आधी हाताला चटके….

मी आणि कौस्तुभ आमचे सामाजिक वजन वाढवण्याचे प्रयत्न गेली अनेक वर्षे करत आहोत. पण त्यात अजून फारसे यश न आल्याने आम्ही मग शारीरिक वजनाकडे मोर्चा वळवला आणि ‘जाऊ तिथं खाऊ’ हे ब्रीदवाक्य मनाशी धरून जागोजागचे प्रसिद्ध पदार्थ खाऊन बघितले. यातूनच प्रत्यक्ष खाण्याबरोबर खाण्याविषयी वाचणे आणि लिहिणे ही आवडही आमच्यात निर्माण झाली. यातूनच एक पुस्तक माझ्या हाती लागलं. आणि मग त्याविषयी तुम्हाला सांगायचं म्हणून हा लेखही बसल्याबसल्या सहज हातातून उतरला.

१८७५ साली राजमान्य राजश्री रामचंद्र सखाराम गुप्ते नावाच्या एक गृहस्थांनी ‘सुपशास्त्र’ अर्थात स्वयंपाकशास्त्र हा ग्रंथ लिहून सिद्ध केला. या पुस्तकात त्यांनी तत्कालीन मराठी पदार्थांची यादीच प्रसिद्ध केलेली आहे. अर्थात यातले सुमारे ८०% पदार्थ आपण आजही खात/करत असतो पण मला यातल्या पदार्थांबरोबरच त्या काळातली भाषा आणि लिहिण्याची पद्धत तितकीच आवडली.

विद्या प्रसारक मंडळ

यातली पदार्थांची यादी वाचून हे पुस्तक ब्राह्मणी अथवा उच्चवर्गाच्या आहारातील पदार्थांविषयीच आहे असा निष्कर्ष नक्कीच काढता येईल पण हे पदार्थ थोड्या फार फरकाने समाजातला एक मोठया भागाच्या रोजच्या आहारातले होते ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे.

लेखकाने आपल्या मनोगतात हे आधीच स्पष्ट केले आहे की – “हाल्ली नीत्यशाहा कुटुंबात स्त्रियाच स्वयंपाक करितात परंतु कधी खारट, कधी आंबट, कधी अळणी या मासल्याने पदार्थ होतात यामुळे भोजन करणारास फार त्रास होऊन त्याचें अंतःकरण स्वस्थ नसते तेंव्हा सुख कोठून मिळेल हे सहज ध्यानात येईल.” अशी काळजाला हात घालणारी सुरुवात करून प्रस्तुत लेखकाने लिहिलेले पुस्तक सर्वांनी संग्रह करून त्याचा उपयोग करावा अशी विधायक सूचना केलेली आहे. शिवाय मुलींच्या शाळेत स्वयंपाक करणे हा विषय सुरू करून तिथे हे पुस्तक मार्गदर्शक म्हणून लावण्यासाठीचे प्रयत्नही आपण वाचकांनीच करायचे आहेत.

स्वयंपाकाचा ओनामा करण्याआधी लेखकाने भोजनातले षड्‌रस कोणते हे उलगडून सांगितलेले आहे. यातले बहुतेक रस आपण आता सुप्स/स्टार्टस, मेनकोर्स आणि डेजर्टस यात गुंडाळून टाकलेले आहेत. पण हे रस आहेत

१. भक्ष्य – पोळ्या, दळ्या, बेसन, मोहनभोग वगैरे
२. भोज्य – भात, खिचडी वगैरे
३.लेह्य – मेतकुट, कायरस, पंचामृत वगैरे
४.पेय- कढी, सार, ऊसाचा रस वगैरे
५. चोष्य – लोणची, शेवग्याच्या शेंगा वगैरे
६. खाद्य – मोतीचूर, जिलब्या, घीवर,  बुंदी वगैरे

एवढं सांगून झाल्यावर सृष्टीचे मूळ ब्रह्म आहे या चालीवर लेखकाने भोजनात मुख्य पदार्थ वरण (पक्षी आमटी/सांबारे) हा आहे असे सांगितले आहे. (या वाक्यावर माझ्यासारखे शेकडा ऐंशी टक्के आमटीप्रेमी सहमत होतील.) यानंतर लेखकाने उत्तम वरण अथवा आमटी कशी करावी हे सांगितले आहे. ही पद्धत आपल्या ओळखीची आहे पण त्या काळातली मापे समजून घेणे सुद्धा थोडं मनोरंजक आहे.

या मापांविषयी लेखकानं माहिती दिली नसली तरी माझ्या आई-आजीकडून घरात धान्य मोजताना जे वजनी आणि मापी परिमाण मला समजलं आणि लक्षात राहिलं ते असं होतं

धान्यासाठी –

दोन नेळवी = एक कोळवे
दोन कोळवी = एक चिपटे
दोन चिपटी = एक मापटे
दोन मापटी = एक शेर
दोन शेर = एक अडशिरी
दोन अडशिर्‍या = एक पायली
सोळा पायल्या = एक मण
वीस मण = एक खंडी

वेलदोडा किंवा इतर छोटे पदार्थ मोजण्यासाठी

दोन गहू = एक गुंज
आठ गुंजा = एक मासा
बारा मासे = एक तोळा

लेखकाने मात्र पदार्थांचे माप/प्रमाण सांगताना भार संज्ञा असलेल्या ठिकाणी इंग्रजी रुपया भार (म्हणजे बहुदा एका इंग्रजी रुपया इतक्या वजनाचे) व शेर म्हटले आहे तिथे ऐंशी रुपये भार असे समजावे असे स्पष्ट केलेले आहे.

विद्या प्रसारक मंडळ

या नंतर भातापासून पाककृतींची सुरुवात होते आणि साधा भात, साखरभात वगैरेनी सुरुवात करून आंब्याच्या रसाचा भात, गव्हल्यांची खिचडी आणि तांदुळाची उसळ अशा आजपर्यंत कानावर न पडलेल्या भाताच्या नावांनी ही यादी संपते. मग सुमारे २५-३० पोळीचे प्रकार आलेले आहेत. यातले चवडे पोळी, मृदुवल्या आणि फुटाणे पोळी वगैरे पदार्थ आपल्याला बऱ्यापैकी माहीत नसलेले आहेत.

यानंतर गोडाचा प्रवेश होतो, यात लाडू, खीर (याला लेखक क्षीर म्हणतो), वड्या, मुरंबे आणि सगळ्यात शेवटी रस व शिकरणी यांची वर्णी लागते. यातली अकबऱ्या, आईते, याडणी, याल्लपी आणि गपचिप ही नावं ऐकायला सुद्धा मस्त वाटतात. यातल्या अनेक गोष्टी आपण अजूनही खात असलो तरी करवंदांचा मुरंबा, महाळुंगाचा मुरंबा आणि कोरफडीचा मुरंबा वगैरे अजून माझ्या तरी ऐकण्यात किंवा खाण्यात आलेले नाहीत. अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे दुधीहलव्याला लेखक ‘दुधे भोपळ्याचा खरवस’ असं नाव देतो.

विद्या प्रसारक मंडळ

जेवणाचे ब्रह्म हे आमटी हे असली तरी जेवणाची भिस्त ही काही प्रमाणात भाजीवर आहेच म्हणून या पुस्तकात भाज्यांचे अनेक प्रकारही आलेले आहेत. आपल्या नेहमीच्या भाज्या आणि आता आपल्या आहारातून बहुतेक हद्दपार झालेल्या राजगिरा, चंदनबटवा अशा भाज्याही इथं दिसतात. यातही एक वेगळी गोष्ट मला आढळली ती म्हणजे त्याकाळात कोबी आपल्या स्वैपाकघरात येऊन पोहोचलेला होता आणि पुस्तकात लेखक त्याचा उल्लेख कोबीचा कांदा असा करतो.

विद्या प्रसारक मंडळ

या नंतर चटण्या, कोशिंबीरी, डांगर, अनेक प्रकारचे सार वगैरे पदार्थ यांचे मनोहारी चित्र आपल्या नजरेसमोर उभं करत पुस्तक शेवटाकडे जाते. शेवटच्या भागात शंभर लोकांच्या जेवणाला लागणारे साहित्य वगैरेची यादी वाचताना त्यात गुलाबाची फुले, अत्तर, गुलाबपाणी आणि उदबत्त्या वगैरे बघून आपण पूर्वी वेगवेगळ्या लग्नात/कार्यात उठलेल्या पंक्ती आणि त्यात जेवायचा थाट वगैरे आता फक्त आठवायचा.

यातल्या सगळ्या पदार्थांची नावं सांगून मला तुम्हाला अचंबित करायचं नाही पण सुमारे दीड शतकापूर्वी महाराष्ट्रातल्या किमान काही भागातल्या आणि काही वर्गाच्या खाद्यसंस्कृतीची ओळख आपल्याला या पुस्तकातून होईल एवढं नक्की.

ता.क. – हौशी लोकांना त्यांनी या पुस्तकात वाचून शिकलेल्या पदार्थांचा नमुना ते मला आणि कौस्तुभला पोचता करतील या वायद्यावर हे पुस्तक उपलब्ध करून दिले जाईल.

यशोधन जोशी

“Hold the corridor”

जर्मनी १९४५ – १९३९ साली सुरु झालेल्या महायुद्धात सुरुवातीला जर्मनीची सर्वत्र सरशी होत होती.ऑस्ट्रिया, पोलंड, फ्रान्स सारखे देश जिंकून हिटलरच्या स्वप्नातले ३ रे राईश (3rd Reich) जवळपास पूर्ण युरोपभर पसरले होते.इटली,जपान हे देशही या युद्धात भाग घेऊन जर्मनीला साथ देत होते.युरोपबरोबरच आफ्रिका आणि आशियाही युद्धाच्या खाईत लोटला गेला होता.जर्मनीचे हवाईदल (luftwaffe) आता थेट लंडनवर बॉम्ब्सचा वर्षाव करत होते.एका मागून एक विजय मिळवत जर्मन सैन्याची आगेकूच सुरु होती आणि २२ जून १९४१ ला हिटलरने रशियाशी केलेला अनाक्रमणाचा करार मोडून त्यांच्यावर आक्रमण केले.युद्धाच्या तयारीत नसणाऱ्या रशियाची प्रचंड वाताहत झाली, जर्मन सैन्याने रशियाचा बराचसा भूभाग जिंकला पण तेवढ्यात कुप्रसिद्ध असा रशियन हिवाळा सुरु झाला आणि जर्मन सैन्याला त्याचा प्रचंड तडाखा बसला. स्टालिनला आपल्या या ‘जनरल विंटर’वरती अतिशय भरोसा होता. रशियात खोलवर घुसलेल्या जर्मन सैन्याला पुरवठा करणे हे काम अतिशय दुरापास्त होऊन गेले आणि रशियन लालसेना (Red army) आणि नागरी संरक्षणदलांनी जर्मन सैन्याला घेरले.रशियन आघाडीवर लढणाऱ्या जर्मन सेनेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्पुरती माघार घेण्याची परवानगी हिटलरकडे मागितली पण हिटलरने त्यांना ‘विजय किंवा मरण’ अशा स्वरुपाची आज्ञा दिली. जर्मन सैन्याने लढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले पण अन्नधान्य आणि इतर युद्धसाहित्याच्या टंचाईने शेवटी त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. लाखो जर्मन सैनिक मृत्युमुखी पडले, हजारो कैद झाले आणि शेवटी हिटलरला रशियन आघाडी गुंडाळावी लागली. Operation Barbarossa सपशेल फसले. आता जर्मनीची पूर्व आघाडी (Eastern Front) हळूहळू माघार घेत होती आणि रशियाने आगेकूच सुरु केलेली होती आता रशियन सैन्याने जर्मनीला ठेचून बर्लिनवर रशियाचा लाल झेंडा फडकवण्याचा निर्धार केलेला होता.

battle-stalingrad-german-soldiers-killed-002

दुसऱ्या बाजूला पश्चिम आघाडीवर ब्रिटीश, अमेरिकन आणि फ्रेंच फौजांनी नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर प्रचंड मोठी जोखीम पत्करून लाखो सैनिक उतरवले आणि त्या आघाडीवरही जर्मन सैन्याची पिछेहाट सुरु झाली.१९४४ संपता संपता जर्मनीच्या दोन्ही बाजूनी दोस्त राष्ट्रांच्या फौजांचा विळखा पडला आणि दुसरे महायुध्द शेवटच्या टप्प्यात पोचले. जर्मनीच्या भूमीवर झालेल्या या लढाईच्या शेवटच्या चरणातील काही महत्वाचे प्रसंग या लेखातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.

मार्च १९४५ Oderberg शहर –  जर्मन सैन्याचा Eastern Front (एकेकाळचा रशियन फ्रंट) आता जर्मनीच्या मधोमध पोचला होता, पूर्वेच्या दिशेने रशियन लाल सेना आणि पोलिश सैन्य आगेकूच करत होते. जर्मन रेडीओवरून अजूनही नाझींच्या सरशीच्या बातम्या सांगितल्या जात होत्या, १९४५ च्या जानेवारी पासूनच Oder नदी पार करण्याचा प्रयत्न रशियन लाल सेना करत असून जर्मन सैन्य त्यांचा यशस्वी प्रतिकार करत आहे अशा बातम्या प्रसारित केल्या जात होत्या. प्रत्यक्षात Oderberg पाशी युद्धाची भयंकर धुमश्चक्री सुरु होती, जर्मनीची 9th Army येथे तैनात होती आणि या लढाईत ३५००० हून अधिक जर्मन सैन्य कमी आलेले होते. जर्मन सैन्याची शक्ती आता घटत चाललेली होती, पाच वर्षाहून अधिक काळ सुरु असलेल्या युद्धानंतर आता जर्मनीला आता मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत होता, या युद्ध आघाडीवर लढणारे बरेचसे सैनिक हे १६-१७ वर्षांचे कोवळे युवक होते आणि आता या अननुभवी सैन्याला आता रशियाच्या राक्षसी सैन्यबळाला तोंड द्यायचे होते.

Oder नदी ओलांडणे रशियन सैन्याला फारसे अवघड नव्हते, त्यांनी नदी ओलांडण्यासाठी तात्पुरते पण मजबूत पूल उभारले होते आणि नदी ओलांडून जर्मनीच्या पश्चिम भागावर हल्ला करण्याची त्यांची तयारी सुरु होती, इथून राजधानी बर्लिन फक्त ६० किमी लांब होते. सुमारे २५ लाख रशियन सैन्य या मोहिमेत सहभागी झालेले होते. या सैन्याची ३ भागात विभागणी केलेली होती आणि यातल्या एका दलाचे नेतृत्व प्रसिद्ध रशियन जनरल झुकॉव्हकडे होते. झुकॉव्हच्या नेतृत्वाखाली ९ लाख रशियन सैन्य होते आणि त्यांच्यासमोर १,३०,००० सैन्यबळ असणारी जर्मनीची 9th Army होती. जर्मन सैन्याचे नेतृत्व करत होता जनरल थिओडोर बुसा (Theodor Busse). कोणत्याही परिस्थितीत बर्लिनचे रक्षण करण्याचे आदेश हिटलरने बुसाला दिलेले होते. Oder नदीवर आणि Frankfurt ला संरक्षणाची अभेद्य भिंत उभारून बर्लिनचे रक्षण करण्याची बुसाने तयारी केली.

WhatsApp Image 2018-12-24 at 7.46.10 PM
जनरल बुसा

याप्रसंगी जर्मनसैन्याच्या मनोधैर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच, समोर रशियन सैन्याचा सागर दिसत असूनही ते योग्य संधीची शांतपणे वाट बघत होते. तर पलीकडच्या बाजूला झुकॉव्ह आपल्या सैन्य आणि सामुग्रीची जुळवाजुळव करण्यात मग्न होता. सिलो हाईट्स (Seelow Heights) हि एक उंचावर असणारी अत्यंत मोक्याची जागा हेरून तिथे झुकॉव्हने आपले Headquarter बनवले होते येथून बर्लिन फक्त ९० किमी होते आणि त्याचे पुढचे लक्ष होते बर्लिन. रशियन सैन्याच्या उच्च अधिकाऱ्यांच्यात जास्तीत जास्त प्रदेश जिंकण्याची स्पर्धा सुरु होती, आपण जास्त प्रदेश जिंकून स्टालिनच्याकडून होणाऱ्या सन्मानास पात्र व्हावे यासाठी त्यांची धडपड सुरु होती. स्टालिनची योजना एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बर्लिनच्या दिशेने आघाडी उघडून २ आठवड्यात बर्लिन हस्तगत करावे आणि १ मे बर्लिनमध्ये साजरा करावा अशी होती.

आता झुकॉव्हचे सैन्य सज्ज झालेले होते, त्याच्याकडे उत्तम प्रकारचा तोफखाना आणि ३००० रणगाडे होते ( आणि जर्मन सैन्याकडे फक्त ५०० रणगाडे होते). युद्धतयारी बरोबरच जर्मन सैन्याला मनोधैर्य खच्ची करून माघार घ्यायला लावण्यासाठीही झुकॉव्हने प्रयत्न सुरु केले. जर्मनीतून पळून जाऊन रशियात आश्रय घेणारे काही कम्युनिस्टही रशियन सैन्याबरोबर होते, त्यांच्याकडून लाऊडस्पीकरवरून जर्मन भाषेत संदेश पसरवले जात होते. या संदेशांचा आशय माघार घेऊन तुमचा जीव वाचवा असा होता पण याला जर्मन सैन्याने मुळीच दाद दिली नाही. याचबरोबर जर्मन सैन्यात अशीही एक अफवा पसरली होती कि रशियन आघाडीवर लढताना कैद झालेला जनरल झायलीच (Seydlitz) हा आपल्या जर्मन सैन्यासह रशियाकडून लढत आहे, पण रशियन सैन्याने झायलीचचा वापर जर्मन सैन्याला माघार घेण्याचे आवाहन करण्यासाठी केलेलाच होता.

WhatsApp Image 2018-12-24 at 7.46.00 PM

१६ एप्रिल १९४५ च्या मध्यरात्री रशियन सैन्याने प्रचंड बळ एकवटून हल्ला सुरु केला, ओडर नदीवरच्या जर्मन आघाडी पथकांच्या दिशेने तोफगोळे आणि अग्निबाणांचा पाऊस पडू लागला, धुळीचे लोळ उठले आणि समोरचे काही दिसेनासे झाले. जर्मन फौजांच्या आघाडीची ताकत या माऱ्यापुढे चालेनाशी झाली. बराच काळ चाललेल्या या सरबत्तीनंतर रशियन रणगाडे आणि चिलखती वाहने पुढे पुढे सरकू लागली आणि त्यांच्या पाठोपाठ रशियन पायदळाने कूच केले. जर्मन सैन्याला या प्रचंड रशियन सैन्याला थांबवणे शक्य होईना, जर्मन सैन्याचा मोठ्या प्रमाणात नाश होऊ लागला. आघाडीवरच्या तुकड्यांनी माघार घेऊन काही चौक्या रिकाम्या केल्या.माघार घेऊन मुख्य सैन्याबरोबर एकत्रितपणे या हल्ल्याचा मुकाबला करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु झाला. जर्मन सैन्याने सिलो हाईटसच्या प्रदेशात अनेक ठिकाणी खंदक उभारले होते,अडथळे उभारून ठेवलेले होते. त्यांच्या आडोशाने त्यांनी अटीतटीची झुंज द्यायला सुरुवात केली. जर्मनांचा प्रतिकार इतका कडवा होता कि रशियाच्या चढाईचा वेग अतिशय मंदावला.

तीन दिवसांच्या अथक लढाईनंतर आणि ३०,००० सैनिकांचा बळी दिल्यावर रशियाला जर्मन आघाडीला खिंडार पडणे शक्य झाले. युद्धभूमीवर जर्मन आणि रशियन सैनिकांच्या प्रेतांचा खच पडलेला होता. निकामी झालेले रणगाडे धूर ओकत होते, चिलखती गाड्या धूर ओकत होत्या. जर्मनीचेही १२,००० सैनिक मृत्युमुखी पडले. जर्मनीच्या बाजूने मनुष्य आणि साहित्याची हानी कमी झालेली असली तरी झालेली ही हानी भरून काढण्याची त्यांची क्षमता संपून गेलेली होती. २० एप्रिलला रशियन सैन्याने जर्मनीच्या सैन्याला सर्व बाजूनी वेढले आणि कोंडीत पकडले. कोंडीत सापडलेल्या या सैन्यावर रशियन तोफखाना आग ओकू लागला, डोक्यावरून भिरभिरत विमाने बॉम्बहल्ला करू लागली. तिथे असणाऱ्या हाल्बे जंगलातील दाट झाडीत लपून जर्मन सैन्यही तिखट प्रतिकार करू लागले. (या भागाला Halbe pocket असे नाव देण्यात आलेले होते) पण हा प्रतिकार नियोजनबद्ध नव्हता, रशियन सैन्याच्या विळख्यातून सुटून पश्चिमेकडे म्हणजे बर्लिनकडे जात जात प्रतिकार करण्याचा प्रयत्न सुरु झाला. तोफांच्या आणि बॉम्बच्या धुरामुळे वातावरण कुंद झालेले होते, प्रेतांचा खच पडलेला होता त्यावरून रशियन रणगाडे पुढे सरकत होते, जर्मन सैन्य मिळेल त्या वाहनाने रशियन सैन्याचा वेढा फोडून निसटायचा प्रयत्न करत होते आणि या वाहनांना रशियन विमाने आणि तोफखाना अचूक टिपत होता. जनरल बुसा जरी या सैन्याचे अजूनही नेतृत्व करत असला तरी त्याचे या सैन्याच्या हालचालीवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नव्हते, शेवटी त्यानेही बर्लिनच्या दिशेने माघार घेण्याचा आदेश दिला पण त्याआधीच जर्मन सैन्याने ते प्रयत्न सुरु केलेले होते.

अग्निबाण आणि तोफांच्या माऱ्यातून वाट काढत जर्मन सैन्य रशियन सैन्याचा वेढा फोडायचा प्रयत्न करत होते, रशियन सैन्याकडून युद्धबंदी बनवले जाण्याची भीती या हालचालीला बळ देत होती. उरलेसुरले रणगाडे गोळा करून त्यांच्या आडोशाने जर्मन सैन्य पुढे सरकत सरकत शेवटी हाल्बे नावाच्या गावाजवळ जाऊन पोचले, पण यांची संख्या फक्त काही हजार होती, बाकीचे सैन्य त्यामानाने बरेच कमनशिबी होते जे अजून हाल्बेच्या जंगलातच अडकून पडले होते आणि तो त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा ठरला. दुसऱ्या बाजूला आता रशियन सैन्याच्या तुकड्या आता बर्लिनच्या उपनगरापर्यंत जाऊन पोचल्या होत्या.

Kampf um Berlin/sowjet.Panzer/Stadtgrenz - Soviet tanks / Berlin / 1945 - Combats ‡ Berlin/ Chars soviÈt. ‡ Berlin

“परिस्थिती अजूनही सुधारेल” अशी वल्गना हिटलरने २५ एप्रिलला केली, 9th Army (जी हाल्बेच्या जंगलात अडकून पडलेली होती) येऊन बर्लिनचे संरक्षण करेल अशी आशा त्याने जर्मन नागरिकांना दाखवली. इकडे हजारो जर्मन सैनिकांना रशियन सैन्याने युद्धबंदी बनवले होते आणि सैबेरियाला रवाना केले होते. त्यांचे पुढे काय झाले याचा कोणताही मागमूस उरला नाही. त्यातील काहींना १९५५-६०च्या दरम्यान रशियाने मुक्त केले. अनेक युद्धकैदी रशियाने सुडापोटी ठार केले.

रशियन फौजांचा वेढा आता बर्लीनभोवती पडला, हाल्बेच्या जंगलातून निसटलेले सैन्य जनरल विंकच्या (Walther Wenck) पश्चिम आघाडीवर ब्रिटीश आणि अमेरिकन सैन्याशी लढणाऱ्या 12th Army ला जाऊन मिळाले आणि आता 12th Army एकाचवेळी अमेरिकन आणि रशियन सैन्याशी लढू लागली. एल्ब (Elbe) नदीच्या आसपासच्या ही लढाई सुरु होती, जर्मन फ़िल्डमार्शल कायटेलने (Keitel) विंकला आज्ञा केली कि त्याने आता 12th Army सह बर्लिनचे रक्षण करावे आणि फ्युररला मुक्त करावे. सुरुवातीला विंकने ही आज्ञा पाळली पण रशियाने वेढलेले बर्लिन पुन्हा हस्तगत करणे हे अशक्यप्राय आहे हे लक्षात येऊन ते साहस करण्याचा विचार सोडून दिला. हिटलरने पुन्हा वल्गना केली कि “जनरल विंकची 12th Army येत आहे,ते आले कि परिस्थिती पालटेल.”

WhatsApp Image 2018-12-24 at 7.46.34 PM
जनरल विंक

हिटलर आता कोणत्या जगात वावरत होता तेच समजत नव्हते. बर्लीनवर अक्षरश: आगीचा वर्षाव होत होता, सर्व इमारती ढासळलेल्या होत्या, हिटलर अजूनही नवनवीन लष्करी आदेश काढत होता, ज्या सैन्याच्या नावे हे आदेश निघत होते ती सैन्यदले आता अस्तित्वातच नव्हती. हिटलर आणि कायटेलच्या आदेशांना झुगारून विंकने आपल्या सैन्याला अडकून पडलेल्या 9th Army ची सुटका करण्याचे आदेश दिले आणि २६ एप्रिल १९४५ ला जर्मन सैन्याने शेवटची चढाई सुरु केली, या हल्ल्याचा जोर इतका जबरदस्त होता कि रशियन सैन्याची बरीच पीछेहाट झाली. जर्मन सैन्याने अनेक गावे आणि शहरे पुन्हा हस्तगत केली. विंक आपल्या सैन्याला पुन्हा पुन्हा संदेश पाठवत होता “Hold the corridor”, 9th Army ला माघार घेण्यासाठी जिंकलेला हा टापू काही काळापुरता का होईना राखून ठेवणे अत्यंत महत्वाचे होते आणि विंकची 12th Army प्राणपणाने आपल्या जनरलच्या “Hold the corridor” या आज्ञेचे पालन करत होती.

WhatsApp Image 2018-12-29 at 10.42.22 AM

२७ एप्रिल १९४५ ला कायटेलने पुन्हा एकदा विंकला आदेश दिला कि, बर्लिनची लढाई आता शेवटच्या टप्प्यात आहे, बर्लिनचे संरक्षण कर. बर्लिनची आशा आता फक्त तुझ्यावर आहे. पण विंकने आता रशियाच्या कचाट्यात सापडलेल्या जर्मन सैन्याची मुक्तता करून अमेरिकन आणि ब्रिटीश सैन्यापुढे शरणागती पत्करण्याचे ठरवले होते. विंकने वेळोवेळी आपल्या सैन्याशी बातचीत करून त्यांचे धैर्य उंचावले, त्याने त्याच्या सैनिकांना आश्वासन दिले कि लौकरच अडकून पडलेल्या 9th Army तील उरलेले सैनिक आणि अडकून 12th Army यांसह तो अमेरिकन आणि ब्रिटीश सैन्यापुढे शरणागती पत्करेल. २९ एप्रिलच्या रात्री हिटलरने जोड्लमार्फत (Jodl) कायटेलला एक संदेश पाठवला आणि त्यात ५ प्रश्न विचारलेले होते,
1. Where are Wenck’s spearheads?
2. When will they attack again?
3. Where is the Ninth Army?
4. To where is it breaking through?
5. Where are Holste’s [XXXXI Panzer Corps] spearhead?

हिटलरला अजूनही चमत्काराची अपेक्षा होती, पण कायटेलने यावेळी खरे उत्तर देण्याचे धाडस दाखवून हिटलरला प्रत्यक्ष परिस्थितीची कल्पना दिली. कायटेलने हिटलरला खालील उत्तर पाठवून दिले.

To 1. Wenck’s point is stopped south of Schwielow Lake. Strong Soviet attacks on the whole east flank.
To 2. As a consequence Twelfth Army cannot continue the attack toward Berlin.
To 3 and 4. Ninth Army is encircled. A panzer group has broken out west. Location unknown.
To 5. Corps Holste is forced to the defensive from Brandenburg via Rathenow to Kremmen.

३० एप्रिल १९४५ ला विंकने 9th Army ला रेडीओवरून लौकरात लौकर 12th Army पर्यंत पोचण्याचा संदेश पाठवला. (Comrades, you’ve got to go in once more, “It’s not about Berlin any more, it’s not about the Reich anymore. The mission is not to win a military victory or commendations, it is to save lives.” हा त्याने पाठवलेल्या संदेशातील काही भाग आहे)

9th Army तील सैनिक आता रात्रंदिवस धावत होते, जागोजागी रशियन फौजेशी त्यांचा सामना होत होता, रशियन सैनिक त्यांचा पाठलाग करत होते, त्यांची लांडगेतोड करत होते. 12th Army चिवटपणे झुंजत, रशियन माऱ्याला तोंड देत त्यांच्यासाठी रस्ता मोकळा करत होती. १ मे १९४५ ला हे हजारो सैनिक विंकच्या सैन्याला येऊन मिळाले. हे सैनिक थकलेले होते, अनेकजण जखमी होते त्यांना त्यांच्या साथीदारांनी पाठीवरून आणलेले होते. काहीजण कुबड्या काठ्या घेऊन चालत होते. सैनिकांबरोबरच यात अनेक परिचारिका आणि रशियन सैन्याच्या भीतीने पळालेले नागरिकही होते.

Screen-Shot-2013-11-23-at-11.36.29-AM

रशियन सैन्याला पाडलेल्या खिंडारातून 9 आणि 12th Army तल्या सैनिकांनी पश्चिमेकडे सरकत पुन्हा एल्ब नदीचा किनारा गाठला. पाठीमागून रशियन सैन्य अजूनही हल्ला करत होते, उखळी तोफांनी गोळे डागले जात होते आणि एल्ब नदीच्या तुटलेल्या पुलावरून आणि नदीच्या प्रवाहात उभ्या केलेल्या नौकातून जीवावर उदार होऊन नदी पार करून लाखो जर्मन सैनिकांनी आणि नागरिकांनी अमेरिकन सैन्यापुढे शरणागती पत्करली. या दिवशी तारीख होती ६ मे १९४५.

WhatsApp Image 2018-12-29 at 10.48.04 AM

युद्धानंतरच्या घडामोडी

9th Army चा प्रमुख जनरल बुसी १९४५ ते ४८ युद्धकैदी होता. इतर जर्मन जनरल्स बरोबर त्याच्यावर देखील न्युरेम्बर्ग येथे खटला चालवण्यात आला (Nuremberg trials) पण त्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली. पुढे बुसी पश्चिम जर्मनीचा नागरीसुरक्षा समितीचा अध्यक्ष झाला, दुसऱ्या महायुद्धावर त्याने लिखाणही केले जे बरेच प्रसिध्द झाले. बुसी १९८६ साली मरण पावला.

12th Army चा प्रमुख जनरल विंक १९४७ पर्यंत युद्धकैदी होता, सुटकेनंतर तो औद्योगिक क्षेत्रात कार्यरत राहिला आणि १ मे १९८२ साली एका मोटार अपघातात तो मरण पावला.

दुसरे महायुद्ध संपून ७० वर्षे होऊन गेली, जनरल विंकच्या मृत्यूलाही आता ३५ वर्षे होऊन गेली. हे युद्ध लढलेलेही आता काळापल्याड जाऊन पोचले पण अजूनही दरवर्षी डिसेंबर आला की मला रशियातल्या भयावह हिवाळ्यात लढणारे जर्मन्स आठवल्याशिवाय रहात नाहीत.

यशोधन जोशी

 

महाराष्ट्रवृत्तांत – १८४८ ते १८५३

“व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले” ही उक्ती ब्रिटींशाच्या बाबतीत नेहमीच वापरली जाते. पण राज्यकर्ते बनतानाचा त्यांचा प्रवासही तेवढाच मनोरंजक आहे. शतकभराच्या प्रवासाच्या त्यांच्या या आठवणी त्यांनी अनेक ठिकाणी लिहून तर काढल्या आहेतच पण जतनही केल्या आहेत. ब्रिटिश राज्यकर्ते म्हणून उदयाला आल्यानंतरही त्यांचे भारताविषयीचे आकर्षण संपलेले नव्हते. त्यांनी भारतीय, त्यांची संस्कृती, धर्म इ. विषयी विस्तृत अभ्यास केला. भारतभर प्रवास करताना त्यांनी प्रवासवर्णनेही लिहिली. यातले अनेक लेखक मुलकी किंवा सेनेतले अधिकारी आहेत. त्यामुळे यातल्या अनेकांच्या आठवणी आपल्याला एकसारख्याही वाटतात. या सगळ्यातून एक प्रवासवर्णन किंवा आठवणी सांगणारे लिखाण मात्र वेगळं आहे कारण ते लिखाण एका स्त्रीचे तिच्या भारतातल्या वास्तव्याच्या स्मृती जागवणारं आहे.

ही स्त्री आहे १८४८ ते १८५३ मध्ये मुंबईचा गव्हर्नर असणाऱ्या ल्युशिअस बेंटिक कॅरे उर्फ लॉर्ड फॉकलंडची पत्नी अ‍ॅमेलिया कॅरे. तिच्या या पुस्तकाचं नाव ‘Chow-Chow; Being selections from a journal kept in India, Egypt and Syria’ हे इतकं लांबलचक आहे. हे पुस्तक १८५७ साली लंडनमध्ये प्रकाशित झाले. पुस्तक प्रकाशनाच्यावेळी या बाईसाहेब जिवंत होत्या की नाही याचा नक्की अंदाज करता येत नाही कारण त्या १८५७ सालीच वारल्याची नोंद आहे. ‘Chow-Chow’ या विचित्र वाटणार्‍या शब्दाबद्दल माहीती देताना ती म्हणते की – भारतात गावोगाव फ़िरून माल विकणारे बोहरा व्यापारी ‘Chow-Chow’ नावाच्या एका टोपलीत/गाठोड्यात सर्व प्रकारच्या मालाचा एक-एक नमुना ठेवतात. जो ते गिर्‍हाईकांना उघडून दाखवतात. यावरून आपल्याला अंदाज आला असेलच की त्या ‘Chow-Chow’ प्रमाणेच गव्हर्नरबाईसुद्धा आपल्या या पुस्तकात त्यांच्या पोतडीतून एकेक चीज काढून दाखवणार आहेत.

पुस्तकात काय लिहिलंय हे बघण्याआधी अ‍ॅमेलिया कॅरेची आपण थोडी ओळख करून घेऊया. अ‍ॅमेलिया ही इंग्लंडचा राजा चौथा विल्यम आणि त्याचं प्रेमपात्र डोरोथी जॉर्डन यांची मुलगी. चार बहीणी आणि पाच भाऊ अशा मोठ्या कुटुंबात ती वाढली. तिचा जन्म १८०७ सालचा. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया ही अ‍ॅमेलियाची चुलत बहीण. १८३० साली अ‍ॅमेलियाचं लग्न बेंटिक कॅरे उर्फ लॉर्ड फॉकलंडशी झालं. उमराव घराण्यातल्या लॉर्ड फॉकलंडची ईस्ट इंडीया कंपनीने मुंबई प्रांताचा गव्हर्नर म्हणून नेमणूक केली. १८४८ साली तो भारतात येऊन दाखल झाला आणि सोबतच गव्हर्नरबाईही दाखल झाल्या.

Amelia_falkland
अ‍ॅमेलिया कॅरे

अ‍ॅमेलिया तिच्या आठवणींची सुरुवात मुंबईत उतरल्यापासून करते. मे महिन्यातल्या एका ’रम्य’ दुपारी त्यांचे जहाज मुंबई बंदरात येऊन दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागताला टळटळीत उन्हात तमाम विदेशी आणि देशी साहेब आपापल्या लवाजम्यासह उभे होते. मंत्र्यासंत्र्यांची वाट बघत उन्हात उभे रहाण्याची रीत जी आपण जागोजागी बघतो तिची मुळे इतक्या मागेपर्यंत गेलेली आपल्याला जाणवतात.

त्यावेळच्या मुंबईचे वर्णन जे काही वर्णन अ‍ॅमेलियाने केलेले आहे ते अगदी वाचण्यासारखे आहे. मुंबईत पोचल्यानंतर पहिल्याच दिवशी ती मुंबईचा फेरफटका मारायला बाहेर पडली. त्यावेळी तिला एक लग्नाची वरात दिसली, एका अशक्त घोड्यावर स्वार झालेले नवरा-नवरी, त्यांची चकचकीत बाशिंगे, मुंडावळ्या आणि त्यांच्यासमोर वाजणारी वाजंत्री. या वाजंत्रीला ती Tom-Tom drums म्हणते. संध्याकाळच्यावेळी घोडे विकणारे अरब आणि पारशी लोक सुंदर आणि रूबाबदार कपडे घालून रस्त्यावर कॉफी पित बसलेले पाहून तिला आपण युरोपमध्ये असल्याचा भास होतो. रोज संध्याकाळी Bandstand वर होणारा वाद्यवृंदाचा कार्यक्रम, त्यावेळी आपल्या ’नेटीव’ नोकराचाकरांच्या लवाजम्यासह जमलेल्या ब्रिटिश स्त्रिया, त्याचवेळी डासांनी मांडलेला उच्छाद त्यामुळं कार्यक्रम संपल्यासंपल्या घरी निघून जाण्याची सगळ्यांची गडबड अशा अनेक गंमती ती सांगते.

96763_5
अ‍ॅमेलियाने पाहिलेले मुंबईतील वाळकेश्वर मंदिर

अ‍ॅमेलिया त्यावेळी मुंबईत अनेक ठिकाणी राहीली. परळसारख्या ठिकाणी रोज दिसणारे साप, मलबार हिलवरचे जंगल तिथून रात्री ऐकू येणारी कोल्हेकुई हे ऐकून आपण ही मुंबईच आहे हे विसरून जातो. मुंबईत त्याकाळी जागोजागी असणाऱ्या वाड्या आणि आमराया, माहीममध्ये असणारे नारळी पोफळीचे वृक्ष, त्यावर चढून ताडी काढणारे भंडारी लोक, मलबार हिलवर विखरून पडलेले जुन्या मंदीराचे अवशेष अशी ही मुंबई आपल्या मुळीच ओळखीची नाही. आजच्या गजबजलेल्या मुंबईने ही जुनी मुंबई केंव्हाच गिळून टाकलेली आहे. अ‍ॅमेलियाने घारापुरीच्या लेण्यांनाही भेट दिलेली होती, लेण्यातल्या थंडगार हवेने हवेने सुखावून जाऊन ती विचार करते की पुर्ण उन्हाळा यां गुहातच रहावे. पौर्णिमेच्या रात्री चांदण्यात न्हाऊन निघालेल्या भव्य शिल्पांना पाहून ती हरखून जाते.

मुंबई जरी इंग्रजांची व्यापारी राजधानी असली तरीही मुंबईची हवा ब्रिटिशांना फारशी मानवत नसे. एका पार्टीत तिने एका ब्रिटिश माणसाला त्याच्या तब्बेतीविषयी विचारले त्यावेळी खांदे उडवून तो म्हणाला “Ahh ! Alive today, dead tomorrow”. ब्रिटिशांना मुंबईतले उष्ण आणि दमट वातावरण फारसे मानवत नसे. इथले डास, ताप वगैरे गोष्टींचा त्यांना भयंकर त्रास होत असे. अनेक ब्रिटिश अधिकारी भारतातच मृत्यूमुखी पडत. वेगवेगळ्या प्रांतात राहून होणाऱ्या तापांना त्यांनी नावेही दिलेली होती. Sindh fever, Deccan fever, Taraain fever, Nagpore fever, Jungle fever अशी तापांची अनेक नावे त्यांच्यात रुढ होती.

अ‍ॅमेलियाला भारतातल्या अनेक गोष्टी अचंबित करत त्यातली एक म्हणजे इथली वृक्षसंपदा. इथल्या संस्कृतीचा भाग होऊन गेलेली झाडे, त्यांच्याभोवती गुंफलेल्या पौराणिक गोष्टी यांचीही नोंद अ‍ॅमेलिया घेते. परळला जिथे गव्हर्नर रहात असे तिथे अशोकाचा एक भव्य वृक्ष होता. अशोकाच्या वृक्षाला सुंदर स्त्रीच्या लत्ताप्रहाराने बहर येतो ही कविकल्पनाही तिला माहीत आहे. अ‍ॅमेलियाला स्केचिंगची आवड होती, वडापिंपळाच्या गर्द सावलीत बसून किंवा आमराईत बसून ती अनेकदा स्केचेस करत असे. पिंपळावरचे ‘Bachelor Ghost’ म्हणजे मुंजा वगैरेच्या गोष्टीही तिच्या लिखाणातून डोकावतात. साताऱ्याजवळ असणाऱ्या वैराटगडाच्या पायथ्याशी दोन-तीन एकरावर पसरलेले एक वडाचे झाड पाहून ती त्याच्या प्रेमातच पडलेली होती. मजेची गोष्ट म्हणजे तिने झाडांची लग्नेही लावलेली बघीतलेली होती. लिंब आणि पिंपळ एकमेकाशेजारी लावले जात. त्यावेळी लग्नातले सर्व विधीही केले जात, जेवणावळी होत हे तिने नोंदवून ठेवलेले आहे. चिंच आणि आंब्याचेही लग्न अशाच प्रकारे लावले जाई. ती आळंदीला गेलेली असताना तिने बरीच खटपट करून तिथल्या अजान वृक्षाची एक फांदी मिळवली आणि ती रुजवण्याचा प्रयत्न केला. नंतर तिचा मित्र आणि भारताचा पहिला Chief Conservator of Forest डॉ. गिब्सन याने ते झाड रूजवून तिला इंग्लंडला कळवलेही होते.

भारतात इंग्लंडच्यामानाने नोकरचाकर जास्त उपलब्ध असत त्यामुळे एखाद्या बड्या साहेबाच्या घरात नोकरचाकरांची फौजच असे. स्वैपाकी, माळी, घोडेवाला, हमाल (घरातली वरकड कामे आणि स्वच्छ्ता करणारा), धोबी, घरातले दिवे पाजळणारा मशालजी, पाणीवाला भिस्ती, गायवाला असे अनेक लोक घरात वावरत असत. त्यापैकी अनेकांना कामचलाऊ इंग्रजी समजे आणि बोलता येई. पण ज्यांच्याशी नेहमी संबंध येई असे व्यापारी, बेकरीवाले, खाटीक इ. लोकही असत. त्यांच्याशी बोलताना त्यांचे इंग्रजी समजून घेणे हे अत्यंत अवघड असे. त्याचा नमुना म्हणून एका खाटकाने त्याचे गिऱ्हाईक असणाऱ्या एका कलेक्टरीण बाईंना लिहिलेली चिठ्ठीच अ‍ॅमेलिया आपल्यासमोर पेश करते. तो लिहितो —

To Mrs. Collector Sahib, ESQ

Honoured Madam,

Madam’s butler says that madam is much displeased with poor butcher, because mutton too much lean and tough. But Sheep no grass got, where get fat? When come rain then good mutton. I kiss your honour’s pious feet. I have honour to remain madam.

                                                            Your affectionate butcher,

                                                            Mohomed Cassein

अ‍ॅमेलिया आणि इतर बरेचसे ब्रिटिश लेखक यांत एक महत्वाचा फ़रक आपल्याला जाणवतो तो म्हणजे इतर बरेचसे लेखक जंगल किंवा शिकार यांच्याच वर्णनासाठी शब्द खर्च करतात तर अ‍ॅमेलिया मात्र इथल्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचा पुरेपुर आढावा घेण्याचा प्रयत्न करते. हिंदू धर्मातले अनेक बारकावे ती टिपते. तिला शिवपार्वती आणि त्यांचा परिवार माहीत आहे, विष्णूचे दशावतार, हनुमान, काली, गणपती यांच्या अनेक गोष्टी ती लिखाणातून मांडते. शाळीग्राम हे विष्णूचे रूप असून गंडकी नदीत सापडणारे दगड हे शाळीग्राम म्हणवले जातात. त्यावर विष्णूच्या चक्राचे ठसे असतात एवढी बारीकसारीक माहीती ती आपल्याला देते. अ‍ॅमेलिया वाईला असताना तिथल्या मंदीरांना भेटी देऊन तिने काही मंदीरातल्या पुजाऱ्यांशी धार्मिक चर्चाही केली होती. वाईजवळच्या धोम येथील मंदीरात तिला एका पुजाऱ्याच्या हातात एक सुंदर पळी दिसलेली होती तिला ती फारच आवडलेली होती म्हणून तिने ती विकत घेण्याची इच्छा दर्शवली पण त्या भटजीबुवांनी तिला मुळीच दाद दिली नाही. तर अ‍ॅमेलियाने त्याच दिवशी संध्याकाळी वाईच्या बाजारातून तसलीच एक पळी पैदा केली. आज महाराष्ट्रातल्या अगदी मोजक्या लोकांना ’स्थंडील’ म्हणजे काय हे सांगता येईल पण अ‍ॅमेलियाला याची व्यवस्थित माहीती आहे. ज्या देशात आपण राज्यकर्ते म्हणून आलेलो आहोत तिथल्या नेटीवांच्या धर्माची वरवर माहीती माहीती असणे चालणार असतानाही ब्रिटिश लोक किती चौकसपणे माहीती नोंदवत हे बघून थक्क व्हायला होतं.

विष्णूचे एक रूप म्हणून विठोबाची उपासना महाराष्ट्रात गेली अनेक शतके होत आहे. अ‍ॅमेलियानेसुद्धा याची नोंद घेतलेली आहे आणि ‘Worship of  Wittoba’  या नावाने तिने एक अखंड प्रकरणच लिहून काढलेले आहे. विठोबाच्या कथांचाही ती नोंद ठेवते. आपल्याला जी पुंडलीकाची गोष्ट माहीत आहे त्यापेक्षा निराळीच गोष्ट अ‍ॅमेलिया सांगते. पुंडलीक आपल्या आईवडील आणि पत्नीसह तीर्थयात्रेसाठी जाताना पंढरपुरातल्या एका मातृपितृ भक्त ब्राह्मणाच्या घरी मुक्काम करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या घरात तीन सुंदर स्त्रिया त्याला घरकाम करताना दिसतात त्या गंगा, यमुना आणि सरस्वती असतात अशी काहीशी अपरिचित कथा ती आपल्याला सांगते.

पंढरपुरात तिथले पुजारी आलेल्या यात्रेकरूंना आपल्याकडे घेऊन जाण्यासाठी ते त्यांचा पाठलाग करत हे ती सांगते. त्याचवेळेला यात्रेकरूंच्या नावागावावरून ते कुणाचे यजमान हे सांगणाऱ्या त्यांच्या चोपड्यांचीही ती माहीती देते. या चोपड्यात संपूर्ण घराण्याची माहीती नोंदवून ठेवली जात असल्याने या चोपड्यांचा उपयोग वारसाहक्क ठरवताना वगैरे केला जाई हे सुद्धा ती नमुद करते.

महाराष्ट्रात दिर्घकाळ राहील्याने अ‍ॅमेलियाला आपले अनेक सण आणि उत्सव जवळून बघायची संधी मिळाली. मुंबईतल्या दिवाळीच्या सणाचे वर्णन करताना ती दिव्यांनी आणि आकाशकंदीलांनी उजळून गेलेली सुंदर घरे, उत्तम कपडे घातलेले पुरुष, त्यांचे रंगीबेरंगी पटके, आणि आकर्षक दागिने घातलेल्या व सुंदर रेशमी साड्या नेसलेल्या स्त्रिया यांची वर्णने ती करते. दिवाळी साजरी करण्याचा उद्देश एखाद्या ज्ञानी माणसाला विचारला तर तो हा उत्सव दुर्गा किंवा कालीचा आहे म्हणून सांगेल तर एखादा उनाड माणूस मात्र हा लक्ष्मीचा आहे म्हणून सांगेल अशी पुस्तीही ती आपल्या दिवाळीच्या वर्णनाला जोडते. (यावरून आपण कोणत्या गटात मोडतो याचा आपणही विचार करायला हरकत नाही.) शिमग्याच्या सणाची आपली माहीती (आता बोंब मारायला होळीची वाट बघायला लागत नसल्याने) पोळीच्या पुढे फारशी सरकत नाही पण अ‍ॅमेलिया मात्र होळीचे वर्णन वसंतोत्सव, कामोत्सव किंवा मधुत्सव असे करते. होळीच्या वेळी होणाऱ्या कामदेवाच्या पूजेचाही ती उल्लेख करते. पुण्यातल्या गणेशोत्सवाचे वर्णन करताना ती हत्ती, घोडे, पालखी यांसह निघणाऱ्या विसर्जनाच्या मिरवणुकीत होणाऱ्या वाद्यांच्या कर्कश्श आवाजाविषयीही सांगते. आणि सगळ्यात शेवटी विचारते की एवढ्या सुंदर मुर्तीला पाण्यात का बुडवायचे ?

भारतीयांच्या श्रद्धा आणि परंपरा यांविषयी अ‍ॅमेलियाला विलक्षण कुतुहल आहे. भारतातल्या जनतेत मृत्यू, त्या नंतरचे जीवन आणि पुर्नजन्म यांविषयी पुर्वापार श्रद्धा आहे आणि पारलौकिक जीवनासाठी त्यांचे सदैव प्रयत्न सुरु असतात हे निरिक्षण अ‍ॅमेलियाने नोंदवले आहे. या श्रद्धा फक्त हिन्दुधर्मीयांच्या पुरत्याच मर्यादीत होत्या असे नव्हे तर मुस्लीम समाजातही त्या होत्या. बोहरी समाजातील धर्मगुरू ज्याला ’आगा’ असे म्हटले जाते तो त्याकाळी लोकांकडून पैसे गोळा करून जन्नतला जाण्याचा ’पासपोर्ट’ देई. हा पासपोर्ट म्हणजे खरोखर एक कागद असे आणि मृताचे दफन करताना हा पासपोर्टही त्याच्यासोबत पुरला जाई.

मुंबईतला उन्हाळा ब्रिटिशांना अजिबात सहन होत नसे त्यामुळे मुंबई जरी राजधानी असली तरी वर्षातून निम्मा वेळ ते मुंबईच्या बाहेरच काढत. उन्हाळ्यात महाबळेश्वर, पावसाळ्यात पुणे असे शक्यतो त्यांचे मुक्काम असत. मुंबईच्या उकाड्याबद्दल लिहिताना अ‍ॅमेलियाने एक मजेशीर प्रसंग सांगीतलेला आहे. एकदा अ‍ॅमेलिया आणि गव्हर्नर भायखळ्याच्या चर्चमध्ये रविवारच्या प्रार्थनेला गेले असताना तिला खिडकीबाहेर अनेक नेटीव लोक जमलेले दिसले, क्षणभर तिला वाटलं की हे सगळे लोक गव्हर्नरला भेटायला जमले असावेत पण प्रार्थना सुरू होताच तिला समजलं की हे सगळे लोक पंखे चालवणारे आहेत.

ब्रिटिश उन्हाळा मुंबईत घालवण्याऐवजी महाबळेश्वरला पसंती देत. मुंबईतून महाबळेश्वरला जाताना पुणे-वाई असा आपला आजचा मार्ग न निवडता ते आधी मुंबईतून वाफेच्या छोट्या जहाजाने बाणकोटला पोचत तेथून सावित्री नदीतून महाड आणि तेथून पालखीने घाट ओलांडला जाई. या प्रवासाच्या दरम्यान अ‍ॅमेलिया पालखीच्या भोयांशी संवाद साधून त्यांच्या या कामाबद्दल, त्यांना त्यातून मिळणाऱ्या मोबदल्याबद्दल माहीती मिळवते. भाषेचा अडथळा असतानाही ती त्यांच्या धार्मिक समजुती आणि रिती परंपरा समजून घेण्याचा प्रयत्न करते. त्यातून तिला देवाला कौल लावणे आणि बगाड यांसारख्या प्रथा समजतात.

घाट चढून वर जाताना अ‍ॅमेलियाला सह्याद्रीच्या रौद्ररूपाचे,दाट जंगलांचे दर्शन होते. सह्याद्रीविषयीच्या अनेक पौराणिक कथा तिला माहीत आहेत. त्यातली एक तर अतिशय वेगळी आहे. सह्याद्री हा मुळात हिमालयापेक्षाही उंच होता त्यामुळे सुर्याचा रथ त्याच्या उत्तुंग शिखरांना अडत असे. सुर्याने या अडचणीवर तोडगा काढण्याची विनंती पर्वतांचे गुरु अगस्ती ऋषींना केली. अगस्ती मग सह्याद्रीकडे आले. अगस्ती मग सह्याद्रीकडे आले अगस्तींना पाहून सह्याद्रीने त्यांना वाकून नमन केले. अगस्ती ऋषींनी त्याला ते समुद्रावरून संध्या करून येईपर्यंत तसेच थांबण्याची आज्ञा केली आणि ते संध्या करायला निघून गेले. सह्याद्री वाकून बसून राहीला पण अगस्ती ऋषी काही परत आले नाहीत. सह्याद्री कायम वाकलेलाच राहून गेला आणि सुर्याच्या रथाचा अडथळा कायमचा दूर झाला. (बहुधा या प्रसंगाला जोडूनच तो तीन आचमनात समुद्र पिऊन टाकण्याचा प्रसंग झाला असावा)

महाबळेश्वरला पोहोचल्यावर तिथली थंड हवा, उतरलेले ढग, दाट जंगल आणि सकाळच्यावेळी पडणारे धुके पाहून अ‍ॅमेलिया हरकून जाते. तिथं रहाणारे लोक, त्यांचे कष्टाचे जीवन यांचेही तिला अप्रूप वाटते. आपल्याला माहीत असलेलं आजचं महाबळेश्वर आणि अ‍ॅमेलियाने बघितलेलं महाबळेश्वर यात प्रचंड तफावत आहे. कुठले कुठले पॉईंट बघत हिंडणाऱ्या आपल्यातल्या अनेक पर्यटकांना याची कल्पनाही नसेल की हे सगळे पॉईंट ब्रिटिशांनी शोधलेले आहेत.

Temple_of_Siva_(Mahades),_Source_of_Chrisna._Mahabuleshwar._(12488633084).jpg

त्याकाळात काही हौशी ब्रिटिश शिकारीमागे जंगल पिंजून काढत होते तर काही महाबळेश्वर फिरता फिरता नवीन पॉईंट शोधून काढत होते. त्यातल्या काही ठिकाणी अ‍ॅमेलिया जाऊनही आलेली होती पण त्यातल्या सुर्योदय पहाण्याचा विल्सन पॉईंट आणि सुर्यास्त बघण्यासाठीचा बॉम्बे पॉईंट फक्त यांचाच उल्लेख ती करते. मावळतीचा सुर्य बघताना ती मध्येच प्रतापगड दाखवून तिथं झालेल्या अफझलखानाच्या वधाच्या प्रसंगाची ती वाघनखांसह इत्यंभूत माहीती देते. याचबरोबर महाबळेश्वरला असणाऱ्या आणि रोज सुर्यास्त बघायला जमणाऱ्या ब्रिटिश स्त्रियांविषयी टिप्पणी करत ती त्यांच्या निसर्गसौंदर्य बघण्यापेक्षा ’गॉसिप’ करत बसण्याच्याही उल्लेख करते.

मराठ्यांचे राज्य लयाला जाऊन तेंव्हा सुमारे तीस वर्षांचा काळ उलटून गेलेला होता त्यामुळे साताऱ्याचे छत्रपती, त्यांची दरबारी मंडळी, सरदार वगैरे अजूनही आपले महत्व राखून होते. अ‍ॅमेलिया महाबळेश्वरला असतानाच एकदा साताऱ्याच्या छत्रपतींच्या दोन महाराणी आणि युवराज वेंकाजीराजे हे प्रतापगडावरील देवीच्या दर्शनासाठी गेले असताना त्यांनी रस्त्यात गव्हर्नरची भेट घेतली. यावेळी त्या आपल्या हत्ती, घोडे, ऊंट अशा लव्याजम्यासह आलेल्या होत्या. त्यांच्या आगमनाची वर्दी देण्यासाठी शिंगे आणि नौबती वाजत होत्या. राजस्त्रिया पालखीतून उतरल्यावर त्या इतरांच्या नजरेला पडू नयेत म्हणून दोन्ही बाजूंना किनखापाचे (याला ती Cincap म्हणते) पडदे लावलेले होते. गव्हर्नरतर्फे त्यांचे स्वागत भारतीय पद्धतीप्रमाणे म्हणजे गुलाबपाणी शिंपडून झाले. गव्हर्नरने वेंकोजीराजांना सामोरे जाऊन त्यांचे स्वागत केले. त्यांचा हात धरून त्यांना आसनावर बसवले. हा भेटीचा कार्यक्रम काही काळ चालला. गोड पदार्थ, फळे इ. पदार्थ पाहुण्यांसमोर ठेवण्यात आले आणि शेवटी पानसुपारी होऊन कार्यक्रम संपला. या प्रसंगी राजस्त्रियांची उत्तम वस्त्रे, निवडक पण सुंदर आणि मौल्यवान दागिने. वेंकाजीराजांचे मोती, पाचू आणि हिऱ्यांचे दागिने आणि त्यांचे विलक्षण देखणे व्यक्तिमत्व यांचेही ती वर्णन करते.

भोरच्या पंतसचिवांशीही अ‍ॅमेलियाशी भेट झालेली होती. हे म्हणजे बहुदा चिमणाजी रघुनाथ पंतसचिव असावेत. त्यांच्या पत्नीही यावेळी त्यांच्यासोबत होत्या. पंतसचिवांनी अ‍ॅमेलियाचे स्वागत इंग्रजीत केले. त्यांच्या पत्नीशी काही काळ दुभाषामार्फत अ‍ॅमेलियाचे संभाषण झाले. ही राजस्त्री विलक्षण गोरी, काहीशी ठेंगणी आणि भरपूर दागिन्यांनी मढलेली होती. दुसऱ्या दिवशी तिने स्वत: केलेले अनेक पदार्थ अ‍ॅमेलियाला पाठवून दिले. यांत केशर घातलेली शेवयांची खीर, गोड भात, केक्स आणि पेस्ट्रिज म्हणजे बहुदा गोड वड्या, शिवाय दही आणि साखर वापरून केलेला पदार्थ म्हणजे बहुतेक श्रीखंड आणि आंब्याचे लोणचे होते.

पावसाळा सुरु होता होता ब्रिटिश महाबळेश्वरमधून निघत आणि पुण्याकडे प्रयाण करत. त्यावेळी चालू असलेली घरांच्या डागडुजीची कामे,छ्परांची शेकरणी आणि पावसाळ्यासाठी लाकूडफाटा साठवून ठेवण्याच्या कामांचाही ती नोंद ठेवते. महाबळेश्वरला कित्येक वर्षे एक मिशनरी बाई रहात असत त्या पावसाळ्यातही आपले घर सोडत नसत. त्यांचा माळी आणि काही नोकरचाकर यांच्यासह त्या तिथे रहात. महाबळेश्वरला पावसापासून बचावासाठी वापरले जाणारे इरलेही अ‍ॅमेलियाच्या नजरेतून सुटलेले नाही.

पुण्याकडे येताना काही काळ अ‍ॅमेलिया वाईला ही थांबलेली होती. वाईचे प्रशस्त आणि सुंदर घाट, तिथली मंदीरे, पाठ्शाळा यांचेही वर्णन ती करते. वाईच्या मुक्कामात तिने नाना फडणवीसांची विधवा पत्नी जिऊबाईंची भेट घेतली. या बाई त्यावेळी सुमारे साठीच्या असाव्यात. अ‍ॅमेलिया म्हणते या बाई एखाद्या देवीसारख्या विलक्षण सुंदर होत्या. ज्यावेळी त्यांनी अ‍ॅमेलियाचे हात हातात घेतले त्यावेळी त्यांचे हात अतिशय मृदु होते असेही अ‍ॅमेलियाने नोंदवून ठेवलेले आहे. जिऊबाईंनी अ‍ॅमेलियाला माधवराव पेशवे (म्हणजे थोरले माधवराव की सवाई माधवराव हे समजत नाही) आणि नाना फडणवीसांच्या पूर्ण आकाराच्या तसबिरीही दाखवल्या होत्या.

अ‍ॅमेलियाच्या पुण्याच्या मुक्कामात म्हणजे खरं तर दापोडीच्या मुक्कामात अ‍ॅमेलिया पुण्याच्या परिसराचे, इथल्या सरदारांचे, गव्हर्नरने भरवलेल्या दरबाराचे माहीतीपूर्ण वर्णन करते. दापोडी आणि खडकीतल्या लष्कराच्या छावण्या, तिथल्या बागा, तिथली ब्रिटिश पद्धतीची घरे आणि तिथे होणाऱ्या पार्ट्या यांचाही अंतर्भाव अ‍ॅमेलियाच्या लिखाणात होतो. पुण्यात त्याकाळी हरदासाची कथा समाजात अतिशय लोकप्रिय होती. काही ठिकाणी अ‍ॅमेलिया त्या कथा ऐकायला जाऊनही आलेली होती. पुण्याच्या रस्त्यांवर बसून तिने चित्रे रेखाटण्याचाही प्रयत्न केला पण त्या काळातही रस्त्यातल्या गर्दीमुळे आणि पुणेकरांच्या ’चौकस’ वृत्तीमुळे तिला हा कार्यक्रम आवरता घ्यावा लागला.

9969683734_07aa27f074_k

या सगळ्या ऐतिहासिक आणि जुन्या वातावरणाची सफर घडवता घडवताच अ‍ॅमेलियाची भारतातून निघण्याची वेळ होते. पण इथेसुद्धा एक सुंदर योगायोग जुळून आलेला आहे. तिचा भारतातला बहुतेक शेवटचा नागरी समारंभ म्हणजे बोरीबंदर ते ठाणे रेल्वेमार्गाचे गव्हर्नरच्या हस्ते झालेले उद्‌घाटन. यावेळी अ‍ॅमेलियाच्या डोक्यात अनेक विचार घोळून गेले. रेल्वे सुरु झाल्यानंतर भारतातील जात, धर्म अशी अनेक बंधने गळून पडतील, लोक एकत्र येण्याची सुरुवात होईल असा आशावादी विचार ती करते. जुना आणि परंपरांच्यात गुंतलेला भारत बघीतलेली अ‍ॅमेलिया इथून जाताना एका मोठ्या बदलाची साक्षीदार होऊन होते.  १८५३ च्या डिसेंबर महिन्यात एका संध्याकाळी फिरोज नावाच्या जहाजातून ती तिच्या आवडत्या मुंबईतील संधीप्रकाशातील दृष्ये  डोळ्यात साठवून घेत घेत भारत सोडते आणि ईजिप्तच्या दिशेने प्रयाण करते.

अ‍ॅमेलियाच्या लिखाणातून ब्रिटिश लेखकांनी लिहिलेली हिंदू धर्माविषयीची पुस्तके, इथल्या संस्कृत नाटकांविषयी त्यांनी केलेले लिखाण यांचा वारंवार उल्लेख येतो. तिच्या चौकस स्वभावामुळॆ ती अनेक ठिकाणी जाऊन येते आणि तिथली विस्तृत माहीती देते. उदाहरण द्यायचे झाले तर हिन्दू धर्मातील मृत्यूनंतरचे विधी, पिंडदान, श्राध्द इत्यादी विषयी तिने सविस्तर लिहून ठेवले आहे. या गोष्टी तिने कुठे बघितल्या असतील याचे आपल्याला नवल वाटत रहाते. एतद्देशीय लोकांहून आपण श्रेष्ठ आहोत या दृष्टीकोनाचा प्रभावही तिच्या लिखाणावर जाणवतो. तिला भेटलेल्या मोजक्या स्त्रिया आणि पुरुष सोडले तर बाकीच्यांवर ती कमी उंची, स्थूल बांधा, विचित्र ठेवण अशी शेलकी टिकाही ती सतत करते. इंग्रजांच्या मानाने इथल्या अनेक परंपरा आणि रीतीरिवाज यांचा दर्जा कसा कमी आहे हे वेळोवेळी पटवून सांगताना तिचा सुर नकारात्मक लागतो. पण तरीही जुन्या महाराष्ट्राचे रम्य दर्शन तिच्या या पुस्तकातून होते हे नक्की.

120906

यशोधन जोशी

विस्मयनगरीचा राजकुमार

ज्यावर कधीच सूर्य कधीच मावळत नसे अशा ब्रिटिश साम्राज्याच्या सुवर्णकाळात म्हणजे व्हिक्टोरियन काळात जगभरातल्या उत्तमोत्तम गोष्टी इंग्लडमध्ये एकवटलेल्या होत्या अर्थात हा काळ वसाहतींच्या पिळवणूकीचाही आहे. ब्रिटिशांनी आपणच सर्वश्रेष्ठ आहोत या साम्राज्यवादी दृष्टिकोनातूनच सर्व जगाकडे पाहिले. पण या काळाच्या थोडसं आधी खुद्द ब्रिटिशांच्या राजधानीत काही परदेशी लोकांनी ब्रिटिशांना त्यांची दखल घेणे भाग पाडले आणि आपल्यासाठी ही गोष्ट अभिमानाची आहे की हे लोक भारतीय होते.

एकोणिसाव्या शतकात इंग्लडमध्ये भारतीय लोक ही काही तशी नवलाईची गोष्ट नव्हती, कारण ब्रिटिश जहाजांबरोबर गेलेले लष्करी गडी, ब्रिटिश मेमसाहेबांच्या बरोबर गेलेल्या आया यांच्याबरोबरच ईस्ट इंडिया कंपनीच्या साहेब लोकांना फारसी आणि हिंदुस्तानी शिकवायला गेलेले मुन्शी, हिंदुस्तानी हकीम वगैरे लोकांनी इंग्लडमध्ये आपली ओळख मिळवली होती. पण लंडनच्या झगमगाटात आपला झेंडा रोवणारे आणि ब्रिटिशांना अचंबित करणारे भारतीय यापैकी कोणी नव्हते.

लंडनच्या वर्तमानपत्रात एकदा एक जाहिरात झळकली, लंडनमधल्या वेगवेगळ्या नाट्यगृहात होणाऱ्या ऑपेरा, ऑर्केस्ट्रा आणि नाटकांच्या जाहिरातींच्या गर्दीत ही जाहिरात काही वेगळीच होती. ही जाहिरात आली त्यावेळी दुसरे बाजीरावसाहेब अजून शनिवारवाड्यातून मराठेशाहीचा कारभार चालवत होते आणि इंग्लडात व्हिक्टोरिया राणी जन्माला यायला अजून पाच-सहा वर्षं अवकाश होता.

म्हणजे थोडक्यात सांगायचं तर १८१३ साली झळकलेल्या या जाहिरातीतला मजकुर असा होता – भारतातल्या नामांकित जादूगारांचा एक संच इंग्लडमध्ये येऊन दाखल झाला असून ते पूर्वेकडच्या देशातले अदभुत जादूचे खेळ करून दाखवतील आणि यातला सगळ्यात धाडसी खेळ असेल तो तलवार गिळण्याचा. १८१३ सालच्या जुलै महिन्यात लंडनच्या Pall Mall येथे हा जादूचा खेळ पार पडला. हा खेळ करून दाखवणारे कलाकार कोण, ते लंडनला कसे काय येऊन पोचले वगैरे प्रश्नांचीही उकलही आता आपण करणार आहोत.

WhatsApp Image 2018-11-20 at 10.09.40 AM (1)

कॅप्टन पीटर कॅम्पबेल हा HMS Lord Keith या ब्रिटिश प्रवासी नौकेचा कप्तान होता. त्याचं जहाज इंग्लड ते भारत अशा सफरी नेहमी करत असे. इतका कंटाळवाणा प्रवास करून दमलेले खलाशी जहाज किनाऱ्याला लागल्या लागल्या लगेच मौजमजा करायला बाहेर पडत त्यात आणि तो भारतासारखा देश असेल तर तिथे करमणुकीला काहीच तोटा नसे. सन १९१२ मध्ये असेच एकदा जहाज कलकत्त्याला पोचल्यावर कॅम्पबेलही कलकत्त्याच्या रस्त्यांवर फिरायला बाहेर पडला. निरुद्देश भटकत असतानाच त्याला रस्त्यावर जादूचे खेळ करणारा एक मद्रासी जादूगार दिसला. त्यावेळी भारतात जादूचे खेळ करणारे किंवा गारुड्यांची संख्या भरपूर होती पण हा जादूगार इतरांच्यापेक्षा वेगळा होता. त्याचे खेळातले कसब आणि लोकांना खिळवून ठेवण्याचे तंत्र अफाट होते.

कॅम्पबेल मंत्रमुग्ध होऊन ते जादूचे प्रयोग बघत राहिला आणि त्या जादूगाराने खेळ संपवता संपवता आपला हुकुमी पत्ता बाहेर काढला. दोन फुटाची एक धारधार तलवार आपल्या पेटाऱ्यातून बाहेर काढून त्या तलवारीला कसलेसे तेल चोपडले आणि आपल्या मानेला एक झटका देत डोकं पूर्ण मागं झुकवून त्यानं ती तलवार हळूहळू आपल्या गळ्यात उतरवायला सुरुवात केली आणि अगदी थोडक्या वेळात त्या तलवारीची फक्त तिची मूठ बाहेर राहिली बाकी सगळी तलवार या जादूगाराच्या पोटात सामावून गेली.

हा सगळा प्रकार बघून कॅम्पबेल थक्क होऊन गेला आणि त्यानं या जादूगाराकडून तलवार गिळण्याचा प्रयोग पुन्हा पुन्हा करून घेतला. सगळ्यात शेवटी मनाशी काही विचार करून त्यानं जादूगाराशी चर्चा केली आणि काही दिवसांनी जेंव्हा कॅम्पबेलच्या जहाजाने भारताचा किनारा सोडला तेंव्हा हा जादूगारही त्याच्या साथीदारांसह त्याच्यासोबत होता.

कॅम्पबेल जरी या भारतीय जादूगारांना इंग्लडला नेण्यात यशस्वी झाला असला तरी त्याआधी असे प्रयत्न इतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनीही केले होते. रॉबर्ट वॉलेस नावाच्या एका अधिकाऱ्याने१७९९ साली मद्रासमध्ये रस्त्यावरचा जादूचा खेळ बघून त्या जादूगाराला इंग्लडला येऊन खेळ करण्याची ‘ऑफर’ दिली पण समुद्र ओलांडणे हे हिंदू धर्मात पाप मानलेले असल्याने त्या जादूगाराने वॉलेसला नकार दिला होता.

आता आपण परत कॅम्पबेलबरोबर जे जादूगार लंडनला जाऊन पोचले त्यांच्याकडं येऊया. कॅम्पबेल हा फारच बिलंदर माणूस होता हे जादूगार लंडनला पोचल्यावर लगेच त्यानं त्यांचे खेळ सुरू केले नाहीत, आधी त्यानं या जादूगारांचा खेळ (काळजीवाहू) राजा चौथा जॉर्ज आणि ब्रिटिश पार्लमेंटच्या सदस्यांसमोर ठेवला. त्याच्या अंदाजाप्रमाणे या जादूगारांनी या सगळ्या उच्चभ्रू लोकांना अगदी मोहित करून टाकलं, त्यांच्या तोंडून या जादूगारांची माहिती सर्वत्र पसरली. लंडनमध्ये या जादूगारांची नावं सर्वतोमुखी झाली आणि पिकॅडली भागातलं या जादूगारांचे निवासस्थान गर्दीने गजबजून गेलं. घोडागाड्यातून येणाऱ्या सरदार-दरकदारांचा आणि धनिकवणिकांचा मेळाच तिथं जमू लागला. कॅम्पबेलनं वातावरण पुरेसं तापलेलं बघून मग खेळांना सुरुवात केली. हे जादूचे प्रयोग Pall mall येथे होत आणि दिवसाला एकूण चार खेळ होत. खेळाचे तिकिट तीन शिलिंग असे.

WhatsApp Image 2018-11-20 at 10.09.41 AM
Pall Mall

खेळाला सुरुवात झाली पण अजून आपल्याला या कलाकारांची नावंही माहीत नाहीत. आता आपण त्यांची ओळख करून घेऊया, या पूर्ण संचातलं आपल्याला एकच नाव माहीत आहे, ते म्हणजे प्रमुख जादूगार Ramo samee. हे बहुदा रामस्वामीचे ब्रिटिश रूप असावं. आणि हा Ramo Samee कोरोमण्डल भागातला म्हणजे चेन्नईच्या आसपासच्या भागातला होता.

WhatsApp Image 2018-11-20 at 10.09.41 AM (1)

इंग्लडमध्ये जादूगार अजिबात नव्हते असे नाही पण खेळातली सफाई, सादरीकरण आणि नाविन्यपूर्ण खेळ यांच्या जोरावर भारतीय जादूगार त्यांच्यावर मात करत. जादूच्या प्रयोगांच्यावेळी या जादूगारांचे कपडे पट्ट्यापट्ट्यांच्या घोळदार सुरवारी, पांढरे कुर्ते आणि डोक्याला रंगीत फेटे असे असत. Cups and balls या खेळाने प्रयोगाला सुरुवात होई. तीन कप आणि एका छोट्या चेंडूने सुरू झालेला हा खेळ हळूहळू रंगत जाताना चेंडूंची संख्या वाढत जाई. एक-दोन-तीन-चार-पाच आणि अचानक सारे चेंडू गायब होऊन कपाखालून साप निघत असे.

त्यानंतर कापडाचा एक मोठा तुकडा नाचवत रंगमंचावर आणला जाई आणि Ramo Samee त्याचे असंख्य बारीक तुकडे करी आणि निमिषार्धात त्याचं पुन्हा अखंड कापड करून दाखवी. त्यानंतर वाळूचा रंग बदलून दाखवण्याचा प्रयोग होई.

आज आपण बघतो किंवा लहान असताना आपण जे जादूचे प्रयोग बघितले त्याहून Ramo Samee चे प्रयोग फारच वेगळे असत. दोन हातांवर व एका पायावर तो धातूच्या जडशीळ रिंग्ज फिरवायला लागे ते चालू असतानाच त्याचा मदतनीस त्याच्या तोंडात एक घोड्याच्या शेपटीचा केस आणि काही मोठाले रंगीत मणी टाकत असे. Ramo Samee तोंडातल्या तोंडात ते मणी त्या केसात ओवून दाखवत असे.

असे अनेकविध खेळ दाखवल्यावर सगळ्यात शेवटी हुकुमाचा पत्ता काढल्यासारखा Ramo Samee आपला हातखंडा असलेला तलवार गिळण्याचा प्रयोग सुरू करत असे. यावेळी संपूर्ण प्रेक्षागृहात शांतता पसरलेली असे.

1813-10-Indian-Jugglers
Ramo Samee या सर्व खेळांमुळे अतिशय लोकप्रिय झाला, त्याच्याविषयीच्या तऱ्हेतऱ्हेच्या वावड्या उठू लागल्या. यात तो अगदी माणूस नसून सर्प आहे वगैरे अफवा पसरल्याच पण कॅम्पबेलने त्याला लंडनला येण्यासाठी दहा हजार पौंड दिले आणि आता रोज या खेळातून कॅम्पबेल गडगंज पैसे मिळवतो वगैरे दंतकथाही पसरल्या. लंडननंतर Ramo Samee ने लिव्हरपुल, स्कॉटलंड आणि आयर्लंड इथेही खेळ केले.

एकदा एखादे चलनी नाणे सापडले की सगळेच त्याच्यामागे लागतात या न्यायाने इतरही ब्रिटिश साहेबांनी भारतातून जादूगार आणण्याचा खटाटोप सुरू केला. यातूनच १८१५ साली इंग्लडमध्ये श्रीरंगापट्टणचे काही जादूगार आले. त्यांची नावे माहीत नसली तरी त्यांच्या खेळाविषयीची माहिती उपलब्ध आहे. तलवार गिळणे वगैरे खेळ तो करत असेच पण त्याचबरोबर नाकपुड्याना हुक अडकवून त्याला २० पौंडाचा दगड अडकवणे व नंतर तो फेकून दाखवत असे. पण हा जादूगार काही फार यशस्वी झाला नाही. याच्यानंतरही अनेक जादूगार येऊन गेले तरी Ramo Samee इंग्लंडमधल्या सगळ्यात लोकप्रिय जादूगाराचे आपले स्थान टिकवून होता.

जुलै १८१९ मध्ये Ramo Samee कॅम्पबेलपासून वेगळा झाला आणि एकटाच आपलं नशीब अजमवायला अमेरिकेला आला. अमेरिकेत बोस्टन, मॅच्युसेट्स इथंही Ramo Samee नं नाव कमावलं. एकदा तो स्टेजवर जादूचे खेळ करत असताना एका चोरट्याने त्याची पेटी फोडून त्याची सगळी कमाई चोरून नेली. (१७२० डॉलर म्हणजे आजच्या हिशोबाने त्याचे जवळपास चाळीस हजार डॉलर चोरीला गेलेले होते.) पण सुदैवाने लौकरच चोर पकडला गेला आणि Ramo Samee चे पैसे परत मिळाले.

Ramo Samee १८२० साली इंग्लडमध्ये परत आला तोपर्यंत इंग्लडमध्ये अनेक जादूगारांचे आगमन झालेले होते आणि त्यांनी इंग्लडमध्ये आपले बस्तान बसवण्यासाठी अनेक खटपटी सुरू केलेल्या होत्या. जादूच्या खेळाबरोबरच कसरतीच्या खेळांचाही प्रसार सुरू झालेला होता. बंगालमधून आलेल्या एका जादूगारांच्या संचाने तर आपल्याबरोबर एक हत्तीच आणलेला होता. Ramo Samee परत आल्यावर त्याला पहिला धक्का बसला तो या वाढलेल्या स्पर्धेचा आणि दुसरा धक्का होता तो म्हणजे एव्हाना जादूचे प्रयोग हे मुख्य कार्यक्रमाऐवजी नाटकाच्या मध्यंतरात किंवा बॅले/संगीताच्या कार्यक्रमाच्यामध्ये सादर केले जाऊ लागले होते याचा. शिवाय नागर प्रेक्षकांना या सततच्या कसरतीच्या आणि जादूच्या खेळांचा कंटाळाही आलेला होता.

एव्हाना फक्त इंग्लडमध्येच नाहीतर पूर्ण युरोपभर भारतीय जादूगारांचा सुळसुळाट झालेला होता. भारतीय जादूगारांच्यासोबतच इतरही जादूगार आता शर्यतीत उतरले होते. Ramo Samee लाही एक कडवा प्रतिस्पर्धी भेटला तो म्हणजे मूळचा पोर्तुगीज असणारा खिया खान. हा जादूच्या प्रयोगांपेक्षा कसरतीचे प्रयोग जास्त करत असे. जडशीळ दगड छातीवर हातोड्याने फोडणे, काचांवरून धावणे, पायाची बोटे तोंडात धरून हातांवर चालणे वगैरे खेळ तो करत असे. त्याचा सगळ्यात लोकप्रिय खेळ होता तो म्हणजे बंदुकीतून झाडलेली गोळी हाताने पकडणे. याला प्रचंड लोकप्रियता मिळाली पण व्यावसायिक गणितं न जमल्यानं लौकरच तो दिवाळखोरीत गेला.

अजून एक मजेची गोष्ट म्हणजे याच दरम्यान दोन भारतीय जादूगारांना पोलंडच्या सीमेवरून रशियात प्रवेश करताना अटक झाली. या दोघांची नावं होती Mooty Samme आणि Medua Samme. या दोघांना रशियन येणं शक्यच नव्हते रशियन लोकांना यांच्या वह्यात लिहिलेला तामिळ मजकुर हा हेरगिरीचा प्रकार वाटत होता. यामुळं या दोघांची रवानगी तुरुंगात झाली. शेवटी या दोघांच्या नशिबाने भारतात काम केलेला आणि तामिळ येणारा एक ब्रिटिश अधिकारी रशियात होता त्याने रशियन अधिकाऱ्यांचा गैरसमज दूर करून या दोघांची सुटका केली. भाषा येत नसताना, वातावरण सर्वस्वी वेगळं असताना या आपल्या लोकांनी तिथं कशी तग धरली असेल हा विचार केल्यावर या सगळ्यांच्या विषयीचे कौतुक आपल्या मनात दाटून आल्याशिवाय रहात नाही.

1810-mooty-und-medua-sammee
Mooty Samme आणि Medua Samme

दरम्यान संघर्ष करून आणि रसिकांची मनं जिंकून Ramo Samee पुन्हा एकदा लोकप्रिय झाला. त्याच्या लोकप्रियतेची पावती म्हणजे तेंव्हा युरोपातल्या जवळपास सगळ्याच भारतीय जादूगारांनी आपल्या नावामागे Samee जोडून Ramo Samee च्या लोकप्रियतेचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला. पण लोकप्रियतेत Ramo Samee च्या आसपास पोचणे एवढे सोपे नव्हते. एका इंग्रजी वर्तमानपत्राने Ramo Samee चे वर्णन करताना म्हटले होते की – Ramo Samee हा विलक्षण देखणा, उत्तम विनोदबुद्धी असणारा तर होताच शिवाय फर्ड्या इंग्लिशने तो लोकांना मोहित करून टाकत असे. त्याच्या कार्यक्रमात सदैव हास्याचे कारंजे उडत असत.

१८३० च्या सुमारास Ramo Samee ची महिन्याची कमाई शंभर पौंडाहून अधिक होती तर बाकीच्या जादूगारांना जेमतेम पाच-सात पौंड मिळत. Ramo Samee ने एलन नावाच्या एका ब्रिटिश बाईशी लग्न केलेलं होतं आणि त्याला दोन मुली आणि एक मुलगा अशी संतती होती. १८४० च्या सुमारास Ramo Samee ची तब्बेत ढासळायला सुरुवात झाली. त्याचा परिणाम खेळांवर होऊन त्याचे उत्पन्न घटले, कर्जाचा डोंगर वाढू लागला. त्यातच १८४९ साली त्याचा एकुलता एक मुलगा तलवार गिळण्याचा सराव करताना मृत्यमुखी पडला आणि Ramo Samee ला जबर धक्का बसला. या धक्क्यातून काही तो सावरला नाही आणि २१ ऑगस्ट १८५० ला त्याचा मृत्यू झाला.

मरताना Ramo Samee ची आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची होती. एलनकडं त्याच्या अंत्यसंस्कारानाही पैसे नव्हते. शेवटी एलनने एका वर्तमानपत्रातून मदतीचे आवाहन केले पण त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. एक सर्कस मालक, एक बिशप, दोन वेश्या आणि दोन ज्यू एवढ्याच लोकांनी जेमतेम मदत केली आणि कसेबसे Ramo Samee चे अंत्यसंस्कार St. Pancras church yard मध्ये पार पडले. १८७१ पर्यंत एलन आणि Ramo Samee च्या दोन मुली देशोधडीला लागल्या.

Ramo Samee नंतर जेमतेम एखादे दशक भारतीय जादूगारांनी युरोपमध्ये आपले कौशल्य दाखवण्यात घालवले.
पुढच्या काळात युरोपिअन जादूगार भारतीय जादूगारांच्या खेळातून शिकून त्यांच्याहून सरस प्रयोग करू लागले आणि त्यांनी भारतातच येऊन आपल्या कौशल्यावर पैसे मिळवणे सुरू केले व अशा रीतीने एक वर्तुळ पूर्ण झालं. या सगळ्या कोलाहलात Ramo Samee चं नाव इतिहासात कुठंतरी हरवून गेलं. पण ब्रिटिशांच्या साम्राज्यात जाऊन आपला झेंडा रोवणारा पहिला भारतीय म्हणून त्याचं नाव अजरामरच राहील.

WhatsApp Image 2018-11-20 at 10.09.40 AM

यशोधन जोशी

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया

आपण लहान असताना आपल्या फटाके उडवण्यावर तसे कुठले निर्बंध नव्हते, आपण अगदी मुक्तपणे पाहिजे तेवढे फटाके उडवले. मी दिवाळीत फटाके उडवत असतानाच घरी आलेला एखादा नतद्रष्ट नातेवाईक (बहुतेक मामाच) घरच्यांच्या समोर ‘आत्ता फटाके उडवताय पण खरे फटाके शाळा सुरू झाल्यावर उडतीलच’ अशी शापवाणी उच्चारून जायचा. तरी मी फटाके उडवल्याशिवाय कधी राहिलो नाही (आणि पुढच्या गोष्टीही टळल्या नाहीत.)

आता दिवाळीत फटाके उडवण्यावर न्यायालयाने निर्बंध घातलेले असले तरी फटाक्यांवर लिहायला त्यांची काही हरकत नसावी त्यामुळे या दिवाळीला मी धांडोळ्यासाठी फटाक्यांच्यावरच लेख लिहून काढला.

इतर अनेक शोधांप्रमाणे फटाक्यांचा शोधही चीनमध्येच लागला, इस ६ व्या शतकात चीनच्या हुनान प्रांतात भुतांना किंवा आत्म्यांना पळवून लावण्यासाठी बांबूच्या पोकळ नळीत दारू भरून ती जाळली जाई. पण आवाजाचे फटाके अजून तयार झाले नव्हते. पण सातव्या शतकाच्या सुरुवातीलाच Suy वंशातला राजा Yang-ti च्या कारकिर्दीत वाजणारे फटाके निर्माण होऊ लागले.

पुढे दहाव्या शतकापर्यंत फटाक्यांच्या प्रांतात बरीच प्रगती होत गेली आणि अग्निबाण,सापासारखे जमिनीवरून फुत्कारत जाणारे फटाके, सुंsssई आवाज करत आभाळात जाणारे फटाके तयार होऊ लागले आणि याचबरोबर शोभेचे फटाकेही तयार झाले.

फटाके तयार करणे याला इंग्रजीमध्ये Pyrotechnics असं नाव आहे. यात अधिकाधिक प्राविण्य मिळवत दहाव्या शतकाच्या आसपास फटाके युद्धतंत्राचाही भाग बनले. स्फोटके भरलेले गोळे, बाण किंवा भाले युद्धात वापरले जाऊ लागले. पण फटाके तयार करण्याच्या तंत्राविषयीची आपण या लेखात चर्चा न करता त्यांच्या वापराविषयीचे इतिहासातील संदर्भ आपण पहाणार आहोत.

आत्तापर्यंतचे फटाक्यांचे सगळे संदर्भ चीनमधले आहेत आणि दिवाळी आली की चिनी मालावर बहिष्कार घालण्याची आपली परंपरा आहे म्हणून आपण आता फटाक्यांचे भारतातले काही संदर्भ आहेत काय ते शोधूया.

अब्दुर रझाक नावाचा एक राजदूत पर्शियन बादशहा शाह रुख याच्यातर्फे भारतात आलेला होता. त्याने विजयनगरला भेट दिली तेंव्हा दुसरा देवराया सत्तेवर होता. अब्दुर रझाकने त्यावेळी विजयनगरला बराच काळ मुक्काम ही ठोकला होता. त्याने विजयनगरच्याविषयीची माहिती आपल्या प्रवासवर्णनात लिहून ठेवलेली आहे. महानवमीच्या उत्सवाचे (म्हणजे बहुदा खंडेनवमीचे) वर्णन करताना तो त्यावेळी उडवण्यात येणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीचे वर्णन करतो. हे वर्णन १४४३ सालातले आहे. (युरोपमधला आतषबाजीचा पहिला लिखित संदर्भ १५७० सालातला आहे, जो न्यूरेम्बर्ग येथील आतषबाजीचा आहे)

काश्मीरचा एक सुलतान झैनुल अबीदिन ज्याने १४२१ ते १४७२ च्या दरम्यान राज्य केले. या सुलतानाने फटाक्यांच्या निर्मितीविषयीची माहिती पर्शियन भाषेत प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात लिहून काढलेली आहे. त्याच्याच राजवटीत १४६६ मध्ये काश्मीरमध्ये फटाक्यांचा पहिला संदर्भ आढळतो.

Verthema हा इटालिअन प्रवासी इस १५०२ ते १५०८ सालच्या दरम्यान भारतात आला होता, त्यानेही विजयनगरला भेट दिली होती. त्यावेळी त्याने हत्तींच्या झुंजीची वर्णने केली आहेत. कधीकधी झुंजीच्या दरम्यान हत्ती बेफाम होतात त्यावेळी फटाक्यांचा वापर करून त्यांना वेगळे करण्यात येई.

विजयनगरच्या राजाला फटाके उडवणे किंवा आतषबाजी करणे शक्य होते पण सामान्य प्रजेला फटाके उपलब्ध होते का असा प्रश्न तुम्हाला आता पडलेला असेलच तर त्याचंही उत्तर मी देणार आहे.

Verthema चाच समकालीन पोर्तुगीज प्रवासी Barbosa हा गुजरातमध्ये गेलेला होता त्यावेळी एका लग्नाच्या वरातीचे वर्णन करताना तो वरातीसमोर वाजवण्यात येणाऱ्या मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचे आणि बाणांचे वर्णन करतो. यावरून फटाके (आजच्यासारखे) फार महाग नसून सामान्य जनतेला परवडावे अशा दरात उपलब्ध होते हे नक्की.

आज आपल्याला फटाक्यांचे प्रकार सांगा असं कुणी सांगितलं तर आपण बॉम्ब, झाडं/कुंड्या, चक्र वगैरे प्रकार सांगू पण त्यावेळेच्या भारतातली फटाक्यांची नावं बघितली तर ती नावं फारच सुंदर आहेत. कल्पवृक्षबाण, चामरबाण, चंद्रज्योति, चंपाबाण, पुष्पवर्ति, छुछुंदरीरसबाण, तीक्ष्णबाण, पुष्पबाण ही नावंच बघा किती काव्यात्मक आहेत. (नाहीतर लक्ष्मीतोटा, नाझी बॉम्ब, नागगोळी ही काय नावं आहेत?)

ही सगळी नावं एका संस्कृत ग्रंथातली आहेत, या ग्रंथाचं नाव आहे कौतुकचिंतामणी आणि त्याचा कर्ता आहे गजपती प्रतापरुद्रदेव. प्रतापरुद्रदेव हा १४९७ ते १५४० या काळात ओरिसावर राज्य करत होता. या ग्रंथात फक्त फटाक्यांची नावंच न सांगता ते तयार करण्याची पद्धत आणि त्यासाठी लागणारे घटक यांचीही नावं दिलेली आहेत. गंधक म्हणजे सल्फर, यवक्षार म्हणजे Saltpetre, अंगार म्हणजे कोळसा अशा विविध रासायनिक पदार्थांची आणि वर्तिका म्हणजे वात, नालक म्हणजे बांबूचा पोकळ तुकडा, अन्नपिष्ट म्हणजे भाताची खळ अशा इतर घटकांचीही नावं दिलेली आहेत.

आता हे संदर्भ वाचून फटाके उडवण्यात ‘कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ?’ असा प्रश्न जर कोणी उपस्थित केला, तर महाराष्ट्र या प्रांतातही त्याकाळी अग्रेसरच होता. महाराष्ट्रात आपल्या संत कवींनी फटाक्यांची वर्णनं करून ठेवलेली आहेत इतकंच नव्हे तर फटाक्यांची नावे वापरून काव्यात दृष्टांतही दिलेले आहेत.

सोळाव्या शतकातले महाराष्ट्रातले संत एकनाथ यांनी रुक्मिणी स्वयंवर नावाचा एक ग्रंथ रचला त्यात आलेले आतषबाजीचे वर्णन फारच सुंदर आहे. Crackers या एकाच नावाने आपल्याला फटाके माहीत असतील तर फटाक्यांचे नामवैविध्य इथं तुम्हाला दिसेल.

0123

एकनाथांनी वापरलेल्या त्या काळातल्या फटाक्यांची आजची नावे काय आहेत याचा आपण अंदाज करायचा प्रयत्न करूया. अर्थात त्यावेळचे या फटाक्यांचे रूप आणि आजचे रूप किंवा नावे यात फरक असणार हे निश्चित.

अग्नियंत्र – रॉकेट

हवई/हवाई – हवेत उडणारा फटाका

सुमनमाळा – झाड/कुंडी/अनार

चिचुंदरी – सुंsssई असा आवाज करत उडणारे रॉकेट याला सध्या सायरन असं म्हणतात

भुईनळा – हा सुद्धा झाडाचाच प्रकार आहे

चंद्रज्योती – आज याला आपण स्काय शॉट म्हणतो

हातनळा/पुष्पवर्ती – फुलबाजा किंवा आपण ज्याला आज पेन्सिल म्हणतो.

एकनाथांच्या नंतर महाराष्ट्रातले अजून एक महत्वाचे संत म्हणजे रामदास, त्यांच्या काव्यातही आतषबाजीचे उल्लेख येतात. मंदिरातले भजन संपल्यावर होणाऱ्या दारुकामाचे वर्णन करताना रामदास लिहितात –

दिवट्या हिलाल चंद्रजोती
बाण हवया झळकती
नळे चिचुंद्रया धावती | चंचळत्वे ||
फुलबाजा बंदुका खजिने |
पट्टे दांड भेदिती बाणे
अभिनव कीर्ती वाखाणे | भाट गर्जती ||

असेच वर्णन रामदास चाफळच्या मंदिरातील उत्सवाचेही करतात

दिवट्या हिलाल चंद्रजोती
नळे आरडत उठती
बाण हवाया झरकती | गगनामध्ये ||

मराठ्यांनी पेशवाईत नर्मदा ओलांडून उत्तरेकडे जो काही राज्यविस्तार केला त्यावेळी त्यांना उत्तरेतले वैभव आणि कला यांचा परिचय झाला. मग उत्तरेकडचे कलाकार बोलावून चित्रं काढून घेणं असो किंवा उत्तरेच्या धर्तीवर मोठंमोठे वाडे बांधणे असो यांची सुरुवात त्याकाळात झाली. पेशवाईतलाच एक प्रसंग आहे, एकदा महादजी शिंदे आणि सवाई माधवराव बोलत असताना महादजी शिंदे सवाई माधवरावांना राजपुतान्यातल्या दिवाळीविषयी सांगत होते. कोट्याला राजेशाही दिवाळी साजरी करताना दारुचेच रावण, राक्षस, वानरे आणि हनुमान वगैरे तयार केले जात आणि मग शेपटीला आग लावलेला हनुमान उड्डाण करून लंकादहन करत असे. कोट्याचा राजा आणि तिथली प्रजा या आतषबाजीचा दरवर्षी आनंद लुटत.

या आतषबाजीची गोष्ट ऐकल्यावर सवाई माधवरावांनीही अशी “दारूची लंका” बघायची इच्छा व्यक्त केली. महादजी शिंद्यांनी मग सगळी तयारी करवून पर्वतीच्या पायथ्याला हा आतषबाजीचा कार्यक्रम करवला आणि बालपेशव्याने हा कार्यक्रम पर्वतीवरून बघितला.

पेशवाईमध्ये जे आतषबाजीचे प्रकार प्रसिद्ध होते त्यांची नावे होती – तावदानी रोषणाई, आकाशमंडळ तारांगण, चादरी दारुकाम, नारळी झाडे, प्रभाचमक, कैचीची झाडे, बादलगर्ज, बाण, पाणकोंबडी, हातनळे, कोठ्याचे नळे, फुलबाज्या, महताफा.

हे सगळे संदर्भ झाले भारतीय पद्धतीने केलेल्या आतषबाजीचे पण भारतावर ब्रिटिश राजवट सुरू होण्याच्या काही वर्षे आधी अवधचा नवाब असफउद्दौला याच्यासाठी ब्रिटिशांनीही एक आतषबाजीचा कार्यक्रम केला होता. लखनौच्या आसपास झालेली ही आतषबाजी अत्यंत कलापूर्ण होती. करॅर नावाच्या एका साहेबाने हे फटाके तयार केले होते. आधी हिरव्या, भगव्या आणि निळ्या रंगाची असंख्य प्रकाशफुले करॅर साहेबाने आकाशात उधळली. त्यापाठोपाठ आकाशात मासे पोहतानाचा नजारा दाखवला आणि त्यानंतर आकाशात चक्रे फिरवून आणि बाण उडवून आकाश उजळून टाकले. सगळ्यात शेवटी आतषबाजीतून एक मशीदही साकारली.

आतषबाजीची दारू किंवा बंदुकीची दारू तयार करणाऱ्या लोकांना महाराष्ट्रात शिकलगार असं म्हटलं जाई. अजूनही महाराष्ट्रात जिथं जिथं संस्थांनी राजवट होती तिथं शिकलगार आडनावाचे लोक आढळतात. शिकलगार समाज अजूनही पारंपारिक पद्धतीने फटाके तयार करतो अर्थात शिवकाशीच्या फटाक्यांच्यासमोर त्यांच्या फटाक्यांचा आवाज आता दबून गेलेला आहे. मला मात्र अजूनही लग्नाच्या वरातीत आकाशात उंच जाणाऱ्या बाणातून नवरा-नवरीची नावं झळकवणारा कोल्हापूरचा एक शिकलगार लक्षात आहे.

कौतुकचिंतामणी या आपल्या ग्रंथात प्रतापरुद्रदेव आतषबाजीला ’विनोद’ असं संबोधतो किंबहुना त्याकाळात करमणुकीच्या सर्वच गोष्टींना विनोद असेच संबोधले जाई. या दिवाळीत तुम्हाला ’वाचन विनोदाचा’ पुरेपुर आनंद मिळो या शुभेच्छा !

यशोधन जोशी

 

संदर्भ –

१. डॉ. गोडे यांचा शोधनिबंध संग्रह

२. पेशवेकालीन महाराष्ट्र – भावे

 

जाने कहॉं गए वो दिन…

समजा एखाद्या दिवशी आपण रोजच्यासारखे झोपलो आणि सकाळी उठल्यावर आपल्या लक्षात आलं की हे २०१८ साल नाही तर २०४३ साल आहे म्हणजे आपण २५ वर्षांनंतर जागे झालेलो आहे तर? आपलं सगळं जगच बदलून गेलेलं असेल ना? अशा प्रकारच्या अनेक विस्मयकथाही लिहिल्या गेल्या आहेत.

पण अशा प्रकारची एक घटना प्रत्यक्षात घडून गेलेली आहे. म्हणजे अगदी काही २५ वर्ष वगैरे नाही पण दोन तारखेला झोपून सकाळी उठल्यावर तीनच्या ऐवजी कॅलेंडर चौदा तारीख दाखवतयं असं होऊन गेलेलं आहे. हे कसं झालं ? कुठं झालं? असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेलच तर ही आहे त्याची गोष्ट.

सूर्य उगवल्यावर आपले उद्योग सुरू करणे आणि सूर्यास्ताबरोबर दिवस संपवणे एवढेच एकेकाळी मानवाला माहिती होतं पण हळूहळू विकसित होताना त्याने चंद्र सूर्य इ. च्या स्थितींचा अभ्यास करून आपले कॅलेंडर तयार केले असावे. जगभरात अशी अनेक कॅलेंडर होती पण त्यांच्यात सुसूत्रता नव्हती. म्हणजे इजिप्शिअन कॅलेंडरमध्ये प्रत्येकी ३० दिवसांचे १२ महिने होते आणि प्रत्येक महिन्यात १० दिवसांचे तीन आठवडे होते. (जरा कल्पना करा आजही हेच कॅलेंडर वापरात असतं तर आठवड्यातले पाच दिवस काम करून दोन दिवस सुट्टी घेणाऱ्या आपल्यासारख्या लोकांचे किती हाल झाले असते)

आपल्या साम्राज्यात कालगणनेत सुसूत्रता असावी या हिशोबाने रोमन सम्राट ज्युलिअस सीझरने एक कॅलेंडर तयार करवून घेतले ज्याला ज्युलिअन कॅलेंडर असे म्हटले जाऊ लागले. खरं तर कॅलेंडर तयार करणे, त्यात सूर्य-चंद्राच्या स्थितीचा अभ्यास करून गणितं मांडणे वगैरे गोष्टी भयंकर क्लिष्ट असतात आणि माझ्यासारख्या गणिताची फारशी आवड नसणाऱ्या लोकांसाठी तर ही सगळी आकडेमोड समजून घेणं फारच अवघड असतात. तरीही आपण आता हे कॅलेंडर सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

पृथ्वीला सुर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला ३६५.२५ दिवस लागतात असं आपण सध्या गृहीत धरू. ज्युलिअस सिझरच्या कॅलेंडरमध्ये यात थोडासा बदल करून वर्षाचे बरोबर ३६५ दिवस बनवले गेले. आणि वर्षातल्या महिने व दिवसांचे गणित बसवताना सर्व महिन्यात ३० किंवा ३१ दिवस घालून आणि फेब्रुवारी २८ दिवसांचा बनलेला होता. हे झाले ३६५ दिवस आणि आता उरला फरक वरच्या ०.२५ दिवसाचा, तर दर चार वर्षांनी एकदा फेब्रुवारीमध्ये एक दिवस वाढवून हा एक दिवसाचा फरक भरून काढला जाई. हे कॅलेंडर इसपू १ जानेवारी ४६ पासून वापरले जाऊ लागले आणि पुढे १५ व्या शतकापर्यंत युरोपमध्ये वापरात होते. पण १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात १३ वा ग्रेगरी याने हे कॅलेंडर सुधारण्याचा कार्यक्रम हाती घेतला.

आता तुम्ही विचाराल की ज्युलिअन कॅलेंडर असताना ग्रेगॅरिअन कॅलेंडर तयार करण्याचं कारणच काय? तर याचं उत्तर आहे सौर कॅलेंडर आणि ज्युलिअन कॅलेंडर मध्ये कालगणनेत पडणारा छोटासा फरक. एक सौर वर्ष म्हणजे ३६५.२४२२ दिवस. म्हणजे ज्युलिअन कॅलेंडरचे ३६५.२५ दिवस आणि सौर वर्ष यात ०.००७८ चा फरक दरवर्षी पडू लागला. म्हणजेच दर १२८ वर्षांनी एका दिवसाचा फरक या दोन कॅलेंडरमध्ये पडू लागला.

हे सर्व गणित मांडलेलं होतं पोप १३ वा ग्रेगरी आणि त्याच्या कॅलेंडर सुधारणा समितीनं. १५८२ मध्ये त्यांनी एक नवीन कॅलेंडर तयार करेपर्यंत ०.००७८ हा काळ साठत जाऊन ११ दिवस इतका झालेला होता. १५८२ मध्ये या ग्रेगॅरिअन कॅलेंडरचा स्वीकार स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्सने केला पण इंग्लडने मात्र अजून काही हे कॅलेंडर स्वीकारलेलं नव्हतं.

newsfb550064fc59811e040391e2100092b4

अखेर १७५२ साली इंग्लडने आणि अमेरिकेने ग्रेगॅरिअन कॅलेंडर स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि २ सप्टेंबरला यातला ११ दिवसांचा फरक लागू करण्याचा निश्चित झाले. म्हणजे २ सप्टेंबरला रात्री ब्रिटिश जनता झोपली आणि थेट १४ सप्टेंबरच्या सकाळी जागी झाली.

या बदलाला जनतेने काही प्रमाणात विरोधही केला, आमचे ११ दिवस परत द्या म्हणून काही काळ इंग्लडमध्ये गोंधळही झाला. पण हळूहळू हा विरोध मावळला आणि सगळं सुरळीत होतं गेलं.

ब्रिटनबरोबर हे नवे कॅलेंडर त्यांच्या सर्व वसाहतींना ही लागू झाले आणि तिथलेही कॅलेंडर ११ दिवसांनी पुढे ढकलले गेले. हे सर्व बदल घडवण्याकरता ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कॅलेंडर ऍक्ट हा ठराव १७५० साली मांडला गेला. या ठरावातल्या एका कलमानुसार जुन्या तारखेनुसार होणारे सर्व सण आणि उत्सव आता नवीन तारखेप्रमाणे करावेत असे स्पष्ट करण्यात आले.

अमेरिकेनेसुद्धा अशाच प्रकारचा एक नियम बनवला. याचे उदाहरण म्हणजे ११ फेब्रुवारी १७३२ साली जन्मलेल्या जॉर्ज वॉशिंग्टनने आपल्या विसाव्या वाढदिवसापासूनचा प्रत्येक वाढदिवस २२ फेब्रुवारीला साजरा करण्यास सुरुवात केली.

आता आपल्याला या वरून बोध हा घ्यायचा आहे की इंग्रजी तारखा प्रमाण मानून आपण ज्या काही ऐतिहासिक घटना भारतात साजऱ्या करतो त्यातल्या १७५२ सालच्या आधीच्या सर्व तारखा आपल्याला अकरा दिवस पुढं नाही काय ढकलायला लागणार ?

टीप- आधीच म्हटल्याप्रमाणे कॅलेंडर, कालगणना हे सगळे अतिशय क्लिष्ट विषय आहेत, हा लेख लिहिताना क्लिष्टता टाळून जेवढ्या सोप्या शब्दात लिहिता येईल तेवढ्या सोप्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यासू लोकांसाठी ज्युलिअन आणि ग्रेगरिअन कालगणनेची विस्तृत माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहेच.

यशोधन जोशी

ऐसी अक्षरे – भाग ३

लायनोटाईप मशिनचा शोध लागला आणि हे तंत्रज्ञान छपाई क्षेत्रात झपाट्याने वापरले जाऊ लागले. पण ऑटमार जेव्हा लायनोटाईप मशिन बनवण्याच्या मागे होता तेव्हा तो सोडून या क्षेत्रात कोणी दुसरे संशोधन करत नव्हतं का? तर ऑटमारच्याच संशोधनाला समांतर असे आणखी एक मशिन बनवण्याच्या मागे एक संशोधक होता आणि त्याने शोधलेले तंत्रज्ञान ऑटमारच्या मशिनसारखेच गुंतागुंतीचे होते.

H1
१८८५ साली अमेरीकन संशोधक टॉल्बर्ट लॅन्स्टन (Tolbert Lanston) याने आणखी एका टाईपसेटींग मशिनच्या पेटंटसाठी अर्ज केला होता. या मशिनमधे कोल्ड स्टॅम्पिंग तंत्रज्ञान वापरुन छपाईचे खिळे बनवले जात. पुढे यात आणखी संशोधन करुन त्याने धातूचे ओतकाम करुन खिळे बनवण्याचे तंत्र विकसित केले गेले.

ह्या मशिनमधे वापरलेले तंत्रज्ञान हे ऑटमारच्या मशिनपेक्षा वेगळे होते. या मशिनमध्येही टाईप करण्यासाठी की बोर्ड होता. पण धातूचे ओतकाम करण्यासाठी यंत्र वेगळे होते. मोनोटाईप हे मशिन एकावेळी एकाच अक्षराचा खिळा बनवत असे. हे खिळे एकामागोमाग एक लावून त्यापासून एक ओळ तयार होत असे.

या यंत्राचं वैशिष्ठ्य म्हणजे यात होणारे जस्टिफिकेशन. दोन शब्दात किती जागा सोडायची हे ऑपरेटर ठरवू शकत असे. टाईप करताना रकान्याच्या रुंदीमध्ये किती जागा उरली आहे हे दर्शवणारी एक स्केल असे. आपण टाईपरायटरवर टाईप करताना उजवीकडील मार्जिनच्या जवळ पोहोचण्याच्या आधी एक घंटा वाजते. जी आपण उजव्या मार्जिनच्या जवळ पोहोचल्याची सुचना देते. तशीच रचना या यंत्रातही होती. त्यावरुन ऑपरेटरला उरलेल्या जागेत किती शद्ब बसतील याचा अंदाज येत असे. एखादा शब्द बसणार नाही असे त्याला वाटल्यास यंत्राच्या वरील बाजूस असलेल्या एका दंडगोलाकृती मापकावरील अंतर बघून त्याप्रमाणे की-बोर्डवर काही विशिष्ठ बटणे दाबली की त्याबरहुकूम कागदाच्या गुंडाळीवर भोके पडली जात. मोनोटाईपच्या या वैशिष्ट्यामुळे रकाने असलेले तक्ते या यंत्रावर सहजपणे करता येत. त्यामुळे वेळापत्रके, वेगवेगळी कोष्टके इ. कामांच्या खिळ्यांची जुळणी या यंत्रावर अतिशय सफाईने करता येत असे.

मोनोटाईप मशिनला एक की-बोर्ड असे ज्यावर एकाच टाईपचे नॉर्मल, इटॅलीक्स, बोल्ड, बोल्ड इटॅलीक्स अशी बटणे असत. यात एखादे अक्षराचे बटण दाबल्यावर वरती लावलेल्या पेपरच्या गुंडाळीला एक छिद्र पडत असे. वेगवेगळ्या अक्षरांसाठी वेगवेगळ्या छिद्रांची रचना या कागदाच्या गुंडाळीवर केली जात असे. छिद्रे पाडण्याची ही प्रक्रीया हवेच्या दाबाने केली जात असे. या कागदाच्या गुंडाळ्या नंतर कास्टिंग करणार्‍या यंत्राकडे पाठवल्या जात. त्याआधी टाईप करणारा ऑपरेटर त्यावर कुठला टाईपची मॅट्रिक केस लावायची तसेच रकान्याची रुंदी किती याबद्दलच्या सुचना हाताने लिहित असे.

लायनोटाईप मशिनप्रमाणेच या मशिनमधेही पितळेचे साचे असत. मॅट्रिक्स केसमधे १५ x १५ असे रकाने व ओळीच्या रचनेत २२५ साचे असत. टायपिंग मशिनवरची छिद्रे पाडलेली कागदी गुंडाळी कास्टर मशिनला लावली जात असे. कास्टर मशिनमधे सांकेतिक छिद्रे पाडलेला कागद वाचला जात असे. छिद्रांची ही रचना वाचून यंत्रातील मॅट्रिक्स केसच्या मागील बाजूस असलेली धातूची पीन केसच्या छिद्रातून अक्षराचा साचा कास्टरमधे ढकलत असे. मग एका पंपाद्वारे कास्टरमधे असलेल्या पितळेच्या साच्यांमधे धातूचा रस दाबाने सोडून अक्षराचा खिळा बनवला जात असे. हा साचा पाण्याचा वापर करुन थंड करण्याची रचना मशिनमधेच केलेली असे. त्यामुळे साच्यात सोडलेला धातूचा रस लगेचच थंड होऊन अक्षराचा खिळा बाहेर पडत असे. हे खिळे एकामागोमाग एक लावले जाऊन शब्दांच्या ओळी तयार होत. ठराविक ओळींचाअसा एक कंपोज छपाईसाठी पुढे पाठवला जात असे.

1280px-Matrixcase-bembo-16pts
मोनोटाईपमधे वापरली जाणारी मॅट्रिक्स केस

ही दोन्ही यंत्रे येण्याच्या आधीपासून रोटरी ऑफसेट मशिन्स वापरण्यास सुरुवात झाली होती. स्टिरीओटाईप नावाच्या मशिनमधे रोटरी ऑफसेटच्या सिलिंडरवर बसणार्‍या गोलाकार ओतीव प्लेटसची निर्मिती करता येत असे. हातानी जुळवलेल्या खिळ्यांच्या कंपोजवर टिपकागदासारखा मऊ कागद दाबून त्यात त्या खिळ्याचा छाप उमटवला जात असे. मग या कागदाला मशिनच्या सिलिंडरच्या व्यासाप्रमाणे गोल वळवले जात असे. हा गोलाकार व अक्षरांचे ठसे असलेला कागद मग ओतकाम करणार्‍या मशिनमधे घातला जात असे. त्यात धातुचा रस ओतून सिलिंडरच्या व्यासाच्या आकाराची व उठावाची अक्षरे असणारी गोलाकार ओतीव प्लेट बनत असे. ही प्लेट सिलिंडरला लावून मग छपाई केली जात असे. वरील दोन यंत्रांमुळे कंपोजींगचे काम जलद होऊ लागले व त्यामुळे या प्लेटही वेगाने बनू लागल्या. त्यामुळॆ छपाईचाही वेग वाढला. (हे तंत्रज्ञान कसे होते हे शोधताना सापडलेला हा माहितीपट.)

पण मोनोटाईप मशिनची संकल्पना ज्याने पहिल्यांदा मांडली तो टॉल्बर्ट लॅनस्टन मात्र दुर्दैवी ठरला. टॉल्बर्टचा जन्म १८४४ साली एका गरीब कुंटूंबात झाला. १५ व्या वर्षीच त्याने आपले शिक्षण सोडून दिले व तो कामधंद्याला लागला. छपाईच्या संदर्भातले काम करताना कंटाळवाण्या खिळे जुळवण्याच्या तंत्रात वेगाने काम करु शकेल असे यंत्र बनवण्याचा ध्यास त्याने घेतला. वर उल्लेखल्याप्रमाणे त्याने कोल्ड स्टॅपिंग प्रकारे खिळे बनवण्याचे एक यंत्र बनवले. १८८६ साली आलेल्या लायनोटाईप मशिनमधे धातूच्या रसापासून स्लग बनवले जातात हे पाहुन टॉल्बर्ट ओतकाम करुन खिळे बनवण्याचे यंत्र बनवण्याच्या मागे लागला. टॉल्बर्टचे फारसे शिक्षण झाले नसल्याने त्याला यंत्रांमधील क्लिष्ट संरचना कशी करावी याबद्दलचे फारसे ज्ञान नव्हते. १८९७ मधे त्याने जॉन सेलर या एका इंजिनिअरच्या सहाय्याने ओतकाम करणारे यंत्र बनवले. टॉल्बर्टने पेनसिल्वेनीया येथे त्याने या यंत्राचे उत्पादन चालू केले. पण आर्थिक चणचणीमुळे या यंत्राला युरोपमधे ग्राहक मिळतील या आशेने त्याने इंग्लंडला प्रस्थान केले. प्रवासातच त्याची डुरेव्हन नावाच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीशी ओळख झाली. त्यांना टॉल्बर्टची कल्पना आवडली व त्यांनी त्याला सहाय्य केले. युरोपमधे विकण्यायोग्य पहिल्या यंत्रावर टॉल्बर्टचे नाव होते. लॅनस्टन कास्टिंग मशीन या नावाने हे यंत्र विकले गेले. पण त्यानंतर पुढील १० वर्षातच टॉल्बर्टचे नाव यंत्रावरुन काढून टाकण्यात आले व विपन्नावस्थेत त्याचा मृत्यू झाला.

लायनोटाईप आणि मोनोटाईप या दोन्ही मशिननी छपाईच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवली. ही दोन्ही मशिन्स साधारणत: १९७०-८० च्या दशकापर्यंत वापरात होती. शोध लागल्यानंतर पुढे ८०-९० वर्षे चालणार्‍या या तंत्रज्ञानात पुढे येणार्‍या संगणकीय टाईपसेटींगची बीजे रोवली गेली होती.

१९६० च्या दशकात त्यानंतर फोटोटाईपसेटींगचा शोध लागला. या मशिनमध्ये खिळ्यांऐवजी फिल्मचा वापर केला जात असे. लायनोटाईप आणि मोनोटाईप या दोन्ही कंपन्यांनी आपली या तंत्रज्ञानावर आधारीत मशिन्स आणली. या दोन कंपन्यांबरोबरच आणखी अनेक कंपन्या यात सामील झाल्या. पण हे तंत्रज्ञान १९८५ साली अ‍ॅपल कंपनीने आणलेल्या लेझर रायटर या लेझर प्रिंटरमुळे पुसले गेले. यानंतरचा काळ होता तो संगणकाचा. वेगवेगळी सॉफ्टवेअर्स निर्माण केली गेली आणि आज डिजिटलच्या जमान्यात संगणकावर जुळवलेला मजकुर थेट डिजिटल ऑफसेट मशिनवर छापला जातो.

अक्षरजुळणी हे मुद्रण क्षेत्राचे एक प्रमुख अंग आहे. अक्षरांची म्हणजेच वेगवेगळ्या फॉण्टस्‌ची निर्मिती ते त्यांची जुळणी याचा आढावा या तीन लेखांमधून घेण्याचा हा अतिशय त्रोटक प्रयत्न आहे. या विषयावर वाचताना मला लायनोटाईप आणि मोनोटाईप या मशिनच्या निर्मितीचा प्रवास अचंबीत करुन गेला. मोनोटाईप मशिनबद्दलचे माहितीपटही युट्यूबवर फारसे मिळाले नाहीत. जे मिळाले त्यातले बरेचसे स्पॅनिशमधले होते. त्यामुळॆ या यंत्रांतील तंत्र समजून घ्यायला जरा अवघड जाते. अक्षरांचा मुद्रणाच्या दृष्टीने झालेला हा प्रवास आता डिजिटल टाईपसेटींग पर्यंत पोहोचला आहे. डिजिटल क्षेत्रात रोज काही तरी नविन तंत्रज्ञान येत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचाही प्रवास मोठ रंजक आहे. पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी…

कौस्तुभ मुद्‌गल

ऐसी अक्षरे – भाग २

This is eighth wonder in the world

Thomas Edison

एडिसनचे हे उद्‌गार आहेत जगातल्या एका महत्वाच्या शोधासंबधी.

आज संगणकाची एक कळ दाबली की तुमच्यासमोर माहितीचा खजिना उघडतो. पण सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी माहितीची कुठली साधन उपलब्ध होती? टेलिग्राफचा शोध लागलेला होता आणि टेलिफोन अजूनही बाल्यावस्थेत होता. माहितीच्या देवाण घेवाणीत मुद्रणशास्त्राचा शोध अतिशय महत्वाचा आहे. १५ व्या शतकात गटेनबर्गने लावलेल्या मुद्रण यंत्राच्या शोधामुळे पुस्तकांबरोबरच अनेक वर्तमानपत्रांच्या छपाईला सुरुवात झाली.

गेल्या दोन शतकात जगात लागलेले महत्वाचे शोध कोणते या प्रश्नांची उत्तरे वेगवेगळे येतील. कोणी म्हणेल वीज, कोणी म्हणेल वाफेवर चालणारे यंत्र तर कोणी म्हणेल संगणक. खरं तर ही यादी न संपणारी आहे. आत्तापर्यंत मानवाने लावलेल्या सगळ्या शोधांचा त्याच्या प्रगतीमध्ये काही ना काही वाटा आहे. पण या सगळ्या शोधांमध्ये एका अतिशय महत्वाच्या शोधासंबंधी आपल्याला फारशी माहिती नाही.

गटेनबर्गने याच तंत्राचा उपयोग करुन धातूंच्या खिळ्यांचा उपयोग करुन मुद्रणशास्त्राला एक नवे वळण दिले. पण अर्थात त्यावेळी टायपोग्राफीची फारशी प्रगती झालेली नव्हती. त्यामुळे गटेनबर्गने वापरलेल्या खिळ्यांच्या टाईपमधे विविधता नव्हती. गटेनबर्गने लावलेल्या लेटरप्रेस मशिनमधे पुढे प्रगती होत गेली आणि त्यातूनच स्वयंचलीत लेटरप्रेस मशीन तयार झाले.

टायपोग्राफीची प्रगती आपण आधीच्या लेखात बघितलेलीच आहे. वेगवेगळे टाईप जरी निर्माण झाले तरी हाताने खिळे जुळवण्याच्या तंत्रात त्यामानाने फारशी प्रगती अजून झाली नव्हती. हातानी खिळे जुळवून त्यावरुन छपाई करणे हे अतिशय जिकिरीचे काम होते. समजा एखादे पुस्तक छापायचे असल्यास त्याच्या पानांच्या संखेप्रमाणे त्याचे किती फॉर्मस होतील याचा अंदाज घ्यावा लागे. फॉर्मस म्हणजे एका मोठ्या तावावर मागून पुढून पुस्तकातील ८ किंवा १६ पाने छापली जात. या मागून व पुढून छापलेल्या एका तावाला एक फॉर्म म्हणत. आधी एका फॉर्मच्या अक्षरांची जुळणी केली जात असे. या जुळवलेल्या पानांचे प्रुफ तपासले जाई. त्यात काही चुका असल्यास त्या दुरुस्त करुन हा फॉर्म छापला जाई. त्यानंतर जुळवलेले सर्व खिळे पुन्हा वेगळे करुन पुढच्या फॉर्मची जुळणी केली जात असे. हे अत्यंत किचकट व वेळखाऊ काम होते. रोजच्या वर्तमानपत्रांच्या बाबतीत तर अशी छपाई करणे आणखी अवघड होते. पण वर्तमानपत्रांचे रोज सकाळी वितरण होणे गरजेचे असत त्यामुळे आठ पानी वर्तमानपत्रांचे कंपोजिंग करण्यासाठी ४०-५० माणसं लागत. याचबरोबर वेगवेगळ्या अक्षरांच्या खिळ्यांचे अनेक संचही तयार ठेवावे लागत. ही आठ पान जुळवून झाली की छपाईला जात. पण त्या दिवसाची छपाई झाल्यावरही काम संपत नसे. जुळवलेले खिळे पुन्हा वेगळे करुन प्रत्येक अक्षर त्याच्या कप्प्यात परत ठेवावे लागे कारण पुढच्या दिवशीच्या वर्तमानपत्रासाठी हे खिळे पुन्हा लागणार असत. त्यामुळे वर्तमानपत्र चालवणे हे अत्यंत जिकिरीचे काम होते. ह्या खिळे जुळवून छपाईच्या तंत्रामुळे वर्तमानपत्रांच्या पानाच्या संखेवर मर्यादा पडे. १९ व्या शतकाच्या मध्यात रोटरी प्रेसचा शोध लागला तरी ते तंत्र अजूनही फारसे प्रगत नव्हते.  १८७४ साली हातानी कळ दाबून अक्षरे छापणार्‍या टाईपरायटरचा शोध लागला. पण वर्तमानपत्रे किंवा पुस्तके छपाईच्या दृष्टीने तो कुचकामी होता. १८८६ साली लागलेल्या एका शोधाने मात्र मुद्रणशास्त्रात मोठी क्रांती घडवली.

Ottmar_Mergenthaler

ऑटमार मर्जनथालर (Ottmar Mergenthaler) याचा जन्म जर्मनीतील हाचटेल येथे एका शाळा शिक्षकाच्या घरी झाला. १८७२ साली त्याने जर्मनीला रामराम ठोकून अमेरीकेची वाट धरली. त्याआधी जर्मनीत  तो एका घड्याळजीकडे उमेदवारी करत असे. वॉशिंग्टनला तो त्याचा भाऊ ऑगस्ट हाल (August Hahl) याला त्याच्या धंद्यात मदत करु लागला व पुढे तो त्याचा धंद्यातला भागीदारही झाला. १८७६ साली जेम्स क्लिफेनच्या (James Clephane) संपर्कात आला. क्लिफेन हा कागदपत्रे वेगाने छापण्यासाठी एखादे यंत्र तयार करण्याच्या मागे होता. त्याने ऑटमारला असे यंत्र बनवण्यास सांगितले. त्याआधी ऑटमारचा एक मित्र चार्स्ल मूर याने वर्तमानपत्राकरता टाईपींग करता येईल असा एक टाईपरायटर बनवला होता. पण त्याच्या डिझाईनमधे अनेक त्रुटी होत्या. त्याच्याच डिझाईनवरुन ऑटमारने कार्डबोर्डवर अक्षरे टाईप करता येतील असे डिझाईन बनवले. पण पुढे लागलेल्या आगीत त्याचे हे सर्व प्रयत्न नष्ट झाले.

पुढे ऑटमार हा व्हाईटलॉ रीड (Whitelaw Reid) ह्या न्युयॉर्क ट्रिब्युन या वर्तमानपत्राच्या अध्यक्षाच्या संपर्कात आला. रीडने ऑटमारला आर्थिक मदत केली आणि ऑटमारने त्याला एक यंत्र बनवून दिले. तरी त्यावर ऑटमार फारसा खुश नव्हता. एके दिवशी आगगाडीतून प्रवास करताना त्याच्या डोक्यात कल्पना आली जी सगळ्या मुद्रण व्यवसायात क्रांती घडवणार होती. काय होती ती कल्पना?

वेगवेगळ्या अक्षरांचे खिळे फाऊंड्रीमधे बनवले जात. त्यानंतर ते छापखान्यात आणून वापरले जात. खिळ्यांचे ओतकाम आणि त्याची जुळणी करणारे स्वयंचलीत मशिन तयार करण्याची कल्पना ऑटमारच्या डोक्यात आली. त्यावर त्याने काम सुरु केले. पण त्यासाठीची संरचना अतिशय जटील असणार होती. अक्षरांचे साचे बनवून त्यांची जुळणी करणे, हे जुळवलेले साचे पुढे ओतकामासाठी पाठवणे व ओतकाम झाल्यावर या साच्यांचा  पुर्नवापर करता येईल अशी संकल्पना त्याच्या डोक्यात होती.  त्याप्रमाणे तो कामाला लागला.

Lino

त्याने पितळेचे छोटे साचे (Matrix) बनवले. एकाच साच्यावर मूळ अक्षर व त्याचा इटॅलीक फॉर्म अशी  रचना केली. कॅपिटल लेटरसाठी याचप्रकारे वेगळे साचे बनवले गेले. हे साचे म्हणजेच मॅट्रेसेस साधारणत: दीड इंच लांबीचे असत. टाईपरायटरला जसा किबोर्ड असतो तसा ९० बटणे असलेला एक किबोर्डवर डाव्या बाजूस सर्व स्मॉल व उजव्या बाजुस सर्व कॅपिटल अक्षरे असत आणि मध्यभागी वेगवेगळी चिन्हे असलेली बटणे असत. किबोर्डच्या डाव्या बाजूला स्पेसबार असे. बटन दाबले की त्या अक्षराचा साचा वरच्या बाजुस ९० अक्षरांचे वेगवेगळे कप्पे असलेल्या मॅगझीनमधून घरंगळत खाली येत असे. पुढच्या अक्षराचे बटन दाबल्यावर त्या अक्षराचा साचा आधीच्या अक्षराच्या पुढे येऊन बसे. याचबरोबर दोन शब्दांमधील अंतरासाठी स्पेसबार दाबला की मधे स्पेसबॅण्ड येऊन बसे. एक पूर्ण ओळ टाईप झाली की ऑपरेटर उजव्या हाताला असलेले एक हँण्डल दाबत असे. हॅण्डल दाबल्यावर ही जुळणी केलेली पूर्ण ओळ मशिनच्या कास्टिंग भागाकडे पाठवली जाई. वर्तमानपत्राच्या रकान्यातील ओळींची अलाईनमेंट ही जस्टिफाईड असते. त्यासाठी दोन शब्दांच्या मधे असलेल्या स्पेसबॅण्ड मधे एक वेगळी रचना केली गेली होती. रकान्याची रुंदी आधीच सेट केलेली असे. मग शब्दांच्या मधल्या अंतराची जाडी कमी जास्त करण्यासाठी या निमुळत्या आकाराच्या स्पेसबॅण्डवर दाब दिला जात असे. हे दाबले गेलेले स्पेसबॅण्डस्‌मुळे जस्टिफिकेशन होत असे. मग ही मॅट्रिसेसची ओळ मोल्डिंग भागाकडे जाई. मोल्डिंगचे डिझाईनसुध्दा अतिशय जटील होते. यंत्राच्या वेगवेगळ्या भागांना वेगवेगळी गती मिळण्यासाठी विविध आकाराचे कॅम एकाच शाफ्टवर बसवलेले असत. साच्यामधे वितळलेला मिश्रधातू ज्यात ८५% शिसे, ११% अ‍ॅंटिमनी व ४% कथील असे याचा रस दाबाने सोडला जात असे. हा रस लगेचच गोठून त्याच्यापासून तयार झालेला एका ओळीचा स्लग बाहेर येत असे. अशा एकामागोमाग एक ओळी टाईप करुन त्याचे स्लग जुळवून कंपोजिंग केले जात असे. छपाई झाल्यावर हे वापरलेले स्लग पुन्हा वितळवले जात.

वरील चित्रात अनुक्रमे अक्षरांचा साचा (Matrix), साच्यावरील बनवलेल्या खाचा,
जस्टिफिकेशनचे स्पेसबॅण्डस‌ आणि स्लग

यानंतर वापरलेले मॅट्रेसेस पुन्हा वर असलेल्या मॅगझिनमधील त्यांच्या कप्प्यात पाठवण्यासाठी केलेली संरचना पण अतिशय जटिल होती. एका यांत्रिक लिव्हरने ते उचलून ते त्यांच्या कप्प्यात पाठवले जात. आज इलेक्ट्रॉनिक्सच्या जमान्यात ह्या रोबोटीक हालचाली करुन घेणे सोपे झाले आहे. पण केवळ यांत्रिक संरचनेतून या अतिशय अवघड अशा हालचाली करुन घेण्यामागे असलेला विचार थक्क करुन सोडतो.

या मशिनमधे वापरलेले तंत्र विस्तारीतपणे दाखवणारा एक माहितीपट युट्यूबवर पहायला मिळतो.

याचबरोबर डॉग विल्सन (Doug Wilson) याने २०१२ साली या मशिनवर आधारीत Linotype – The Film हा माहितीपट काढला. त्यात त्याने या मशिनशी संबधीत असलेल्या अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्या ऐकताना या मशिनच्या बाबतीत घडलेल्या अनेक गंमती आपल्याला कळतात.

पहिल्या बनवलेल्या मशिनमधे मॅट्रिसेस ठेवण्याचे एकच मॅगझीन असे. पण त्यामुळे एकाच टाईपचा पर्याय उरे. त्यानंतर आलेल्या मशिनला चार मॅगझीन असत. या चार मॅगझीनमधे चार वेगवेगळे टाईप असत. ऑपरेटर त्याला पाहिजे त्या टाईपचे मॅगझीन लावून टायपींग करत असे.

या कंपोजिंगमधे काही वेळेला गंमती घडत. टाईप करताना काही चूक झाल्यास ऑपरेटर ओळ पूर्ण करण्यासाठी डाव्या हाताला असलेल्या etaoin shrdlu या अक्षरांची बटन दाबून ओळ पूर्ण करत. याचा बाहेर आलेला स्लग काढून टाकण्यात येई. पण काही वेळेला हा स्लग काढायचा राहून जाई व तो तसाच छापला जाई. मग वाचकांना प्रश्न पडे की हे etaoin shrdlu काय प्रकरण आहे.

 

ऑटमारने हे बनवलेले मशिन लगेचच न्युयॉर्क ट्रिब्युनच्या छापखान्यात बसवले गेले. त्याने १८८९ साली मर्जनथालर लायनोटाईप कंपनीची स्थापन केली आणि तेथे या मशिनची निर्मिती सुरु केली.

अनेक वर्तमानपत्रांनी ही मशिन विकत घेणे चालू केले. वेगाने होणार्‍या टाईपसेटींगमूळे अनेक वर्तमानपत्रांनी आपल्या पानांची संख्याही वाढवली. नविन तंत्रज्ञानाचा जो परिणाम होतो तो झालाच. अनेक खिळे जुळवणार्‍यांच्या नोकर्‍या या मशिनमुळे गेल्या. त्यातील काहींनी हे नविन तंत्रज्ञान आत्मसात केले.

i-89dc6ddb105a1722bcfef439e8e76448-6211948_linotype

ऑटमारने बनवलेले पहिल्या ब्लोअर मॉडेलमधे पुढे त्यानेच सुधारणा करुन ’मॉडेल १’ या नावाने नविन मशिन बाजारात आणले. १९७०-८० या दशकात फोटोटाईपसेटींग मशिन बाजारात येण्यापर्यंत ही मशिन अनेक छापखान्यात वापरली जात होती. १८९९ मधे ऑटमारचा बाल्टिमोर येथे मृत्यू झाला.

einstein1.png

पण ही गोष्ट येथेच संपलेली नाही….

क्रमश:

कौस्तुभ मुद्‌गल

ऐसी अक्षरे – भाग १

आज आपण आपले विचार व्यक्त करण्यासाठी कुठली माध्यमे वापरतो? मुद्रित माध्यम, सोशल मिडिया, दूरदर्शन अशी यादी बरीच वाढवत नेता येईल. पण विचार व्यक्त करण्यासाठी आपण कुठली साधने वापरतो याचा विचार करु गेल्यास लिपीचा नंबर बराच वरचा लागेल. वरील कुठल्याही माध्यमाद्वारे माहिती पाठवायची असेल तर अक्षरांच्या मदतीने तो पोहोचवणे सोपे जाते. पण या लिप्यांचा उगम शोधायला आपल्याला बरेच मागे म्हणजे आजपासून सुमारे २५-३० हजार वर्षे मागे जावे लागते. कुठलीही लिपी बनण्याच्या आधी भाषा निर्माण झाली यात संशय नाही आणि भाषेच्या स्वरांना चित्रात बसवण्याचा प्रयत्न मानवाने लिपीद्वारे केला.

हजारो वर्षांपूर्वी मानवाला आपल्या मनातल्या भावभावना प्रकट करण्याची इच्छा झाली. निसर्गातील विविध आवाज तो ऐकत होता व या आवाजाची नक्कलही त्याने करुन बघितली असेल. यातूनच तो तोंडावाटे निरनिराळे आवाज काढून संवाद साधू लागला. इथे भाषा निर्माण झाली. पण तो इथेच थांबला नाही. मग त्याने निसर्गातील वस्तूंचा वापर करुन गुहांमधे चित्रे काढली. तोही त्याच्या मनातल्या भावना प्रकट करण्याचा एक मार्ग होता. तो काढत असलेल्या निरनिराळ्या आवाजांना त्याने चित्रबध्द केलं आणि कुठल्या आवाजाला कुठले चित्र वापरावे याचे प्रमाणीकरण केले. आज आपल्याला एखादे अक्षर बघून त्याचा उच्चार कसा करायचा हे माहित असले तरी त्यावेळी त्याच्यासाठी ते एक चित्रच होते. इथेच लिपीचा जन्म झाला.

गुहांमधील या चित्रांना लिपी म्हणता येणार नाही पण आपल्या मनातल्या भावना, रोज घडणारे प्रसंग, वेगवेगळे प्राणी पक्षी अशा अनेक गोष्टींची अभिव्यक्ती या चित्रांमधून त्याने दगडांवर उमटवली. हा मानवाच्या प्रगतीतला एक महत्वाचा टप्पा मानला पाहिजे. त्याने प्रारंभी काढलेल्या चित्रांमधे त्याला दिसलेले प्राणी, पक्षी यांचे चित्रण येते. नंतरच्या काळात त्याने अशी अनेक चित्रांची मालिका काढण्यास सुरुवात केलेली आढळते. ज्यात एखाद्या प्राण्याची शिकार करतानाचा प्रसंग, लढाईचा प्रसंग किंवा नाचगाण्यांच्या प्रसंगाचे विस्तृतपणे  चित्रण केलेले आढळते.

यानंतरचा टप्पा आहे तो Ideogram म्हणजे चिन्हांकीत लिपीचा.  यात त्याने त्याच्या मनातल्या भावनांचे वेगवेगळ्या चिन्हांमधे प्रकटीकरण करणे सुरु केले. पण अजूनही या चिन्हांना आवाज मिळालेला नव्हता. Ideogram चे उत्तम उदाहरण म्हणजे चिनी लिपी.  आणि यानंतर मात्र त्याने उमटवलेल्या प्रत्येक चिन्हाला विशिष्ठ उच्चारणाद्वारे आवाज दिला व त्याचे प्रमाणीकरण केलं. इथे खर्‍या अर्थाने लिपीची भाषेशी सांगड घातली गेली.

old Chinese
प्राचीन चीनी लिपी

वैदिक साहित्य हे मौखिक असल्याकारणाने लिखित स्वरुपातले कुठलेही पुरावे आपल्याला मिळत नाहीत. कदाचीत त्याकाळी (अर्थात त्याचा कालखंड कुठला हा एक मोठा प्रश्नच आहे) ते लिहिले गेले असल्यास कालौघात ते नष्ट झाले असेच म्हणावे लागेल.

साधारणत: इ.स.पू  ३००० वर्षांपूर्वी मेसोपोटेमिया येथे टोकदार हत्याराने विविध चिन्ह उमटवलेल्या चिकणमातीच्या अनेक पट्ट्या मिळालेल्या आहेत. अर्थात ही कुठली लिपी असावी का? याबद्दल निश्चित काही सांगता येत नाही. पण याच कालखंडात भारताच्या वायव्य प्रांतात असलेल्या प्रगत सिंधू संस्कृतीच्या सापडलेल्या मुद्रांवरही अशाच चिन्हांकीत लिपीने लिहिलेले आढळते. ही लिपी वाचण्याचे अनेक दावे केले गेले असले तरी ही लिपी अद्याप वाचली गेलेली नाही.  तसेच याच कालखंडातील इजिप्तमधील पिरॅमिडस्‌मधेही अशीच चिन्हांकीत लिपी सापडते. त्यानंतर जगभर वेगवेगळ्या प्रदेशांमधे अशा चिन्हांच्या लिपींचा वापर सुरु झालेला दिसतो.  नंतर या चिन्हांना स्वरही मिळाले. या चिन्हांच्या आकृतीबंधातून ती काय सांगत आहेत हे कळत असे. पुढच्या प्रगतीच्या टप्प्यावर मात्र ही चिन्हे Expressive कडून symbolic झाली. याच चिन्हांच्या लिपीतून ग्रीक व त्यानंतर आपण सध्या वापरतो ती रोमन लिपी निर्माण झाली. भारतातील एक जुनी लिपी म्हणजे ब्राह्मी, तिच्यावरुन अनेक लिप्या तयार झाल्या.

download
क्युनिफॉर्म लिपीतील भाजलेल्या मातीची पट्टी

सध्याच्या लेबॅनॉन, ट्युनिशिया व माल्टा या भागात इ. स. पू. ९ व्या शतकात फोनिशीअन भाषा बोलली जात असे. या भाषेची एक लिपी देखील होती. ग्रीकांनी या लिपीतील अक्षरांवर संस्कार करुन त्यांना वेगवेगळे स्वर दिले व त्यांचे प्रमाणीकरण केले. टायपोग्राफी या शब्दाची निर्मितीच ग्रीक शब्द Typo म्हणजे चिन्हांकीत करणे आणि Graphy  म्हणजे लिहिणे यापासून झालेली आहे. ग्रीकांनी बनवलेल्या या लिपीमधे सगळी अक्षरे कॅपिटल होती. तसेच दोन शब्दांच्या मधे जागा सोडणे वगैरे नियम तयार झालेले नव्हते. रोमन लोकांनी या लिपीत आणखी भर टाकली व ८ व्या शतकात कॅपिटल व लोअर केसच्या अक्षरांचा वापर चालू झाला.

गंमतीचा भाग असा की वेगवेगळ्या भागात एकाच स्वरासाठी वेगवेगळी चित्रे किंवा चिन्हे म्हणजेच अक्षरे निर्माण झालेली दिसतात. अगदी भारताबद्दलच बोलायचं झालं तर भाषेप्रमाणे लिपीही बदलते. पण जगात इतरत्र मात्र असे आढळत नाही. युरोपमधे बर्‍याच भाषांनी रोमन लिपीमधे थोडी भर टाकून ती वापरण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणॆ अरबी लिपी ही फारसी किंवा उर्दू लिहिण्यासाठी आजही वापरली जाते.

दरम्यानच्या काळात दगड, ताडपत्र, भुर्जपत्र, जनावरांच्या कातड्यापासून बनवलेले पार्चमेंट अशा वेगवेगळ्या माध्यमांचा वापर लिखाणासाठी सुरु झालेलाच होता. ही सगळी हस्तलिखिते होती. त्यामुळे लिखित साहित्याच्या प्रती बनवणे हे अत्यंत जिकीरीचे आणि वेळखाऊ काम होते. शिक्षणासाठी किंवा धर्मप्रसारासाठी लागणार्‍या ग्रंथांच्या प्रती निर्माण करणे अत्यंत गरजेचे होते.  याच कालखंडात चीनमधे कागदाचा शोध लागलेला असला तरी तो अजून जगासमोर आलेला नव्हता. कागद हे माध्यम जगासमोर आल्यानंतरही  हाताने लिहिण्याच्या कृतीला अजुनही पर्याय मिळाला नव्हता.

गटेनबर्गने धातूचे खिळे जुळवून तसेच तेलमिश्रीत शाई वापरुन केलेली छपाई ही त्यावेळी मोठी क्रांतीच मानावी लागेल. खिळे जुळवून छपाईच्या तंत्राचे मूळ मात्र चीनमधे सापडते. गटेनबर्गला हा शोध लागण्यापूर्वी सुमारे हजारवर्षे अशी छपाई चीनमधे चालत होती. लाकडाच्या ठोकळ्यावर उलटी अक्षरे कोरली जात व त्यांना शाई लावून ती कागदावर छापली जात. पुढे भाजलेल्या मातीची अक्षरे बनवून व ती जुळवून छापण्याचे तंत्र त्यांना गवसले. पण त्यांनी हे तंत्र अनेक वर्ष चीनच्या बाहेर मात्र जाऊ दिले नाही. रेशीम मार्गावरून पश्चिमेकडील देशांशी चालणार्‍या व्यापारामुळे चीनी व्यापार्‍यांचा अरबी लोकांशी संबंध येत असे. याच संबंधांमधून अरबांना हे तंत्र माहिती झाले व त्यांच्यामार्फत ते युरोपात पोहोचले. मात्र गटेनबर्गने बनवलेला पहिला खिळ्यांचा संच वाचण्याच्या दृष्टीने फारसा चांगला नव्हता.

gutenburg_banner
गटेनबर्गने छापलेल्या बायबलमधील टाईप

मुद्रणासंबधीत टायपोग्राफीची सुरुवात येथून झालेली आपल्याला आढळते. एखादा टाईप बनवताना अतिशय बारकाईने विचार केला गेला आहे. त्या अक्षराचे वळण, त्या अक्षराची जाडी, त्याच्या सरळ रेषांचे कोन व गोलाकार भागांची गोलाई, कॅपिटल व लोअर केस मधली अक्षरे अशा अनेक अंगांनी विचार केला गेलेला आहे. अक्षरांची ही संरचना प्रारंभी हातानीच केली गेली व त्यानंतर त्यांना मुद्रणासाठी वापरण्यायोग्य असे धातूंचे खिळे बनवण्यात आले. टाईप डिझाईनची ही प्रगती अतिशय त्रोटक शद्बात मांडलेली आहे.

mio-designassets0BzCQdutE8gumVE9NYmg5cU83N2sanatomy
टाईपफेसची विविध अंगे

टायपोग्राफी जसजशी प्रगत होत गेली तसतसे वेगवेगळे ’टाईपफेस’ ज्याला आपण सध्या ’फॉन्टस’ म्हणतो ते तयार होत गेले. गटेनबर्गने बनवलेला पहिला टाईप होता ब्लॅक लेटर या नावाचा. पण हा टाईप वाचण्याच्या दृष्टीने अत्यंत किचकट होता. मग १५ व्या शतकातच निकोलस जेन्सन या फ्रेंच संशोधकाने पहिला रोमन टाईप बनवला. हा टाईपफेस वाचण्याच्या दृष्टीने अतिशय सुटसुटीत होता. यानंतर रोमन टाईपलाच उजवीकडे एक विशिष्ठ कोनात तिरका करून ’इटॅलीक्स’ टाईप बनवला गेला. यानंतर १८ व्या शतकापर्यंत टाईपमधे फारशी प्रगती झाली नाही. १८ व्या शतकात इंग्लडमधे विल्यम कॅसलॉन याने रोमन टाईप आणखी चांगल्याप्रकारे डिझाईन केला व त्यानंतर जॉन बास्करव्हिले, डिडोट, बोडोनी यांनीही रोमन टाईपवर आधारीत वेगळे टाईपफेस बनवले. विल्यम कॅसलॉनचा पणतू चवथा कॅसलॉन याने सेरीफ नसलेला सान्स सेरीफ टाईपफेस विकसीत केला.

blog-graphic-02-1024x364-1-800x284
सेरिफ व सान्स सेरिफ टाईपफेस

२० व्या शतकाच्या सुरुवातीला पॉल रेनर या जर्मन डिझायनरने फुच्युरा नावाचा टाईपफेस बनवला. त्यानंतर एरिक गिल या इंग्लीश डिझायनरने गिल सान्स हा टाईपफेस बनवला. जगातला सर्वात जास्त वापरला गेलेला व आवडता टाईपफेस हेल्वेटीका हा स्विस डिझायनर मॅक्स मिडिंगर याने तयार केला. (Helvetica या टाईपच्या निर्मितीला ५० वर्षे झाली त्यानिमित्ताने २००७ साली एक माहितीपट काढला गेला. तो जरुर बघा.)

टायपोग्राफी मधली ही प्रगती मुद्रण शास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. निर्माण झालेल्या या वेगवेगळ्या टाईप्सचे खिळे बनवले गेले व ते छपाईसाठी वापरले जाऊ लागले. रोमन लिपीचे जसे खिळे बनवले गेले तसेच देवनागरी, बंगाली अशा भारतीय लिप्यांचेही खिळे बनले. प्रारंभी ते परदेशातून आयात करावे लागत. पण त्यानंतर भारतातच अनेक टाईपफाऊंड्री चालू झाल्या. हा आहे  टायपोग्राफीचा प्रवास.

Types

आज मोबाईलवरच तुमच्यासमोर माहितीचा खजिना उघडला जातो. पण सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी माहितीची कुठली साधने उपलब्ध होती? टेलिग्राफचा शोध लागलेला होता आणि टेलिफोन अजूनही बाल्यावस्थेत होता. त्यामुळॆ माहितीच्या देवाणघेवाणीत मुद्रणशास्त्राचा शोध अतिशय महत्वाचा आहे. १५ व्या शतकात गटेनबर्गने लावलेल्या मुद्रणयंत्राच्या शोधामुळे पुस्तकांबरोबरच अनेक वर्तमानपत्रांच्या छपाईलाही सुरुवात झाली. गटेनबर्गने शोधलेल्या लेटरप्रेस मशिनमुळॆ एका वेगळ्या शाखेची निर्मिती झाली. टाईपफेसचे खिळे वापरुन छपाईचे तंत्रज्ञान विकसीत होत गेले आणि १९ व्या शतकाच्या अखेरीस या तंत्रातच एक मोठी क्रांती घडली…..

क्रमश:

कौस्तुभ मुद्‌गल

Blog at WordPress.com.

Up ↑