कानामागून आली आणि….

अनेक गोष्टींविषयी आपल्या काही विविक्षित कल्पना असतात. उदाहरणार्थ  छत्रपती शिवाजी महाराजांच्यासोबत मोहिमेवर गेलेलं लष्कर दुपारच्यावेळी कुठं तरी रानात बसून लसूण घातलेला मिरचीचा झणझणीत ठेचा, मुठीनं फोडलेला कांदा आणि भाकरी अशी आपली शिदोरी खात बसलेलं आहे असा प्रसंग कुठल्या सिनेमात किंवा सिरीयलीत दाखवला तर आपण त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू. पण खऱ्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मिरची खाल्ली असेल का ? याबद्दल आपल्याला ठाम विधान करता येणार नाही कारण मिरची भारतात महाराजांच्या जन्माआधी जेमतेम शतकभरच भारतात अवतरलेली होती. आणि कोणतीही नवीन खाण्याची गोष्ट आपल्या आहाराचा भाग होण्यासाठी बराच काळ लोटायला लागतो. 

ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधू नये अशी आपल्याकडं एक म्हण आहे पण मिरचीचं कुळ शोधून काढायला काही हरकत नसावी. एखाद्या घरातली सगळी मंडळी सालस आणि गोड स्वभावाची असताना त्याच घरात एखादा तिरशिंगराव निघावा तसं वांगी, बटाटे आणि टोमॅटो यांच्या कुळात म्हणजे Solanaceae कुटुंबात जन्माला आलेली मिरची मात्र वेगळी आहे. याच कुळातला अजून एक वांड कुलदीपक म्हणजे आपले तंबाखूराव. या बहीणभावांनी तमाम मानवजातीला घाम फोडायचं काम अगदी इमानेइतबारे पार पाडलेलं आहे. यांच्याच लांबच्या नात्यातले पण माळकरी म्हणजे आपले रताळेबुवा. आता एवढयावर हा कुलपरिचय थांबवून आपण पुढं सरकूया.

जगभरात मिरचीच्या ४००हून जास्त जाती असल्या तरी मिरची ही मुळात अमेरिकन. Aztek आणि Mayan मंडळींना मिरची माहीत होती. कोकोच्या पाण्यात मिरचीच्या बिया मिसळून आणि त्यात इतर काही पदार्थ घातलेलं एक झटकेबाज पेय  ही मंडळी लैंगिकशक्तीच्या वाढीकरता पीत असत. असलं मिरचीच्या बिया घातलेलं झणझणीत पेय प्याल्यावर खरंच शक्तीत वाढ व्हायची का वारंवार उठाबशा काढायला लागून शक्तिपात व्हायचा हा अभ्यासाचा विषय आहे. पण सांगायचा उद्देश असा की या मंडळींचा मिरचीशी जुना घरोबा. मुळात chilli हा शब्दच आपण Aztek मंडळींच्या xilli या शब्दावरून घेतलेला आहे. मिरचीचेच एक थुलथुलीत वाण म्हणजे ढब्बू उर्फ सिमला मिरची. तिला मिळालेलं Capsicum हे नाव ग्रीक शब्द kapto म्हणजे to bite यावरून आलेलं आहे. अर्थात या bite ला पलीकडून तेवढंच जोरदार प्रत्युत्तर मिळतंय ही गोष्ट वेगळी.

लेकरांना शिक्षा म्हणून मिरच्यांची धुरी देणारे Aztec पालक

मिरचीची छोटी रोपं गादीवाफ्यात लावून त्याना तीन महिने न चुकता पाणी, खत घातल्यावर आणि फवारणी केल्यावर ती अदमासे अमुक तमुक फुटाची होऊन त्यांना त्यांच्या वाणाप्रमाणे हिरवी/लाल/जांभळ्या रंगाची आणि तुकतुकीत कांतीची फळे धरतात – अशा शेतकरी बंधूंच्या कार्यक्रमातल्या माहितीऐवजी आपण मिरची तिखट का लागती याकडे आपण वळूया.

मिरचीत Capsaicin नावाचे एक रासायनिक द्रव्य असते जे खाल्ल्याने किंवा संपर्कात आल्यानेही सस्तन जीवांच्या शरीराचा दाह होतो. कॉलेजात शिकलेली केमिस्ट्री थोडी आठवत असेल तर Capsaicin फॉर्म्युला आहे C18H27NO3. Capsaicin च्या ग्रंथी मिरचीच्या आतल्या बाजूला जो पांढऱ्या रंगाचा भाग असतो ज्याला मिरचीच्या बिया चिकटलेल्या असतात त्या जागी असतात. म्हणजे आपली जी समजूत आहे की बिया काढून टाकल्या की मिरचीचा तिखटपणा कमी होतो ती मुळातच चुकीची आहे. Capsaicin च्या मुळाशी जाऊन त्याचा शोध लावला तो अमेरिकन वनस्पतीशास्त्रज्ञ Albert Brown Lyons ने.

Albert Brown Lyons

आता सगळ्याच मिरच्यांत Capsaicin च असलं तरीही ‘जगात भारी’ Capsaicin कुठल्या मिरचीत असा प्रश्न लगेच तुम्हाला पडलाच असेलच. पण त्याआधी Capsaicin ची तिखट मर्यादा कशी मोजतात हे आपण जरा समजून घेऊया. तिखट मोजण्याचं आपल्याकडचे परिमाण जरी ‘आज आत्ता ताबडतोब’ ते ‘दुसऱ्या दिवसाची सकाळ’ असं असलं तरी त्याचं शास्त्रीय परिमाण आहे ते म्हणजे SHU. SHU म्हणजे Scoville Heat Units. प्रोफेसर Scoville नावाच्या एका संशोधकाने ही पद्धत शोधली म्हणून या पद्धतीला त्याचे नाव देण्यात आले.

Wilbur Scoville

तिखटपणा मोजण्याची पद्धत समजून घेणं तिखट पचवण्यापेक्षा सोपं आहे. आजकाल सगळ्या उगीचच विदेशी नावं दिलेल्या (आणि महाग) हॉटेलात jalapeños नावाची मेक्सिकन मिरची सगळ्यात घातलेली आढळते तिची Scoville scale आहे 4,000 ते 8,500 SHU. म्हणजे हिचा तिखटपणा पुर्णतः घालवायला साधारणपणे ४५०० ते ८००० साखर आणि पाण्याच्या द्रावणाचे थेंब लागतात. भारताच्या ईशान्येकडे म्हणजे आसाम, मणिपूर आणि नागालँडमध्ये पिकणारी Bhut jolokia नावाची मिरची जगातली सगळ्यात तिखट मिरची आहे. जिची Scoville scale आहे 8,00,000 SHU तर शुद्ध Capsaicin ची Scoville scale आहे 1,60,00,000 SHU. हे सगळे आकडे ऐकूनच आपल्या कानातून जाळ निघायला लागलाय पण हे सगळे SHU चे आकडे निश्चित करण्यासाठी या चाचण्या वारंवार केल्या गेल्या त्या प्रत्येकवेळी मिरचीची पूड चाखून बघूनच. साधारण १९१२च्या सुमारास.

मिरचीचा तिखटपणा मोठ्या प्रमाणात तिच्या कामीसुद्धा आलेला आहे. कारण Capsaicinoids मुळं मिरचीवर सूक्ष्मजीव वाढत नाहीत तिच्यावर बुरशीदेखील धरत नाही. त्यामुळे उष्ण कटिबंधात रहाणाऱ्या मानवाने तिचा वापर आहारात करण्याआधी मांस टिकवण्याच्या दृष्टीने केला असावा. आजही जेंव्हा आपण मिरची घातलेले जे मांसाहारी पदार्थ खातो त्यात मिरची चव आणण्यासोबतच मांसातले सूक्ष्मजीव नष्ट करण्याचं काम पण करत असते.

अमेरिका खंडातली मूळ रहिवासी मंडळी मिरचीचा पुरेपूर वापर करत त्यामुळे जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी म्हटल्याप्रमाणे कचऱ्याचे खड्डे, चुलीच्या आसपास, भांड्यात सर्वत्र आपल्याला मिरचीचे अवशेष सापडतात. आपण आधी बघितल्याप्रमाणे चॉकलेटमध्ये मिरची मिसळून पेयं तयार केली जातच पण त्याच बरोबर maize gruel म्हणजे मक्याच्या लापशीसारख्या पदार्थातही मिरची घालून त्याची चव वाढवली जाई. मृतांना आणि देवांना मिरचीचे पदार्थ तर्पण/अर्पण केले जात.

स्पॅनिश मंडळी सगळ्यात पहिल्यांदा अमेरिका खंडाच्या जाऊन पोचली आणि लौकरच त्यांना मिरचीची ओळख झाली. चवीसाठी सगळा युरोप मिरीवर अवलंबून असताना लागलेला हा शोध म्हणजे अफाटच होता. स्पॅनिश मंडळींना अमेरिका खंडावर ताबा काही सहज मिळाला नाही त्यांनी अफाट लढवय्येपणा आणि अर्थातच क्रूरताही दाखवून ते साध्य करून दाखवलं. या भांडणात काहीवेळा स्पॅनिश मंडळी आणि मूलनिवासी मंडळींचे म्होरके एकमेकांच्या हाती लागत. मग अशावेळी रक्तपात करण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात मिरच्यांच्या खंडणीची देवाणघेवाण करून प्रश्न सोडवला जाई. स्पॅनिश मंडळींनी स्वतःबरोबर मिरची स्वदेशी आणली आणि ती तिथं इतकी प्रसिद्धीला आली की १५व्या शतकातल्या  स्पेनमध्ये खाद्यपदार्थात सढळ हाताने मिरची वापरणं हे श्रीमंतीचं प्रतीक समजलं जायचं. (या श्रीमंतीचे दुष्परिणामही जाणवले असतीलच म्हणा)

युरोपमध्ये मिरची येऊन पोचल्यावर तिच्यावर अनेक प्रयोग केले जाऊ लागले, तिची वेगवेगळी वाणं तयार करण्यात येऊ लागली. त्याआधी मिरचीच्या जन्मस्थानी म्हणजे अमेरिका खंडातल्या आदिवासी म्हणवल्या जाणाऱ्या मंडळींनीही मिरचीवर शेकडो वर्षे प्रयोग करत करत ठराविक रंगाच्या, आकाराच्या आणि तिखटपणाच्या वाणांची निर्मिती केलेलीच होती.

१४९३ मध्ये जेंव्हा कोलंबस दुसऱ्यांदा त्यानं शोधलेल्या नवीन भूभागात दाखल झाला त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की तिथली स्थानिक मंडळी त्यांच्या अन्नात तिखटपणासाठी काही वेगळा पदार्थ वापरतात तेंव्हा त्याने त्याचा सहाय्यक Diego Álvarez Chanca ला याची नोंद घ्यायला सांगून हे भाकीत केलं की या मिरच्या त्यांना मोठा फायदा मिळवून देऊ शकतात. त्यानं अंदाजाने हे ठरवलं की दरवर्षी साधारण २००-२५० टन मिरच्यातरी आपण इथून आपल्या देशात नेऊ शकू. पण कोलंबसने मिरच्यांना pepper हेच नाव दिलेलं होतं कारण तिखट म्हणजे pepper उर्फ आपली काळी मिरी हीच समजूत त्याकाळी रूढ होती. परत येताना नमुन्यादाखल त्याने मिरचीची रोपं आणि मिरच्या दोन्ही आपल्या सोबत स्पेनला आणले. तिथं पोचल्यावर मिशनरी मंडळींनी त्यांना रुजवलं, त्यांची रोपं तयार केली पण सुरुवातीचा काही काळ त्यांचा उपयोग शोभेची झाडं म्हणूनच झाला कारण त्यांना मिरचीत विष असावं असा संशय होता. पण लौकरच तो संशय मावळला आणि मिरची युरोपमध्ये प्रसिद्धीला आली. १५९७ साली मिरचीच्या बिया इंग्लंडला पोचल्याचा संदर्भ आपल्याला ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ John Gerard च्या लिखाणात सापडतो. पण इंग्लंडमधल्या थंड वातावरणात मिरचीचा लाल रंग काही खुलला नाही.

युरोपिअन दर्यावर्दी मंडळी म्हणजे  अगदी वास्को द गामा, कोलंबस आणि इतर मंडळी यांच्यात खरं तर भारत शोधून तिथं पोचण्याची जबरदस्त स्पर्धा जुंपलेली होती. जेंव्हा कोलंबस जहाजं भरभरून मिरच्या, इतर अमेरिकन पिकं आणि गुलाम युरोपात आणून ओतत होता त्यावेळी वास्को द गामा आपल्या मोहिमेच्या तयारीत होता. मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार आपल्या हातात ठेवण्यासाठी त्याला कोलंबसच्या आधी भारतात पोहोचायचं होतं. १४९८ ला भारतात येऊन दाखल झाला आणि इस १५०० मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी Pedro Álvares Cabral हा भारतात यायला निघालेला असताना रस्ता चुकून (खरं तर समुद्रच चुकून!) ब्राझीलमध्ये जाऊन पोचला. आता या पोर्तुगीजांनी या नवीन भूमीतून जहाजं भरभरून मिरच्या आणायला सुरुवात केली.पोर्तुगीजांना मिरच्यांत खरं तर अजिबातच रस नव्हता पण त्यांनी आशिया खंडात मिरच्या आणून भारत, अरबस्तान आणि पूर्वेकडच्या इतर छोट्यामोठ्या देशात या धंद्याची ‘लाईन’ बसवली.

Pedro Álvares Cabral

भारतात मिरची बहुदा सर्वात पहिल्यांदा आली असावी केरळमध्ये कारण तिथूनच पोर्तुगीज मंडळींचा मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार चालायचा. भारतात तोवर तिखटपणासाठी काळी मिरीच वापरली जायची आणि वास्को द गामा भारतात आल्यापासून तीसेक वर्षात मिरचीनं भारतात आपली मुळं घट्ट रोवली. मिरची एवढी लोकप्रिय  होण्याचे मुख्य कारण म्हणजे मिरीपेक्षा एकतर ती स्वस्त असावी आणि दुसरं म्हणजे ती आपल्या परसातल्या बागेत पिकवता येणं शक्य होतं.
आज आपल्याला कुठलाही भारतीय तिखट पदार्थ मिरचीच्याऐवजी मिरीच्या चवीचा असणं कल्पनेतही सहन होत नाही.

आपली एक समजूत असती की संत मंडळी अतिशय सात्विक आहार घेत असावेत आणि त्यांना आपल्यासारखे फारसे जिभेचे चोचले नसतील पण १६व्या शतकात कर्नाटकातले प्रसिद्ध संत पुरंदर दास आपल्या एका रचनेत मिरचीचे गुणगान करताना म्हणतात – ‘वा  मिरचीबाई ! तू गरिबांचं रक्षण करणारी आहेस. तू आमच्या अन्नाची चव वाढवतीस. तुझी चव जहाल आहे आणि तुझी चव घेतली की काही काळ मला ईश्वराचाही विसर पडतो.’ यावरून असा अंदाज बांधता येईल की मिरची सामान्य जनतेच्या आहाराचा भाग बनलेली होती.

पुरंदरदास

तेराव्या शतकातले आणि ज्ञानेश्वर माऊलींचे समकालीन असणारे संत सावतामाळी त्यांच्या एका अभंगात म्हणतात –
कांदा मुळा भाजी । .
अवघी विठाबाई माझी ॥ १ ॥
लसूण मिरची कोथिंबिरी ।
अवघा झाला माझा हरी ॥ २ ॥
यावरून २ निष्कर्ष निघू शकतात – मिरची १३व्या शतकात म्हणजे वास्को द गामा भारतात यायच्याआधी २शतकं महाराष्ट्रात उपलब्ध होती किंवा मिरची या अभंगात नंतरच्या काळात घुसडली गेली.

भारतात मिरची आली, रुजली आणि १६व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतीय मिरची तुर्कांमार्फत भारतीय मिरची जर्मनी, इंग्लड आणि नेदरलँडला जाऊन पोचली. पण ही मिरची नक्की कुठून जायची याबद्दल मला तरी अजून माहिती सापडलेली नाही. त्याशिवाय मराठी मुलुखात प्रसिद्ध असलेल्या ब्याडगी आणि जवारी या दोन मिरच्या नक्की कधीपासून अस्तित्वात आहेत याचाही शोध अजून लागलेला नाही.

मिरचीला chilli हे आधीच मिळालेलं नाव असताना भारतात तिचं नाव मिरची कसं काय पडलं? हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेलच तर त्याचंही उत्तर मी देणार आहे. मिरचीच्या आधी भारतीयांच्या अन्नाच्या तिखटपणाची जबाबदारी काळ्या मिरीने उचललेली होती. मिरीला संस्कृतमध्ये ‘मरीच’ असं नाव आहे त्यामुळं परदेशातून आलेल्या आणि मिरीसारख्याच जहाल पदार्थाला मरिचिका हे नाव पडलं असावं आणि त्यावरून मिरची हे नाव रूढ झालं असावं. परदेशातून येऊन आणि स्थानिक मंडळींना मागे टाकून आपल्या हातात सत्ता घेण्याची मोठी परंपरा भारताला लाभलेली आहे.त्याला अनुसरूनच परदेशी मिरची भारतात आली आणि मिरीची जागा पटकावून बसली. ‘कानामागून आली आणि तिखट झाली’ ही आपली मराठीतली म्हण यावरूनच तर पडली नसेल ना?

यशोधन जोशी

कळा ज्या लागल्या जीवा…

काही दिवसांपूर्वी मी दाताच्या डॉक्टरांच्या खुर्चीत आल्या प्रसंगाला धीरानं ‘तोंड’ देत पडलेला असताना मला सहज वाटलं की पूर्वी जेंव्हा असल्या काही सोयीसुविधा नसताना लोक दातदुखी कशी सहन करत असतील? त्यांच्याकडे दातांच्या दुखण्यावर कोणते उपाय असतील? 

सापडलेला हा विषय मी घराकडं घेऊन आलो आणि दुखऱ्या दातानिशी यावरची माहिती शोधायला सुरुवात केली. आदिमानवाचे दात किडत नसतील कारण तो साखर खायचा नाही पण कच्चं धान्य आणि फळं खाऊन त्याचे दात झिजत मात्र असतील. पण तरीही दातदुखी झालीच तर मग दुखऱ्या दाताच्या मुळाशी एखादा लाकडाचा तुकडा किंवा छोटा दगड ठेवून नंतर त्यावर एकच दणकट घाव घालून दात पाडण्याचे ‘कौशल्य’ माणसाने (दुसऱ्यांच्या किडलेल्या आणि काही वेळा चांगल्या दातांवर केलेल्या) अनेक प्रयोगातूनच मिळवले असावे. (आठवा :- कास्ट अवे सिनेमातला स्वतःच स्वतःचा दात पाडण्याचा प्रसंग) 

प्राचीन मानवाला दातदुखीची ३ कारणं ज्ञात होती – १) दातातली किड  २)शत्रूने केलेली करणी आणि ३) शरीरात वाढलेला कोणतासा एक द्रवपदार्थ.

पूर्वी इतर कसल्याही तपासण्या न करता फक्त जीभ बघून केलेल्या निदानावरून योग्य ते औषध देणारे फॅमिली डॉक्टर होते त्याचप्रमाणे मेसोपोटेमियातले वैद्य दात बघून रोग्याच्या तब्बेतीचा अंदाज लावायचे उदाहरणार्थ – 

If his teeth are dark-colored, the disease will last a long time.

If his teeth are crowded together, he will die.

If his teeth (fall out) his house will collapse.

If he grinds his teeth, the disease will last a long time.

If he grinds his teeth and his hands and feet shake: Hand of the moon god, he will die.

(संदर्भ – क्युनिफॉर्म लिपीत कोरलेल्या मातीच्या पाट्या) 

दातांवर करणी होऊ नये म्हणून किंवा झालेली करणी उतरावी म्हणून गळ्यात चामड्यात गुंडाळलेले मंतरलेले दगड बांधले जात. तर दातातली किड मरावी म्हणून दुखऱ्या दाताला वेगवेगळ्या औषधी वनस्पती जाळून धुरी दिली जायची आणि नंतर त्या दातात काही बियांची पूड आणि मेण एकत्र करून भरलं जायचं. 

बॅबिलोनचा राजा हम्मुराबीने इसपू २२५०मध्ये तेंव्हाच्या शल्यविशारद (त्याकाळात न्हावी छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया करत आणि दुखणारे दातही काढून देत.) मंडळींसाठी एक नियमावली तयार केली त्याला ‘Hammurabi’s code’ असं म्हटलं जातं. हे सगळे नियम एका दगडी स्तंभावर लिहिलेले आहेत आणि ही पहिली वैद्यकीय नियमावली मानली जाते. हे नियम अतिशय कडक आहेत एखाद्या शस्त्रक्रियेदरम्यान समजा रुग्ण दगावला तर त्याची शिक्षा म्हणून शल्यविशारदाचे हातच तोडले जात. (Hammurabiच्या code चे पालन करणारे भारतात अजूनही बक्कळ आहेत) 

Hammurabi’s code मध्ये दातांबद्दलही काही नियम आहेत. सुमारे दोन परिच्छेद हे दातांबद्दल आहेत. दात ही माणसाची संपत्तीच मानली गेली जायची. रागाच्या भरात कुठल्या दांडगोबानं एखाद्या नागरिकाचा दात घशात घातल्यास तर त्याबदल्यात त्याचा स्वतःचा एक दात काढला जायचा पण एखादया गुलामाचा दात घशात घातला तर त्या बदल्यात चांदी द्यावी लागायची. 

ग्रीक आणि रोमनांच्या ‘दंत’कथा 

रोमनांना युद्धात अनेकदा अवयव गमवावे लागत मग त्यांची जागा सोन्याच्या अवयवांनी भरून काढली जायची. युद्धात (आणि बहुधा काही वेळा गृहयुध्दातही) दात गमावले तर त्याजागी सोन्याचे दात किंवा दोन दातांच्या मध्ये सेतू बसवला जाई. आज आपण दाताना जे ब्रिजिंग करतो त्याचे श्रेय या मंडळींना आहे. रोमन साम्राज्य गडगंज असलं तरी सोन्याची किंमत त्यांनाही होतीच त्यामुळे अशी सोनेरी मंडळी पैलतीरी पोचल्यावर त्यांच्या अंगावर चढवलेले हे सगळे सोन्याचे साज उतरवल्याशिवाय त्यांना जाळू/पुरू नये असा नियम होता. तरीही काही ‘विद्रोही’ मंडळींनी स्वत:ला या साजासकट पुरून घेतल्याने आपल्याला त्यांच्या या कौशल्याची माहिती मिळाली. 

ग्रीकांनी आपल्या दातदुखीचा भार देवावर सोडलेला होता. Aesculapius हा औषधांचा देव त्यांची दुःखं स्वतःच्या शिरावर (आणि काहीवेळा दातावरही) घेई. याची मंदिरं बांधली जात आणि तिथं केवळ नामस्मरणाने दाताचे रोग बरे व्हायचे. Aesculapiusलाही जमलं नाहीच तर जादूटोणा, बाहेरची बाधा काढणं वगैरे होतंच. 

Aesculapius

दात पहिल्यांदा भरण्याचे श्रेय बहुदा Celsus या रोमन दंतवैद्याचे आहे. जवळपास इसवीसनाच्या पहिल्या शतकात त्याने एका रोग्याच्या दातात शिसे भरले होते. अफू, लवंग इ एकत्र करून त्याचा लेप दुखऱ्या दातावर लावण्याचा उपाय त्याने शोधून काढलेला होता. हा Celsus आणि ख्रिस्त एकमेकांना समकालीन, ख्रिस्तापेक्षा तो जवळपास १५ वर्षांनी मोठा होता. 

मध्ययुगीन युरोपमधलं ‘थेटर’ 

चौकात गर्दी गोळा करून जादूचे खेळ करून दाखवणारे आपल्याला काही नवीन नाहीत. पण मध्ययुगीन युरोपात चौकात वेगळ्याच जादूचे खेळ चालत. एखाद्या गावात बाजार भरलेला असताना अचानक कर्णा फुंकल्याचा जोरदार आवाज व्हायचा आणि साहजिकच गर्दी जमायला लागायची. पहिल्यांदा एक जादूगार येऊन ग्राम्य विनोद करत जादू करायला लागायचा आणि गर्दी जssरा स्थिर व्हायची. काही मिनिटं यात गेली की पुन्हा वाद्यांचा कल्लोळ उठायचा आणि एक लांब कोट आणि चमकदार टोपी असा भपकेबाज पेहराव केलेला मनुक्ष येऊन दाखल व्हायचा याशिवाय त्यानं गळ्यात मानवी दातांची माळही घातलेली असायची. तो आपण आजवर किती लोकांचे दुखरे दात कसे त्यांना मुळीच न दुखवता उचकटून हातात दिले अशी स्वतःची बढाईदार स्तुती करायला लागायचा आणि त्याला भुलून एखादा दुखऱ्या दाताचा गडी स्वतःहून पुढे यायचा. त्याचा दुखरा दात शून्य मिनिटात काढून दाखवला जाई तो गडीही आपल्याला वेदना कशी जाणवली नाही हे सगळ्यांना सांगायला लागायचा. रस्त्यावर जादूचे खेळ बघून तयार झालेल्या मंडळींना हे जादूगार स्वतःचाच माणूस गर्दीत उभा करून त्यालाच पुढं बोलावतात हे माहीत आहेच. इथंही तोच प्रकार होई. खोटं रक्त, आधीच कुणाचा तरी काढलेला दात हातचलाखीने या गड्याच्या तोंडात टाकून खेळात रंग आणला जाई. यानंतर वाद्यांचा पुन्हा दणका उठत असे. 

हे बघून धीर आलेली दुखऱ्या दातांची मंडळी आता पुढं येत पण त्यांना यापरास वेगळाच अनुभव येई. दात उचकटताना त्यांनी खच्चून मारलेली बोंब वाजंत्रीच्या ‘बहु गलबल्यात’ कुणालाही ऐकूच जायची नाही. दुखरा दात काढला की संपलं असं आपल्याला वाटत असलं तरी ते तसं नाही बरेचदा यामुळं काही इतरही त्रास सुरू व्हायचे आणि ते निस्तरायला लागायचे. आणि तोवर आपले हे डॉक्टर गुल झालेले असायचे. याशिवाय अजून एक उपाय असायचा तो म्हणजे शल्यक्रिया करणाऱ्या न्हावी मंडळींकडून उपचार करून घेणे. ते सुद्धा दात काढणे आणि अंगात वाढलेला कुठंलासा द्रवपदार्थ काढणे हे दोनच उपाय करत. दोन्हीकडे करताना रक्तपात अटळच होता. तेंव्हाच्या डॉक्टर मंडळींनी आपण दातांवर काम करणार नसल्याचं ठरवूनच घेतलेलं होतं. 

चौकात,बाजारात,जत्रेत गर्दी गोळा करून दात काढणाऱ्या या मंडळींना tooth-drawer म्हटलं जाई आणि गावाकडची मंडळी यांना toothers किंवा toothies ही म्हणत. त्यातले सगळेच काही भोंदू किंवा भामटे नसत पण अनेकदा त्यांना फारसं ज्ञान नसायचं त्याचबरोबर वेदनाशामकं, भूल नसताना आणि जेमतेम उपकरणांनिशी ते काम करायचे. त्यांना बऱ्याच स्पर्धेलाही तोंड द्यायला लागायचं. नुसत्या दातांवर पोट भरत नसल्याने ते त्या जोडीला पायाची कुरुपं काढणे, मोडलेली हाडं जोडून देणे इ उद्योगही करत. 

त्यातले काही दातकाढे अतिशय प्रसिद्ध होते त्यापैकी एक म्हणजे Martin Van Butchell. हे साहेब दिसायला काही औरच होते. ठेंगणा बांधा आणि लांब दाढी असणारा हा दातकाढ्या लंडनमधून आपल्या पांढऱ्या रंगाच्या व त्यावर बैंगणी ठिपके असणाऱ्या तट्टावरून फिरत असे.

या गृहस्थाने केलेला अजून एक अचाट उद्योग म्हणजे त्याने त्याच्या मयत बायकोला म्हणजे एलिझाबेथला योग्य त्या प्रक्रिया करून एका काचेच्या पेटीत घालून ठेवलं आणि तो त्याच्याकडे येणाऱ्या मंडळींशी तिची अगत्याने ओळखही करून देत असे. ( या अखंड सौभाग्यवती एलिझाबेथ बाईनी नवरा ख्रिस्तवासी होण्याआधी आपला मुक्काम लंडन म्युझिअममध्ये हलवला आणि १९४१ साली हिटलरच्या हवाईदलाने त्यांना मोक्ष देईपर्यंत त्या तिथंच होत्या.) 

या Martin Van Butchell साहेबानी आपल्या धंद्याची केलेली जाहिरात वाचण्याजोगी आहे. 

१७व्या शतकापासून ते १९व्या शतकापर्यंत पॅरिसमधल्या Pont-Neuf bridge च्या परिसरात दातकाढे आणि इतर भोंदू मंडळींचा सुळसुळाट होता. दात काढण्यापासून ते भूत उतरवण्यापर्यंत सर्व सिद्धी प्राप्त असलेली मंडळी इथं ठेचेला पाच पन्नास मिळत असत. यापैकी एक होता Le Grand Thomas. भयंकर धिप्पाड असलेला हा मनुष्य चार लोकांच्या वाट्याचे जेवण जेवायचा, तेवढीच वारूणी प्यायचा आणि कधी कधी दिवसाचे १८ तास झोपायचा. पण उरलेल्या वेळात तो पॅरिसमधल्या गोडघाशा मंडळींचे दुखरे दात काढून तो त्यांच्या चेहऱ्यावर (एखादा दात कमी असलेलं) हसू फुलवायचा. त्यानं या क्षेत्रात इतकं नाव मिळवलं की त्याच्यावर अनेक कथा, कविता आहेतच पण नाटकंही त्यांचं दंतपुराणाचं आख्यान लावत. त्याचा पोशाखही एकदम फैनाबाज असायचा. लालभडक कोट, तिरकी आणि मोरांची पिसं खोवलेली टोपी आणि कमरेला खंजीर. Pont-Neuf bridge बद्दल एक सांगायची राहिलेली गोष्ट म्हणजे माणूस असलेलं पहिलं छायाचित्र इथून काढलं गेलेलं होतं. 

पण Le Grand Thomasनंतरच्या काळात मात्र दातकाढ्यांचा सामाजिक दर्जा घसरला तो घसरलाच, फ्रान्समध्ये तर ‘दातकाढयांसारखे खोटे बोलणे’ हा वाक्यप्रचारच रूढ झाला. एखादा दात काढल्यासारखा दाखवताना आपल्या हातातला दात कळा लागलेल्या माणसाच्या तोंडात टाकला जायचा आणि तो कसलेला कलाकार तोंडातला दात आणि आधीच घेऊन ठेवलेलं कोंबडी/बकरीचं रक्त थुंकून दाखवायचा की लगेच लोकांच्या रांगा लागल्याच. दुखणेकरी माणसाला बसवायला खुर्ची वगैरे नसायचीच त्यामुळं वरच्या रांगेतील सुळे किंवा दाढा काढणं फारच अवघड असायचं मग दातकाढे हे दात काढता येणार नाहीत याचा अंदाज आला की त्यांचा संबंध डोळ्यांशी जोडून गाल फुगवून बसलेल्या माणसाला डोळे जाण्याची भीती घालायचे. आणि बिचारे लोक डोळे तरी वाचले याचं समाधान मानून कळा सहन करायचे. 

कर्माचं फळ आणि दाताला कळ 

चर्चमध्ये अनेक रोगांवर उपचार होत असले तरी काही वेळा चर्च धर्माच्याविरुद्ध वर्तन करणाऱ्याला जबर शिक्षाही करत. ख्रिस्ती मंडळींच्या ४० दिवसांच्या Lent या उपासाच्या दिवसात चोरून मांस खाणाऱ्या/उपास मोडणाऱ्या मंडळींना दात उपटण्याची शिक्षा दिली जायची. आणि हे दात शक्यतोवर पुढचेच काढले जायचे जेणेकरून ती पोकळी सदैव इतरांना दिसत राहील. (आपल्या नशिबानं हिंदू धर्मात असं काही नाही नाहीतर अनेकांच्या आयुष्यात मोठी ‘पोकळी’ निर्माण झाली असती.) इतरही अनेक गुन्ह्यातल्या हाताबद्दल गुन्हेगाराला दात गमवायची वेळ यायची. आपण अनेकदा सिनेमात डायलॉग ऐकलेला आहे की ‘हमे अमुक तमुक लाख रुपये दे दो, वरना हम तुम्हारे बच्चे के तुकडे तुकडे जर देंगे’ या डायलॉगचं श्रेय बाराव्या शतकातला इंग्लंडचा राजा जॉनला द्यायला हरकत नाही त्यानं एका श्रीमंत माणसाकडून १०००० ducats उकळण्यासाठी त्याला पकडून आणून स्वतःच्या राजवाड्यात डांबलं आणि तो खंडणी द्यायला राजी होईपर्यंत सात दिवस रोज स्वहस्ते त्याचा एक दात काढून त्याच्यावर राजकृपा केली. 

ख्रिश्चन दंतेश्वरी सेंट अपोलोनिया 

अपोलोनिया ही साधारण इसवीसनाच्या तिसऱ्या शतकात अलेक्झांड्रीया इथं जन्मली, तिचा जन्म व्हावा म्हणून तिच्या आईने मेरी मातेला नवस केलेला होता. त्यावेळी अलेक्झांड्रीयात नुकतीच ख्रिस्ती धर्माची पावलं पडायला लागलेली होती, त्यामुळं त्याला विरोधही प्रचंड होता. अपोलोनियाने ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेऊन त्याचा प्रचार करायला सुरुवात केली. यावर तिला पकडून तिला रोमन देवतांची उपासना करण्याची बळजबरी करण्यात आली याला नकार मिळाल्यावर तिचे सगळे दात उपसून काढले गेले आणि शेवटी तिला आगीत टाकण्यात आले. जळताना तिनं वचन दिलं की जो तिची प्रार्थना करेल त्याला कधीही दातदुखी होणार नाही. 

त्यामुळे हे भोंदू दातकाढे अपोलोनियाची शपथ घेऊन आणि काहीवेळा त्यांच्याकडे असलेल्या ‘साक्षात’ तिच्या दातावर हात ठेवून दातदुखी घालवण्याची हमी देत. अपोलोनियाच्या दातात असलेल्या या दैवी गुणामुळे तिच्या दाताला प्रचंड मागणी आली. पंधराव्या शतकातला इंग्लंडचा राजा सहावा हेन्री हा अतिशय भाविक होता त्याने अपोलोनियाचे सगळे दात आपल्या एजंट मंडळींकडे जमा करण्याचे आदेश जनतेला दिले आणि जनतेनेही याला उस्फुर्त प्रतिसाद देत जवळपास टनभर दात राजाच्या खजिन्यात जमा केले. एवढ्या दातांच्या अपोलोनियाचं पोट भरायची वेळ आली असती तर या बिचाऱ्या राजाचं संपूर्ण राज्यही पुरे पडलं नसतं. 

आपण आधी वाचलं त्याप्रमाणे न्हावी मंडळींना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी कितीतरी आधीपासून होती, या मंडळींनी एकजुटीने इंग्लंडच्या राजाकडे जाऊन दाद मागितली आणि १४६२ मध्ये सर्व प्रकारचे व्यवसाय करण्याची सनद आपल्या पदरी पाडून घेतली. यात त्यांना त्यांच्या स्वतःच्या उद्योगासोबतच इतरही सर्वप्रकारचे उद्योग करण्याचे हक्क मिळाले. फक्त त्यांनी कुंटणखाने चालवू नयेत आणि लोकांच्या केसातल्या ‘श्वापदांना’ काढण्याचे काम करू नये एवढीच अट त्यात घातलेली होती. मग यांनी आपलं सगळं ज्ञान पणाला लावून ‘प्रॅक्टिस’ सुरू केली. १५-२२ ऑगस्ट १६६५ म्हणजे शिवाजी महाराज बहुदा उत्तरेत कुठंतरी असताना दूर लंडनमध्ये आठवडी मयतांचा यादीत एकूण ५५६८ मंडळी दाताच्या दुखण्यामुळे (किंवा बहुदा त्यावरच्या उपायांमुळे) ख्रिस्तवासी झाली असा उल्लेख आढळतो तर प्लेगाने फारच कमी धावा करत फक्त ४२३७चा आकडा गाठला. 

पहिली महिला डेंटिस्ट 

दाताच्या डॉक्टरांपैकी बहुसंख्य महिला असतात (हे विधान मी आजवर वाचलेल्या दवाखान्याच्या पाट्यांवर आधारीत आहे). पण इंग्लंडमधल्या Barber surgeon guild अर्थात न्हावी मंडळींच्या वैद्यकीय संघटनेनं २६ ऑगस्ट १५५७ ला एक पत्रक काढून श्रीमती Dawson यांना दातांवर कोणत्याही प्रकारचे उपचार करण्यास मनाई केली. या बाईंचा पहिला नवरा हा दातांवर उपचार करायचा तो मेल्यावर या बाईंनी त्याचा धंदा आपल्या हातात घेतला. पण लौकरच त्यांनी ‘जातीबाहेर’ लग्न करून नवीन संसार थाटला आणि तरीही पहिल्या नवऱ्याचा धंदा सुरूच ठेवला. हे लक्षात आल्यावर लगेच पत्रक काढून बाईंना हा धंदा बंद करायला लावला. १७४५ मध्ये  इंग्लंडचा राजा दुसरा जेम्सने न्हावी मंडळींच्या सनदेत मोठ्या प्रमाणावर फेरफार करून त्यांच्या हातातली शस्त्रं खाली ठेवायला त्यांना भाग पाडलं. 

या नंतरच्या काळातही अनेक ‘दंतकथा’ घडल्या, शोध लागले आणि आपलं जीवन सुखकर झालं. पण त्याबद्दल लिहीत बसलो तर एखादं मेडिकल जर्नल वाचल्यासारखं वाटून एखादी ‘तीव्र सणक’ तुमच्या डोक्यात जाण्याची शक्यता लक्षात घेऊन मी हा लेख इथं आवरता घेतो. 

ता.क. –  पुस्तकं अर्पण करतात तसं हा लेख अर्पण करायची वेळ आली तर त्याची अर्पणपत्रिका अशी असेल – (प्रेमात न पडताही) तळमळून काढलेल्या कित्येक रात्रींना….

यशोधन जोशी

भावनांचा घोडेबाजार

माणसांप्रमाणे प्राण्यांना भावभावना असतात का? तसेच प्राण्यांना माणसांच्या भावभावना कळतात का? या दोनही प्रश्नांवर गेली तीन चार शतके संशोधन चालू होते. प्राण्यांचा आणि भावभावनांचा काहीएक संबंध नाही अशी समजूत अनेक शतके रुढ होती. याला धक्का देणारी एक घटना घडली १९ व्या शतकाच्या अखेरीस.

१८९१ साली Wilhelm von Osten या घोड्यांच्या शिक्षकाने सगळ्या जगाला अचंबित करून सोडलं. त्याने त्याचा Hans नावाच्या घोड्याला मानवाप्रमाणे बुद्धिमत्ता असल्याचा दावा केला. याची प्रात्यक्षिके तो सगळीकडे करू लागला. त्याने हान्सला गणिती प्रश्न सोडवण्यात तरबेज केले होते. उदा. तीन गुणिले चार म्हणजे किती? असा प्रश्न हान्सला विचारला की हान्स आपल्या पायाच्या टापांचा १२वेळा आवाज करी. त्याला एखाद्या कागदावर लिहिलेल्या आठ वजा पाच किती? असा प्रश्न दाखवला की तो अचूकपणे तीनदा टापांचा आवाज करी. हे सगळे पाहून लोक आश्चर्यचकित होत. यामुळे हान्सला जर्मनीत भलतीच प्रसिध्दी मिळाली. हान्स हा खरोखरच बुद्धिमान घोडा आहे असे लोकांना वाटू लागले. पण काही लोकांना शंका आली की जेव्हा Wilhelm ही प्रात्यक्षिके करतो त्यावेळी तो हान्सला काही खाणाखुणांनी सूचना देतो.

याची सत्यता उलगडण्यासाठी १९०४ साली जर्मन वैज्ञानिकांची एक समिती नेमण्यात आली. या समितीमध्ये वैज्ञानिकांबरोबर सर्कसमध्ये प्राण्यांना प्रशिक्षण देणार्‍या प्रशिक्षकाचा समावेश केला गेला. या समितीने एक प्रयोग केला. त्यांनी हान्सला Wilhelmच्या अनुपस्थितीत प्रश्न विचारायचे ठरवले. तसा प्रयोग केला गेला आणि Wilhelm हजर नसतानाही हान्सने अचूक उत्तरे दिली. यामुळे हान्सच्या बुद्धिमत्तेवरचा लोकांचा विश्वास आणखी दृढ झाला.

असे असले तरीही काही तज्ञांना यामागे काहीतरी रहस्य असावे असे जाणवत होते. १९०७ साली ऑस्कर फुग्स्ट नावाच्या एका मानसशास्त्रज्ञाने हान्सची पुन्हा चाचणी घेण्याचा चंग बांधला. त्याने हान्सला प्रश्न विचारल्यावर हान्सचे निरीक्षण चालू केले. अनेक अथक प्रयत्नानंतर ऑस्करने यामागील रहस्य उलगडले. हान्स हा हुशार घोडा होता यात वादच नाही. Wilhelm ने त्याला प्रश्नकर्त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव वाचण्याचे प्रशिक्षण दिले होते. जेव्हा हान्सला तीन गुणिले चार किती? असा प्रश्न विचारला जाई की हान्स टापा वाजवायला सुरुवात करायचा. त्यावेळी हान्सची नजर प्रश्नकर्त्यांच्या चेहर्‍याकडे असे. टापा वाजवताना प्रश्नकर्त्याच्या चेहर्‍यावरील ताण वाढत जात असे आणि जेव्हा बारावी टाप वाजवली जात असे तेव्हा प्रश्नकर्त्यांच्या चेहेर्‍यावर ’हुश्श’ असा भाव येत असे आणि हा भाव बघुनच हान्सला आपण उत्तरापर्यंत पोहोचलो याची जाणीव होत असे. ऑस्करने हे सत्य जगासमोर आणले आणि प्राण्यांना भावभावना असतात तसेच ते माणसांच्या चेहर्‍यावरील भावही वाचू शकतात यावर शिक्कामोर्तब झाले. कदाचीत आपला चेहेरा कोरा ठेवणार्‍या एखाद्या माणसाने हान्सची परीक्षा घेतली असती तर हान्सला उत्तर देणे शक्य झाले नसते.

हान्स हा इतिहासात Clever Hans म्हणून प्रसिध्द झाला.

कौस्तुभ मुद‍गल

एप्रिल फुल बनाया…

एकेकाळी माध्यमं खरोखरच्या बातम्या द्यायची आणि लोकांचा त्यावर संपूर्ण विश्वासही असायचा. त्यात ‘बीबीसी’ सारख्या माध्यमाकडे तर जगभरातल्या लोकांचं लक्ष असायचं आणि त्यांच्या बातम्यांना अधिकृत मानलं जायचं. त्यांच्या धीरगंभीर स्वभावामुळे ते कधी एक एप्रिलला आपली टोपी उडवतील असं इंग्लंडातल्या कुणालाही अपेक्षित नव्हतं.

१ एप्रिल १९५७ ला बीबीसीच्या पॅनोरमा या देशोदेशीच्या बातम्या दाखवणाऱ्या सदरात स्वित्झर्लंडमधल्या Ticino या प्रांतात spaghetti चं बंपर हंगाम झाल्याचा एक व्हिडिओ प्रदर्शित झाला. चित्रविचित्र नावांच्या आणि विनाकारण इंग्रजी बोलणाऱ्या महागड्या हॉटेलांमुळे आपल्याकडं मोठ्या शहरात रहाणाऱ्या जवळपास सगळ्यांना spaghetti माहिती झालेलीच आहे. (ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी – पास्ता नावाचा एक इटालियन पदार्थ आहे ज्यात हे पास्ता नावाचे बोटभर सांडगे बटरमध्ये घोळून वेगवेगळ्या सॉसबरोबर खाल्ले जातात. spaghetti हा सुद्धा पास्त्याचाच एक प्रकार आहे ज्यात हात-दीड हात लांबीच्या या शेवया चीज,बटर आणि सॉसमध्ये घोळून खाल्ल्या जातात. बाकी माहितीसाठी गुगल असे सदा ज्ञानदाता!) तर आता आपण परत जाऊया थंडगार स्वित्झर्लंडमध्ये. या व्हिडिओत झाडावरून मुली, बायका आणि समानता दाखवायची म्हणून काही पुरुषही झाडावरून स्पॅघेट्ट्या तोडताना, त्या वाळवताना वगैरे दाखवलेले होते आणि सोबत होतं बीबीसीचं नेहमीचं धीरगंभीर समालोचन.

इंग्लंडमध्ये spaghetti माहीत नव्हती अशातला भाग नव्हता पण त्यांच्याकडे हवाबंद टिनमधलीच spaghetti मिळायची. झाडाला या शेवया लागलेल्या आहेत आणि आपल्या स्वतःच्या बागेतल्या या शेवया स्वीडिश मंडळी सुखासमाधानाने खातायत हे दृश्य शहरी मंडळींच्या (नेहमीप्रमाणे) काळजाला हात घालून गेलं. शेकडो लोकांनी बीबीसीला फोन करून आम्हालाही आमच्या अंगणी ही बाग फुलवायची असेल तर काय करायला लागेल वगैरे चौकशी करायला फोन केले. बीबीसीने जो माणूस अशा फोनचं उत्तर द्यायला ठेवलेला होता तो तर याच्यावरचा निघाला. त्यानं या भावी बागायतदार मंडळींना “काही अवघड नाही ओ ! एक स्पॅघेट्टी सॉसच्या रिकाम्या डब्यात पेरा आणि रोज पाणी घाला” हा सल्ला दिला.

पुढच्या एक दोन दिवसांत याचा प्रचंड गवगवा होऊन हा बीबीसीचा जनतेला टोप्या घालण्याचा उद्योग होता हे स्पष्ट झालं.चौकोनी चेहऱ्याची गंभीर बीबीसी असा उद्योग करेल असं लोकांना स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. त्यामुळं अनेकांनी बीबीसीला धारेवरही धरलं. नशिबानं त्या काळात सोशल मीडिया नसल्यानं लोकांनी ‘माध्यमांची विश्वासार्हता धोक्यात’ वगैरे पोष्टी पाडल्या नाहीत. आणि बीबीसीनंही लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागून व्हिडीओ मागे घेतला नाही.

तुम्ही आता नेहमीप्रमाणे या व्हिडीओची लिंक मागाल तर ती आधीच खाली दिलेली आहे. आणि मी शपथ घेऊन सांगतो की ती नक्की खरी आहे –

यशोधन जोशी

झोपेच्या गावा जावे…

आजकाल आपल्याकडं कुठल्याही जरा बऱ्या हॉटेलात गेलो की होणारा सगळ्यात मोठा वैताग म्हणजे एकसारख्याच चवीच्या पदार्थांची स्पॅनिश इटालियन अशा कुठल्या कुठल्या भाषेत लिहिलेली नावं. या पदार्थांच्या नावाचं स्पेलिंग वाचताना स,ह,ज,झ आणि च यापैकी नक्की उच्चारावं याचा इथं फार घोटाळा होतोय. उदाहरणार्थ mojito असं स्पेलिंग असलं तरीही त्याला muh-hee-toh म्हणायचं, lasagne असं उदराग्नी, कामाग्नी च्या जवळपास जाणारं स्पेलिंग असलं तरी luh-za-nyuh असं उच्चारायचं. आपल्याला ऑर्डर देताना ती नावं नीट उच्चारता नाही आली की ऑर्डर घेणाऱ्याच्या चेहऱ्यावर एक खुनशी आनंद पसरल्याचा भास मला नेहमी होत असतोय. म्हणजे एकुणात काय तर आपल्याला स्वतःच्या गोष्टींचं कौतुक कमी आणि दुसऱ्याचं जास्त. दुपारी जेवून, पानाचा तोबरा चघळून झाल्यावर अंधाऱ्या आणि थंडगार माजघरात तासभर झोपण्यात जे सुख आहे ते शब्दात सांगता येणार नाही. वामकुक्षी घेणाऱ्याना हसणाऱ्या लोकांसाठी देशोदेशीच्या दुपारी झोपण्याच्या तऱ्हांचा घेतलेला हा धांडोळा –

स्पॅनिश Siesta – स्पॅनिश लोक हे मुळात झोपप्रिय आहेत. Siesta या शब्दाचा मूळ अर्थ सहावा तास असा आहे. पण स्पॅनिश मंडळी याचा अर्थ घेताना सकाळी झोपून उठल्यानंतर सहाव्या तासाला जेवून खाऊन जी विश्रांती घेतली गेली पाहिजे ती असा घेतात. साधारणपणे हा Siesta ची वेळ दुपारी दोनपासून ते पाचपर्यंत मानली जाते. स्पेनमधल्या अनेक शहरात दुपारी या वेळात दुकानं बंद असतात. आता या Siesta ला तशी काही अंधार,फॅन, अंगावर पातळ चादर इ इ सरंजामाची गरज नाही आपण बसल्या बसल्याही Siesta घेऊ शकतो. पण हा Siesta चार तासांचा नसून फक्त अर्ध्या तासाचा असतो. सुप्रसिद्ध स्पॅनिश दर्यावर्दी कोलंबस साहेबसुद्धा दुपारी भर समुद्रात जहाजाचा नांगर टाकून अर्धा तास siesta उर्फ एखादी पडी टाकत असणार याबद्दल मला कुठलीही शंका नाही.

इटालियन Riposo (उच्चारी रिपोजो) – झोपेच्याबाबतीत इटालियन मंडळींनी स्पॅनिश मंडळींच्या हातावर हात मारलेला आहे म्हणायला हरकत नाही. पण इटालियन मंडळी ही जरा जास्तच बैजवार असल्यानं त्यांनी स्पॅनिशांच्या अर्ध्या तासाच्या विश्रांतीला स्पॅघेट्टीसारखं ताणून थेट दीड ते दोन तास करून टाकलेलं आहे.  रिपोजो साधारणपणे दुपारी दीड वाजल्यापासून चारपर्यंत चालतो. या वेळात ऑफिस, दुकानं तर बंद असतातच पण सुप्रसिद्ध म्युझिअम आणि गॅलरीजसुद्धा बंद असतात. रिपोजो हा बसल्या बसल्या पार पाडण्याचा विधी नसून दुकानं, ऑफिसं यांना टाळं लावून घरात जाऊन थेट अंथरुणावर अंग टाकण्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळं रिपोजोचं विडंबन करून त्याला ‘रिझोपो’ म्हटलं तरी फारसं बिघडणार नाही.

जपानी Inemuri (उच्चारी ईनेमुरी) – जपानी चेहऱ्यावरून झोपेत असल्यासारखी दिसत असली तरी त्यांच्यात झोपेचं प्रमाण फार कमी आहे. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन दिवसरात्र काम करत रहाण्याची सवय त्यांनी स्वतःला लावून घेतलेली आहे. पण या झोपेची कमतरता पूर्ण करण्याचं त्यांचं तंत्र थोडं वेगळं आहे. कामंधंदे बंद करून आणि दुकानं/ऑफिसला टाळी न ठोकता बसल्या जागेला दोन पाच मिनिटांची डुलकी घेणे.जपानी मंडळी रेल्वेत किंवा बागेत बसल्या बसल्या ईनेमुरी घेताना दिसतात. ईनेमुरी हे तुमच्या धडपडून काम करण्याच्या वृत्तीचं द्योतक आहे असं जपानी लोक मानतात. यापुढं कधी ऑफिसात जाण्याची वेळ आलीच आणि दुपारी सवयीनं डोळे झाकायला लागले तर ‘गर्व से कहो हम ईनेमुरी मै है !’

खरं तर हा लेख काल आंतरराष्ट्रीय झोप दिवसाच्या निमित्ताने पोस्ट करायचा होता पण आधी siesta मग riposo आणि त्यांच्यामध्ये inemuri या गडबडीत ते राहूनच गेलं.

पळा पळा कोण पुढे पळे तो…

साल होतं १९०४. अमेरिकेतलं पहिलं ऑलिंपिक. सर्वत्र उत्साह पसरलेला. मॅरेथॉन चालू होणार होती. बरोबर ३ वा. ३ मिनिटांनी मॅरेथॉन चालू झाली. आधीच्या बॉस्टनला झालेल्या मॅरेथॉनमधले पहिले तीनही विजेते सामील होते. याचबरोबर क्युबा येथील एक धावपटू सामील झाला होता. आपल्याला या मॅरेथॉनमध्ये भाग घेता यावा म्हणून त्याने संपूर्ण क्युबामध्ये धावून पैसे जमवले होते.

धुळीचा खकाणा आणि प्रचंड उकाड्यात शर्यत चालू झाली. अशा वातावरणामुळे शर्यतीमधील अनेक धावपटूंना उष्माघाताचा प्रचंड त्रास झाला. त्यात शर्यतीच्या संयोजकांनी आणखी भर घातली. धावपटूंना धावताना अतिशय कमी पाणी देण्यात आले. त्यामुळे नर्जलीकरणाचा त्रासही अनेकांना भोगावा लागला. पहिल्या पाच फेर्‍या या मैदानातच मारण्यात आल्या. मैदानातल्या तिसर्‍या फेरीच्या दरम्यान पहिली दुर्घटना घडली. John Lordan नावाच्या धावपटूला उलट्यांचा त्रास होऊ लागला आणि त्याने शर्यत सोडून दिली. त्यानंतर धावपटू मैदानाबाहेर पडले. धावपटूंच्यामध्ये अडथळा येऊ नये म्हणून घोडेस्वार, पत्रकार, डॉक्टर, धावपटूंचे सहकारी आणि शर्यत आयोजित करणार्‍या लोकांनीच इतकी गर्दी करून ठेवली की धावपटूंना त्यातून वाट काढत पळावे लागले.

तर अशा अनेक संकटांमध्ये धावपटूंनी धावण्यास सुरुवात केली. Fred Lorz या धावपटूने आधी झालेल्या बोस्टन मॅरेथॉनमध्ये दोनदा पहिल्या पाचमध्ये क्रमांक मिळवला होता. या धावपटूने ही शर्यत जिंकली. म्हणजे त्यानी तसा दावा केला. दावा केला असे म्हणण्याचे कारण म्हणजे त्याला शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यात त्याला स्नायूंमध्ये पेटके येऊ लागले. मग त्याने पुढील प्रवास एका गाडीमध्ये बसून केला आणि अंतिम रेषेच्या अलीकडे गाडीतून खाली उतरून त्याने शर्यत पूर्ण केली. त्याला संयोजकांनी विजयी घोषीतही केले. Lorz ने शर्यत आपण जिंकल्याचा दावा केला पण काही प्रेक्षकांनी त्याचे रहस्य फोडले. Lorz ने ही बातमी खोटी आहे असा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण हे शाबीत झाल्यावर त्याच्यावर आजन्म बंदी घालण्यात आली.

याच शर्यतीत Len Taunyane आणि Jan Mashiani हे दोघे कृष्णवर्णीय आफ्रिकेतील आदिवासी जमातीतील धावपटू सामील झाले होते. ऑलिंपिकमध्ये सामील झालेले हे दोघे पहिले कृष्णवर्णीय आफ्रिकन.

Taunyane आणि Jan Mashiani

शर्यतीत दुसरा नंबर पटकावला Thomas Hicks याने. Hicks हा व्यवसायाने विदुषक होता. २० व्या मैलाला Hhicks ला प्रचंड तहान लागली. त्याने आपल्या सहकार्‍यांना पाणी मागितले. पण त्याला पिण्यासाठी पाणी देण्याऐवजी त्याच्या सहकार्‍यांनी त्याचे अंग ओल्या स्पंजने पुसून काढले. त्याला पळण्यासाठी उर्जा मिळावी यासाठी त्याच्या सहकार्‍यांनी त्याला पळताना अंड्याच्या पांढर्‍या बलकाबरोबर उत्तेजना देणारे एक औषध दिले. पण झाले भलतेच. Strychnine नावाचे हे औषध वापरले जायचे उंदीर मारण्यासाठी. त्याने त्याला विषबाधा झाली. त्याचा पळण्याचा वेग मंदावला. शेवटचे दोन मैल राहिले असताना त्याला त्याच्या सहकार्‍यांनी Strychnine ब्रॅंडीमध्ये मिसळून दिले. याने त्याला थेडी तरतरी आली. पण शेवटी त्याच्या सहकार्‍यांनी त्याला चक्क उचलून शर्यत पूर्ण केली. Lorz चा खोटेपणा शाबीत झाल्यावर Hicks ला विजयी घोषीत केले.

अर्ध्या शर्यतीच्या दरम्यान Miller नावाचा धावपटू सगळ्यात पुढे होता. त्याच्या मागे Newton आणि Hicks होते. Miller ला पायामध्ये पेटके येऊ लागले. त्यातच त्याने शर्यतीत एका ठिकाणी चुकीचे वळण घेतले. आता परत वळून पुन्हा शर्यतीत पळण्याचा त्याला कंटाळा आला व त्याने शर्यत सोडून दिली. Newton हा एकमेव धावपटू होता ज्याने कुठलीही गडबड न करता ही शर्यत तिसर्‍या क्रमांकाने पूर्ण केली.

१९ व्या मैलाला आणखी एक दुर्घटना घडली. William Garcia नावाचा धावपटू हा चौथ्या क्रमांकावर होता. तो पळताना अचानक खाली पडला. त्याला तेथेच रक्ताची उलटी झाली. त्याला ताबडतोब दवाखान्यात नेण्यात आले. तो अगदी मरणाच्या दारातून परत आला.

Andarin Carabjal या क्युबन धावपटूने ही शर्यत चौथ्या क्रमांकाने पूर्ण केली. त्याने क्युबात पळून जमवलेले पैसे अमेरिकेत आल्यावर जुगारात खर्च केले. त्याला शर्यतीत घालण्यासाठी योग्य असे कपडे देखील उरले नाहीत. शेवटी त्याने घातलेली फूल पँट अर्धी कापली. हा पळत असताना रस्त्याच्या बाजूला एका फळाच्या दुकानातून सफरचंद घेतले. पण ते कच्चे असल्याने ते खाल्ल्यावर त्याच्या पोटात पेटके येऊ लागले. मग पठ्ठ्याने काहीवेळ रस्त्याच्या बाजूला डुलकी घेतली. जागा झाल्यावर त्याने मग शर्यत पूर्ण केली.

Andarin Carabjal

तर अशी ही १९०४ साली झालेल्या ऑलिंपिकमधील शर्यतीची कथा.

वेदनेच्या पलीकडे

मानवाने आपल्या उत्क्रांतीच्या दरम्यान अनेक विषयांचे ज्ञान प्राप्त केले आहे. त्यातले मानवाच्या दृष्टीने महत्त्वाचे ज्ञान आहे आरोग्य विषयाचे. रोग व त्यांच्यावरील औषधे यांच्या शोधाच्या कथा अकल्पीत आहेत. तसाच आणखी एक महत्त्वाचा शोध म्हणजे शस्त्रक्रिया. शस्त्रक्रिया ही प्रक्रिया अतिशय वेदनादायी असते. भूल देण्याचे तंत्र विकसित होण्याआधी अफूसारख मादक पदार्थ वापरले जात. अर्थातच ते माफक प्रमाणातच वापरावे लागत आणि त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यावर अनेक मर्यादा होत्या. भूलीचे तंत्र विकसित होण्याआधी शरीराच्या आतील भागांच्या शस्त्रक्रिया तर शक्यच नव्हत्या. होणार्‍या वेदनांना आणि शस्त्रक्रिया करताना वापरले जाणारे चाकू यांना घाबरून रुग्ण शक्यतो शस्त्रक्रिया करणे टाळत असत. १९ व्या शतकाच्या मध्यात क्लोरोफॉर्मचा शोध लागे पर्यंत ही अशीच स्थिती होती.

पण हा काही आजचा विषय नाही. आजचा विषय आहे तो इस्ट इंडिया कंपनीने नेमलेल्या Dr. James Esdile या स्कॉटिश डॉक्टरचा. हा रेव्हरंट James Esdile चा थोरला मुलगा. त्याने एडिनबर्ग विद्यापीठातून M.D. ही वैद्यकीय पदवी घेतली. त्यानंतर त्याची नेमणूक इस्ट इंडिया कंपनीच्या वैद्यकीय विभागात झाली आणि १८३० साली तो कलकत्ता येथे आला. जेम्सला दम्याचा त्रास होता आणि भारतातील हवामान आपल्याला मानवेल या भावनेने तो भारतात आला. मात्र उत्तर प्रदेशमधील आझमगढ येथे काम करताना त्याला दम्याचा मोठा झटका आला आणि त्याने दोन वर्षांची रजा घेतली. १८३९ साली तो जेव्हा पुन्हा कामावर रुजू झाला तेव्हा त्याची नेमणूक हुगळीच्या इमामबाडा हॉस्पिटलात झाली.

एकदा जेम्सच्या वाचनात इंग्लंडमधील एका शस्त्रक्रियेविषयी माहिती आली. तेथील एका वैद्याने संमोहनशास्त्राच्या आधारे भूल न देता ही शस्त्रक्रिया पार पाडली होती. ही माहिती वाचल्यावर जेम्सला या विषयात अतिशय उत्सुकता निर्माण झाली आणि त्याने हुगळीच्या त्या हॉस्पिटलमध्ये याचा प्रयोग करण्याचे मनात घेतले. जेम्सला संमोहन शास्त्राविषयी फारशी माहिती नव्हती. हुगळी येथील एका हायड्रोसीलच्या शस्त्रक्रियेच्या दरम्यान रुग्णाला झालेल्या वेदना बघून तर त्याने हा प्रयोग करण्याचे मनात पक्के ठरवले.

त्याचा पहिला पेशंट होता रस्त्याच्या कामावर असलेला हायड्रोसीलचाच रुग्ण असलेला एक कामगार. ४ एप्रिल १८४५ रोजी त्याने संमोहनाचा पहिला प्रयोग केला. जेम्सने पुढे लिहिलेल्या Mesmerism in India या पुस्तकात त्याने त्याचे वर्णन केले आहे.

त्याचे दोन्ही गुडघे माझ्या दोन पायांमध्ये ठेवून त्याला डोळे मिटावयास सांगितले.मी माझा हात त्याच्या चेहर्‍यावरून ते खाली पोटापर्यंत सावकाश फिरवू लागलो. साधारणतः अर्धा तास हा प्रकार मी केला. पण रुग्णाच्या परिस्थितीत काहीही फरक पडला नाही. अजून १५ मिनिटे मी हा प्रकार चालू ठेवला तरीही मला अपेक्षीत असा कुठलाही बदल रुग्णात दिसला नाही. निराश होऊन मी माझा प्रयोग फसल्याचे जाहीर केले. मग मी शांतपणे बसलो आणि काय चुकले असावे याचा विचार करू लागलो. माझे लक्ष रुग्णाकडे गेले आणि मी त्याला डोळे उघडावयास सांगितले. त्याने डोळे उघडले आणि तो म्हणाला ’मला संपूर्ण खोली धुराने भरल्यासारखी दिसत आहे’ माझी उत्सुकता पुन्हा चाळवली आणि मी माझे हात त्याच्या डोक्यापासून छातीपर्यंत आणून येथे थोडा दाब दिला. त्याने मांडीपाशी असलेल्या त्याच्या हातांनी माझे हात दाबले. ही प्रक्रिया पुढे तासभर चालू ठेवली. त्यानंतर त्याला झोप येत असल्याचे त्याने सांगितले. याचवेळी मला जाणवले की त्याच्या जाणीवा कमी होत चालल्या आहेत व त्याच्या प्रतिक्रियाही विसंगत झाल्या आहेत.

जेम्सने यानंतर शस्त्रक्रिया पार पाडली. शस्त्रक्रिया करताना रुग्णाला कुठल्याही वेदना झाल्या नाहीत. यानंतर जेम्सने रुग्णांना संमोहित करून शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. १८४५ ते १८४७ या दोन वर्षांमध्ये जेम्सने वेगवेगळ्या अशा ३०० शस्त्रक्रिया पार पाडल्या.

२२ जानेवारी १८४६ साली त्याने The Englishman या वृत्तपत्राच्या संपादकाला एक अहवाल पाठवला. त्यात त्याने संमोहनाखाली पार पडलेल्या मागील आठ महिन्यातील शस्त्रक्रियांची यादीच दिली आहे. अहवालाच्या सुरुवातीस तो म्हणतो

माझ्या गेल्या आठ महिन्यातील संमोहनाखाली केलेल्या शस्त्रक्रियांची माहिती मी देत आहे. संमोहनाखाली मी पार पाडलेल्या शस्त्रक्रियांमुळे येथील स्थानिक रुग्णांना मोठा फायदा झाला आहे. शस्त्रक्रियेच्या होणार्‍या वेदनेपासून मुक्ती याशिवाय अनेक फायदे त्यांना मिळाले आहेत. असे उपचार त्यांना मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि त्यापासून त्यांना वंचित ठेवता येणार नाही.

जेम्सने केलेल्या शस्त्रक्रियांपासून रुग्णांमध्ये खरोखरच आश्चर्यकारक परिणाम दिसून आले. मुळात शस्त्रक्रिया करताना त्यांना कुठल्याही वेदना झाल्या नाहीत. जेम्सने संमोहनाखाली केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये एकही रुग्ण दगावला नाही. शस्त्रक्रियेनंतरही जखमांना कुठलाही संसर्ग झाला नाही आणि रुग्ण लवकर बरे झाले.

जेम्सने संमोहनाखाली शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. त्याने कलकत्त्यामध्ये संमोहनाखाली उपचार देणारा एक दवाखानाही उघडला. पण पुढे १८४९ साली जेम्सची नेमणूक इस्ट इंडिया कंपनीच्या आरमारी विभागात केली गेली. १८५३ साली जेम्स निवृत्त झाला आणि तो लंडन येथील संमोहन इस्पितळाचा संचालक झाला. १० जानेवारी १८५९ साली जेम्सचा मृत्यू झाला.

याच काळात भूलशास्त्राची वेगळी शाखा विकसित झाली आणि जेम्सने केलेले हे प्रयोग मागे पडले.

Happy Birthday To You ची गोष्ट

जगात सर्वात जास्तवेळा गायलं जाणारं गाणं कुठलं असं विचारलं तर सगळ्यांची उत्तरं वेगवेगळी असतील पण जगातलं सर्वात जास्त वेळा गायलं जाणारं गाणं आहे ‘Happy Birthday To You’. आणि सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करताना वेगवेगळ्या (बे)सुरात आपण जे गाणं गातो ते त्याची सरासरी वार्षिक कमाई जवळपास २०,००,००० अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.

पण या गाण्याची जन्मकथा थोडी वेगळी आहे. अमेरिकेतल्या केंटुकी शहरात रहाणाऱ्या Mildred J. Hill and Patty Smith Hill या दोन बहिणी लहान बालशिक्षण या क्षेत्रात कार्यरत होत्या. Patty Smith Hill ने त्या काळात अनेकविध प्रयोग करून मुलांना कसे शिकवावे याच्या नवीन पद्धती शोधून काढलेल्या होत्या. तर Mildred J. Hill ही तिची थोरली बहीणही या क्षेत्राबरोबरच संगीत क्षेत्रातही कार्यरत होती.  Mildred ज्या शाळेत शिकवत असे त्याच शाळेची Patty मुख्याध्यापिका होती.

Mildred J Hill आणि Patty Smith Hill

एके दिवशी Mildred नं एक धून तयार केली आणि Patty नं त्यात शब्द भरले. एकुणात यातून जे काही गाणं तयार झालं ते असं होतं –

Good morning to you,
Good morning to you,
Good morning, dear children,
Good morning to all.

याला आता तुम्ही आता ‘Happy birthday to you’ च्या चालीवर म्हणून बघा. या ओळी एकदम मीटरमध्ये बसतात आहेत हे तुमच्या लक्षात येईल. आणि हे स्तवन/कवन शिक्षकांनी शाळेत मुलांच्या स्वागतासाठी गायचं आहे हे विशेष.(आठवा : शाळेत असताना आपण उन्हात उभे राहून गायलेल्या  ‘सुरेल’ प्रार्थना)

पण लौकरच गाण्याचा ‘कर्ता’ बदलून हे गाणं नवीन रुपात आलं ते असं – Good morning to you,
Good morning to you,
Good morning, dear teacher,
Good morning to you.

आता यातले मूळचे शब्द बदलून यात ‘Happy birthday to you’ हे शब्द कुणी घातले याबद्दल नक्की माहिती कळत नाही. पण ब्रॉडवे, रेडिओ सगळीकडं Mildred च्या धूनवरचं Happy birthday to you ऐकू येऊ लागलं. ही गोष्ट आहे साधारणतः १९३० च्या दशकातली. या वेळेपावेतो Mildred काही जिवंत नव्हती पण तिची सगळ्यात लहान बहीण Jessica जिवंत होती. तिने ही धून वापरण्याबद्दल आक्षेप घेऊन कोर्टात केस दाखल केली आणि ती जिंकली देखील. म्हणजे या धूनचं कॉपीराईट तिला मिळालं. वेळोवेळी त्याचं रिन्युअल होऊन आणि कॉपीराईट कायद्यातल्या बदलांमुळे आता २०३० पर्यंत या गाण्याचे अधिकार सुरक्षित राखले गेले आहेत. हे कॉपीराईट ट्रान्सफर होत होत सध्या Warner Music Group या कंपनीच्या अखत्यारीत आहेत आणि आधी म्हटल्याप्रमाणे दरसाल सुमारे २० लाख अमेरिकन डॉलर्स एवढी कॉपीराईट फी हे गाणं कंपनीला मिळवून देतं. ही रक्कम Hill foundation या संस्थेला मिळते आणि ती सामाजिक कामासाठी खर्च केली जाते.

आता ‘हे गाणं आपण म्हणतो तेंव्हा कॉपीराईटचा भंग होतो काय?’ या तुमच्या मनातल्या प्रश्नाचं एकदम कडक आणि कायदेशीर उत्तर –
Royalties are due, of course, for commercial uses of the song, such as playing or singing it for profit, using it in movies, television programs, and stage shows, or incorporating it into musical products such as watches and greeting cards; as well, royalties are due for public performance, defined by copyright law as performances which occur “at a place open to the public, or at any place where a substantial number of persons outside of a normal circle of a family and its social acquaintances is gathered.” So, singing “Happy Birthday to You” to family members and friends at home is fine, but performing a copyrighted work in a public setting such as a restaurant or a sports arena technically requires a license from ASCAP or the Harry Fox Agency.

तुम्ही हे पूर्ण वाचलं नसणारच हे माहीत आहे म्हणून सांगतो – तुम्हाला याचा एक रुपया सुद्धा भरायचा नाहीये. त्यामुळं पुढच्या वेळी आपल्या घरच्या मंडळींच्या/मित्रांच्या birthday celebration ला हे कोट्यावधी रुपयांचं गाणं मन आणि गळा दोन्हीही मोकळं सोडून गायला अजिबात हयगय करू नका !

यशोधन जोशी

ऐतिहासिक मूत्रविसर्जन

सन १९४१ दुसरे महायुद्ध ऐन भरात आले होते. जर्मनीने इंग्लंडवर जोरदार बॉम्बहल्ले चालवले होते. ब्रिटन मधील एका घराच्या छतातून एक जर्मन बॉम्ब आतमध्ये पडला. घरात घराचा मालक आणि ज्युलिआना नावाची त्याची ग्रेट डेन जातीची कुत्री दोघेच होते. आता बॉम्ब फुटणार तेव्हढ्यात ज्युलिआना उठली आणि तिने आपल्या मुताची धार त्या बॉम्बवर सोडून दिली. फुरफुरणारा बॉम्ब अर्थातच विझला आणि दोघांचे प्राण वाचले. ही बातमी पोहोचली ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे. ते सुद्धा ही बातमी ऐकून अचंबित झाले. त्यांनी ज्युलिआनाला मानाचे ब्लू क्रॉस पदक बहाल केले. याआधी ब्लू क्रॉस हे पहिल्या महायुध्दात चांगली कामगिरी करणार्‍या घोड्यांना देण्यात येत असे. ज्युलिआना ही पहिली कुत्री होती जिला ब्लू क्रॉस मिळाला.

पण ज्युलिआनाची धैर्याची कहाणी इथेच संपत नाही. १९४४ साली तिच्या मालकाच्या दुकानाला आग लागली असताना तिने आपल्या मालकाला भूंकून इशारे दिले. या बद्दलही तिला आणखी एक पदक मिळाले.

ब्रिस्टॉल येथील एका घराच्या झाडाझडतीत तिला मिळालेले दुसरे पदक आणि तिचे जलरंगात काढलेले चित्र मिळाले. चित्राच्या खालील भागात तिने विझवलेल्या बॉम्बची कथा तर पदकावर आग लागलेल्या दुकानाची हकिकत होती. ह्या गोष्टी लिलावात विकल्या गेल्या आणि लिलाव करणार्‍यांनी त्याची जाहिरात करताना ज्युलिआनाबद्दल ’A Great Dane with a great bladder’ असे वर्णन केले.

दुर्दैवाने १९४६ साली ज्युलिआना विषबाधेने मरण पावली.

पोलीसमामांची पहिली ‘कामगिरी’

एका ऐतिहासिक घटनेला नुकतीच १२५ वर्षं पूर्ण झाली. तशी ती घटना ऐतिहासिक असली तरी एकमेवाद्वितीय वगैरे नाही. कारण आपल्यापैकी ९९.९९% लोकांनी अशा घटनेचा अनुभव तर घेतलेला आहेच आणि वरून आपली अक्कलहुशारी वापरून ग्लास फोडल्याचे बारा आणे भरायच्याऐवजी आठ आण्यात भागवल्याचे किस्सेही इतरांना सांगितलेले आहेत. ती गोष्ट म्हणजे ट्रॅफिक पोलिसांनी आपल्याला पकडून फाडलेली पावती.  तर जगाच्या इतिहासात पहिली पावती फाटण्याच्या घटनेला २८ जानेवारी २०२२ ला १२५ वर्षं पूर्ण झाली. आणि हा सन्मान मिळवणारे मानाचे मानकरी आहेत Walter Arnold.

२८ जानेवारी १८९६ रोजी हे Walter Arnold साहेब ताशी ८ मैल (८×१.६ = १२ किमी/तास) अशा महाप्रचंड वेगाने इंग्लंडमधल्या Kent परगण्यातल्या Paddock wood नावाच्या शहरातल्या रस्त्यावरून आपली मोटार हाकत चाललेले होते. या रस्त्यावर मोटार चालवण्याचा कमाल वेग ताशी २ मैल इतकाच होता. Walter Arnold ला इतक्या वेगाने मोटार हाकताना पाहून तिथं कर्तव्य बजावणाऱ्या एका हवालदार साहेबांनी बघितलं आणि त्यांनी ताबडतोब यांवर कारवाई करण्याचा निश्चय केला. त्यांनी लागलीच आपल्या सायकलवर टांग टाकून त्याचा पाठलाग सुरू केला. हवालदार साहेबांनी कर्तव्यात मुळीच कसूर न करता Walter Arnold चा पाच मैल पाठलाग केला आणि अखेर त्याला गाठलं.

आणि Walter Arnold साहेबांवर खटला दाखल झाला. हा वेगळ्या प्रकारचा खटला निरनिराळ्या कलमांखाली एकूण ४ कोर्टात चालला आणि अखेर Walter Arnold यांना एकूण २ पौंड ११पेन्स इतका दंड ठोठावण्यात आला. या ऐतिहासिक घटनेला कारणीभूत ठरलेल्या Walter Arnold पेक्षाही मला कौतुक वाटलं ते त्या कर्तव्यकठोर हवालदार साहेबांचं. त्यांनी प्रकरण ‘मिटवून’ घेण्याचं कौशल्य न दाखवल्याने एका फार मोठ्या ऐतिहासिक घटनेची नोंद कागदोपत्री झाली.

Walter Arnold चालवत होता ती गाडी

Walter Arnold चालवत असलेली गाडी होती मर्सिडीज बेन्झ. Walter Arnold चा मोटारी विकण्याचा धंदा होता, तो जर्मनीतून मर्सिडीज गाड्या आणून इंग्लंडमध्ये विकत असे. पुढं त्यानं स्वतःची Arnold’s Motor Carriage नावाची स्वतःची कंपनी स्थापन केली. पण पुढच्या आयुष्यात Walter Arnold ला पुन्हा कधीही दंड भरायची वेळ आली नसावी कारण इंग्लंडमध्ये १८९६ च्या ऑगस्ट महिन्यात गाडी चालवण्याच्या वेगाची मर्यादा २ मैल प्रतितास वरून थेट ताशी १४ मैल करण्यात आली.

यशोधन जोशी

Blog at WordPress.com.

Up ↑