श्री’देवी’ पुराण

आपल्याला सिनेमात आणि तत्कालीन चित्रातसुद्धा जे इंग्रज दाखवले जातात ते साधारणपणे उंचेपुरे आणि देखणे दाखवतात तर स्त्रिया नाजूक, देखण्या आणि नितळ कांतीच्या वगैरे दाखवतात पण प्रत्यक्षात हे काही १००% खरं नाही. कारण युरोपात देवीच्या साथी अगदी नियमित येत असत आणि लोकांचा जीव किंवा डोळ्यासारखे अवयव घेऊनच नाहीशा होत. माणूस जगला वाचला तरी पुरता विद्रुप होऊन जाई. एखादी रुपगर्विता देवीच्या रोगातून बाहेर पडताना आपलं देखणं रुपडं हरवूनच येई. यातून वाचलेल्या मंडळींना आयुष्यभर देवीचे व्रण चेहऱ्यावर वागवावे लागत. आणि यावरचा कोणताही उपाय त्याकाळातल्या या आधुनिक ज्ञान असलेल्या मंडळींच्याकडे नव्हता.

Mary Pierrepont ही इंग्लडमधल्या एका उच्चभ्रू घराण्यात जन्माला आली, तिचा जन्म झाला १६८९ला म्हणजे त्यावेळी इकडं महाराष्ट्रात औरंगजेब मराठ्यांचे स्वराज्य बुडवण्यासाठी ठाण मांडून बसलेला होता. पहिल्यापासूनच तिची अभिरुची अतिशय उच्च होती, श्रीमंती असली तरी अभ्यासाचे वातावरणही तेवढंच होतं त्यामुळं घरात उत्तम ग्रंथालय होतं. घरच्या अशा ‘वळणा’मुळे ती लॅटिन आणि फ्रेंच शिकली, ती उत्तम लेखिका आणि कवियत्री होती, व्यासंग भरपूर असल्याने तिचा आणि इंग्लंडच्या बिशपचा थेट पत्रव्यवहार होत असे. याशिवाय ती दिसायला अतिशय देखणी होती आता अशा ‘स्थळावर’ उडया पडणार नाहीत तर काय?

पण मेरीची महत्वाकांक्षा होती की आपण लेखिका व्हावं (असले उद्योग पोट भरलेलं असल्याशिवाय सुचतच नाहीत) पण एवढ्यात तिच्या वडिलांनी तिचं लग्नच ठरवलं पण मेरीचं मन आधीच दुसरीकडे गुंतलेलं होतं आणि तिनं त्याच्याशीच लग्न केलं. आता आपण सगळे हिंदी सिनेमे बघून तयार झालेले असल्यानं तुम्हाला लगेच वाटेल की मेरीने ‘गरीब लेकीन खुद्दार’ अशा कुठल्या मुलाशी सूत जुळवलं असेल तर तसं काही झालं नाही. तिनं लग्न केलं ते Edward Wortley Montagu शी. हे साहेब म्हणजे Earl of Sandwich चा नातू. (याच्याबद्दल मी ‘एका नावाची गोष्ट’ या लेखात लिहिलेलं आहे) नशीबच काढलं पोरीनं.

लग्न झालं, मेरी आणि एडवर्डचा नव्या नवलाईचा संसार सुरू झाला. मेरीच्या प्रतिभाशक्तीलाही बहर आला, तिच्या कविता लोकांना आवडू लागल्या, समीक्षकांनीही तिचं कौतुक केलं. मेरीच्या काही कविता तिच्या तत्कालीन सामाजिक वर्तुळातील मंडळींची इतकी खिल्ली उडवणाऱ्या होत्या की त्या तिला निनावी प्रकाशित कराव्या लागल्या.

मेरीच्या पायगुणाने एडवर्डचीही प्रगती होत होती तो ही त्याच्या उच्चभ्रू नोकरीत वर वर चढत होता. लौकरच एडवर्ड आणि मेरीच्या प्रेमाला फळ आलं, मेरीला पहिला मुलगा झाला. वर्ष १७१३. आता एवढं सगळं छान चाललेल्या गोष्टीत काही गडबड व्हायचं कारण नव्हतं पण तरीही एक गडबड झालीच. एके दिवशी मेरीला ताप आला त्यानंतर तिच्या अंगावर चट्टे उठू लागले डॉक्टरनं तिला तपासलं आणि तिला देवीची लागण झाल्याचं जाहीर केलं.

देवीच्या रोगाची सुरुवात साध्या तापाने किंवा डोकेदुखीने होई. पण दोन दिवसांत रोग्याची लक्षणं बदलत, ताप वाढत असे, नाडीचे ठोके जलद होत, रोग्याचे अंग घामाने डबडबून जाई, बद्धकोष्ठता आणि उलट्या सुरू होत आणि सतत तहान लागत असे. यानंतर त्वचेवर लहान फोड उठू लागत,ते हळूहळू काळे पडत त्यातून अतिशय दुर्गंधी यायला लागे आणि अंगाला भयंकर खाज सुटत असे. हे फोड ओठ, तोंड,घसा, नाक आणि डोळे यांतही उठत असत. यातून अंगाला हळूहळू सूज यायला लागे. नाक आणि घसा बंद झाल्याने श्वास घेणं अवघड होई,रुग्ण आचके द्यायला लागे, अंगावरचे फोड फुटून त्यातून दुर्गंधीयुक्त पू निघायला लागे. यानंतर कोणतेही उपाय शिल्लक नसल्याने (किंबहुना उपायच नसल्याने) यापुढं फक्त वाट बघणं एवढंच रोग्याच्या घरचे आणि नातेवाईक यांच्या हातात असे. दर चारांपैकी एक रोगी मरत असे आणि बाकीचे विद्रुप होऊन रोगातून बाहेर पडत अनेकांचे डोळेही देवी आपल्यासोबत घेऊन जाई. चेहऱ्यावर पडलेले देवीचे खड्डे झाकण्यासाठीच चेहऱ्यावर जाळी असणाऱ्या हॅट , मेकअप अशा गोष्टी विकसित झाल्या. या सगळ्यात आनंदाची (!) गोष्ट फक्त इतकीच होती की एकदा देवी होऊन गेल्यानंतर परत कधीच त्यांचा संसर्ग होत नसे. 

मेरी सुदैवी होती ती या रोगातून वाचली. पण तिच्या सुंदर चेहऱ्याचा नूर पुरता उतरून गेलेला होता, देवीच्या रोगाने तिच्या भुवया आणि पापण्यांचे केस कायमचे निघून गेलेले होते. आणि चेहरा आता भयंकर दिसायला लागलेला होता. नशिबानं तिचे डोळे गेलेले नव्हते आणि तिची जिद्द कणभरही कमी झालेली नव्हती. कर्मधर्मसंयोगानं याचवेळी एडवर्डची नेमणूक इस्तंबूलला ब्रिटिश राजदूत म्हणून झाली. इस १७१५. खरं तर इतक्या लांबचा प्रवास आणि नवीन प्रदेश हे लक्षात घेऊन तो एकटाच जायचा होता पण मेरीने हट्ट करून शेवटी तुर्कांच्या देशात जायचं निश्चित केलं.

मेरी एडवर्ड आणि त्यांच्या दोनेक वर्षाच्या लहान मुलाचा प्रवास सुरु झाला. या प्रवासात तिनं त्या सगळ्या प्रदेशांचं निरीक्षण करून  मायदेशी उत्तम वर्णनात्मक पत्रं पाठवली. ही पत्रं पुढच्या काळात १८व्या शतकातले प्रवासवर्णन म्हणून फार गाजली. मेरीला या प्रवासाला निघण्याचा उद्देश बहुदा हाच तर नसेल?

मेरीचं एक अस्सल पत्र

इस्तंबूलला जाऊन पोचल्यावर काही दिवसात मेरी तिथं रुळली, राजदूताची बायको असल्याचा फायदा तिला हा झाला की शहरातल्या अनेक उच्चभ्रू मंडळींशी तिची ओळख झाली. स्थानिक संस्कृतीशी तिचा परिचय झाला आणि तिच्या लक्षात आलं या तुर्की स्त्रिया अतिशय सुंदर तर आहेतच पण त्यांच्या चेहऱ्यावर अंगावर देवीचा एकही डाग दिसत नसे. याचा तिनं शोध घ्यायला सुरुवात केल्यावर एक रहस्य तिला समजलं.

देवीची लागण करून घेण्यासाठी  इच्छुक असणारी १५-२० तुर्की मंडळी एकत्र जमत आणि एका शिंपल्यात देवीच्या रुग्णाच्या फोडातील पातळ द्रव गोळा करून काही म्हाताऱ्या स्त्रिया तिथं येत. एका सुईने त्या हातावर एक छोटीशी जखम करत आणि शिंपल्यातला पातळ द्रव सुईनेच थोडासा त्या जखमेवर थोडासा लावून जखम बंद करून टाकत असत. त्यानंतर फार तर ३ दिवस या मंडळींना ताप येई, चेहऱ्यावर अगदी मोजक्या देवी उठत पण त्यांचे व्रण रहात नसत. या तापात चुकूनही कोणी दगावत नसे. आणि यानंतर पुढच्या आयुष्यात कधीच त्यांना पुन्हा देवी उठत नसत. याला Inoculation असं शास्त्रीय नाव आहे.

मेरीने हे सर्व वर्तमान पत्रातून मायदेशी कळवलं आणि त्याचबरोबर इस्तंबुलमधला ब्रिटिश फिजिशियन आणि फ्रेंच फिजिशियनशी याबद्दल चर्चा केली. त्या दोघांना याबद्दल माहिती होती त्यांनी याबद्दल आपापल्या मायदेशी कळवलेलंही होतं पण तिकडच्या वैद्यकीय विश्वाने याची विशेष दखल घेतलेली नव्हती. मेरीचं डोकं आता भराभर चालू लागलं तिनं स्वतःच्या मुलावर हा देवीच्या उताऱ्याचा प्रयोग करून बघायचा ठरवला. 

नेमकं याचवेळी एडवर्डला पुन्हा मायदेशी येण्याचा हुकूम मिळाला आता मेरीला भराभर हा सगळा उद्योग पार पाडणं गरजेचं झालेलं होतं. तिनं दूतावासातला सर्जन Charles Maitland ला आपल्या उद्योगात सामील करून घेतलं आणि देवी टोचणाऱ्या म्हाताऱ्या बाईला बोलवून घेऊन तिच्याकडून आपल्या २-३ वर्षाच्या मुलाला देवी टोचवून घेतलं. ठरल्याप्रमाणे तिच्या मुलाला ताप आला, अंगावर देवी उठल्या पण काही दिवसात तो धडधाकट झाला.आता आयुष्यभर त्याला देवीचा संसर्ग होणार नव्हता. 

मेरी आणि तिचा मुलगा

यानंतर लौकरच मोंन्टेग्यू कुटुंब लंडनला परत आलं, आपल्या मुलाचा धोका टळला तर आता बाकी जगाचं व्हायचं ते होवो असं म्हणून मेरीला शांत बसता आलं असत पण तिनं इंग्लंडमधूनच देवीचं उच्चाटन करण्याचा विचार करून आपली धडपड सुरू केली. पण तिला इंग्लंडमधल्या वैद्यकीय क्षेत्राकडून कोणतेही सहकार्य मिळेनासे झाले त्याचीही काही कारणं होती 

१. मुस्लिम जगताकडून ख्रिस्ती मंडळींना हे ज्ञान घेण्याची गरज नाही.

२. वैद्यकीय क्षेत्राची काहीही माहिती नसलेली एक स्त्री वैद्यकीय ज्ञान असणाऱ्या मंडळींना काय अक्कल देणार?

आणि

३. या मंडळींना माहीत असणाऱ्या देवीच्या उपचारात ही पद्धत बसत नव्हती. 

१७२१ मध्ये इंग्लंडमध्ये देवीची पुन्हा एकदा साथ आली एव्हाना मेरीला एक मुलगीही झालेली होती. जी जवळपास ३ वर्षांची होती आणि आता मेरीला तिला या साथीपासून वाचवायचं होतं. तुर्कस्तानात तिला मदत करणारा सर्जन मेटलॅन्डही इंग्लंडमध्ये परत आलेला होता. तिने स्वतःच्या जबाबदारीवर आपल्या मुलीला देवी टोचवून घेतल्या. तिनं हे बघायला अनेक ब्रिटिश अमीर उमरावांना बोलावलं आणि त्यांच्यासमोर हा सगळं पार पडलं. आणि २-३ दिवसांच्या तापानंतर तिची मुलगी पुन्हा धडधाकट झाली. आता मात्र काही प्रमाणात तिच्यावर या उच्चभ्रू मंडळींनी विश्वास ठेवायला सुरूवात केली.यात तेंव्हाचा ब्रिटिश राजपुत्र म्हणजे प्रिन्स ऑफ वेल्सची पत्नी कॅरोलीनही होती. या मंडळींना आता आपल्या मुलांना देवी टोचवून घ्यायच्या होत्या.  कॅरोलीनने आपल्या सासऱ्याशी म्हणजे पहिल्या जॉर्जशी याबद्दल चर्चा सुरू केली. जॉर्जने सावध पवित्रा घेत लगेचच आपल्या कुटुंबातील कुणाला देवी टोचवून घेण्यास नकार दिला पण त्याने तुरुंगातल्या काही कैदयांवर याचा प्रयोग करण्याची परवानगी दिली. 

प्रिन्सेस ऑफ वेल्स कॅरोलीन

मग तीन पुरुष आणि तीन स्त्री कैद्यांवर हा प्रयोग करण्यात आला. यावेळी अनेक शास्त्रज्ञ आणि डॉक्टर हजर होते. त्यापैकी पाचजणांना देवीची लागण झाली एकाला मात्र झाली  नाही कारण त्याला पूर्वीच देवी येऊन गेलेल्या होत्या. पण पाचही कैदी त्यातून बचावले. काही प्रमाणात याबद्दल राजाला विश्वास वाटू लागला तरीही त्याची अजून पुरती खात्री पटलेली नव्हती मग त्यासाठी नवीन उपाय शोधला गेला.अनाथालयातल्या ११ मुलांना देवी टोचल्या गेल्या आणि हा प्रयोगही यशस्वी ठरला.  जगातल्या या बहुदा पहिल्या clinical trials असाव्यात.

१७२२ साली कॅरोलीनला आपल्या मुलींना देवी टोचवून घेण्याची परवानगी मिळाली (मुलं गादीची वारस असल्यानं त्यांच्याबाबत कोणताही धोका पत्करण्याची राजाची तयारी नव्हती)  राजकन्याही या दिव्यातून सुखरुप पार झाल्या. मग मात्र जनतेने जल्लोष केला. तरीही काही मंडळींनी याला मोठा विरोध केला, वादविवाद झाले पण हळूहळू हा विरोध मावळत गेला. पूर्ण युरोपने आणि अमेरिकेने देवीच्याविरुद्ध लढा देण्याचा हा सर्वात उत्तम उपाय असल्याचं मान्य केलं. 

मेरीबाई पुढं १७६२ सालापर्यंत जगल्या पण या देवीच्या रोगाचा प्रतिकार करण्याचं आणि त्याला प्रतिबंध करण्याचा उपाय युरोपला शिकवल्याचं श्रेय तिला कधीच मिळालं नाही तर ते श्रेय मिळालं Edward Jenner ला. धोका पत्करून मेरीने आपल्या ज्या मुलावर देवी टोचून घेण्याचा प्रयोग केला तो पुढच्या काळात वाया गेलेला आणि जुगारी झाला पण नंतर बराच सुधारला आणि भरपूर भ्रमंती करून उत्तम लेखक झाला तर मुलगी ब्रिटिश पंतप्रधान जॉन स्टुअर्टची पत्नी झाली.

पुढच्या काळात अभ्यासातून हे लक्षात आलं की गाईंवर Cowpox नावाचा एक रोग असतो जो दूध काढताना गवळी मंडळींना होतो हा प्राणघातक नसला तरी हा रोग होऊन गेलेल्या मंडळींना देवी होत नाहीत. यावर Edward Jenner नावाच्या डॉक्टरने प्रयोग करून गाईवरच्या रोगाच्या फोडातून द्रव्य गोळा करत देवीची पहिली लस तयार केली. हे सगळे शोध लागत असताना मराठे पानिपतावर अब्दालीच्याविरुद्ध उभे ठाकलेले होते. आता vaccine किंवा vaccination हा शब्द आपल्याला ऐकून अगदी सवयीचा झालेला आहे पण या शब्दाची व्युत्पत्ती झाली ती Vacca या शब्दापासून आणि लॅटिन भाषेत याचा अर्थ होतो गाय. आणि हाच शब्द आपण सरसकट सगळ्या प्रकारच्या लसीकरणासाठी वापरतो. (लेखाच्या शिर्षकासाठी जे चित्र वापरलेलं आहे ते जर नीट बघितलं तर लक्षात येईल की लस घेतलेल्या मंडळींच्या शरीराच्या विविध भागातून गाई बाहेर पडत आहेत, गाईपासून बनवलेली लस घेतल्याने गाईचे गुणधर्म आपल्यात येतील अशी काही मंडळींनी या लसीची टर उडविलेली होती ती पार्श्वभूमी या चित्राला आहे)

एडवर्ड जेनर

आता आपल्याला प्रश्न पडला असेल की भारतातही देवीच्या साथी येत असत मग यावेळी भारतीय काय करत असत किंवा भारतीयांनी लस घेतल्याचे काही संदर्भ आहेत का? तर त्याचीही उत्तरं माझ्याकडे आहेत. भारतीयांनी या रोगाचा भार शीतला देवीवर सोडलेला होता आणि काही प्रमाणात याबद्दलचे औषधोपचारही केले जात पण याच्या खोलात मी जाणार नाही.

लसीकरणाचा संदर्भ मात्र अगदी महाराष्ट्रातला आणि त्यातही पुण्यातला आहे. दुसऱ्या बाजीरावाने १८०७ साली पुण्यात देवीची साथ आलेली असताना थॉमस कोट्स नावाच्या एका ईस्ट इंडिया कंपनीच्या डॉक्टरकडून आपली पत्नी वाराणसीबाई यांना देवीची लस टोचवली. हे लसीकरण यशस्वी झालं आणि बाजीरावाने या डॉक्टरला २००० रु इनाम म्हणून दिले. याची नोंद या प्रकारे केलेली आहे – ‘इंग्रजाकडील वैद्याकडून घरात श्री देवी काढविल्या.. त्या यथास्थित कृपा करून आरोग्य जाहल्या. त्या वैद्यास दिले २०००’

रोगांचा इतिहाससुद्धा रंजक असतोच आपण सगळेही एका जीवघेण्या रोगाच्या साथीचे साक्षीदार आहोत. आपल्यापैकी काही मंडळींनी लिहिलेल्या आठवणी त्या दिवसात आपण तयार केलेल्या डिजिटल कचऱ्यातून शे-दोनशे वर्षांनी कुणाच्या हाती लागल्या तर आपल्या काळाच्या इतिहासाच्या अजून भर पडेल हे नक्की !

यशोधन जोशी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: