जून १९४०. जर्मन फौजा फ्रान्समध्ये आतपर्यंत घुसल्या होत्या. Bordeaux या फ्रान्समधील शहराकडे नाझी सैन्य सरकू लागले होते. जर्मन नाझी सैन्याच्या तडाख्यातून सुटण्यासाठी सगळीकडे नागरिकांची धावपळ चालली होती. यात फ्रेंचांबरोबरच अनेक ज्यू देखील होते. नाझी सैन्य जेथे पोहोचे तेथून ते ज्यूना पकडून छळछावण्यांकडे रवाना करत होते. जर्मन सैनिकांच्या या धरपकडीतून बचावलेल्या अनेक निर्वासित लोकांनी स्पेन आणि पोर्तुगालच्या सीमेकडे प्रयाण केले. परंतु सीमा ओलांडून दुसर्या देशात प्रवेश करण्यासाठी त्या देशाचा व्हिसा असणं आवश्यक होत आणि यामुळे हजारो ज्यू स्पेन आणि पोर्तुगालच्या सीमेवरती अडकून पडले होते.

यावेळी पोर्तुगालमध्ये Antonio de Oliveira Salzar या हुकूमशहाची सत्ता होती. त्याने या निर्वासितांना कुठल्याही परिस्थितीत व्हिसा न देण्याचा फतवाच काढला होता. ’Circular 14’ या नावाने प्रसिध्द असलेल्या या फतव्यात निर्वासितांना व्हिसा न देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते.
या परिस्थितीत एका पोर्तुगीज अधिकाऱ्याने मात्र सत्ताधाऱ्यांचे सर्व आदेश धुडकावून या हजारो निर्वासितांना वाचविण्याच प्रयत्न केला.

Aristides de Sousa Mendes (अॅरिस्टिडेस द सुसा मेंडेस) असं लांबलचक नाव असणारा हा अधिकारी त्यावेळी फ्रान्स मधील Bordeaux या शहरात पोर्तुगीज राजनैतिक अधिकारी म्हणून नियुक्त होता. हजारो निर्वासितांना सीमा ओलांडण्यासाठी स्पेन आणि पोर्तुगालचा व्हिसा असणं आवश्यक होतं. अशा हजारोनिर्वासितांनी व्हिसा मिळविण्यासाठी Bordeaux येथील पोर्तुगीज वकिलातीपाशी गर्दी केली होती. नाझी सैन्य हे Bordeaux शहराकडे सरकत होते आणि या हजारो निर्वासितांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी तातडीने काहीतरी निर्णय घेणे आवश्यक होते.

हजारो निर्वासितांची जगण्यासाठी चाललेली धडपड सुसा हतबलतेने बघत होता. मग मात्र सुसाने आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्याचे ठरविले आणि हुकूमशहा Salazar चा आदेश धुडकावून लावला.

Bordeaux येथील पोर्तुगीज वकिलात कामाला लागली. सुसा आपल्या सहकाऱ्यांबरोबर दहा दिवस रात्रंदिवस काम करत होता. त्याने हजारो निर्वासितांच्या व्हिसावर शिक्कामोर्तब केले आणि त्यांना पोर्तुगालमार्गे निसटून जाण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला.सरकारी आदेश धुडकवल्याबद्दल सुसाची वकिलातीतून हकालपट्टी करण्याचे आदेश Salzar ने दिले. पण हकालपट्टीचा आदेश येईपर्यंत सुसाने तीस हजार निर्वासितांना व्हिसा दिलेला होता. यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सुसाने जारी केलेल्या व्हिसाचा सीमेवरील फ्रेंच, स्पॅनिश आणि पोर्तुगीज अधिकार्यांनी मान ठेऊन या निर्वासितांना सीमा ओलांडण्याची परवानगी दिली.

Salzar ने सुसाची हकालपट्टी केली पण याची शिक्षा त्याच्या सर्व कुटुंबाला भोगावी लागली. त्याच्या सर्व परिवारावर निर्बंध घातले गेले. सुसाच्या १५ मुलांना शिक्षणासाठी शाळा कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. तसेच त्याच्या परिवारातील सगळ्या सदस्यांना सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत करण्यात आले. सुसा आता पुरता निर्धन झालेला होता. त्याला शेवटी आपले राहते घरही विकावे लागले. सुसाला १९५४ साली विपन्नावस्थेत मरण आले. पण त्याच्या या सेवेची जाणीव ठेवत १९६६ साली इस्राईल सरकारने सुसाचा गौरव केला तसेच १९८६ साली अमेरिकन कॉंग्रेसनेही त्याच्या या वीर कृत्याबद्दल गौरव केला.
कौस्तुभ मुदगल
Leave a Reply