एक भाग्यवंत झाड सफरचंदाचे

गोविंन्दाग्रजांच्या कवितेतले एक कडवे आठवा

“काही गोड फुले सदा विहरती स्वगागनांच्या शिरी,
काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी ;
काही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि ते ;
एकादें फुटके नशीब म्हणुन प्रेतास शृंगारिते !”

‘फुटक्या नशीबा’ ऐवजी नेमके उलटे भाग्य एखाद्या वृक्षाच्या ‘नशिबी’ येते. गयेमधला बोधिवृक्ष आणि न्यूटनच्या माहेरचे सफरचंदाचे झाड हे त्याचे नमुने.

१६६५ साली प्लेगची मोठी साथ आली. म्हणून केंब्रिजमध्ये नुकताच ‘स्नातक’ झालेला आयझॅक न्यूटन आपल्या वारसघरी परतला. हे घर होते लिंकनशायर मधल्या वूलसथॉर्प येथे. तरूण न्यूटन अनेक समस्यांची उकल करण्यात रमलेला, बव्हंशी एकलकोंडा जीव होता. गणित, ग्रहगोलशास्त्र (अॅस्ट्रॉनोमी) हे त्याचा मेंदू व्यापून राहिलेले विषय होते.

रुढ प्रचलित कथा सांगते अशाच एका वेळी घराच्या बागेत सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटन विचारमग्न बसला होता. तेव्हा एक सफरचंद झाडावरुन गळून सरळ रेषेत खाली पडले. ग्रहगोल असे एकमेकांवर का आदळत नाहीत? पृथ्वीतलावर मात्र कोणतीही वस्तू थेट झपाटत (प्रतिसेकंद ३२ फूट वेग वाढत) खाली पडते….. असे का? या प्रश्नाला या पडत्या सफरचंद फळाची पुन्हा आज्ञा झाली.

यासारखी अनेक कोडी एकाच सपाट्यात सोडविणारा ग्रंथ नंतर वीस वर्षांनी म्हणजे १६८७ साली अवतरला पण त्याचे ‘बीज’ म्हणे या पडत्या फळाच्या आज्ञेतले! अशी ही आख्यायिका.

त्यानंतर न्यूटन इतका मोठा गणिती आणि वैज्ञानिक ठरला आणि त्याच्या प्रयोगशाळा, टिपणे, हत्यारे या बरोबरीने या वूलसथॉर्पमधील एका सफरचंदाच्या झाडाला पण ऐतिहासिक वारसवस्तूचा बहुमान मिळाला. आर.जी. किसींग या भौतिक शास्त्रज्ञाने या झाडाचा मागोवा घेत पुरेसा पिच्छा काढला आणि त्याच्या इतिहासावर उपलब्ध पुराव्यांवर त्याच्या अन्यत्र लाविलेल्या भाईबंद रोपटी, झाडे यांच्या जनुकी छाननीवर अवघे पुस्तक लिहून ठेवले आहे. न्यूटनची भाची ते व्हॉलतेर पर्यंत सगळ्यांची साक्ष, नोंद घेत त्याने सदर इतिहास लिहीला आहे.

आदरापोटी व्यक्तिला ईश्वरी दर्जाची श्रध्दा लाभते. विज्ञानामध्ये न्यूटनचे असे झाले. जगभरच्या भौतिक विज्ञानवंतांना ह्या झाडाचे रोपटे आपल्या संस्थांमध्ये वृक्ष म्हणून नांदवावे असे वाटले. न्यूटनच्या बहुमानार्थ त्याच्या डहाळ्या अलग नेल्या गेल्या. हे मुळ झाड १६५० च्या सुमारास लावले गेले. १८१६ च्या वादळात ते पडले. पण त्याला आपसूक फुटवे पण आले. उरल्या पडक्या झाडाच्या ‘न्यूटनस्मृती खुर्च्या’ ‘न्यूटनस्मृती ओंडके’ झाले आणि थोरांघरी वा संग्रहालयात मिरवू लागले. त्याचीच एक रोपडहाळी नजीकच्या बेल्टन पार्कमध्ये लावली गेली. १९३० मध्ये फ्रुट रिसर्च स्टेशनने त्या झाडाच्या डहाळ्या नेल्या तेव्हापासून जगभरच्या विश्वविद्यालयात संशोधन संस्थांमध्ये त्याचा प्रचार झाला. जणू प्रत्येकाला आपल्या प्रांगणात न्यूटनचा सोबती फोफावलेला पाहीजे होता.

याचा आपला स्वदेशी नमुना म्हणजे पुण्यातील ‘आयुका’ १९९४ साली त्यावेळचे संचालक जयंत नारळीकरांना वुलस्थॉर्प मधल्या ‘मातृ’ वृक्षाचे रोपटे मिळाले. प्रोस्टानी पौष्टिक दिरंगाई, पुण्याची उष्म हवा इत्यादी अडथळे निरंतर चालू राहिले. परिणामी रोप वाढायचे पण मान टाकायचे. अखेरीस १९९७ साली दोन रोपे लावली. सावली धरणारे हिरवट आडोसे केले. सर्वांच्या शर्तीने विशेषकरुन डॉ. भापकरांच्या प्रयत्नाला एक छोटे फळ आले ते मी डॉ. भापकरांबरोबर स्वत: पाहिले होते.

जुन्या बायबलमध्ये ‘अदाम आणि हव्वा’ यांनी खाल्लेले फळ म्हणे सफरचंद होते अशी श्रध्दा वा धारणा आहे. (हे फळ बहुदा प्राचीन नारिंग असण्याचा संभव अधिक आहे) पण मनुष्यजातीच्या निर्मितीप्रमाणे भौतिक विज्ञानालाही मुळ कारण ठरलेले हे विशेष म्हणजे अती प्राचीन वस्तूंच्या नकली प्रतिकृती करणे हा एक मोठा गब्बर चोरधंदा आहे. न्यूटनच्या वृक्ष यास अपवाद नाही. २०१६ साली कॅनडाच्या नॅशनल रिसर्च सेंटरला असे कळून चुकले (खरेतर चुकले ते कळले) की आपल्या परसातला न्यूटन सफरचंद वृक्ष हा मुळचा नाही फार काय तो मूळ ‘ फ्लॉवर ऑफ केंट’ या प्रकारचा सुध्दा नाही !

लॉर्ड ऑफ मिंट झाल्यावर न्यूटनने आपली तीक्ष्ण बुध्दी बनावट नाणी पारखण्याकरता खर्ची घातली होती. आता बनावट न्यूटन वृक्ष पारखण्याचे दिवस आहेत.

डॉ. प्रदिप आपटे

शिकार ते शेती

पृथ्वीवरील भौतिक परिसराने पराकोटीचे बदल अनुभवले आहेत. ‘अन्न’ या वस्तूचा प्राथमिक स्रोत या भौतिक पर्यावरणामध्येच असतो. वनस्पती आणि प्राणिजीवनाची शक्याशक्यता या भौतिक पर्यावरणाने ठरते. सध्या ‘जागतिक तापमान’ वाढत असल्याची मोठी भयग्रस्त चर्चा चालु आहे. आजवरच्या भूवैज्ञानिक पुराव्यांनुसार पृथ्वीवरील वातावरण तापणे, ते थंडावणे, असे हेलकावे अनेकदा घडले आहेत. जेव्हा मनुष्यप्राणी फार मोठी कर्ब उलाढाल करत नव्हता, तेव्हासुध्दा घडले आहेत. या हेलकाव्यांमुळे जीवसृष्टीची ठेवण बदलते, कधी कधी अतोनात पालटते. दाट ते तुरळक जंगलांच्या जागी वाळवंटी कळा येते. नद्यांचे प्रवाह बदलतात. काही नद्याच सुकून नाहीशी होतात. अशा उत्पातांबरोबरीने अन्नाची व्याख्या पार  पालटते.

मनुष्यजातीची वाटचाल इतर जीवसृष्टीप्रमाणेच या बदलांच्या चाळणीतून झालेली आहे. मानवसदृश माकडापासून उपजलेले स्थित्यंतर बदलत बदलत मनुष्यशाखा उपजली; पण इतर माकडांपेक्षा त्याचा जबडा, दातांची ठेवण आणि मेंदू यात लक्षणीय बदल झाले. हे बदल अन्नसंकल्पनेशी निगडित आहेत.

Stages in human evolution

अधिक जाडसर दंतकवच, पसरट दाढांमुळे अनेक प्रकारच्या वस्तू ‘खाद्य’ होऊ शकल्या. ‘वनस्पती’ व ‘प्राणी’ या दोन्हींचे ग्रहण त्यामध्ये चालू राहिले. वाघसिंहादी मार्जार किंवा लांडगा-कुत्रावर्गीय मांसाहार प्राण्यांचे दात वनस्पतिभक्षणाला लायक नव्हते, तर अन्य माकडवर्गीयांनी मांसाहार प्रतिकूल होता. परिणामी, विशिष्ट पर्यावरणाखेरीज त्यांना जगणे मुश्किल होते. माणसाच्या सर्वभक्षीपणामुळे परिस्थितीनुसार तगणे, नव्या परिसरात स्थलांतरीत होऊन तगणे सुकर बनले.

मनुष्यप्राण्यांना कोणकोणत्या रुपाने अन्न गवसत गेले आणि भेडसावत राहिले, या प्रश्नाचे उत्तर फार गुंतागुंतीचे आहे. माणसाची ‘उपजत’ बुध्दी किती, अनुभवातून अंगीकारलेली अशी ‘अनुकूल’ बुध्दी किती, माणसाचा मेंदू कसा विकसित झाला, याचा ‘अन्न‘ या जाणिवेशीही संबंध आहे.

सुमारे २५ हजार वर्षांपूर्वी पृथ्वीचा खूपसा भाग हिमाने झाकलेला होता. भूभागांवर हिमाचे ताव पसरले होते. समुद्राची क्षेत्रेही गोठलेली होती. जशी या हिमतावांची वितळण होत पीछेहाट सुरु झाली तसे वनस्पती व प्राणिजीवन निराळ्या जोमाने व वैशिष्ट्यांनी फुलू लागले. या अखेरच्या मोठ्या हिमयुगाला ‘वुर्म’ म्हणतात. युरोपातले हवामान अधिक उबदार होऊ लागले. बर्फ हटल्याने मोकळ्या झालेल्या जमिनीवर प्राणी, मनुष्य व वनस्पतींचे वैपुल्य वाढू लागले. बर्फ वितळून या अखेरच्या समुद्राची पातळी उंचावू लागली. भारतीय भूभागांवर होणार्‍या पावसात वाढ होऊ लागली. त्यानंतरच्या सुमारे १३००० ते ६००० पुर्वीच्या काळाला ‘मध्याश्मयुग’ म्हणतात. हा पूर्वीच्या तुलनेत सुबत्तेचा काळ. कंद आणि फळे या स्वरुपामुळे अन्न मुबलक झाले. मानवी लोकसंख्यादेखील बळावली. तरीही आजच्या अर्थाने शेती सार्वत्रिक नव्हती. अन्नपैदास केली जात नसे. अन्न मुख्यत: शोधून गोळा केले जाई. हत्यारे फार प्रगत नव्हती. शिकार मोठ्या कष्टाची असे. मोठ्या प्राण्यांची शिकार मर्यादित संख्येमुळे आणि जिकिरीमुळे कमी असे. मांस साठविणेही शक्य नसे. त्यापेक्षा पाणवठा, गवताळ भागातील छोट्या पण संख्येने विपुल असणार्‍या प्राणी व पक्ष्यांची शिकार सुलभ असे. या काळातल्या दगडी हत्यारांची ठेवणही त्यामुळे अशा शिकार्‍यांना अधिक साजेशी आढळते. प्राण्याची शिकार आणि वनस्पतीजन्य अन्न गोळा करणे, याचे प्रमाण सुमारे एकास चार इतके असावे, असा कयास आहे. आधुनिक आर्थिक भाषेत सांगायचे, तर शिकारीमधून मिळणार्‍या मांसातून जास्त उष्मांक मिळायचे, पण जास्त खर्चीही पडायचे. म्हणून फक्त उष्मांक बेताचेच लाभायचे. त्यापेक्षा अन्न गोळा करण्यासाठीची यातायात अधिक सुकर. या खटाटोपातूनच दोन विशेष बाबी उद्‌भवल्या. एक म्हणजे ‘शिकारीसाठीचे मित्र प्राणी’ आणि ‘पाळीव प्राणी’ ही नवी संस्कृती व संस्था वाढीला लागली. दुसरे म्हणजे वनस्पतिचक्राची अधिक डोळस जाण येऊ लागली.

foto_paleolitico

या दोन्ही बाबी माणसाच्या समाजाचे व भौगोलिक स्थित्यंतराचे स्वरुप ठरवू लागल्या. परंतु जवळपसा सर्व संस्कृतींमध्ये व समाजांत माणसाचे ‘सर्वभक्षी’ पण (शाकाहार व मांसाहार) शाबूत दिसते. निव्वळ वनस्पतिजन्यं पदार्थांवर उपजीविका करण्याची कुवत पुरेशी आलीच नव्हती. जेव्हा ‘शेती’ ची कल्पना रुजली आणि फोफावली तेव्हाच या शक्यतेचा उदय झाला असावा. बहुतेक सर्व समाजव्यवस्थांमध्ये शेतीचा आरंभ स्त्रियांकडून झाला असावा, असेच सूचित करणारे पुरावे आढळतात. हे फार मोठे आर्थिक स्थित्यंतर आणि सर्वांत लक्षणीय ‘श्रमविभागणी’ चे उदाहरण ठरले आहे. शेती म्हणजे ‘नैसर्गिक’ अशी आपली ढोबळ धारणा असते. ही बव्हंशी विपरीत समजूत आहे. शेती ही मनुष्यमात्राने केलेली सर्वात क्रांतिकारक शस्त्रक्रिया. तिला कृत्रिम म्हणावे की नैसर्गिक? मनुष्य हा निसर्गाचाच एक भाग आहे. त्या अर्थाने ती नैसर्गिकच. आपल्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार आसपासचे भौतिक जग मुरडून घेण्याची मोठी ताकद प्रथम शेतीतून व्यक्त झाली. मनुष्य आधी अन्न ‘निवडून’ घेत असे. शेतीमुळे तो अन्नेतर बाबी निवडून काढून टाकू लागला. अन्न देणार्‍या वनस्पतींचा अन्नेतर वनस्पतींपासून बचाव करु लागला. वनस्पती लागवडीपासून वाढीपर्यंत हुकमत आल्यामुळे उत्पादन स्थिरावले. वरकड पैदा झाला. मनुष्यजीवन भौगोलिकदृष्ट्यादेखील स्थिरावले. ‘शिकार’, ‘पाळीव प्राणी’ आधारित जीवनक्रमी सावलीसारखा चालूच होता; पण तोही वाढत्या जाणिवेमुळे, ज्ञानामुळे हळूहळू उंचावू लागला.

neolithic-farmers

हे स्थित्यंतरदेखील सर्वत्र एकसमान नव्हते. त्याची गती, प्रगती आणि गुणवत्ता फार भिन्न आणि आणि गुंतागुंतीची आढळते. हे कसे घडले हे समजावून घ्यायला भूविज्ञान, पुराविज्ञान, वातावरणविज्ञान, पर्यावरणविज्ञान अशी अनेक भिंगे वापरावी लागतात, तरच आहे त्या तुटपुंज्या साधनांतून हा इतिहास उलगडतो. जगभरच्या प्रदेशातील विभिन्नता काही अंशी तरी वनस्पतीची नैसर्गिक विखरण कशी झाली, यावरच अवलंबून होती. म्हणूनच पूर्वापार काही भाग म्हणजे वनस्पतिजन्य अन्न, असे ठाम असे तयार होऊ लागले. काही वनस्पतींचे वेचक प्राबल्य फार झपाट्याने वाढले त्याचे सुस्पष्ट दाखले हरतर्‍हेने मिळतात.

डॉ. प्रदिप आपटे

हरवलेल्या आवाजांच्या शोधात

मानवाच्या उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधे त्याने वेगवेगळे शोध लावले. त्यातला एक महत्वाचा शोध म्हणजे भाषा. त्याने संवादासाठी भाषेचा शोध लावला. पण त्या आधीपासून तो निसर्गातील अनेक आवाज ऐकत होताच. कधीतरी त्याने त्या आवाजांची नक्कल करण्याचा प्रयत्नही केला असेल. पण एकंदरीत त्याचे आयुष्य खडतरच होते. पण पुढे जेव्हा त्याच्या जीवनात स्थिरता आली तेव्हा त्याने मनोरंजनासाठी नाचगाण्याचा व त्याबरोबर साथीला संगीताचा आधार घेतला असावा. दोन वस्तू एकमेकांवर आदळल्यावर येणारा आवाज हेच त्याचे पहिले संगीत असावे. मग या वस्तू एकमेकांवर आदळताना एक विशिष्ठ ठेका धरुन त्यावर नाचगाणे चालत असावे. या सुरुवातीच्या काळात संगीताची साधने म्हणजे हाडे, बांबू, वेगवेगळे दगड अशा गोष्टींचा वापर केला गेलेला असावा. या नाचगाण्यांचा पहिला भौतिक पुरावा आपल्याला मिळतो तो हजारो वर्षांपूर्वी काढलेल्या गुंफाचित्रांमधे. भीमबेटका येथील भित्तीचित्रांमधे नाचगाण्यात मश्गुल असलेली अनेक चित्रे आहेत. मनोरंजनाबरोबरच काही धार्मिक समारंभातही संगीताचा उपयोग केला जात असावा.

हे ’नमनालाच घडाभर तेल’ कशाला? तर आजचा धांडोळा आहे अशाच अनवट वाद्यांबद्दल. आपण वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकत असतो. ऐकताना त्या गाण्याच्या शब्दांकडे किंवा त्या गाण्यात वाजवलेल्या वाद्यांकडे आपण लक्ष देतो. पण अनेक गाण्यांमधे एखादा विशिष्ठ ठेका देण्यासाठी काही वाद्ये वापरली जातात. या वाद्यांचा आवाज मुख्य वाद्यांच्या आवाजात हरवून जातो.  तबला, ढोलक, ड्र्म अशा percussion  म्हणजे ठेका देणार्‍या वाद्यांबरोबरच आणखीही काही ठेका देणारी वाद्ये वाजवली जातात. मात्र त्या वाद्यांचा ठेका जाणवाला तरी आपल्याला त्या वाद्यांबद्दल फारसे माहित नसते. या वाद्यांनी अनेक गाण्यांमधे रंगत भरली आहे.

guiro-2-2447077

गुइरो (Güiro) नावाचे एक लॅटिन अमेरिकन वाद्य आहे. हे वाद्य percussion  म्हणून वापरले जाते. भोपळ्यापासून हे वाद्य बनवलेले असते. भोपळा वाळवून त्याला पोकळ केले जाते. या वाळवलेल्या भोपळ्यावर अनेक दंतुर खाचा केलेल्या असतात. या खाचांवर एका काठीने घासून विशिष्ठ आवाज काढला जातो. हे वाद्य लॅटिन अमेरिकेत दक्षिण अमेरिकेतून किंवा अफ्रिकेतून आले असावे. मेक्सिको येथील अ‍ॅझटेक संस्कृतीत हाडांवर खाचा केलेले असेच एक वाद्य वापरात होते. कॅरेबियन बेटांवरही मोठ्या भोपळ्यापासून किंवा जनावराच्या हाडांपासून बनवलेले असे एक वाद्य वाजवले जात असे. या वाद्यात अनेक प्रयोग केले गेले. भोपळ्याऐवजी धातूपासून बनवलेल्या गुइरो मधून एक वेगळाच ध्वनी निघतो. याच बरोबर यावर घासण्यासाठी एका काठीऐवजी अनेक छोट्या काड्यांनी  आणि कंगव्यासारखी दिसणारी  गुइरो पिक (Güiro Pick) वापरली जाते.

fa1167
गुइरो पिकने गुइरो वाजवणारा वादक

आपल्या हिंदी चित्रपट संगीतामधे अनेक संगीतकारांनी या वाद्याची भारतीय आवृत्ती ’रेसो रेसो’ हे वाद्य वापरलेले आहे. अनेक संगीतकारांनी आपल्या गाण्यांमधे हे वाद्य वापरले असले तरी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला तो ओ. पी नय्यर, एस डी बर्मन आणि आर डी बर्मन यांनी. पडोसन चित्रपटातल्या ’मेरे सामनेवाले खिडकी मे’ या गाण्याच्या सुरुवातीला हे वाद्य वापरलं गेलं आहे. या वाद्याचा उपयोग केलेलं आणखी एक गाणं म्हणजे दो फुल मधलं ’मुथुकोडी कव्वाडी हडा’. या गाण्यांमधे prominently ऐकू येणारे हे वाद्य इतर अनेक गाण्यांमधे backgroundला ऐकू येतं. अभिमान चित्रपटातील ’रे मित ना मिला रे’ या गाण्याच्या सुरुवातीला हे वाद्य वाजवताना दाखवले आहे.  रेसो रेसो बनवण्यासाठी प्लॅस्टिक, फायबर आणि धातूंचा उपयोग करण्यात येतो.
(भांग पाडायच्या कंगव्यावर एखाद्या पट्टीने घासूनही असा आवाज मिळतो. बघा प्रयत्न करुन)

https://www.youtube.com/watch?v=bSItOIS0k5w
https://www.youtube.com/watch?v=MHPdtBwfaco

3067कबासा हे आणखी एक वाद्य percussion मध्ये वापरले जाते. या वाद्याचे मूळ अफ्रिकेमधे सापडते. हे अफ्रिकन कबासा भोपळ्यापासून बनवलेले असते. या अंडाकृती पोकळ भोपळ्यावर तारांमधे अडकवलेल्या मण्यांच्या माळा असतात. हे वाद्य खुळखुळ्याप्रमाणे दिसते. त्याला हातात धरण्यासाठी एक लाकडी हॅण्डल असते. एका हातात हे हॅण्डल धरुन दुसऱ्या हाताने या मण्यांचा त्या पोकळ भोपळ्यावर आघात करुन विशिष्ठ आवाज काढला जातो. आघात करतानाच हॅण्डलने आतला भोपळा फिरवून वेगवेगळ्या प्रकारचे तालबध्द आवाज काढले जातात. मार्टिन कोहेन या लॅटिन तालवाद्यांच्या तज्ञाने धातूपासून कबासा बनवले. या कबासाने एक वेगळाच मेटॅलीक आवाज मिळतो.

कबासा हे वाद्य अनेक हिंदी गाण्यामधे आजही वापरले जाते. आप की कसम या चित्रपटातलं ’जिंदगी के सफर मे’ या गाण्यात बॅकग्राउंडला कबासा वाजताना ऐकू येते. आराधना मधल्या ’मेरे सपनो की रानी’ मध्येही कबासा वापरलेलं आहे. तिसरी मंझिल मधल्या ’ओ मेरे सोना रे’ मधेही कबासा सापडते.

आणखी एक वाद्य आहे ते स्पॅनिश कॅस्टॅनेटस. हे वाद्य प्राचीन काळापासून युरोपमधे वाजवले जात असे. चेस्टनट्च्या लाकडाचे कपसारख्या आकाराचे दोन ठोकळे एकमेकांना दोरीने बांधलेले असतात. हे वाद्य हातात धरुन हे दोन ठोकळे बोटांच्या विशिष्ठ हालचालींनी एकमेकांवर आदळून त्यातून ध्वनी निर्माण केला जातो. या दोन हातातील जोडींच्या आवाजाचे pitch थोडे वेगळे असतात. कमी pitch असलेल्या ठोकळ्यांना माचो (male) असे म्हणले जाते व ते डाव्या हातात धरले जातात. जास्त pitch असलेल्या ठोकळ्यांना हेम्ब्रा (female) असे म्हणले जाते व ते उजव्या हातात धरले जातात (स्त्रियांच्या आवाजाचा pitch जास्त असतो का?) . या वाद्याचा आवाज ऐकायला जितका चांगला असतो तेवढेच हे वाद्य वाजवताना पहायलाही मजा येते. प्राचीन काळी ग्रीस आणि इजिप्तमधे लहान हाडे एकमेकांवर आदळून वाजवली जात. युरोपात इतर ठिकाणी अस्तंगत झालेले हे वाद्य स्पेनने मात्र सांभाळले. १७ व्या शतकातील सापडलेल्या एका चित्रामधे कोसेक जमातीतील काही स्त्रिया हातात लाकडी ठोकळे घेऊन वाजवताना दाखवल्या आहेत.

हिन्दी चित्रपट संगीतात कॅस्टॅनेटसचा वापर केला गेला आहे. जुन्या चित्रपटांमधे क्लब मधे गाणं गाताना हातात कॅस्टॅनेटस घेतलेली गायिका दाखवलेली असते. मिलाप नावाच्या चित्रपाटातील ’हमसे भी कर लो कभी कभी’ या गाण्यात गीता बाली हातात कॅस्टॅनेटस घेऊन वाजवताना दाखवलेली आहे. तसेच ये रात फिर ना आयेगी या चित्रपटातल्या ’हुजुरेवाला’ या गाण्यातही हेलन कॅस्टॅनेटस वाजवताना दाखवली आहे. छोटे नबाब या चित्रपटातील ’मतवाली ऑंखोंवाले’ या गाण्यातही कॅस्टॅनेटस वाजवताना दाखवलेले आहे.

https://www.youtube.com/watch?v=oyJ5IT-Pjpk

चायनीज वुडन ब्लॉक्स नावाचे एक लाकडी वाद्य आहे. त्याचा आवाज बराचसा कॅस्टॅनेटस सारखाच असतो. त्यामुळे कधी कधी गाण्यात कॅस्टॅनेटस वाजवलय का चायनीज ब्लॉक्स वाजवलय ते कळत नाही. ओ. पी. नय्यर यांच्या गाण्यामधे चायनीज ब्लॉक्सचा वापर बराच केला गेला आहे.

1024px-Dos_bloques

या वाद्यांमुळे गाण्यांमधे एक वेगळीच मजा येते. आता शोधा तुम्हाला कुठल्या गाण्यांमधे ही वाद्ये वाजवलेली सापडतात आणि आम्हालाही कळवा.

कौस्तुभ मुद्‌गल

(टिप : धांडोळ्यावरील लेख छापील पुस्तक स्वरुपात वाचायला तुम्हाला आवडेल का? कृपया comment मधे तुमच्या प्रतिक्रीया द्या.)

कुत्र्याचा लळा लागला त्याची गोष्ट

काही दिवसांपूर्वी Eight below नावाचा एक सुंदर चित्रपट बघण्यात आला,त्या चित्रपटातील माणूस आणि कुत्र्यांचे एकमेकांशी निर्माण झालेले नाते पाहून कुत्रा पाळण्याची माझी इतके दिवस दबून राहीलेली माझी उर्मी पुन्हा एकवार उफाळून आली.त्याचवेळी डोक्यात चक्र सुरु झाले कि माणूस आणि कुत्रा हे कधीपासून एकत्र आले असतील आणि कुत्रा तर लांडग्याच्याच कुळातला प्राणी मग माणसाने त्याला कसे माणसाळवले असेल? मग माझ्या अनुजा बोस नावाच्या archaeologist मैत्रिणीशी या विषयावर चर्चा केली. तिने या विषयावरची बरीच माहिती पुरवली आणि माझा उत्साह वाढीला लागून मी या विषयावरची अधिक माहिती गोळा करायला सुरुवात केली.

माणसाळलेल्या कुत्र्याचे सर्वात जुने अवशेष बेल्जियममधील Goyet गुहेत सापडले आहेत, या गुहेत सापडलेली कुत्र्याची कवटी साधारणता २६००० ते ३६००० हजार वर्षे जुनी आहे. पूर्व पुराश्मयुगातील (Upper Paleolithic period) युरोपमधील Aurignacian मानवाने हा कुत्रा पाळला असावा. मानवाने त्याआधी कधीतरी लांडग्याची (Canis lupus) शिकार करून त्याची पिल्ले पाळली असावीत आणि काही पिढयांनंतर त्यातूनच आजचे कुत्रे (Canis lupus familaris) निर्माण झाले असावेत असा काही संशोधकांचा अंदाज आहे अर्थातच त्याला छेद देणारे सिद्धांतही मांडले गेलेले आहेत.

पाळीव कुत्र्यांच्या अस्तित्वाचा अजून एक पुरावा मिळतो तो फ्रान्समधील Chauvet गुहेत. या गुहेत आदिमानवाने चितारलेली अत्यंत सुरेख चित्रे आहेत त्याशिवाय या गुहेत साधारणत: ८ वर्षाचा मुलगा आणि त्याच्यासोबत चालणारा कुत्रा यांच्या पायाचे ठसे सापडले आहेत. हे ठसे सुमारे २६००० वर्षापूर्वीचे आहेत.

Human-and-canine-prints
भारतीय उपखंडातील कुत्र्यांचा विचार केला असता हे कुत्रे येथेच उपजले असून सुमारे १५००० वर्षांपासून ते भारतीय उपखंडात वास्तव्य करत आहेत,जगातील सर्वात जुन्या कुत्र्यात भारतीय कुत्र्यांचा समावेश होतो.ऑस्ट्रेलियात आढळणारे Dingo (Canis lupus dingo) हा सुद्धा साधारणपणे भारतीय कुत्र्यांसारखाच आहे.भारतातील कुत्र्यांचा सर्वात पहिला पुरावा मध्याश्मयुगातील (Mesolothic period) भीमबेटका गुहात काढल्या गेलेल्या चित्रात आढळतो. सुमारे १०,००० वर्षांपूर्वी काढल्या गेलेल्या या चित्रात एक कुत्रा माणसाच्या मागोमाग चालताना दिसतो. त्याच्या गळ्यात बांधलेली दोरी माणसाच्या हातात आहे यावरून तो कुत्रा पाळीव आहे हे निश्चित.काश्मीरमधील बुर्झोम येथील उत्खननात माणसाबरोबर दफन केलेले पाच कुत्रे आढळले आहेत यावरून ३००० वर्षांपूर्वी कुत्रा हा मानवाच्या जीवनातील अविभाज्य भाग बनल्याचे दिसून येते.
7192ac30
भीमबेटकामधील कुत्र्याचे चित्र
Dogs1
बुर्झोममधील शिलाचित्र
71926c9f
बुर्झोम येथील दफन केलेला कुत्रा
ताम्रपाषाण युगात (Chalcolithic age) म्हणजेच सिंधू संस्कृतीतील महत्वाच्या स्थळांपैकी लोथल,मोहन्जोदारो व हडप्पा या ठिकाणी झालेल्या उत्खननात काही मातीच्या (Terracota) खापरांवर कुत्र्याचे चित्रण केलेले आढळले आहे. हा कुत्रा गळ्यात दोरी बांधून एका खांबाला बांधलेला आहे यावरून राखण करण्यासाठी किंवा संरक्षणासाठी कुत्र्यांचा वापर केला जात असावा. तोंडात ससा पकडलेल्या कुत्र्याचे मातीचे (Terracota) एक खेळणेही हडप्पा येथे सापडले आहे यावरून कुत्र्यांचा शिकारीसाठीही उपयोग केला जात असावा असा अंदाज बांधता येतो. याशिवाय गेंड्याचे शरीर व कुत्र्याचे तोंड असलेल्या काही मातीच्या मूर्ती आढळल्या आहेत यावरून त्यांचा काही धार्मिक कार्यासाठी/विधीसाठी वापर होत असेल का अशीही शंका मनात येते. हरियाणा येथील राखीगढी येथे उत्खननात एक छोटीशी कुत्र्याची मूर्ती सापडली आहे तिच्या गळ्यात पट्टाही दिसतो यावरून सिंधू संस्कृतीत कुत्रा हा पूर्णता पाळीव झालेला होता असा अंदाज बांधता येतो.

 

 सिंधू संस्कृती इतकाच पुरातन असा एक पुरावा महाराष्ट्रातही आढळला आहे,१९७४ साली नगर जिल्ह्यात दायमाबाद येथे तांब्यांच्या वस्तूंचा एक संच (Copper hoard) उत्खननात सापडला.यात चाके असणारे हत्ती,म्हैस व गेंडा हे प्राणी असून दोन बैलासोबत असणारी एक बैलगाडीही सापडली आहे. यातील बैलगाडीवर गाडीवानासोबत एक कुत्राही उभा आहे. यावरून त्याकाळात मानवासोबतचे त्याचे नाते अगदी घट्ट झालेले दिसते.
daimabad2
इतिहासपूर्व काळातील कुत्रा आणि मानवाच्या संबंधांचा आढावा घेतल्यानंतर आता आपण भारतीय कला,साहित्य आणि संस्कृतीमध्ये कुत्रा कुठे कुठे दिसतो याचा आढावा घेऊया.
ऋग्वेदातील १० व्या मंडलात इंद्राला मदत करण्यासाठी ‘पणि’ म्हणजेच असुरांनी चोरून नेलेल्या गाईंचा माग काढण्यासाठी गेलेल्या देवांची कुत्री ‘सरमा’ हिची कथा आहे. पृथ्वीवरील कुत्रे हे या सरमाचे वंशज म्हणून त्यांना ‘सारमेय’ असे संस्कृतमध्ये संबोधले जाते.
बौद्ध साहित्य म्हणजे जातक कथा यात बुद्धाच्या म्हणजेच बोधीसत्वाच्या अनेक कथा येतात. जातक कथात वेळोवेळी कथांची भर पडत गेली.यातीलच एक कथा आहे “कुक्कुर जातक”.यामध्ये बोधिसत्व हा कुत्र्याच्या रुपात जन्म घेऊन वाराणसीच्या राजाला उपदेश करतो असा कथाभाग येतो.ही कथा अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजेच इसपू ५ व्या शतकाच्या आसपास रचली गेली असावी असा अंदाज आहे. या कथेत राजाने आपल्या राजवाड्यात कुत्रे पाळलेले होते असाही संदर्भ येतो.
Dogs6
पाणिनीच्या अष्टाधायी या इसपू ४थ्या शतकातल्या ग्रंथात पाणिनी पाळीव कुत्र्यांचा उल्लेख ‘श्वा’ असा करतो आणि राजाने पाळलेल्या/पैदास करवलेल्या कुत्र्यांना ‘कौलेयक’ असे संबोधतो. ‘श्वा-गणिक’ म्हणजे पाळीव शिकारी कुत्र्यांची टोळी (Pack of hounds) असाही उल्लेख पाणिनीने केलेला आहे.
इसपू ३ऱ्या शतकात कौटिल्याने लिहिलेल्या अर्थशास्त्र या ग्रंथात त्याने राजाने सरकारी कुरणे म्हणजेच जिथे जनावरे चरायला सोडली जातात तिथे हिंस्त्र प्राणी येऊन त्यांनी या पाळीव जनावरांना इजा पोहोचवू नये म्हणून ‘स्व-गणिन’ म्हणजे शिकारी कुत्रे (Pack of hounds) पाळून पाळीव प्राण्यांचे रक्षण करावे असा उपदेश केलेला आहे.
सांचीच्या स्तूपाच्या तोरणावर काही बौद्ध कथा आणि जातके कोरली आहेत.यातील एका कथेत सर्व प्राणी बोधीवृक्षाकडे भक्तिभावाने पाहत आहेत असे एक शिल्प आहे त्यात दोन कुत्रेही दर्शवले आहेत. हे दर्शवताना त्यांचे तोंड कुत्र्याचे व शरीर सिंहाचे असे दर्शवले आहे. या शिल्पाचा काळ संशोधकांनी इसपू २ रे शतक असा निश्चित केलेला आहे.
Dog at Bahrut
इसपू २ ऱ्या/ १ ल्या शतकात म्हणजेच मौर्य किंवा शुंग काळातील एक मृण्मुद्रा (Terracota plaque)  पश्चिम बंगालमध्ये चन्द्रकेतूगड येथे सापडली आहे. यावर एका उंच आसनावर बसलेले दंपती दाखवले असून त्यांच्या पायाशी एक लहान मुलगाही दिसतो. हा लहान मुलगा गळ्यात दोरी बांधलेल्या एका कुत्र्याशी खेळताना दिसतो. शिवाय तिथेच बदकासारखा दिसणारा पक्षीही दिसतो. यावरून कुत्रा ज्याच्याशी लहान मुलांनीही खेळावे असा पूर्णतः पाळीव झालेला दिसतो. याशिवाय पाळीव पक्ष्यांची शिकार करायची नाही हे शिक्षणही त्याला मिळालेले दिसते.
436e729069b3988baba6bec4271618ac.jpg
अजिंठा येथील जगप्रसिद्ध बौद्ध गुहातील चित्रात तत्कालीन समाजजीवनाचे चित्रण दिसून येते. गुहा क्र. १७ मध्ये  सुतसोम जातक ही कथा चित्रित करण्यात आलेली आहे. वाराणसीचा राजा सुदास हा वनात शिकारीसाठी जाताना दिसतो. यावेळी त्याच्या बरोबर अनेक लोक तसेच हत्ती घोडेही दिसतात. पण याचबरोबर काही सेवक शिकारी कुत्र्यांना (Hounds) बांधलेल्या दोऱ्या खेचून त्यांना आवरताना दिसतात. बारकाईने निरीक्षण केले असता यातील कुत्रे वेगवेगळ्या जातींचे आहेत हे सुद्धा दिसून येते. हे चित्र वाकाटकांचा मांडलिक असणाऱ्या उपेन्द्र्गुप्त याने दान केलेल्या गुहेतील आहे व याचा निर्मितीचा काळ इस ५ वे शतक आहे.
17_10_sutasoma
भारतीय दैवतानाही आपण वेगवेगळ्या प्राण्यांशी जोडलेले आहे जसे कि वृषभ म्हणजे शिव, मोर म्हणजे कार्तिकेय शिवाय याच प्राण्यांना आपण त्या त्या दैवताचे वाहनही मानलेले आहे. काही ठिकाणी दैवताच्या मूर्तीसोबत काही प्राण्यांचे अंकन करण्याची पद्धत ही दिसून येते. जसे की शिवाच्या अनेक प्रकारच्या मूर्ती आढळतात जसे व्याखानमूर्ती, सोमास्कंद इ. याशिवाय शिवाची भिक्षाटन मुर्तीही अतिशय प्रसिद्ध आहे. यात भिक्षा मागणारा शिव दाखवलेला असतो व त्याच्यासोबत एक कुत्राही नेहमी दाखवलेला असतो.
bhikshatana-form-shiva.jpg
शिवाचेच रूप असणारा भैरव हा देखील नेहमीच कुत्र्यासोबत दाखवला जातो. बरेचदा भैरवाच्या हातातील मानवी मस्तकातून ठिबकणारे रक्त खाणारा कुत्राही दाखवला जातो.वाराणसी येथील भैरवाच्या मंदिरातील मूर्तीच्या दोन्ही बाजूस त्याचे रक्षक म्हणून बसलेले कुत्रे आहेत. भैरवाच्या पाठीमागे उभा असणारा व संतापाने गुरगुरणारा कुत्राही अनेक शिल्पात दाखवला आहे.
bhairav.jpg
इस ७व्या/८व्या शतकाच्या आसपास रचून पूर्ण झालेल्या आजच्या महाभारतातील महाप्रास्थानिक पर्वात ज्यावेळी पांडव व द्रौपदी  जेंव्हा  स्वर्गाकडे  जाण्यास निघतात त्यावेळी कुत्र्याच्या रूपाने यमधर्मही त्यांच्यासोबत असतो.स्वर्गाच्या दारावर जेंव्हा रक्षक युधिष्ठिराला कुत्र्याला बाहेरच सोडून  स्वर्गात प्रवेश करायला सांगतात त्यावेळी कुत्र्याला सोडून  युधिष्ठिर  स्वर्गात प्रवेश करण्यास नकार देतो असा एक कथाभाग महाभारतात येतो .
ओरिसामधील हिरापूर येथे इस ९व्या शतकातील ६४ योगिनींचे एक मंदिर आहे. हे मंदिर तंत्रमार्गी साधनेसाठी बांधण्यात आलेले असावे. या मंदिरात योगिनींच्या ६४ मूर्ती स्थापित केलेल्या आहेत.यापैकीच एक मूर्ती ‘विक्राळी’ या योगिनीची आहे जी कुत्र्यावर आरूढ आहे. यातून तंत्रमार्गी साधनेतही कुत्र्याने स्थान मिळवले होते हे स्पष्ट होते.
Yogini Vikrali.jpg
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबाच्या अश्वारूढ मूर्तीच्या पायाशीसुद्धा कुत्रा दाखवलेला असतो. खंडोबा हा शिवाशी साधर्म्य असणारा देव असल्याने किंवा शिवापासूनच उत्पन्न झालेला असल्याने त्याच्यासोबतही भैरवाप्रमाणे कुत्रा दर्शवण्यात आला असावा.
Khandoba.jpg
महाराष्ट्रातीलच सर्वात नवीन संप्रदाय म्हणून उदयास आलेल्या दत्तासोबतही कुत्रा दाखवलेला असतो.
भटका आदीमानव,गुरे पाळणारा व शेती करणारा आदीमानव ते नगरे वसवून  त्यात वास्तव्य करणारा आधुनिक मानव या सर्व स्थित्यंतराचा साक्षीदार ,त्याला शिकारीत मदत करणाऱ्या, त्याच्या घराचे कुटुंबाचे रक्षण करणाऱ्या या इमानी साथीदाराच्या माणसासोबतच्या वाटचालीचे स्मरण ठेवण्यासाठी हा लेखन प्रपंच

यशोधन जोशी

दोन घडीचा डाव

मारतो राजास एक्का, नहिल्यास दहीला मारतो
कल्पनेचे खेळ सारे, कोणी कुणा ना मारतो
पाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे
सारेच तुकडे कागदाचे, छाप नुसते वेगळे

असा भाऊसाहेब पाटणकरांचा एक शेर आहे. पत्त्यांपासून चालू करून भाऊसाहेब शेवटी वाचकाला वेदांताकडे घेऊन जातात.पण वेदांत वगैरे गोष्टींशी माझा अर्थाअर्थी काही संबंध नसल्यामुळे मी पत्त्यातच गुंतून राहिलो.सँडविचचा लेख लिहितानाच पत्त्यांविषयी काही माहिती मिळेल काय असा किडा माझ्या डोक्यात वळवळला आणि मग मी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पुस्तकं पिसायला सुरुवात केली.त्यातूनच ही सगळी माहिती पत्त्यांच्या पानांसारखी पिसारा फुलवून हाताशी लागली.

माझ्या सगळ्या लेखात चीनचा संदर्भ कुठं ना कुठं येतच असतो त्यामुळं इथंही चीन आलेला आहेच.छपाईची सुरुवात जशी चीनमध्ये झाली तशीच पत्ते खेळण्याची सुरुवातही चीनमध्येच झाली.९व्या शतकात चीनमध्ये Tang राजांची राजवट होती,त्यांच्याच काळात block printing तंत्रज्ञानाने पत्ते तयार होऊ लागलेले होते.यावरून त्याआधी एखाद दुसरे शतक आधीपासून तरी तिथं पत्ते खेळले जात असावेत असा अंदाज बांधायला काही हरकत नाही.त्याआधीचे पत्ते हाताने चितारलेले आणि रंगवलेले असत.अर्थात त्यांचे पत्ते आज आपण खेळतो त्यापेक्षा नक्कीच वेगळे होते पण ते पत्त्यांचे खेळ खेळत याचे संदर्भ उपलब्ध आहेत. ते पत्त्यांना Leaf game म्हणत असत.(हे कुठंतरी आपल्या मराठीतल्या “पानां”च्या आसपास जाणारं आहे ना?)या पत्त्यात तीस पाने असत.याच प्रकारचे पत्ते वापरून चीनमध्ये एक जुगारही खेळला जाई.

160px-Ming_Dynasty_playing_card,_c._1400
१५ व्या शतकातील चीनमधील छापील पत्त्याचे पान

अरब व्यापारी जगभर प्रवास करत असत त्यांच्याबरोबर पत्ते पर्शिया आणि अरबस्तानात पोचले.अरब या पत्त्यांना ‘कंजीफा’ म्हणत यावरूनच आपल्याकडचा गंजिफा हा शब्द तयार झालेला आहे.अरबांनी हा खेळता खेळता त्यात बरेच बदलही केले असावेत.अरबांकडून पत्ते मध्यपूर्वेत अनेक ठिकाणी पोचले.तेंव्हा इजिप्त आणि आसपासच्या भागात ‘मामलुक’सुलतांनाची सत्ता होती,११व्या शतकाच्या आसपास पत्ते इथेही येऊन पोचले आणि इथूनच आज आपण जे पत्ते बघतो (खरं तर खेळतो)त्यांचे प्राथमिक रूप तयार व्हायला सुरुवात झाली.मामलुकांच्या राज्यात पत्त्यांचा खेळ अतिशय लोकप्रिय झाला होता.यांच्या पत्त्यांच्या प्रत्येक deck मध्ये (ज्याला आपण पत्त्यांचा ‘क्याट’ म्हणतो) ५२ पाने असत.आपल्या इस्पिक (spades),बदाम (hearts),किलवर (clubs) आणि चौकट (diamonds) यांची सुरुवात मामलुकांनी polo sticks,coins,cups आणि swords अशी केली होती.यात प्रत्येक प्रकारची दहा पाने असत आणि मलिक (king), नायब मलिक (deputy king) आणि थनी मलिक (second deputy) अशी तीन court cards असत.

13759_106459582701694_100000129589211_165692_2292611_n
मामलुकांचे पत्ते

चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात अरब आणि युरोपियन प्रवाशांसोबत पत्ते युरोपमध्ये येऊन पोचले.युरोपमध्ये पत्ते अतिशय लोकप्रिय झाले.पत्ते खेळता खेळता लोकांचा वेळ उत्तम प्रकारे जाऊ लागला,लोक देहभान विसरून पत्ते खेळायला लागले.समाजाच्या सर्वच स्तरातले लोक पत्ते खेळत असत पण हलक्या आणि उनाड लोकांनी फसवेगिरी,खोटेपणाने खेळायला सुरुवात केली.यांतून भांडणे,मारामाऱ्या वगैरे प्रकार नित्याचेच झाले शिवाय लोक कामधंदा सोडून पत्ते खेळत या सगळ्याचा परिणाम म्हणून त्याकाळात राजसत्तेवर वर्चस्व असणाऱ्या चर्चेसनी आपला दबाव वापरत पत्त्यांवर बंधने घालायला भाग पाडले.फ्रान्सचा राजा Charles V याने १३७७ मध्ये पॅरिसमध्ये रविवार सोडून इतर दिवशी पत्ते खेळण्यावर बंदी घातली.१३७९ मध्ये स्वित्झर्लंडमध्येही पत्ते खेळण्यावरच बंदी घालण्यात आली.अर्थातच ही बंदी फार काळ टिकली नाही.

playing-cards-meliadus-1

युरोपमध्ये आल्यावर पत्त्यांच्या रुपात आमुलाग्र बदल होत गेला. युरोपमधल्या समाजजीवनाची छाप त्यांच्यावर पडत गेली.मलिक, नायब मलिक आणि थनी मलिकऐवजी युरोपिअन पद्धतीने King, Queen, Knight आणि Knave म्हणजे गुलाम (याला आपल्याकडं गोटू का म्हणतात हे मात्र कळत नाही) अशी court cards तयार केली जाऊ लागली.म्हणजेच आता ५२ ऐवजी ५६ पत्ते तयार होऊ लागले. Polo sticks या चिन्हाऐवजी Baton हे चिन्ह वापरले जाऊ लागले,याचं कारण म्हणजे पोलोचा खेळ अरबांच्यात लोकप्रिय असला तरी युरोपात फारसा प्रचलित नव्हता.

पत्त्यांचा खेळ प्रसिद्ध झाला असला तरी पत्ते तयार करणे हे अजूनही खर्चिक आणि वेळखाऊ होते.हाताने तयार केले जाणारे आणि रंगवले जाणारे पत्ते हळूहळू स्टेन्सिल वापरून तयार केले जाऊ लागले.यामुळे ते स्वस्तही झाले आणि तयार करण्याचा वेळही कमी झाला.जर्मनी आणि फ्रान्समध्ये उत्तम प्रतीचे पत्ते तयार होत,पण फ्रेंचांनी स्टेन्सिल्स वापरून जलद उत्पादन सुरू केल्याने जवळपास संपूर्ण युरोपभर फ्रान्समध्ये तयार झालेले पत्ते प्रचलित झाले.आज आपण वापरतो ते पत्तेसुदधा फ्रेंच पद्धतीचेच आहेत.

पत्त्यांची उत्क्रांती मात्र अजूनही संपलेली नव्हती.पत्त्यांच्या deck मधले knaves काढून टाकून त्यांची संख्या ५६ वरून पुन्हा ५२वर आणली गेली.स्पॅनिश लोकांनी deck मधून राणी काढून टाकून त्याऐवजी घोड्यावर स्वार झालेला knight (सरदार) ची भरती केली. स्पेनपाठोपाठ जर्मन decks मधूनही राणी हद्दपार झाली.फ्रेंचांनी मात्र आपल्या decks मध्ये राणी कायम ठेवली.फ्रेंच decks चा प्रसार सर्वदूर झाला असल्याने सर्वत्र राणीच प्रचलित झाली.तरीही अजूनसुद्धा जर्मनीतल्या काही भागात राणी नसलेले decks वापरले जातातच. फ्रेंचांनीच Knight ऐवजी knave ला deck मध्ये परत आणलं.

13759_106459582701694_100000129589211_165692_2292611_n

Spades (इस्पिक),Hearts (बदाम) Diamonds (चौकट) Clubs/Clover (किलवर) ही चिन्हे फ्रेंच decks मध्ये वापरली जाऊ लागली.यांचा संबंध तत्कालीन समाजरचनेशीही जोडलेला होता.Spade म्हणजे भाल्याचा फाळ हे राजसत्तेचे प्रतीक,Hearts चर्चचे, Diamonds उच्चभ्रू वर्गाचे आणि Clubs शेतकरी आणि कामगार वर्गाचे प्रतीक ठरवले गेले. जर्मन या चिन्हांऐवजी त्यांच्या decks मध्ये Bells म्हणजे राजसत्ता (या bells छोट्या घुंगरासारख्या असत आणि ससाण्याच्या पायात बांधायला वापरल्या जात.जर्मन राजघराण्यात falconry चा खेळ प्रसिद्ध होता त्याच्याशी हा संबंध जोडलेला होता), Hearts म्हणजे चर्च, Leaves म्हणजे मध्यमवर्ग आणि Acorns म्हणजे शेतकरी आणि कामगार वर्ग ही चिन्हे वापरत.युरोपमधल्या इतरही काही देशात अशीच निरनिराळी चिन्हे वापरली जात.

96292-004-6887D906

खरी गंमत या नंतरच आहे,पत्त्यातले राजराणी हे खरेच असतात काय? ते कुठून आले? हे प्रश्न तुम्हाला एव्हाना पडले असतील तर त्यांचीही उत्तरं मी देणार आहे.सुरुवातीला पत्त्यात राजे म्हणून बायबलमध्ये उल्लेख आलेला जेरुसलेमचा राजा सॉलोमन, रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट ऑगस्ट्स, फ्रान्सचा एक राजा क्लॉविस आणि रोमन सम्राट कॉन्स्टंटाईन हे चार राजे मानले गेले होते.पण पुढे सतराव्या शतकाच्या आसपास या राजांऐवजी रोमन सम्राट चार्लमेन Hearts, बायबलमध्ये उल्लेख आलेला जेरुसलेमचा राजा डेव्हिड Spades, रोमन सम्राट ज्युलिअस सीझर Diamonds आणि ग्रीसचा राजा अलेक्झांडर Clubs हे चौघे decksच्या राजसिंहासनावर स्थानापन्न झाले.

13759_106459582701694_100000129589211_165692_2292611_n.jpg
तर राणीवशात बायबलमधल्या कथेतली जुडीथ Hearts, Spades ची राणी पलास म्हणजेच युद्धदेवता अथेना,बायबलमधल्या कथेतील रॅचेल Diamonds समाविष्ट झाल्या.चौथी राणी Clubsची Argine हिची मात्र ओळख काही पटत नाही. अर्थात हे सगळे अंदाज आहेत आणि अर्थातच याला छेद देणारेही काही मतप्रवाह आहेत.

Knaves उर्फ Jack सुद्धा तत्कालीन समाजावर छाप असलेल्या व्यक्तिमत्वांपासून वेगळे राहिले नाहीत.त्यामुळे La Hire हा चौदाव्या शतकातला फ्रेंच योद्धा Hearts, Ogier हा अजून एक फ्रेंच सरदार Spades, Diamonds साठी Hector ( होय! तोच तो ट्रॉय सिनेमातला) आणि ब्रिटिश राजा आर्थरचा सरदार Lancelot हा Clubs चा knave बनला.

पण या सगळ्या राजे राण्या आणि त्यांच्या इमानी सरदारांच्या गर्दीत Joker कुठं आहे? तर Joker काही युरोपिअन decks मध्ये समाविष्ट नव्हता तो आणण्याचे श्रेय अमेरिकनांचे आहे. Joker सगळ्यात शेवटी म्हणजे १८६० च्या सुमारास Poker सारख्या एका खेळासाठी deck मध्ये समाविष्ट करण्यात आला.

आता डाव संपून पत्ते गोळा करण्याची वेळ झाली पण अजून आपले आवडते ते ‘लॅडीस’ ( उर्फ वख्खई), झब्बू, सात-आठ, पाच तीन दोन, बदाम सात वगैरे खेळ कुठून आले हे प्रश्न शिल्लक आहेतच.आता त्यासाठी तुम्हीच इंटरनेट पिसायला घ्या आणि तुम्हाला सापडलेली उत्तरं मला पण सांगा.

H4052-L116600659
पहिल्या महायुध्दाच्यावेळी दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांसाठी तयार केले गेलेले पत्ते

यशोधन जोशी

 

हे जिव्हे रससारज्ञे सर्वदा मधुरप्रिये…..

 

लेखाचा मथळा हा एका संस्कृत सुभाषिताचा अर्धा भाग आहे. संपूर्ण सुभाषित असे आहे
हे जिह्वे रससारज्ञे सर्वदा मधुरप्रिये | भगवन्नामपीयूषं पिव त्वमनिशं सखे ||

हे माझ्या जिव्हे विविध स्वाद ओळखण्यात तू तज्ज्ञ आहेसच, पण त्यात तुला गोड स्वादाच्या वस्तू जास्त आवडतात. त्यामुळे सृष्टीची निर्मिती करणार्‍या परमेश्वराचे नामस्मरण करुन हा मधुरस तू सतत प्राशन कर.

हे सुभाषित घ्यायच कारण की याचा पहिला अर्धा भाग मला जास्त भावला (आणि संस्कृत सुभाषित टाकून सुरुवात केली की लेखाला जरा वजन येते.)

साखरेचा शोध ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. पण आर्यभट्टाच्या शुन्याच्या शोधा पलिकडे आपल्याला फारसे माहित नसते. आता साखरेच्या आधीच येऊन गेलेल्या लेखानंतर साखरेवर आणखी काय लिहिणार?

हा लेख साखरेबद्दल नसून आहारात येणार्‍या गोड पदार्थांबद्दल आहे. पाश्चिमात्य देशात अशा गोड पदार्थांना Desserts म्हणतात आणि ती जेवणानंतर खाण्याची प्रथा आहे. पण या Desserts ची यादी बघायला गेलं तर केक, आईस्क्रिम, चॉकलेट व आणखी ८-१० गोड पदार्थांपुढे पोहोचत नाही. भारतीय उपखंडात मात्र ऊसापासून बनवलेली साखर, गुळ याचबरोबर मधासारख्या गोडी आणणार्‍या पदार्थांपासून जी व्यंजने बनवली गेली व वेगवेगळे प्रयोग केले गेले त्याचा हा थोडक्यात घेतलेला धांडोळा.

भारतीय उपखंडात राहणारे आपण सर्वजण गोड पदार्थ आवडीने खाणारे आहोत. तुमच्या रोजच्या आहारातला पदार्थांमधे या गोडी आणणार्‍या गोष्टींचा वापर केलेला असतोच. गुळाचा लहानसा खडा आमटीची लज्जत वाढवतो तसेच निरनिराळ्या पदार्थांमधे चवीसाठी चिमुटभर साखर वापरली जातेच. पण आजुबाजूला ’मला गोड आवडत नाही’ असे म्हणणारे महाभागही आढळतात. त्याचबरोबर डाएटींगवाल्यांनी तर गोड खाण्यावर मोठ्या प्रमाणात बंदी आणली आहे. बाकी काहीही असले तरी मी गोड पदार्थांवर मनापासून प्रेम करतो आणि जे खवय्ये कुठलीही भीडभाड न बाळगता गोड पदार्थ खातात त्यांच्याबद्दल मला आदर आहे. या प्रेमापोटीच या वेगवेगळ्या गोड पदार्थांच्या कुळकथा शोधायला निघूयात.

भारतातल्या गोड पदार्थ आणि मिठाई यांची विभागणी अशी करता येईल. सारण (stuffing) भरुन भाजलेले पदार्थ यात मुख्यत: गोड पोळ्या येतात. मग सारण भरुन तळलेले किंवा शॅलो फ्राय केलेल्या करंज्या व साटोर्‍यांसारखे पदार्थ आणि सारण भरुन उकडलेले मोदकासारखे पदार्थ. यानंतर येतात ते साखरेच्या किंवा गुळाच्या पाकात मुरवून (soaking) केलेले गोड पदार्थ. यात जिलेबी, गुलाबजाम, बुंदीचे लाडू, पाकातले चिरोटे असे पदार्थ येतात. (इंदुरला मी खव्याचे सारण असलेले पाकातले सामोसे बघितले होते.) यानंतर वेगवेगळ्या फळांपासून किंवा फळभाज्यांपासून केलेले हलवे. शेवटी सगळ्यात महत्वाचे म्हणजे दुधापासून बनवलेले गोड पदार्थ. या आढाव्यात आणखी अनेक प्रकारचे पदार्थ राहिले असण्याची शक्यता आहेच कारण हा गोड पदार्थांचा पसारा खूप मोठा आहे.

DSCF0461
पाकातले सामोसे

मानवाला गोडाची ओळख झाली ती तो खात असलेल्या फळांमुळे. प्राण्यांची शिकार करण्याआधी माणसाच्या आहारात मुख्यत: कंदमुळे आणि फळांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. मधासारख्या गोड पदार्थाचा शोध त्याला कधी लागला हे खात्रीलायकपणे सांगता येत नाही पण भौतिक पुरावे आपल्याला १० हजार वर्ष मागे घेऊन जातात. भीमबेटका येथील गुंफाचित्रांमधे मध गोळा करणार्‍या माणसाचे भित्तिचित्र आहे. तसेच पंचमढी येथील गुहांमधेही अशी भित्तिचित्रे सापडली आहेत. त्यामुळे गोडीसाठी मधाचा वापर हा इतिहासपूर्व काळापासून चालत आलेला आहे.

bees-nest2
पंचमढी गुंफेतील चित्र

भारतातील पहिली sweet dish कुठली? ऋग्वेदात मधाचे उल्लेख आलेले आहेत. त्याचबरोबर मोठ्या मधमाशांच्या मधापेक्षा लहान मधमाशांचा मध अधिक चांगला असतो असे सांगणारे श्लोकही आलेले आहेत. ’अपुप’ ही ऋग्वेदात आलेली पहिली sweet dish. सातूचे गोलाकार गोळे मंद आचेवर तुपामधे तळले जात. त्यानंतर ते मधामधे घोळवले जात. त्याचबरोबर घरी आलेल्या पाहुण्याचे स्वागत मधुपर्काने केले जात असे. मधुपर्क म्हणजे दही, तुप आणि मध घालून केलेले पंचामृत.

तीळ आणि गुळ एकत्र करुन त्यापासून गोड पदार्थ बनवला जात असे. त्याचबरोबर तांदुळ, गहू यांचे पीठ तुपामधे तळून त्यात गुळ घालूनही गोड पदार्थ बनवले जात असत. पतंजलीच्या योगसुत्रामधे मधुगोलक किंवा मोदकाचा उल्लेख आलेला आहे. पण हा मोदक आजच्या उकडीच्या किंवा तळणीच्या मोदकाप्रमाणे होता की नव्हता हे काही खात्रीलायकपणे सांगता येत नाही. साधारणत: गुप्तकाळात म्हणजेच ४ थ्या शतकात गणपती ही शुभदेवता बनली. त्या काळातील गणपतीची शिल्पे बघितली तर त्याच्या हातात लाडू किंवा मोदक दाखवलेला दिसतो. याचबरोबर साधारणत: ७ व्या शतकातील साहित्यामधे मंडक म्हणजे मांडे (पुरणपोळीचे मूळ येथेच असावे) याचा उल्लेख सापडतो. याचबरोबर दक्षिण भारतात मुख्यत: कर्नाटकात बनवले जाणारे कडबू या पदार्थाचेही संदर्भ आढळतात.

kaju-modaks1

येथे एका ग्रंथाचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे.’पाकदर्पण’ नावाचा शाकाहारी मांसाहारी पदार्थांच्या पाककृती दिलेला एक ग्रंथ आहे. हा ग्रंथ नल नावाच्या राजाने लिहिला. ’नल दमयंती’ मधला नल बहुदा हाच असावा. तो पाककलेत निष्णात होता. या पुस्तकाचा काळ मात्र सांगता येत नाही. ७६१ श्लोकांच्या व ११ प्रकरणांचा हा ग्रंथ आहे. या ग्रंथातलं चवथे प्रकरण हे ’पायस’ या विषयावरच आहे. या प्रकरणात पायस बनवण्याच्या ५ कृती दिलेल्या आहेत. गमतीचा भाग असा की पायस म्हणजेच खीर ही गोड असली पाहिजे अशी आपली समजूत असते. पण यातल्या दोन खीरी गोड नाहीत. या कांजी या प्रकारच्या आहेत. हे तांदुळ आणि गहू यापासून तयार केलेले व लसुण-लवंगांची फोडणी घातलेले पायस आहे. उरलेल्या तीन पाककृती मात्र गोड खीरीच्या आहेत. लसुणयुक्त भाताच्या पायसात साखर घालून ते गोड बनवण्याची कृतीही आलेली आहे. तसेच विविध फळांचे व ऊसाचा रस तसेच मध वापरुन केलेले पायस आहे. दुधात तांदूळ किंवा गहू शिजवून त्यात मध किंवा गुळ घालून त्यापासून बनते ती खीर. खीरीचे उल्लेख आपल्याला वैदिक ग्रंथातही सापडतात. पायस नावाचा हा पदार्थ त्याकाळी अत्यंत प्रिय होता. गौतम बुध्द बोधीप्राप्ती करता बोधिवृक्षाखाली बसले होते. त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला होता. त्यामुळे ते अस्थिपंजर झाले. या वेळी तेथुन जाणाऱ्या सुजाता नामक एका महिलेने त्यांच्यात चेतना यावी म्हणून त्यांना खीर खायला दिल्याची एक कथा बौध्द साहित्यात येते.

सध्या आंब्याचा मोसम आहे. या ग्रंथातल्या एका प्रकरणात आंब्यांपासून बनणार्‍या एका पदार्थाची कृती दिलेली आहे. या प्रकरणाचे नावच ’लेह्यप्रकरणम’ म्हणजे चाटून खाण्याचे पदार्थ. या ग्रंथात क्षीरपाक नावाच्या गोड पदार्थाचे आहे. कोळशाच्या चुलीवर आटवलेल्या म्हशीच्या दुधापासून तयार होणारा बासुंदी सारखा हा पदार्थ असावा. यात विविध सुगंधी फुलांचे अर्क टाकावेत असे सांगितले आहे. शेवटच्या प्रकरणात दही कसे लावावे याची माहिती आहे. फळं घालून केलेल्या yogurt चीही इथे पाककृती दिलेली आहे.

खवा हा भारतीय मिठाईचा आत्मा आहे. भारतातील मिठायांमधे खव्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण खव्याचा शोध कसा लागला याबद्दल सांगता येत नाही. नलपाकदर्पण या ग्रंथात दुध आटवताना त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याला काय म्हणतात याची नावे आलेली आहेत. १/११ आटवलेल्या दुधाला शर्करा म्हणावे असे सांगितले आहे. दुधाची ही अवस्था म्हणजेच खवा असावा.

भारतात मोठ्या प्रमाणात मिठाई बनवली जाते. बर्‍याचश्या मिठायांचा शोध हा अपघाताने लागलेला आहे. यात अस्सल भारतीय भूमीत बनलेले पदार्थ आहेतच पण अनेक परदेशी पदार्थांचे भारतीयकरणही झालेले आहे. यात मुख्य दोन पदार्थ येतात. पहिली म्हणजे जिलेबी आणि दुसरा म्हणजे गुलाबजाम.

हो जिलेबी भारतीय नाही!
जिलेबीचे मूळ शोधायला आपल्याला जावे लागते ते प्रशिया, तुर्कस्तानला. मध्य आशियातून झिलाबीया या नावाचा पदार्थ अरबी व्यापार्‍यांमार्फत १५ व्या शतकात भारतात आला. अफगाणिस्तानमध्ये झिलाबीया थंडीच्या दिवसात खाल्ला जाई. १५ व्या शतकातील जीनासूर या जैन ग्रंथामधे जिलेबीचा पहिला संदर्भ सापडतो. सोळाव्या शतकात लिहिलेल्या पाकशास्त्र या गंथात जिलेबीची पाककृती आलेली आहे. मैद्याच्या पिठात लिंबाचा रस, तूप, उडदाचे पीठ एकत्र करुन ते भांड्यात ठेवावे. दुसर्‍या दिवशी त्यात आंबवण्याची प्रक्रिया झाल्यावर जिलेबी पात्राने तुपात हा वाटोळा पदार्थ तळून तो केशरयुक्त साखरेच्या पाकात टाकावा असा उल्लेख त्या श्लोकात आलेला आहे. जिलेबीला त्या ग्रंथात त्यांनी ’कुंडलीका’ व ’जलवल्लीका’ असे म्हटले आहे. बाहेरुन आलेली जिलेबी आज भारतभर मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. जिलेबी मधे पुन्हा प्रादेशिक विविधता आढळते. तसेच ’इम्रती’ ही जिलेबीची बहिण अतिशय नक्षीदार व देखणी असते.

आपला गुलाबजामही आला तो तुर्कस्तान व मध्य अशियातून. त्या भागात बनणारा लुक्मा आपण खातो त्या गुलाबजामचाच भाऊबंद. आपण या परदेशातून आलेल्या पदार्थाचे भारतीयकरण केले. चविष्ठ खव्याचा वापर ही भारतीय खासियत. त्यातही पुन्हा केलेले वेगवेगळे प्रयोग. तोंडाचा मोठा आ करुन खावा लागणारा काला जामून, पाकातले गुलाबजाम, साखर लावलेले कोरडे गुलाबजाम, त्यावर काजू पिस्त्याची केलेली पखरण. मुगलांबरोबर आलेला गुलाबजाम आता मुख्य पक्वान्न बनला आहे. (पुण्यात गणेश पेठेतील गुरुद्वारासमोर असलेल्या उत्तम स्वीट नावाच्या मिठाईच्या दुकानाला गुलाबजाम खाण्यासाठी आवर्जून भेट द्यावी)

gulam-jamun-pakwangali_520_102815120718

दसरा पाडव्याला खाल्ल्या जाणार्‍या श्रीखंडाचा इतिहास अज्ञात आहे. दह्यातील पाणी काढून तयार झालेल्या चक्क्यात साखर, जायफळ आणि केशर घालून श्रीखंड तयार केले जाते. श्रीकृष्णाच्या मथुरेत श्रीखंड बनवले जात असे असा उल्लेख सापडतो. उत्तर भारतात कुठेही श्रीखंड फारसे खाल्ले जात नाही. श्रीखंड ही खासियत आहे ती पश्चिम भारताची. ११ व्या शतकातील चावुण्डराया याच्या ’लोकोपकार’ या कन्नड भाषेतील ग्रंथात शिरकिनी या नावाने पहिल्यांदा श्रीखंडाचा उल्लेख आलेला आहे. १६ व्या शतकातील मंगारसाच्या ’सूपशास्त्र’ या ग्रंथातही श्रीखंडाचा उल्लेख सापडतो. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, राजस्थान आणि पंजाबमधे श्रीखंड खाल्ले जाते.

shrikhand-678x381

दोन राज्यांमधे पाण्यावरुन, सीमेवरुन असे वाद होत असतात. पण मिठाईवरुन वाद हा फक्त भारतातच होऊ शकतो. दोन वर्षांपूर्वी रसगुल्ल्यावरुन पश्चिम बंगाल आणि ओरिसा राज्यांमधे असाच वाद झाला होता. रसगुल्ला याला प्रादेशिक वैशिष्ठ्याचा दर्जा मिळवण्याच्या वरुन हा वाद सुरु झाला. पश्चिम बंगाल आणि ओरिसा या दोन्ही राज्यांनी पुरावे सादर केले. दुध नासवून त्यापासून तयार केलेला छेना हा या मिठाईचा आत्मा. पुरी येथील जगन्नाथाला प्राचीन काळापासून या छेन्यापासून बनवलेल्या रसगुल्ल्याचा प्रसाद दाखवला जातो असा दावा करण्यात आला. जगन्नाथ आपल्या जन्मस्थळी लक्ष्मीला न नेता आपल्या बहिण भावाबरोबर गेला. याचा लक्ष्मीला राग आला. मग तिला शांत करण्यासाठी जगन्नाथाने तिला रसगुल्ला खायला दिला अशी एक कथा सांगितली जाते. ओरिसा सरकारने छेन्यापासून तयार होणार्‍या पदार्थांचे अनेक संदर्भ दिले. पण शेवटी हा मान मिळाला प. बंगालला. येथे जाता जाता एका ओरिसाच्या मिठाईचा उल्लेख करणॆ गरजेचे आहे ती म्हणजे छेना पोडा. छेन्यावर साखरेचा थर देऊन कोळश्यावर ७-८ तास त्याला ठेवले जाते. साखरेचे कॅरॅमलायजेशन होऊन बनणारा हा भारतीय चीज केक. कधी पुरीला गेलात तर जरुर खाऊन पहावा असा.

1-chhena-poda
छेना पोडा

१७ व्या शतकात हुगळी येथे पोर्तुगीज लोकांची एक वसाहत होती. ते दुधात लिंबू पिळुन त्यापासून कॉटेज चीज बनवत. हे कॉटेज चिज म्हणजेच छेना. त्यापासूनच बंगाली मिठाई बनवण्यास सुरुवात झाली. या छेन्यापासून बनवलेली पहिली मिठाई म्हणजे ’संदेश’. बंगाली मिठाई बनवणार्‍या आणि त्यात वेगेवेगळे प्रयोग करणार्‍या हलवायांमधे भीमनाग, के. सी. दास, द्वारिका घोष आणि गंगुराम यांचा मोठा वाटा आहे. छेन्यापासून बनणारा गुलाबजामचा बंगाली भाऊ म्हणजे पान्तुआ. लग्नसमारंभात आढळणारी रसमलाई बंगालचीच. मिठाई अधिक दिवस टिकावी म्हणून हवाबंद टिनच्या डब्यामधे देण्यास सुरुवात केली ती बंगाली मिठाईवाल्यांनी त्यामुळे या मिठायांचा प्रसार झपाट्याने जगभर झाला.

Rasgulla-2

भारतातील मिठायांत भरपूर प्रादेशिक विविधता आढळते. यातील सगळ्याच मिठायांचा इतिहास ज्ञात नाही. आपल्याकडे एक म्हण आहे की ’ऊस गोड लागला तरी मुळापासून खाऊ नये’. त्यामुळे आपणही मिठायांच्या फार मुळाशी न जाता त्यांची लज्जत चाखूया !

कौस्तुभ मुदगल

 

 

वसुंधरेचे मनोगत

हात जोडुनी मीच विनवते, वाट वाकडी करू नका….

माझ्या प्रिय लेकरांनो, मी धरतीमाता. तुम्हाला वसुंधरादिनानिमित्त काही सांगू इच्छिते. आजचा दिवस २२ एप्रिल हा ‘वसुंधरा दिन’ म्हणून पाळता. मात्र गेली कित्येक वर्ष वसुंधरा दीऽऽऽऽन होत चालली आहे. खरं तर वसुंधरा या माझ्या नावाप्रमाणे मी वसु म्हणजे संपन्न समृध्द होते. माझी नैसर्गिक संपदा अफाट होती असं म्हणू या. होती असच म्हणाव लागेल कारण शहाणा माणूस अस नाव धारण करणार्‍या माझ्या लेकरा, तू मला लक्तर बहाल केलीस. तुझी वृत्ती जेव्हा व्यापारी बनली तेव्हा माझा सखा, जल जो पावसाच्या रूपानं मला भेटतो आणि चराचराला सुखावतो. त्याला ही ’पैसा झाला खोटा’ असं म्हणून डिवचतोस आणि त्यामुळे अनेकदा त्याच्या प्रकोपाचाही बळी ठरतोस. माझी संपत्ती घेऊन, खर तर लुटून त्याबदल्यात तू मला काय काय दिलं आहेस? विषारी वायु, न विघटन होणारे प्लास्टिक, जास्त उत्पादन होण्यासाठी रासायनिक खतांचा आणि घातक कीटकनाशके. त्यांच्यामुळे जलस्त्रोत आणि हवाही विषारी झाली. तुमच्या चैनी, सुखसोई यासाठी – ज्याला तुम्ही ’विकास’ असे भुलवणारे, आकर्षक नांव देता, माझ्या हिरव्यागार वनांच्या शालू शेल्याची लक्तरे केलीत. ’पृथ्वी केवळ माणसांसाठीच’ अशा स्वार्थी वृत्तीमुळे माझ्या इतर काही लेकरांना म्हणजे पशुपक्ष्यांना निर्वंश केलंत. खरं तर माझी आजची  अवस्था एखाद्या अतिदक्षता विभागातील रुग्णासारखी आहे, जागतिक तापमानवाढ माझ्या ज्वराचे मापक, झाडं कमी झाल्याचाही तो एक परिणाम, खेरीज झाडं नसल्यानं मला कृत्रिम श्वासोच्छवासावर ventilator वर ठेवल्यासारखं आहे. ओझोनच्या विरळीकरणामुळॆ घातक सूर्यप्रकाश मला भाजून काढत आहे.

पुराणातील संकल्पनेनुसार माझा भार शेषनागाने स्वत:च्या मस्तकावर तोलला आहे. पण माझ्या लेकरांनो तुम्ही केलेल्या पापांचे हे वजन या शेषाला जड होत आहे आणि मग त्याने संतापाने डोकं हलवल्यावर माझी तारांबळ होते. भूकंप, ज्वालामुखी अगर महाप्रलयासारख्या आपत्तींना अखेर तुम्हालाच तोंड द्याव लागतं.

ही पुराणकथा म्हणून भाकडकथा असं मानू नका. Lovelock नावाच्या वैज्ञानिकाने मला मूलत: सजीव मानले आणि १९७० साली Gaia Hypothesis  अशी संकल्पना मांडली. Gaia या ग्रीक संज्ञेचा अर्थ आहे  Mother Earth.

तुम्ही तुमचा चंगळवाद थोपवा आणि जरा सुधारा, तुम्ही सर्व चराचराचे मालक नसून विश्चस्ताच्या भूमिकेत जा आणि ’शहाणा माणूस’ हे आपलं नावं सार्थ करा एवढी तुम्हाला विनंती.

डॉ. हेमा साने

एका नावाची गोष्ट

इंग्लडच्या केंट परगण्यात एक छोटंस गाव आहे.शांत आणि टुमदार. हे गाव ज्यांना सरंजाम मिळालेले होते त्या जहागिरदारांना अर्ल (Earl) अशी उपाधी होती.या जहागिरदारांच्या कुळात जन्मलेले एक कुलदिपक होते चौथे अर्ल म्हणजेच जॉन मॉन्टेग्यू. हे साहेबराव सदैव कंटाळलेले, दिवसभर काय करावे हा प्रश्न सकाळी उठताच त्यांच्यासमोर उभा ठाकलेला असे.

पण प्रत्येक रोगाला औषध असते तसेच प्रत्येक कंटाळ्यालाही असते, वेळ कसा घालवावा या विवंचनेत असतानाच त्यांच्या भोवती असलेल्या मंडळीतल्या एकाने त्यांना पत्ते खेळण्याविषयी सुचवले आणि झालं ! अर्लसाहेबांना पत्ते खेळण्याची गोडीच लागून गेली. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत साहेब फक्त पत्ते आणि पत्तेच खेळू लागले.दिवसाचं सोडा साहेबांना रात्री स्वप्नातही पत्तेच दिसू लागले.पत्ते खेळताना अर्लसाहेब तहानभूक विसरले, खेळताना मधेच उठून जेवायला जायचाही त्यांना कंटाळा येऊ लागला.

एके दिवशी असाच पत्त्यांचा खेळ अतिशय रंगात आलेला होता आणि जेवायची वेळही झालेली होती.अर्लसाहेबांची खेळाचे टेबल सोडून जेवण्याच्या टेबलावर जाऊन बसण्याची मुळीच इच्छा नव्हती म्हणून साहेबस्वारीने आपल्या स्वैपाक्याला बसल्या जागेवरून न उठता जे काही खाता येईल ते आणून देण्याचा हुकूम दिला. ही ब्रिटिश स्वैपाकी मंडळी जात्याच हुशार, त्याने आपलं डोकं चालवून दोन पावांच्या तुकड्यात मांसाचे तुकडे आणि इतर काहीबाही भरून हा नवीन पदार्थ अर्लसाहेबांच्या समोर पेश केला.

RR4_05SANDWICH

अर्लसाहेबांना हा नवीन पदार्थ फारच आवडला आणि तो हा पदार्थ रोजच खाऊ लागले. हळूहळू या पदार्थाची त्यांच्या आसपासच्या सगळ्यांनाही गोडी लागली.

भरपूर उत्सुकता ताणून झाल्यानंतर आता आपण या अर्लसाहेबांची ओळख करून घेऊया, हे आहेत 4th Earl of Sandwich आणि यातलं Sandwich हे नाव त्यांच्या गावाचं आहे.  Earl of Sandwich वरूनच अर्लसाहेबांना आवडलेल्या पदार्थाचं नाव *सँडविच* पडून गेलं. ही सगळी कहाणी आहे सुमारे १७६० च्या सुमाराची.

पण खरं सांगायचं तर त्यांच्या सँडविच गावाचा अतिशय कंटाळा आलेला होता आणि त्यांची इच्छा होती की इंग्लडच्या राजाने आपल्याला Portsmouth गाव इनाम द्यावं,पण राजा यांच्या विनंती अर्जाकडे अजिबात लक्ष देईना आणि शेवटी अर्लसाहेबांची ती इच्छा अपूर्णच राहिली,नाहीतर आज आपण  Portsmouth खात असतो.

यशोधन जोशी

आपला इंपोर्टेड उपास

आमच्या गुरू आणि जेष्ठ वनस्पतीशास्त्र अभ्यासक डॉ. हेमा साने यांचा सदर लेख १२ एप्रिल १९८७ रोजी तरुण भारतच्या रविवार पुरवणीत छापून आला होता. तेंव्हा आपल्यापैकी अनेकजणांना बहुतेक वाचता येत नसेल किंवा हा लेख समजण्याचे आपले वय नसेल अशा सगळ्यांसाठी जवळपास एकतीस वर्षांनंतर हा लेख पुनः प्रकाशित करत आहोत 

खरं म्हणजे ’उपास’ या अतिपरिचित शब्दाचे मूळ रूप आहे ’उपवास’. याचा शब्दश: अर्थ नजीक किंवा जवळ बसणॆ, ईश्वरासन्निध बसून काही ध्यानधारणा, चिंतन, मनन करणे. अर्थातच नेहमीच्या कामाला ’सुट्टी’! म्हणून नेहमी लागणार्‍या ’कॅलरीज’ नकोत. म्हणून तसा आहारही नको. म्हणजे एका अर्थाने त्या दिवशी पचनसंस्थेलाही विश्रांती.

पण आज या मूळ संकल्पनेपासून उपासाने फारकत घेतली आहे. आज आपण करीत असलेला उपास म्हणजे रोजच्या जेवणात ’चेंज’ असे झाले आहे. काही जण तर असाही दावा करतात की आपण बुवा (किंवा बाई) फक्त दोन खाण्यांच्या मधल्यावेळेत उपास करतो.

प्रश्न तुम्ही रूढ अर्थाने सनातनी आहात की नाही हा अजिबातच नाही. तर तुम्ही असा प्रचलित उपास करताना काय खाता याच्याशी निगडीत आहे. पण मी जे सांगत आहे ते ऐकल्यावर तुम्ही सनातनी असाल तर उपास करणे ताबडतोब सोडून द्याल आणि पाश्चिमात्याळलेले असाल तर ताबडतोब उपासाला बसाल. कारण उपासाच्या दिवशी जे पदार्थ आपण उपयोगात आणतो ते वनस्पती शास्त्रज्ञांच्या चष्म्यातून ’अभारतीय’ आहेत. ’इंपोर्टेड’ आहेत. अपवाद फक्त वर्‍याचे तांदूळ आणि राजगिरा.

भुईमूग ब्राझीलचा

उपास म्हणजे मुख्य भिस्त शेंगदाणे म्हणजे आपला भुईमूग. पण हा आपला नाही. भुईमूग मूळचा ब्राझीलचा. अगदी प्राचीन काळी, म्हणेजे अज्ञात काळात तो फक्त दक्षिण अमेरिकेते परिचित होता. १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी भुईमूगाला आपल्याबरोबर अफ्रिकेत नेले. स्पॅनिश लोकांबरोबर भुईमूग पॅसिफिक महासागरातील फिलिपाईन्स बेटावर गेला. नंतर तिथून चीन, जपान, मलाया असा वेडावाकडा फिरत भारतात आला आणि आज भुईमूगाच्या लागवडीत भारत अग्रगण्य आहे.

Eating-Nuts-Adds-up-to-Longer-Life-722x406

विरोधाचा कळस म्हणजे शेंगदाणे आपल्याला उपासाला चालतात. पण शेंगदाण्याचे तेल चालत नाही आणि त्यापासून तयार केलेले कृत्रिम, वनस्पतिजन्य तूप मात्र चालते.

बटाट्याची कूळकथा

यानंतरचा क्रम येतो बटाट्याचा. अनेकदा याला ’आयरिश बटाटा’ म्हणत असले तरी बटाटा हाही अमेरिकेचाच बेटा आहे. पेरू आणि बोलिव्हिया देशाचा रहिवासी. इंका या अमेरिकन आदिम संस्कृतीच्या लोकांनाही बटाटा माहीत असावा. टिटिकाका नावाच्या तलावाच्या आसपासच्या प्रदेशात आजच्या लागवडीखाली असलेल्या बटाट्याचे पूर्वज नांदत असावेत असा अंदाज आहे. अ‍ॅंडिज पर्वतात म्हणजे अमेरिकेच्या पश्चिम घाटात साधारणत: ३५०० मीटर उंचीवर बटाट्याच्या अनेक जाती आजही सापडतात. त्यातील काहींना अक्षरश: वाटाण्याएवढे बटाटे येतात. तर इतरांना नेहेमीच्या बटाट्याएवढे. अ‍ॅंडिज मधील आदिम संस्कृतीशी निगडीत असलेल्या खापरांवरही बटाट्याचे चित्र आढळते.

potato

जवळ जवळ १६ व्या शतकापर्यंत बटाटा बाहेरच्या जगालाच काय पण अ‍ॅंडिजचा डोंगराळ भाग सोडल्यास उरलेल्या अमेरिकेलाही त्याचा पत्ता नव्हता. कोलंबस बरोबर बटाटा अमेरिकेहून युरोपला आला. भाजी म्हणून तो फारसा रुचला नाही. पण असा एक समज होता की बटाटे खाल्ल्यावर वंध्यत्व जाते.

सर वॉल्टर रॅलेने बटाटा युरोपमधून इंग्लंडला आणि आयर्लंडला नेला आणि मग तो भारतात आला.

उपास म्हटला की साबुदाणा आलाच. हे कुठल्याही झाडाचे नैसर्गिक बी नव्हते हे सर्वज्ञातच आहे. बटाटा पाण्यात किसला की किसाबरोबर एक प्रकारचा न विरघळणारा पांढरा साका पाण्याच्या तळाशी बसतो हा स्टार्च. यालाच आपण तवकीर (तवकील) म्हणून ओळखतो. अनेक झांडांच्या खोडात असा स्टार्च साठवलेला असतो. मेट्रॉक्झिलॉन सागो नावाचे नारळाच्या जातीचे एक झाड, सायकस, मरांटा आणि टॅपिओका या चार प्रकारच्या वनस्पतीपासून साबुदाण्यासाठी लागणारा स्टार्च मिळतो. पैकी मेट्रॉक्झिला आणि सायकसच्या खोडात असा स्टार्च असतो. मरांटा म्हणजे ज्याला आपण आरारूट म्हणतो त्याच्या भूमिगत खोडात टॅपिओकाच्या मुळात स्टार्च साठवलेला असतो. तुम्ही दक्षिण भारतात प्रवास केला असाल तर टॅपिओकाचे वेफर्ससुध्दा खाल्लेले असतील.

यापैकी मरांटा, टॅपिओका दोन्हींचे उगमस्थान अमेरिका. टॅपिओका अफ्रिकेतही विपुल आहे. तिथले मूळ राहिवाश्यांचे टॅपिओका साठवणीतील अन्न आहे. टॅपिओका आता आग्नेय आशियातील लोकांचेही प्रमुख अन्न बनलेले आहे.

रताळ्याचा प्रवास

रताळे आणि उपवास यांचाही असाच अतूट संबंध आहे. रताळ्याचे लॅटिन नाव आहे आयपोमिया बटाटाज. रताळी ही देखील अमेरिकेचीच ’देन’ आहे. बटाटाज हे रताळ्याचे तिथल्या आदिम समाजातील नाव आहे. आजमितीस रताळ्याचे जंगली पूर्वज अस्तित्वात नाहीत. पण ते कुठे तरी मध्य अमेरिकेत असावेत. काही पूर्वज आहेत पण त्यांना आता रताळी येत नाहीत.

prod001584

सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे कोलंबसाचे पाय अमेरिकेला लागण्यापूर्वीच रताळ्याला पाय फुटले. हवाई आणि पॉलिनेशिया बेटांना ते केव्हाच पोहोचले. आजही न्यूझीलंडच्या मावरी लोकांचे ते आवडते खाद्य आहे. मात्र रताळ्याने हा प्रवास कसा केला याचे आकलन होत नाही.

कोलंबसबरोबर रताळे युरोपात प्रवेश केला आणि पोर्तुगीजांबरोबर ते भारतात आले आणि स्थिरावले.

मिरचीचा ठसका

फराळाच्या पदार्थांची गोडी मिरची शिवाय अर्थातच नाही. ही मिरचीसुध्दा अमेरिकनच! आपण खरे मिरीचे चाहते. संस्कृत भाषेत मरीची म्हणजे मिरी. मिरची तिखटपणात मिरीच्या जवळची. इंग्रजीमधे रेड पेप्पर म्हणजे मिरची. आणि पेप्पर म्हणजे मिरी पिंपळी. मिरची पुढे इतकी लोकप्रिय झाली की म्हणूनच म्हण तयार झाली असावी ’कानामागून आली नि तिखट झाली’ पण मिरची भारतात फारच लवकर आली असावी. सावता माळ्याने ’लसूण, मिरची, कोथिंबीरी, अवघा झाला सावळा हरि ॥ असे म्हटले आहे. म्हणजे सावता माळी यांच्या काळात म्हणजे १३ व्या शतकात मिरची आपल्याला माहिती होती का ? पण बहुतेक सावता माळ्याचा तोंडी हे वाक्य घुसडण्याचं पुण्यकर्म कोणी महाभागाने केले असावे. मिरचीचा मूळ देश मेक्सीको. मेक्सीको येथील गुंफांमधे इ. स. पू. ७००० च्या काळातील मिरचीचे अवशेष सापडले आहेत. पेरू देशातील काही पूर्वैतिहासीक दफनात मिरचीच्या अस्तित्वाच्या खुणा आढळल्या आहेत. काहींच्या मते वेस्ट इंडिज हा मिरचीचा मायदेश असावा. अर्थातच कोलंबसबरोबर मिरची स्पेनला आली आणि बहुधा सतराव्या शतकाच्या मध्यावर ती युरोपबरोबर, अफ्रिका आणि अशियात पसरली.

Jwala-chilli

फळांमधे खजूर आणि केळी ही महत्वाची. हे दोन्ही वर्षभर मिळणारी फळे. पण खजूरही भारतीय नाही. केळी मात्र चालतील.

तेव्हा राहता राहिले वर्‍याचे तांदुळ आणि राजगिरा. ह्या वनस्पती मात्र अस्सल भारतीय आहेत असा पुरावा उपलब्ध आहे. मग उपासाचा भारतीय मेनू काय राहिला तर वर्‍याचे तांदुळ, राजगिर्‍याच्या लाह्या आणि केळी. आता बोला आहात का उपासाला तयार?

डॉ. हेमा साने

 

Blog at WordPress.com.

Up ↑