ज्ञानदीप लावू जगी…

आपल्या समाजात आपण ‘यशस्वी’ माणसांचा एक ठराविक साचा तयार केलेला आहे, त्यापेक्षा वेगळ्या माणसाला आपण सहसा गिनतीत घेत नाही.याशिवाय वेळोवेळी आपलं रोल मॉडेल बदलल्याशिवाय आपल्याला स्फूर्ती मिळणार नाही याबद्दल आपल्या ‘मन में पुरा विश्वास’ असतो. पण यांपेक्षाही वेगळी एखादी सक्सेस स्टोरी असावी हे आपल्या ध्यानात येत नाही. १९५३ साली एक वेगळं पुस्तक प्रकाशित झालेलं होतं, त्याच्या विषयामुळेच बहुदा तत्कालीन पुस्तकविश्वाने त्याची दखल घेतली नाही.

हे पुस्तक लिहिलेलं आहे आचार्य नंदन सखाराम कालेकर यांनी. हे कुठल्याही अध्यात्मिक गुरुकुलाचे आचार्य नसून ते ‘नंदन केशभूषा विद्यालयाचे’ हेडमास्तर आहेत. केशभूषा विद्यालय इज सो लो क्लास आणि या विषयावर लिहिण्यासारखं काय आहे? हा प्रश्नही तुम्हाला पडला असेलच. पण मी आधीच म्हटल्याप्रमाणे केस कापायचे शिक्षण देणाऱ्या माणसाला यशस्वीतेच्या साच्यात बसवणे आपल्याला मानवत नाही त्याचा होणारा हा मानसिक त्रास आहे.

नंदन सखाराम कालेकर लिखित या पुस्तकाचे नाव आहे ‘केशकर्तनकला’ अर्थात केशभूषा शास्त्र आणि तंत्र. या पुस्तकाला प्रस्तावना आहे शंतनुराव किर्लोस्करांची, पुस्तकाचे प्रकाशन झालेलं आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्याप्रसंगी पक्षविरोधी भूमिका घेणारे नेते भाऊसाहेब हिरे यांचे. आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे नंदन केशभूषा विद्यालयाचे उदघाटन केलेले होते आचार्य अत्रे यांनी.आता तुमची उत्सुकता थोडी चाळवली असेल कारण किर्लोस्कर, अत्रे अशी मोठी नावं आली. मुख्य पुस्तकाकडे वळण्याआधी आचार्य नंदन सखाराम कालेकर प्रोप्रा.ओ.के. हेअर कटिंग सलून ऑपेरा हाऊस मुंबई ४ यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया.

आचार्यांची घरची परिस्थिती गरिबीची असल्याने ते लहान वयातच केस कापण्याच्या दुकानात कामाला लागले पण वाचण्याच्या आवडीमुळे ते उत्तमोत्तम साहित्य वाचून सुविद्य झाले. स्वउत्कर्ष करण्याच्या ध्यासातून त्यांनी जगातील एक उत्कृष्ट केशभुषक बनण्याचे ठरवले. या विषयातले उच्चशिक्षण घेण्यास ते इंग्लडला जाण्याचे स्वप्न त्यांनी पाहिजे आणि त्या ध्यासातून एका प्रवासी बोटीवर त्यांनी हेअरड्रेसरचे कामही पत्करले. ही सर्व हकीकत खुद्द शंतनूरावांनी प्रस्तावनेत लिहिलेली आहे. विदेशी जाताना पोर्ट सैद बंदरातून त्यांनी शंतनूरावांना पत्र लिहून आपली हकीकत कळवली कारण आचार्य स्वतः किर्लोस्करचे वाचक होते. शंतनूरावांनी त्यांना शुभेच्छा देऊन स्वतःचे अनुभव लिहून किर्लोस्करला पाठवण्याचे सुचवले. त्याप्रमाणे आचार्यांचे दोन लेख किर्लोस्करमध्ये १९३६ साली छापूनही आले. किर्लोस्करचा त्याकाळातला दर्जा पहाता ते लेख उत्तम होते समजायला हरकत नसावी. आजच्या संपादनविश्वातल्या मंडळींनीही असे प्रयोग करून बघायला हरकत नाही.

पुस्तकाचे मनोगत लिहिताना आचार्य प्रथम संत सेना महाराजांचे स्मरण करून आपल्या विविध गुरूंचे आभार मानत आपला प्रवास थोडक्यात सांगतात. शिवाय आपल्या लिखाणाच्या उर्मीचे श्रेय दत्तू बांदेकर, मामा वरेरकर आणि आचार्य अत्रे यांच्या नावे जोडतात. इतरही अनेक नामांकित पत्रकार आणि संपादकांचा नामोल्लेख करून ‘पुष्पासंगे मातीस वास लागे’ अशी नम्र भावनाही व्यक्त करतात. हे पुस्तक लिहिण्याचा आचार्यांचा उद्देश म्हणजे आपल्या व्यवसायबंधूंना मार्गदर्शन आणि सामाजिक ऋणातून मुक्त होणे असा उदात्त आहे.

पहिल्या धड्यात आचार्य केशसंवर्धन आणि केशरचना यांचा इतिहास सांगतात. ते म्हणतात केशसंवर्धन आणि केशरचना या कष्टसाध्य कला आहेत. शिल्पकला,चित्रकला वगैरेंचे जसे तंत्र असते त्याप्रमाणे यांचेही तंत्र आहे. या कलेला इतकी वर्षे योग्य तो मान मिळाला नाही, शास्त्राचा दर्जाही दिला गेला नाही याचे कारण केवळ उच्चवर्णीय लोक नसून नाभिक समाजाचे अज्ञान, शिक्षणाचा अभाव आणि त्यांची या कलेविषयीची बेफिकीर वृत्ती हे ही आहे. पण नवीन पिढीला याचे महत्त्व पटलेले आहे आणि तिला आता जनाश्रय लाभत आहे हे सुद्धा नमूद करतात.( आताची गल्लोगल्ली झालेली चकचकीत सलून, पार्लर आणि स्पा बघून आचार्यांना विशेष आनंद झाला असता)

या कलेच्या प्राचीनत्वाची माहीती देताना ते वासुदेव गोविंद आपटे यांनी मनोरंजन मासिकात लिहिलेल्या प्राचीन ग्रंथांच्या आधारे स्त्रियांच्या केशभूषा व पद्धती या लेखाचा संदर्भ देतात. यानंतर आपल्याकडचा माहितीचा खजिनाच आचार्य उघडतात. अथर्ववेदात एक मंत्र आहे ज्याच्यात अशी प्रार्थना केलेली आहे – लांब आणि दाट केसांनी आमची मस्तकं झाकली जावीत, शतपथ ब्राह्मणात मात्र लांब केसांवर टीका केलेली आहे. यावरून आचार्यांचा व्यासंग खोलवर असल्याचे दिसते.

प्राचीन ग्रीस आणि रोममध्ये हा व्यवसाय फक्त केस कापण्यापुरता मर्यादित नव्हता तर ते सामाजिक एकत्रीकरणाचे ते एक ठिकाणही होते. ही मंडळी डोळे,नाक,कान वगैरेंच्या शस्त्रक्रियाही करत शिवाय पायाच्या भोवऱ्या (कुरूपे) काढणे वगैरे कार्यही करत. (यांवरून मला कोल्हापुरातले एक जुने केशकर्तनालयवाले चामखीळ काढून देत त्याची आठवण झाली) आचार्य हे मुळातच अभ्यासू गृहस्थ असल्याचे त्यांच्या कलेचा इतिहास सांगण्यावरून दिसून येते. आर्किओलॉजी, समाजशास्त्र, सामाजिक आणि राजकीय इतिहास अशा विविध अंगांनी ते या कलेचा वेध घेतात.

Barber हा शब्द मूलतः Barba म्हणजे दाढीवरून आलेला आहे, दाढीची निगा राखणारा तो Barber अशी व्युत्पत्ती आचार्य मांडतात. ही कला प्राचीन ग्रीसमधून जगभर पसरली असं त्यांचं मत आहे. (आठवा : लिओनायडस आणि मंडळी, स्पार्टावाले)एखाद्या व्यक्तीच्या केसाचा वापर करून त्याच्यावर जादूटोणा करणे व त्याचे प्राण घेणे (अर्थात केसावरून स्वर्गाला धाडणे) हे प्राचीनकाळी रूढ होते. दाढी हे बुद्धीचे, आरोग्याचे आणि पौरुषाचे लक्षण आहे. (इथं आपल्यापैकी अनेक पुरुषांनी स्वतःलाच भले बहाद्दर म्हणून पाठ थोपटून घ्यायला हरकत नाही, यात धांडोळाकारही आलेच) अशा प्रकारचे अनेक समज केसांत घर करून बसलेले होते असं म्हणून आचार्य आपल्यातल्या विनोदबुद्धीचे दर्शन घडवतात.

प्राचीन रोममधले बालकांच्या जावळाचे विधी वगैरेची माहिती देत ते शत्रूच्या हाती दाढी सापडून आपले सैनिक बंदी बनू नयेत म्हणून अलेक्झांडरने त्यांना दाढी राखायला मनाई केलेली होती, त्याशिवाय एखाद्याची दाढी छाटणे म्हणजे विटंबना म्हणून ज्युलिअस सीझरने त्याने पराजित केलेल्या गॉल लोकांच्या दाढ्या छाटलेल्या होत्या ही नवीनच माहिती आचार्य देतात. १८व्या शतकाच्या सुरुवातीला रशियाचा राजा पीटर द ग्रेटने त्याच्या राज्यातल्या दाढीधारी मंडळींच्या दाढीवर कर बसवलेला होता आणि तो न भरल्यास दाढी छाटली जाई. (आपल्याकडे असं काही केल्यास नोव्हेंबर महिन्यात सरकारी महसुलात मोठी वाढ होईल, त्याशिवाय इन्कम टॅक्स भरल्याच्या पोष्टी ज्याप्रमाणे फेबुवर येतात तशा याच्याही येतील. शिवाय दर अर्थसंकल्पात आम्हा वर्षानुवर्षे दाढी राखणाऱ्या मंडळींसाठी काही सवलतही मायबाप सरकार जाहीर करेल) इंग्लडचा राजा ८व्या हेन्रीनेही दाढीवर कर बसवलेला होता, तो भरल्याचा पुरावा म्हणून एक बिल्ला करदात्याला दिला जाई. तो दाढीत अडकवत की खिशात ठेवत हे मात्र कळत नाही.

युरोपात वैद्यकीय व्यवसाय आणि शस्त्रक्रिया या धर्मगुरू करत आणि त्यांना मार्गदर्शन नाभिक (barber surgeon) करत. पुढे शस्त्रक्रियानिपुण नाभिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आणि धर्मगुरूंना केवळ प्रवचनाचेच काम उरले. पोप अलेक्झांडरनेही धर्मोपदेशकांना शस्त्रक्रिया करण्यास मनाई केली होती कारण त्यात मोठ्या प्रमाणावर रक्तपात होई.

१३व्या शतकात लंडन नाभिक संघ अर्थात Barber’s Company of London ची स्थापना झाली. त्यांनी व्यवसायाचे नियम बनवले तसेच अननुभवी लोकांवर नियंत्रण आणले. त्यांना राजसत्तेचाही पाठींबा होता. शस्त्रक्रियाकरांनी नाभिकांच्या धंद्यात हस्तक्षेप करू नये असा कायदाही तेंव्हा करण्यात आला होता. शस्त्रक्रियाकारांना व्यवसायासाठी जी सनद दिली जाई त्यावर गव्हर्नर आणि दोन नाभिकांच्या सह्या असत. १८व्या शतकात मात्र वैद्यकीय व्यवसाय पूर्ण उदयाला आला आणि नाभिकांची शास्त्रक्रियेपासून ताटातूट झाली. या काळापर्यंतचा इतिहास सांगून आचार्य पहिला धडा संपवतात.

आचार्य स्वतः हात काळे करून शिकलेले असल्याने ते बारीकसारीक माहिती उत्तम देतात. हे पुस्तक वाचताना लहानपणापासून केशकर्तनालयात पाहिलेली वेगवेगळी साधनं, ती वापरण्याण्याची केक (केशकर्तनालय) वाल्यांची स्टाईल अगदी डोळ्यांपुढे उभी रहाते. पुढचा धडा हा नाभिक समाजाच्या वापरातील हत्यारांबद्दल आहे. यात वस्तऱ्यापासून सुरुवात करून कातरी, स्प्रिंगची मशीन( क्लिपर्स), इलेक्ट्रिक क्लिपर्स इ ची सविस्तर माहिती ते देतात. ते झाल्यावर कंगवे/फण्या केस झाडायचे ब्रश, धार लावायचे दगड व चांबड्याचे/कॅनव्हासचे पट्टे, साबणाचा फेस काढायचे (अर्थात दाढीचे) ब्रश वगैरे दुय्यम साधनांचीही ते माहिती देतात.

फौजेत नव्यानेच भरती झालेल्या रंगरुटांना हत्यारं वापरायला शिकवणाऱ्या वस्तादासारखेच आचार्य वस्तऱ्यापासून सुरुवात करून सर्व हत्यारांची भरपूर माहिती सांगतात. वस्तऱ्याची माहिती सांगताना ते या हत्याराच्या देठ,खीळ, कांडे, टांच,खांदा अशा अवयवांची माहिती आकृतीसह सांगतात. आचार्यांच्या उमेदीच्या काळात स्वदेशीची चळवळ जोरात असली तरी ते इंग्लडमधल्या शेफिल्ड येथे तयार झालेले वस्तरे वापरण्याचाच आग्रह करतात. वस्तऱ्याची माहिती सांगून झाल्यावर लगेचच आचार्य त्याला परजण्याची पद्धत शिकवतात तसेच त्यासाठी लागणारे दगड, चांबड्याचे आणि कॅनव्हासचे पट्टे यांचाही तपशील पुरवतात. धार लावण्यासाठीचा बेष्ट दगड म्हणजे ‘स्वाती'(swaty) हे सुद्धा बजावून सांगतात.

आचार्य मुळातच खोलात जाऊन अभ्यास करणारे आहेत. कात्री आणि क्लिपर्स वगैरेची माहिती सांगताना ते क्लिपर्सचं पेटंट कुठल्या अमेरिकन कंपनीकडं आहे हे ते सांगतात. क्लिपर्स आपल्याकडं सर्रास झिरो मशीन म्हणून ओळखले जातात पण याचेही विविध प्रकार आहेत. ते म्हणजे 0000,000,00,0,1,2 आणि 3. त्याचे कोष्टक लिहून कुठल्या मशीनने केस कितव्या भागापर्यंत कापला जातो हे ते सांगतात. इलेक्ट्रिक क्लिपर्स म्हणजे लॉकडाऊनमध्ये ज्याच्या दणादण ऑर्डर टाकून आपण अमेझॉन आणि फ्लिपकार्टचं दुकान आपण चालवलं ते ट्रीमर. ट्रीमर हे तेंव्हापासून होते हे मला या पुस्तकातच कळलं. केस कापण्याचे कंगवे ‘store in cool and dry place’ असा कळकळीचा सल्लाही आचार्य आपल्या व्यवसायबंधूंना देतात.

‘शिंव्हास जशी आयाळ तशी पुरुषास दाढी’ असं कुणीतरी म्हटलेलं माझ्या पक्कं लक्षात आहे. पुढच्या धड्यात आचार्य दाढी करण्याबद्दल विशेष सविस्तरपणे सांगतात. गिऱ्हाईकच्या चेहऱ्याचा अभ्यास करून, त्याच्या केसाचा प्रकार, त्यांचा पोत इ गोष्टी दाढी करण्यापूर्वी लक्षात घ्याव्यात असा सल्ला ते देतात. ‘घे वस्तरा आणि चालव सपासपा’ असं करू नये हे ही बजावतात. ‘केक'(केशकर्तनालय)मध्ये गेल्यावर आपल्याला जी आदबशीर वागणूक मिळते जसे की खुर्ची पुढं ओढून आपल्याला सन्मानपूर्वक आसनस्थ करणे, सौजन्याने काय करायचं आहे वगैरे चौकशी करणे ही शिकवण आचार्य पुस्तकातून देतात. सध्याचे बहुसंख्य ‘केक’वाले आचार्यांच्या गुरुकुलाचाच वारसा पुढं चालवत असावेत.

आचार्य अतिशय काटेकोरपणे प्रत्येक क्रियेची माहिती सांगतात. साबण लावण्यापासून ते कितीसा जोराने वस्तरा कुठल्या भागावर आणि कोणत्या दिशेने फिरवावा हे एवढ्या सविस्तरपणे सांगतात की क्या कहने ! याशिवाय अर्थबोध व्हावा म्हणून आकृत्याही काढून दाखवतात. आपण इतकी वर्षं हा प्रयोग आपल्यावर करून घेतोय पण हे आपल्या लक्षातही आलं नाही हे मला प्रकर्षानं जाणवलं. शिवाय एवढी सगळी खबरदारी घेऊनही रक्तपात झालाच तर उपाय सांगताना पहिला उपाय हा गिऱ्हाईकाची माफी मागणे हाच आहे असंही ते म्हणतात.

पुढच्या धड्यात आचार्य केशकर्तनकलेची माहिती देतात. आधुनिक ‘केक’मध्ये गेले असता शेकडो नक्षीकाम केलेल्या डोक्यांचे फोटो दाखवून आपल्याला अवाक करतात ते सगळं खोटं आहे हे आपल्याला या पुस्तकात समजतं. कारण आचार्यांनी २ प्रकारात आणि ६ उपप्रकारात संपूर्ण केशकर्तनकला बसवून दाखवलेली आहे. हे वर्गीकरण अगदी सोपं आहे, म्हणजे प्रकार १) मध्ये/बाजूला भांग पाडलेले केस आखूड/मध्यम/लांब कापणे आणि प्रकार २) भांग न पाडता उलट फिरवलेले केस आखूड/मध्यम/लांब कापणे. खलास. हा म्हणजे वामनाने तीन पावलात संपूर्ण ब्रह्मांड व्यापून टाकण्याचाच प्रकार झाला. मग नवशिक्याने केस कापताना कशी खबरदारी घ्यावी, हलक्या हाताने, खापे न पाडता कशी केशभूषा करावी वगैरे हितोपदेश आचार्य करतात. प्रत्येक वेळी आचार्य एक गोष्ट आवर्जून सांगतात ती म्हणजे गिऱ्हाईक नाराज न होईल याची खबरदारी घ्यावी. त्यांच्या अफाट जनसंग्रहाचे कारण त्यांचा हा मितभाषी स्वभाव हेच असावे.

दाढी, मिशा आणि ब्रश मारणे या धड्याची सुरुवात आचार्य केशकर्तनादी क्रिया संपल्यावर दाढी,मिशा यांच्या ठाकठिकी संबंधाने विचार करणे आवश्यक आहे अशी पल्लेदार तान घेऊन करतात. दाढी राखणे ही अलीकडे फॅशनच झाली आहे असे म्हणून ते सध्याच्या दाढी टीकाकारांना No Shave November चे प्राचीनत्व सांगतात.म्हणजे ही प्रथा हिरकमहोत्सवी होऊन गेली आहे हे निश्चित. तत्कालीन मिशांचे कट बघताना आपल्याला आपल्या घरातल्या जुन्या फोटोत दिसणारे आपले परिजन आठवतात.

केशविज्ञान आणि शांपू या धड्यात आचार्य एकदम वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून केसांची anatomy, त्यातील घटक द्रव्ये वगैरे शिकवण देतात. शांपूचे प्रकार आणि तो कसा करावा हे सांगून मग पैसे खर्चायला चिकटपणा न करता चांगले शांपू वापरून गिऱ्हाईकांचे समाधान करावे असं म्हणत समेवर येतात. मुखमर्दनकला व स्नायूविज्ञान या धड्यातही आधीच्या धड्यातला टेम्पो टिकवून ठेवत कवटीची रचना वगैरे समजावून सांगत मसाज करण्याच्या कृती व क्लुप्ती उलगडून दाखवतात.

शेवटचा धडा हा केशकर्तनालयासाठीची संकीर्ण माहिती आणि धंदेवाईकास हितोपदेश असा आहे. यात दुकान कुठे काढावे, ते कसे असावे यापासून दुकानाची स्वच्छता, ग्राहकांशी कसे वागावे असा उपदेशात्मक आहे. ‘ग्राहक हा कल्पतरू, तो आपलासा झाला तर भरभराटीला काय तोटा’ असा गांधीजींचा मंत्रच आपल्या भाषेत सांगतात. मालकाने कसे वागावे, कामगारांनी कसे वागावे,धंद्यातील यशाची गुरुकिल्ली म्हणजे वक्तशीरपणा वगैरे नियम सांगत शेवटी आपण कामदारांनी स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे हित साधण्यासाठी वरील सूत्रांचा विचार करावा असं म्हणून आपला हा ज्ञानयज्ञ आटोपता घेतात.

आचार्य नंदन सखाराम कालेकर यांचे कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे आपण कष्टानं साध्य केलेली विद्या, आपलं ज्ञान त्यांनी आपल्या ज्ञातीबांधवांच्या उपयोगासाठी त्यांनी खुलं केलेलं आहे. त्यांच्या लिहिण्यात आपण आता फार मोठे कुणी आहोत हा अहंकार थोडाही झळकत नाही. त्यांनी जो उपदेश त्यांच्या व्यवसायबंधूंना केला आहे तो तमाम मराठी व्यावसायिकांनी अंगी बाणवायला हरकत नसावी. अशा विषयावर आपण कधी लिहू असं मलाही कधीच वाटलेलं नव्हतं पण एक धंदेशिक्षण देणारं एक ऑफबीट पुस्तक म्हणून या पुस्तकाला जरूर महत्व द्यायला हरकत नाही.

यशोधन जोशी

ठिपक्यांची किमया…

आपलं जीवन ठिपक्यांशी घट्ट बांधलं गेलं आहे. कागदावर काढलेली रेघ असो किंवा संगणकावर लिहिलेला मजकूर असो सगळं ठिपक्यांनी बनलेलं आहे. आपण ह्या कृती नेहेमी करत असतो पण आपण या ठिपक्यांना नेहेमी दुर्लक्षित करत आलो आहे. हा लेख आहे तो ठिपक्यांनी एका क्षेत्रात केलेल्या क्रांतीबद्दल. या ठिपक्यांमुळे या क्षेत्रात अमुलाग्र बदल झाला.

छायाचित्र काढणार्‍या कॅमेर्‍याचा शोध लागला आणि प्रकाशाच्या मदतीने छायाचित्र काढली जाऊ लागली आणि ही काढलेली छायाचित्रे रासायनिक प्रक्रिया करून छापताही येऊ लागली. याच बरोबर छपाईच्या क्षेत्रातही प्रचंड प्रमाणात प्रगती होत होती. पण यात एकच उणीव राहिली होती ती म्हणजे छापलेल्या पुस्तकांमधे किंवा वर्तमानपत्रांमधून छायाचित्रे छापण्याचे तंत्र विकसित झाले नव्हते. त्यामुळे जुन्या पुस्तकांमधे छायाचित्र छापलेली दिसत नाहीत. सगळी चित्रे काळ्या रंगाच्या रेषांनी काढलेल्या आकृत्या असतात तशी काढलेली असतं. १८४२ साली राणी व्हिक्टोरीयाचा खुनाचा प्रयत्न झाला होता. त्यानिमित्ताने ’द इलस्ट्रेटेड लंडन न्यूज’ एक अंक प्रकाशित झाला आणि या अंकात चक्क दोन छायाचित्रे छापलेली होती. ही खर्‍याखुर्‍या छायाचित्रांसारखी नव्हती. अशी एका रंगातली आणि केवळ काळ्या व पांढर्‍या रंगातील छायाचित्रे छापण्यास तेव्हापासून सुरुवात झाली. या छायाचित्रांसाठी कंपोजमधे लावण्यासाठी बनवण्यात येणारा ब्लॉक बनवण्याची प्रक्रिया मोठी गमतीशीर पण किचकट होती. यात आधी कलाकार जे छायाचित्र छापायचे आहे त्याचे रेखाचित्र (Sketch) कागदावर बनवत असे. मग या रेखाचित्राची उलटी प्रतिमा तयार करून ती एका मऊ लाकडावर चिटकवली जात असे. मग त्या उलट्या चित्रानुसार कोरक्या त्या लाकडावर ती प्रतिमा कोरत असे. काढलेल्या रेखाचित्राची उलटी प्रतिमा काढणे हे तितके सोपे काम नव्हते. याचे उत्तर शोधले फ्रेंच चित्रकार देगा (Degas) याने. त्याने उलटी प्रतिमा लाकडावर उमटविण्यासाठी ट्रान्सफर पेपर तयार केला. या ट्रान्सफर पेपरवर रेखाचित्र काढले जात असे. हा पेपर ट्रेसिंग पेपरसारखा पारदर्शक असे. या पेपरच्या एका बाजूस कोटिंग केलेले असे. कोटिंग केलेल्या बाजूवर रेखाचित्र काढून ती बाजू लाकडी ठोकळ्यावर ठेवली जात असे व वरचा पेपर काढला की कोटिंग असलेल्या बाजूवर काढलेले रेखाचित्र उलटे उमटे. लाकडावर कोरकाम झाले की तो लाकडी ठोकळा एका मऊ चिकणमातीमधे दाबून त्याचा साचा बनवला जात असे. मग या साच्यात धातू ओतून त्याचा ब्लॉक बनविला जात असे. हा ब्लॉक कंपोजमधे लावून मग छपाई केली जात असे. अशा प्रकारे छापलेली रेखाचित्रे अनेक जुन्या पुस्तकांमधे छापलेली दिसतात. अशी कोरून छायाचित्रे छापणे शक्य झाले तरी खर्‍या फोटोग्राफप्रमाणे छापणे शक्य नव्हते. साधारणतः १८९१ साली अमेरिकेतील वर्तमानपत्रांमधून जवळ जवळ १००० कलाकार आठवड्याला १०००० रेखाचित्रे काढत असत.

द इलस्ट्रेटेड लंडन न्यूजमध्ये छापलेली चित्रे

या समस्येवर उत्तर म्हणून एका इंग्लिश छायाचित्रकाराने छायाचित्र छापण्याची एक नवीन पद्धत विकसित केली. वॉल्टर वुडबेरी हे त्याच नाव. वॉल्टर हा हरहुन्नरी छायाचित्रकार होता. आपल्या इंजिनिअरींगच्या शिक्षणादरम्यानच त्याने सिगरेटचा बॉक्स आणि चष्म्याच्या भिंगांपासून कॅमेरा बनवला होता. हा छायाचित्रकार १८५१ साली चरितार्थासाठी ऑस्ट्रेलियाला गेला. त्याचे चरितार्थाचे काम इंजिनिअरींग मधले असले तरी तो एक व्यावसायिक छायाचित्रकारही होता. याच दरम्यान त्याची ओळख जेम्स पेज नावाच्या माणसाबरोबर जकार्तामधे आपला स्टुडिओ चालू केला. १८६३ साली आजारामुळे वॉल्टर पुन्हा इंग्लंडला परतला. १८६४ साली त्याने पहिल्यांदा प्रकाश व रसायने न वापरता छायाचित्र छापण्याची पद्धत विकसित केली. अर्थात ही पद्धत शोधली गेली ती फोटोग्राफ छापण्यासाठी मात्र या पद्धतीने अनेक प्रती छापणे सहज शक्य झाल्याने ती मुद्रण क्षेत्रातही वापरली गेली. ज्यामुळे एकाच छायाचित्राच्या अनेक प्रती छापणे सहज शक्य झाले. वॉल्टरने शोधलेल्या पद्धतीत प्रारंभी रसायन आणि प्रकाश यांचा वापर केला जात असे. जिलेटीन आणि डायक्रोमेट यांचे मिश्रण एका काचेवर पसरले जात असे. मग त्यावर कॅमेऱ्याने काढलेल्या छायाचित्राची निगेटिव्ह ठेऊन प्रखर अतिनील किरणांच्या सहाय्याने एक्सपोज केले जात असे. एक्सपोज होताना निगेटिव्ह वर असलेल्या वेगवेगळ्या छटांप्रमाणे जिलेटीन वर छायाचित्र एक्सपोज होत असे. गर्द छटेच्या इथे जाड तर फिकट छटेच्या इथे पातळ अशा उंचसखल आकारात छायाचित्र जिलेटीनवर उमटे. त्यानंतर त्यावर पाणी टाकून एक्सपोज न झालेले जिलेटीन धुवून टाकले जात असे. प्रखर अतिनील किरणांमुळे जिलेटीन टणक होत असे. मग ही जिलेटीनची पातळ फिल्म शिशाच्या एका जाड तुकड्यावर ठेवून प्रचंड दाबाखाली दाबली जात असे. टणक जिलेटीनवरचे छायाचित्र मग या शिशाच्या तुकड्यावर उलटे उमटत असे. मग या पट्टीवर जिलेटीन व शाई यांचे मिश्रण टाकून

वुडबरी पध्दतिने बनवलेला शिशाचा ब्लॉक

छायाचित्र कागदावर उमटवले जात असे. शिशाच्या तुकडयावरून छायाचित्रांच्या अनेक प्रती काढता येत असत. पुस्तकांच्या छपाईत हा शिशाचा तुकडा वापरून आता छायाचित्रे छापता येऊ लागली. या शिशाच्या तुकड्याने छापलेली छायाचित्रे ही फोटो पेपरवर छापलेल्या छायाचित्रांप्रमाणे म्हणजे Continuous Tone मधली असत. ही पद्धत वेळखाऊ तसेच महाग असल्याने ती फक्त किमती पुस्तकांमध्ये वापरली जात असे. या पद्धतीने छापलेली छायाचित्रे अतिशय दर्जेदार असत. या पद्धतीला वुडबरीटाईप असे नाव आहे.

वुडबरी पध्दतीने पुस्तकात छापलेली छायाचित्रे

याआधी एका चित्रकाराने केवळ रेषा आणि ठिपके वापरून काढलेल्या चित्रांमधे वेगवेगळ्या छटांचा परिणाम साध्य केला होता. हेन्ड्रीक गोल्डझियस (Hendrik Goldzius) याने काळा हा एकच रंग वापरूनही राखाडी रंगांच्या छटांचे छायांकन आपल्याला त्या चित्रांमधे दिसते. रेषांच्या व ठिपक्यांच्या सहाय्याने त्याने केलेली रेखाचित्रे कमालीची सुंदर आहेत.

हेन्ड्रीक गोल्डझियसने एका रंगात काढलेल्या चित्रांमधे साधलेल्या छटांचे छायांकन

यातूनच प्रेरणा घेऊन छायाचित्रे छापण्यासाठी या आधीच एका संशोधकाने सोपी आणि स्वस्त पध्दत शोधली जिने छपाई क्षेत्रात क्रांती घडवली. आजही छापण्यासाठी हिचं पद्धत वापरली जाते. असे असले तरी त्याचा व्यवसायिक वापर सुरू होण्यासाठी तब्बल ३८ वर्षे गेली.

विल्यम टालबॉट

येथे ठिपके मदतीला आले. विल्यम टालबॉट या एका छायाचित्रकाराने या समस्येवर उपाय शोधला. त्याने १८५१ साली पहिल्यांदा ठिपके वापरून छायाचित्रे छापता येतील अशी एक सोपी पद्धत विकसित केली. वुडबरीने शोधलेल्या पद्धतीने खर्‍याखुर्‍या फोटोग्राफ सारखी छायाचित्रे छापता येऊ लागली तरी ती रोजच्या वर्तमानपत्रांमधून छापण्यासाठी खर्चिक होती. कोरलेल्या लाकडापासून जी रेखाचित्रे छापली जात त्यात एक समस्या होती ती म्हणजे त्यामधे शाईचा काळा आणि कागदाचा पांढरा एवढ्या दोनच रंगांमधे काम करावे लागत असे. काळ्या व पांढर्‍या या दोन रंगांमधील राखाडी (Gray) रंगाच्या छटा मिळत नसत. त्यामुळे खर्‍या फोटोग्राफ सारखे छायाचित्र छापता येत नसे. यावर तोडगा म्हणून विल्यमने अतिशय सोपी पद्धत विकसित केली. ही पद्धत अर्थातच पहिल्यांदा फोटोग्राफ छापण्यासाठी वापरली गेली व त्याचा मुद्रणामधे वापर वर उल्लेख केल्याप्रमाणे नंतर चालू झाला. फोटोग्राफ हे नेहेमी Continuous Tone मधे छापलेले असतात. विल्यमने शोधलेल्या पध्दतीमध्ये ही Continuous Tone मधला फोटोग्राफ हा एक्स्पोज करताना मधे ठिपक्यांची पट्टी ठेऊन अक्षरशः ब्रेक केला जात असे. त्यामुळे एक्स्पोज केलेल्या छायाचित्रात गडद भागात म्हणजे १००% काळ्या रंगाच्या जागी पॅच ९०-८०% भागात क्वाड्राटोन ६०-५०% भागात मिडटोन ३०-२०% भागात क्वार्टर टोन तर ७-५% भागात हायलाईटस अशा प्रकारे ब्रेक केला जाई. यालाच Juxtaposition असेही म्हटले जाते. फोटो कॅमेर्‍यामधेच एक काचेची पट्टी असे. या काचेवर समान अंतरावर असलेले व एकाच आकाराचे ठिपके काढलेले असत. ही ठिपके असलेली काच छायाचित्राला लहान लहान ठिपक्यांमध्ये परावर्तीत करत असे. अशा प्रकारे घेतलेल्या छायाचित्रातील गडद भागातील ठिपके आकाराने मोठे तर फिकट भागातील ठिपके आकाराने लहान असत. यामुळे या छायाचित्रात एक प्रकारचा ठिपक्यांचा पॅटर्न बनत असे. या ठिपक्यांमधील अंतर अतिशय कमी असे. सगळे ठिपके हे काळ्या रंगातच छापले तरी दृष्टिभ्रमामुळे या लहान मोठ्या ठिपक्यांच्या आकारामुळे छायाचित्रात राखाडी रंगाच्या छटांचा भास होत असे. या अशा ठिपक्यांच्या छायाचित्रांवरून ब्लॉक किंवा ऑफसेटच्या धातूच्या प्लेटवरती उतरवून छापणे सहज शक्य होऊ लागले. ही पद्धत अतिशय सोपी आणि स्वस्त होती. विल्यमनी याचे पेटंटही घेतले. मग याच संकल्पनेला धरून मग वेगवेगळे प्रयोग चालू झाले. ठिपक्यांचा आकार लहान करणे, वेगवेगळ्या म्हणजे चौकोनी, गोल, लंबगोल आकाराचे ठिपके वापरणे, ठिपक्यांच्या ओळींचा कोन बदलणे असे बरेच वेगवेगळे प्रयोग केले गेले. विल्यम लेगो या माणसाने प्रिन्स आर्थर यांचे छायाचित्र ही पध्दत वापरून ’कॅनेडियन इलस्ट्रेटेड न्युज’ या वर्तमानपत्रात १८६९ साली पहिल्यांदा छापले.

विल्यम लेगोने छापलेले प्रिन्स आर्थर यांचे छायाचित्र

पण वर्तमानपत्र आणि मुद्रण क्षेत्रात याचा व्यवसायिक वापर चालू झाला तो १८९० साली. या क्षेत्रात काम करणारे जॉर्ज मिसेनबाख (George Meisenbach) आणि फेड्रिक इव्ज (Frederick Ives) यांनिही उल्लेखनीय काम केले आहे. या ठिपक्यांच्या ओळींची संख्या LPI म्हणजे Line per Inch या प्रमाणात मोजली जाते आणि ठिपक्यांची संख्या ही DPI म्हणजे Dots per Inch मधे मोजली जाते. LPI जितका जास्त तितके छापलेले छायाचित्र मुळ फोटोग्राफच्या जवळ जाते. एकरंगी मुद्रणात वापरली जाणारी ही पद्धत नंतर फोर कलर छपाईतही वापरली जाऊ लागली. मुद्रणात वापरले जाणारे चार रंग म्हणजे निळा (Cyan), किरमिजी (Magenta), पिवळा (Yellow) आणि काळा (Black) यांच्या चार वेगळ्या प्लेटसमधे या चारही रंगांसाठी वापरल्या जाणार्‍या ठिपक्यांचा कोन बदलला जातो. फोर कलर मुद्रणाच्या सुरुवातीस हे कोन काय असावे याचे प्रमाणीकरण झालेले नव्हते त्यामुळे बर्‍याचवेळा चित्रांमधे फुलांसारखा एक पॅटर्न येत असे ज्याला Moiré असे म्हणले जाते. मग संशोधनानंतर या ठिपक्यांचे कोन प्रमाणीत केले गेले.

आज हे ठिपके डिजिटल पध्दतीने टाकले जातात. या पद्धतीच्या प्रारंभीच्या काळात ऑफसेटसाठी १००-१२० LPI, लेटरप्रेससाठी बनविण्यात येणार्‍या ब्लॉकला ८०-१०० LPI तर स्क्रिन प्रिंटिंगसाठी ६०-५० LPI वापरले जात असे. आज डिजिटल तंत्रामुळे ऑफसेटसाठी २०० व त्यापेक्षा अधिक LPI वापरून छपाई करणे शक्य झाले आहे.

आता आणखी एका ठिपक्यांबद्दल. लहानपणी हे ठिपके आपण पाहिलेले असतील. लहानपणी मॅंड्रेक्स, फॅंटम यांची कॉमिक्स वाचली असतील तर तुम्हाला या ठिपक्यांची नक्की ओळख असेल. या कॉमिक्समधे छापलेल्या छायाचित्रांमधे एक ठिपक्यांचा पॅटर्न असे. वरती सांगितलेल्या हाफटोन प्रमाणे हे ठिपके लहान मोठे नसत. एकाच आकाराचे ठिपके कॉमिक्समधल्या चित्रांना एक वेगळीच छटा देऊन जायचे. या ठिपक्यांना ’बेन डे डॉट्स’ असे म्हणले जाते. साधारणतः १८३७ सालापासून कॉमिक्स छापण्यास सुरुवात झाली. ‘The Adventures of Obadiah Oldbuck’ या नावाने प्रकाशित झालेल्या या कॉमिक्स पुस्तकाच्या इंग्रजी व्यतिरिक्त अनेक युरोपियन भाषांमधे आवृत्त्या निघाल्या. इंग्रजीतली आवृत्ती यायला चार वर्षे गेली. कॉमिक्स सुवर्णकाळ मात्र चालू झाला तो १९३८ साली पहिल्यांदा जेव्हा ’सुपरमॅन’ हे कॉमिक्स बाजारात आले. बेंजामीन डे (ज्यु.) या रेखाचित्रकाराने बेन डे डॉटस पहिल्यांदा वापरले. एकाच आकाराचे पण वेगवेगळ्या रंगांचे ठिपके एकमेकांवर ओव्हरलॅप करून छापले की एक वेगळाच परिणाम रेखाचित्रांना मिळत असे. त्यानंतर बेन डे डॉटस हे कॉमिक्स मधील रेखचित्रांमधे वापरले जाऊ लागले. बेन डे डॉटस यांचा वापर केवळ कॉमिक्सपर्यंतच मर्यादित होता. पण अमेरिकन पॉप आर्टिस्ट रॉय लिचेनस्टीन (Roy Lichtenstein) याने आपल्या चित्रांमध्ये आणि शिल्पांमध्ये या बेन डे डॉटसचा भरपूर वापर केलेला आहे.

(वरती वर्णन केलेल्या सगळ्या प्रक्रिया या अतिशय त्रोटक आणि त्यातील किचकट तांत्रिक बाजू न देता लिहिलेल्या आहेत.)
तर अशा प्रकारे हे छापलेले ठिपके आपण रोज बघत असतो किंबहूना आपण ठिपक्यांनी छापतही असतो. आपण वापरत असलेले लेझर किंवा इंकजेट प्रिंटरही ठिपक्यांमधेच छपाई करतात. पण या ठिपक्यांचे महत्व आपल्या गावीही नसते. आता जेव्हा वर्तमानपत्रात किंवा एखाद्या पुस्तकात छापलेले छायाचित्र बघाल तेव्हा भिंगामधून हे ठिपके जरूर बघा.
या लेखासाठी संदर्भ म्हणून शोधताना मला एक वेबसाईट सापडली ज्यावर या सगळ्या पध्दतींचे सुंदर सादरीकरण केले आहे. मी त्यांना संदर्भासाठी ही माहिती वापरण्याची परवानगीसाठी मेल पाठवला. सहसा अशा मेलला उत्तर न मिळण्याची शक्यता असते. पण दोनच दिवसांत आभार मानून लेखकानी ही माहिती वापरण्याची परवानगी दिली. तुम्हीही या साईटला जरुर भेट द्या. http://ted.photographer.org.uk/

कौस्तुभ मुद्‍गल

फेस भराभर उसळू द्या !

भारतीय संस्कृतीला वारुणी ही काय नवीन नाही. ऋग्वेदापासून ते महाकाव्यापर्यंत अनेक ठिकाणी वारुणीचे आणि विविध मद्यांचे उल्लेख आपल्याला आढळतात. महत्वाचा उल्लेख सांगायचा तर सीता वनवासात जाताना सीता नदीची प्रार्थना करून वनवासातून सुखरूप परत आल्यावर तुला वारुणी आणि मांस अर्पण करेन असं म्हणते.  पुढच्या काळात मात्र मद्य हळूहळू ‘नतिचरामी’च्या यादीत कधी जाऊन बसलं हे समजलंच नाही. पण भारतीय मद्य आणि वारूणींची माहिती देणारे हजारो संदर्भ आपल्याकडं सापडू शकतील. 

विदेशी मद्य ही भारतात काही नवलाईची गोष्ट नाही सर्वदूर ते उपलब्ध आहे ( आणि प्रोहिबिशन असलेल्या ठिकाणी तर हमखास उपलब्ध आहे)भारतातल्या मोठ्या वर्गाची मद्यप्रेमाची सुरुवात जिथून झाली त्या फेसाळणाऱ्या बिअरची ही कुळकथा…

भटका माणूस एका जागी वस्ती करून रहायला लागला आणि हळूहळू त्यानं नियमितपणे धान्य पिकवायला सुरुवात केली. आता हे पिकवलेलं धान्य साठवून ठेवायची कला अजून त्याला अवगत नव्हती त्यामुळं काही वेळा त्या धान्याला मोड येत काही  वेळा ते ओलसर होऊन खराबही होई.  हे सगळे खटाटोप करताना माणसाला कधीतरी fermentation चा शोध लागला आणि इथंच कधीतरी बिअरचा जन्म झाला. (बिअर कशी करतात वगैरे माहिती मी सांगणार नाही कारण लॉकडाऊनमध्ये हौशी लोकांनी कुठून कुठून माहिती मिळवून आणि आलं वगैरे वापरून हे कुटीरउद्योग करून बघितलेले आहेतच)

कुर्दीस्तान म्हणजे आजच्या तुर्की-इराण-इराकच्या भागात बिअरने पहिला श्वास घेतला (पक्षी : इथंच तिच्यातून पहिल्यांदा बुडबुडे निघाले). युफ्रेटीस आणि टायग्रीस या मानवाला आपल्या काठावर वाढवणाऱ्या नद्यांनी मानवाच्या जीवनातील एका संस्कृतीलाही हातभार लावला. ( हे वाक्य १००% स्वप्रेरणेतून आलेलं आहे, लेखाचा विषय असलेल्या पेयाचा त्यावर कोणताही अधिकार नाही) काही anthropologist च्या मते अन्नाबरोबरच, धान्यापासून तयार होणारी पेये हे सुदधा मानवाच्या शेतीप्रधान होण्यामागचे कारण आहे. 

सुमेरियन संस्कृतीत Ninkasi नावाच्या देवतेचं वर्णन सापडतं. ही देवता प्रजोत्पादन, पीकपाणी, प्रेम आणि युद्ध यांच्याशी संबंधित आहे. याच्याशिवाय हिच्याच खांद्यावर fermentation ची सुद्धा जबाबदारी दिलेली आहे. Ninkasi चा अर्थच lady who fills the mouth असा आहे. प्रजोत्पादनाची देवता असल्यानं ७ मुली आणि २ मुलं असा तिचा पोटमळा बैजवार पिकलेला आहे. दोन मुलांपैकी पहिल्याचं नाव brawler – म्हणजे हाणामाऱ्या करणारा आणि दुसऱ्याचं नाव boaster – म्हणजे बढाया मारणारा अशी ‘विचारपूर्वक’ ठेवली गेलेली आहेत. इसपू १८०० मधल्या एका मातीच्या tablet वर Ninkasi देवतेची दोन गाणी लिहिलेली आहेत. त्यापैकी एकात  brewing ची पद्धत सांगितलेली आहे आणि दुसऱ्यात देवीचे धुंदीचा आनंद दिल्याबद्दल आभार मानलेले आहेत.बिअरसाठी सुमेरियन भाषेत  sikaru, dida आणि ebir अशी वेगवेगळी नावं होती.हळूहळू सुमेरियन संस्कृतीत बिअर घरी करण्याबरोबरच तिचं व्यावसायिकदृष्ट्याही उत्पादन सुरू झालं. सैन्यासाठी उत्तम दर्जाची बिअर तयार केली जाऊ लागली. बिअरचा दर्जा प्रमाणित करण्यात आला. कमी दर्जाची बिअर तयार करणाऱ्याला त्या बिअरमध्येच बुडवून ठार मारलं जाई. Ur नावाच्या एका शहरात brewing चा उदयोग मोठ्या प्रमाणात चालत असे.

इसपू २००० मध्ये बॅबिलॉनियाने (म्हणजे आजचा इराक आणि सिरियाचा प्रदेश) सुमेरियावर हल्ला केला त्यावेळी त्यांनाही हे बिअर तयार करण्याचे तंत्र अवगत झाले. बॅबिलोनियन राजा हम्मूराबीने बिअर निर्मितीसाठी नियम घालून दिले. याला Code of Hammurabi असं म्हणतात. वीस प्रकारच्या बिअर तिथं तयार होत. त्यापैकी ८ बार्लीपासून आणि १२ इतर धान्यांपासून तयार होत.बॅबिलोनियन बिअरचा व्यापार इजिप्तमध्येही करत. तिथल्या सर्वात उत्तम बिअर तयार करणाऱ्या brewery चं नाव होतं beer त्यावरूनच बिअर हे नाव रूढ झाले.

इजिप्तमध्येही उत्तम बिअर तयार होई. Heget नावाच्या तिथल्या प्रसिद्ध बिअरमध्ये आलं, केशर आणि चवीसाठी juniper झाडाची फळे वापरत. हळूहळू इजिप्तमध्ये बिअरचं महत्व वाढत गेलं. औषध म्हणून तर तिचा वापर होईच पण मृताच्या पुढच्या प्रवासासाठी ‘तहानलाडू’ म्हणूनही मृतदेहाबरोबर ती पुरली जाई. Book of Dead ( तेच जे कुठल्या एका ममी सिनेमात दाखवलेलं आहे) नावाच्या पुस्तकात Osiris या मृत्यूच्या देवाला आमंत्रित करून  Heget अर्पण करण्याची एक प्रार्थना आहे. Osiris कडं मृत्यूबरोबरच पुनरुत्पादन, पुनर्जन्म आणि brewing या जबाबदाऱ्याही देण्यात आलेल्या आहेत. ( कला, क्रीडा,सांस्कृतिक  बरोबरच महिलाकल्याण आणि ग्रामीणउद्योग ही खाती पण एकाच मंत्र्याला दिल्यासारखा प्रकार आहे हा!) इजिप्तमध्ये बिअर तयार करण्याची जबाबदारी स्त्रियांवर होती.

Alexander ने इजिप्तवर विजय मिळवला तेंव्हा त्याने ही Heget जरूर चाखून बघितली असावी. हिरोडोट्सने इजिप्तमधल्या लोकांचा उल्लेख करताना ते बार्लीपासून तयार होणारी वाईन पितात असा जो उल्लेख केलेला आहे त्याचा संबंध बिअरशी नक्की जोडता येईल. पुढं रोमनांनीही इजिप्तमध्ये आपलं राज्य प्रस्थापित केलं  ‘द्राक्ष’ संस्कृती जपणाऱ्या रोमनांना सुरुवातीला बिअर फारशी आवडली नाही. पण जसं जसं रोमन साम्राज्य वाढत गेलं तसं द्राक्षांपासून बनवलेली वारुणी मिळणं अवघड होऊ लागलं आणि मग ते ही बिअरकडं वळले. त्यांच्याबरोबर हळूहळू युरोपभर brewing आणि breweries पसरल्या. Viking तर जहाजांवरही बिअर तयार करत आणि ती आपल्या हातून ठार झालेल्या शत्रूच्या कवटीतून पित. Scandinavia मध्ये आजही आपल्या चिअर्ससारखा skal हा शब्द वापरला जातो ज्याचा अर्थ skull हाच आहे. Norse म्हणजे Germanic लोककथात युद्धात मृत्यू आला तर स्वर्ग प्राप्त होतो आणि तिथं बिअरच्या नद्या वहात असतात असेही उल्लेख आढळतात.

इस ६१२ मध्ये ऑस्ट्रीयाच्या सेंट अर्नोल्ड या ख्रिस्ती धर्मगुरूने दूषित पाण्यापासून रोग होतात म्हणून जनतेने बिअर प्यावी अशी चळवळ सुरू केली. या चळवळीला जनतेने अफाट ‘प्रतिसाद’ दिला. या अर्नोल्डच्या मृत्यूनंतर त्याचं प्रेत त्याच्या जन्मगावी नेताना त्याचे भक्तगण रस्त्यातल्या ज्या tavern उर्फ खानावळीत क्षुधा आणि तृषाशांतीसाठी थांबले तिथे अगदी थोडी बिअर शिल्लक होती पण सद्गुरू अर्नोल्डकृपेने त्याच्या भक्तगणांनी यथेच्छ बिअर पिऊनही ती बिअर संपली नाही. यामुळे त्याच्या भक्तांची त्यांच्याबद्दलची श्रद्धा वाढीला तर लागलीच पण चर्चनेही हा अर्नोल्डचा चमत्कार मानून त्याला संतपद बहाल केले. (लोकांकडून प्रेम आणि आदर मिळवण्यासाठी त्यांना बिअर पाजणे हे इथूनच सुरू झाले असावे)

Monks of St. Gallen या स्वित्झर्लंडमधल्या चर्चने ९व्या शतकात पहिली commercial brewery सुरू केली. तीन प्रकारच्या बिअर तिथं तयार होत आणि सामाजिक दर्जानुसार त्यांचे वाटप होई. Celia – ही बिअर गहू आणि बार्लीपासून तयार होई. ती चर्चमधले उच्च लोक आणि महत्वाच्या पाहुण्यांसाठी राखीव असे. Cervisa – ही ओट्सपासून तयार होई आणि धर्मगुरू आणि यात्रेकरुंना दिली जाई. Small – ही हलक्या दर्जाची बिअर गरीब आणि श्रमिक लोकांसाठी असे. याचकाळात बिअर इतकी प्रसिद्ध झाली की दूध आणि पाण्याऐवजी लोक बिअरचा पिऊ लागले. चहा-कॉफीप्रमाणे दिवसातून तीन तीनदा लोक बिअर पित. St. Bartholomew’s hospital या लंडनमधल्या हॉस्पिटलमध्ये सन १६८७ ते १८६०म्हणजे  जवळपास पावणेदोनशे वर्षं सर्व रुग्णांना दररोज हॉस्पिटलच्या brewery त तयार झालेली ३ pint बिअर दिली जाई. 

चर्चबरोबरच व्यावसायिकदृष्ट्याही युरोपभर बिअरचे उत्पादन सुरू झाले. जर्मनीतल्या Hamburg हे तेंव्हा बिअरनिर्मितीत अग्रेसर होते. Reinheitsgebot ही तिथली बिअर अतिशय प्रसिद्ध होती.इंग्लडमध्येही बिअर याच काळात हळूहळू मुळं पसरत होती. १४४५ मध्ये सहाव्या हेन्रीने बिअर उत्पादकांना सवलती आणि व्यवसाय वाढीसाठी मदत करणारा एक हुकूमनामा काढला. व्यावसायिकपणे बिअरचे उत्पादन सुरूच होतं पण अनेक घरातही घरच्यासाठी बिअर तयार केली जाई. ही घरच्या स्त्रीची जबाबदारी असे.  बिअर तयार करणाऱ्या या स्त्रियांना Ale wives म्हटलं जाई. घरात खर्च होऊन उरलेली बिअर या ale wives शेजारीपाजारी आणि जवळपासच्या खानावळीत विकतसुद्धा. (गृहकृत्यदक्ष असणाऱ्या या स्त्रिया शेजारपाजाऱ्यांची आपल्याकडं आलेली भांडी त्यात बिअरच भरून परत पाठवत असाव्यात). आपल्या घरात विक्रीसाठी आहे याची जाहिरात दारावर ‘येथे घरगुती बिअर मिळेल’ अशी करत नसत तर एक छोटा बांबू छपरापाशी आडवा रोवून त्यावर झुडूप अडकवलेलं दिसलं की ‘तहानलेले’ लोक आपापले मोगे तिथून भरून घेत. पुढं या घरगुती बिअरचा दर्जा तपासण्यासाठी टेस्टरसुद्धा नेमले गेले आणि मजेची गोष्ट म्हणजे टेस्टर या मुख्यत्वे स्त्रियाच असत. 

सतराव्या शतकात अमेरिकेत वसाहती वाढू लागल्या तसे काही brewers ही इंग्लडहून अमेरिकेला जाऊन पोचले. सुरुवातीला माल्ट्स वगैरे कच्चा माल ते इंग्लडमधूनच नेत पण नंतर अमेरिकेतल्याच धान्यापासून बिअर निर्मिती केली जाऊ लागली. ज्यांच्याकडे brewery घालण्याएवढे पैसे नसत ते घोडागाडीतून सगळं सामान घेऊन गावोगाव फिरत आणि शेतकऱ्याच्या शेतातच त्याला बिअर तयार करून देत. अशा मंडळींना brew master म्हटलं जाई. ( आपल्याकडं दारात म्हशी पिळून दूध घालणाऱ्या गवळी लोकांचाच हा विदेशी अवतार) त्याकाळात अमेरिकेत ज्या मोठ्या brewery असत त्यांनी केलेल्या उत्पादनाची विक्री करणं त्यांना अवघड जाई कारण रस्ते फारसे नसतंच. औद्योगिक क्रांतीबरोबर ज्या सुधारणा झाल्या त्यात वाहतुकीची सुविधा हा मोठा भाग होता त्यामुळं बिअर सर्वदूर पोचू लागली.

वाफेच्या इंजिनाचा शोध जेम्स वॅटनं १७४४ मध्ये लावला आणि १७४७ मध्ये लंडनच्याMessers Cook and CO नं  त्यांच्या brewery मध्ये वाफेचे इंजिन बसवले. औद्योगिक प्रगतीचा धडाका एवढा जोरदार होता की brewery मधले धान्य बारीक करणे, पाणी पंप करणे वगैरे सगळी कामं यंत्रांनी होऊ लागली. याशिवाय हायड्रोमीटर थर्मामीटर वगैरे या शोधांमुळं कामाची अचूकता वाढली आणि उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं. १७५८ साली जेंव्हा आपल्याकडे मराठे अटकेपार जाताना नदयामागून नदया ओलांडत होते तेंव्हा लंडनच्या Whiteboard Brewery ने विक्रमी ६५,००० बॅरल बिअरची निर्मिती केली होती . इंग्लडमध्ये ट्रेडमार्कचा कायदा आल्यावर पहिला ट्रेडमार्क मिळवण्याचा मानही Red Triangle या बिअरनेच मिळवला होता. लुई पाश्चरच्या pasteurization च्या शोधामुळे दूध दीर्घकाळ टिकवण्याची पद्धत आपल्याला समजली झाली हे आपल्याला माहीत आहे पण या तंत्रज्ञानाचे प्रयोग सुरुवातीला बिअरवरच केले गेले. १८७३ साली Carl Von Linde या Spaten Brewery मध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या उद्योगी गृहस्थानं रेफ्रिजरेशनचा शोध लावला यामुळं मोठ्या प्रमाणात बर्फ तयार करता येऊ लागला. यामुळं बिअरचं आयुष्य वाढलं.

याच काळात ब्रिटिशांनी हळूहळू भारतात पाय पसरायला सुरुवात केलेली होती या नवीन वसाहतीतल्या गरम वातावरणासाठी तयार केलेली Indian Pale Ale ही चमकदार, हलकी आणि आंबटसर कडवट चवीची बिअर १७९० साली भारतात आली. म्हणजे सवाई माधवराव शनिवारवाड्यात संध्याकाळी संध्या करत असताना तिथून कोसभर अंतरावर असलेल्या संगमावरच्या रेसिडेन्सीत ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी ही Ale पीत बसत असतील असा अंदाज बांधायला काही हरकत नाही. आपल्याकडच्या जुन्या शौकीन बिअरप्रेमींना London Pilsner ही आता फारशी न मिळणारी बिअर आठवत असेल, तिचा जन्मही याच काळातला. Bohemia तल्या Pilsen मध्ये जी सोनेरी बिअर तयार होई तिलाच Pilsner हे नाव पडलं.

आता या बिअरच्या इतिहासानंतर याचाच पुढचा रंजक भाग आहे तिची सांस्कृतिक आणि सामाजिक वाटचाल. Inns, Ales and Drinking Customs of Old England या पुस्तकात बिअरच्या प्रवासाचा आढावा घेतलेला आहे. आज जी इंग्लडमधली प्रसिद्ध पब संस्कृती आहे तिची मुळं इस ४३ च्या जवळपास पोचलेली आहेत. रोमन साम्राज्य इंग्लडमध्ये असताना रोमनांचा आवडता उद्योग होता तो म्हणजे रस्ते,पूल बांधणे. यासाठी कामगार आणि तंत्रज्ञ घोड्यावरून सतत प्रवास करत असत. दूरच्या प्रवासात स्वार आणि घोडयाला विश्रांती मिळावी म्हणून रस्त्याच्या बाजूला छोटी मोठी बिअर आणि किरकोळ खाण्याच्या वस्तू विकणारी दुकानं म्हणजेच आजचे पब्ज. रात्रीचा मुक्काम करण्यासाठी ज्या खानावळी असत त्याला tavern किंवा inn असं म्हटलं जाई. या सोयी प्रवासी लोकांसाठी आहेत तरी उनाड आणि रिकाम्या लोकांनी इथं गर्दी करून वेळ आणि पैसा वाया घालवू नये अशी तंबी इंग्लडचा राजा दुसऱ्या जेम्सनं १६०३ मध्ये दिलेली होती.  पण बहुतेक ही राजाज्ञा जनतेनं फारशी मनावर घेतली नाही.

व्हिक्टोरिया राणीच्या काळात अनेक brewery नी स्वतःचे पब्ज चालू केले. Ye Olde Fighting Cocks हा इंग्लडमधला सर्वात जुना पब व्हिक्टोरिया राणीच्या काळातलाच आहे. पब्जमध्ये करमणुकीसाठी कोंबड्यांच्या झुंजी वगैरेही चालत त्याचाही संदर्भ या क्लबच्या नावाशी आहे. इंग्लडमधल्या पब्जच्या धर्तीवर जर्मनीत गावोगावी beer hall असत. Munich मधल्या Hofbräuhaus या hall मध्ये मोझार्ट, लेनिन,हिटलर अशी नामांकित गिऱ्हाईक येत असत. याशिवाय beer garden ही असत जिथं मोठ्या संख्येने लोकांना बसता येई. Hirschgarten या म्युनिकमधल्याच garden मध्ये एकावेळी ८००० लोकांना बसता येते.  १९ व्या शतकात जर्मन मंडळी अमेरिकेत येताना त्यांची ही garden आणि hall संस्कृतीही घेऊन आले. त्याच काळात तुफान हाणामारी करणारे बोटात पिस्तुल फिरवत गोळीबार करणारे cowboys असलेले Saloon bars अमेरिकेत सुरू झाले. १९२० ते ३३ या काळात अमेरिकेत दारूबंदी होती, तरीही चोरून मारून मद्य मिळत असे. अशा छुप्या अड्ड्यांचे पत्ते कुजबुजत एकमेकांना विचारले जात म्हणून अशा ठिकाणांना Speakeasy drinking dens म्हणत. अशी ठिकाणं म्हणजे गुन्हेगारांचे अड्डेच बनत शिवाय इथं मिळणारं मद्य हे महाग आणि हलक्या प्रतीचे असे.

बिअर आणि तिची कर्मकांडे, रिवाज वगैरे –

इंग्लड आणि ऑस्ट्रेलियात जेंव्हा मित्र मित्र पबमध्ये जातात तेंव्हा प्रत्येकानं एकेकदा सगळ्यांसाठी बिअर मागवायची प्रथा आहे. याला shout असा शब्द आहे. व्यंकटेश माडगूळकरांनी त्यांच्या ऑस्ट्रेलियातल्या आठवणी लिहिताना या I shout, you shout चा उल्लेख केलेला आहे. पहिल्या महायुद्धाच्यावेळी या प्रथेवर बंदी घालण्यात आलेली होती कारण यामुळे पिण्याचे प्रमाण वाढते जे युद्धकाळात घातक होते. 

चीनमध्ये cheers च्या ऐवजी Gam bei असा पुकारा होतो, Gam bei चा अर्थ ग्लास रिकामा करूनच खाली ठेवायचा. यजमान जेंव्हा जेंव्हा Gam bei चा घोष करेल तेंव्हा तुम्हाला त्यात भाग घ्यावाच लागतो. भाग न घेणे हा यजमानाचा अपमान समजला जातो.

पेरूमध्ये बिअर पिण्याची सुरुवात करताना पहिली बिअर भूमातेला अर्पण करण्याची पद्धत आहे. (आपल्याकडं हीच प्रथा प्राशनाला सुरुवात करण्यापूर्वी चषकात दोन बोटं बुडवून स्थळदेवता, इष्टदेवता, गैरहजर मित्रमंडळी इ इ च्या नावे हवेत प्रोक्षण करणे या स्वरूपात अस्तित्वात आहे)

जुन्या इंग्लडमधली अजून एक मजेशीर प्रथा म्हणजे yard of ale. एक यार्ड म्हणजे सुमारे 90 सेमी एवढ्या मोठ्या ग्लासातून तीन imperial pints = ५६८.२६ मिली x ३ म्हणजे जवळपास दीड लिटर बिअरने प्राशनाला सुरुवात करायची पद्धत आहे. याशिवाय जर ही बिअर जर तुम्ही एका दमात पिऊ शकला तर मग तुम्ही म्हणजे ‘भले बहाद्दर’ गटातले मर्द इ इ.

बिअरच्या नावांच्याविषयी हजारो किस्से आहेत, सगळेच सांगणं शक्य नाही पण त्यातली जी नावं आणि किस्से मला आवडले ते तुम्हाला सांगतो. 

दुसऱ्या महायुद्धात १९४४ मधली battle of Bulge ही एक महत्वाची लढाई आहे. जर्मन आणि अमेरीकन सैनिकात बेल्जियमच्या Bulge या शहरात प्रचंड रक्तपात झाला. अमेरिकन सैन्याने या शहरातल्या चर्चमध्ये एक हॉस्पिटल उभारलेलं होतं. 101st Airborne नावाच्या तुकडीतले अमेरीकन सैनिकही इथं लढत होते. त्यातला Vincent Speranza हा सैनिक आपल्या मित्राला भेटायला हॉस्पिटलात गेला. युद्धामुळं पाण्याचा पुरवठा कमी झालेला होता, Vincent च्या मित्राला अतिशय तहान लागलेली होती. हे बघून Vincent तिथून बाहेर पडला आणि शहरातल्या प्रत्येक बंद पबमध्ये जाऊन तिथं काही प्यायला मिळतंय का ते तो शोधत होता ते ही जर्मन तोफखाना आग ओकत असताना. सुदैवानं एका पबमधला नळ सुरू केल्यावर त्यातून बिअर बाहेर आली, Vincent नं ही बिअर आपल्या हेल्मेटमध्ये भरून घेतली आणि आपल्या मित्राला नेऊन पाजली. मित्राबरोबरच आसपासच्या चार इतर  रुग्णांचे घसे ओले करायचं पुण्यकर्मही Vincent नं पार पाडलं. हे उदार मित्रप्रेम त्याला दाखवल्याबद्दल त्याच्या मेजरच्या शिव्या जोरदार मिळाल्या. 

२००९ साली Vincent पुन्हा एका लष्करी कार्यक्रमासाठी माजी सैनिक म्हणून Bulge ला आला तेंव्हा त्याला त्याच्या युध्दातल्या पराक्रमाची आठवण सांगणारी Airborne ही बिअर आढळली. याहून कहर म्हणजे या प्रसंगाची आठवण म्हणून आजही Airborne ही बिअर Bulge मध्ये हेल्मेटच्या आकाराच्या चषकातूनच प्यायली जाते. 

अमेरिकेत Gandhi Bot –  Double Indian Pale Ale नावाची बिअर आहे. २०१५ साली अमेरिकेतल्या भारतीयांनी या नावाला विरोध म्हणून कोर्टात धाव घेतली आणि बहुदा बिअरचे नाव बदलावे असा आदेशही कोर्टाने काढला. पण अजूनही त्याच नावाने या बिअरची विक्री होते. हिच्या जाहिरातीत असा उल्लेख आहे की ही बिअर तुमची आत्मशुद्धी करते आणि तुम्हाला सत्य आणि प्रेम हा गांधीजींनीच दिलेला संदेश देते.

बिअरचा इतिहास, गोष्टी आणि किस्से कितीही सांगितले तर संपणार नाहीत. मी जे सांगितलं ते परिपूर्ण नाही. शोधलं तर अजूनही भरपूर रंजक माहिती तुम्हाला सापडेल. काही नवीन माहिती हाती लागली तर मलाही जरूर सांगा. 

लेखाची लांबी वाढू नये म्हणून मला बरीच माहिती, अनेक किस्से गाळावे लागले. ते ऐकायचे असतील तर मला कुठं भेटायला बोलवायचं हे सांगायची गरज आता अजिबातच नाही.
 आई Ninkasi ची कृपा तुमच्यावर सदैव बरसत राहो !

सगळ्यात शेवटी वैधानिक इशारा – लेख लिहिण्यामागचा उद्देश हा तुम्हाला या चमकदार सोनेरी आणि फसफसणाऱ्या पेयाची माहिती द्यावी इतकाच आहे. तुमच्या पुढील विविधगुणदर्शन कार्यक्रमास धांडोळा जबाबदार नाही.

यशोधन जोशी

इकडून तिकडे गेले वारे..

पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो. एका राजाला जंगलातून जाताना एक वेगळ्या प्रकारचा आवाज कानावर पडतो. राजा कुतूहलाने आपल्या सरदाराला त्या आवाजाबद्दल विचारतो तेव्हा सरदार सांगतो की हा आवाज फिनिक्स पक्षाचा आहे. मग ते जंगलातून परततात. पण राजा त्या आवाजाच्या इतका प्रेमात पडलेला असतो की त्याला तो आवाज ऐकल्याशिवाय करमत नाही आणि तो आदेश देतो की त्या आवाजाप्रमाणे आवाज काढणारं एक वाद्य बनवा. मग त्याच्या राज्यातला एक कल्पक कलाकार खरोखरच तसा आवाज काढणारं वाद्य बनवतो. ही एक चिनी दंतकथा ’शेंग’ या वाद्याच्या निर्मितीची. तर ही कथा सांगण्याचं प्रयोजन म्हणजे आणखी एक वाद्यच.

d8cb8a51564a18a8930e03
’शेंग’ वाद्य आणि वादक

तर ह्या वाद्याविषयी सांगायचं झालं तर हे अतिशय लोकप्रिय वाद्य आहे. सहसा कोणतही वाद्य विकत घ्यायचं म्हणलं तर साधारण मोठी रक्कम खर्ची घालावी लागते. पण हे वाद्य मात्र अगदी दोन पाचशे रुपयांपासून विकत मिळतं. पूर्वी मुलींवर इंप्रेशन मारण्यासाठी अनेकजण हे वाद्य जवळ बाळगत. हे कुठेही खिशात ठेवता येतं, दोन चार गाणी ऐकून ऐकून ती या वाद्यावर वाजवणे त्या मानाने सोपं असतं आणि तुम्हाला हे वाद्य वाजवता येत नसलं तरी नुसतं फुंकत बसलं तरी त्यातून येणारे स्वर फारच भन्नाट असतात. तर असं हे गुणी वाद्य आहे हार्मोनिका म्हणजेच तोंडाने वाजवण्याचा बाजा. हार्मोनिका हे अ‍ॅकॉर्डियन, कॉन्सेट्रीना या वाद्यांच्या परिवारातील वाद्य असल्याने या वाद्याचा उगमही आपल्याला घेऊन जातो ते ’शेंग’ या चिनी वाद्यापर्यंत.

review-crossover

बांबूच्या पट्ट्यांवर फुंकून हवेचा झोत सोडून बांबूच्या पट्ट्यामध्ये कंपने निर्माण होतात आणि त्यातून स्वर निर्माण होतात. या तंत्रावर बनवलेलं वाद्य म्हणजे शेंग. पुढे हेच तत्व वापरून अ‍ॅकॉर्डियन, कॉन्सेट्रीना, हार्मोनियम, ऑर्गन आणि हार्मोनिका बनलेला आहे. फक्त या वाद्यांमधे पितळी पट्ट्यांचा वापर केला जातो. अरबी व्यापार्‍यांमार्फत कधीतरी हे मुळचे चिनी वाद्य युरोपात पोहोचले आणि त्यावरून वेगवेगळ्या वाद्यांची निर्मिती झाली.

युरोपमधे हार्मोनिकाचा शोध कोणी लावला या प्रश्नाचं ठाम असं उत्तर देता येत नाही. कारण साधारणतः १९ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात बर्लिन, व्हिएन्ना, लंडन आणि पॅरिसमधे ’फ्री रिड’ म्हणजेच पट्ट्यांच्या कंपनातून आवाज निघणार्‍या वेगवेगळ्या वाद्यांची निर्मिती होऊ लागली होती. त्यामुळे ठामपणे या वाद्याच्या निर्मात्याचे नाव सांगता येत नसले तरी १८२१ साली फेड्रीक बुशमन या कारागीराने पहिल्यांदा हार्मोनिका बनवला असे सांगितले जाते. बुशमनने हार्मोनिका बनवला यात शंका नाही पण बुशमनने हे वाद्य बनवण्याच्या आधी अशाच प्रकारचे वाद्य व्हिएन्नामधे वाजवले जात असल्याचा संदर्भ मिळतो. त्यावेळी मोठ्या प्रमाणात हार्मोनिका उत्पादन करणारे कारखाने नव्हते. शहरांमधील कारागीर स्वतःसाठी किंवा ओळखीच्या लोकांसाठी हार्मोनिका बनवत. या शहरांमधे अनेक घड्याळं तयार करणारे कारागीर राहत असत. ते आपली घड्याळं विकण्यासाठी वेगवेगळ्या गावांमधे जात आणि येताना आपल्या घरच्यांसाठी काही वस्तू आणत. या वस्तूमध्ये हार्मोनिका ही आणले जात. ही गोष्ट एका माणसाच्या लक्षात आली आणि त्याला हार्मोनिका बनवून विकण्याच्या व्यवसायात मोठी संधी दिसली. ख्रिस्तियन मेसनर या माणसाने १८३० साली हार्मोनिका तयार करण्याचा कारखाना टाकला. त्यानंतर अल्पावधीतच दक्षिण जर्मनीतल्या या भागात हार्मोनिका हा प्रचंड लोकप्रिय झाला. हार्मोनिका वाजवायला शिकवणार्‍या संगीत शाळा सुरू झाल्या. हार्मोनिकाची संग्रहालये बांधली गेली. हार्मोनिका बनवण्याचे तंत्र बाहेर कोणास कळू नये याची अतिशय काळजी मेसनर परिवाराकडून घेतली जात असे. पण १८५० साली मेसनरचा भाचा क्रिस्टन वाईज याने

हार्मोनिकाचे उत्पादन चालू केले. त्याच्या कारखान्याला शाळेतली मुलं भेट देत. अशाच भेटीमध्ये एक माणूस दोनदा तेथे आला आणि हे उत्पादन कसे चालते याचे बारकाईने अवलोकन करू लागला. ही गोष्ट वाईजच्या लक्षात आली आणि त्याने त्या माणसाला आपल्या कारखान्यातून अक्षरशः हाकलून दिले. आज जगभर ज्या कंपनीचे हार्मोनिका मोठ्या प्रमाणात विकले जातात त्या होनर (Hohner) या कंपनीचा संस्थापक मथायस होनर.

MatthiasHohner
मथायस होनर

१८५७ साली मथायसने आपली हार्मोनिका बनवणारा कारखाना चालू केला. तो आणि त्याची बायको हे दोघेच त्या कारखान्यात काम करत. पहिल्या वर्षी त्यांनी त्यांच्या कारखान्यात ६५० हार्मोनिका बनवले. १८६२ सालापासून होनर हार्मोनिका हे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात निर्यात केले जाऊ लागले. आजही होनर कंपनीचे हार्मोनिका हे जगभर विकले जातात. प्रारंभीच्या काळात बनवले जाणार्‍या Diatonic हार्मोनिकांवर म्हणजेच संगीताच्या नोट्स एका विशिष्ट पातळी (Scale) मधे वाजवता येत असत. त्यामुळे हे हार्मोनिका ब्लूज, रॉक, पॉप किंवा लोक संगीतात वापरले जात असत. १९२० साली होनर कंपनीने Chromatic हार्मोनिका बनवण्यास सुरुवात केली. हे हार्मोनिका जॅझ आणि क्लासिकल संगीतातही वापरता येऊ लागले. (अर्थात यातल्या तांत्रिक बाजूंविषयी मला फारशी माहिती नाही) या हार्मोनिकांना एका बाजूस हाताने सरकवता येणारी पट्टी असते. ही पट्टी सरकवून तुम्ही सांगितीक नोट्स बदलू शकता. पण हार्मोनिकाच्या बाबतीतली एक गोष्ट हार्मोनिका बनवणार्‍या उत्पादकांच्या पथ्यावर पडणारी होती. हार्मोनिका या वाद्य हे दिर्घकाळ टिकणारे वाद्य नाही. सतत वाजवल्या नंतर आतल्या धातूंच्या पट्ट्या खराब होतात आणि त्यातून येणारा स्वर बदलतो. होनर कंपनी मोठ्या प्रमाणात हार्मोनिका बनवत होती तेव्हा १८४७ साली सेडेल ही कंपनीही हार्मोनिका बनवत होती.

होनर कंपनीचे आभार मानणे अत्यंत गरजेचे आहे कारण या कंपनीने अतिशय उत्कृष्ट असे हार्मोनिका वादक जगाला दिले. त्यातल्या तीन वादकांविषयी लिहिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. त्यातला एक वादक भारतातील होता. पण त्याच्याविषयी नंतर सांगतो. होनर कंपनीने १९२० साली Chromatic हार्मोनिका बाजारात आणले आणि त्याच्या प्रसारासाठी हार्मोनिका वादकांच्या स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली. अशाच एका स्पर्धेत लॅरी अ‍ॅडलर नावाचा एक वादक आला. त्याने ती स्पर्धा तर जिंकलीच आणि पुढे त्याने अनेक हॉलिवूड चित्रपटांमधे हार्मोनिका वाजवला. लॅरी अ‍ॅडलरने वाजवलेले ट्रॅक्स फारच भन्नाट आहेत. लॅरीमुळे अमेरिकेत Chromatic हार्मोनिका प्रचंड प्रमाणात विकले जाऊ लागले. पण लॅरीला अमेरिका सोडावी लागली. लॅरी हा कम्युनिस्ट विचारसरणीचा होता आणि त्याला कम्युनिस्टांविषयी माहिती देण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात आला. लॅरीने ते सांगण्यास नकार दिला. त्यानंतर लॅरीला काळ्या यादीत टाकण्यात आले. त्यानंतर लॅरी इंग्लंडमधे स्थाईक झाला. ९५३ साली आलेला ’Genevieve’ या विनोदी चित्रपटाला लॅरीने संगीत दिले. त्याच्या कारकिर्दीतले ते एक नावाजण्यासारखे काम आहे. लॅरीचा उल्लेख केल्याशिवाय हार्मोनिकावरचा लेख पूर्ण होवूच शकत नाही.

तसाच आणखी एक कॅनेडियन व्हायोलिन वादक टॉमी रायली (Tommy Reilly) याच्या उल्लेखाशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही. १९३५ साली रायली परिवार लंडन येथे स्थाईक झाला. तेथून टॉमी हा जर्मनीतील Leipzig विद्यापीठात संगीताचे धडे घेण्यासाठी रुजू झाला. दुसरे महायुद्ध चालू झाले आणि टॉमीला तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगात त्याने हार्मोनिकाचे धडे गिरवले. १९४५ साली तो पुन्हा लंडनला परतला आणि त्याने बी बी सी रेडियोमधे काम करण्यास सुरुवात केली. बीबीसी वरील The Navy Lark या रेडीयो मालिकेसाठी त्याने बनवलेली थिम ट्यून अतिशय श्रवणीय आहे. टॉमीने वाजवलेला हार्मोनिकाच्या ट्यून्स ऐकल्या तर या हार्मोनिकावर वाजवल्या गेल्या आहेत यावर विश्वास बसत नाही. टॉमीने केलेले काम कमाल आहे.

अमेरिकेत हार्मोनिकाला मागणी वाढण्यामागे एक वेगळेच कारण होते. याच कालावधीत अनेक जर्मन अमेरिकेला स्थलांतरीत झाले आणि त्यांनी आपल्या बरोबर हार्मोनिकाही नेले. हे जर्मन आपल्या मनोरंजनासाठी हार्मोनिका वाजवत असत. हे तोंडानी वाजवायचे छोटे वाद्य अमेरिकेत शेतांवर काम करणार्‍या आफ्रिकन मजुरांनी ऐकले. दक्षिण अमेरिकेत याच आफ्रिकन मजुरांनी एका वेगळ्या संगीताची सुरुवात केली होती आणि या संगीतात वाजवण्यासाठी त्यांना हे छोटे आणि स्वस्त वाद्य फार आवडले. त्यावेळच्या हार्मोनिकाच्या जाहिरातीत हार्मोनिकाची किंमत १० सेंट इतकी दाखवली आहे. ’ब्लूज’ (Blues) हे संगीत या आफ्रिकन मजुरांमधे अतिशय लोकप्रिय होते. या ब्लूज संगीताने अनेक हार्मोनिका वादक जगाला दिले. या वादकांची यादी मोठी आहे. डी फोर्ड बेली नावाचा एक वादक होऊन गेला. त्याने हार्मोनिका वाजवण्याची शैली आणली आणि ती अतिशय लोकप्रिय झाली. त्याने वाजवलेला आगगाडीच्या आवाजाची नक्कल अनेकजण करू लागले. सोनी बॉय विल्यमसन, लिटल वॉल्टर, जेम्स कॉटन असे कितीतरी वादक ब्लूज या संगीताने जगाला दिले आहेत.

सॉन्डर्स टेडेल नावाचा एक आंधळा हार्मोनिका वादक होऊन गेला. ब्लूज संगीत लाजवणार्‍या या वादकाने वाजवलेला हार्मोनिका एका वेगळ्या प्रकारचा होता. हार्मोनिका वाजवतानाच त्या वादनाबरोबरच तो तोंडानेही आवाज काढत असे. त्याने वाजवलेला हार्मोनिका ऐकण्याजोगं आहे.

हार्प नावाचं एक तंतू वाद्य आपण सगळ्यांनी पंख असलेल्या उडणार्‍या देवदूतांच्या हातात बघितले आहे. १८७२ साली कार्ल एसबाख कंपनीने (Carl Essbagh Co.) फ्रेंच हार्प नावाने हार्मोनिका बाजारात आणला. वस्तुतः हार्प हे एक तंतूवाद्य आहे. मग त्याचा आणि हार्मोनिकाचा संबंध काय असावा? हवेचा वापर करून वाजवली जाणार्‍या Aeolina हार्प या वाद्यातील हार्प हा शब्द घेऊन एसबाखने फ्रेंच हार्प नावाने हार्मोनिका बाजारात आणले. या फ्रेंच हार्प मधील धातूच्या पट्ट्या (reeds) या चांगल्याच लांब असत. आणखी एका मताप्रमाणे हार्प या वाद्याला वेगवेगळ्या लांबीच्या तारा असतात तसेच हार्मोनिकामधेही वेगवेगळ्या लांबीच्या धातूच्या पट्ट्या (Reeds) असल्याने त्याला हार्प हा शब्द वापरला गेला. हार्मोनिकाला वेगळ्या नावाने ओळखले जाणे इथेच थांबणार नव्हते. पिट हॅम्पटन या आफ्रिकन गायकाने या वाद्याचे नामकरण माऊथ ऑर्गन असे केले आणि त्याने हेच नाव घेऊन ‘Mouth Organ Coon’ हा अल्बम आणला.

१९४० च्या सुमारास अमेरिकेत वादकांच्या फेडरेशनच्या युनियनने वाद्यांच्या रेकॉर्डींग वर बंदी आणली गेली. गमतींचा भाग असा की हार्मोनिका हे वाद्य समजले जात नव्हते त्यामुळे हार्मोनिकाला हा नियम लागू पडत नव्हता. त्यामुळे त्याकाळात अनेक गाण्यांना साथसंगत करताना हार्मोनिकाचा वापर केला गेला.

महायुद्ध आणि हार्मोनिका यांचा एकमेकांशी संबंध आहे. युद्धाच्या तणावाच्या स्थितीमधे सैनिकाला थोडासा निवांतपणा मिळावा म्हणून जर्मन सैनिकांना हार्मोनिका दिले गेले. अर्थातच होनर कंपनी साठी ही मोठीच संधी होती. होनरने दोन्ही महायुध्दांमधे मोठ्या प्रमाणात हार्मोनिका विकले. होनरने आपले हार्मोनिका केवळ जर्मन सैनिकांनाच विकले नाहीत तर होनरने स्वित्झर्लंड येथे एक वेगळा कारखाना काढून तेथे बनवलेले हार्मोनिका इंग्लंड, फ्रान्स मधे विकले. हार्मोनिकामुळे अनेक सैनिकांचे प्राणही वाचले आहेत. धातूने बनलेले हे हार्मोनिका बरेच सैनिक आपल्या कोटाच्या वरच्या खिशात ठेवत असत. शत्रूने छातीवर नेम धरून मारलेली गोळी या हार्मोनिकावर आदळे आणि सैनिकाचे प्राण वाचत असत. इंग्लंडमधे सैनिकांना हार्मोनिका वाजवणं शिकवण्यासाठी खास शिक्षक नेमले गेले होते. रोनाल्ड चेसनी (Ronald Chesney) हा इंग्लंडमधला प्रसिद्ध हार्मोनिका वादकही सैनिकांना प्रशिक्षित करत असे. ९४३ साली प्रदर्शित झालेला ’They Met in the Dark’ या युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या विनोदी थ्रिलर चित्रपटात रोनाल्डनी हार्मोनिका वादकाची भूमिका केली होती. यात हार्मोनिका वाजवताना आपल्या वादनातून गुप्त संदेश देताना दाखवला होता.

पाश्चात्य संगीतातील अनेक गाण्यांमधे हार्मोनिकाचा वापर केला गेला आहे. पण हार्मोनिका म्हणले की डोक्यात येते ते बिटल्सचेLove me do’ हे गाणे. या गाण्यात आणि बिटल्सच्या अनेक गाण्यांमधे हार्मोनिकाचा वापर अतिशय सुंदरपणे केला गेला आहे. ‘Love me do’ हे बिटल्सचे हार्मोनिका वापरून केलेले पहिले गाणे. आपल्या गाण्यात हार्मोनिकाचा वापर का केला गेला यामागचे कारण जॉन लेनन याने आपल्या ’Lennon Remembers’ या पुस्तकात सांगितले आहे. १९६२ साली Frank Ifield याचे ’I remember you’ हे गाणे बरेच गाजले. या गाण्यात हार्मोनिका वाजवला गेला आहे. त्यामुळे आपल्याही गाण्यात हार्मोनिका असावा असे सगळ्यांचे मत होते. जॉन लेनन हा लहानपणापासून हार्मोनिका वाजवत असला तरी त्याने हार्मोनिका वाजवण्याचे तंत्रशुद्ध शिक्षण घेतले नव्हते. त्यावेळी अतिशय प्रसिद्ध असा हार्मोनिका वादक डिल्बर्ट मॅक्लिंटन याच्याकडे जॉनने हार्मोनिका शिकवण्याची विनंती केली. डिल्बर्टने त्यास नकार दिला. त्यानंतर मग १९६३ साली आलेल्या ‘Love me do’ मधे आणि पुढच्या अनेक गाण्यांमधे जॉनने हार्मोनिका कमाल वाजवला आहे. ’Love Me Do’ या गाण्यात हार्मोनिका कोणी वाजवला यावरून अनेक वादही झाले.

या लेखात कितीतरी हार्मोनिका वादकांचा उल्लेख राहून गेला आहे ज्यांनी हार्मोनिका वादनात काहीना काही भर घातली आणि हार्मोनिकाचे वादन अतिशय वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवले. पॉल जोन्स, विल्यम गॅलिसन, ब्रेंडन पॉवर खरतर ही यादी न संपणारी आहे.

आता वळू हिंदी चित्रपट संगीताकडे. हार्मोनिका आणि हिंदी संगीत म्हणलं तर आपल्या समोर येत ते ’है अपना दिल तो आवारा’ हे गाणं आणि शोले मधे वाजवलेली हार्मोनिकाची धून. याच्यापुढे आपली गाडी सरकत नाही. पण भारतीय चित्रपट संगीतामधे हार्मोनिका किंवा माऊथ ऑर्गनचा वापर पहिल्यांदा केला गेला १९३९ साली आणि तो चक्क मराठी चित्रपट होता. मास्टर कृष्णराव या संगीतकाराने ’माणूस’ या चित्रपटाच्या संगीतामधे माऊथ ऑर्गनचा वापर पहिल्यांदा केला. त्यानंतर उल्लेख करावा लागेल १९४७ साली आलेल्या ’शहनाई’ या चित्रपटाचा.मेरी जान मेरी जान संडे के संडे’ या गाण्यात संगीतकार सी रामचंद्र यांनी हार्मोनिकाचा वापर केला आहे. या गाण्यात वाजवलेला हार्मोनिकाच्या वादकाविषयीची ही गोष्ट. इथे पुन्हा होनर कंपनीचे आभार मानावे लागतात. फिरोझ डामरी हे एक व्हॉयलीन वादक होते. संगीताची ही परंपरा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाली होती. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ नानी पालखीवाला हे सुध्दा फिरोज डामरी यांच्याबरोबर व्हॉयलीन वाजवायचे. होनर कंपनीने १९३७ साली भारतात हार्मोनिका वादकांची स्पर्धा घेतली. त्यांनी अनेकजणांना हार्मोनिका वाटले आणि त्याबरोबर हार्मोनिका कसा वाजवायचा याच्या सूचना देणारी छोटी पुस्तिका दिली. हार्मोनिका वाटल्याच्या दोन दिवसांनी झालेल्या स्पर्धेत फिरोज डामरी पहिले आले. होनर कंपनीने त्यांना आपला भारतातील प्रतिनिधी म्हणून नेमले. त्यांना दुसर्‍या महायुद्धानंतर होनर कंपनीने जर्मनीत होणार्‍या पहिल्या हार्मोनिका महोत्सवासाठी बोलावले. तिथे फिरोज डामरी यांनी वाजवलेल्या गाण्यामुळे त्यांना तिसरे पारितोषिक मिळाले. ते गाणे होते ’मेरी जान मेरी जान संडे के संडे’.

संगीतकार सलिल चौधरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत हार्मोनिका प्रसिद्ध करण्याचे मोठे काम केले. त्यांनी कलकत्त्यावरून मिलोन गुप्ता या हार्मोनिका वादकाला मुंबईत आणले. मिलोन गुप्ता यांनी अनेक चित्रपटात हार्मोनिका वाजवला आहे. २२ नोव्हेंबर हा मिलोन गुप्तांचा जन्मदिन आज भारतीय हार्मोनिका दिवस म्हणून साजरा केला जातो.काश्मीर की कली’ मधल्या ’किसी ना किसिसे’ या गाण्याच्या सुरुवातीचा हार्मोनिका मिलोन गुप्तांनीच वाजवला आहे. त्यानंतर नाव घ्यावं लागेल ते लिजंडरी संगीतकार आर डी बर्मन याच. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत असलेल्या ’दोस्ती’ या चित्रपटासाठी पंचमने हार्मोनिका वाजवला आहे. गिटार वाजवणार्‍याला हार्मोनिका वाजवायला लावणे यासारखे काम पंचमसारखा अतरंगी संगीतकारच करू जाणे. शोलेमधली हार्मोनिकाची ट्यून ही पंचमकडे गिटार वाजवणारे भानू गुप्ता यांनी वाजवली आहे. अर्थातच त्यांना मुख्य वाद्य गिटारबरोबरच हार्मोनिकाही चांगला वाजवता येत होताच. गौतम चौधरी, अशोक भंडारी आणि असे अनेक चांगले हार्मोनिका वादक भारतात होऊन गेले किंवा आजही वाजवत आहेत.

तर असं हे स्वस्त, खिशात मावणार्‍या, कुठल्याही वाद्यांची साथ नसतानाही अतिशय कर्णमधुर वाजणार्‍या अतिशय गुणी वाद्याचा आढावा घेण्याचा छोटासा प्रयत्न. लेखामधे उल्लेख केलेल्या वादकांचे काम मात्र एकदा जरूर ऐका.

कौस्तुभ मुद्‍गल

सैनिक हो तुमच्यासाठी…

युद्धस्य कथा रम्या…युद्धाविषयी काहीही लिहायचं झालं की आपल्याकडं त्याची सुरुवात अशी करायची प्रथा आहे. पण रम्यपणाशिवायही अनेक पैलू युद्धकथांच्या मागे असतात जिकडं सहसा आपलं लक्ष जात नाही.

साधारणत: दोन-तीन महिन्यांपूर्वी म्हणजे लॉकडाऊन अगदी ताजं असताना माझ्या हातात एक वेगळ्याच विषयावरचं पुस्तक आलं. कॅनडाच्या एका इतिहासाच्या प्राध्यापकांनी लिहिलेलं हे पुस्तक डासांबद्दल होतं. या पुस्तकात लेखकानं डासांनी जगाच्या इतिहासात कसं आपलं योगदान(!) दिलं याबद्दल लिहिलेलं होतं. या पुस्तकातून प्रचंड असा माहितीचा खजिनाच माझ्या हाती लागला. पण या लेखाचा विषय डास हा नसून दुसऱ्या महायुद्धातला एक फारसा ज्ञात नसलेला पैलू आहे.

पर्ल हार्बरवर जपानने हवाईहल्ला केला आणि अमेरिका दुसऱ्या महायुद्धात ओढली गेली. पर्ल हार्बरमुळं झालेल्या अपमानाचा सूड उगवणे हे जणू अमेरिकीचे राष्ट्रीय ध्येय बनले. कोणत्याही राष्ट्राचा युद्धात उतरण्यासाठीचा पहिला टप्पा म्हणजे सैनिकभरती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सगळ्याच राष्ट्रांनी जी सैनिकभरती केली त्यात १००% काटेकोरपणा मुळीच नव्हता. सैनिकांची गरज एवढी प्रचंड होती की ज्यांचं डोकं ताळ्यावर आहे आणि हातीपायी धडधाकट आहेत अशा सगळ्यांना जुजबी प्रशिक्षणानंतर गणवेश चढवून आणि हातात बंदूक देऊन रणभूमीवर पिटाळण्यात आलं.

अमेरिकेचं उदाहरण द्यायचं झालं तर १९४० सालच्या आसपास सैनिक म्हणून भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांपैकी ५०% शारीरिक आणि आणि बौद्धिक कमतरतेमुळे अपात्र ठरत. अमेरिकेने युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला व जपान,जर्मनी आणि इटली तिघांच्याही विरुद्ध आघाडी उघडण्याचा निर्धार केला. आता यासाठी सैनिकबळ मोठ्या प्रमाणावर लागणार होते मग सैनिक भरतीच्या पात्रतेचे निकष थोडे शिथिल करून मोठ्या संख्येने ‘रंगरूट’ भरती करून घेतले जाऊ लागले. या सगळ्या सैनिकांचे शिक्षण जेमतेमच झालेले होते आणि यातल्या अनेकांना आपलं गाव आणि आसपासचा भाग सोडला तर बाकी जगाची माहिती शब्दश: शून्य होती.
अमेरिकन युद्धखात्यातल्या एका मानसोपचार तज्ञाच्या मते या सैनिकांचे सरासरी बौद्धिक वय हे १३ ते १४ वर्षे होते. (मानसोपचार तज्ज्ञाचे हे मत अमेरिकेच्या महायुद्धविषयक माहिती देणाऱ्या सरकारी वेबसाईटवर नोंदवलेलं आहे हे विशेष)

आता या नव्याने भरती झालेल्या ‘सर्वगुणसंपन्न’ पोरसवदा सैनिकांना शहाणं करून सोडण्याची मोठीच जबाबदारी लष्करावर येऊन पडली. हत्यारं चालवणं आणि इतर युद्ध प्रशिक्षण कसं द्यावं हे लष्कराला माहीत होतं पण थोडक्या वेळात या सैनिकांचं ‘चरित्र’ कसं सुधारावं आणि यांना नैतिकता,लष्करी शिस्त कशी शिकवावी याचा मोठाच पेच निर्माण झाला. मग यासाठी अमेरिकेच्या युद्धखात्यातर्फे US Army Air Force First Motion Picture या विभागाची निर्मिती करण्यात आली.

या विभागाचे मुख्य काम सैनिकांसाठी छोट्या छोट्या फिल्म्स तयार करणे हे होते जेणेकरून यातून त्यांचे प्रबोधन होईल आणि अनेक गोष्टींची माहिती त्यांना या माध्यमातून करून देता येईल. या विभागातल्या लोकांनी मग आपलं डोकं चालवून एक आराखडा तयार केला आणि यातून Private SNAFU या पात्राची निर्मिती करण्यात आली. Private म्हणजे शिपाईगडी आणि SNAFU चा अर्थ होता Situation Normal All Fouled Up ! (यातल्या Fouled च्या ऐवजी योग्य तो ‘F’ जोडण्याचं कसब आपण आपल्या अंगी बाणवलेलं आहेच !).

SNAFU हा मनमौजी शिपाईगडी हे मुख्य पात्र, त्याच्या करामती आणि त्यातून त्याच्यावर ओढवणारे प्रसंग असा या फिल्म्सचा विषय असे.चार ते पाच मिनिटांच्या या कार्टून फिल्म्स सैनिकी सिनेमागृहात सिनेमाच्या अगोदर दाखवण्यात येत. या फिल्म्स तुफान विनोदी पण जरा जास्तच ‘मोकळ्याढाकळ्या’ आहेत बहुदा याच कारणामुळं त्या सामान्य जनतेला दाखवायला त्याकाळात सरकारची बंदी होती. कारण यामुळं आपल्या सैनिकांबद्दल जनतेच्या मनात ज्या भावना असत त्यालाच धक्का बसला असता.

कोणी कितीही आणि काहीही म्हटलं तरी सैन्य,युद्ध हे विषय पुरुषी आहेतच, इथं शिवराळपणा आणि अर्वाच्यता आहे आणि राहीलंच. मग ते सैन्य कोणतेही असो आणि देशभक्तीने कितीही भरलेले असो. आपल्याला इंग्रजी सिनेमातून अमेरिकन किंवा ब्रिटिश सैनिकांची जी विलक्षण साहसी आणि बिलंदर अशी जी प्रतिमा नेहमी दाखवण्यात येते ते बरोब्बर त्याच्या विरुद्ध असत. आधीच शिक्षण कमी त्यात अंगावर गणवेश आणि खांद्याला बंदूक यांचा माणसावर विपरीत परिणामच जास्त होतो. युरोपमधले मुलुख जिंकून पुढं जात असताना तिथल्या शहरात पोचल्यावर विजयाचा उत्सव थोडा ‘जास्तच’ झाल्याने धुंद होणे, वेश्यांच्या वस्तीत धुमाकुळ घालून कायद्याचा प्रश्न निर्माण करणे, प्रेमाच्या
(आणि मद्याच्या) धुंदीत आपल्याकडची माहिती कुठल्यातरी वेश्येपुढे उघड करणे, पत्रांतून आणि फोनवरून आपला ठावठिकाणा आणि फौजेची हालचाल आपल्या ‘प्रिय पात्रांना’ कळवणे अशा अनेक प्रसंगांना या फिल्म्समधून स्पर्श केला गेलेला आहे. या शिवाय रोजच्या व्यवहारातल्या अनेक शिस्तीच्या गोष्टी यातून शिकवण्याचा प्रयत्न केला गेला. मलेरियापासून बचाव होण्यासाठी मच्छरदाणी लावून झोपणे, कॅमोफ्लाज, आपल्या हत्यारांची काळजी कशी घ्यावी असे अनेक विषय यातून समजावण्याचा प्रयत्न केला गेला.

आपल्याकडं सरकारी आणि त्यात परत शैक्षणिक म्हटलं की त्यासाठी कमीत कमी खर्चात कोण काम करेल त्याला प्राधान्य दिलं जातं, त्यामुळं तयार झालेल्या गोष्टींचा दर्जा म्हणजे क्या कहने… युद्धकाळात वेगळा सैनिकी फिल्म्सचा विभाग तयार करून फिल्म्सवर एवढा खर्च करणे हे आपल्या विचाराला मान्यच होणारं नाही. पण अमेरिकन युद्ध विभागाला अशा फिल्म्सची गरज मान्य झाली आणि त्यासाठी पैसा खर्च करण्याची तयारीही त्यांनी दाखवली.

या फिल्म तयार करण्यात सगळ्यात मोठा वाटा होता हॉलिवूडचा प्रख्यात दिग्दर्शक Frank Capra चा. युद्ध घोषित झालं आणि Frank Capra ताबडतोब सैन्यात अधिकारी म्हणून भरती झाला त्याला लगेचच मेजरचा हुद्दा देण्यात आला आणि त्याच्यासाठी काम पण तयारच होतं ते म्हणजे U.S. Army Air Force First Motion Picture Unit चा अध्यक्षही. मुख्य म्हणजे दर्जात कोणतीही गडबड न करता या फिल्मची निर्मिती सुरुवातीला काही काळ डिस्नेच्या स्टुडिओमध्ये आणि नंतर वॉर्नर ब्रदरच्या स्टुडिओत केलेली होती. या पात्रासाठी आवाज दिलेला होता Mel Blanc नं. Mel Blanc आपल्याला बघून माहीत नसला तरी त्यानं जिवंत केलेले Bugs Bunny आणि Daffy Duck आपल्याला माहीत असतात. भारतात आजही मुलांसाठी ज्या प्रकारच्या animated फिल्म तयार होतात त्यांच्याशी या फिल्म्सची तुलना केली तरी ७०-८० वर्षांपूर्वीच्या या फिल्म दर्जाच्या दृष्टीने जास्त चांगल्या वाटतात.

आता या फिल्म्स सामान्य जनतेसाठी उपलब्ध आहेत, दुसऱ्या महायुद्धाबद्दल अनेक फिल्म्स, डॉक्युमेंट्रीज आहेत. पण या सगळ्याहून युद्धखात्याने तयार केलेल्या या फिल्म सत्याच्या किंवा वस्तुस्थितीच्या अधिक जवळ जाणाऱ्या आहेत. त्याकाळच्या अमेरिकन सैनिकांचं जे चित्रण आपण सिनेमातून बघतो त्याहून ते किती वेगळे असत हे आपल्याला यातून दिसतं. ‘अमेरिकन वॉर हिरोज’ ची दुसरी बाजू या फिल्म्स आपल्याला दाखवतात.

यशोधन जोशी

अग्निफुले

मानवाने एका ठिकाणी राहून शेती चालू केली. वेगवेगळ्या धान्यांची त्याची ओळख होती हे आपल्याला उत्खननातून मिळालेल्या धान्यांच्या दाण्यांवरून कळते. शेतीच्या शोधात स्त्रियांचा मोठा वाटा होता यात शंका नाही. त्याचबरोबर वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृती करण्यामागेही स्त्रियाच होत्या. आगीवर जेव्हा मानवाने नियंत्रण मिळवले त्यानंतर स्त्रियांनी आपल्या पाकगृहात अनेक वेगवेगळे प्रयोग केले. भाजणे, उकडणे, तेलाच्या शोधानंतर तळणे अशा कितीतरी वेगवेगळ्या कृतींचा शोध लावला. या सगळ्या प्रयोगांबरोबरच आणखी एका पाककृतीचा शोध लावला गेला.

तिने आपल्या गुहेत स्वयंपाकाची तयारी केली. तो परतला शिकार घेऊन. आता विस्तवावर शिकार भाजायची आणि खायची. तिने त्याच्याबरोबर खाण्यासाठी मातीच्या मडक्यातून धान्याचे दाणे काढले. काढताना कशाचा तरी धक्का लागला आणि मडके फुटले. त्यातले काही दाणे विस्तवावर पडले. चट्‍-चट्‍ असा आवाज झाला आणि धान्याच्या दाण्याचे वेड्यावाकड्या आकार तयार झाले. कदाचित धान्यांपासून लाही (flakes) बनवण्याची सुरुवात अशी झाली असावी. अर्थात हा झाला कल्पनाविस्तार पण हा शोध कधी लागला असावा याबद्दल ठामपणे सांगता येत नाही. साधारणतः ४ हजार वर्षांपूर्वीच्या अश्मीभूत झालेल्या लाह्या उत्खननांमधे सापडल्या आहेत.

लाही बनत असतानाची प्रक्रिया अतिशय मनोरंजक असते. कुठल्याही धान्यांच्या दाण्यांमधे काही प्रमाणात आर्द्रता असते. धग लागल्यावर या पाण्याच्या अंशाचे वाफेत रुपांतर होऊ लागते. या वाफेमुळे आतील दाब वाढतो आणि दाण्यामधे असलेले स्टार्च दाबाने बाहेर पडते. हे स्टार्च बाहेर पडताना छोटासा स्फोट होतो आणि आवाज होतो. या बाहेर आलेल्या स्टार्चला धग लागल्यावर ते आणखी कुरकुरीत होते. कुरकुरीत गोष्टी खाण्याची आवड माणसामधे उपजतच असते. तांदळापासून बनणारे चुरमुरे, साळीच्या लाह्या, मक्याच्या लाह्या, राजगिर्‍याच्या लाह्या अशा कितीतरी धान्यांच्या लाह्या बनवल्या गेल्या. लाह्या बनवण्याच्या पद्धतीतही फरक असतात. धान्याला भाजून किंवा तळून लाह्या बनवल्या जातात. पण नुसतं भाजल्यावर त्यात धान्याचे अनेक दाणे कच्चे राहतात आणि तळल्यामुळे तेलकटपणा राहतो त्यामुळे बारीक वाळू भट्टीत गरम करुन त्यात धान्य टाकले की लाह्या जास्त फुलतात.

भारतवर्षामधे लाह्या तयार केल्या जात होत्या आणि त्या खाल्ल्या जात होत्या यात शंका नाही. वैदिक विवाह पद्धतीमधे दोन संस्कार झाले की विवाह संस्कार पार पडला असे समजले जाते. त्यातला पहिला संस्कार म्हणजे सप्तपदी आणि दुसरा म्हणजे लाजाहोम. लाजा या संस्कृत शब्दाचा अर्थच मुळात लाही असा होतो. अग्नीला आवाहन करून त्याला तांदळापासून बनवलेल्या साळीच्या लाह्यांची आहुती दिली जाते आणि यावेळी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना पत्नी करते. ’कुमारसंभव’ ह्या कालिदासाच्या काव्यात शिवपार्वतीच्या लग्नसमारंभाचे वर्णन आले आहे. त्यातही लाजा होमाचे वर्णन आले आहे. साळ ही आपल्या संस्कृतीत समृद्धीचे प्रतिक मानली जाते. त्यामुळे आपल्या अनेक धार्मिक विधींमध्ये साळीच्या लाह्यांचा उपयोग केला जातो. दिवाळीत लक्ष्मीपूजनालाही साळीच्या लाह्या लागतात. चरकसंहितेत पथ्यात खाण्यासाठी साळीच्या लाह्या आणि ज्वारीच्या लाह्या सांगितलेल्या आहेत.

images

प्राचीन काळात तांदळापासून लाह्या तसेच पोहेही बनवले जात. या दोन्हीं पासून अनेक प्रकारचे पदार्थही बनत असावेत. पण लाह्यांपासून बनणार्‍या पदार्थांचे फारसे संदर्भ मिळत नाहीत. तांदळापासून आणखी एक प्रकार बनवला जातो तो म्हणजे आपल्या आवडत्या भेळेत वापरले जाणारे चुरमुरे. या तिन्ही गोष्टींपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जाऊ लागले त्याचे संदर्भ सापडतात ते गेल्या शतकभरातले.

साळ ही तांदळाची एक जात आहे. साळी आणि व्रिही अशा दोन जातींचे तांदूळ प्राचीन काळी भारतात खाल्ले जात. साळ ही जात ही अतिशय रुचकर मानली जात असे. त्यापासूनच साळीच्या लाह्या बनवल्या जात.साळीच्या लाह्यांपासून चिवडा बनवला जात असे. बंगाल प्रांतात ’मोआ’ नावाचे साळीच्या लाह्यांचे लाडू चविष्ट लाडू बनवले जातात.

दुसरा प्रकार म्हणजे पोहे. ओलसर असलेल्या तांदळाला दाबून पोहे बनवले जात. हे पोहे पुन्हा फोडून चिवड्यात वापरले जाणारे दगडी पोहे बनवले जातात. उत्तरेकडे पोह्यांना चिवडा असे म्हणले जाते. महाराष्ट्रात चिवडा म्हणलं की पहिलं नाव येत ते नाशिकच्या कोंडाजी चिवड्याचे. कोंडाजी गुणाजी वावरे या माणसाने सुमारे शंभर वर्षांपूर्वी तळलेला कांदा आणि लसूण घालून या दगडी पोह्याचं एक मिश्रण बनवलं. सुरुवातीला दारोदारी जाऊन या मिश्रणाचे नमुने खायला ते देत असत. चटपटीत आणि कुरकुरीत चिवडा लवकरच लोकांच्या पसंतीस उतरला. तसाच १९३५ साली पुण्यात लक्ष्मीनारायण दत्त यांनी लक्ष्मीनारायण चिवडा या नावानी चिवडा करणे चालू केले. त्याकाळी छोट्या खाकी कागदांच्या पुड्यांमधे या चिवड्याचे नमुने वाटले जात. तसाच १४० वर्षांची परंपरा असलेला सोलापूरचा नामदेव चिवडा ही प्रसिध्द आहे. सुमारे पन्नास वर्षांपूर्वीपासून फरासखान्याजवळ रामचंद्र चिवडेवाल्यांची गाडी लागायची. सचोटीने धंदा करणार्‍या या चिवडेवाल्यांमधे अस्सल पुणेरी फटकळपणा होता. असे प्रत्येक गावागावांमधे तुम्हाला तिथे प्रसिद्ध असणारे चिवडेवाले भेटतील. चिवडा हा पदार्थ कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमधे मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. तिथून हा चिवडा भारतभर पसरला आणि त्याची वेगवेगळ्या रुपांमधे तो समोर आला. तर हे झालं संक्षिप्त चिवडा पुराण.

kondaji-chivda-cbs-nashik-namkeen-manufacturers-4d5f7

आता वळू यात चुरमुऱ्यांकडे. चुरमुरे, शेव, गाठी, बारीक चिरलेला कांदा, पापडी, छोट्या पुर्‍या यांच्या मिश्रणापासून बनवलेली भेळ भारतभर खाल्ली जाते. भेळेच्या व्यवसायाची सुरुवात मुंबईत झाली असावी. मुंबईतल्या रस्त्यांवर आणि नाक्यावरल्या गुजराथी हॉटेलमधे विकली जात असे. तिथून ती चौपाटीवर पोहोचल्यावर तिला प्रसिद्धी प्राप्त झाली. पहिल्यांदा भेळ कोणी बनवली याबद्दल मात्र ठामपणे काही सांगता येत नाही.

bhel-puri-mumbai-main

पण भेळेचे हे पुराण संपण्याआधी भेळेशी निगडित असलेल्या एका गोष्टीचा संदर्भ सापडला तो मोठा धक्कादायक आहे कारण भेळपुरीमुळे एका गृहस्थाला प्राण गमवावा लागलेला आहे. ब्रिटिश अधिकार्‍यांना भारतीय पदार्थांसंबंधी प्रचंड आकर्षण होते. भारतीय पदार्थ हे ब्रिटिश अधिकारी मोठ्या चवीने खात. अर्थात त्यात भेळपुरीचाही समावेश होता. एक मोठ्या हुद्द्यावरचे ब्रिटिश अधिकारी भेळपुरीच्या प्रेमात होते. हा काळ होता युद्धाचा पण कुठलं युद्ध याचे काही संदर्भ सापडत नाही. कदाचित हा दुसर्‍या महायुध्दाच्या सुरुवातीचा काळ असावा. इंग्लंडहून विल्यम हेराल्ड नावाच्या एका खानसाम्याला भारतात पाठवण्यात आले. भारतात आल्यावर अल्पावधीतच वर उल्लेख केलेल्या अधिकार्‍याने त्याची आपला खाजगी खानसामा म्हणून नेमणूक केली. एके दिवशी आपल्या रेजिमेंटला भेळपुरी खायला घालावी या इच्छेपायी या अधिकार्‍याने विल्यमला सर्व रेजिमेंटसाठी भेळपुरी करण्याचा आदेश दिला. भेळ म्हणजे काय हे माहीतच नसल्याने विल्यमच्या पोटात गोळा आला. मग त्याने शहरातली सगळी भेळपुरीची दुकाने पालथी घातली आणि भेळेची कृती समजावून घेतली. पण इथे एक मोठा पेच निर्माण झाला कारण विल्यमला प्रत्येक दुकानात वेगवेगळी कृती सांगण्यात आली. तसेच या सगळ्यांची भेळपुरीमधे घालायच्या जिन्नसांची यादीही वेगवेगळी होती. त्यामुळे तो अतिशय गोंधळला आणि त्याला जाणवले की ही आपल्या हाताबाहेरची गोष्ट आहे. त्याने आपल्या अधिकार्‍याकडे जाऊन सांगितले की मला हे जमणार नाही. त्याच्या या उत्तरामुळे या तापट अधिकार्‍याचा पारा चढला आणि त्याने तडक पिस्तुलातून विल्यमवर गोळी झाडली. त्यात विल्यमचा जागीच मृत्यू झाला. तर आता जेव्हा जेव्हा तुम्ही भेळपुरी खाल तेव्हा विल्यमची आठवण जरुर काढा. भेळेचा बंगाली भाऊबंद म्हणजे झालमुरी. मोहरीचं तेल घालून बनवलेली ही झणझणीत भेळ वर्तमानपत्राच्या देखण्या पाकिटात दिली जाते.

08VZMPJHALMURI

चुरमुर्‍यांपासून बनणारा आणखी एक पदार्थ म्हणजे भडंग. सांगली कोल्हापुर भागातली भडंग अतिशय प्रसिध्द आहे. त्याचबरोबर चुरमुर्‍यांचे गुळ घालून केलेले लाडूही कोकणात सगळीकडे मिळतात. ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा, राजगीर्‍याचे लाडू आणि वड्या असे लाह्यांपासून बनवलेले कितीतरी पदार्थ आपण रोज खात असतो.

आज आपल्याला किरकोळ वाटणार्‍या गोष्टींच्या इतिहासामागे किती सामाजिक व आर्थिक संदर्भ असतात. गोष्ट अतिशय किरकोळ असते आणि सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे त्या गोष्टीचा इतिहासच बदलून जातो.

पुलंच्या ’असा मी असा मी’ मधे एक प्रसंग आहे चित्रपट पहायला जाण्याचा. त्यात पायलीला पसाभर मिळणार्‍या लाहीचा उल्लेख आहे. चित्रपट बघायला गेले की मध्यंतरात ह्या लाह्यांचं म्हणजेच पॉपकॉर्नच पुडकं चौपट भावाने विकत घेऊन ते खात खात चित्रपट बघणे हे अतिशय सहज दिसणारे दृश्य असते सगळ्या चित्रपटगृहांमधे.

तर या लाहीचा म्हणजेच पॉप कॉर्नचा इतिहास अतिशय रंजक आहे. साधारणतः १९ व्या शतकाच्या सुरुवातीस युरोपमधे मक्यापासून बनवलेल्या या लाह्या रस्त्यांवरील गाड्यांवर विकले जाऊ लागले. लवकरच ते अतिशय प्रसिद्ध झाले. पॉप्युलर म्हणून कॉर्नच्या मागे पॉप लागले असावे किंवा मक्याचे दाणे भाजताना होणार्‍या पॉपिंग साऊंड वरून ही हे नाव आले असावे. १८८५ साली वाफेवर चालणारी मक्याचे दाणे भाजणारी भट्टी युरोपमधे बनवली गेली. त्यामुळे पॉप कॉर्नचे उत्पादनही वाढले.

popcorn_03-compress

मग पॉप कॉर्न चित्रपटगृहांमधे पोहोचले कसे? खरं बघायला गेलं तर चित्रपटाचा आणि पॉपकॉर्नचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. साधारणतः १९ व्या शतकाच्या अखेरीस चित्रपट बनवण्यास आणि ते चित्रपटगृहांमधे दाखविण्यास सुरुवात झाली. अर्थात या प्रारंभीच्या चित्रपटांना आवाज नव्हता. चित्रपट बघणे ही श्रीमंत लोकांची मक्तेदारी होती. त्यावेळची चित्रपटगृहे ही अतिशय उंची वस्तूंनी सजवलेली असत. जाड गालीचे, मोठे पडदे व आरामदायक खुर्च्या अशा महागड्या वस्तूंनी सजवलेल्या चित्रपटगृहांमधे खाद्यपदार्थ खाण्यास मनाई होती. १९०० पर्यंत चित्रपट बघणे ही एक अतिशय सामान्य गोष्ट झाली असली तरी ती सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरच होती. त्यामुळे त्याकाळी चित्रपट हे सुशिक्षित आणि श्रीमंत लोकांपर्यंत मर्यादीत राहीले.

१९२७ साली चित्रपटांना आवाज मिळाला आणि चित्रपटही सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आला. त्यामुळे चित्रपटगृहांवर गर्दी होऊ लागली. १९३० सालापर्यंत चित्रपट बघणार्‍यांची संख्या ९ कोटीपर्यंत पोहोचली. अर्थातच हे सामान्य लोक चित्रपटगृहांमधे खाण्यासाठी आपापले पदार्थ घेऊन येत. रस्त्यांवरील गाड्यांवर पॉपकॉर्न विकणार्‍या लोकांना यात संधी दिसली. मग चित्रपटगृहांच्या बाहेर पॉप कॉर्नच्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात विक्री चालू असे. त्यानंतर जगभर मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी आली. मग चित्रपटगृहाच्या मालकांना चित्रपटाच्या उत्पन्नाबरोबरच ह्या लाह्या विकून आपले उत्पन्न वाढवण्याचा मोह झाला आणि साधारणतः १९३० साली पॉपकॉर्न हे चित्रपटगृहांमधे विकले जाऊ लागले. पॉपकॉर्न बनवण्यास सोपे होते. ते बनवण्यासाठी काही विशेष कौशल्याची गरज नव्हती. त्यामुळे चित्रपटगृहाच्या मालकांनी खाद्यपदार्थ म्हणून विकण्यासाठी पॉपकॉर्नची निवड केली. प्रारंभी ५ ते १० सेंटला विकला जाणार्‍या पॉपकॉर्नच्या पुड्याची किंमत १० डॉलरपर्यंत पोहोचली. १९४५ सालापर्यंत अमेरिकेत विकल्या जाणार्‍या पॉप कॉर्न मधील निम्मे पॉप कॉर्न चित्रपटगृहांमधे विकले जाऊ लागले. अर्थातच चित्रपटगृहाच्या मालकांनी हे पॉपकॉर्न मोठ्या प्रमाणात विकले जावे म्हणून चित्रपटाच्या आधी व मध्यंतरात जाहिराती दाखवण्यास सुरुवात केली. जा जाहिरातीं मधील १९५७ साली प्रदर्शित केलेली ’Let’s all go to the Lobby’ ही ४० सेकंदाची जाहिरात अतिशय लोकप्रिय झाली.
त्यानंतर आलेल्या टेलिव्हिजनमुळे चित्रपटांवर थोडा परिणाम झालाच. पॉपकॉर्न घरी बनवणे जरा कठीण होते. पण मग काही कंपन्यांनी घरी सहज बनवता येतील असे पॉपकॉर्न तयार केले आणि मग घरी टेलिव्हिजनवर चित्रपट बघतानाही पॉपकॉर्न खाल्ले जाऊ लागले.

तर चित्रपटांच्या प्रारंभी श्रीमंत लोकांनी नाकारलेले पॉपकॉर्न विकून अनेक लोक श्रीमंत झाले.

चित्रपटगृहांमधे खाल्ल्या जाणार्‍या पॉपकॉर्न बनवण्याच्या यंत्राविषयी आणखी एक गमतीशीर गोष्ट. डॉ. अलेक्झांडर अ‍ॅंडरसन या वनस्पती शास्त्रज्ञाने एका वेगळ्या यंत्राचा शोध लावला. त्याने एका दंड गोलाकृती भांड्यामधे मक्याचे दाणे घातले आणि त्याला उष्णता दिली. त्यानंतर त्याने ते भांडे बाहेर काढून त्यावर हातोड्याने आघात केला. उष्णतेमुळे भांड्यात वाढलेल्या दाबाने भांडे फुटले आणि फुललेल्या लाह्या सगळीकडे पसरल्या. त्यातून त्याने पॉपिंग गन बनवली. दंड गोलाकृती भांड्यात मक्याचे दाणे घातले जात आणि त्यांना उष्णता दिली जात असे. उष्णतेमुळे या भांड्यामधला दाब वाढत असे आणि साधारण १७७ अंश सेल्सियसला आतल्या मक्याच्या दाण्यांमधील स्टार्च बाहेर पडून लाही बनत असे. या भांड्याला दाब दाखवणारे मीटर बसवलेले असे. त्या मीटरमधे एक विशिष्ट दाब निर्माण झाला की भांड्याला उष्णता देणे थांबवले जाते. त्यानंतर या भांड्याचे झाकण उघडले असताना तोफेसारखा स्फोट होऊन आतले पॉपकॉर्न बाहेर येतात. चीनमधील रस्त्यांवर आजही या पॉपिंग गनचा उपयोग केला जातो.

मक्याशीच संबंधीत असलेल्या आणखी एका पदार्थाबद्दल बोलणं अनिवार्य आहे. आज जगभर सगळीकडे न्याहारीला खाल्ल्या जाणार्‍या मक्याच्या पोहे (Flakes). दुधात या मक्याचे फ्लेक्स आणि थोडी साखर टाकून खाणे हा बर्‍याच लोकांचा नाष्टा आहे. पण याचा इतिहास बघायचा झाला तर आपल्याला जावं लागतं ते १८९८ मध्ये. अमेरिकेत केलॉग नावाच्या माणसाने पहिल्यांदा हे फ्लेक्स बनवले. ’बॅटल क्रिक टोस्टेड कॉर्न फ्लेक कंपनी’ अशा लांबलचक नावाने १९०६ साली मक्याच्या फ्लेक्सच्या उत्पादनास सुरुवात झाली. १९१४ साली केलॉग्ज अमेरिकेबरोबरच कॅनडामधेही विकल्या जाऊ लागलं. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या स्वादात मिळणारे फ्लेक्स बाजारात आणले. आज जगभरात जवळ जवळ १८० देशांमधे ’केलॉग्ज’ नावाच्या हे मक्याचे पोहे बनवले जातात आणि विकले जातात.

images (2)

अमेरिकेत हा व्यवसाय फक्त मक्याच्या फ्लेक्सपर्यंतच मर्यादेत राहिला नाही. केलॉग्जच्या आधीपासूनच क्वॅकर नावाची कंपनी ओटस् पासून न्याहारीसाठी पदार्थ बनवत असे. केलॉग्जच्या यशानंतर क्वॅकर या कंपनीनेही मका आणि ओटस् यांच्यापासून फ्लेक्स बनवले. त्यानंतर पॉपींग गन मधून बनवलेल्या साळीच्या लाह्यांचीही विक्री त्यांनी चालू केली. क्वॅकर आणि केलॉग्ज यांनी बनवलेले हे फ्लेक्स जगभर आजही मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात.

धान्याची लाही करण्याची कला मानवाला हजारो वर्षांपूर्वीपासून माहिती होती. त्याचबरोबर या लाह्यांचे किंवा पोह्यांचे चिवडे देखील खाण्यासाठी बनवले जात असावेत. पण आज त्याचे संदर्भ मात्र मिळत नाहीत. दोन चार रुपयात मिळणार्‍या लाह्या आपण शेकडो रुपयात घेऊ लागलो आहे. लाह्यांचा हा प्रवास मोठा मनोरंजक आहे.

कौस्तुभ मुद्‌गल

श्रावणमासी…

आटपाट नगर होतं, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण किंवा उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको ही वाक्य आपण अनेकदा वाचतो आणि कधी कधी मजेत वापरतो सुद्धा. या सगळ्याचा सोर्स म्हणजे आपला श्रावणातला कहाणी संग्रह. या कहाण्या कोणी रचल्या कोणी लिहिल्या याबद्दल कुठलीही माहिती आजवर माझ्या वाचनात आलेली नाही. पण जवळपास गेली शे-सव्वाशे वर्ष तरी या कहाण्या सांगितल्या वाचल्या जात आहेतच. 

आटपाट नगर होतं, तिथं एक राजा राज्य करत होता किंवा तिथं एक दरिद्री ब्राह्मण रहात असे(सगळ्या गोष्टीतले ब्राह्मण दरिद्री का हे मला एक कायमचं पडलेलं कोडं आहे) अशी सुरुवात करून गोष्ट चालू व्हायची. मग पुढं आवडत्या नावडत्या सुना/राण्या, मनोभावे व्रत पाळणारे आणि हेळसांड करणारे (करणाऱ्या सुद्धा), दारी आलेल्याला दोन घास खायला घालून पुण्य कमावणारे वगैरे वगैरे टिपिकल कथाभाग त्यात असायचा. मग व्रत करून आलेलं वैभव, न केल्यानं आलेलं दळीद्र/दुर्भाग्य वगैरे मसाला आणि शेवटी हा वसा टाकायचा नाही वगैरे तंबी कहाणी वाचणाऱ्याला देऊन सगळे सुखानं नांदू लागायचे आणि कहाणी सुफळ संपूर्ण व्हायची. 

साधीसोपी व्रतं, उपासना आणि त्यातून हमखास फळ मिळेल ही आशा हा या कहाण्यांचा USP होता. अगदी परवा-परवापर्यंत या कहाण्या मध्यमवर्गीय घरात श्रावणात हमखास वाचल्या जायच्या, त्या ऐकलेली शेवटची पिढी आता बहुतेक तिशी-चाळीशीत असावी. या मराठीतल्या घरगुती कहाण्या कुठं बाहेर झळकल्या असतील याचा मला अजिबात अंदाज नव्हता. पण शंभर वर्षांपूर्वी या गोष्टी Deccan Nursery Tales or Fairy Tales From The South या नावानं प्रकाशित झालेल्या होत्या. Charles Augustus Kincaid नावाच्या एका ब्रिटिश गृहस्थाने हा अनुवाद केलेला आहे. 

 हे Kincaid साहेब मुंबईच्या हायकोर्टात न्यायाधीश होते, त्यांनी १९१४ साली या गोष्टी पुस्तकरूपाने प्रकाशित केल्या, त्याआधी याच गोष्टी टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आलेल्या होत्या. हे पुस्तक Kincaid साहेबांनी आपला मुलगा Dennis ला अर्पण केलेलं आहे. पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेनुसार आधी साहेबांनी या गोष्टी आपल्या चिरंजीवांना ऐकवल्या, त्याला त्या फारच आवडल्या म्हणून साहेबांनी या गोष्टी आधी पेपरात आणि मग पुस्तकरूपानं प्रकाशित केल्या. या Kincaid साहेबांनी केलेलं सगळ्यात महत्वाचं कार्य म्हणजे A History of Maratha People ग्रंथाच्या तीन खंडाचे त्यांनी रावबहाद्दूर पारसनीस यांच्याबरोबर केलेले लिखाण. 

page11-1024px-Deccan_Nursery_Tales.djvu

आता आपण परत श्रावणातल्या कहाण्यांकडं येऊया.आपल्याकडं कहाण्यांची सुरुवात ‘ऐका गणेशा तुमची कहाणी’ पासून होऊन मग निर्मळ मळे उदकाचे तळे वगैरे स्टॉप घेत घेत व्रताची माहीती सांगून मग शेवटी साठाउत्तराऐवजी पाचाउत्तरी सुफळ संपूर्ण होते, आता यात कथाभाग काहीच नसल्यामुळं Kincaid साहेबांनी गणपतीलाच पुस्तकातून गाळून टाकलेलं आहे. त्यामुळं Kincaid साहेबांची कहाणी एकदम सुरू होती ती आदित्यराणूबाईपासून. आता या आदित्यराणूबाईला इंग्रजी कापडं न घालता तिला फक्त Sunday story च म्हटलेलं आहे. Atpat नावाच्या village मध्ये रहाणाऱ्या या ब्राह्मणाला नित्य समिधा, फुलं आणि दुर्वा आणायला woods मध्ये  पाठवल्यावर त्याला फक्त fetch sticks and cut grass एवढंच करता आलं. तिथं त्याला nymphs & wood fairies भेटल्या त्या holy rites करत होत्या, ब्राह्मणाने त्याना विचारल्यावर त्या म्हणाल्या you will become proud and vain and you shall not perform them properly. एखाद्या परकीय भाषेत आपल्या मातीतल्या गोष्टी रूपांतरीत करणं केवढं अवघड आहे हे आपल्याला इथूनच कळायला सुरुवात होती. मग आपल्या नेहमीच्या ‘गूळपाण्याचं’ चं pudding होऊन जातं आणि करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा तर फारच थोडक्यात आवरून जातंय. 

Atpat नावाच्या village मध्ये घरच्या लेकीसुनांना bath घालून एक म्हातारी sandle wood paste, flowers, half dozen grains तांदूळ आणि खुलभर म्हणजेच few drops of milk  घेऊन महादेवाच्या मंदिरात जाते आणि भक्तिभावानं तेवढं खुलभर  दूध गाभाऱ्यात घालते आणि गाभारा दुधानं भरून जातो. खुलभर दुधाची ही कहाणी इथं Monday story म्हणून येते.

लहान असताना आपल्या डोळ्यातून सगळ्यात जास्त पाणी काढणारी गोष्ट म्हणजे भावाच्या घरी जेवायला जाणाऱ्या बहिणीची गोष्ट, शुक्रवारची गोष्ट. बहिणीची परिस्थिती ती जेंव्हा भावाकडं जाती तेंव्हा ती एकेक दागिना काढून बसायच्या wooden platform ठेवायला लागते.नंतर तिनं portion of rice घेतला आणि सरीवर ठेवला, portion of vegetable घेतला आणि ठुशीवर ठेवला. Sweetball उचलला चिंचपेटीवर ठेवला, मराठी गोष्टीत मोत्याच्या पेंडाला जिलबी मिळते पण इथं मात्र पेंडाला उपाशीच रहावं लागलेलं आहे. पण मराठी कहाणीतला जो समजावणीचा सुंदर सूर आहे तो इंग्लिशमध्येही टिकलेला आहे. 

श्रावण शनिवारचा मला आवडणारा भाग म्हणजे केनीकुर्डूची भाजी आणि भाकरी, या गोष्टीतली सून grain jars मधून grain काढून bread करते, केनीकुर्डूला अजून एक नाव आलापाला असंही आहे तेच नाव घेऊन भाजी grass ची झालेली आहे आणि तेरडा clover leaves होऊन त्याची चटणी झालेली आहे. 

Deccan_Nursery_Tales_066

नागपंचमीच्या गोष्टीत आईवडील आणि कुणीच नातेवाईक नसणाऱ्या सुनेला Nagoba the snake king  मामा म्हणून त्याच्या घरी न्यायला येतो त्याच्या फण्यावर बसवून तिला आपल्या beneath the earth महालात घेऊन जातो. तिथं काही दिवस राहून ती परत येते पण यायच्या आधी एका अपघातात तिच्या हातून दिवा पडून नागाच्या पिल्लांच्या शेपट्या जळतात. ही पिल्ले मोठी झाल्यावर आपल्या शेपट्या जाळणाऱ्याचा सूड घ्यायला हिच्या घरी येतात. त्यादिवशी नेमकी नागपंचमी असते आणि ही सुनबाई नागांची पूजा करत असते. या शेपूट जळलेल्या पिल्लांना आठवून ती म्हणते जिथं माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील खुशाल असोत त्याचं इंग्लिश भाषांतर little prince no tail, little prince cut tail आणि little prince dock tail केलेलं आहे जे वाचताना फार छान वाटतंय.

Deccan_Nursery_Tales_097 (1)

जवळपास सगळ्याच कहाण्या Kincaid साहेबांनी या पुस्तकात घेतलेल्या आहेत. यांना आपले हे सगळे सणवार माहीत कसे झाले असतील, तिथं या कहाण्या सांगितल्या जातात हे कसं समजलं असेल त्यानंतर त्यांना मराठी येत नसणारच हे गृहीत धरून त्यांनी त्यांचं हे शब्दशः भाषांतर कसं केलं असेल याचं कौतुक वाटल्याशिवाय रहात नाही. ज्या देशात आपण राज्यकर्ते म्हणून गेलेलो आहे तिथं तो आब बाजूला ठेवून तिथल्या संस्कृतीशी एवढी नाळ जोडून घेणं हे काम नक्कीच सोपं नाही. 

कधीकाळी आई-आजीकडून ऐकलेल्या वर्णसठीची, पिठोरीची शिवामुठीची आणि इतरही अनेक कहाण्या इंग्रजीतून वाचताना फार आनंद वाटत रहातो. नॉस्टॅल्जिया म्हणून पुन्हा एकदा या कहाण्या वाचायला आणि ऐकायला काहीच हरकत नाही. त्यासाठीच या पुस्तकाची लिंकही लेखाच्या शेवटी दिलेली आहे.या पुस्तकात सुखावणारी अजून एक गोष्ट म्हणजे यातली धुरंधरांनी रेखाटलेली चित्रं, इतकी सुंदर चित्र आजही आपल्याकडच्या पुस्तकात आढळत नाहीत. 

न उतता मातता (आणि वैतागता) तुम्ही हा लेख जसा पूर्ण वाचला तसेच आमचे पुढचेही लेख तुम्ही वाचावेत असं म्हणून ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण…


लिंक-https://archive.org/details/deccannurserytal00kinc

यशोधन जोशी

झेंडा रोविला…

सन १७५२. भारतापुरतं बोलायचं तर मराठ्यांची सत्ता उत्तरेत आता बळकट झालेली होती आणि नानासाहेब पेशवा पुण्यातून जवळपास निम्म्या भारताचा कारभार बघत होता. भारतात ब्रिटिशांनी अजून पाय पक्के रोवलेले नसले तरी त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू होती. तिकडं सातासमुद्रापार अमेरिकेत मात्र त्यांचा अंमल घट्ट बसलेला होता.

सॅम्युअल आणि रिबेका ग्रीस्कॉम हे एक सामान्य जोडपं न्यूजर्सीमध्ये रहात होतं. सॅम्युअल  सुतार होता, सुतारकामातून मिळणारे थोडेफार उत्पन्न व घरच्या कोंबड्या आणि बकऱ्या यावर त्याचा प्रपंच रुटूखुटू चालायचा. या भरीत भर म्हणून त्यांची तब्बल १७ लेकरं. यातल्या आठ लेकरांना काय फार आयुष्य मिळालं नाही पण उरलेली मात्र जगली. यातलंच नववं अपत्य होतं एलिझाबेथ ग्रीस्कॉम, हिचा जन्म १७५२ चा.

ग्रीस्कॉम कुटुंब ख्रिश्चन धर्मातल्या Quaker पंथाचे अनुयायी होतं.  या पंथातले लोक ईश्वर हा सर्वातच आहे अशी श्रद्धा बाळगतात, कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट यांच्यासारखा चर्च आणि धर्मगुरूकेंद्रित धर्म ते मानत नाहीत. या पंथाचे लोक कोणत्याही युद्धात भाग न घेणे, रंगीत कपडे न वापरणे, गुलाम न बाळगणे, मद्यपान न करणे इत्यादी नीतिनियम पाळतात. त्यामुळं एलिझाबेथचं लहानपण तसं शिस्तबद्द वातावरणातच गेलं

एलिझाबेथ तीन वर्षांची असतानाच सगळं ग्रीस्कॉम कुटुंब फिलाडेल्फियाल स्थलांतरित झालं. इथं एलिझाबेथ Quaker समुदायाने चालवलेल्या शाळेत जाऊ लागली. एलिझाबेथची एक आत्या शिवणकामात अतिशय तरबेज होती, तिच्या हाताखाली शिकून एलिझाबेथही लौकरच उत्तम शिवणकाम करू लागली.

शाळा संपता संपता एलिझाबेथ जॉन वेबस्टर या एका बैठकीच्या गादया गिरदया तयार करणाऱ्या गृहस्थाच्या कारखान्यात उमेदवारी करायला लागली. हे गृहस्थ गादया गिरदया तयार करण्याच्या कामाव्यतिरिक्त महागडे पडदे, पलंगपोस, लोकरी ब्लॅंकेट यांची दुरुस्ती करायचेही काम करत. उमेदवारी करताना एलिझाबेथनं हे सगळं शिकून घेतलं.

सगळं नीट चालू असतानाचा एक घोटाळा झाला, एलिझाबेथ तिच्याबरोबर काम करणाऱ्या एका तरुणाच्या प्रेमात पडली. याचं नाव होतं जॉन रॉस. प्रेमात पडायला हरकत नव्हती पण हा जॉन रॉस ग्रीस्कॉम कुटुंबाच्या दृष्टीनं ‘आपल्यातला’ नव्हता. म्हणजे जॉन हा ख्राईस्ट चर्चचा सभासद होता, त्याचे वडील चर्चमधलेच एक अधिकारी होते. एलिझाबेथच्या घरातून या प्रेम प्रकरणापायी तिला अफाट विरोध झाला आणि शेवटी एलिझाबेथ आणि रॉस घरातून पळून गेले आणि लग्न केलं. ही सगळी हकीकत १७७३ सालची.

संसार सुरू झाला हळूहळू सगळ्या गोष्टी सुरळीतपणे घडायला लागल्या.  लग्नानंतर एलिझाबेथने नवीन नाव घेतलं ते म्हणजे बेटसी. बेटसी आणि रॉसने मिळून स्वतःचा व्यवसाय सुरू केला, बेटसीच्या हातात अफाट कौशल्य होतं त्यामुळं धंदा हळूहळू नावारूपाला आला. खुद्द जॉर्ज वॉशिंग्टनच्या शयनगृहाच्या सजावटीचे काम करायची संधीही  त्यांना मिळाली.

अमेरिकेत तेंव्हा स्वातंत्र्ययुद्धाला सुरुवात झालेली होती, कॉन्टिनेटल आर्मी या नावानं सैन्य जमवून जॉर्ज वॉशिंग्टन वगैरे मंडळींनी मोठीच धामधूम सुरू केलेली होती.  स्वातंत्र्यासाठी सैन्यात भरती होण्याच्या हाकेला प्रतिसाद देऊन रॉस सैन्यात भरती झाला आणि बेटसी एकटीनेच व्यवसाय सांभाळू लागली. रॉसचं एकूण ग्रहमान फारसं बरं नसल्यामुळंच का काय पण तो दारूगोळ्याच्या कोठारावर पहाऱ्याला असताना त्याला आग लागली आणि उडालेल्या भडक्यात रॉस ख्रिस्तवासी झाला.

बेटसीनं अपार दुःख केलं पण थोड्याच दिवसात पुन्हा आपल्या कामाला लागली. सैन्यासाठी गणवेश, तंबू, झेंडे इत्यादी गोष्टी ती पुरवू लागली. एके दिवशी संध्याकाळी जॉर्ज वॉशिंग्टन आणि त्याचे चार-दोन सहकारी बेटसीच्या दुकानात येऊन धडकले, त्यांच्याकडे झेंड्याचे एक डिझाईन होते आणि त्याप्रमाणे एक झेंडा त्यांना शिवून पाहिजे होता.

बेटसी आपल्या कामात पारंगत असल्यामुळं तिनं त्यात काही सुधारणा सुचवल्या, त्या सूचना जॉर्ज वॉशिंग्टनने व त्याच्या सहकाऱ्यांनाही पटल्या आणि त्या  डिझाईन बरहुकूम बेटसीने झेंडा तयार करून या मंडळींना सुपूर्द केला. पण या लहानशा वाटणाऱ्या गोष्टीमागे मात्र मोठा इतिहास लपलेला  होता.

जॉर्ज वॉशिंग्टन जे डिझाईन घेऊन आलेला होता ते डिझाईन अमेरिकेच्या राष्ट्रध्वजाचे होते, या झेंड्यावर १३  लाल,पांढरे पट्टे आणि १३ चांदण्या होत्या. हे अमेरिकेन संघराज्यात सामील झालेल्या तेंव्हाच्या १३ राज्यांचे प्रतिक होते. बेटसीने सुचवलेला बदल म्हणजे डिझाईनमध्ये ज्या  चांदण्या होत्या त्यांना सहा टोकं होती, त्याऐवजी पाच टोकांच्या चांदण्या करणे कारण त्या करणं अधिक सोपं होतं.

यथावकाश हा झेंडा फडकला, बेटसीही आपल्या आयुष्यात गुंतत गेली. १७७७ मध्ये तिनं दुसरं लग्न केलं, जोसेफ अँशबर्न हा तिचा नवरा मर्चंट नेव्हीत होता. दुर्दैवाने त्याचं जहाज ब्रिटिशांनी पकडलं आणि तो तुरुंगात पडला. वर्षभरात जहाजवरचे सगळे खलाशी सुटले पण सुटकेच्या आधी थोडेच दिवस जोसेफ तुरुंगात मरण पावला. बेटसीने हिंमत हरली नाही आणि तिने पुन्हा एकदा लग्नाची गाठ बांधली. तिचा तिसरा नवरा होता जॉन क्लेपूल. तिचं हे लग्न मात्र ३४ वर्ष टिकलं.पुरती म्हातारी म्हणजे ७६ वर्षांची होईतो बेटसी आपलं दुकान सांभाळत होती.

आपल्या नातवंड-पतवंडाना बेटसी तिने शिवलेल्या पहिल्या अमेरिकेच्या झेंड्याची गोष्ट नेहमी खुलवून सांगत असे. ती १८३६ साली ख्रिस्ताघरी गेली. १८७० साली तिचा नातू विल्यम कॅनबीने त्याच्या आजीने सांगितलेली अमेरिकन झेंड्याची गोष्ट हिस्टोरीकल सोसायटी ऑफ पेनसिल्व्हेनियामध्ये मांडली. या गोष्टीला अर्थातच काहीही कागदोपत्री पुरावा नव्हताच. पण विल्यम कॅनबीनं पुरावा म्हणून घरच्या सगळ्या मंडळींचे त्यांनी ही हकीगत बेटसीकडून ऐकल्याचे प्रतिज्ञापत्रच सादर केले. या सगळ्यामुळे बेटसी एकदम अमेरिकाभर प्रसिद्ध झाली.

पुढच्या काळात झेंड्याच्या श्रेयावरून अनेक वाद-प्रतिवाद झाले,इतिहासकारांनी हे सगळे दावे फेटाळून लावले. पण १९५२ साली अमेरिकन सरकारने बेटसीच्या जन्माला दोनशे वर्ष झाल्याच्या निमित्याने तिच्यावर एक टपाल तिकीट काढून तिच्या या कार्याची पोचपावती दिली.

यशोधन जोशी

क्षितीजाच्या पार…

माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे कारण त्याला स्मृतीचे वरदान आहे. चांगल्या-वाईट स्मृतींचे संचित घेऊन तो आयुष्याची वाटचाल करत रहातो. अशीच एक आठवण उराशी बाळगून एक इंग्रज भारतातून मायदेशी परतला आणि मरेपर्यंत त्याने भारतातल्या त्याच्या ‘पराक्रमाची’ आठवण उराशी बाळगली.

हे साहेब आहेत विल्यम जेम्स. याचा  जन्म १७२१ चा वेल्समधल्या Haverfordwest मधला. घरची परिस्थिती अगदी बेतासबात, वडिलांचा व्यवसाय म्हणजे पिठाची गिरणी चालवणे. वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे  हे चिरंजीव घरातून परागंदा झाले, कुठं गेले काय झालं काही पत्ता नाही. पण कुणाचं नशीब कुठं असावं याचा काही भरोसा नाही, विल्यम जेम्सने घरातून बाहेर पडल्यावर समुद्राचा रस्ता धरला आणि जहाजांवर उमेदवारी सुरू केली.  वयाच्या सतराव्या वर्षी तो एका जहाजाचा कप्तान बनला आणि स्वतःचे उत्तम बस्तान बसवले. 

त्याकाळी इंग्लडमध्ये ईस्ट इंडीया कंपनीचा बोलबाला मोठा होता, कंपनी पगारपाणी आणि भत्तेही चांगले देई. १७४७ मध्ये कंपनीच्या नौदलात भरती होऊन विल्यम जेम्स मुंबईत दाखल झाला आणि अंगच्या गुणांमुळे चारच वर्षांत ‘कमोडोर’ पदाला जाऊन पोचला.

Commodore William James (1721-1783) 
*oil on canvas 
*127 x 101.5 cm 
*1784
विल्यम जेम्स

मराठा आणि इंग्रज आरमाराच्या झटापटी सदैव चालूच असत. तुळाजी आंग्रेनी पश्चिम किनाऱ्यावर आपली चांगलीच दहशत बसवलेली होती. पण एक वेळ अशी आली की तुळाजी आंग्रे स्वतःच्या स्वामींना म्हणजे साताऱ्याच्या छत्रपतींनाही जुमानेनासे झाले. मग मराठी सत्तेतर्फे नानासाहेब पेशव्यांनी आंग्र्याविरुद्ध मोहीम उघडली. इंग्रजांनीही त्यांचा भविष्यातल्या फायदा लक्षात घेऊन या संघर्षात मराठ्यांच्या बाजूने भाग घेतला. कंपनीतर्फे विल्यम जेम्सला सुवर्णदुर्गाला वेढा घालण्याची कामगिरी मिळाली. Protector हे इंग्लडमध्ये तयार झालेलं लढाऊ गलबत आणि Viper, Triumph व Swallow ही तीन गुराब अशा चार जहाजांचा काफिला घेऊन सुवर्णदुर्गाच्या दिशेने निघाला. सुवर्णदुर्ग किनाऱ्यापासून सुमारे पाव मैल समुद्रात आहे आणि त्याच्या संरक्षणासाठी किनाऱ्यावर कनकगड, फतेगड आणि गोवागड हे तीन किल्ले आहेत. 

commodore-james-in-the-protector-with-revenge-and-the-grab-bombay-off-gheriah-india-april-1755
Protector, Viper, Triumph आणि Swallow

सुवर्णगडापाशी येऊन पोचल्यावर  विल्यम जेम्सने या चारही किल्ल्यांच्या ताकतीचा अदमास घेतला, या चारही किल्ल्यांवर मिळून १३४ तोफा होत्या. Protector वर ४० तोफा होत्या आणि बाकीच्या जहाजांवर हलक्या माऱ्यासाठी उपयोगी पडतील अशा तोफा होत्या. थोडक्यात सांगायचं तर दोघांचे बलाबल अगदी विरुद्ध होते. पावसाळा तोंडावर होता त्यामुळं जेम्सने वेढा घालणे वगैरे वेळकाढू गोष्टींपेक्षा प्रत्यक्ष लढाईच सुरू करण्याचे ठरवले.  त्यानुसार पहिल्या दिवशी जेम्सने समुद्राच्या बाजूने जवळपास ८०० गोळे सुवर्णगडावर डागले.ज्यामुळे किल्ल्यातील शिबंदीचे मोठे नुकसान झाले.

यानंतर त्याने एक धाडसी डाव खेळण्याचे ठरवले आणि रात्रीच्या अंधारात किनारा आणि सुवर्णदुर्ग यांच्यामध्ये जो उथळ व खडकाळ भाग होता तिथं Protector, Viper आणि Triumph ही तीन जहाज घुसवली आणि दुसरा दिवस उजाडताच चारही किल्यांबरोबर एकाच वेळी लढायला सुरुवात केली. Protectorने सुवर्णदुर्गावर असा मारा केला की किल्ल्यांवरच्या तोफा आणि त्या चालवणारे यांचे बरेच नुकसान झाले. दुपारपर्यंत सगळ्या बाजूने सरबत्ती अशीच सुरू राहिली. त्याचवेळी Protector वरून उडवलेला एक गोळा थेट बारुदखान्यावर जाऊन पडला आणि त्याचा भयंकर मोठा स्फोट झाला. आगीचे लोळ उसळले तरीही सुवर्णदुर्ग संध्याकाळपर्यंत लढत राहिला. इंग्रजही रात्रीपर्यंत चारही किल्ल्यांवर मारा करत राहिले. रात्रीच्या वेळी सुवर्णदुर्गावरून निसटून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या छोट्या गलबतांना (इंग्लिश रेकॉर्डसमध्ये यांना gallivats म्हटलेलं आहे.) मागे ठेवलेल्या Swallow ने समुद्राचा तळ दाखवला.

दुसऱ्या दिवशीची सकाळ होताच पुन्हा लढाईला तोंड फुटले पण मराठ्यांच्यात आता फारसा जोर उरलेला नव्हता. सकाळी दहाच्या सुमाराला चारही किल्ल्यांनी शरणागती पत्करली. ब्रिटिशांनी चारही किल्ल्यांवर त्यांचे निशाण फडकवले आणि विजयोत्सव सुरू केला. ते विजयाच्या आनंदात मग्न असतानाच गोवागडाचा किल्लेदार आणि काही सैनिक लपत-छ्पत सुवर्णदुर्गावर पोचले त्यांनी गडाचा पुन्हा ताबा घेतला.परत एकदा लढाईला तोंड फुटले. पुन्हा एकवार सुवर्णदुर्गावर तोफांचा मारा सुरू झाला आणि काही वेळातच ब्रिटिशांनी परत किल्ला जिंकून घेतला. आंग्र्यांच्या विरोधात कंपनीला पहिल्यांदाच एवढा मोठा विजय मिळालेला होता.

विल्यम जेम्सची ही कामगिरी फारच अफाट असली तरी कंपनीने त्याला फक्त १०० पौंड बक्षिसादाखल दिले. १७५६ च्या फेब्रुवारीत विल्यम जेम्सने विजयदुर्ग उर्फ घेरियाच्या लढाईतही भाग घेतला. पुढं काही वर्ष भारतात काढून १७५९ साली त्यानं कंपनीला रामराम ठोकला आणि मायदेशी परतला. तिकडं गेल्यावर विल्यम जेम्सने लग्न केलं, संसार थाटला आणि पोराबाळांच्यात रमला. पण कंपनीशी त्याचे लागेबांधे अजूनही टिकून होते त्यामुळं १७६८ मध्ये कंपनीच्या संचालक मंडळाचा सभासद झाला. १७७८ साली त्याला ‘सर’ हा किताब देण्यात आला.

लॉर्ड सँडविच (हेच ते ज्यांच्याबद्दल ‘एका नावाची गोष्ट’ हा लेख मी लिहिलेला होता) आणि विल्यम जेम्स पुढं एकत्रितपणे राजकारणात उतरले. विल्यम जेम्स दोनदा इंग्लंडच्या संसदेत निवडूनही गेला. १७८३ साली त्याच्यावर कंपनीत असताना हेराफेरी केल्याचा आरोप करण्यात आला, हे प्रकरण इंग्लंडच्या संसदेपर्यंत पोचलं पण विल्यम जेम्सने हे सगळे आरोप फेटाळून लावले.

१७८३ च्या डिसेंबर महिन्यात स्वतःच्या मुलीच्या लग्नातच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो मरण पावला. विल्यम जेम्स आयुष्यभर सुवर्णदुर्गाच्या लढाईच्या आठवणीत रमलेला असे, जीव पणाला लावून जिंकलेली ती लढाई म्हणजे त्याच्या आयुष्यातला त्याने सदैव उराशी बाळगलेला प्रसंग होता. त्या प्रसंगाची आठवण म्हणून त्याच्या पत्नीने त्याच्या स्मरणार्थ एक स्मारक बांधलं आणि सुवर्णदुर्ग संग्रामाची आठवण म्हणून तिने या स्मारकाला Suverndroog castle हे नाव दिले.

triangular_tower_shooters_hill

 

लंडनजवळच्या Shooters hill नावाच्या एका छोट्या टेकाडावर आजही हा Suverndroog castle उभा आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासातल्या एका दुर्दैवी प्रसंगाची स्मृती सातासमुद्रापलीकडे अद्याप जिवंत आहे.

London,_Shooter's_Hill,_Severndroog

तारीफ करू क्या…..

१८१८ साली ब्रिटिश सरकारने भारतावर आपले राज्य प्रस्थापित केले. त्यानंतर ब्रिटिशांचा जुलमी राज्यकारभार चालू झाला. या जुलमी कारभारामुळे तत्कालीन सरकारविरुद्ध बंड करण्याचे बीज रोवले गेले आणि स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले जीवन समर्पित केले. पण काही लोकांना तत्कालीन सरकारविषयी अत्यंत प्रेम होते.

प्राचीन काळी राजांकडे त्यांची स्तुती करण्यासाठी स्तुतीपाठक, भाट अशी पगारी लोकं ठेवलेली असायची. या लोकांचं काम म्हणजे राजाची खरी-खोटी स्तुती करणे आणि राजाला खूश ठेवणे. काही मोगल राजांनी त्यांचे स्तुती करणारे ग्रंथही लिहून घेतले होते.

६-७ महिन्यांपूर्वी यशोधनने मला दोन पुस्तके दिली. त्यातलं एक १८९७ साली तर दुसरं १९११ साली प्रकाशित झालं.

१८९७ हे साल स्वातंत्र्यसग्रामाच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाचे आहे. या वर्षी प्लेगची साथ सगळीकडे आली होती आणि याच भानगडीत २२ जूनला रॅंडचा पुण्यात खून करण्यात आला होता. या सगळ्या षडयंत्रामागे टिळकांचा हात असावा असा संशय ब्रिटिश सरकारला आला होता. टिळक पुण्यात जेव्हा स्वातंत्र्यसंग्रामाच्या गडबडीत गर्क होते तेव्हा गोविंद पांडुरंग टिळक नावाचे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील मुलींच्या शाळेतले शाळामास्तर यांनी ’मलिका मा अझमा महाराणी साहेब व्हिक्टोरीया यांचा जयजयकार असो’ या नावाचे पुस्तक प्रकाशित केले. एक टिळक ब्रिटिश सरकार विरुद्ध भांडत होते तर हे दुसरे टिळक ब्रिटिश महाराणीचा उदो उदो करत होते.

पुस्तक अतिशय मजेशीर आहे. पुस्तकात तिसर्‍या पानावर व्हिक्टोरीया राणीचे रेखाचित्र छापले आहे. पुढील पानावर पुस्तकाच्या नावाखाली राणीगीत – हे लहानसेच, पण अत्युत्तम नीतिपर पुस्तक असे छापले आहे. पुस्तकाची किंमत चार आणे असून ते कोल्हापूरातील ज्ञानसागर छापखान्यात छापले आहे असा उल्लेख सापडतो.

पुस्तकाची प्रस्तावना ज्याला सुचना असं लेखक म्हणतो ती अतिशय मजेदार आहे. ’ह्या पुस्तकात चक्रवर्तिनी श्रीमती महाराणी साहेब व्हिक्टोरीया केसर इ हिंद यांची स्तुती आणि त्यांस दीर्घायुषी करण्याबद्दल परमेश्वरापाशी विनयपूर्वक मागणे मागून, महाराणी साहेबांच्या कारकिर्दीतील राज्य पद्धतीचे धोरणाविषयी माहिती थोडक्यात दिलेली आहे.’ अशी पुस्तकाची ओळख लेखक पहिल्याच परिच्छेदात करून देतो. हा लेखक अतिशय प्रामाणिक आहे. त्यांनी या सुचनेत लिहिले आहे ’मेहरबान व्हिट्‌कोम साहेब बहादूर, असि सुपरिंटेंडन्ट रेव्हिन्युसर्वे मराठास्टेट यांणीं आरंभी रुकडी मुक्कामी, आपला अमोल्य वेळ खर्च करून, या बूकांतील पहिल्या आवृतीच्या सर्व कविता मजकडून म्हणवून घेतल्या, आणि मोठ्या आनंदाने ह्या बुकाच्या पहिल्या आवृत्तीच्या कांहीं प्रतींना आश्रय देऊन, काही सुधारणा करण्यास सांगितल्या जेणे करून मजला चालू कामास भारी उमेद आली.’

या संपूर्ण पुस्तकात व्हिक्टोरीया राणीच्या स्तुती करणार्‍या ४५ कवितांचा समावेश आहे. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत या सगळ्या कविता त्या कुठल्या वृत्तात लिहिल्या आहेत ते दिले आहे. प्रत्येक कवितेनंतर त्याचा अर्थ दिलेला आहे. कवितेच्या प्रत्येक शब्दावर आकडे दिलेले आहेत आणि कवितेनंतर कंसामधे ’वरील अंक अन्वयाचे आहेत’ अशी टिप दिलेली आहे. कवितेच्या अर्थामधे कुठल्या क्रमाने कवितेमधले शब्द आले आहेत हे कळण्यासाठी हे अंक दिले आहेत. त्याकाळी मराठी संगीत नाटकात प्रसिद्ध असलेली साक्या, दिंड्या आणि कामदा या वृत्तातल्याही कविता आहेत.

या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकाची छपाई. १८९७ साल हे भारतातील छपाईचा प्रारंभीचा काळ. अर्थातच पुस्तक हे खिळे जुळवून छापलेले आहे. हातानी लिहिल्याप्रमाणे असलेला हा टाईप फेस देखणा आहे. याचबरोबर पुस्तकाच्या सुरुवातीस व्हिक्टोरीया राणीचे रेखाचित्र छापले आहे.

पुस्तकाच्या अखेरीस लेखकानी विद्याखात्याचे अधिकारी साहेबांना विनंती करून आपली पुस्तकं खपवण्याचा प्रयत्न केला आहे ’शाळांनिहाय बक्षिसें वैगेरे देण्याकरीतां मंजूर करून पुस्तकें घेण्याची मेहेरबानी करतील इतकेंच मागणे मागून त्वत्पदीं नमस्कार करीतों’

एकंदर हे पुस्तक वाचताना धमाल येते.

असंच आणखी एक पुस्तक लिहिलं १९११ साली स्वातंत्र्यसंग्रामाच्या चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या पुण्यात. हे पुस्तक लिहिलं आहे एका लेखिकेने. ’आंग्ल प्रभा’ या नावानी प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची लेखिका आहे हिराबाई रामचंद्र गायकवाड. या बाईंनी आपल्या नावाच्या आधी स्वत:ला बालसरस्वती अशी पदवी लावलेली आहे. पुस्तक छापले आहे ठाण्यातल्या अरुणोदय या छापखान्यात.

हे पुस्तक आहे राजेसाहेब पंचम जॉर्ज आणि त्यांची पत्नी मेरी यांचे लघुचरित्र हे पुस्तक लेखिकेने खुद्द पंचम जॉर्ज आणि मेरी यांनाच अर्पण केले आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच पंचम जॉर्ज आणि मेरीची रेखाचित्रे आहेत आणि चित्राखाली स्तुतीपर आर्या लिहिल्या आहेत. त्यानंतर ’नवकुसुममाला’ या मथळ्याखाली भलामोठा तीन पानी श्लोक लिहिलेला आहे.

प्रस्तावनेची सुरुवात पुन्हा चार ओळींच्या श्लोकाने होते आणि प्रस्तावनेत येणारे एक वाक्य फारच भारी आहे. ’ईश्वराच्या आज्ञेवाचून झाडाचे पान ही हालत नाही इतका अधिकार हल्लीचे सार्वभौम जे इंग्लंडचे राजे पंचम जॉर्ज व हिंदुस्तानचे बादशाह यांच्याकडे आला आहे.’ यानंतरचे कंसातले वाक्य काळजाला भिडणारे आहे. त्या कंसात म्हणतात ’ एकीकडे राजे व दुसरीकडे बादशाह म्हणजे जणू काय इंग्लंड व इंडिया यांची ’हरीहर’ भेटच होय.’

यातला महाराणी मेरीची स्तुती करणारा एक परिच्छेद फारच रंजक आहे.
पूर्व काली इकडे मुद्रणकला माहीत नसल्यामुळे साधुसंतांची चरित्रे, पुराणे व वेद इत्यादी ग्रंथ लिहिणे अवघड होई; म्हणून विद्यादेवी मंत्ररूपाने पठणद्वारे गुप्त राहिली होती. पण अशा तर्‍हेने कोंडून राहणे तिला न आवडून म्हणा किंवा महाराणी साहेबांची कीर्ती वाढविण्याकरिता म्हणा तिने मंत्रासह यंत्रामध्ये उडी टाकिली अर्थात ती पालथी पडली. (टाइप उलटे असतात). तेव्हा तिला उठविल्यावर म्हणजे छापून काढिल्यावर सुलटी होऊन बसली अशा प्रकारचे आपले सुंदर रूप तिने बादशाहीण येण्यापूर्वी हिंदुस्थानात कोणासही दाखविले नसावे. आणि आता प्रत्यक्ष प्रगट होऊन खुशाल पुस्तक रूपाने व वर्तमानपत्राद्वारे पृथ्विपर्यटन करीत आहे. यावरून असे वाटते की, श्री स्वामिणां सद्गुणखनी महाराणी व्हिक्टोरिया ह्या येतील तेव्हांच आपले खरे स्वरूप व्यक्त करावे असा तिने निश्चय केला असावा.

संपूर्ण पुस्तकात पंचम जॉर्ज आणि महाराणी मेरी हिचे गुणगान केले आहे. मधे मधे श्लोक, रुपके यांची पेरणी याचबरोबर लिहिलेला मजकूर अतिशय रंजक आहे. कदाचित पंचम जॉर्ज आणि महाराणी मेरीने हे पुस्तक वाचले असते (आणि त्यांना ते वाचून कळले असते) तर त्यांना गहिवरून आले असते. यात एक रुपक तर फारच गंमतिशीर आहे.

रूपकं
महाराणी साहेब रूपी हरितालिका मातेने
राज्य रूपी महालांत बसून
प्रजा रूपी भक्तांस
कृपा रूपी प्रसाद देऊन
सद्गुण रूपी मस्तकावर
कीर्ति रूपी किरीट व
शाबासकी रूपी शालू परिधान केला होता तद्वत्
हल्ली राजे महाराजांनी किरीट व शालू सह औदार्य रूपी आभरण धारण करावें
आणि विचार रूपी कृपादृष्टी ठेवून कधी झालेल्या गरीब प्रजेचे पालन करून प्रजेकडून दुवा रूपी दुशाला ग्रहण करावी अशी विनयपूर्वक प्रार्थना आहे.

तसेच या पुस्तकात सातवे एडवर्ड बादशाह यांची स्तुती करणारे एक वेगळे प्रकरण लिहिलेले आहे. पुस्तकाच्या शेवटी बरेच फारसी शब्द असलेले एक हिंदी स्तुतीगीत आहे.

३० पानी छोटेखानी असलेल्या या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सगळे पुस्तक दोन रंगांमधे छापलेले आहे. तांबड्या रंगाची नक्षीदार बॉर्डर आणि काळ्या रंगात मजकूर छापलेला आहे. वापरलेला टाईपफेस सुबक असून पुस्तकारंभी आलेली रेखाचित्रे निळ्या रंगात छापलेली आहेत.

एकीकडे स्वातंत्र्याची चळवळ जोरात चालू असताना इंग्रजांची भलावण करणारे स्तुतीपाठक होते. कदाचित त्यांना त्यावेळी समाजात त्रासही झाला असेल. ‘ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी’ अशी एक म्हण आहे. या म्हणीप्रमाणे स्तुतीपाठकांची ही प्राचीन परंपरा आजही अव्याहत चालूच आहे.

कौस्तुभ मुद्‌गल

Blog at WordPress.com.

Up ↑