असे सापळे’ आणि याबरोबरच ’उंदरांना विष खायला घालून मारणारे पदार्थ’. असे अनेक प्रकारचे प्रयत्न करूनही आजही उंदरांना पकडण्यासाठी कुठलाही प्रभावी उपाय मानवाला मिळालेला नाही.

अन्नधान्याची नासाडी इतपर्यंत ठीक होते. पण त्याबरोबर उंदरांनी जेव्हा घरातील इतरही गोष्टी कुरतडण्यास सुरुवात केली तेव्हा माणसाने या समस्येकडे गंभीरपणे पाहिले असावे आणि प्लेग सारख्या रोगाच्या प्रसाराचे उगमस्थान उंदीर हे आहे हे कळल्यावर या समस्येच्या गांभीर्यात अजून भर पडली.

प्लेगचा उल्लेख झालाच आहे तर १७ व्या शतकात युरोपमध्ये आलेल्या प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता. रुग्णाची त्वचा काळी पडू लागे व जांघेमध्ये मोठी गाठ येत असे. अशा रुग्णांच्या घरांवर लाल रंगाने खुणा केल्या जात व रात्री मृत पावलेल्या माणसाचे कलेवर शहराबाहेरील एका मोठ्या खड्ड्यामध्ये टाकले जात असे. या प्लेगला Black Death या नावाने ओळखले जात असे. मे ते ऑगस्ट १६६५ या कालावधी दरम्यान लंडनमधील १५% माणसे मृत्यू पावली होती. प्लेगचा प्रसार उंदरांच्या अंगावरील माश्यांमुळे झपाट्याने सर्व युरोपभर झाला. आणखी एक मजेदार गोष्ट म्हणजे आजही लहान मुले आवडीने गात असलेले गाणे ’Ring-a-ring of roses’ हे गाणे प्लेगच्या वर्णनावरील आहे. या गाण्याचे शेवटचे शब्द होते ’All Fall Dead’ जे बदलून ’All Fall Down’ असे करण्यात आले. प्लेगच्या या भयंकर साथीनंतर युरोपमध्ये उंदरांना नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरु झाले.

तर माणसाचे उंदीर पकडण्याचे प्रयत्न आपल्याला पार हडप्पा आणि इजिप्तच्या संस्कृतीपर्यंत म्हणजे किमान ४ ते ५ हजार वर्ष मागे घेऊन जातात. इजिप्त, सिरीया, सायप्रस, इराक आणि मोहेजोदडो येथे उत्खननात भाजलेल्या मातीचे उंदीर पकडण्याचे सापळे सापडले आहेत. आजही Djerbba या बेटावरील खेड्यांमध्ये असे भाजलेल्या मातीचे सापळे बनवले जातात. प्राचीन ग्रीक साहित्यामध्ये Batrachomyomachia नावाची पुराणकथा सापडते. ही कथा आहे बेडूक आणि उंदरांमधील युद्धावर आधारित. ही पुराणकथा आहे साधारणतः इ.स.पू. ५ व्या शतकातली. या कथेमध्ये लाकडी सापळ्याचा उल्लेख आलेला आहे. मातीच्या सापळ्यांमध्ये बदल झाला तो मध्ययुगीन कालखंडात म्हणजे ५ व्या शतकापासून. मातीच्या ऐवजी लाकूड आणि धातूंच्या तारांचा वापर करून उंदीर पकडण्याचे सापळे किंवा पिंजरे बनविण्यास सुरुवात झाली. यात जसे जिवंत उंदीर पकडण्याचे सापळे होते तसे उंदीर चिरडून मारण्याचे सापळे होते. हे सगळे सापळे बनविणारे स्थानिक सुतार किंवा लोहार होते. ग्राहकाकडून मागणी आली तरच हे सापळे बनविले जात होते.

उंदीर पकडण्याचे सापळे पहिल्यांदा व्यावसायिक कारणासाठी उत्पादित करण्याचा प्रयत्न झाला इंग्लंडमधील वेस्ट ससेक्स प्रातांत. Colin Pullinger याने पहिल्यांदा व्यावसायिक कारणासाठी मोठ्या प्रमाणात हे सापळे बनविणे चालू केले. १७८८ साली प्रकाशित झालेल्या फ्रेंच एनसायक्लोपीडियामध्ये लोहार आणि सुतारांनी बनविलेल्या सापळ्यांची जंत्रीच दिलेली आहे.

१८७० साली John Bunnell याने फाश्याच्या सहाय्याने उंदरांना पकडता येईल अशा सापळ्याची रचना केली व त्याचे पेटंट मिळवले. एकाचवेळी अनेक उंदरांना पकडता येईल असा सापळा १८७६ मध्ये John Morris याने बनविला.

उंदरांवर आजपर्यंत सगळ्यात परिणामकारक असा उपाय म्हणजे ’स्प्रिंगच्याद्वारे खटक्यासारखे मिटून उंदरांना चिरडून मारणारे सापळे’ म्हणजेच Snap Trap. आजपर्यंत जगभरात अब्जावधी Snap Trap विकले गेलेले असतील. १८७९ साली पहिल्यांदा अशा सापळ्याला अमेरिकेत पेटंट देण्यात आले. यात बिडापासून बनवलेला एक काटेरी पंजासारखी रचना असे. या पहिल्या Snap Trapच नाव होतं ’Royal No. 1’. उंदरांना पकडण्याचे सापळ्यांमध्ये खरी क्रांती झाली ती १८९४ मध्ये. विल्यम हुकर याने रचना केलेल्या उंदराच्या सापळ्याला १८९४ मध्ये अमेरिकेत पहिल्यांदा पेटंट दिले गेले. हुकरने केलेल्या सापळ्याची रचना इतकी परिपूर्ण होती की आजही जगभर उंदरांना मारण्यासाठी याच प्रकारचे सापळे मोठ्या प्रमाणात वापरले जातात. एका लाकडी फळीवर स्प्रिंगने ताणून बसवलेल्या खटक्यामध्ये उंदरासाठी खाण्यासाठी अमिष लावले जाते आणि ते खाण्यासाठी आलेल्या उंदराचा त्याला स्पर्श होताच खटका उघडून त्या खाली उंदीर चिरडून मरतो अशी अत्यंत साधी रचना होती या सापळ्याची. या सापळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे सापळे वजनाने हलके आणि कुठेही सहज ठेवता येतील असे होते. या सापळ्याचा मिटण्याचा वेग अतिशय जलद होता. साधारणतः सेकंदाच्या ३८ हजारावा भाग इतक्या कमी वेळात हा सापळा बंद होत असे. त्यामुळे त्याची रचना अतिशय परिणाम कारक होती. हुकरने अ‍ॅनिअल ट्रॅप कंपनी नावाने याचे उत्पादनही चालू केले. हुकरचा मृत्यू १९०९ साली झाला. तोपर्यंत त्याच्या नावावर २७ पेटंट होती आणि त्यातील १७ पेटंट ही सापळ्यांसाठी मिळालेली होती. जगभरात खपणार्‍या सापळ्यांच्या ६०% सापळे हे हुकरच्या कंपनीचे असत.

१८९८ साली हुकरच्या रचनेमध्ये थोडे बदल करून ब्रिटिश संशोधक James Atkinson याने बनवलेल्या सापळ्याला ’Little Nipper’ या नावाने पेटंट मिळाले. १९१३ साल James Atkinson ने आपले पेटंट १००० पाऊंडांना प्रॉक्टर या कंपनीस विकले. या कंपनीने आजपर्यंत Little Nipper ची १५० वेगवेगळी मॉडेल्स बाजारात आणली. यानंतर हुकरच्याच मूळ रचनेमध्ये काही बदल करून असे उंदरांना मारण्याचे सापळे बनविण्याची लाटच आली. १९ व्या शतकाच्या अखेरीस व २० शतकाच्या सुरुवातीस अमेरिकन पेटंट ऑफिसने साधारणतः ४४०० पेटंट उंदिर पकडण्यासाठी किंवा मारण्यासाठी वापरायच्या सापळ्यांना दिली होती. पण त्यातील मोजक्या १५-२० जणांनाच या व्यवसायात यश आले.

उंदीर मारणे ही पध्दत अतिशय क्रुर आहे असे काही लोकांना वाटत होते. मग उंदीर जिवंत पकडण्यासाठी सापळे बनविण्याचे प्रयत्न सुरू झाले. (आमच्या लहानपणी जिवंत पकडलेले उंदीर आम्ही पाण्यात बुडवून मारत असू) १८७० साली उंदीर जिवंतपणे पकडण्याचा सापळ्याचे पहिले पेटंट W. K. Bachman याने घेतले. ज्यांच्या झडपा उंदीर आत गेल्यावर वेगाने बंद होतील असे तारांच्या जाळीचे पिंजरे, लाकडी पेट्या बनविण्यात आल्या. १९२४ साली Austin Knees याने उंदरांना आकर्षित करून जिवंत पकडण्याचे अनेक सापळे बनविले. परंतु जिवंत उंदीर पकडण्याच्या सापळ्यांचा बाजारातील खप मात्र एका विशिष्ट मर्यादे पलीकडे जाऊ शकला नाही.

उंदरांना विष घालून मारण्याच्या पध्दतीचा वापरही मोठ्या प्रमाणात आजही केला जातो. उंदरांना आकर्षित करेल अशा अमिषात विष घालून मारण्याची प्रथा अतिशय जुनी आहे. पण यात एक मोठी समस्या म्हणजे उंदीर हे विष खाऊन मेला की सुटणारी दुर्गंधी. त्यामुळे असे विष तयार केले गेले की उंदिर ते खाऊन उघड्यावर जाऊन मरतील. हे विष खाल्ल्यावर उंदरांना प्राणवायूची कमतरता जाणवू लागते व ते अधिक प्राणवायू मिळविण्यासाठी उघड्यावर जातात. आजही बाजारात ’उंदीर मारण्याचे औषध’ अशा पाट्या घेऊन उभे असणारे विक्रेते दिसतात.

उंदीर पकडण्याच्या आणखी एका पध्दतीचा शोध अपघाताने लागला. पारधी लोकं पूर्वी पक्षांना पकडण्यासाठी डिंकासारख्या चिकट पदार्थाचा उपयोग करत असत. त्याला Birdlime म्हणण्यात येत असे. या पध्दतीने उंदरांनाही पकडता येईल असा उल्लेख १८ व्या शतकाच्या सुरुवातीस छापलेल्या ’The Complete Vermin Killer’ या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत केलेला आहे. या पुस्तकात या पध्दतीने उंदरांना कसे पकडावे याचे विस्तृत वर्णनही केलेले आहे. अर्थात १८ व्या शतकात या पध्दतीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. २० व्या शतकाच्या सुरुवातीच मात्र अनेक व्यापाऱ्यांनी Glue Trap बनविण्यास सुरुवात केली. टिनच्या डबीमध्ये हा चिकट डिंक विकला जात असे. पुठ्ठ्याच्या एका तुकड्यावर हा डिंक लावून उंदरांना पकडण्यासाठी भिंतींच्या कडेला ठेवले जात. यात सुधारणा करून काही कंपन्यांनी डिंक लावलेले पुठ्ठे विकण्यास सुरुवात केली.

अनेक वेगळ्यावेगळ्या पध्दती वापरून उंदरांवर मात करण्याचा प्रयत्न मानवाने प्राचीन काळापासून केला आहे. चिरडून मारणे, पिंजर्‍यात उंदीर पकडणे, विष घालून मारणे, चिकट पदार्थाचा वापर करून उंदीर पकडणे, विजेच्या धक्का देऊन उंदरांना मारणे अगदी आपल्या देवाचे वाहन म्हणून दर्जा देऊनही आजही मानवाला उंदरांवर मात करता आलेली नाही.

कौस्तुभ मुदगल

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: