एप्रिल फुल बनाया…

एकेकाळी माध्यमं खरोखरच्या बातम्या द्यायची आणि लोकांचा त्यावर संपूर्ण विश्वासही असायचा. त्यात ‘बीबीसी’ सारख्या माध्यमाकडे तर जगभरातल्या लोकांचं लक्ष असायचं आणि त्यांच्या बातम्यांना अधिकृत मानलं जायचं. त्यांच्या धीरगंभीर स्वभावामुळे ते कधी एक एप्रिलला आपली टोपी उडवतील असं इंग्लंडातल्या कुणालाही अपेक्षित नव्हतं.

१ एप्रिल १९५७ ला बीबीसीच्या पॅनोरमा या देशोदेशीच्या बातम्या दाखवणाऱ्या सदरात स्वित्झर्लंडमधल्या Ticino या प्रांतात spaghetti चं बंपर हंगाम झाल्याचा एक व्हिडिओ प्रदर्शित झाला. चित्रविचित्र नावांच्या आणि विनाकारण इंग्रजी बोलणाऱ्या महागड्या हॉटेलांमुळे आपल्याकडं मोठ्या शहरात रहाणाऱ्या जवळपास सगळ्यांना spaghetti माहिती झालेलीच आहे. (ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी – पास्ता नावाचा एक इटालियन पदार्थ आहे ज्यात हे पास्ता नावाचे बोटभर सांडगे बटरमध्ये घोळून वेगवेगळ्या सॉसबरोबर खाल्ले जातात. spaghetti हा सुद्धा पास्त्याचाच एक प्रकार आहे ज्यात हात-दीड हात लांबीच्या या शेवया चीज,बटर आणि सॉसमध्ये घोळून खाल्ल्या जातात. बाकी माहितीसाठी गुगल असे सदा ज्ञानदाता!) तर आता आपण परत जाऊया थंडगार स्वित्झर्लंडमध्ये. या व्हिडिओत झाडावरून मुली, बायका आणि समानता दाखवायची म्हणून काही पुरुषही झाडावरून स्पॅघेट्ट्या तोडताना, त्या वाळवताना वगैरे दाखवलेले होते आणि सोबत होतं बीबीसीचं नेहमीचं धीरगंभीर समालोचन.

इंग्लंडमध्ये spaghetti माहीत नव्हती अशातला भाग नव्हता पण त्यांच्याकडे हवाबंद टिनमधलीच spaghetti मिळायची. झाडाला या शेवया लागलेल्या आहेत आणि आपल्या स्वतःच्या बागेतल्या या शेवया स्वीडिश मंडळी सुखासमाधानाने खातायत हे दृश्य शहरी मंडळींच्या (नेहमीप्रमाणे) काळजाला हात घालून गेलं. शेकडो लोकांनी बीबीसीला फोन करून आम्हालाही आमच्या अंगणी ही बाग फुलवायची असेल तर काय करायला लागेल वगैरे चौकशी करायला फोन केले. बीबीसीने जो माणूस अशा फोनचं उत्तर द्यायला ठेवलेला होता तो तर याच्यावरचा निघाला. त्यानं या भावी बागायतदार मंडळींना “काही अवघड नाही ओ ! एक स्पॅघेट्टी सॉसच्या रिकाम्या डब्यात पेरा आणि रोज पाणी घाला” हा सल्ला दिला.

पुढच्या एक दोन दिवसांत याचा प्रचंड गवगवा होऊन हा बीबीसीचा जनतेला टोप्या घालण्याचा उद्योग होता हे स्पष्ट झालं.चौकोनी चेहऱ्याची गंभीर बीबीसी असा उद्योग करेल असं लोकांना स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. त्यामुळं अनेकांनी बीबीसीला धारेवरही धरलं. नशिबानं त्या काळात सोशल मीडिया नसल्यानं लोकांनी ‘माध्यमांची विश्वासार्हता धोक्यात’ वगैरे पोष्टी पाडल्या नाहीत. आणि बीबीसीनंही लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागून व्हिडीओ मागे घेतला नाही.

तुम्ही आता नेहमीप्रमाणे या व्हिडीओची लिंक मागाल तर ती आधीच खाली दिलेली आहे. आणि मी शपथ घेऊन सांगतो की ती नक्की खरी आहे –

यशोधन जोशी

पळा पळा कोण पुढे पळे तो…

साल होतं १९०४. अमेरिकेतलं पहिलं ऑलिंपिक. सर्वत्र उत्साह पसरलेला. मॅरेथॉन चालू होणार होती. बरोबर ३ वा. ३ मिनिटांनी मॅरेथॉन चालू झाली. आधीच्या बॉस्टनला झालेल्या मॅरेथॉनमधले पहिले तीनही विजेते सामील होते. याचबरोबर क्युबा येथील एक धावपटू सामील झाला होता. आपल्याला या मॅरेथॉनमध्ये भाग घेता यावा म्हणून त्याने संपूर्ण क्युबामध्ये धावून पैसे जमवले होते.

धुळीचा खकाणा आणि प्रचंड उकाड्यात शर्यत चालू झाली. अशा वातावरणामुळे शर्यतीमधील अनेक धावपटूंना उष्माघाताचा प्रचंड त्रास झाला. त्यात शर्यतीच्या संयोजकांनी आणखी भर घातली. धावपटूंना धावताना अतिशय कमी पाणी देण्यात आले. त्यामुळे नर्जलीकरणाचा त्रासही अनेकांना भोगावा लागला. पहिल्या पाच फेर्‍या या मैदानातच मारण्यात आल्या. मैदानातल्या तिसर्‍या फेरीच्या दरम्यान पहिली दुर्घटना घडली. John Lordan नावाच्या धावपटूला उलट्यांचा त्रास होऊ लागला आणि त्याने शर्यत सोडून दिली. त्यानंतर धावपटू मैदानाबाहेर पडले. धावपटूंच्यामध्ये अडथळा येऊ नये म्हणून घोडेस्वार, पत्रकार, डॉक्टर, धावपटूंचे सहकारी आणि शर्यत आयोजित करणार्‍या लोकांनीच इतकी गर्दी करून ठेवली की धावपटूंना त्यातून वाट काढत पळावे लागले.

तर अशा अनेक संकटांमध्ये धावपटूंनी धावण्यास सुरुवात केली. Fred Lorz या धावपटूने आधी झालेल्या बोस्टन मॅरेथॉनमध्ये दोनदा पहिल्या पाचमध्ये क्रमांक मिळवला होता. या धावपटूने ही शर्यत जिंकली. म्हणजे त्यानी तसा दावा केला. दावा केला असे म्हणण्याचे कारण म्हणजे त्याला शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यात त्याला स्नायूंमध्ये पेटके येऊ लागले. मग त्याने पुढील प्रवास एका गाडीमध्ये बसून केला आणि अंतिम रेषेच्या अलीकडे गाडीतून खाली उतरून त्याने शर्यत पूर्ण केली. त्याला संयोजकांनी विजयी घोषीतही केले. Lorz ने शर्यत आपण जिंकल्याचा दावा केला पण काही प्रेक्षकांनी त्याचे रहस्य फोडले. Lorz ने ही बातमी खोटी आहे असा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण हे शाबीत झाल्यावर त्याच्यावर आजन्म बंदी घालण्यात आली.

याच शर्यतीत Len Taunyane आणि Jan Mashiani हे दोघे कृष्णवर्णीय आफ्रिकेतील आदिवासी जमातीतील धावपटू सामील झाले होते. ऑलिंपिकमध्ये सामील झालेले हे दोघे पहिले कृष्णवर्णीय आफ्रिकन.

Taunyane आणि Jan Mashiani

शर्यतीत दुसरा नंबर पटकावला Thomas Hicks याने. Hicks हा व्यवसायाने विदुषक होता. २० व्या मैलाला Hhicks ला प्रचंड तहान लागली. त्याने आपल्या सहकार्‍यांना पाणी मागितले. पण त्याला पिण्यासाठी पाणी देण्याऐवजी त्याच्या सहकार्‍यांनी त्याचे अंग ओल्या स्पंजने पुसून काढले. त्याला पळण्यासाठी उर्जा मिळावी यासाठी त्याच्या सहकार्‍यांनी त्याला पळताना अंड्याच्या पांढर्‍या बलकाबरोबर उत्तेजना देणारे एक औषध दिले. पण झाले भलतेच. Strychnine नावाचे हे औषध वापरले जायचे उंदीर मारण्यासाठी. त्याने त्याला विषबाधा झाली. त्याचा पळण्याचा वेग मंदावला. शेवटचे दोन मैल राहिले असताना त्याला त्याच्या सहकार्‍यांनी Strychnine ब्रॅंडीमध्ये मिसळून दिले. याने त्याला थेडी तरतरी आली. पण शेवटी त्याच्या सहकार्‍यांनी त्याला चक्क उचलून शर्यत पूर्ण केली. Lorz चा खोटेपणा शाबीत झाल्यावर Hicks ला विजयी घोषीत केले.

अर्ध्या शर्यतीच्या दरम्यान Miller नावाचा धावपटू सगळ्यात पुढे होता. त्याच्या मागे Newton आणि Hicks होते. Miller ला पायामध्ये पेटके येऊ लागले. त्यातच त्याने शर्यतीत एका ठिकाणी चुकीचे वळण घेतले. आता परत वळून पुन्हा शर्यतीत पळण्याचा त्याला कंटाळा आला व त्याने शर्यत सोडून दिली. Newton हा एकमेव धावपटू होता ज्याने कुठलीही गडबड न करता ही शर्यत तिसर्‍या क्रमांकाने पूर्ण केली.

१९ व्या मैलाला आणखी एक दुर्घटना घडली. William Garcia नावाचा धावपटू हा चौथ्या क्रमांकावर होता. तो पळताना अचानक खाली पडला. त्याला तेथेच रक्ताची उलटी झाली. त्याला ताबडतोब दवाखान्यात नेण्यात आले. तो अगदी मरणाच्या दारातून परत आला.

Andarin Carabjal या क्युबन धावपटूने ही शर्यत चौथ्या क्रमांकाने पूर्ण केली. त्याने क्युबात पळून जमवलेले पैसे अमेरिकेत आल्यावर जुगारात खर्च केले. त्याला शर्यतीत घालण्यासाठी योग्य असे कपडे देखील उरले नाहीत. शेवटी त्याने घातलेली फूल पँट अर्धी कापली. हा पळत असताना रस्त्याच्या बाजूला एका फळाच्या दुकानातून सफरचंद घेतले. पण ते कच्चे असल्याने ते खाल्ल्यावर त्याच्या पोटात पेटके येऊ लागले. मग पठ्ठ्याने काहीवेळ रस्त्याच्या बाजूला डुलकी घेतली. जागा झाल्यावर त्याने मग शर्यत पूर्ण केली.

Andarin Carabjal

तर अशी ही १९०४ साली झालेल्या ऑलिंपिकमधील शर्यतीची कथा.

वेदनेच्या पलीकडे

मानवाने आपल्या उत्क्रांतीच्या दरम्यान अनेक विषयांचे ज्ञान प्राप्त केले आहे. त्यातले मानवाच्या दृष्टीने महत्त्वाचे ज्ञान आहे आरोग्य विषयाचे. रोग व त्यांच्यावरील औषधे यांच्या शोधाच्या कथा अकल्पीत आहेत. तसाच आणखी एक महत्त्वाचा शोध म्हणजे शस्त्रक्रिया. शस्त्रक्रिया ही प्रक्रिया अतिशय वेदनादायी असते. भूल देण्याचे तंत्र विकसित होण्याआधी अफूसारख मादक पदार्थ वापरले जात. अर्थातच ते माफक प्रमाणातच वापरावे लागत आणि त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यावर अनेक मर्यादा होत्या. भूलीचे तंत्र विकसित होण्याआधी शरीराच्या आतील भागांच्या शस्त्रक्रिया तर शक्यच नव्हत्या. होणार्‍या वेदनांना आणि शस्त्रक्रिया करताना वापरले जाणारे चाकू यांना घाबरून रुग्ण शक्यतो शस्त्रक्रिया करणे टाळत असत. १९ व्या शतकाच्या मध्यात क्लोरोफॉर्मचा शोध लागे पर्यंत ही अशीच स्थिती होती.

पण हा काही आजचा विषय नाही. आजचा विषय आहे तो इस्ट इंडिया कंपनीने नेमलेल्या Dr. James Esdile या स्कॉटिश डॉक्टरचा. हा रेव्हरंट James Esdile चा थोरला मुलगा. त्याने एडिनबर्ग विद्यापीठातून M.D. ही वैद्यकीय पदवी घेतली. त्यानंतर त्याची नेमणूक इस्ट इंडिया कंपनीच्या वैद्यकीय विभागात झाली आणि १८३० साली तो कलकत्ता येथे आला. जेम्सला दम्याचा त्रास होता आणि भारतातील हवामान आपल्याला मानवेल या भावनेने तो भारतात आला. मात्र उत्तर प्रदेशमधील आझमगढ येथे काम करताना त्याला दम्याचा मोठा झटका आला आणि त्याने दोन वर्षांची रजा घेतली. १८३९ साली तो जेव्हा पुन्हा कामावर रुजू झाला तेव्हा त्याची नेमणूक हुगळीच्या इमामबाडा हॉस्पिटलात झाली.

एकदा जेम्सच्या वाचनात इंग्लंडमधील एका शस्त्रक्रियेविषयी माहिती आली. तेथील एका वैद्याने संमोहनशास्त्राच्या आधारे भूल न देता ही शस्त्रक्रिया पार पाडली होती. ही माहिती वाचल्यावर जेम्सला या विषयात अतिशय उत्सुकता निर्माण झाली आणि त्याने हुगळीच्या त्या हॉस्पिटलमध्ये याचा प्रयोग करण्याचे मनात घेतले. जेम्सला संमोहन शास्त्राविषयी फारशी माहिती नव्हती. हुगळी येथील एका हायड्रोसीलच्या शस्त्रक्रियेच्या दरम्यान रुग्णाला झालेल्या वेदना बघून तर त्याने हा प्रयोग करण्याचे मनात पक्के ठरवले.

त्याचा पहिला पेशंट होता रस्त्याच्या कामावर असलेला हायड्रोसीलचाच रुग्ण असलेला एक कामगार. ४ एप्रिल १८४५ रोजी त्याने संमोहनाचा पहिला प्रयोग केला. जेम्सने पुढे लिहिलेल्या Mesmerism in India या पुस्तकात त्याने त्याचे वर्णन केले आहे.

त्याचे दोन्ही गुडघे माझ्या दोन पायांमध्ये ठेवून त्याला डोळे मिटावयास सांगितले.मी माझा हात त्याच्या चेहर्‍यावरून ते खाली पोटापर्यंत सावकाश फिरवू लागलो. साधारणतः अर्धा तास हा प्रकार मी केला. पण रुग्णाच्या परिस्थितीत काहीही फरक पडला नाही. अजून १५ मिनिटे मी हा प्रकार चालू ठेवला तरीही मला अपेक्षीत असा कुठलाही बदल रुग्णात दिसला नाही. निराश होऊन मी माझा प्रयोग फसल्याचे जाहीर केले. मग मी शांतपणे बसलो आणि काय चुकले असावे याचा विचार करू लागलो. माझे लक्ष रुग्णाकडे गेले आणि मी त्याला डोळे उघडावयास सांगितले. त्याने डोळे उघडले आणि तो म्हणाला ’मला संपूर्ण खोली धुराने भरल्यासारखी दिसत आहे’ माझी उत्सुकता पुन्हा चाळवली आणि मी माझे हात त्याच्या डोक्यापासून छातीपर्यंत आणून येथे थोडा दाब दिला. त्याने मांडीपाशी असलेल्या त्याच्या हातांनी माझे हात दाबले. ही प्रक्रिया पुढे तासभर चालू ठेवली. त्यानंतर त्याला झोप येत असल्याचे त्याने सांगितले. याचवेळी मला जाणवले की त्याच्या जाणीवा कमी होत चालल्या आहेत व त्याच्या प्रतिक्रियाही विसंगत झाल्या आहेत.

जेम्सने यानंतर शस्त्रक्रिया पार पाडली. शस्त्रक्रिया करताना रुग्णाला कुठल्याही वेदना झाल्या नाहीत. यानंतर जेम्सने रुग्णांना संमोहित करून शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. १८४५ ते १८४७ या दोन वर्षांमध्ये जेम्सने वेगवेगळ्या अशा ३०० शस्त्रक्रिया पार पाडल्या.

२२ जानेवारी १८४६ साली त्याने The Englishman या वृत्तपत्राच्या संपादकाला एक अहवाल पाठवला. त्यात त्याने संमोहनाखाली पार पडलेल्या मागील आठ महिन्यातील शस्त्रक्रियांची यादीच दिली आहे. अहवालाच्या सुरुवातीस तो म्हणतो

माझ्या गेल्या आठ महिन्यातील संमोहनाखाली केलेल्या शस्त्रक्रियांची माहिती मी देत आहे. संमोहनाखाली मी पार पाडलेल्या शस्त्रक्रियांमुळे येथील स्थानिक रुग्णांना मोठा फायदा झाला आहे. शस्त्रक्रियेच्या होणार्‍या वेदनेपासून मुक्ती याशिवाय अनेक फायदे त्यांना मिळाले आहेत. असे उपचार त्यांना मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि त्यापासून त्यांना वंचित ठेवता येणार नाही.

जेम्सने केलेल्या शस्त्रक्रियांपासून रुग्णांमध्ये खरोखरच आश्चर्यकारक परिणाम दिसून आले. मुळात शस्त्रक्रिया करताना त्यांना कुठल्याही वेदना झाल्या नाहीत. जेम्सने संमोहनाखाली केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये एकही रुग्ण दगावला नाही. शस्त्रक्रियेनंतरही जखमांना कुठलाही संसर्ग झाला नाही आणि रुग्ण लवकर बरे झाले.

जेम्सने संमोहनाखाली शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. त्याने कलकत्त्यामध्ये संमोहनाखाली उपचार देणारा एक दवाखानाही उघडला. पण पुढे १८४९ साली जेम्सची नेमणूक इस्ट इंडिया कंपनीच्या आरमारी विभागात केली गेली. १८५३ साली जेम्स निवृत्त झाला आणि तो लंडन येथील संमोहन इस्पितळाचा संचालक झाला. १० जानेवारी १८५९ साली जेम्सचा मृत्यू झाला.

याच काळात भूलशास्त्राची वेगळी शाखा विकसित झाली आणि जेम्सने केलेले हे प्रयोग मागे पडले.

Happy Birthday To You ची गोष्ट

जगात सर्वात जास्तवेळा गायलं जाणारं गाणं कुठलं असं विचारलं तर सगळ्यांची उत्तरं वेगवेगळी असतील पण जगातलं सर्वात जास्त वेळा गायलं जाणारं गाणं आहे ‘Happy Birthday To You’. आणि सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करताना वेगवेगळ्या (बे)सुरात आपण जे गाणं गातो ते त्याची सरासरी वार्षिक कमाई जवळपास २०,००,००० अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.

पण या गाण्याची जन्मकथा थोडी वेगळी आहे. अमेरिकेतल्या केंटुकी शहरात रहाणाऱ्या Mildred J. Hill and Patty Smith Hill या दोन बहिणी लहान बालशिक्षण या क्षेत्रात कार्यरत होत्या. Patty Smith Hill ने त्या काळात अनेकविध प्रयोग करून मुलांना कसे शिकवावे याच्या नवीन पद्धती शोधून काढलेल्या होत्या. तर Mildred J. Hill ही तिची थोरली बहीणही या क्षेत्राबरोबरच संगीत क्षेत्रातही कार्यरत होती.  Mildred ज्या शाळेत शिकवत असे त्याच शाळेची Patty मुख्याध्यापिका होती.

Mildred J Hill आणि Patty Smith Hill

एके दिवशी Mildred नं एक धून तयार केली आणि Patty नं त्यात शब्द भरले. एकुणात यातून जे काही गाणं तयार झालं ते असं होतं –

Good morning to you,
Good morning to you,
Good morning, dear children,
Good morning to all.

याला आता तुम्ही आता ‘Happy birthday to you’ च्या चालीवर म्हणून बघा. या ओळी एकदम मीटरमध्ये बसतात आहेत हे तुमच्या लक्षात येईल. आणि हे स्तवन/कवन शिक्षकांनी शाळेत मुलांच्या स्वागतासाठी गायचं आहे हे विशेष.(आठवा : शाळेत असताना आपण उन्हात उभे राहून गायलेल्या  ‘सुरेल’ प्रार्थना)

पण लौकरच गाण्याचा ‘कर्ता’ बदलून हे गाणं नवीन रुपात आलं ते असं – Good morning to you,
Good morning to you,
Good morning, dear teacher,
Good morning to you.

आता यातले मूळचे शब्द बदलून यात ‘Happy birthday to you’ हे शब्द कुणी घातले याबद्दल नक्की माहिती कळत नाही. पण ब्रॉडवे, रेडिओ सगळीकडं Mildred च्या धूनवरचं Happy birthday to you ऐकू येऊ लागलं. ही गोष्ट आहे साधारणतः १९३० च्या दशकातली. या वेळेपावेतो Mildred काही जिवंत नव्हती पण तिची सगळ्यात लहान बहीण Jessica जिवंत होती. तिने ही धून वापरण्याबद्दल आक्षेप घेऊन कोर्टात केस दाखल केली आणि ती जिंकली देखील. म्हणजे या धूनचं कॉपीराईट तिला मिळालं. वेळोवेळी त्याचं रिन्युअल होऊन आणि कॉपीराईट कायद्यातल्या बदलांमुळे आता २०३० पर्यंत या गाण्याचे अधिकार सुरक्षित राखले गेले आहेत. हे कॉपीराईट ट्रान्सफर होत होत सध्या Warner Music Group या कंपनीच्या अखत्यारीत आहेत आणि आधी म्हटल्याप्रमाणे दरसाल सुमारे २० लाख अमेरिकन डॉलर्स एवढी कॉपीराईट फी हे गाणं कंपनीला मिळवून देतं. ही रक्कम Hill foundation या संस्थेला मिळते आणि ती सामाजिक कामासाठी खर्च केली जाते.

आता ‘हे गाणं आपण म्हणतो तेंव्हा कॉपीराईटचा भंग होतो काय?’ या तुमच्या मनातल्या प्रश्नाचं एकदम कडक आणि कायदेशीर उत्तर –
Royalties are due, of course, for commercial uses of the song, such as playing or singing it for profit, using it in movies, television programs, and stage shows, or incorporating it into musical products such as watches and greeting cards; as well, royalties are due for public performance, defined by copyright law as performances which occur “at a place open to the public, or at any place where a substantial number of persons outside of a normal circle of a family and its social acquaintances is gathered.” So, singing “Happy Birthday to You” to family members and friends at home is fine, but performing a copyrighted work in a public setting such as a restaurant or a sports arena technically requires a license from ASCAP or the Harry Fox Agency.

तुम्ही हे पूर्ण वाचलं नसणारच हे माहीत आहे म्हणून सांगतो – तुम्हाला याचा एक रुपया सुद्धा भरायचा नाहीये. त्यामुळं पुढच्या वेळी आपल्या घरच्या मंडळींच्या/मित्रांच्या birthday celebration ला हे कोट्यावधी रुपयांचं गाणं मन आणि गळा दोन्हीही मोकळं सोडून गायला अजिबात हयगय करू नका !

यशोधन जोशी

ऐतिहासिक मूत्रविसर्जन

सन १९४१ दुसरे महायुद्ध ऐन भरात आले होते. जर्मनीने इंग्लंडवर जोरदार बॉम्बहल्ले चालवले होते. ब्रिटन मधील एका घराच्या छतातून एक जर्मन बॉम्ब आतमध्ये पडला. घरात घराचा मालक आणि ज्युलिआना नावाची त्याची ग्रेट डेन जातीची कुत्री दोघेच होते. आता बॉम्ब फुटणार तेव्हढ्यात ज्युलिआना उठली आणि तिने आपल्या मुताची धार त्या बॉम्बवर सोडून दिली. फुरफुरणारा बॉम्ब अर्थातच विझला आणि दोघांचे प्राण वाचले. ही बातमी पोहोचली ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे. ते सुद्धा ही बातमी ऐकून अचंबित झाले. त्यांनी ज्युलिआनाला मानाचे ब्लू क्रॉस पदक बहाल केले. याआधी ब्लू क्रॉस हे पहिल्या महायुध्दात चांगली कामगिरी करणार्‍या घोड्यांना देण्यात येत असे. ज्युलिआना ही पहिली कुत्री होती जिला ब्लू क्रॉस मिळाला.

पण ज्युलिआनाची धैर्याची कहाणी इथेच संपत नाही. १९४४ साली तिच्या मालकाच्या दुकानाला आग लागली असताना तिने आपल्या मालकाला भूंकून इशारे दिले. या बद्दलही तिला आणखी एक पदक मिळाले.

ब्रिस्टॉल येथील एका घराच्या झाडाझडतीत तिला मिळालेले दुसरे पदक आणि तिचे जलरंगात काढलेले चित्र मिळाले. चित्राच्या खालील भागात तिने विझवलेल्या बॉम्बची कथा तर पदकावर आग लागलेल्या दुकानाची हकिकत होती. ह्या गोष्टी लिलावात विकल्या गेल्या आणि लिलाव करणार्‍यांनी त्याची जाहिरात करताना ज्युलिआनाबद्दल ’A Great Dane with a great bladder’ असे वर्णन केले.

दुर्दैवाने १९४६ साली ज्युलिआना विषबाधेने मरण पावली.

पोलीसमामांची पहिली ‘कामगिरी’

एका ऐतिहासिक घटनेला नुकतीच १२५ वर्षं पूर्ण झाली. तशी ती घटना ऐतिहासिक असली तरी एकमेवाद्वितीय वगैरे नाही. कारण आपल्यापैकी ९९.९९% लोकांनी अशा घटनेचा अनुभव तर घेतलेला आहेच आणि वरून आपली अक्कलहुशारी वापरून ग्लास फोडल्याचे बारा आणे भरायच्याऐवजी आठ आण्यात भागवल्याचे किस्सेही इतरांना सांगितलेले आहेत. ती गोष्ट म्हणजे ट्रॅफिक पोलिसांनी आपल्याला पकडून फाडलेली पावती.  तर जगाच्या इतिहासात पहिली पावती फाटण्याच्या घटनेला २८ जानेवारी २०२२ ला १२५ वर्षं पूर्ण झाली. आणि हा सन्मान मिळवणारे मानाचे मानकरी आहेत Walter Arnold.

२८ जानेवारी १८९६ रोजी हे Walter Arnold साहेब ताशी ८ मैल (८×१.६ = १२ किमी/तास) अशा महाप्रचंड वेगाने इंग्लंडमधल्या Kent परगण्यातल्या Paddock wood नावाच्या शहरातल्या रस्त्यावरून आपली मोटार हाकत चाललेले होते. या रस्त्यावर मोटार चालवण्याचा कमाल वेग ताशी २ मैल इतकाच होता. Walter Arnold ला इतक्या वेगाने मोटार हाकताना पाहून तिथं कर्तव्य बजावणाऱ्या एका हवालदार साहेबांनी बघितलं आणि त्यांनी ताबडतोब यांवर कारवाई करण्याचा निश्चय केला. त्यांनी लागलीच आपल्या सायकलवर टांग टाकून त्याचा पाठलाग सुरू केला. हवालदार साहेबांनी कर्तव्यात मुळीच कसूर न करता Walter Arnold चा पाच मैल पाठलाग केला आणि अखेर त्याला गाठलं.

आणि Walter Arnold साहेबांवर खटला दाखल झाला. हा वेगळ्या प्रकारचा खटला निरनिराळ्या कलमांखाली एकूण ४ कोर्टात चालला आणि अखेर Walter Arnold यांना एकूण २ पौंड ११पेन्स इतका दंड ठोठावण्यात आला. या ऐतिहासिक घटनेला कारणीभूत ठरलेल्या Walter Arnold पेक्षाही मला कौतुक वाटलं ते त्या कर्तव्यकठोर हवालदार साहेबांचं. त्यांनी प्रकरण ‘मिटवून’ घेण्याचं कौशल्य न दाखवल्याने एका फार मोठ्या ऐतिहासिक घटनेची नोंद कागदोपत्री झाली.

Walter Arnold चालवत होता ती गाडी

Walter Arnold चालवत असलेली गाडी होती मर्सिडीज बेन्झ. Walter Arnold चा मोटारी विकण्याचा धंदा होता, तो जर्मनीतून मर्सिडीज गाड्या आणून इंग्लंडमध्ये विकत असे. पुढं त्यानं स्वतःची Arnold’s Motor Carriage नावाची स्वतःची कंपनी स्थापन केली. पण पुढच्या आयुष्यात Walter Arnold ला पुन्हा कधीही दंड भरायची वेळ आली नसावी कारण इंग्लंडमध्ये १८९६ च्या ऑगस्ट महिन्यात गाडी चालवण्याच्या वेगाची मर्यादा २ मैल प्रतितास वरून थेट ताशी १४ मैल करण्यात आली.

यशोधन जोशी

बडबडगीतांच्या शोधात – Jack and Jill

पाण्याला गेलेल्या Jack आणि Jill ची ही कविता आपण शाळेत जोरजोरात घोकलेली आहे पण जॅक आणि जिल कोण हे आपण कधी शोधलं नाही. तर इतर अनेक गोष्टींसारखीच याची पण दोन-तीन व्हर्जन आहेत. पण सगळ्यात पहिल्यांदा हे गाणं १७६५ ला Mother Goose’s Melody या
लंडनमध्ये छापलेल्या पुस्तकात छापलं गेलं होतं.

जॅक आणि जिलची गोष्ट एखाद्या तालुका लेव्हलच्या पेपरात येणाऱ्या बातमीच्या सुरात सांगायची तर –  इंग्लंडमधल्या Somerset कौंटीतल्या मौजे Kilmersdon या गावात रहाणारा इसम जॅक उमर अदमासे २५ वर्ष धंदा शेती हा गावात असणाऱ्या टेकडीवर पाणी आणायला (पाणी आणायला टेकडीवर? हा प्रश्न मलाही सुटलेला नाही) गेला असता अपघातग्रस्त होऊन मरण पावला. या वेळी गरोदर असलेली त्याची बायको जिल उमर अदमासे २० धंदा घरकाम ही सुद्धा बाळंतपणानंतर मानसिक धक्क्याने काही दिवसांनी मरण पावली.

या गोष्टीत पुढं दुर्दैवी दाम्पत्याच्या मुलाला सगळ्या गावाने मिळून वाढवले आणि त्याने पुढे मोठा झाल्यावर आपल्या आईबापाच्या स्मरणार्थ गावात एक स्मृतीशिळा बसवली.  पण या घटनेचा नक्की काळ मात्र कळलेला नाही.

जॅक आणि जिलच्या गोष्टीचं दुसरं व्हर्जन मात्र भलतंच रक्तरंजित आहे आणि ते जोडलं गेलं आहे फ्रेंच राज्यक्रांतीशी. १७९३ मध्ये फ्रान्सचा राजा King Louis XVI – आणि त्याची राणी Marie Antoinette यांची फ्रेंच राज्यक्रांती दरम्यान क्रांतिकारकांनी गिलोटीनखाली मुंडकी उडवली याचा संदर्भही या कवितेशी जोडला जातो. King Louis XVI उर्फ जॅक याचं राजमुकुट घालणारं मुंडकं उडवलं गेलं आणि त्याच्यापाठोपाठ राणी Marie Antoinette उर्फ जिल हिचंही उडवलेलं मुंडकं गडगडत त्याच्या शेजारी येऊन पडलं.

यातली कुठली गोष्ट खरी असेल ती असो पण एखाद्या दुःखद घटनेची हकीकत ही लहान मुलांची कविता व्हावी आणि पिढ्यानपिढ्या मुलांनी ती गात रहावी हे फारच विस्मयकारक आहे.

यशोधन जोशी

बडबडगीतांच्या शोधात – Mary had a little lamb

शाळेत आपण इंग्लिश शिकायला सुरुवात केल्यावर शिकलेल्यापैकी सगळ्यात पहिली कविता ही बहुधा Mary had a little lamb हीच होती. कवितेतली ही मेरी कोण असावी प्रश्न मला सहज पडल्यावर मी या मेरीबाईंचा शोध घेतला. तर ही आपली नायिका म्हणजे अमेरिकेतल्या Massachusetts राज्यातल्या Sterling या छोट्या शहरात एकेकाळी रहाणारी Mary Sawyer. हिचा जन्म १८०६ सालचा. साधारण १८१५ च्या आसपास आपल्या शेतकरी वडिलांबरोबर शेतात फिरताना या छोट्या मेरीला एक अशक्त आणि आजारी दिसणारं मेंढीचं पिल्लू दिसलं. मेरीनं बराच हट्ट केल्यावर तिच्या वडिलांनी तिला हे आईविना पोर सांभाळायची परवानगी दिली. मेरीच्या मायेमुळे हे पांढरंधोप पिल्लू लौकरच खडखडीत बरं झालं आणि मेरीच्या मागोमाग सगळीकडं हिंडू-फिरू लागलं.

एकदा असंच हे पिल्लू मेरीबरोबर तिच्या शाळेत गेलं आणि तिथं बरंच प्रसिद्धही झालं. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी मेरीच्या गावातला एक मुलगा John Roulstone घोड्यावरून मेरीच्या शेतापर्यंत गेला आणि तिथं त्यानं एक छोटीशी कविता लिहिलेला कागद तिच्या हातात दिला जिच्या ओळी होत्या –

Mary had a little lamb;
Its fleece was white as snow;
And everywhere that Mary went,
The lamb was sure to go.

It followed her to school one day,
Which was against the rule;
It made the children laugh and play
To see a lamb at school.

And so the teacher turned it out;
But still it lingered near,
And waited patiently about
Till Mary did appear.

ही घटना साधारण १८१५-१६ सालातली असावी.एवढं दीर्घ आयुष्य लाभलेल्या आणि जगभर पसरलेल्या या कवितेची उपनायिका असणारी ही मेंढी मात्र काही फार जगली नाही. जेमतेम ४ वर्षाची असताना एका गाईचं शिंग लागून ती ख्रिस्तवासी झाली पण जाण्याआधी तिनं तीन पिल्लं जन्माला घालून आपला वंशवृक्ष कायम राहील याची दक्षता घेतली. ही कविता लिहिणारा John Roulstone ही कमनशिबीच होता, जेमतेम १७ वर्ष जगून तो ही ख्रिस्ताला प्यारा झाला.  पण आपली नायिका Mary Sawyer मात्र पुढं १८८३ पर्यंत जगली आणि तिनंच १८७३ साली ही गोष्ट उघड केली. तोवर ही कविता अमेरिकेत बरीच प्रसिद्ध झाली होती. अर्थात मेरीकडं या आपल्या दाव्यासाठी कोणताही पुरावा नव्हता. पुढच्या काळात अजून दोन मेऱ्यांनी कवितेतली मेरी आपणच असल्याचा दावा केला. पण त्यांच्याकडेही याबद्दल काही पुरावा नव्हता.

पण एडिसननं त्याचा फोनोग्राफ तयार झाल्यावर त्याच्यावर सगळ्यात पहिल्यांदा काय रेकॉर्ड केलं तर ते होतं Mary had a little lamb. एवढी गोष्ट या कवितेची लोकप्रियता समजायला पुरेशी आहे.

यशोधन जोशी

हवीहवीशी ‘हवा’

मला काही दिवसांपूर्वी घरात बसल्या बसल्या फार म्हणजे फारच अस्वस्थ झाल्यासारखं झालेलं होतं इतका अस्वस्थपणा मला पूर्वी मी जेंव्हा (कैकदा) प्रेमात पडलेलो होतो तेंव्हाच आलेला होता. बराच वेळ काय करावं याचा विचार करूनही काहीच न सुचल्यानं मग मी घरात पडलेला एक बबल रॅप घेऊन त्याचा आवाज करत माझ्यातल्या अस्वस्थपणाला वाट काढून दिली. कुठल्याही गोष्टीचा पुरेपूर वापर करायचा आपल्या स्वभावांतच असल्यानं मी या घटनेचाही वापर करून घेतला.

वर्ष १९५७ – अमेरिकेतलं न्यू जर्सी  राज्य Alfred Fielding आणि Mark Chavannes या दोन इंजिनीयर असलेल्या मंडळींनी अगदी सहज म्हणून दोन प्लास्टिकचे पडदे (शॉवर कर्टन) एकमेकांना चिकटवून बघितले पण त्या दोन पडद्यांच्यामध्ये हवा राहिली आणि एखाद्या पापडाला फोड उठावेत तसं त्या पडद्यांवर हवेचे बुडबुडे तयार झाले.

Alfred आणि Mark यांनी हे तयार झालेलं प्रॉडक्ट आधी वॉलपेपर म्हणून खपवायचा प्रयत्न केला पण हा असला विचित्र वॉलपेपर कोणीही घ्यायला तयार झाले नाही मग त्यांनी काही काळ याला ग्रीन हाऊसमध्येही खपवण्याचा प्रयत्न केला पण तिथंही या जोडगोळीला फारसं यश आलं नाही. पण तरीही त्यांनी धीर सोडला नाही आणि या मटेरियलचं उत्पादन सुरूच ठेवलं. त्यासाठी त्यांनी एक कंपनी स्थापन केली जिला नाव दिलं Sealed Air Corp.

काळाचाही आपला असा एक हिशोब असतो. १९६० च्या आसपास IBM कंपनीनं आपला 1401 हा worldwide accounting machine (WWAM) असं बिरुद मिरवणारा संगणक तयार केला. हा जगभरात पोचवण्यासाठी त्यांना सुरक्षित पॅकेजिंग मटेरियलची गरज होती आणि त्यांची नजर पडली या हवेचे  अंगभर हवेचे बुडबुडे असणाऱ्या मटेरिअलवर. त्यांनी या बबल रॅपचा वापर आपले संगणक पॅक करण्यासाठी वापरायला सुरुवात केली आणि अमेरिकाभरातून या बबल रॅपला मागणी येऊ लागली.

Alfred आणि Mark यांनी या प्रॉडक्टचं पेटंट आपल्या नावावर घेतलं व आज Sealed Air Corp जगातली एक नामांकित कंपनी आहे आणि २०२१ मध्ये तिची उलाढाल एकूण ४९०३ दशलक्ष डॉलर्सची आहे. 

तोंडाला ’पाणी’ सुटेल असं पेय

उत्तेजक पेयांचा इतिहास फार मोठा आहे. चहा, कॉफीपासून ते वेगवेगळी मद्य जगभर वेगवेगळ्या प्रकारे प्यायली जात होती आणि आहेत. तरतरी आणणाऱ्या किंवा झिंग चढवणार्‍या पेयांची आकर्षण मानवाला फार पूर्वीपासूनच आहे. काही प्रदेशांमध्ये पेयांऐवजी झाडांची पाने चावून चघळून खाल्ली जातात. कोकाची पाने चघळत राहिल्यावर तुम्हाला झोप येत नाही अशी नोंद ’पॅपिलॉन’ हेन्री शॅरियरने करून ठेवली आहे.

अशाच एका तरतरी आणणार्‍या पेयाची नोंद कॅप्टन जेम्स कूकने करून ठेवली. आहे. जेम्स कूक हा साहसी दर्यावर्दी. जेम्सने आपल्या मोहिमांमधून जगातील अनेक भूभाग उजेडात आणले. या साहसी मोहिमांच्या दरम्यान त्याने शोधलेल्या भूभागांविषयी अनेक बारीकसारीक नोंदी त्याने करून ठेवलेल्या आहेत. स्थानिक लोकांच्या प्रथा, राहणीमान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने या भूभागांचे नकाशे काढले आहेत. तो १७७३ सालातील सप्टेंबरमध्ये आपल्या दुसर्‍या सागरी मोहिमेवर होता. तो जुन्या नकाशांमध्ये दाखवलेल्या ’Terra Australis Incognita’ म्हणजे सध्याच्या ऑस्ट्रेलियाच्या शोधात होता. हा शोध घेताना तो दक्षिण पॅसिफिकमधील सोसायटी आयलंडवर पोहोचला. तेथील स्थानिक आदिवासी लोकांच्या ’टोंगन कावा’ या समारंभाची त्याने नोंद केलेली आहे. तो लिहितो –

’या बेटावरील हे स्थानिक लोक आवा नावाच्या मिरीच्या रोपाप्रमाणे दिसणार्‍या रोपापासून मद्य बनवतात. ही दारू बनविण्याची पध्दत ही अतिशय घृणास्पद आहे. बरीच लोक या झाडाची मुळं किंवा मुळाजवळील खोडाचा तुकडा तोंडात टाकून चावून त्याचा चोथा करतात. चावून चोथा करताना तोंडात बरीच लाळ सुटते. मग ही सगळी मंडळी एका मोठया भांड्यामध्ये चावलेला चोथा आणि लाळ थुंकतात. भांड्यामध्ये पुरेसा चोथा जमा झाला की त्यात प्रमाणामध्ये पाणी मिसळले जाते व हे मिश्रण गाळले जाते. आता ही दारू पिण्यास तयार असते आणि तिची चव मिरीसारखी लागते.’

कावा बनविण्याचे भांडे Credit- British Museum

शेवटच्या वाक्यात जेम्सने त्या पेयाच्या चवीचा उल्लेख केलेला आहे. घृणास्पद असलेल्या या पेयाची चव जेम्सने बहुधा चाखली असावी.

Blog at WordPress.com.

Up ↑